आठ हजार मुलींचा बापमाणूस ... डॉ. हेमंतराजे गायकवाड
'श्री शिवाजी ज्ञानपीठ (इंटरनॅशनल)' ची स्थापना करून छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आणि विचार यांचा अभ्यास आणि प्रचार करणारे मुंबई दादरमधील डॉ. हेमंतराजे गायकवाड त्यांच्या 'शिवाजी महाराज द ग्रेटेस्ट' मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड, संस्कृत या भाषांत बेस्ट सेलर ठरलेल्या ग्रंथामुळे महाराष्ट्रात परिचित आहेत. परंतु त्याअगोदर ते गेल्या ३० वर्षांपासून स्वतःच्या पायावर उभे राहिलेल्या १८ वर्षांवरील आठ हजाराहून अधिक मुलींचे कुटुंबवत्सल बाप बनले आहेत..... काय ? विश्वास नाही बसत का ? पण हे खरं आहे. आईविना पुरुषाने बाळाच्या पालकत्वाची जबाबदारी घेऊन जन्मापासून बाळ वाढविणे हे आपल्या समाजाला सवयीचे झाले आहे.
आताचे शतक हे तंत्रज्ञानाचे, अद्ययावत कॉम्पुटरचे शिक्षण घेऊन उत्तमोत्तम नोकरी पटकावण्याचे. परंतु उच्च शिक्षण घेऊनही गलेलठ्ठ पगार आणि त्यातून आर्थिक स्थैर्य मिळेल की याची कुणालाही खात्री नाही. अशावेळी वयाची पंच्याहत्तरी गाठलेल्या डॉ हेमंतराजे गायकवाड या व्यक्तीने मुलींच्यातील न्यूनगंड घालवून हजारो लेकींना आर्थिक स्थैर्य आणि सुखासमाधानाने जगण्यासाठी सशक्तपणा दिला आहे.डॉ हेमंतराजे हे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एका सधन घरातले. सेंट झेव्हियर्स मध्ये शिक्षण घेऊन ते ग्रँट मेडिकल कॉलेजमधून MBBS DOMS झाले. विद्यार्थीदशेत कॉलेज/विद्यापीठ स्पर्धांमध्ये वादविवाद, रॉक-क्लायंबिंग आणि बॅडमिंटनमध्ये यामध्ये अनेक बक्षिसे जिंकताना रावबहादूर मणियार त्वचा आणि लैंगिक रोगासाठी पुरस्कार, बी.बी. योध संशोधन फेलोशिप, बॉम्बे मेडी मीटमधील पारितोषिक पेपर हे पुरस्कार मिळाले. १९८० मध्ये त्यांच्या इंटर्नशिप दरम्यान त्यांनी पनवेल तालुक्यातील चिरनेर ग्रामीण वैद्यकीय केंद्राची स्थापना केली जे चाळीस खाटांचे ग्रामीण रुग्णालय बनले. याठिकाणी त्यांनी काळवेळ न पाहता गोरगरिबांसाठी रुग्णसेवा केली. नेत्ररोग तज्ज्ञ म्हणून अनेकांना दृष्टी दिली. अनेक वैद्यकीय शिबिरे घेतली. त्यासाठी राज्यपालांच्या संयुक्त समितीने त्यांना राजीव गांधी शिरोमणी पुरस्कारप्रदान करण्यात आला. त्यांना देशसेवा करण्याची तीव्र इच्छा होती आणि गणवेशावरील प्रेम पूर्ण करण्यासाठी १९८६ मध्ये ते होमगार्डमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाले आणि २००४ मध्ये ते बृहन्मुंबईचे कमांडंट झाले. त्सुनामीच्या काळात केलेल्या कार्याबद्दल त्यांचे कौतुक झाले होते. त्यांनी महिला प्रवाशांचा छळ आणि विनयभंग रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा पथक सुरू केले.
२६ /११ च्या मुंबई शहरावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर विशेषतः महत्त्वाच्या असलेल्या मुंबईच्या किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी त्यांनी मच्छिमारांची होमगार्ड म्हणून नोंदणी केली. १९९७ मध्ये स्वतंत्र सुवर्ण जयंती पदक, २००६ मध्ये महाराष्ट्र राज्य होमगार्ड हिरक जयंती पदकाने त्यांना गौरविण्यात आले. पहिल्या तीन मुंबई मॅरेथॉनच्या आयोजनातही त्यांचा मोलाचा मुख्य वाटा आहे. पल्स पोलिओसाठी WHO ने त्यांचे कौतुक केले आहे. त्यांना लायन्स क्लब इंटरनॅशनलतर्फे उक्तृष्ट प्राचार्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांना भारतीय चिकीत्सा रत्न पुरस्कारही मिळाला आहे.पं जवाहरलाल नेहरू संस्थापक अध्यक्ष असलेल्या भारत सेवक समाजाचे प्रादेशिक अधिकारी (महाराष्ट्र) म्हणून त्यांनी पद भूषविले.
डॉ. हेमंतराजे यांच्याकडे आयुष्य घडविलेल्या मुलींचे जैविकदृष्टया रक्ताचे नाते असलेले वडील वेगवेगळे असतील. परंतु या सगळ्याजणींसाठी डॉ हेमंतराजे हे त्यांच्या आयुष्याला वेगळी दिशा देणारे बाप ठरले आहेत. आपण एक व्यावसायिक डॉक्टर किंवा शिक्षक नसून वैद्यकीय क्षेत्रात जाऊ इच्छिणाऱ्या मुलींचे आयुष्य घडविणारे बाप आहोत हे त्यांनी प्रथम स्वतःच्या मनावर बिंबवले. मुलीचा बाप होणे फार अवघड असते हे त्यांना सुरुवातीला लक्षात येऊ लागले मात्र नंतर अंतर्मनाला बजावले, पैसा महत्वाचा नाही तर आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक मुलीचे आपल्याला आयुष्य घडवायचे आहे.फणसाला कितीही काटे असले तरी आत गरे गोड असतात. डॉ हेमंतराजे काहीसे असेच आहेत. सर्व मुलींना त्यांची आदरयुक्त भीती वाटत असते. त्यासाठी या बापमाणसाला समजवून घ्यायला हवं. हा बाप वरून शिस्तप्रिय असला तरी स्वतःच्या आवडी निवडी व्यक्त न करता मुलींच्या वेळप्रसंगी आवडी निवडी,हट्ट पुरविणारा, परंतु मी तुमच्यासाठी मोठा आधार आहे हे सुद्धा त्यांनी मुलींच्यावर बिंबवले.
एका लेकीचा बाप होणं आणि बापाचं काळीज असणारी लेक होणं हे फक्त त्या बाप लेकीच्या नात्यालाच ठाऊक असतं. असं नातं निर्माण झालं तरच आपल्या मनातले इप्सित साध्य होईल हे ओळखून डॉक्टरांनी मनाशी निश्चय केला यापुढे शिक्षणाचे धडे देताना आपल्याला प्रत्येकवेळी कठोर व्हावे लागेल. हे करताना आपल्याकडे शिक्षण घेतलेल्या मुलींचा मानसिक आणि भावनिक विकास कसा होईल याकडे त्यांनी सुरुवातीला लक्ष द्यायला सुरुवात केली. मुलींमध्ये आत्मविश्वास आणि धैर्य हे वडिलांशी असलेल्या चांगल्या नात्यातूनच निर्माण होतं. नोकरीसाठी असणारे आवश्यक ते धडे देताना त्यांनी या मुली मानसिकदृष्टया कशा सक्षम होतील याचेही वर्ग घेण्यास सुरुवात केली. समाजात वावरताना कोणत्याही दडपणाखाली किंवा न्यूनगंड मनात ठेवून वावरू नका. कधीही लाचार व्हायचं नाही. स्वाभिमानानं जगायचं. हे क्षेत्र समाजसेवेचे आणि लोकांना मानसिक आधार देण्याचे आहे हे सदैव लक्षात ठेवा. असा मंत्र प्रत्येकीला दिला. डॉक्टर हेमंतराजे यांनी स्वतः आदर्शवादी जीवन शिस्तीने जगण्याचे तत्व अंगिकारले होते. त्यामुळे आपल्या संस्थेतील मुलींवर योग्य संस्कार करण्याबरोबर तिला उत्तमोत्तम शिक्षण देऊन तिच्या पायावर उभी करणे हे कर्तव्य त्यांनी पार पाडले. याचा परिणाम असा झाला की मुलींना आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कोणतीही अडचण आली नाही.
घरात एका मुलीचा जन्म झाल्यावर सर्वाधिक आनंद तीच्या बापाला होत असतो. लेक जर घराचे सौख्य असेल तर त्या सौख्याचे पावित्र्य तिचा बाबा असतो. बोट धरून चालायला शिकवणारा बाबा असतो, लेकीच्या हट्टासाठी घोडा होणाराही बाबा असतो. कामावरून येताना रोज न चुकता खाऊ आणणाराही बाबाच असतो. लेकीचे पहिले बोबडे बोल, तिने टाकलेले पहिले पाऊल, तिचे लाडिक वागणे, तिची घरभर पैंजणांची छुमछुम हे सगळे पाहून सुखावतो तो बाबा असतो आणि लेकीला नाजूक कळीसारखा सांभाळणारा आणि प्रसंगी रागे भरणारा पण बाबाच असतो, म्हणूनच म्हणतात ना बाप-लेकीच्या नात्याला कसलीच तोड नसते. लेकीच्या प्रत्येक सुखासाठी झटणाराही बाबा शेवटी मुलगी म्हणजे परक्याचे धन हे कटू सत्य पचवणारा बाबा ज्या वेळी तो आपल्या लाडक्या लेकीसाठी अनुरूप जोडीदाराच्या शोधासाठी तो बाहेर पडतो, त्या वेळी त्याला दाहक सामाजिक वास्तविकतेचे चटके बसू लागतात.
मुलीचे लग्न म्हणजे 'कर्जाचा डोंगर' ही वस्तुस्थिती आजही बदललेली नाही. जग बदलतयं, समाजही आधुनिक होतोय असं म्हणतात. पण समाजव्यवस्थेने दिलेलं 'मुलीचा बाप' हे नातं तो ओझ्यासारखं वाहताना दिसतो आहे. या संदर्भात केलेल्या राज्यस्तरीय सर्वेक्षणात उच्चवर्गीयांपासून ते मागावसर्गीयांपर्यंत अन् सधनांपासून ते दारिद्रयरेषेखालच्या कुटुंबापर्यंत लग्नाचा खर्च मुलीच्या वडिलांनाच करावा लागत असल्याचे दिसतेय. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नांदणाऱ्या अठरापगड जातीजमाती आणि धर्मात आजही मुलीच्या लग्नाचा खर्च ही वधुपित्याचीच जबाबदारी मानली जात आहे. बऱ्याच वडिलांना तर ऋण काढून लग्न करण्याशिवायही पर्याय नसतो. अगदी मध्यमवर्गीय वा निम्नमध्यमवर्गीय कुटुंबांमध्येही आज मुलीच्या लग्नापोटी पाच ते सात लाख रुपये खर्च आणि सुमारे तेवढेच तोळे सोनं, असे समीकरण महाराष्ट्रात कायम आहे. हे ओळखून डॉ हेमंतराजे गायकवाड यांनी आपल्याकडे प्रवेश घेतलेल्या मुलीने लग्नवेदीच्या पाटावर उभे राहण्यापूर्वी कधीही कुणाही समोर हात पसरू नये. स्वकमाईने लग्नाला सामोरे जावे यासाठी इन्स्टिट्यूटमध्ये
१८ वर्षाच्या विद्यार्थिनीने प्रवेश घेतल्यानंतर त्यांना सर्टिफिकेट व नोकरीची १००% लेखी हमी दिली. २० ते २३ वर्षाचे असताना काम केले तर सुमारे रु. १५,००००/- x ३६ महिने रु. ५,४०,०००/- ही रक्कम त्यांना मिळते. या रकमेत त्यांचा लग्नाचा खर्च निभावतो. क्लास ३ तास २५ दिवस = ७५ x ४ महीने ३०० तास, प्रॅक्टिकल २० महिने २५ दिवस x ८ तास = ४००० ५००० तासांचा क्लास, प्रदीर्घ अनुभव. ट्रेनिंग दोन भागात असते. पहिले क्लासरूम ट्रेनिंग जे चार माहिने चालते व नंतर प्रॅक्टिकल ट्रेनिंग जे २० माहिने चालते. नेत्र तज्ञाला ऑप्टोमेट्रीस्ट ऑष्टिशन, एक्स रे तज्ञाला एक्सरे टेक्निशियन, शस्त्रक्रियेला ओ.टी असिस्टंट, पेशंट केअर, डी. एम.एल.टी (लॅब टेक्निशियन) हे प्रोफेशनल कोर्स शिकवले जातात. डॉ. गायकवाड्स इन्स्टिट्यूटचे ब्रीद वाक्यच आहे, १००% नोकरीची लेखी हमी. विद्यार्थ्यांचा उत्साह, जिद्द आणि मेहनत यामुळे गेली ३० वर्षे इन्स्टिट्यूटचा निकाल १००% लागत आहे. गेल्या ३० वर्षात एकही मुलगी जॉबलेस (बीन नोकरीची) नाही.
प्रत्येक कोर्सच्या विषयासाठी त्यांनी स्वतः १५ पुस्तके लिहिली आहेत. तीच शिकवली जातात आणि परीक्षा घेतली जाते. वेगळेपण जपणारे हे मोठे काम त्यांच्याकडून घडले आहे. याबद्दल डॉ. गायकवाड्स इन्स्टिट्यूटला इकोनॉमिक टाइम्स आयकॉन ऑफ एक्सेल्लेन्स व सेंट्रल भारत सेवक समाजतर्फे भारत कर्मश्री अवॉर्ड सारखे मानाचे अवॉर्ड्स देखील प्राप्त झाले आहेत.
वडील आणि मुलीमध्ये नेहमी एक सुंदर नातं असतं. ज्या मुलींचं आपल्या वडिलांसोबतच नातं सुंदर असतं. त्यांच्या वयाच्या प्रत्येक टप्प्यातील त्यांच्या आठवणी सुंदर असतात. आपल्या वडिलांबरोबर चांगलं नातं असल्यास आपल्या स्वभावावरही त्याचा परिणाम होत असतो. जो भविष्यातील वैवाहिक आयुष्यावर प्रभाव टाकत असतो. जर वडील खूप रागीट किंवा त्यांचा सहवास न लाभल्यास मुलींमध्ये विश्वासाची कमतरता निर्माण होते आणि आयुष्यात येणाऱ्या पुरुषांशी वागण्याबाबत समस्या निर्माण होतात. याउलट जर वडील सतत पाठिंबा देणारे आणि प्रेम करणारे असल्यास मुलीही तेवढ्याच आत्मविश्वास असलेल्या आणि कणखर बनतात. त्यामुळे मुलींच्या आयुष्यात वडिलांची भूमिका खूप महत्त्वपूर्ण आहे. डॉक्टर हेमंतराजे हे दुसऱ्या प्रकारचे बाप आहेत, त्यामुळे उगाच नाही मुलींना मदर्स डे पेक्षा फादर्स डे ची उत्सुकता असते. फादर्स डे च्या निमित्ताने डॉ हेमंतराजे गायकवाड यांना त्यांच्याकडे आजवर शिक्षण घेतलेल्या अनेक मुलींच्या पत्ररूपी लिहिलेल्या भावना पाहाता डॉ हेमंतराजे या बापाला शुभेच्छा देण्यासाठी त्यांची धडपड असते हे लक्षात येते.
साहित्यामध्ये, व्यवहारामध्ये मातृमहती मोठ्या गौरवाने गायली जाते. परंतु पितृप्रेमाकडे तेवढे लक्ष दिले जात नाही. पित्याची माया ही मुकी असते. ती दिसत नाही. अंतरीची कळकळ कधीकधीच प्रकट होते. बोलकी होते. बरेचदा तर आयुष्याच्या उत्तरार्धात माणसाच्या आठवणी जाग्या होतात आणि नियती माणसाला त्या त्या वयाच्या टप्प्यावर आणून बसवते तेव्हा माणसाला आपल्यातला 'बाप' कळतो. आज आयुष्याचा अमृत महोत्सव साजरा करताना डॉ हेमंतराजे गायकवाड नावाचा "बापमाणूस" कृतार्थ आहे. अनेक मुलींचा फोन येतो आणि मोबाईलमधून आवाज येतो 'बाबा' कसे आहात.... तेव्हा तीन दशकातील अनेक आठवणी त्यांच्या मनाला उभारी देतात.
डॉ. गायकवाड्स इन्स्टिट्यूटचा पत्ता :
२०३, आकांक्षा बिल्डिंग, एन सी केळकर रोड, दादर-पश्चिम, मुंबई ४०००२८ Contact: ८६९१९७३८७४ /९३२१६९०६२५
Website : www.drgaikwadinstitute.com
- रवींद्र मालुसरे
अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई ९३२३११७७०४
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा