सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत सत्याची कास धरून पत्रकारिता करावी.
सतरावे शतक प्रबोधनाचे, अठरावे शतक वैचारिकतेचे, एकोणीसावे शतक प्रगतीचे, विसावे शतक चिंतेचे म्हणून ओळखले जाते ! तर एकविसावे शतक माहिती-तंत्रज्ञान युगांचे संबोधले जात आहे. इंग्रजांची राजवट असतानाच आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे पहिले वर्तमानपत्र सुरु केले होते. त्यामागे गतकाळाचे संपन्न बुद्धिवैभव व विचारसंपदा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित व्हावी, आपला समृद्ध वारसा, ही प्रभावशाली परंपरा अखंडितपणे चालावी, सांस्कृतिक-सामाजिक ठेवा समाजासमोर ठेवावा असा उदात्त हेतू त्यांचा होता. वृत्तपत्र हे समाजाचे अत्यंत महत्त्वपूर्ण अंग आहे हे त्यांनी जाणले होते. इंग्रजांची राजवट संपल्यानंतर आपण लोकशाही शासनप्रणालीत स्वीकारली आणि त्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याला किती अत्यंत मोठे स्थान आहे हे आपण जाणतच आहोत. त्यामुळेच जगभरात वृत्तपत्राला लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानतात. आपण जर थोडे इतिहासात डोकावले तर लक्षात येते की युरोपात राजेशाही अस्तित्वात असतानाच वृत्तपत्रचळवळीचा उदय झाला होता. तत्कालीन राजे-सरंजामदारांनी वृत्तपत्राची ताकद जोखली होती. त्यामुळेच नेपोलियन बोनापार्टने लेखणीचे सामर्थ्य तलवारीपेक्षा जास्त आहे, असे उघडपणे मान्य केले होते. भारतात जरी छपाईयंत्रणेचा सर्वव्यापी वापर उशिरा सुरू झाला होता, तरी लेखणीचे आणि बातमीचे महत्त्व तत्कालीन समाजात निश्चितच होते. नाहीतर मुघलकालीन आईने-अकबरीमध्ये न खिंचो कमानको, न तलवार निकालो, जब तोप मुकब्बिल होतो, अखबार निकालो असा शेर लिहिलाच गेला नसता. खरं तर, ऐतिहासिक काळात भारतवर्षात दळणवळणाच्या साधनाअभावी समाजातील संवाद फार कमी प्रमाणात होत असे. मात्र काळ पार बदलला आहे. समाजही वेगाने बदलत आहे. विशेष म्हणजे, माहिती आणि संपर्काच्या क्षेत्रात झालेल्या क्रांतीमुळे समाजातील संवादाची माध्यमे प्रचंड वेगाने प्रगती करीत आहेत. संगणक, इंटरनेट आणि दूरदर्शन वाहिन्या यांच्या वाढत्या प्रसारामुळे वृत्तपत्रांचे स्वरूपही बदलत आहे. या बदलत्या काळात एक महत्त्वाची बाब मात्र टिकून आहे, ती म्हणजे वृत्तपत्रांमधील वाचकांचा सहभाग. वाचकांच्या सक्रीय सहभागाशिवाय वृत्तपत्र आणि सर्वसामान्य नागरीक यांच्यातील संवाद होणे शक्य नसते. नाहीतर वृत्तपत्र हे संवादाचे एकतर्फी माध्यम राहिले असते. परंतु, वृत्तपत्रसृष्टीतील पूर्वसुरींनी परस्परसंवादाचे महत्त्व खूप आधीच जाणले होते. म्हणूनच मराठीत पहिले वृत्तपत्र दर्पण सुरू करणाऱ्या बाळशास्त्री जांभेकर यांनी आपल्या पहिल्याच अंकात लोकांनाच लिहिण्यासाठी खास आवाहन केले होते. विशिष्ट पदवी घेऊन जन्माला येणार पत्रकार हा त्यापूर्वी नव्हता. अगदी तेव्हापासून जनमनाचा कानोसा घेत समाजातले वैगुण्य टिपत, घडलेल्या घटनांची दखल घेणारा लोकांना जागृत करणारा म्हणजे पत्रकार होय. बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण सुरु केले ते समाजाच्या जागृतीसाठी ! यानंतरचा काळ हा स्वातंत्र्यासाठी पत्रकारिता करणारे आणि आपल्या आयुष्यासोबत लेखणी झिजवणारे आले असेच इतिहास सांगतो. साप्ताहिके ही माध्यमांची जननी आहे असे म्हटले तर भारतीय इतिहासाला तरी ही गोष्ट नाकारता येणार नाही.
ब्रिटीशांविरोधातील आंदोलनात टिळकांनी लेखणी हातात घेतली तर संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात अत्रे यांनी 'मराठा' द्वारे विरोधकांना वठणीवर आणले. जनता क्रांतीचा जयजयकार करते हाच पत्रकाराचा खरा धर्म आहे. पत्रकारांची लेखणी ही सत्यासाठी आणि न्यायासाठी लढणाऱ्या शिपायाची तलवार होय.भारतीय स्वातंत्र्य चळवळीत इतर अनेक देशातल्याप्रमाणे भारतीय वृत्तपत्रांनी परकीय शासनसंस्थेच्या शोषक कारभाराची पाळेमुळे उघड केली नि एक प्रकारे अग्निदिव्य पत्करले. एका बाजूने लोकमत जागृत करण्याची व दुसऱ्या बाजूने त्या लोकमताचे संघटित दडपण शासनावर पाडण्याची अवघड कामगिरी भारतीय पत्रकारितेने केलेली आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील आघाडीच्या नेत्यांनी चळवळीचे एक साधन म्हणून वृत्तपत्राचाच वापर केला. आपल्या जीवनात वृत्तपत्राचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात वर्तमानपत्रांनी समाजसुधारकांसारखे महत्त्वाचे कार्य केले आहे. देशी वृत्तपत्रे हे स्वातंत्र्यलढ्याचे प्रमुख साधन आहे हे लक्षात घेऊन स्वातंत्र्य चळवळीच्या बातम्या जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी देशभक्त भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सुरुवातीच्या काळातील जे अग्रणी नेते होते ते एकजात पत्रकार होते. न्या. रानड्यांपासून लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, शिवराम महादेव परांजपे, मोहनदास करमचंद गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ बाबासाहेब आंबेडकर या सर्वांनी आपल्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून स्वातंत्र्याचा लढा चालविला होता. तळमळीचं यज्ञकुंड त्यांच्या अंतःकरणात धगधगत होतं. या यज्ञकुंडाच्या भडकलेल्या ज्वालातून बाहेर पडणारे जे स्फुल्लिंग होते ते त्यांचे शब्द झाले आणि त्या शब्दांनी सर्वांच्या अंतःकरणाची पकड घेतली. पहिले मराठी वृत्तपत्र सुरू झाले त्याला आता दीडशे वर्षात्रर काळ उलटला आहे. या कालावधीतील मराठी वृत्तपत्रांची वाटचाल अगदी डोळे दिपविणारी वाटली नाही किंवा अपेक्षेइतकी ती उच्च स्तरावर गेली असेही आढळून आले नाही; तरी तिने गाठलेला पल्ला उपेक्षणीय नाही. जिचा सार्थ अभिमान बाळगावा अशी एक वैशिष्टचपूर्ण परंपरा मराठी वृत्तपत्रसृष्टीला लाभलेली आहे. ही ध्येयवादी परंपरा आता इलेक्ट्रॉनिक्स माध्यमे आणि सरकारी दडपशाही व हस्तक्षेपामुळे क्षीण झाली असली, तरी मराठी वृत्तपत्र जगताचा व्याप निश्चितच वाढला आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय भाषांतील वृत्तपत्रांना भरपूर वाव मिळेल व त्यांची भरघोस वाढ होईल अशी जी अपेक्षा होती. ती आता स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षाचा काळ उलटल्यावर काही प्रमाणात तरी फलद्रूप होऊ लागली आहे.
स्वातंत्र्योत्तर काळात आपण सांसदीय लोकशाही राज्यपद्धतीचा स्वीकार केलेला असल्यामुळे सामान्य माणसाचे महत्त्व जरूर वाढले आहे. भाषावार राज्यरचनेमुळे प्रत्येक राज्यात स्थानिक भाषेला महत्त्व व प्रतिष्ठा मिळणे अपरिहार्य वृत्तपत्राच्या या नव्या स्वरूपामुळे वृत्तपत्र चालविणे हा आता केवळ धर्म वा मिशन राहिलेले नाही. या व्यवसायाला आधुनिक उद्योगसंघटनेचे स्वरूप आले आहे. दैनिक वृत्तपत्र उभे करण्यासाठी उभारावे लागणारे प्रचंड भांडवल, तांत्रिक प्रगतीमुळे टिकाव धरण्यासाठी अत्याधुनिक यंत्रांचा व तंत्रांचा वापर करण्याची अपरिहार्यता, वृत्तपत्राचा व्याप, आणि या व्यवसायात नफ्याला असलेला वाव, तसेच वृत्तपत्रा- सारख्या प्रभावी साधनावर पकड ठेवण्याची धनिकांची धडपड यांमुळे भांडवलदारी मालकी वृत्तपत्र व्यवसायात शिरली आहे. एक किंवा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊन देशस्वातंत्र्यासाठी वा सामाजिक विचारांचे अभिसरण व प्रचार करण्याच्या हेतूनेच केवळ वृत्तपत्र सुरू करावे अशी परिस्थिती आता उरलेली नाही. मराठी वृत्तपत्र आर्थिक लाभाच्या हेतूने कचितच निघाले. त्याग आणि सेवा हेच वृत्तपत्रांचे एक वेळ भांडवल होते. पण ते आता सारे पालटले आहे. त्याग, सेवा, यांसारख्या गोष्टी दुर्मिळ झाल्या असून वृत्तपत्र चालवायला तशा त्या पूर्वीही पुरेशा नव्हत्या, आणि आता तर नाहीच नाही. भांडवली प्रवृत्तीने सर्वच मराठी पत्रसृष्टीला अजून ग्रासलेले नसले, तरी तिची वाटचाल त्याच दिशेने होऊ लागली आहे. मराठीतील मोठी व मुंबईतील मराठी दैनिके एकाद दुसरा अपवाद वगळता सर्वस्वी अमराठी भांडवलदारी संघटनांच्या ताब्यात आहेत. वृत्तपत्र समूहांच्या साखळीतील एक दुवा असे स्थान या वृत्तपत्रांना पत्करावे लागते. विशिष्ट धोरणापेक्षा भरपूर खप, म्हणून भरपूर जाहिराती आणि मग भरपूर नफा या दृष्टीला यामुळे अपरिहार्यपणे महत्त्व मिळू लागले आहे. अशा परिस्थितीने होणाऱ्या धंदेवाईक स्पर्धेत छोट्या वृत्तपत्रांचा टिकाव लागणे कठीण होऊ लागले आहे. त्याचबरोबर मराठी वृत्तपत्र जन्माला आले ते प्रभोधनाच्या हेतूने. पुढे त्यात टीका, प्रक्षोभ, निंदानालस्ती, स्तुती अशा विवित्र गोष्टींना एकेका काळात प्राधान्य मिळाले. पण त्या सर्व अवस्था पार करून खरेखुरे 'वर्तमान' पत्र म्हणजे मुख्यतः कालचे व आजचे वर्तमान कथन करणारे पत्र, असे निर्भेळ स्वरूप त्याला येत आहे. लो. टिळकांच्या काळात आणि नंतरही आग्रही मतपत्र म्हणून त्याचे जे स्वरूप होते ते पूर्णपणे मागे पडले आहे. नराठी वृत्तपत्राचे हे स्वरूप हा बदललेल्या काळाचा परिपाक आहे. एकूण भारतीय वृत्तपत्रसृष्टीत अशा तन्हेचा बदल घडून येत आहे. वृत्तपत्र-निर्मितीची तांत्रिक साधने बदलत असल्यानेही नवे स्वरूप अधिकाधिक गडद होणे अपरिहार्य आहे. पण एक गोष्ट निश्चित की, भारतीय भाषांतील वृत्तपत्रांत मराठी वृत्तपत्र आघाडीवर राहात आले आहे. याचे एक कारण असे की, बदलत्या परिस्थित्यनुरूप ते बदलत गेले. या बदलाचा आणि त्याला कारणीभूत होणाऱ्या परिस्थितीचा मागोवा घेतल्यानंतर लक्षात येते.
वृत्तपत्राच्या सामर्थ्याविषयी अनेकांनी अनेक प्रकारे उद्गार काढले आहेत. नेपोलियनसारख्या रणधुरंधराने म्हटले की, "चार जबरदस्त वृत्तपत्रे हजारो संगिनीना निष्प्रभ करू शकतात. "लेखणीचे सामर्थ्य हे माणसांची मने घडविण्याचे सामर्थ्य असल्यामुळेच जगातील अनेक हुकूमशहांनी लेखणीची धास्ती घेतली. त्यांच्या राजवटीत वृत्तपत्र-स्वातंत्र्यावर कायम निर्बंध राहिले, परंतु गुप्त पत्रकांच्या रूपाने क्रांतिकारी विचारांच्या प्रसाराचे कार्य अशाही राजवटीत जोमाने चालते व त्यातूनच राज्यक्रांतीला साह्य होते. लोकमत जागृतीसाठी लोकांना माहिती पुरवून, गुपिते उघड करून वृत्तपत्रे सत्तेवर अंकुश ठेवतात. पर्यायाने संपूर्ण समाजाचे नियमन करतात, असा अर्थ त्यात अभिप्रेत आहे. अन्यायांना वाचा फोडून सामान्य माणसाच्या न्याय्य हक्काचे संरक्षण करण्याची जबाबदारी हा चौथा स्तंभ पार पाडीत असतो.
सद्य परिस्थितीतही महाराष्ट्रातून प्रसिध्द होणारी वर्तमानपत्रे आपले जनजागृतीचे आणि लेखणीद्वारे सत्तेवर अंकुश ठेवण्याचे काम यशस्वीपणे करत आहेत. पूर्वीच्या काळात जनतेतील साक्षरतेचं प्रमाण कमी होतं. तशीच वर्तमानपत्रेही मर्यादित होती. मात्र सध्या परिस्थिती बदललेली आहे. आजमितीस महाराष्ट्रातून प्रसिध्द होणारी वर्तमानपत्रे, साप्ताहिके, पाक्षिके, मासिके, त्रैमासिके यांची संख्या साधारण ३५,००० हून अधिक आहे. त्या प्रत्येकाचा होणारा खप लक्षात घेता वाचकांची संख्या किती असेल याचा आकडा न काढलेलाच बरा. मोठमोठ्या शहरापर्यंत राहणाऱ्या हजारो, शेकडो माणसांच्या जीवनाचा एक अपरिहार्य भाग वृत्तपत्रांनी व्यापलेला आहे. दैनंदिन जीवनात एक गरजेची वस्तू म्हणून वृत्तपत्राचे महत्त्व आज सर्वमान्य झालेले दिसते. आजच्या जीवनात वृत्तपत्रे हा अपरिहार्य घटक झाला आहे. किंबहुना आधुनिक संस्कृतीचे ते एक चिन्ह बनले आहे. वृत्तपत्रांनी सारे जीवनच व्यापले आहे. वृत्तपत्ररहित जीवनाची आपण कल्पनाही करू शकत नाही. दैनंदिन जीवनाची ती गरज झालेली आहे. सुदूर आदिवासी भागात कदाचित अजूनही इतक्या मोठ्या प्रमाणात वृत्तपत्रांची गोडी निर्माण झाली नसेल, पण वृत्तपत्रांचा संचार तेथपर्यंत जाऊन पोहचलेला आहे एवढे मात्र निश्चित. त्यामुळेच वृत्तपत्राविना आधुनिक माणूस राहू शकत नाही असे म्हटले जाते.
आजच्या पिढीतील पत्रकारांनी मात्र लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेला काळानुरूप वेगळे रुप दिले. कारण सद्याचे युग हे स्पर्धात्मक युग असल्यामुळे आणि इलेक्ट्रॉनिक मिडियामुळे प्रिन्ट मीडीयाचे काम अवघड बनले आहे, त्यातून मार्ग काढण्यासाठी वृत्तपत्रांच्या मालकांना सत्ताधारी व विरोधक या दोघांची मर्जी सांभाळून आपला व्यवसाय करावा लागत आहे. त्यामुळे ते नीतीमुल्यांपासून दूर जात आहेत. भरमसाठ पैसे घेऊन दिली जाणारी भडक वृत्ते, जाहिराती यांनी वृत्तपत्रांना गिळंकृत करून टाकले आहे. जर वाहिनी किंवा वर्तमानपत्राच्या मालकांनीच धोरण ठरवलं असेल तर संपादक काहिही स्वातंत्र्य घेऊ लिहू किंवा दाखवू शकत नाही. त्यामुळे उठसुठ संपादक आणि पत्रकारांना दोष देणं चुकीचं आहे. संपादकांच्या विचारस्वातंत्र्यासाठी ठामपणे उभे रहाणारे मालक आता भारतात अपवादात्मक शिल्लक राहिले आहेत.
स्मार्टफोन हातात घेऊन सध्या पिढी जन्माला आलेली आहे. अर्थात त्यासोबत इंटरनेट, सोशल मीडियाची ओळख त्यांना त्यांचं पहिलं पाऊल टाकण्यासोबतच सुरु होते. अजून चालायला न लागलेली लहान बाळं रडून मोबाईलचा हट्ट धरतात. मोबाईलवर कुठे दाबल्यावर व्हिडिओ दिसतो किंवा मोबाईलमधून आवाज येतो हे त्यांना सर्रास ठाऊक असते. पहिली-दुसरीतील मुलं मोबाईलमध्ये फोटो काढणे, युट्यूबवर व्हिडीओ पाहणे असं सारं अगदी कौशल्याने करतात. माध्यमांच्या क्रांतीमुळे पिढ्यांमधील अंतर दिवसागणिक वाढत आहे. या बदलाचा आपण मोठा भाग आहोत. विज्ञानाच्या प्रगतीमुळे सर्व जग एक मोठे खेडे बनल्याने संपर्क, स्पर्धा, अचूकता आणि प्रसंगावधान या गोष्टींना अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे. इंटरनेट हा परवलीचा शब्द झाला असून जगाच्या कानाकोपऱ्यातील खबर इंटरनेटद्वारे आपल्या घरात बघण्यास मिळते. सोशल मीडियाचं (सामाजिक माध्यम) प्रस्थ आपल्याकडे इतकं फोफावलं आहे की, सार्वजनिक ठिकाणी अथवा घरांमध्ये लोक मोबाइलमध्ये मान खुपसून बसलेले असतात. जे बोलायचं ते व्हॉट्सअप किंवा फेसबुकसारख्या माध्यमातूनच, या टप्प्यापर्यंत आपण येऊन पोचलोय. अपरिचित तर सोडाच पण परिचित माणसांशीसुद्धा थेट संवाद कमी होऊ लागलाय.
सध्याचे युग हे प्रसार क्रांतीचे युग म्हणून संपुर्ण जगाच्या लक्षात राहणार आहे. अमेरिकेच्या पेन्टागॉनवर किंवा सध्याचा युक्रेनवर रशियाने केलेला हल्ला, पंतप्रधानांचे परदेश दौरे अथवा बदलापूर सारख्या ठिकाणचा लोकक्षोभ काही क्षणात घरबसल्या पाहण्याचा योग प्रसार प्रगतीचे सर्वात मोठे उदाहरण आहे. एखादी घटना पहाणे आणि ऐकणे म्हणजे ती घटना सत्य मानणे हे जरी खरे असले तरी ज्ञानी माणसांना प्रत्येक घटनेच्या पाठीमागे असणारा दस्तऐवज आपण आजही या फास्टफुड माध्यम क्रांतीमध्ये तपशिलवार वाचणेच आवश्यक वाटते.
डिजिटल माध्यमांकडे फक्त एक नवे माध्यम एवढ्याच मर्यादित दृष्टीने पाहणे चूक ठरेल. ती एक स्वतंत्र आणि व्यापक व्यवस्था आहे. आशयाची निर्मिती, स्वरूप, वितरण, ग्राहकवर्ग, आर्थिक गणिते, यशापयशाचे निकष अशा अनेक बाबतीत ती वर्तमानपत्रे, दूरचित्रवाणीसारख्या प्रसारमाध्यमांच्या व्यवस्थेपेक्षा वेगळी आहे. या माध्यमांचे वय तसे जेमतेम दोन दशकांचे; पण त्यांच्या वाढीचे स्वरूप आणि प्रमाण चक्रावून टाकणारे आहे. प्रस्थापित प्रसारमाध्यमांपुढे तर त्यांचे मोठे आव्हान निर्माण झालेले आहेच; पण त्यांचा वापर करणारे आणि नियमन करू पाहणारे यांच्यासाठीही ती आव्हानात्मकच आहे. म्हणूनच डिजिटल माध्यमांचे स्वरूप, त्यांची व्यवस्था आणि त्यांनी निर्माण केलेले आव्हान समजून घेणे हे माध्यमकर्मी, अभ्यासक तसेच या माध्यमांचा वापर करणाऱ्या सुबुब्द नागरिकांसाठी आवश्यक आहे.
आपण पत्रकार आहोत, याचा अभिमान वाटावा असा पत्रकारितेचा सुवर्णकाळ आता संपत चालला आहे. पत्रकारिता हे व्रत आहे, सतीचं वाण आहे, या गोष्टी केवळ सुविचार म्हणून राहिल्या आहेत. कविता आकाशातून पडत नसते. ती कवीच्या हृदयातून जन्माला यावी लागते. तसेच हाडाचा पत्रकारसुद्धा जन्मालाच यावा लागतो. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत अनेक संकटांवर, समस्यांवर मात करून ज्यांनी ग्रामीण पत्रकारितेची वेदना बोलकी केली पत्रकारिता ही शहरी किंवा ग्रामीण असते, यावर माझा विश्वास नाही. जिथे वेदना आहे, व्यथा आहे अन ज्याची लेखणी जीवनाच्या प्रत्येक घटकाला स्पर्श करणारी वास्तववादी प्रयत्न करते तोच खरा पत्रकार. मग तो शहरातला असो की, ग्रामीण- भागातला. निश्चितच अभिमानास्पद आणि अभिनंदनीय आहे.
कार्लाइल नावाचा जगप्रसिद्ध माणूस असं म्हणाला होता की, 'खुज्या आणि ठेंगण्या माणसांच्या लांब सावल्या पडायला लागल्या की, सूर्यास्त जवळ आला आहे, असे समजायला हरकत नाही.' आदर्श रायगड वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनी तिसरा वर्धापन दिन साजरा करताना त्यांच्या माध्यमात वास्तववादी लिखाण करून पत्रकारितेत येऊ घातलेल्या सूर्यास्ताला दूर लोटेल, या अपेक्षेसह त्यांना पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा, त्यांच्या या लिखाणातील उर्मी आणि हृदयातील गुर्मीला माझा मानाचा मुजरा !!
- रवींद्र मालुसरे
अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई
संपर्क - ९३२३११७७०४
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा