गुरुवर्य गणेश केळकर :वृत्तपत्र लेखक व कार्यकर्त्यांचा वाटाडया

गुरुवर्य गणेश केळकर : वृत्तपत्र लेखक व कार्यकर्त्यांचा वाटाडया 

.............................................

मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे माजी अध्यक्ष आणि साहित्यिक स्व. गणेश केळकर यांचा आज ७१ वा जन्मदिवस! यनिमित्ताने त्यांच्या विविधांगी कार्यकर्तृत्वाचा घेतलेला आढावा... .............................................

 आता या घटनेला २० वर्षे उलटून गेली आहेत. मे २००४ चा शनिवार, नेहमीप्रमाणे आम्ही मराठी वृत्तपत्र लेखक संघांचे पदाधिकारी आणि नियमित हजेरी लावणारे  सभासद दादर पूर्वेकडील शिंदेवाडीच्या कार्यालयात येण्यासाठी आपापल्या कार्यालयातून किंवा घरून शिरस्त्याप्रमाणे निघालो होतो. गणेश केळकरही निघाले होते. संध्याकाळी वा आम्ही कार्यालय उघडायचो....आणि बरोबर त्याच वेळी बातमी आली.. गणेश केळकर यांचे हार्ट अटॅकने निधन झाले. त्यांना अस्वस्थ वाटू लागले म्हणून लोअर परेल स्टेशनवरून ते परत घरी गेले ते संघात परत येण्यासाठी. कोणत्याही आजाराची पूर्वसूचना देता केळकर गेले होते. केळकरांच्या निधनाच्या बातमीवर आम्हा सहकाऱ्यांपैकी अखेरपर्यंत कुणाचाच विश्वास बसत नव्हता. प्रत्येकाला ही बातमी खोटी आहे असेच वाटत होते. परंतु... देवाजीच्या मनात काही वेगळेच होते. सतत चैतन्यशील वृत्तीने काम करणाऱ्या, सुपारीच्या खांडाचेही व्यसन नसलेल्या केळकरांचा मृत्यू वयाच्या पन्नाशीत हृदयविकाराने व्हावा याचा आम्हा कार्यकर्त्यांना एक जबरदस्त आघात बसलाहोता. दुर्दैवी योगायोग म्हणजे पत्रलेखन चळवळीत काम करणाऱ्या वृत्तपत्रलेखकांचा शनिवार हा आठवड्यातील एकमेव हक्काचा दिवस. चळवळीवर नितांत प्रेम करणारे बुजुर्ग आणि नवे अशा दोन्ही पिढीतील पत्रलेखक प्रत्येक शनिवारी शिंदेवाडीतील' पत्रलेखक संघात हमखास भेटणार. गेल्या कैक वर्षांचा हा शिरस्ता केळकरांनीही पाळला होता. मात्र मेच्या शनिवारी हा नियम केळकारांनी तोडला. ते संघात आले नाहीत तर कार्यकर्त्यांनाच त्यांच्या घरी जावे लागले. तेही त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी. नियतीचा हा कोणत्या प्रकारचा योगायोग म्हणायचा?

गणेश केळकरांचा जन्म १३ ऑक्टोबर १९५३ सालचा. वडील लक्ष्मणराव यांचा सामाजिक कार्याचा वसा गणेश केळकरांनी घेतला होता. वरळी येथील गांधीनगर परिसरात त्यांचे बालपण आणि तारुण्य गेले. गांधीनगरमध्ये पूर्वी झोपडपट्टी होती. आता तेथे पक्क्या इमारती उभ्या राहिल्या आहेत.. झोपडपट्टीत आढळणारी असामाजिक तत्त्व गांधीनगरमध्ये देखील होती. पण गणेश केळकर हे अशा अपप्रवृत्तींपासून सदैव दूर राहिले. म्हणूनच समाजात ते चिखलात फुलणाऱ्या कमळासारखे शोभून दिसले. याचे मुख्य कारण त्यांचे वडील लक्ष्मणराव केळकर त्यांनी आपल्या मुलांवर केलेले संस्कार हे होय. लक्ष्मणराव हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांच्या विचारांचा वारसा गणेश केळकर यांनी देखील उचलला. पण सामाजिक कार्य करत असताना त्यांनी कधीही राजकारण केले नाही. इन्कम टॅक्समधील नोकरी सांभाळून ते विविध संस्थांच्या माध्यमातून समाजसेवा करीत आले. किंबहुना पूर्णपणे निर्व्यसनी असलेल्या केळकरांना समाजसेवेचे फार मोठे व्यसन होते. मुंबई शहरातील विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात केळकर सदैव पुढे असलेले दिसत. सकाळी नऊ वाजता घरातून बाहेर पडलेले केळकर रात्री बारानंतरच घरी परतत. ऑफिसचे काम संपवल्यानंतर ते सामाजिक कार्यात रमत. घरचे कार्य असल्याप्रमाणे 'विविध संस्थांच्या कार्यक्रमांमध्ये ते हसतमुखाने वावरत. हे करत असतानाच ते लेखन, वाचन आणि चिंतन करीत. त्यांना लिखाणाची आवड होती. लेख पत्रलेखनाद्वारे त्यांनी विपुल लिखाण करतानाच जनतेची गाऱ्हाणी नागरी समस्या प्रभावीपणे मांडल्या.

मुंबईतील सर्वच आघाडीच्या वर्तमानपत्रांमध्ये केळकर यांची शेकडो पत्रे आतापर्यंत प्रसिद्ध झाली आहेत. त्यांची आतापर्यंत हजार पत्रे प्रसिद्ध झाली आहेत. दादर येथील वसंत बुक स्टॉलचे अरविंद तेंडुलकर यांनी त्यांची अनेक पुस्तकें प्रकाशित केली आहेत. याशिवाय त्यांचे 'संसारी वाहे झरा सुखाचा' हे नाटकाचे पुस्तक देखील प्रकाशित झाले आहे. मोत्यांसारखे अक्षर आणि सोपे मराठी हे केळकर यांच्या लेखनाचे वैशिष्ठ्य होते. हिंदू सण आणि उत्सव या त्यांच्या पुस्तकाच्या त्यांच्या हयातीत एकविस आवृत्त्या निघाल्या होत्या. अबालवृद्धांमध्ये हे पुस्तक प्रचंड लोकप्रिय झाले. अमेरिकेतील मराठी माणसांनी तर हे पुस्तक मुंबईतून खास मागवून घेतलेया पुस्तकाव्यतिरिक्त त्यांची इतरही अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली होती. महिमा सणांचा या दोन आवृत्त्या निघालेल्या त्यांच्या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ठ वाङमयाचा पुरस्कार मिळाला. भारतीय संस्कृती : प्रतिके आणि संस्कार (पाचवी आवृत्ती), प्रार्थना (तृतीय आवृत्ती), सात वार बारा महिने (द्वितीय आवृत्ती), संस्कार महिमा (द्वितीय आवृत्ती) आणि चातुर्मासातील सण - व्रते (द्वितीय आवृत्ती) या त्यांच्या पुस्तकांनी सर्व वयोगटातील वाचकांवर संस्कारांची शिंपण केली. केळकर यांनी जशी धार्मिक पुस्तके लिहिली तशी वीर सावरकर, डॉ. हेडगेवार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या रथीमहारथिंवर आगळीवेगळी पुस्तके संपादीत देखील केली. त्यांनी एकांकीका देखील लिहिल्या आणि आकाशवाणी दूरदर्शनवर कार्यक्रम देखील केलेत्याचप्रमाणे 'जागरूक 'नागरिक' म्हणून देखील त्यांचा गौरव करण्यात आला होता. दैनिक मराठा, दैनिक शिवनेर, दैनिक सकाळ, दैनिक नवाकाळ, दैनिक सामना, दैनिक लोकसत्ता, हंटर साप्ताहिक यवतमाळ, कोकण वैभव साप्ताहिक, भक्तिसंगम मासिक आंदींतून त्यांनी विपुल साहित्यलेखन केले आहे. 'साहित्य शतरंग' आणि 'चळवळ' या नियतकालिकांचे त्यांनी संपादन केले होते. मध्यंतरी काही वर्षापूर्वी त्यांनी दैनिक कृषीवलमध्येही लेखन केले होते. मुंबईतील वरळी येथील आचार्य अत्रे यांचा अर्धपुतळा, प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात आचार्य अत्रे यांचे तैलचित्र लावणे, व्यसनमुक्ती, ग्रंथप्रसार, मराठी वाचवा मराठी - टिकवा अशा चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता

सामाजिक, सांस्कृतिक चळवळीत वावरताना कोणत्याही प्रकारचा गाजावाजा करता काही माणसांची शांतपणे आपले काम करण्याची एक पद्धत असते. मुंबईतील पत्रलेखन चळवळीचे एक अध्वर्यू गणेश केळकर यांनी  त्यांच्या पत्रलेखन आणि साहित्य क्षेत्रातील आपल्या तीस वर्षांच्या कारकीर्दीत हे तंत्र कायम जोपासले. मग ते वृत्तपत्रलेखक संघाचे किंवा वरळीच्या प्रगती कला मंडळाचे उपक्रम असोत किंवा सामाजिक, सांस्कृतिक चळवळीतील त्यांचे काम असो. त्यांच्यासोबत 'काम करणाऱ्या आम्हा कार्यकर्त्यांना ही त्यांची कामाची पद्धत माहीत होती

महाराष्ट्रातील मराठी वृत्तपत्रांतून पत्रलेखन करणाऱ्या पत्रलेखकांची आद्यसंस्था मराठी वृत्तपत्रलेखक संघाशी केळकर जवळपास ३० वर्षे निगडित होते. पत्रलेखक संघ ही त्यांची मातृसंस्था होती. एक सामान्य कार्यकर्ता ते अध्यक्ष अशी वाटचाल त्यांनी केली. स्वभावात जिद्द आणि बंडखोर वृत्ती असल्याने त्यांनी संघाला प्रतिकूल परिस्थितीतून उत्कर्षापर्यंत नेले. या काळात त्यांचे अनेकांशी वादविवाद झाले पण संस्थेपेक्षा व्यक्ती मोठी नाही या त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे केळकर टिकून राहिले. सैन्य जसे पोटावर चालते तशी सामाजिक संस्थादेखील आर्थिकदृष्ट्या   सक्षम असायला पाहिजे हा ध्यास त्यांनी कायम घेतला. त्यादृष्टीने पावले टाकून विविध माध्यमांतून संघाला स्वतःच्या पायावर आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविले. वृत्तपत्रलेखक संघ ही मुंबईतील जागृत नागरिकांची वैचारिक आणि सांस्कृतिक चळवळ व्हावी हे त्यांचे स्वप्नं त्यांच्या हयातीत पूर्ण झाल्याचे समाधान त्यांना लाभले. कार्यकर्त्यांना वेळोवेळी ते तसे सांगतही असत की, मुंबईतील सामाजिक, सांस्कृतिक चळवळींचा इतिहास लिहायचा झाला तर इतिहासकाराला मराठी वृत्तपत्रलेखक संघाला वगळून पुढे जाता येणार नाही. सुदैवाने केळकरांचे हे शब्द आज खरे ठरले आहेत. संघ आज त्या टप्प्यावर पोहोचला आहे. याचे श्रेय नि:संशय संघाच्या जुन्या-जाणत्या  ग शं सामंत, मधू शिरोडकर, विश्वनाथ पंडित, वि.अ सावंत, शरद वर्तक, विजय कदम, भाई तांबे या आणि इतर  कार्यकर्त्यां प्रमाणेच केळकरांनाही जाते. मराठी वृत्तपत्र लेखक संघ आणि गणेश केळकर हे एक अद्वैत होते.

संघ कार्यरत ठेवणे, पत्रलेखकांना प्रतिष्ठाप्राप्त करून देणे नवीन पत्रलेखक तयार करणे ही पत्रलेखकांची चळवळ अव्याहतपणे सुरू ठेवणे हे ध्येय उराशी बाळगून गणेश केळकरांनी निःस्वार्थीपणे पत्रलेखक संघाची सेवा केली. मी रवींद्र मालुसरे, दत्ताराम घुगे, प्रकाश नागणे, सुनील शिंदे, रोपळेकर, दिलीप सावंतपास्कोल लोबो,दत्ताराम गवस, नितीन चव्हाण, मनोहर मांदाडकर, मनोहर साळवी, वसंत हरयाणरमेश सांगळे, नारायण परब, दिगंबर चव्हाण, सखाराम जाधव, दिलीप सावंत, लक्ष्मण कोकाटे, श्रीकांत खांडके,सुरेंद्र देवस्थळी, विजय पवार, नवनाथ दांडेकर असे संघाची धुरा वाहणारे अनेक कार्यकर्ते केळकरांनी तयार केले. वृत्तपत्र लेखक संघाला आज समाजात जो सांस्कृतिक चेहरा प्राप्त झाला आहे त्यामागे केळकरांचे योगदान अश्याप्रकारे मोठे आहे. प्रसंगी स्वतःच्या कौटुंबिक बाबी दूर सारून त्यांनी संघाचे कार्य महत्त्वाचे मानले. त्याची उदाहरणे देण्याची ही जागा नव्हे. मात्र याची जंत्री फार मोठी होईल हे निश्चित...

 सोलापूर वृत्तपत्र लेखक संघटनेचे सर्वोत्कृष्ट पत्रलेखनाचे प्रथम पारितोषिक,  'जागरुक नागरिक' उत्कृष्ट वृत्तपत्र लेखक म्हणून मुंबईच्या  विविध संस्था व्यक्तींनी गणेश केळकरांना सन्मानीत केले होते. मुंबईच्या महापौरांकडून १९७८ १९८२ साली गौरव,   सामाजिक आशयाच्या प्रभावी नाट्याला महाराष्ट्र राज्य दारुबंदी शिक्षण विभागातर्फे नाट्याचार्य खाडिलकर पुरस्कार, श्रमिक सभा यांची नाट्यलेखनाची पारितोषिके, उल्लेखनीय साहित्यसेवेबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकर वाङ्मय पुरस्कार, मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा उत्कृष्ट वाड्मय निर्मितीचे 'सृजन साहित्य' पुरस्कार अशी अनेक पारितोषिके त्यांना मिळाली. हिच त्यांची खरी कमाई होती.

सौजन्यमूर्ती म्हणून लक्षात राहिलेल्या अशा गुरुवर्य गणेश केळकर यांचे वयाच्या अवघ्या ५१ व्या वर्षी हृदय विकाराच्या झटक्याने तडकाफडकी अकाली निधन व्हावे हे समाजाचे दुर्दैव होयगणेश केळकर यांच्या स्मृतीस आमची भावपूर्ण आदरांजली.  त्यांच्या निधनाने विविध क्षेत्रात आपल्या कर्तबगारीचा वेगळा ठसा उमटविणारे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आणि आता केवळ उरल्या आहेत त्या त्यांच्या आठवणी

--------------------------------------------------

गणेश केळकरांचा परिचय

प्रकाशित पुस्तके :- हिंदू सण उत्सव (२१ वी आवृत्ती), महिमा सणांचा (द्वितीय आवृत्ती) महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मयाचा पुरस्कार प्राप्त, सर्वाधिक खपाचे पुस्तक साप्ताहिक 'लोकप्रभा' कडून प्रशंसाभारतीय संस्कृती : प्रतीके आणि संस्कार (पाचवी आवृत्ती) प्रार्थना (तृतीय आवृत्ती) शिर्डीचे साईबाबा, सात वार बारा महिने (द्वितीय आवृत्ती), संस्कार महिमा (द्वितीय आवृत्ती), चतुर्मासातील सण-व्रते (द्वितीय आवृत्ती) तुलसी विवाह / व्रतवैकल्ये / अधिकमासाचे महत्त्व, आघात / तडा (एकांकिका संग्रह), लक्ष्यवेध (पत्रसंग्रह)

संपादित पुस्तके :- महामेरु (स्वा. सावरकर यांच्या जीवन पैलूवरील आगळे पुस्तक), चैतन्य (डॉ. हेडगेवार डॉ. आंबेडकर असामान्य जीवन पैलूवरील पुस्तक), अनुबंध (वृत्तपत्र लेखकांचा कार्य परिचय),

पुरस्कारः - आचार्य अत्रे फोंडेशनकडून गौरव - १९७६, श्रमिक महिला सभेचा उत्कृष्ट नाटक लेखन पुरस्कार- १९७७, मुंबईच्या महापौरांकडून जागरुक नागरिक (१९७८), आणि उत्कृष्ट वृत्तपत्र लेखक सन्मान (१९८२), भारत सेवक समाज (समाचार प्रचार समितीतर्फे) आदर्श कार्यकर्ता प्रशस्ती पत्र - १९८०, दारुबंदी (शिक्षण) संचनालय, महाराष्ट्र शासन मुंबईतर्फे सन्मान पत्र - १९८०, महाराष्ट्र राज्य नशाबंदी मंडळ एकांकिका लेखन पुरस्कार - १९८१, नाट्याचार्य खाडिलकर नाट्यलेखन पुरस्कार १९८४, चंद्रकांत वेणेगुरकर समिती सोलापूर, सर्वोत्कृष्ट वृत्तपत्र लेखन पुरस्कराचे पहिले मानकरी - १९८८, प्रगती मैत्र पुरस्कार - १९९१, संस्कृती साहित्य पुरस्कार - १९९३, सृजन साहित्य पुरस्कार - १९९३ / १९९६, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वृत्तपत्र लेखन पुरस्कार - १९९४, अष्टगंध पुरस्कार - १९९५दया पवार स्मृती साहित्य पुरस्कार - १९९७, महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा 'महिमा सणांचा' या पुस्तकास १९९७-९८ चा पुरस्कार, आशीर्वाद साहित्य पुरस्कार - १९९९, सामाजिक समरसता सेवक पुरस्कार - २०००, स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार (उत्तुंग सांस्कृतिक परिवार) २००३

पारितोषिके :- युवक क्रांती दल (युक्रांद) आयोजित वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक १९७०, नाटककार दत्ता आयरे स्मृती उत्कृष्ट दिग्दर्शन एकांकिका लेखन पारितोषिक - १९७३डॉ. काशिनाथ घाणेकर स्मृती उल्लेखनिय नाट्य अभियानाचे,  पारितोषिक - १९७८, प्रागतिक साहित्यिक मंडळ - काव्य स्पर्धेत पारितोषिक - १९८०साप्ताहिक 'लोकप्रभा' सर्वोत्कृष्ट पत्रांना पारितोषिके - १९८०/८१, मुंबई तरुण भारतची सर्वोत्कृष्ट पत्रांची निवड - १९८१/१९८२, मराठी वृत्तपत्र लेखक संघ आयोजित विविध स्पर्धा

स्पर्धेतील पारितोषिके :- सर्वोत्कृष्ठ पत्र स्पर्धा प्रथम क्रमांक १९७२, सातत्यपूर्ण वृत्तपत्र लेखन  १९७८, विक्रमी वृत्तपत्र लेखन १९७९. सर्वोत्कृष्ट वृतान्त लेखन १९८३, उत्कृष्ट वृत्तपत्र लेखन  १९९५, अनुभव कथन १९९५, मुंबई वृत्तपत्र लेखक संघ, उत्कृष्ट वृत्तपत्र लेखक  १९८०

स्तंभलेखन :- (लेखमाला) दैनिक कृषीवल (नवसाक्षर) १९७६, मुंबई तरुण भारत (भारतीय संस्कृतीचे प्रतीके) १९९४, मुंबई सकाळ (महिमा सणांचा) १९९४, दैनिक सामना (वृक्षपूजन / संस्कार) २०००, महाराष्ट्र दर्शन (दिनदर्शिका 'वृक्षवल्ली' लेखमाला २००१), विश्व हिन्दू परिषद (दिनदर्शिका - 'संस्काराची प्रतीके' लेखमाला २००१)

नियतकालिकांचे संपादन :- साहित्य शतरंग (दिवाळी अंक) प्रेरणा (वार्षिक), -: कार्यकारी संपादक :-चळवळ (पाक्षिक), प्रतिनिधी :- १० वर्षे मुंबई तरुण भारत, वर्षे मुंबई संध्या (सकाळ वृत्तपत्रसमूह), १० वर्षे (हंटर - अर्ध साप्ताहिक, यवतमाळ, हस्तलिखित मासिकाचे संपादन :- शिवदर्शन / जयश्री

सल्लागार :- आध्यात्मिक चैतन्य (मासिक), साईप्रसाद (त्रैमासिक), नवकिरण (त्रैमासिक), गगनगिरी पत्रिका (मासिक), शिखर प्रकाशन ट्रस्ट, सह्याद्री को. . हौ. सोसायटी (३२० सदनिकांचे गृहसंकुल)

विविध संस्थांमधून संस्थात्मक कार्य :- बाल कल्याण समिती (संघटक), मुंबई मराठी बाल साहित्य परिषद (उपाध्यक्ष), साने गुरुजी वाङ्मय मंडळ (अध्यक्ष), मराठी वृत्तपत्र लेखक संघ (माजी अध्यक्ष / कार्याध्यक्ष), कोकण मराठी साहित्य परिषद (कार्यकारणी सदस्य), आचार्य अत्रे ग्रंथालय (सरचिटणीस), राष्ट्रीय एकात्मता मंच (सरचिटणीस), मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय (आजीव सदस्य), भारतीय विचार प्रतिष्ठान (अध्यक्ष), कलागौरव (माजी अध्यक्ष), मुंबई मराठी पत्रकार संघ (सदस्य), जनकल्याण समिती (विभाग प्रमुख), नागरी संरक्षण दल (मा. विभाग प्रमुख), प्रगती कला मंडळ (माजी अध्यक्ष / कार्याध्यक्ष /प्रमुख कार्यवाह/कोषाध्यक्ष), साने गुरुजी बाल विकास मंदिर (आजीव सदस्य), दलित शिक्षण प्रसारक समिती (आजीव सदस्य), आचार्य अत्रे स्मारक समिती (कार्य. सदस्य), मराठी विज्ञान परिषद (आजीव सदस्य), संपूर्ण महाराष्ट्र समिती (कार्यकारिणी सदस्य), स्वा. वीर सावरकर अभ्यास मंडळ (आजीव सदस्य), संत रोहिदास विचार केंद्र (अध्यक्ष), बेपत्ता व्यक्ति शोध सहाय्यक समिती (कार्य. सदस्य)



  
















- रवींद्र मालुसरे

अध्यक्षमराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई

९३२३११७७०४

इतर पोस्ट वाचण्यासाठी समोरची 👉अनुक्रमाणिक clik करा 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संकल्पपूर्ती दाता : स्व. तानाजीदादा मालुसरे

प्रभादेवी श्री विठ्ठल मंदिर : इतिहास, परंपरा आणि नैमित्तिक कार्यक्रम

बैल दिवाळी इतिहास, संस्कृती आणि शेतीचे धागे विणणारा सण