बहुपक्षीय लोकशाहीला वाळवी लावण्याचा प्रयत्न,
आपला राष्ट्रग्रंथ संविधान जगात सर्वोत्तम - ज्येष्ठ संपादक तुळशीदास भोईटे
मुंबई (रवींद्र मालुसरे) : संसदीय लोकशाही बहुपक्षीय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान घडवताना भारतातील विविधता लक्षात घेत बहुपक्षीय संसदीय लोकशाही आपल्याला दिली. पण गेल्या काही दशकांमध्ये राजकीय स्वार्थासाठी पक्षांतरे आणि आता तर थेट पक्षचोरीचा आरोप होत, पक्षांचंच अस्तित्व संपवण्यास सुरुवात केली आहे. बहुपक्षीय संसदीय लोकशाहीला अशी वाळवी लागत पक्षच संपू लागले, तर लोकशाहीच उरेल कशी? मुद्दा फक्त ठाकरे, शिंदे, पवार, फडणवीस, मोदी, शाह, गांधी या राजकीय नेत्यांपुरता मर्यादित नाही. मुद्दा फक्त शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजपा या पक्षांपुरता सुद्धा मर्यादित नाही. त्याची व्यापकता समजणं, गरजेचं आहे. हा संसदीय लोकशाहीच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे असे मत राजकीय विश्लेषक मुक्तपीठचे संपादक तुळशीदास भोईटे यांनी वृत्तपत्र लेखकांच्या समोर मांडले.
काशिनाथ धुरू हॉल ट्रस्टच्या दादर सार्वजनिक वाचनालयात मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा ७७ वा वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी भोईटे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्रमुख कार्यवाह विश्वनाथ पंडीत तर पोलादपूर तालुक्यातील विद्यादानाचे कार्य निस्वार्थीपणे करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवराम उतेकर, माजी अध्यक्ष विजय ना कदम, माजी अध्यक्ष प्रकाश नागाने हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. लोकशाहीचा गाभा संविधानात वसलेला असतो आणि त्या लोकशाहीला जिवंत ठेवण्याचे काम लेखणी करीत असते. शब्दांमध्ये समाजाला दिशा देण्याची, व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची आणि सत्याचा आरसा दाखवण्याची ताकद असते. याच विचारधारेला केंद्रस्थानी ठेवून मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने 'वृत्तपत्र लेखक दिनाचे औचित्य साधून या विशेष वैचारिक व्याख्यानाचे आयोजन केले होते. भोईटे पुढे असेही म्हणाले की, हातातील दोन विषय बाजूला ठेवून देशवासीयांसमोर आलेली सध्याची राजकीय परिस्थिती सर्वांनाच अस्वस्थ करून सोडत आहे, त्यामुळे पुस्तक लिहिण्यासाठी मी तिसरा विषय हाती घेतला तो संविधानाचा. आपल्या राष्ट्रग्रंथाचे महत्व अधोरेखित करण्याचा.आपल्या राष्ट्रग्रंथासोबत सभोताली आजवर घडत आलेल्या, घडत असलेल्या, घडू शकणाऱ्या राजकारणाचा वेधही घेण्याचा अभ्यासपूर्ण प्रयत्न केला आहे. सभोवतालचं वास्तव प्रत्येकाला कळलं पाहिजे. राष्ट्रग्रंथ संविधानात नेमकं काय आहे, तोच जगातील सर्वोत्तम कसा तेही सोप्या शब्दात समजलंच पाहिजे. त्यातून त्याच्या कसोटीवर सारं काही पाहण्याची सवय लागलीच पाहिजे.
शिवराम उतेकर यांनी परिस्थिती कशीही असो माणसाने आपल्या आयुष्याचे ध्येय ठरवले पाहिजे, त्याचबरोबर आपण समाजाचे काही देणं लागतो या भावनेतून विशेषतः परिस्थतीशी झगडणाऱ्या लोकांसोबत आपण माणुसकीच्या भावनेतून उभे राहायला हवे. वृत्तपत्र लेखक हेच काम हातात लेखणी धरून निर्भिडपणे आणि निस्वार्थीपणे करीत असतो. वर्तमानातील सामाजिक व राजकीय घडामोडींचे भान ठेवत, संविधानाच्या मूळ मूल्यांशी निष्ठा राखून समाजहितैषी लेखन कसे घडायला हवे यावर आज सखोल विचारमंथन झाले आहे.
संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी १९४९ पासूनच्या संस्थेच्या चळवळीचा आढावा घेतला. वृत्तपत्र लेखक हा ऐकतो, बोलतो, वाचतो आणि मग लिहितो, याच अनुषंगाने आज दिल्ली दरबारी डाव प्रतिडाव चाललेल्या व देशभर घुसळण चाललेल्या महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. आदर्श वार्ताहर संपादक पंकजकुमार पाटील यांचा प्रभाकर पाध्ये स्मृती पुरस्कार प्रदान करून यावेळी गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रम प्रमुख दिगंबर चव्हाण तर आभार प्रदर्शन कार्यवाह नितीन कदम यांनी केले. कार्यक्रम प्रमुख सुनील कुवरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्याध्यक्ष रमेश सांगळे, माजी अध्यक्ष प्रकाश नागणे, दत्ताराम गवस, राजन देसाई, रामचंद्र जयस्वाल, अब्बास आतार, श्रीनिवास डोंगरे, विवेक तवटे, सतीश भोसले, दिलीप दळवी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.



0 टिप्पण्या