लालबागचा राजा Untold Story
लालबागच्या राजाच्या इतिहासाबाबत काही
स्रोतांमध्ये १९२८, १९३१ आणि १९३४ अशा वेगवेगळ्या तारखा आढळतात. मात्र मंडळाच्या सध्याच्या
अधिकृत उपलब्ध ऐतिहासिक नोंदीनुसार १२ सप्टेंबर १९३४ रोजी गणेशमूर्तीची स्थापना करण्यात
आली. म्हणजे यंदाचे २०२६ हे ९२वे वर्ष मंडळ साजरे करत असल्याची अधिकृत नोंद सांगितली
जात आहे. आज लालबागच्या राजाची मूर्ती आणि उत्सव भव्य स्वरूपात साजरा होत असला तरी
प्रारंभीच्या थाटामाटात परंतु उत्सव म्हणून करायचा असे ठरले होते, “आम्हाला जगण्यासाठी
बाजाराची जागा मिळावी” या सामान्य माणसाच्या गरजेतून. त्यातून नवस झाला, नवस पूर्ण
झाला, कृतज्ञतेतून गणपती बसला आणि पुढील जवळपास शतकात तो जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान
बनला. हीच लालबागच्या राजाच्या इतिहासातली दुसरी बाजू आहे. गर्दीने ओसंडणारे इतके भव्य
दिव्य स्वरूप आपल्या मार्केटमधील गणपतीला प्राप्त होईल असे पूर्वसूरींच्या स्वप्नातही
आले नसावे.
१९३२ मध्ये पेरू चाळ येथील बाजार
बंद झाल्यानंतर स्थानिक विक्रेत्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली. स्थानिक मासेविक्रेते
आणि व्यापाऱ्यांनी गणपतीकडे कायमस्वरूपी बाजारपेठ मिळावी, आमचा रोजगाराचा प्रश्न सुटावा
या हेतूने नवस केला गेला. म्हणजे लालबागच्या राजाच्या कथेत सुरुवातीपासूनच रोजगार आणि
उपजीविका हा महत्त्वाचा विषय होता. मूळ नवस बाजारपेठेसाठी होता. नवस’ ही परंपरा
सामाजिक मानसशास्त्राशीही जोडलेली आहे. भक्तांच्या वैयक्तिक मनोकामना त्याला जोडल्या
गेल्या होत्या. मार्केट उभे राहिल्यानंतर कृतज्ञतेपोटी गणपतीची स्थापना करण्यात आली.
लालबागचा राजा ‘बाजाराच्या संघर्षातून’ जन्माला आला लालबागचा राजा श्रीमंतीच्या नवसातून
जन्मलेला नाही; तो रोजगाराच्या नवसातून जन्मलेला आहे. पुढे भक्तांनी स्वतःच्या इच्छा-आकांक्षांसाठी
नवस करण्यास सुरुवात केली आणि ‘नवसाला पावणारा गणपती’ ही ओळख रूढ झाली. म्हणजेच मूळ
नवस रोजगारासाठी होता.
त्याची लिंक लावायची म्हटली तर एका
बाजारासाठी संघर्ष करणाऱ्या सामान्य लोकांनी गणपतीला केलेला नवस → बाजारासाठी जागा
मिळणे → कृतज्ञतेने गणेशोत्सव → स्थानिक श्रद्धा → ‘नवसाचा गणपती’ → देश-विदेशातील
प्रसिद्ध श्रद्धास्थान, असा हा जवळपास शतकभराचा प्रवास आहे.
राजाच्या इतिहासात हिंदू-मुस्लिम सामाजिक
सहकार्याचा संदर्भ दिसतो. बाजारासाठी जागा उपलब्ध करून देण्यात राजाबाई तैय्यबली
या जमीनमालकाचा उल्लेख येतो.जागेचा प्रश्न सुटल्यानंतर त्यावेळच्या काही स्थानिक व्यक्तींनी
बाजार उभारणीसाठी प्रयत्न केले त्यात कुंवरजी जेठाभाई शाह, डॉ. व्ही. बी. कोरगावकर,
नाखवा कोकम मामा, भाऊसाहेब शिंदे आणि डॉ. यू. ए. राव यांसारख्या व्यक्तींचा उल्लेख
इतिहासात आढळतो. प्रारंभीची मूर्ती मासेमारी करणाऱ्या स्थानिक समाजाच्या पारंपरिक पोशाखाशी
संबंधित स्वरूपात सजवली गेल्याचा उल्लेख आढळतो. सुरुवातीच्या काळात हा गणपती कामगार,
मच्छीमार आणि छोट्या व्यापाऱ्यांचा गणपती होता. पहिल्या मूर्तीचे स्वरूप आजच्यासारखे
नव्हते. पहिली मूर्ती होडी वल्हवणाऱ्या दर्यासारंगाच्या रूपातील असल्याचे वर्णन आढळते.
त्यामुळे ‘राजा’ ही लोकप्रिय प्रतिमा नंतरच्या काळात निर्माण झालेली सांस्कृतिक उत्क्रांती
म्हणून पाहता येते.
आज आपण पाहतो तो राजेशाही दरबारातील स्वरूपातील गणपती ही नंतर विकसित झालेली प्रतिमा आहे. ‘राजा’ ही प्रतिमा सामाजिकदृष्ट्याही महत्त्वाची आहेआज ‘राजा’ म्हटल्यावर राजेशाही पोशाख, मुकुट आणि भव्य दरबार आठवतो. लालबाग हा मुंबईच्या औद्योगिक पट्ट्यातील महत्त्वाचा परिसर होता.लालबागच्या राजाचा इतिहास म्हणजे जुन्या गिरणगावाचाही इतिहास. त्यामुळे राजाची लोकप्रियता वाढण्यामागे गिरणी कामगार आणि निम्न-मध्यमवर्गीय मुंबईचे सांस्कृतिक जग महत्त्वाचे ठरले आहे. एकप्रकारे हा केवळ धार्मिक इतिहास नसून मुंबईच्या गिरणगावाचा, बाजारपेठेचा, कामगारांचा आणि स्थानिक समाजजीवनाचा इतिहास आहे. त्या काळातील लालबाग हा प्रचंड औद्योगिक परिसर होता. भायखळा, लालबाग, परळ, शिवडी, दादर, प्रभादेवी, वरळी, डिलाईल रोड, महालक्ष्मी हा परिसर म्हणजे गिरणगाव. यंत्रांची धडधड आणि भोंग्यांचा आवाज दिवसरात्र ऐकू येत असे. मुंबईतील कामगार संस्कृती, स्थलांतरितांचे जीवन, व्यवसायाची असुरक्षितता आणि धार्मिक श्रद्धा यांचा संगम या ठिकाणी नांदत होता त्याने उत्सवाची धार्मिकता, सामाजिक भान जोपासले होते. गर्दीने लोककला राबवत पावित्र जपले होते. मात्र कामगार नेते डॉ. दत्ता सामंत यांच्या जागतिक गिरणी संपात या ठिकाणी झोपडपट्टी आणि चाळीत राहणारा गिरणी कामगार आणि उद्योग उध्वस्त झाला.
लालबागचा राजा हा केवळ धार्मिक उत्सव
साजरा करणारी संस्था म्हणून थांबला नाही, १९३४ पासून विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम
राबवले जात आहेत. कोविड काळात जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर परंपरागत गणेशमूर्तीची
प्रतिष्ठापना न करता ‘आरोग्योत्सव’ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या काळात
कोरोना काळात लालबाग, परळ, शिवडी, चिंचपोकळी, काळाचौकी आदी परिसरात वैद्यकीय तपासणी,
औषधवाटप आणि समुपदेशन यांसारखे आरोग्यसेवा उपक्रम राबवण्यात आले. दहा दिवसांच्या
रक्तदान शिबिराच्या उपक्रमात १,५८५ रक्तदात्यांनी रक्तदान केले होते. त्यातील काही
रक्तपिशव्या जम्मू-काश्मीरमधील लष्करी रुग्णालयांकडे पाठवण्यात आल्या.नौदलातील जवानांसाठी
दर तीन महिन्यांनी रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला. आर्थिकदृष्ट्या
गरजू मूत्रपिंड विकाराच्या रुग्णांना नाममात्र शुल्कात डायलिसीसची सुविधा देण्याचा
उपक्रम.शैक्षणिक विकासासाठी प्रबोधिनीअंतर्गत विविध उपक्रम राबवले जातात. यात साने
गुरुजी अभ्यासिका, स्वातंत्र्यवीर सावरकर ग्रंथालय, संत ज्ञानेश्वर संदर्भ पुस्तक बँक
यांचा समावेश आहे. स्वामी विवेकानंद शिष्यवृत्तीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक
मदत केली जाते.राज्यसेवा, PSI/STI तसेच बँक व रेल्वे भरतीसारख्या परीक्षांसाठी मार्गदर्शन
व समुपदेशन वर्ग आयोजित केले जातात.लोकमान्य टिळक कॉम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या
माध्यमातून Office Automation, DTP, Tally, Taxation, AutoCAD, C/C++ आदी अभ्यासक्रम
नाममात्र शुल्कात दिले जातात.मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार विविध नैसर्गिक आपत्ती आणि
राष्ट्रीय संकटांच्या काळात आर्थिक मदत करण्यात आली आहे. उदाहरणार्थ, १९९० मध्ये कोकण
पूरग्रस्तांसाठी मदत आणि १९९९ मध्ये कारगिल युद्धातील शहीद जवानांच्या कुटुंबांसाठी
Army Central Welfare Fundला देणगी देण्यात आली. थोडक्यात लालबागचा राजा हा केवळ गणेशोत्सव
किंवा दर्शनापुरता मर्यादित न राहता आरोग्यसेवा, रक्तदान, शिक्षण, स्पर्धा परीक्षा
मार्गदर्शन, कौशल्य प्रशिक्षण, योग आणि आपत्तीच्या काळातील मदत अशा विविध क्षेत्रांत
सामाजिक उपक्रम राबवणारे मंडळ म्हणून कार्यरत आहे.
१९३५ ते २०२४ पर्यंच्या लालबागच्या राजाच्या मूर्तींचे संकलनही प्रसिद्ध झाले आहे. जुन्या काळातील मूर्ती आणि आजची मूर्ती यांच्यातील फरक केवळ सजावटीचा नाही. उपलब्ध जुन्या छायाचित्रांच्या संदर्भांतून मूर्तीच्या मुद्रा, अलंकार, पोशाख आणि राजेशाही प्रतिमेचा क्रमशः विकास झालेला आहे. आजचे राजेशाही स्वरूप अलीकडच्या दोन दशकांत अधिक ठळक झाल्याचे पहायला मिळते. गेल्या काही वर्षांपासून उद्योजक अंबानी यांच्या सोबतीने तर उत्सवाची भव्यता आणि श्रीमंती कित्येक पटीने वाढली आहे, त्याचबरोबर हे न पटणारे टीकाखोरही वाढले आहेत.
- रवींद्र मालुसरे
अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई
9323117704







0 टिप्पण्या