आगरी-कोळ्यांची माटुंगा येथील श्रीमारुबाईचे जागृत देवस्थान











आगरी-कोळ्यांची माटुंगा

येथील श्रीमारुबाईचे जागृत देवस्थान

आताचे मुंबई आणि पूर्वीचे बॉम्बे हे शहर मुळात अरबी समुद्रातील सात बेटे जोडून तयार झाले आहे. त्या बेटांमध्ये कुलाबा, ओल्ड वूमन आयलंड, बॉम्बे, माझगाव, वरळी, माहिम, माटुंगा यांचा समावेश होता. सात बेटांच्या मुंबापुरीचे आद्य रहिवासी म्हणजे कोळी, आगरी, भंडारी, पाचकळशी या समाजाचे लोक होते. तीनशे वर्षांपूर्वी मुंबईतील सर्व गावे ब्रिटिशांनी ताब्यात घेतली. यापैकी बहुतांश बेटांना त्यावेळी त्यांची ग्रामदेवता होती. गावातील लोकांचे ती रक्षण करते अशी तेथील गावकऱ्यांची श्रद्धा होती. माटुंगा बेटावरील गावकऱ्यांची श्रीमारुबाई ही ग्रामदेवता होती.

माटुंगा बेट हे तेव्हा आताच्या परळपासून ते शीवपर्यंत विस्तारलेले होते. शीव ही पूर्वीच्या मुंबईची उत्तर सीमा होती. मराठीमध्ये सीमा, हद्दीला शीव म्हणत असल्याने तेच नाव या भागाला पडले. माटुंगा बेटावर प्रामुख्याने कोळी-आगरी, भंडारी लोक मोठ्या प्रमाणात राहत होते. माटुंग्याला फार पूर्वी   श्रीमारुबाई  टेकडी गाव असेही म्हटले जायचे. कालांतराने या नावाचे माटुंगा हे लघुरूप प्रचलित झाले. काही आख्यायिकांनुसार प्राचीन काळी मातंग नावाच्या ऋषींनी या भागात घोर तपश्चर्या केल्याने या भागाला मातंगाश्र असे म्हटले जाऊ लागले. कालांतराने त्याचा माटुंगा हा अपभ्रंश प्रचलित झाला.  आताच्या सायनला खेटून उभे असलेल्या माटुंगा इथल्या परिसरात पूर्वी ताडी काढणे असे व्यवसाय करायचे. तसेच भातशेती आणि फुलांच्या वाड्या तसेच शेजारच्या वडाळ्यात मिठागरे हे येथील स्थानिकांचे उपजीविकेचे साधन होते. याच माटुंग्यात 'माटुंगा टेकडी' येथे या गावाचे ग्रामदैवत 'श्रीमारुबाई ' चे देवस्थान होते. काळाच्या ओघात विकासकामांमध्ये ही टेकडी नाहीशी झाली. या टेकडीच्या जागेवर सध्याच्या माटुंगा - किंग्ज सर्कलच्या उड्डाणपुलासमोर जैन मंदिर उभे राहिले आहे. 1700 AD पासून ओळखले जाणारे, माटुंगा हे गावांचे एक समूह होते, जे नंतर सत्ताधारी ब्रिटीशांनी एकाच शासकीय छत्राखाली आणले.  ब्रिटिशांनी १ सप्टेंबर १८८८ मध्ये 'बीयटी' कायद्याखाली मुंबईच्या विकासासाठी मंदिराची व ग्रामस्थांची जागा ताब्यात घेवून त्यांना सध्याच्या अरोरा सिनेमा येथील नाथालाल पारेख मार्गावर जागा दिली, अशी माहिती 'मुंबई गॅझेट' मध्ये मिळते. सुमारे तीनशे वर्षाहून अधिक काळ पुरातन इतिहास असलेल्या   श्रीमारुबाई   ग्रामदेवतेचे हे मंदिर १९०४ पासून पारेख मार्गावर स्थानापन्न झाले आहे. श्रीमारुबाई  देवस्थानाचे मुंबईच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. येथेच श्रीमारुबाई चे वास्तव्य असल्याने ग्रामस्थांनी या देवीला आपली ग्रामदेवता म्हणून पुजण्यास सुरुवात केली.श्रीमारुबाई नावामागील पूर्वपीठिका अशी की, माटुंग्यामध्ये जलजन्य आजार कोळी, नारू, देवी, नायटा मोठ्या प्रमाणावर होत असत. (त्यावेळी हे बेट फारसे विकसित नव्हते व समुद्राच्या पाण्याने वेढलेले होते). त्याकाळी माटुंग्यात या रोगांची लागण पसरली होती. या आजारांनी लोक दगावत होते. लोक देवीला साकडे घालण्यास मंदिरात यायचे. त्यावेळी गावकरी श्रीमारुबाई ला अभिषेक करून ते पाणी प्राशन करत. त्यामुळे प्रकृती ठणठणीत राहाते असा त्यांचा विश्वास होता. त्यामुळे मरणाऱ्याला तारणारी देवी म्हणून देवीचे नाव श्रीमारुबाई  असे पडले. यापैकी माटुंगा या गावात एका छोटया जागेवर श्रीमारुबाई च्या मंदिराची स्थापना करण्यात आली. (जी अपमृत्यूपासून भक्ताचे रक्षण करते.) असे म्हणण्यात येऊ लागले.

श्रीमारुबाई ची मूर्ती स्वयंभू असून तिचे मूळ स्थान किंग्ज सर्कल भागातील एका पिंपळाच्या झाडाखाली (अश्वत्थ वृक्ष) होते. १८ व्या शतकात ईस्ट इंडिया कंपनीने समुद्रात भराव टाकून व सात बेटे जोडून आजचे मुंबई शहर आकाराला आले. श्रीमारुबाई मंदिराचे विश्वस्त गावंड (त्यांचे पूर्वज माटुंगा गावचे सरपंच तसेच श्रीमारुबाई  देवस्थानचे प्रशासक होते) यांच्याकडे उपलब्ध असलेल्या ऐतिहासिक माहितीनुसार, बॉम्बे इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट (बी.आय.टी.) कायदा १८८८ अन्वये माटुंग्यातील गावकऱ्यांची जमीन ब्रिटिश सरकारने मुंबई शहराच्या विकासासाठी संपादित केली. त्यानंतर रस्ते व इमारतीच्या बांधणीसाठी   श्रीमारुबाई  ची मूर्ती किंग्ज सर्कल भागातून सध्याच्या ठिकाणी हलविण्यात आली. माटुंग्यातील गावकऱ्यांची श्रीमारुबाई या ग्रामदेवतेप्रती असलेली श्रद्धा लक्षात घेऊन तिचे एक लहानसे देऊळही बांधून देण्यात आले. शारदादेवी असलेल्या श्रीमारुबाई च्या इच्छेनुसार माटुंगा परिसरातील १०० भूखंड १८९० ते २००० या कालावधीत शैक्षणिक संस्थांसाठी राखीव ठेवण्यात आले. कांचीपुरमच्या शंकराचार्यांनी श्रीमारुबाई ला कुंभाभिषेक केला तसेच प्रत्येक पोर्णिमेला चंडिका होम करण्यास सांगितले. तेव्हापासून आजपावेतो ही प्रथा यथासांग पाळण्यात येत आहे.

श्रीमारुबाई  ही अष्टभूजा दुर्गाही असून तिची पवित्र भूमी माटुंग्यातील आपल्या लेकरांवर कायमच कृपादृष्टी असते. या देवीच्या आशिर्वादाने तिच्या भक्तांचे कोटकल्याण होते. मंदिरात नवरात्रोत्सव  मोठ्या थाटात साजरा केला जातो. लाल-पिवळा-मळवट भरलेल्या काळ्या पाषाणातील स्वयंभू मूर्तीवर सोन्याचा चढवलेला मुखवटा असे देवीचे अगदी तेजस्वी रूप येथे पाहायला मिळते. श्रीमारुबाई  देवीची दोन फूट काळी मूर्ती पूर्वाभिमुख आहे. मूर्तीवर सिंदूर मढवलेला आहे आईची मूर्ती देवीला भगवान शिवाचा त्रिशूळ, भगवान विष्णूची चकती, भगवान वरुणाचा शंख, भगवान कुबेराचा क्लब आणि भगवान इंद्राची वज्र धारण केलेली दिसते. देवी शक्ती आणि संरक्षणाचे प्रतीक आहे. दुर्गा भवानीचे रूप असलेल्या मातेच्या दर्शनासाठी येथे दररोज शेकडो भाविक येतात. चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंतीच्या दिवशी देवीची पालखी काढली जाते. तसेच दर महिन्याच्या पौर्णिमेला देवीची मोठी पूजा व नवचंडी यज्ञ केला जातो.

१९५१ मध्ये ग्रामस्थांनी मंदिराची ट्रस्ट रजिस्टर केली. त्या वेळी काशीनाथ गावंड हे ट्रस्टचे विश्वस्त होते. त्यानंतर १९८७ पासून व आतापर्यंत ट्रस्टचे विश्वस्तपद अनिल गावंड यांच्याकडेच आहे. लहानशा घुमटित असलेल्या मंदिराचे १९१२ मध्ये संपूर्णपणे संगमरवरी बांधकाम करण्यात आले. २००० मध्ये कांची कामकोटी पिठाच्या शंकराचार्यांच्या हस्ते कुंभाभिषेक करून मंदिराला सोन्याचा कळस चाढविण्यात आला. नवरात्रोत्सवात मंदिरात २ लाखांहून अधिक भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. पंचमीच्या दिवशी महिलांसाठी हळदीकुंकूवाचा कार्यक्रम ठेवला जातो. श्रीमारुबाई ची तेजःपुंज मूर्ती पाहता क्षणी डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे. मंदिराचा गाभारा सोने-चांदीने मढविलेला असून दररोजची फुलांची बदलती आरास नयनरम्य आहे. दोन फुटांची 'दुर्गास्वरूप' असलेली ही मूर्ती अष्टभुजा असून सिंहावर आरूढ झालेली आहे. स्वयंभू पाषाणाच्या मूळ मूर्तीचे जतन करण्यासाठी मूर्तीच्या अंगावर सुवर्ण कवच बसविले असून मुखवटाही सोन्याचा करण्यात आला आहे. वर्षभरात येणाऱ्या सर्व पूर्णिमा आणि चैत्र व अश्विन नवरात्र उत्सव येथे थाटात साजरा केला जातो.

श्रीमारुबाई देवीला चैत्र त्रयोदशीला ५१ किलो श्रीखंडाचाअभिषेक व चतुर्दशीला देवीचा नवचंडी होम केला जातो. चैत्र पौर्णिमेला देवीचा पालखी सोहळा असतो. पारंपारिक आगरी-कोळी बँड व ढोल-ताशांच्या गजरात 'श्रीमारुबाई 'ची सोन्याच्या पालखीतून मिरवणूक काढली जाते. कोजागिरी पौर्णिमेला नवचंडी होमाचे आयोजन केले जाते. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठातून आणलेला अखंड तेवता महानंदादीप हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे.

धार्मिक पावित्र्य जपताना मंदिर ट्रस्टने विविध सामाजिक - उपक्रमांची जोडही दिली आहे. मंदिरातर्फे आदिशक्ती योग विद्यापीठ चालवले जाते. महापालिका शाळांमधून बालवाड्या तसेच सायन रुगणालयात गोरगरीब रुग्णांना औषधोपचारासाठी आर्थिक मदत दिली जाते. तरुणांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी प्रेरणा कार्यशाळा आयोजित केल्या जातात. नवरात्रौत्सवात दुर्गा पूजक मंडळांची भजने, भक्तिगीतांचा कार्यक्रम, वीणावादन, ललितापंचमी, दुर्गाष्टमी , कुमारीपूजन, अष्टमी हवन, विजयादशमी अशी विविध धार्मिक अनुष्ठानने आयोजित केली जातात. माटुंग्याचे श्रीमारुबाई गावदेवी मंदिर, जे महाराष्ट्रीयन माणसांच्या ट्रस्टींद्वारे व्यवस्थापित केले जाते, हे सर्व स्तरातील सर्व धार्मिक संप्रदायांसाठी खुले प्रार्थनास्थळ आहेगोलू (मूर्ती आणि बाहुल्यांचे प्रदर्शन) प्रदर्शित करून विशिष्ट दक्षिण भारतीय पद्धतीने नवरात्रोत्सव साजरे करतात. नवरात्रीच्या काळात मंदिरात कलश स्थापना, हळदी कुमकुम, अभिषेक, पूजा, सरस्वती आवाहन, कुमारी पूजन आणि अष्टमी होम असे  विविध प्रकारचे उत्सव आयोजित केले जातात. भजने,  श्रीसूक्त महाअभिषेक, मातेला पूर्णाहुती होऊन महाआरती आणि विशेष देवी प्रार्थना करण्यात येणार येते. चित्रा नक्षत्रावर श्रीमारुबाई मातेच्या मुखवट्याची पालखी मिरवणूक भाविकांकडून निघते. रात्री महाप्रसादाचे आयोजन होऊन चैत्र नवरात्री उत्सव सोहळ्याची सांगता होते.




- रवींद्र मालुसरे,



अध्यक्ष मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई 

हे वाचल्यानंतर ही लिंक इतरांना पाठवा आणि या ब्लॉगबरील इतरही पोस्ट वाचा
संपर्क : 9323117704




इतर पोस्ट वाचण्यासाठी समोरची 👉अनुक्रमाणिक clik करा  

टिप्पण्या

  1. माटुंगा गावा संदर्भात श्री मरुबाई देवीची मिळालेली विस्तृत मा माहिती नाविन्यपूर्ण!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संकल्पपूर्ती दाता : स्व. तानाजीदादा मालुसरे

प्रभादेवी श्री विठ्ठल मंदिर : इतिहास, परंपरा आणि नैमित्तिक कार्यक्रम

बैल दिवाळी इतिहास, संस्कृती आणि शेतीचे धागे विणणारा सण