संकल्पपूर्ती दाता : स्व. तानाजीदादा मालुसरे


संकल्पपूर्ती दाता : 

स्व. तानाजीदादा मालुसरे 

१३ सप्टेंबरला पहाटे गाढ झोपेत असताना मोबाईल वाजला. फोनमधून आवाज आला... तानाजीआण्णा सिरीयस आहेत, तुम्ही बाजीराव नानांना घेऊन लगेच डोंबिवलीला या. मनात शंकेची पाल चूकचुकली. सकाळी ६ .३०  वा जेव्हा त्यांच्या घरी पोहोचलो तेव्हा तो निचेष्ठ पडलेला देह आणि वहिनीने दुःखाने फोडलेला हंबरडा खूपच अस्वस्थ करून गेला. त्या दिवशी डोंबिवलीत पहिल्यांदाच तानाजीदादा यांच्याशी न बोलता पाऊल ठेवत होतो. एकतर तो बोलवायचा किंवा मी माझ्या इतर कामासाठी गेलो तरी फोनवर सांगायचो मी अमुक ठिकाणी आलोय. मन सैरभैर झाले... गावाच्या किंवा डोंबिवलीतील त्याच्या अनेक कार्यक्रमांच्या अगोदर त्यांच्याशी केलेली चर्चा, घेतलेले मार्गदर्शन, गावाची पिढ्यानपिढ्याची नांदणूक, कुळाचार आणि शिवकालीन इतिहास, वारकरी संप्रदाय वादविवाद तसेच वेळोवेळच्या राजकीय घडामोडी यावर अनेक वेळा तासनतास चर्चा केलेल्या आठवणी मनात उसळून येऊ लागल्या... आणि जाणवले अगदी घट्ट धरून ठेवणारा आधार आपल्यापासून कायमचा सुटलाय ! माणसाचा मृत्यू हे मानवी जीवनातील त्रिकाळाबाधित सत्य होते तरी पहिल्यांदाच हादरून गेलो होतो. आपला हितचिंतक आणि आधार आपल्यापासून दूर जाऊ नये ही भावना माझ्या मनात दाटून आली होती. माझ्या खडकवाडीतील अनेक भावडांच्या तसेच साखर ग्रामस्थ्यांच्या मनात अशीच भावना होती हेही मला दिवसभर जाणवत होते.

काही माणसं जन्माला येतात तीच काही साहसी, वैशिष्टपूर्ण कामगिरी करण्यासाठी, त्यांच्या  कामाची नोंद अनेकांच्या स्मरणात दीर्घकाळ राहील अशासाठी. अनेकांच्या आयुष्यात खडतर प्रवास येतो, परंतु त्या खडतर प्रवासावर, बिकट परिस्थितीवर मात करून समाजापुढे आदर्शवत उदाहरण उभे करणारे फार थोडे असतात. अनेक जण जन्माला येतात, वर्षानुवर्षे जगून फक्त वाढत्या वयाचे साक्षीदार होतात. परिणामी त्यांच्या जगण्याला काहीच अर्थ नसतो. परंतू काही जण पुरुषार्थ जाणून आपल्या जन्मभूमी बरोबर आपल्या कुळाचे ऋण कधीही विसरत नाही. माता – पित्याच्या भावंडांच्या मुलांच्या कर्तव्यात कधी कसूर ठेवत नाहीत, अशी व्यक्तिमत्वे त्यांच्या त्यांच्या पद्धतीने आपल्या आठवणींची नोंद जवळच्या माणसांच्या हृदयात कोरून ठेवतात. यापैकी तानाजीदादा होय ! माझ्या आठवणीच्या कप्प्यात दादाच्या असंख्य आठवणी साठून आहेत, गेले दोन दिवस त्या थिजल्या होत्या. आम्हा मालुसरे परिवारात वेगळेपण जपणारा आणि त्याने लोकांसाठी निःस्वार्थपणे केलेले काम हे लोकांपुढे यावे या हेतूने त्याच्या जीवन चरित्राचा व कर्तृत्वाचा वेध घेणारा हा लेख....साठवणीतल्या आठवणीच म्हणा ना !











स्वतः साठी कुणीही जगतो पण दुसऱ्यासाठी जगणारा खरा कर्तृत्ववान समजावा असे मला तरी वाटते, अशी व्यक्ती आपली जबाबदारी काटेकोरपणे सांभाळतो. कोणतीही तक्रार अथवा त्यास वाव मिळेल असे कामं करीत नाही,  हे त्या व्यक्तीचे वैशिष्ट असते आणि अती कठीण प्रसंगातही खंबीरपणे धाडशी निर्णय घेणारा व त्यातून आपला मार्ग निवडून कार्य सिद्ध करणारा हा खरा कर्तृत्ववान. माणसाचे कर्तृत्व केव्हाही त्याच्या बोलण्यातून, वागण्यातून, कामाच्या पद्धतीतून, माणसाच्या संचयातून आणि त्याने स्वतः केलेल्या पण सर्वासाठी लाभाच्या ठरलेल्या कामांच्या गोष्टीतून मोजावे.

पोलादपूर तालुक्यात तानाजीदादाने निःस्वार्थीपणे केलेली अशी अनेक कामे सांगता येतील. काही वर्षांपूर्वी पितळवाडी येथे एक घर स्वखर्चाने भाड्याने घेतले आणि त्या ठिकाणी तिन्ही खोऱ्यातील नागरिकांसाठी मोफत चुंबकीय चिकित्सा आणि आयुर्वेदिक औषधांचे वाटप केले, पोलादपूर तालुक्यातील अनेक ग्रामस्थ भजनी मंडळाना मृदंग, टाळ, वीणा असे साहित्याचे वाटप केले, पंढरपूरची वारी करणाऱ्या काही निस्सीम वारकऱ्यांची पूजा करून ज्ञानेश्वरी ग्रंथासह पूजेचे साहित्य दिले. श्रीक्षेत्र पंढरपूर येथे कार्तिक वारीमध्ये वारकऱ्यांना अन्नदान केले, उमरठ येथे माघ वद्य नवमीच्या एका कार्यक्रमात शिवकालीन शस्त्र संग्राहक गिरीश जाधव यांचे प्रदर्शन आयोजित केले. साखर येथील शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप तर केलेच परंतु दैनिक नवशक्तीची इयत्ता दहावीसाठी विशेष पुरवणी दर आठवड्याला निघायची ती त्यांनी साखर, देवळे, मोरसडे येथील हायस्कुलला न चुकता पाठवली. साखर येथील आणि खडकवाडीतील झालेल्या तुकाराम गाथा पारायणासाठी सर्वोतोपरी मदत केली.

यावेळी आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना अनुभव आणि आर्थिक मदत मिळावी यासाठी त्यांना ८ दिवस खडकवाडीत आणले अशी बरीच कामे केली आहेत परंतु एक महत्वाचे त्यांचे काम महाराष्ट्रातील शिवभक्तांच्या कायम स्मरणात राहील असे त्यांच्या हातून घडले आणि ते म्हणजे, बोरज येथील छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती भव्य पुतळा. लहान पुतळ्याच्या जागी मोठा पुतळा असावा असा संकल्प सोडल्यानंतर त्यांनी बोरज ग्रामस्थांच्या सहमतीने स्वखर्चाने वाशी येथील शिल्पकार कुलदीप कदम यांच्याकडून हा पुतळा बनवून घेतला. आणि मान्यवरांच्या उपस्थितीत त्याचे लोकार्पण केले. या कार्यक्रमाला त्यांनी शिवशाहीर विजय तनपुरे, तपोनिधी  गरुवर्य अरविंदनाथ महाराज, आमदार भरतशेठ गोगावले आमंत्रित केले होते. सामाजिक, सांस्कृतिक चळवळीत चालताना कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता संकल्प सोडलेली कामे शांतपणे करण्याची एक पद्धत काही माणसांची असतें. ही अशी अनेक कामे करताना तानाजीदादाने हीच पद्धत अवलंबली होती.

वैविध्यपूर्ण स्वभावांनी बनलेली अनेकविध माणसं समाजात वावरत असतात. सारीच माणसं जिवंत असतात. पण ज्या माणसांत चैतन्य असते, कर्तृत्वाची स्फुल्लिंगं प्रज्वलित झालेली असतात, जीवनाचा अन्वयार्थ ज्यांना ज्ञात झालेला असतो अशीच माणसं जिवंत वाटतात आणि समाजातल्या अशा विखुरलेल्या चैतन्यमयी माणसांमुळे समाजपुरुष जिवंत हे असे वाटते. अशी कर्तृत्ववान माणसं समाजाची भूषण असतात. इतकेच नव्हे तर अशी माणसं समाजाची कवचकुंडल असतात. असंच एक कवचकुंडल समाजात सन्मानाने वावरणाऱ्या कुटुंबात पोलादपूर तालुक्यातील साखर गावात जन्माला आले होतेहाती घेतलेलं कोणतंही काम करताना तानाजीदादाचे केवळ कोरडं कर्तव्य नसे, तर ते भावस्निग्ध व्रत असायचं,  ते काम सरस आणि सकस व्हावं, कार्यपूर्तीला सौजन्याचं कोंदण हवं याची त्यांना सतत जाणीव असायची. तानाजीरांवाना माणसाची विलक्षण ओढ होती. साखर आणि डोंबिवली येथील अनेक स्तरांतील आणि विविध व्यवसायातील माणसंविषयी त्यांना उत्कट प्रेम होते. दोष कुणात नसतात ? दोष बाजूला ठेऊन माणूस शोधायचा असतो, असे अनेक उभे आडवे धागे जुळवीत समाजकारणाचं वस्त्र ते विणत असत. प्रतिकुलता झेलत आणि चैतन्य उधळत प्रामाणिकपणाने बोलावं आणि जगावं कसं याचा वस्तुपाठ म्हणजे तानाजीरावांचे जीवन होते. काळाच्या ओघात समाजात सतत स्थित्यंतरे घडत असतात. मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात स्वतःला झोकून देणारे आणि तन-मन-धन अर्पण करणारे निष्काम महापुरुष ठामपणे उभे राहातात तेव्हाच इतिहासात नोंद घेणारे बरेचसे त्यांच्याकडून घडत असते. साखर गावात गेल्या दीडशे वर्षात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांत प्रतिभा आणि प्रगल्भता असलेली मोठी माणसं जन्माला आली आहेत असे समाजच व्यासपीठावरून म्हणतो, हा लेख वाचल्यानंतर तानाजीदादा मालुसरे यांची स्वतंत्र ओळख समाजाला नव्याने होईल तेव्हा त्यांनी राजकारण नव्हे तर सामाजिक क्षेत्रात केलेले काम उल्लेखनीय असेच आहे हे अनेकांच्या लक्षात येईल.

छत्रपती शिवाजी महाराज आणि सुभेदार नरवीर तानाजी - सूर्याजी मालुसरे यांच्या सुवर्णाक्षरांनी समृध्द झालेल्या जाज्वल्य इतिहासाचा स्वाभिमानी असा वारसा तानाजी मालुसरे यांना लाभलेला होता. आजच्या प्रमाणेच त्या काळी देखील मुंबई हे स्वप्नपूर्ती करणारं शहर असल्याने तानाजीरावांचे थोरले भावोजी उद्योजक गणू कोंढाळकर हे त्यांना खूणगाठ मनाशी बांधून शिक्षणासाठी आणि पुढे उज्वल भविष्य घडविण्यासाठी त्यांना मुंबईत फोर्टला घेऊन आले. रायगड - प्रतापगड - कांगोरीगड यांच्या चहुबाजींनी वेढलेले साखर हे तानाजीरावांची जन्मभूमी. सुभेदार नरवीर तानाजी - छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास, पोवाडे ऐकत आणि गात तानाजी लहानाचे मोठे झाले. त्यांच्या पराक्रमी इतिहासापासूनच अन्यायाविरोधात लढावयास त्यांना तरुण वयात समर्थ आणि सिध्द केले. त्यांचे वडील ह भ प विठोबा अण्णा हे स्वातंत्र्य सेनानी आणि गांधीवादी विचारांचे होते. स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्वातंत्रसेनानी अंबाजीराव मालुसरे, सखाराम चोरगे यांच्या पिढीपासून स्व. महादेव मालुसरे, स्व गणपत कदम, ज्ञानोबा मालुसरे यांच्या काळापर्यंत संपूर्ण गावही काँग्रेस विचारांचा बालेकिल्ला. तरी तानाजीराव मात्र मुंबईत आल्यानंतर "शिवसेना" या मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी झटणाऱ्या चार अक्षरी मंत्राने भारावले. आणि तेव्हापासून शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर कार्यकर्ता बनले. एका सभेमध्ये बाळासाहेबांचे विचार ऐकले व त्यांच्या  विचारांनी प्रभावित झाले. मराठी माणसांवरील त्यांचे अन्यायाविरोधात प्रखर विचार ऐकून फोर्टसारख्या अमराठी विभागात त्यांनी बेभान होऊन काम करायला सुरुवात केली. माजी मंत्री प्रमोद नवलकर,माजी शाखाप्रमुख स्व. चंद्रकांत पवार, माजी शाखाप्रमुख स्व. दारपशहा घडीयाळीमाजी नगरसेवक ज्ञा.भी. गावडे यांच्या सोबत सतत राहून राजकारणाचे धडे गिरवले. शिवसेनेचा भगवा झेंडा खांद्यावर घेवून शिवसैनिक म्हणून त्यांनी अनेक आंदोलनात भाग घेतला. बेळगांव-कारवार सीमा प्रश्नासंदर्भात आझाद मैदानात झालेली धरणे-आंदोलने, दुकानांच्या इंग्रजी नावांच्या पाट्याना डांबर फासणे, बॉम्बे चे 'मुंबई' व्हावे यासाठी झालेली आंदोलने, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या रीडल्स पुस्तकप्रकरणी झालेले आंदोलन, दुध केंद्राविरुध्दचा लढा अशा अनेक घटना सांगता येतील. आज शिवसेना नेते स्व. प्रमोद नवलकर हयात नाहीत. मात्र त्यांच्यासोबत या आंदोलनात आणि प्रत्येक निवडणुकीत त्यांनी काम केले आहे. पुढे सन १९९२ साली डोंबिवली येथे राहायला आल्यानंतर येथे सुध्दा शिवसेनेचे ज्येष्ठ शिवसैनिक आणि पदाधिकारी यांच्या सहकार्याने संघटनेचे काम सुरु केले. तानाजीराव राहात होते त्या विभागात शिवसेना पक्षाची स्वतंत्र अशी शाखा नव्हती. हे शल्य प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात होते. त्यांनी पुढाकार घेऊन सर्व शिवसैनिकांच्या सहकार्याने भव्य अशी शाखा बांधली आणि त्या शाखेचे उदघाट्न त्यावेळी शिवसेना कार्याध्यक्षप्रमुख असलेल्या मा. उध्दवजी ठाकरे यांच्या हस्ते केले. या शाखेचे शाखाप्रमुख म्हणून त्यांची नेमणूक झाल्यानंतर संघटना बांधणीला त्यांनी प्राधान्य दिले आणि संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न केला. सध्या ते डोंबिवली पश्चिमचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उप शहरप्रमुख कार्यरत होते.

डोंबिवली पश्चिमेला रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील आहेत त्यामध्ये जास्तीत जास्त हे मुंबईमध्ये १९८२ च्या गिरणी संपात उध्वस्त झाल्यानंतर एकत्रीत कुटुंबातून विभक्त झालेले आहेत. आपल्या आयुष्याची पूंजी निवाऱ्याला लावून ते डोंबिवलीसारख्या शहरात चाळी-चाळींमध्ये राहत आहेत.

त्यांना सुरुवातीला भाडोत्री म्हणून हिणवले जात असे, त्याहीपेक्षा गटर, मीटर, वॉटर बाबतीत सुधारणा करायच्या अडचणी होत्या, बांधकाम करताना नियोजन नसल्याने हा विभाग जमेल तसा आडवा तिडवा पसरला आहे. स्थानिक आगरी समाजतील ज्येष्ठ गावकरी आणि लोकप्रतिनिधी इथल्या भागाचे नेतृत्व करायचे. तानाजीदादांचे व त्यांचे ऋणानुबंध कमालीचे दृढ होते त्यामुळे लोकांच्या अडिअडचणी त्यांच्या कानापर्यंत ते सविस्तर चर्चा करून पोहोचवीत असत त्यामुळे 
काही प्रश्न सामंजस्याने सुटण्यास मदत होत असे.

परंतु डोंबिवलीत आल्यानंतर त्यांनी त्यांच्या प्रभागातील नागरिकांच्या भावना आणि व्यथा जवळून पाहिल्या होत्या. स्वतः सुध्दा काही भोगले होते. इथल्या सर्व समस्या त्यांनी अनुभवल्या होत्या. त्यामुळे अभ्यासपूर्वक त्या सोडवण्यासाठी सत्तेच्या माध्यमातून प्रामाणिकपणे प्रयत्न होणे आवश्यक होते. राजकीय आयुष्याच्या वाटा फुलवायच्या असतील तर संघर्षाच्या काट्यांना घाबरुन चालत नाही. सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम विभागातील नागरिकांसाठी यशस्वीपणे राबविले त्याबद्दल जिल्ह्यातील सर्वच ज्येष्ठ शिवसेना नेत्यांनी त्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, विभागातील ६०० हून अधिक नागरिकांना स्वस्त दरातील विद्युत मीटर वाटप, २००५ च्या अतिवृष्टीत उमेशनगर, महाराष्ट्रनगर आणि गरीबाचा वाडा या विभागातील नागरिकांना मदत, मार्गशीर्ष महिन्यातील श्री महालक्ष्मी व्रतासंबधी विभागातील हजारो स्त्रीयांना मार्गदर्शन करण्यासाठी ख्यातनाम पंचांगकर्ते विद्याधर करंदीकर यांचे कार्यक्रम, मुलांना खाऊ वाटप, गरजू विद्यार्थ्यांना शाळेची शैक्षणिक फी भरण्यासाठी धनादेशाचे वाटप, प्रत्येक वर्षी २५० ते ३०० गरजू कुटुंबांना दिवाळीनिमित्त फराळ बनविण्यासाठी मोफत वस्तू वाटप, श्री संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान सप्ताह साजरा करताना प्रभागातील गटारे, नाले, पायवाटा यांची कीटकनाशक फवारणी करुन साफसफाई. महापालिकेची व्यवस्थाही पोहोचू शकत नाही अशा चाळीअंतर्गत सार्वजनिक संडासाच्या टाक्यांची साफसफाई अशी अनेक कामे त्यांनी केली. गेली १५ वर्षे विभागातील अनेक नागरिकांच्या सुख-दु:खात ते सहभागी झाले.  या विभागातील जवळपास १०० एक बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी प्राप्त करुन दिली. प्रत्येक वर्षाच्या जून महिन्यात ४०० ते ५०० गरजू विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप करुन तसेच ४० ते ५० विद्यार्थी ज्यांची वर्षाची फी भरुन शैक्षणिक मदत केली. असे तसेच विभागामध्ये असे काही रुग्ण होते की ज्यांना त्यांच्या औषधांचा खर्च करणेही शक्य होत नाही. अशा रुग्णांना त्यांना महिन्याभरासाठी लागणरी औषधे स्वखर्चाने उपलब्ध करुन दिली. कोणतेही लोकप्रतिनिधीत्वाचे पद नसताना ही  काही कामे त्यांनी केली ती स्वतःच्या मिळकतीमधून किंवा काही देणगीदार व संस्थांच्या माध्यमातून. अशा अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून ते सतत लोकांच्या समोर असल्याने "तानाजी मालुसरे" ही व्यक्त्ती कोण याची ओळख नव्याने लोकांना करुन देण्याची गरज वाटली नाही.

३५ वर्षे शिवसेना या पक्षासाठी भिंती रंगविणे, पोस्टर्स बॅनर्स लावण्यापासून कामे  केल्यानंतर साहजिकच डोंबिवलीतील अनेक कार्यकर्त्यांचा आणि नागरिकांचा तानाजीराव यांनी स्थानिक निवडणुक लढायला हवी असा आग्रह होऊ लागला. या अनुषंगाने त्यांनी पक्षाकडे विभागप्रमुख या नात्याने उमेदवारीसाठी अर्ज केला. प्रभागातील  सर्वच कार्यकर्त्यांनी एकमताने तानाजीरावांच्या नावाचा आग्रह पक्षनेतृत्वाकडे केला होता. पक्षनेतृत्वानेही त्यांना शेवटपर्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला आणि अगोदरच्या रात्री अखेर कोणतेही कारण न देता उमेदवारी नाकारली. साहजिकच त्यांच्यासह सर्वांनाच धक्का बसला. पक्षाशी कोणतीही निष्ठा नसलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिल्याबद्दल कार्यकर्त्यांच्याही मनात राग होताच. त्या सर्व 'कार्यकर्त्यांचे पाठबळ, तानाजीरावांच्या प्रती असलेली निष्ठा आणि शेवटच्या टोकापर्यंतचा लोकांनी आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या आग्रहाखातर अखेर त्यांना लढावेच लागले.  तानाजीराव कोकणातला आणि तेही शिवप्रभुंच्या दऱ्याखोऱ्यातील असल्याने त्यांनी प्रखरपणे योजनाबध्द लढण्याचे, जिंकण्याचे आणि मतदारांच्या समस्या सोडविण्यासाठी कटीबध्द राहण्याचे ठरवले. तानाजीराव माळकरी होते, २७ वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांचे उत्तरकार्य होते त्या दिवशी त्यांनी आजरेकर फडाची दिक्षा घेतली. त्यानंतर पंढरपूरच्या प्रत्येक आषाढी वारीचा वारकरी आणि श्रीमाऊली आजरेकर फड, स्वानंद सुखनिवासी तपोनिधी गणेशनाथ महाराजांचा निस्सीम अनुयायी होता. मनुष्याला त्याच्या जन्माला आल्यानंतर जेव्हा संतसंग किंवा सत्संग लाभतो तेव्हा त्याच्या पाठीमागे पूर्वपुण्याई, पूर्वजन्माचे संस्कार व सुकृत असते. ही त्यांची एक जमेची बाजू होती. याशिवाय नरवीर तानाजी सुर्याजी मालुसरे यांचा वारसदार असल्याने अन्यायाविरुध्द लढण्याची शिकवण उपजतच मिळाली होती. अपक्ष उमेदवार हा शर्यतीत कमजोर समजला जातो मात्र त्यांनी निवडणुकीचा ज्या दिवशी अर्ज दाखल केला त्यावेळीपासून शाखेतले सर्व शिवसेनेचे कायकर्ते त्यांच्या सोबत दिवस-रात्र होते. शिट्टी या चिन्हाचा प्रचार करीत होते. प्रचारफेरीत कार्यकर्त्यांबरोबर भागा- भागातील नागरीक, महिला, तरुण वर्ग मोठ्या संख्यने स्वतःहून सहभागी झालेला होता. गेल्या १५ वर्षात डोंबिवलीमध्ये त्यांनी असे काय केले होते हे ते प्रत्यक्ष लोकांचा मिळणारा प्रतिसाद पाहून गेल्या काही दिवस सुखाचे क्षण अनुभवत होते. मात्र निवडणुकीत धनशक्ती आणि दांडगाई समोर अल्प मतांनी हार पत्करावी लागली.

‘मोठा माणूस हो’ असा आशीर्वाद वडीलधारी मंडळी मुलांना देत असतात. वयाने मोठे तर सगळेच होतात. कर्तृत्वाने मोठे होणे महत्त्वाचे. कर्तृत्ववान बनायचे तर प्रत्येक कृतीत शिस्तबद्धता हवी. नीतिमत्ता आणि आचरण शुद्ध हवे. फुलाचा सुगंध दरवळत असतो. आपला सुगंध किती मनमोहक हे त्याला ओरडून सांगावे लागत नाही. आपली माणुसकी, आपले कर्तृत्व, नीतिमान आचरण हे सगळे बघून समाजात चांगला माणूस म्हणून आपोआप ओळख निर्माण होत असते. तानाजीदादाने यानंतर गढूळ झालेल्या राजकारणापासून थोडे दूर राहून तानाजीदादाने अधिकाधिक सामाजिक आणि सांस्कृतिक कामाला जोडून घेतले. 

इतिहासात जे थोर पुरुष होऊन गेले, त्यांनी समाजाच्या कल्याणासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करून, आपले आयुष्य खर्ची घातलेले असते. त्यांच्या स्मृती आपण जपतो. मोठेपणाचा हव्यास असणारी मीपणाचा अहंकार असणारी व्यक्ती, कधीही सर्वस्वाचा त्याग करू शकत नाही. थोर पुरुषाने प्रथम आपल्या अहंकाराची होळी केलेली असते. शिवरायांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता रयतेच्या शत्रूंशी लढून स्वराज्य मिळवले. कीर्तिमान, नीतिमान राजा म्हणून आजही जग छत्रपतींच्या नावाचा जयजयकार करते. आपल्या नावाचा जयजयकार व्हावा आपल्याला मोठेपणा मिळावा, हेच जर शिवरायांचे ध्येय असते तर कल्पना करा सध्याचे चित्र काय असते.

आपण माणूस आहोत आणि आपल्यातली माणुसकी कायम जिवंत राहावी यासाठी प्रयत्नशील असणारा प्रत्येक जण ‘मोठा माणूस’ च असतो. कर्तृत्ववान माणसासंबंधी यशवंतराव सांगतात ''कुठल्यातरी समाजामधील कर्तृत्ववान मनुष्य हा समाजाला सोडून कर्तृत्व करूच शकत नाही. नवनीत म्हणजे आपण ज्याला लोणी म्हणतो ते दुधातून येते. दूध नसेल तर लोणी नाही. समाजजीवन जेव्हा खवळलेले असते त्यामध्ये काहीतरी साचत असते. नवनीत निर्मिणार्‍या दुधाप्रमाणे त्यात एक शक्ती असते. नवनीताला स्वतंत्र अस्तित्व असते ही खोटी गोष्ट आहे. तीच गोष्ट कुठल्याही कर्तृत्ववान दिसणार्‍या माणसाच्या जीवनासंबंधीही खरी आहे, असे माझे तत्त्व आहे'' आणि पुढे म्हणतात ''जी कर्तबगार माणसे असतात त्यांच्या जीवनात कुठल्या तरी महत्त्वाच्या प्रेरणा त्यांना पुढे रेटीत असतात, कुठल्यातरी विचारांचा, कुठल्यातरी ध्येयांचा त्यांना एक प्रकारचा नाद लागलेला असतो, छंद लागलेला असतो. लौकिक अर्थाने आपण ज्याला नाद किंवा छंद म्हणतो तो सोडून द्या., परंतु वैचारिक किंवा ध्येयविषयक नाद असल्याशिवाय कर्तृत्ववान माणसाचे जीवन घडूच शकत नाही.''

बंधुनो, माणूस किती वर्षे जगला यापेक्षा कसा जगला हे महत्वाचे आहे. 'कसा' हा शब्द संबंधित व्यक्तीची जीवनपद्धती, संस्कार व तिच्या जीवनविषयक ध्येयाचा निर्देशक असतो. तानाजीदादाने अचानक वयाच्या ६२ व्या वर्षी जगाचा आणि आमचा निरोप घेतला. मात्र आपल्या नावाचा नव्हे तर कामाचा ठसा आपल्यापरीने उमटवून गेला.

तानाजीदादा हे कुटुंबाचे, मालुसरे कुळाचे, साखर गावाचे आणि समाजाचे उपकारकर्ते. आपल्यावर ज्यांनी उपकार केले, त्याची जाणीव मनात असून उपकार कर्त्याविषयी मनात सदैव सद्भावना असणे व त्याला अनुसरून उपकारकर्त्याशी वेळप्रसंगी तसे आपले वर्तन असणे ही झाली 'कृतज्ञता' या शब्दाची व्याख्या. आपल्या भारतीय संस्कृतीची जी अंगे उपांगे आहेत, त्यात कृतज्ञतेचा समावेश होतो. ....तानाजीदादा माझ्यासाठी एक भाऊ आणि त्यापेक्षाही प्रामाणिक मार्गदर्शक होता ....त्याच्यासाठी ही चार शब्दांची ही शब्दसुमने कृतज्ञापूर्वक त्यांच्या चरणी समर्पित !




- रवींद्र मालुसरे

अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई

९३२३११७७०४

इतर पोस्ट वाचण्यासाठी समोरची 👉अनुक्रमाणिक clik करा 

------------------------------------------------------

डोंबिवली पश्चिम उप शहर प्रमुख स्व. तानाजीदादा मालुसरे हे शिवसेना पक्षाच्या मागील सर्व पडझडीत  स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत म्हणून मातोश्रीशी कट्टर शिवसैनिक म्हणून कायम निष्ठा ठेऊन राहिले. यांच्या अंत्यविधीसाठी डोंबिवली येथे शेकडो नागरिकांसह शिवसेना उद्धवसाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सदानंद थरवळ, शिवसेना शिंदे गटाचे पोलादपूर तालुका प्रमुख निलेशजी अहिरे, माजी नगरसेवक गणेश सानप, कुलाबा विधानसभा प्रमुख विकासजी मयेकर, माजी नगरसेवक प्रकाश भोईर, शहर संघटक बाळाराम म्हात्रे, शिवसेना उबाठा शहर प्रमुख प्रकाशजी तेलगोटे, मनसे शहर संघटक प्रल्हाद म्हात्रे, समाजातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत मोरे, शिवराम केसरकर, विठ्ठल कळंबे, कृष्णा उतेकर, चिंदमामा उतेकर, रामशेठ साळवी, रामशेठ गोळे, किशोर गोळे, सखारामबुवा वाडकर, नवनाथ अहिरे, सालकर भावोजी, सुभाष घाडगे, सखारामबुवा गाडे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्राचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी तानाजी मालुसरे यांच्या घरी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कर्तबगार माणिकराव जगतापांची लेक स्नेहलदीदी

बैल दिवाळी इतिहास, संस्कृती आणि शेतीचे धागे विणणारा सण