Ticker

6/recent/ticker-posts

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलुखातील ऐत्याहासिक महाड-पोलादपूर

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलुखातील ऐत्याहासिक महाड-पोलादपूर 
महाड पोलादपूर तालुक्याचा शिवकालीन इतिहास हा केवळ रायगड किल्ल्यापुरता मर्यादित नसून संपूर्ण स्वराज्याच्या आर्थिक,प्रशासकीय आणि,लष्करी संरक्षण व्यवस्थेचा कणा असल्याचे दिसून येते.शिवकाल ते पेशवेकाल याचा अधिक खोलात अभ्यासल्यास या भूमीत घडलेल्या अनेक अशा गोष्टी समोर येतात. अनेक गावांत पोवाडे,गोंधळ,शिवजयंती उत्सव, पालख्या, वीरगळ,जुन्या सनदा,कुलवृत्तांत,जुन्या देवळांतील शिलालेख,घराण्यांच्या वंशावळ्या,स्थानिक देवस्थानांच्या कथा यांतून दोन्ही तालुक्यातील अनेक गावांत आजही शिवकालीन आठवणी जपल्या जातात.त्या सांस्कृतिक जीवनाशी निगडित असल्यामुळे शिवकालीन स्मृती  इतिहास आणि लोकस्मृती आजही जिवंत आहेत.महाड परिसरातील अनेक प्राचीन देवळांना शिवकालात संरक्षण आणि देणग्या मिळाल्याचे उल्लेख आढळतात. उत्सव,यात्रा आणि बाजार यांमुळे हा प्रदेश सांस्कृतिकदृष्ट्याही समृद्ध होता हे लक्षात येते.

रायगड ही राजधानी असली तरी तिचे "जीवन" महाड-पोलादपूरच्या दऱ्याखोऱ्यात धडधडत होते. महाड शहर हा या राजधानीचा श्वास होता. शिवकालीन इतिहास समजून घेताना केवळ रायगड,पाचाड किंवा दासगाव यांचाच विचार पुरेसा ठरत नाही. महाड - पोलादपूर या प्रदेशातील भौगोलिक रचना,घाटमार्ग,नद्या,स्थानिक समाज आणि वतनदारी व्यवस्था यांचा एकत्रित अभ्यास केल्यास ही भूमी जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार कशी होती हे लक्षात होते.


रायगड ही राजधानी असली तरी तिच्या दैनंदिन गरजांचा मोठा भार महाड आणि पोलादपूर तालुक्यातील महाबळेश्वर घाटाच्या परिसरावर पूर्वापार होता.महाड,दासगाव आणि सावित्री नदीमार्गे येणारा माल पाचाडमार्गे रायगडावर पोहोचविला जात असे.त्यामुळे महाड हे स्वराज्याच्या पुरवठा व्यवस्थेचे प्रमुख केंद्र होते.या दोन्ही तालुक्यातील अनेक गावांतील देशमुख,पाटील,कुळकर्णी,हजारो मावळे,बलुतेदारी करणारे यांनी स्वराज्याला साथ दिली. महसूल वसुली,धान्यसाठा,घोड्यांसाठी तबेले,सैनिकांच्या निवासाची व्यवस्था आणि व्यापाऱ्यांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र अधिकारी याच दोन्ही तालुक्यातून नेमले जात असत. या दोन्ही तालुक्यातील अनेक तरुण डोंगराळ प्रदेशाची माहिती असल्याने आणि ते गनिमी युद्धात निष्णात होते.त्यामुळे स्वराज्याच्या पायदळात, घोडदळात आणि गडांच्या शिबंदीत कार्यरत होते.जरी त्यांच्या नावांची स्वतंत्र नोंद फारशी उपलब्ध नसली,तरी स्थानिक परंपरांमध्ये त्यांच्या शौर्याच्या कथा टिकून आहेत. या परिसरातील मावळे रायगडाच्या संरक्षणासाठी आणि स्वराज्याच्या मोहिमांमध्ये सहभागी होत असत. प्रत्येक गावाची स्वतंत्र शिवकालीन परंपरा आहे. विशेषतः दासगाव, बिरवाडी,   उमरठ,   साखर,पाचाड, नाते,वाळण,शिवथर,कोंझर, वरंधा, ढवळे, बोरावळे, सडे, महादेवाचा मुरा, देवळे, कोंढवी, देवळे, करंजे आणि सव या गावांचा इतिहास अभ्यासल्यास अनेक दुर्मीळ संदर्भ आणि बखरींमधील उल्लेख आढळतात. महाड आणि पोलादपूर तालुक्याचाइतिहास अजून पूर्णपणे सविस्तर लिहिला गेलेला नाही.दोन्ही तालुक्यातील अनेक गावांमध्ये आजही वीरगळ (वीरशिळा)  आढळतात.या वीरगळांमधून स्थानिक योद्ध्यांच्या बलिदानाची माहिती मिळते.त्यांचा शास्त्रीय अभ्यास अजूनही मोठ्या प्रमाणात व्हायचा आहे. अनेक अप्रकाशित कागदपत्रे, बखरी,  गावोगावी जपलेल्या परंपरा आणि किल्ल्यांच्या अवशेषांमध्ये जिवंत आहे. गावागावांतील वीरगळ, देवस्थानांची कागदपत्रे,वतनदार घराण्यांच्या सनदा आणि लोकपरंपरा यांचे संकलन केले,तर इतिहासाचा मागोवा घेणारा एक स्वतंत्र ग्रंथ सहज तयार होऊ अशा संशोधनातून अनेक अज्ञात मावळे,सरदार आणि स्थानिक घराण्यांचे योगदान प्रकाशात येण्याची शक्यता आहे.सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा भाग छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या दृष्टीने अत्यंत धोरणात्मक होता.

१९८५ पासून मी या दोन्ही तालुक्यातील इतिहासाचा अभ्यास करण्याचा मी माझ्यापरीने प्रयत्न केला. शिवरायांच्या घोड्यांच्या टापांनी आणि तलवारीच्या खणखणाटाने निनादलेला या भूभागाचा इतिहास कुठे सापडेल ? शेकडो ग्रंथ,दुर्मिळ कागदपत्रे,जाणती माणसे यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी जे  काही इतिहासाचे संचित जमा करू शकलो.इतिहासाचा हा धांडोळा घेताना या लेखाद्वारे आपल्यासमोर घेऊन येताना "छत्रपती शिवाजी राजांच्या रायगड राजधानीच्या मुलुखातील म्हणजे महाड-पोलादपूर" तालुक्यातील हे स्थलदर्शन नक्कीच इतिहासाची आवड निर्माण करणारा,इतिहासाची प्रेरणा देणारा,पूर्वजांच्या पराक्रमाची साक्ष देणारा आणि त्यांच्याविषयी अभिमान बाळगणारा असेल.

सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे (उमरठ),सुभेदार सूर्याजी मालुसरे (साखर),नरवीर मुरारबाजी देशपांडे (किंजळोली),गोदाजी जगताप (सांदोशी), हरजीराजे महाडिक (खर्डी) अशा अनेकांनी प्राणाची आहुती देत शिवरायांना मोलाची साथ दिली होती याची नोंद अनेक बखरकारांनी घेतली आहे.प्रतापगड ते रायगड या दरम्यानच्या भूभागाने शिवाजी राजांना स्थैर्य दिले.बारा मावळातील वतनदारांचे वर्तन स्वराज्याचे तोरण बांधताना लक्षात आल्यावर, राजगड आणि पुणे परिसर सोडून या घनदाट जावळीतील अरण्याचा आसरा घेतला नाही तर स्व-राज्य स्थापन करण्याचे मातोश्री जिजाऊंचे स्वप्न पूर्ण होणार नाही हे महाराज जाणून होते.

पाचाड : स्वराज्याची राजधानी  दुर्गदुर्गेश्वर रायगड पाहिला नाही असा दुर्गप्रेमी विरळाच. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथे आऊसाहेबांच्या निवासस्थानाला भेट देऊन नंतर समाधीचे दर्शन घेणे ओघाने येतेच. वयोमानाप्रमाणे राजमाता जिजाऊंना गडावरची थंड हवा मानवत नसल्याने महाराजांनी गडाच्या पायथ्याशी भक्कम तटबंदीचा राजमातेच्या इतमामाला साजेसा वाडा बांधला होता. हा वाडा म्हणजे एक प्रकारचा भुईकोट होता. चौकोनी आकाराचा पाचाड कोट ५ एकरवर पसरलेला असुन याच्या तटबंदीत चार टोकाला असलेले ४ बुरुज वगळता पुर्व,उत्तर व दक्षिण बाजुस प्रत्येकी ३ बुरुज तर पश्चिमेला ५ बुरुज अशी याची रचना आहे. पाचाडमध्ये घोडदळ, हत्ती आणि इतर राजकीय व्यवस्थेसाठी स्वतंत्र जागा होती. जन्म विदर्भात, विवाह मराठवाड्यातील भोसले कुळात तर बहुतांशी वास्तव्य घाटमाथ्यावरील मावळात व आयुष्याचा उत्तरार्ध कोकणात असे संपुर्ण महाराष्ट्रात आयुष्य व्यतीत केल्यावर या राजमातेने पाचाड मुक्कामी १८ जून १६७४ रोजी पहाटे शेवटचा श्वास घेतला.  राजधानीत येणारे दूत, व्यापारी आणि सरदार प्रथम पाचाड येथे मुक्काम करत असत.

महाड : महाड हे सह्याद्रीच्या घाटमाथ्याला  आणि कोकण किनारपट्टीला जोडणाऱ्या मार्गावर वसलेले आहे. "महाड" या नावाची व्युत्पत्ती "महा-हाट" (मोठी बाजारपेठ) अशी मानली जाते. रायगड जिंकण्यासाठी शत्रूला प्रथम महाड परिसरावरील नियंत्रण मिळवणे आवश्यक होते. त्यामुळे महाडला "राजधानीचे प्रवेशद्वार" मानले जात असे. देशावरून येणारे सैन्य, व्यापारी आणि राजदूत यांच्यासाठी हा प्रदेश प्रवेशद्वार होता. गुजरात, सातारा, वाई, महाबळेश्वर, दाभोळ, बाणकोट आणि कोकण किनारपट्टीतील व्यापाऱ्यांची येथे वर्दळ असे. इ.स. १६७४ मध्ये रायगड राजधानी झाल्यानंतर महाड परिसरात घोड्यांचे तबेले, धान्यकोठारे, रसद पुरवठा केंद्रे आणि व्यापाऱ्यांच्या पेठा विकसित झाल्या. राजधानीला लागणारे लाकूड, लोखंड, धान्य आणि मीठ,  तांदूळ,  सुपारी,   नारळ,   मध,   गूळ,   लोखंडी अवजारे, गुरेढोरे, नाचणी, वरी, भात, तेल, घोड्यांचा चारा, लाकूड यांचा मोठा पुरवठा महाडमार्गे होत असे. सावित्री, गांधारी व काळ नद्यांच्या संगमामुळे महाडला सामरिक महत्त्व प्राप्त झाले होते. समुद्रकिनाऱ्यावर किंवा घाटमार्गावर संकट उद्भवल्यास काही तासांतच राजधानीला खबर मिळत असे. १६८९ मध्ये रायगड मोगलांच्या ताब्यात गेल्यावर महाड परिसरावरही त्याचा परिणाम झाला.जंजिऱ्याच्या सिद्दींचा सतत धोका होता. सिद्दी हा स्वराज्याचा कट्टर शत्रू होता. जंजिऱ्याच्या सिद्दींचे आरमार आणि किनारी भागातील धोक्यामुळे महाड परिसरात कायम सैनिकी सज्जता ठेवण्यात येत असे.  महाड, पाचाड आणि दासगाव ही ठिकाणे राजधानीच्या सुरक्षेची पहिली फळी होती. महाडच्या बाजारपेठेवर हल्ला होऊ नये म्हणून आसपासच्या दासगाव,   दौलतगड आणि बिरवाडी परिसरातून सिद्दींच्या हालचालींवर लक्ष ठेवले जाई. झुल्फिकारखानाने रायगड जिंकल्यानंतर महाड परिसरही मोगलांच्या ताब्यात गेला. पण स्थानिक मावळ्यांनी प्रतिकार सुरू ठेवला आणि पुढे मराठा सत्तेच्या पुनर्स्थापनेत या प्रदेशाने योगदान दिले.



उमरठ : तानाजी मालुसरे यांचा येथे वाडा होता. त्या घराचे अवशेष अलीकडच्या काळापर्यंत अस्तित्वात होते. गोडोलीवरून खाली कोकणात आल्यानंतर आपल्या दोन्ही मुलांना घेऊन तानाजी-सूर्याजींची आई त्या घळीत काही दिवस राहिल्याची इतिहासात नोंद आहे. आज नरवीर तानाजी मालुसरे आणि शेलारमामा यांची समाधी आणि लढाईच्या पावित्रातील ६ फूट उंचीचा लढाईच्या पावित्रातील भव्य पुतळा १९६५ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या आदेशाने उभारलेला पुतळा आहे. चीनचे युद्ध सुरु झाल्यानंतर यशवंतराव सरंक्षणमंत्री म्हणून दिल्लीला गेले त्यामुळे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी त्याचे अनावरण केले. हजारोंच्या उपस्थितीत स्वातंत्र्यसेनानी अंबाजीराव मालुसऱ्यांचा त्यावेळी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी सत्कार केला होता. तानाजीरावांच्या मृत्यूनंतर सूर्याजी मालुसरे त्यांच्या कलेवरासह वेल्हाची पेठ, ढोणीचे पाणी, बिरवाडी,भावे या गावावरून उमरठला आले. आणि साखर येथे राहिले. सूर्याजींचे तीन मुलगे होते. नाईकजी  हा साखर येथे राहू लागला. कान्होजी उमरठला  तर भोरजी कडोशी या महाबळेश्वर पलीकडे असलेल्या गावी राहावयास गेला. तर  तानाजींच्या चुलत्याचा म्हणजे भोरजीचा वंश फुरुस या कोयना काठच्या गावाला गेले. त्याचप्रमाणे मालुसरे वंशज साखर, धाकटी वाकी,गावडी, किंवे, आंबेशिवथर, कसबे शिवथर, गोडवली, पारमाची,लव्हेरी या गावात आजही राहतात.उमरठच्या समाधीच्या लगतच्या डोंगरावर एक मोठी घळ आहे.

साखर : सूर्याजी मालुसरे यांचे हे गाव.  सिंहगडाच्या स्वारीच्या वेळी टेहळणी करताना पायथ्याशी असलेल्या  घेरेसरनाईकाच्या सोबत केलेल्या बोलचालीचे वर्णन असे आहे - (शिवकाळातला समकालीन शाहीर तुलसीदासच्या पोवाड्यात अशी नोंद आहे... ) १९२८ मध्ये प्रसिद्ध केलेल्या ग्रंथात हा ५५ चौक असलेला सुभेदारांच्या पराक्रमाचा पोवाडा आहे... त्यातल्या ओळी आहेत -

धन्य ह्याची नारायणा | कोण तुमचे गाव |

एवढे सांगावे आम्हाला |

सुभेदार म्हणतात -

मी साखरेचा पाटील |

गेलो होतो पुण्याला | मंडईच्या वाड्यात |

गेलो होतो पट्टी लावायला | जात होतो घराला |

तेथे वाघाने अडविला | तुमच्या आलो आश्रयाला |

यात साखरेचा पाटील याचा अर्थ सावित्री-ढवळी- कामथी तीन नदीच्या तीरावर असलेल्या आणि सूर्याजी मालुसरे यांची समाधी आणि त्यांची पत्नी सती गेली ती सतीशिळा म्हणजे "साखर गाव" कोणते हे सांगायची गरज नाही.साखर गावातील मालुसरे आणि उमरठ येथील कळंबे मंडळी १९३० पासून  उमरठ येथे माघ वद्य नवमीला तानाजीरावांची पुण्यतिथी साजरी करीत आहे. साखर गाव हा बारा बलुतेदारी करणाऱ्यांचा मोठा  गाव. या गावात असणारे पांढरीचे देऊळ अनेक शतकापूर्वीचे आहे. तसेच या मंदिराच्या आसपास अनेक वीरगळी आजही अनेक पराक्रमी वीरांची साक्ष देत आहे.

किंजळोली : मुरारबाजी देशपांडेंचे हे मूळ ऐत्याहासिक गाव. जावळींच्या चंद्रराव मोरें याच्याशी लढताना शिवाजीराजे भोसले यांना मोरेंच्या सैन्यातून लढणाऱ्या मुरारबाजीच्या युद्धकौशल्याचे विलक्षण कौतुक वाटले. त्यानंतर मुरारबाजी देशपांडे हे स्वराज्य सैन्यातील वीर बनले. इ.स. १६६५ साली मोगलांनी पुरंदर किल्ल्याला घातलेल्या वेढ्यात त्याने मराठा सैन्यांचे नेतृत्व करत कणखर झुंज दिली. मात्र १६ मे १६६५ रोजी मोगलांनी केलेल्या सुलतान लढयाचा प्रतिकार करताना त्यांना वीरमरण आले.मुरारबाजी देशपांडे यांनी पुरंदर शर्तीने लढवताना अवघ्या सातशे मावळ्यांनिशी दिलेरखानाच्या पाच हजार फौजेच्या तोंडचे पाणी पळवले. मुरारबाजीचा या लढाईत अंत झाला. स्वराज्यासाठी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. या स्वराज रक्षक रणधुरंधर मुरारबाजी यांच्या समाधी जवळ ऐतिहासिक शौर्य आणि संस्कृतीच्या प्रतिक असलेल्या वीरांच्या शिळा आपल्या इतिहासाचा अभिमान बाळगून आहेत.

बिरवाडी : डोंगराळ भूभाग आणि जंगलांमुळे गनिमी काव्यासाठी हा प्रदेश अनुकूल होता. शिवकालात महाड परिसराचा समावेश बिरवाडी सुभ्यामध्ये होता. स्थानिक परंपरेनुसार बिरवाडी सुभा हा स्वराज्याच्या कोकणातील महत्त्वाच्या प्रशासकीय विभागांपैकी एक मानला जातो. या सुभ्यातून महसूल, सैनिकी भरती आणि किनारपट्टीवरील हालचालींवर नियंत्रण ठेवले जात असे. या परिसरातील मावळे स्वराज्याच्या अनेक मोहिमांमध्ये सहभागी होते. बिरवाडी किल्ल्याची उभारणी इ.स. १६४८ च्या सुमारास बांधण्यात आल्याचे उल्लेख आढळतात. जंजिऱ्याच्या सिद्दींच्या हालचालींवर लक्ष ठेवणे आणि कुंडलिका खोऱ्यावरील नियंत्रण राखणे हा त्याचा उद्देश होता. थोर इतिहास संशोधक महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार हे या गावचे.

छत्री निजामपूर : राजधानी रायगड च्या छत्राखाली वसलेले हे ऐतिहासिक गाव. रायगड घेऱ्यामध्ये दोन निजामपूर नावाची गावं आहेत. उपदुर्ग मानगडाच्या पायथ्याशी असलेलं मोठं निजामपूर, आणि दुसरं हे अन्नछत्राचं निजामपूर. निजाम म्हणजे त्या त्या परिसराचा व्यवस्थापक, आणि तो ज्या महालाचा अधिकारी जिथं राहतो त्या गावाला निजाम + पूर असे निजामपूर नाव पडत असे. आदिलशाही अंमलातील काळात, या गावात हा मुलकी व्यवस्थापक राहत असावा. मढेघाट, बिरवाडी आणि कावल्याबावल्या खिंडीतून रायगडाकडे जाणारा मार्ग याच छत्रीनिजामपूरमधून जात असल्याने, शिवकाळात गावाला अनन्यसाधारण महत्व होतं. जंजिरेकर सिद्दी आणि छत्रपती शाहूंच्या सैन्यामध्ये १० जानेवारी १७३४ रोजी रायगड परिसरात घनघोर युद्ध झाले. छत्रपती शाहूंचा सरदार बाजी भीमराव ९ जानेवारीच्या दिवशी छत्रीनिजामपूर मध्ये येऊन पोहोचल्याची नोंद सापडते. त्याच्यासोबत सोमवंशी बंधू, हरि मोरेश्वर, कृष्णाजी पवार, वाईचा शेखमिरा, कृष्णराव खटावकर यांचंही सैन्य होतं. या सैन्याने पराक्रमाची शर्थ करून, सिद्दी अंबर अफवानीला मात दिली. खासा सिद्दी अंबर ठार झाला. छत्रीनिजामपूरमधील गायकवाड, सकपाळ आडनावांचा उल्लेख कागदपत्रांमधून सापडतो. मोरोजी नाईक सकपाळ हे पेशवेकाळात गडावर सेवेत असल्याची नोंद आढळते. तसेच येसाजी गायकवाड या सरदारांचा नामोल्लेख अनेकदा दिसून येतो.

सांदोशी : स्वराज्याचे रणझुंझार सेनापती गोदाजी जगताप व सर्कले नाईक यांचे हे गाव. राजधानी रायगडच्या संकट काळात यांनी स्वराज्य वाचवले. रायगडाला वेढा पडला तेव्हा स्वराज्याचे धनी छत्रपती राजाराम महाराज यांना रणसंग्राम करीत सुरक्षित पणे बाहेर काढण्यात मोठा सिंहाचा वाटा गोदाजी जगतापांचा होता. कावळ्या बावळ्या खिंडी मध्ये गनीमांना रोखून त्यांच्या चिंधड्या उडवून रक्ताचे पाट वाहणारे व स्वराज्यासाठी तेथेच गतप्राण होणारे सांदोशी गावचे दोन हे महापराक्रमी वीर योद्धे होते.

 नाते : नाते हे गाव रायगडाकडे जाणाऱ्या मार्गावरील महत्त्वाचे ठिकाण होते. या भागातील लोक स्वराज्याच्या सैन्याला मार्गदर्शक आणि रसद पुरवठादार म्हणून मदत करत.देशाचे पहिले केंद्रीयमंत्री सी डी देशमुख यांचा हा गाव.

गंधारपाले : महाडजवळील गंधारपाले लेणी ही बौद्धकालीन असून शिवकालातही हा परिसर ओळखीचा होता. रायगडाकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी हा परिसर महत्त्वाचा मार्ग होता. त्यामुळे महाड हा केवळ शिवकालीन नव्हे तर प्राचीन काळापासून महत्त्वाचा प्रदेश राहिला आहे.

वाळणकोंड : शिवकाळात राजगड ते रायगड जोडणारा जो मुख्य 'राजमार्ग' किंवा पायवाट होती, ती याच वाळण कोंडाच्या परिसराजवळून जात असे. असे मानले जाते की, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे या मार्गावरून ये-जा करताना या ठिकाणी घटकाभर थांबून वरदायिनी देवीचा आशीर्वाद घेत असत. येथील खडकांमध्ये एका विशिष्ट कोनातून छत्रपती शिवाजी महाराजांचा चेहरा (नैसर्गिक प्रतिमा) दिसतो, यामुळेही या ठिकाणाचा शिवरायांशी असलेला भावनिक संबंध अधिक दृढ होतो.

कोंडेखळी : या ठिकाणी एक गुढ अनामिक अगम्य वृंदावन आहे. ते काशीबाईसाहेबांचे वृंदावन की सोयराबाईसाहेबांचे वृंदावन असा वाद आहे. गोनिदांना हे काशीबाईसाहेबांचे वृदांवन असावे असे सांगितले. झाडाने पुरते वेढलेल्या ह्या वृदांवनाचा फोटो  गोनिदांनी शिवतीर्थ  रायगड  पुस्तकात छापलेला आहे. वृंदावनात सर्वात वरती एक नक्षीदार गोलाकार हौद असतो ज्यात तुळस लावलेली आहे. इतिहास संकलक आप्पा परब म्हणतात : " हिंदु धर्मात पती पत्नीचे  स्मारक  बांधत नाही म्हणून काशीबाईंचे वृंदावन  शिवराय कसे बांधतील ? काशीबाई निपुत्रिक होत्या म्हणजे त्यांचे वृदांवन त्यांचा पुत्र बांधू शकत नव्हता. म्हणून हे काशीबाईंचे वृंदावन नव्हे. हे वृदांवन  सोयरांबाईसाहेबांचे असावे ' कारण संभाजीराजे  रायगडी सिंहासनावर बसल्यावर १६८२ च्या दरम्यान  सोयराबाई कैलासी गेल्या.त्यांच्यावर संभाजीराजे क्षुब्ध होते म्हणून सोयराबाईंचे वृदांवन  पुत्र ह्या नात्याने  संभाजीराजांनी बांधले. सोयराबाईंवर राग असल्याने  व त्या स्वराज्यघातकी वर्तणूकीतून गेल्यामुळेच  संभाजीराजांनी त्यांचे वृदांवन असे आडरानात निर्जन कोंडेखळीत बांधले. ह्या वृदांवनावर कुठलाही शिलालेख नसल्याने संदर्भपूर्ण दावा करता येत नाही.

वारंगी : रायगडावर मोगलांचे आक्रमण झाले तेव्हा राजधानी रायगडवर असलेले श्री जगदीश्वर मंदिरामधील शिवलिंगावर असलेले पवित्र शाळिग्राम किल्लेदाराने सुरक्षित भक्तीपूर्ण भावनेने गडाच्या खाली असलेल्या वारंगी गावामधे लपवले. या गावातील श्री शिव हनुमान मंदिरामध्ये ते आढळते. याला दुजोरा अनेक शिव इतिहासकारांनी दिला आहे. असेच  शाळिग्राम किल्ले शिवनेरी वर पण आहे. शौर्य आणि संस्कृतीच्या प्रतिक असलेल्या वीरांच्या शिळा आपल्या इतिहासाचा अभिमान बाळगून आहेत.

तळोशी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या  सैन्यदलातील सरदार पिलाजी पार्टे यांचे हे गाव. त्यांना महाराजांनी हे गाव इनाम म्हणून दिले होते. तळोशी - छत्रपती शिवाजी महाराजांच्या  सैन्यदलातील सरदार पिलाजी पार्टे यांचे हे गाव. त्यांना महाराजांनी हे गाव इनाम म्हणून दिले होते.

खर्डी : छत्रपतींच्या कन्या सईबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. महाराजांचे जावई होते. महाराजांनी हरजीराजांवर खुश होऊन त्यांना कर्नाटकातील स्वराज्याच्या प्रदेशाचे सुभेदार बनवले. त्यांनी दक्षिणेत मराठ्यांचा दरारा निर्माण केला आणि औरंगजेबाच्या सैन्याशी निकराचा लढा दिला. औरंगजेबाच्या दक्षिणेकडील आक्रमणादरम्यान त्यांनी जिंजीचा किल्ला मोगलांच्या हातात जाऊ दिला नाही. कर्नाटकातील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीवर आणि शौर्यावर प्रसन्न होऊन छत्रपती शिवरायांनी त्यांना सोन्याची जेजूरी गडावर "राजेशाही" हा किताब बहाल केला.

चंद्रगड : चंद्रगड किल्ला उमरठच्या पुढे  ढवळे गावाच्या पूर्वेला असून दक्षिण-उत्तर दिशेला पसरलेला आहे. महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वतरांगांमध्ये अनेक दुर्गम आणि ऐतिहासिक किल्ले आढळतात. त्यापैकी एक म्हणजे चंद्रगड किल्ला, ज्याला ढवळगड किल्ला असेही म्हणतात. आज, हा किल्ला जरी भग्नावस्थेत असला तरी त्यावर जुन्या जलकुंड, तटबंदी आणि प्राचीन वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात.शिवाजी महाराजांनी इ.स. १६५६ मध्ये चंद्रराव मोर्‍यांना नेस्तनाबूत केले आणि जावळी स्वराज्यात दाखल झाली. त्या बरोबर ढवळगड ही स्वराज्यात दाखल झाला. त्याचे नाव बदलून महाराजांनी चंद्रगड ठेवले. गडाचा माथा लहानसा आहे. घराचे चौथरे आणि पाण्याच्या टाक्या पहायला मिळतात. येथे आकाशाखाली उघडय़ावर शंकराची पिंड आहे. त्याला ढवळेश्वर महादेव म्हणतात. महाशिवरात्रीच्या उत्सवात या ठिकाणी नियमित पूजा केली जाते. उंचवटय़ावर वाडय़ाचे भग्नावशेष दिसतात. उत्तर अंगाला पाण्याची टाकी आहेत. किल्ल्यावर १४  पाण्याची टाकी आहेत. वरंधा घाट आणि कोकणातील मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी चंद्रगडाचा उपयोग होत असे.

कांगोरीगड : मंगळगड उर्फ कांगोरी गड जावळीच्या खोर्‍यातील एका उंच पहाडावर बांधण्यात आला. हा भाग उंच पहाड, घनदाट जंगल व खोल दर्‍यांनी नटलेला आहे.घाटमार्गाच्या कांगोरी उर्फ मंगळगड हा किल्ला जावळीच्या खोर्‍यातील भोप घाट, वरंध घाट व अस्वल खिंड ह्या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी व  सावित्री नदीकाठी वसलेल्या महाड शहरातून परदेशांशी व्यापार चालत असे. व्यापारी मार्गाचे संरक्षण करण्यासाठी कोकणात उतरणाऱ्या वाटेवरील रायगडचा उपदुर्ग असलेला हा किल्ला टेहळणीसाठी एक महत्वाचा किल्ला आहे.  शिवाजी महाराजांनी जावळी ताब्यात घेतली. त्याबरोबर ८ जानेवारी १६५८ रोजी कांगोरी गड,किल्लेही महाराजांच्या ताब्यात आले. मुरारबाजीसारखा कसलेला योध्दा मिळाला. कांगोरीगडाची डागडूजी करुन त्याचे नाव बदलून ‘‘मंगळगड’’ ठेवले. किल्ल्यावर कांगोरीमातेचे (देवी) मंदिर आहे.  स्वराज्यांची राजधानी रायगडच्या जवळ असल्यामुळे याचा उपयोग राजकीय गुन्हेगारांना तुरुंगवासात ठेवण्यासाठी केला गेला. या गडावर जाण्यासाठी तीन-चार मार्ग आहेत. चंद्रगड पाहून तेथून महादेव मुर्‍ह्यामार्गे अंदाजे सहातासांच्या पाय प्रवासानंतर मंगळगडाला पोहोचता येते. दोनदा डोंगर चढून उतरावा लागतो. महाडच्या पिंपळवाडीतून तसेच कामथी खोऱ्यातील  सडे गावातून सुद्धा अवघड वाटेने जाता येते.

कोंढवी किल्ला : पोलादपुर तालुक्यात कशेडी घाटमार्गात कोंढवी हे प्राचिन गाव आहे. गावात दिसणाऱ्या सतीशिळा, विरगळ, कोरीव मुर्त्या तसेच मंदिराचे कोरीव स्तंभ या गावाचे प्राचीनत्व अधोरेखीत करतात. कोंढवी गावाच्या पश्चिमेला घाटमाथ्यावरीत सातारा व महाबळेश्वर येथे जाणारा आंबेनळी घाट आहे. घाटमार्गाचे रक्षण करण्यासाठी कोंढवी किल्ल्याची बांधणी करण्यात आली असावी. गडाची तटबंदी व दरवाजा नष्ट झाले असुन या रस्त्याने आपण गडमाथ्यावर असलेल्या आठगाव भैरवनाथ या मंदिराकडे पोहोचतो. ...उतारावर ढासळलेल्या तटबंदीचे दगड दिसुन येतात. मंदिराच्या उजव्या बाजुस जुन्या चौथऱ्यावर नव्याने बांधतेती एक खोली असुन त्यात नवनाथांच्या मुर्ती ठेवल्या आहेत. मंदिरासमोरून रसाळगड, सुमारगड व महिपतगड हे किल्ले नजरेस पडतात. आदिलशाही काळात कोंढवी हा परगणा असुन कोंढवी किल्ल्यावरूनच या परगण्याचा कारभार चालत असे. पोलादजंग हा कोंढवी गडाचा किल्लेदार होता. पोलादजंगची पोलादपुर शहरात कबर असुन त्याच्या नावानेच या गावाला पोलादपुर नाव पडल्याचे सांगण्यात येते. शिवकाळात हा प्रदेश जावळीचे चंद्रराव मोरे यांच्या ताब्यात होता. इ.स.१७७८-७९ मध्ये रायगड मधील २४४ गावे कोंढवी महाड बिरवाडी तुडील विन्हेरे व वाळण अशा सहा परगण्यात विभागली होती. यातील परगणा कोंढवी पंतप्रतिनिधीच्या ताब्यात होती. गडमाथ्यावर सुध्दा भैरवनाथाचे प्राचीन मंदिर असून याला "आठगाव भैरवनाथ " या नावाने ओळखले जाते.

कविंद्र स्वामी परमानंद : शिवाजी महाराजांचे चरित्र ज्याने प्रसिद्ध केले ते म्हणजे कविंद्र परमानंद गोविंद नेवासकर यांची समाधी पोलादपूर बाजारपेठेत आहे. शिवभारत हे शिवचरित्राचे एक समकालीन आणि अतिशय विश्वसनीय साधन आहे. आपण हे काव्य शिवाजीच्या सांगण्यावरून रचले असल्याचे परमानंद सांगत असल्याने आणि त्याची विश्‍वासार्हता वारंवार प्रत्ययास आली असल्याने ते शिवाजी महाराजांचे अधिकृत चरित्र आहे असे समजण्यास हरकत नाही. एकूणच शिवभारत हा ग्रंथ शिवचरित्राच्या आणि इतिहासाच्या अभ्यासकांना अत्यंत उपयुक्त ठरले आहे. शिवचरित्रकार कविंद्र परमानंद - शिवाजी महाराजांचे समकालीन कवी कविंद्र परमानंद यांचा पोलादपूरशी संबंध होता. त्यांनी संस्कृत भाषेत "शिवभारत" हा ग्रंथ लिहिला, जो शिवाजी महाराजांच्या चरित्राचा महत्त्वाचा स्रोत मानला जातो. त्यांची समाधी पोलादपूर येथे असल्याचे मानले जाते. कविंद्र परमानंद आणि 'शिवभारत' पोलादपूरचे कविंद्र परमानंद हे शिवाजी महाराजांचे समकालीन कवी होते. त्यांनी संस्कृत भाषेत 'शिवभारत' हा महत्त्वाचा ग्रंथ लिहिला. राज्याभिषेकापूर्वीच्या घटनांचे वर्णन करणारा हा ग्रंथ शिवचरित्राचा एक प्रमुख साधनग्रंथ मानला जातो. आजही त्यांची समाधी पोलादपूर येथे आहे.

चित्रे घराणे : बाळाजी आवजी चिटणिसांचे घराणे म्हणजे चित्रे घराणे. या इतिहासकालीन घराण्याचा सेवा व लौकिक गेले साडेतीन शतके प्रसिद्ध आहेच. चित्रे घराणे देवळे, विन्हेरे, कोंढवी, पोलादपूर, देवास इत्यादी ठिकाणी नांदत होते. कालपरत्वे या घराण्यातील काही पुरुषांची आडनांवेही बदलली आहेत. मध्यप्रदेशातील देवासचे चित्रे आपणास देवळेकर म्हणवितात. देशपांडेपणाचे वतन चालविणारे काही चित्रे मंडळी देशपांडे झाले आहेत. काहीजण आपणास कोंढवीकर म्हणवितात. पोलादपूर तालुक्यातील देवळे गावातील रावजी गोविंद चित्रे यांच्या दप्तरात अनेक ऐत्याहासिक कागदपत्रे ज्येष्ठ इतिहास संशोधक शांताराम गोवळसकर यांना सापडली होती. इ.स. १७३४च्या जानेवारी महिन्यात काळ नदीच्या खोऱ्यात पेशव्यांचे आणि सिद्दी यांचे मोठे युद्ध झाले. किल्ले बाणकोट, गोवेले, विन्हेरे, पाचाड मारीत सिद्दी रायगडाच्या पायथ्यास आणि पुढे देवळे येथे पोहोचला. देवळे येथे त्यावेळी चित्रेंचा गवताने शाकारलेला भव्य चौसोपी वाडा होता. सिद्दीने त्यावेळी आगीचे पलिते सोडून या वाड्यास आग लावली, त्यामुळे बराचसा महत्वाचा दस्तऐवज जळून खाक झाला. मध्ययुगीन महाराष्ट्रातील देशमुख-देशपांडे-देसाई ही महत्त्वाची वतने होती.  त्यामुळे चित्रे म्हणजे महाड-पोलादपूर मधील देशपांडे या हुद्द्यावर काम करीत  देशपांड्याला त्याच्या कामाच्या स्वरूपावरून देशकुळकर्णी असेही म्हणत असत. देवळे लगतच्या सावित्री नदीतीरावर प्राचीन शिवमंदिर आहे. त्याचे मानकरी चित्रे आहेत. शिवरात्रीला मोठी जत्रा भरते. एकेकाळी मानकऱ्यांच्या काठ्या येत असत. काही वर्षांपूर्वी उत्खनन करताना याठिकाणी अनेक वीरगळी सापडल्या.

खंडो बल्लाळ चिटणीस : शिवाजी महाराजांचे सचिव व पुढे संभाजी महाराजांचे विश्वासू सहकारी खंडो बल्लाळ चिटणीस यांचे मूळ पोलादपूर परिसराशी संबंधित असल्याचे उल्लेख आढळतात. त्यांच्या घराण्याने मराठा राज्यकारभारात महत्त्वाची भूमिका बजावली. शिवाजी महाराजांच्या सेवेत असलेल्या चिटणीस घराण्याचे वाडे पोलादपूर येथे होते. आजही ते भग्न अवस्थेत असले तरी स्वराज्यकालीन वैभवाची साक्ष देतात.  शिवाजी महाराजांचे सचिव आणि पुढे संभाजी महाराजांचे विश्वासू सहकारी खंडो बल्लाळ चिटणीस यांचे मूळ घराणे पोलादपूरशी संबंधित होते.

कुडपण : हा गाव उंच डोंगरावर दुर्गम ठिकाणी आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांचे मामा शेलारमामा यांचे हे गाव अशी वंदता आहे. त्याठिकाणी त्यांची समाधी सुद्धा असल्याचे गावकरी सांगतात. घनदाट जंगलांनी वेढलेला असल्याने गनिमी काव्यासाठी अनुकूल मानला जात होता. स्थानिक कथांनुसार मावळ्यांच्या छोट्या तुकड्या येथे लपून राहत आणि घाटमार्गांवर नजर ठेवत. घोड्यांना पाणी पाजण्यासाठी बांधलेल्या जुन्या विहिरी. वीरगळ, समाध्या आणि भग्न मंदिरे.गुप्त वाटा व टेहळणीची ठिकाणे आहेत.

कापडे : कोकणातून प्रतापगडवर जाताना घाट सुरु होतो तो हा गाव. रसद पुरवठ्याचे केंद्र कापडे हे गाव होते.  गावातून महाड व प्रतापगडकडे जाणाऱ्या अंतर्गत वाटा होत्या. स्थानिक मावळ्यांना धान्य, भात व नाचणी याठिकाणी पुरवत असत अशी परंपरा सांगितली जाते. गावातील जुन्या देवळांमध्ये श्रीराम वरदायिनी देवी कापडे बुद्रुक येथे आहे. याबाबत 'समर्थ रामदास स्वामींनी तुळजापुरी ठाकेना। चाललि पश्चिमेकडे | रामवरदायिनी जाता। गर्द होऊनी उठली।' असे भाष्य केले असून तुळजापूर, पार, कापडे बुद्रुक आणि काटेतळी या सर्व देवींची स्थाने प्रत्येकीच्या पश्चिमेकडे असल्याचा योगायोग आहे. याशिवाय काही कोरीव दगड आढळतात.

चांढवे : या गावाला ऐत्याहासिक वारसा आहे हे या ठिकाणी असलेल्या वीरगळांच्या माध्यमातून लक्षात येते. गावाभोवतीच्या डोंगरांमध्ये अनेक जुने दगडी अवशेष आढळतात.गावातील वीरगळांना स्थानिक लोक स्वराज्यकालीन योद्ध्यांशी जोडतात.पावसाळ्यात या भागातील जंगलांचा वापर गनिमी काव्यासाठी होत असल्याच्या कथा प्रचलित आहेत.

वाकण : पोलादपूर तालुक्यातील हे गाव सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेले असून प्रतापगड, जावळी आणि महाड यांना जोडणाऱ्या अंतर्गत मार्गांच्या परिसरात येते. या भागाचा उल्लेख मोठ्या ऐतिहासिक घटनांमध्ये स्वतंत्रपणे कमी आढळतो; परंतु भौगोलिकदृष्ट्या तो स्वराज्याच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. या गावाच्या वेशीवर शेकडो वर्षाचे पुरातन मंदिर असून काळकाई ही देवी नवसाला पावणारी आहे त्याठिकाणी नवरात्रोत्सवातील दूरवरून येणाऱ्या गर्दीवरून लक्षात येते.

कुंभे शिवथर :  सह्याद्रीच्या कुशीत श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री  समर्थ रामदास स्वामी याच्या पदपर्शनी पावन झालेली ही भूमी म्हणजे शिवथरघळ. जिथे समर्थानी दासबोध ग्रंध लिहिला. चंद्रराव मोरे याचा वाडा सुद्धा येथील घळईच्या डोंगरात आहे. कुंभे शिवथर - सह्याद्रीच्या कुशीत श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री  समर्थ रामदास स्वामी याच्या पदपर्शनी पावन झालेली ही भूमी म्हणजे शिवथरघळ. जिथे समर्थानी दासबोध ग्रंध लिहिला. चंद्रराव मोरे याचा वाडा सुद्धा येथील घळईच्या डोंगरात आहे.

देवळे : शिक्षण व परंपरेचे गाव. स्थानिक आख्यायिकांनुसार स्वराज्याच्या घोडदळाचे तात्पुरते मुक्काम या परिसरात होत असत. गावातील जुने महादेव आणि ग्रामदैवतांची मंदिरे मध्ययुगीन काळापासून अस्तित्वात असल्याचे मानले जाते. गावाजवळील काही समाध्या आणि वीरशिळा अजूनही स्थानिक श्रद्धेची केंद्रे आहेत.

पारघाट : छत्रपती शिवाजी महाराजांचे बंड मोडण्यासाठी काहीतरी केले पाहिजे हे विजापूर दरबारने ठरविले. परंतु या स्वारीवर महाड,जोरखोरे,जावळीचे खोरे या प्रदेशाची माहिती असणारा कोणीतरी हिंदू सेनापती पाठविला पाहिजे असा विचार दरबारने केला आणि शेवटी 'बाजी श्यामराज' याला शिवाजी राजांचा समूळ फडशा पाडण्यासाठी पाठविण्याचे विजापूर दरबारने ठरविले. यावेळी राजे आपल्या सैन्यासह बिरवाडी-महाडच्या परीसरात असल्याने दगा फटका करीत त्यांना जिवंत पकडण्याचा बेत बाजी शामराजाने आखला. तो पारघाटाच्या मार्गाने निघाला. चंद्रराव मोरे याच्या जावळीच्या मुलुखातील घनदाट जंगलाचा फायदा घेण्याचे त्याने ठरवले होते. गोळेगणी या गावाच्या आसपास डोंगराच्या उतारावर तो सैन्यासह लपून बसून राहिला. त्याचवेळी जावळीचा दौलतराव मोरे संभ्रमात पडला की, शिवाजीला मानावे की बाजी शामराजला मानावे; विजापूरचे ऐकावे की स्वतःचे राज्य निर्माण करू इच्छिणाऱ्या शिवाजीचे ऐकावे. तिकडे बाजींचे सैन्य दबा धरून बसले होते. आणि इकडे शिवाजी महाराजांनी किनेश्वर आणि विन्हेरे खोऱ्यात सैन्याची जमवाजमव करून तयारीत होते. ही दोन्ही सैन्य एकत्र येऊ शकेल अशी जागा पारच्या खाली पश्चिम घाटाच्या इथेच असेल असा कयास बांधून महाराज हल्ल्याची वाट पाहात बसले, साखर-देवळे खोऱ्यातील सैन्य तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली करंजे आणि नेरच्या घनदाट जंगलातून डोंगराळी पार या गावांवर सावधपणे जबरदस्त हल्ला करणार होते. बोचेघळीच्या खिंडीतून ढोपराच्या डोंगरावर पूर्वेकडून जंगलातून मावळच्या बांदल देशमुखांनी सैन्य उभारून जय्यत तयारी केली होती. आणि मकरंदगडाखाली मोठ्या सैन्याची जमवाजमव केली. बाजी शामराजचा आपल्या दहा हजार सैन्यावर फार मोठा विश्वास होता. एक-दोन दिवसातच शिवाजीला आपण जेरबंद करू असे त्याने मनसुबे आखले,इतक्यात त्याच्यावरच असा काही हल्ला झाला की त्याच्यासह त्याचे सैन्यहीं बावरले, अनपेक्षित हल्ल्याने हल्लकल्लोळ माजला आणि सैन्य सैरावरा धावू लागले. ते ढोपराच्या डोंगराच्या खिंडीतून पलीकडे कोतवालकडे पळून जात असताना महाराजांचे विन्हेरे खोऱ्यातील सैन्य त्यांना सामोरे गेले आणि चहुबाजूंनी इतर ठिकाणी असलेल्यांनी बाजींचे सैन्य अक्षरशः कापून काढले.  महाड–पोलादपूर–पार–प्रतापगड हा मार्ग स्वराज्याच्या सैन्याच्या दळणवळणासाठी वापरला जात असे. या घाटमार्गांमुळे कोकणातून देशावर जलद हालचाल करणे शक्य होत असे. अफझलखान मोहिमेच्या काळातही हा परिसर महत्त्वाचा ठरला होता.

वरंधा घाट : कोकण आणि देश यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग हा वरंधा हा घाट होता. राजगड, तोरणा, रायगड आणि प्रतापगड या दुर्गांमधील संपर्कासाठी या मार्गाचा उपयोग होत असे. वरंधा घाट, भोप घाट, आंबेनळी घाट  अस्वलखिंड या रायगडाकडे जाणाऱ्या मार्गांद्वारे कोकणातून देशावर आणि राजधानी रायगडावर रसद, सैन्य व दूत पाठविले जात असत. या घाटमार्गांच्या संरक्षणासाठी दुर्गांची साखळी उभारण्यात आली होती. या ठिकाणाहून धूर, अग्नी व मशालींच्या साहाय्याने संदेश पोहोचवले जात असल्याचे स्थानिक परंपरा व दुर्गअभ्यासकांच्या लेखनातून दिसून येते. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावरील संकटाची माहिती काही तासांत राजधानीपर्यंत पोहोचत असे.

स्वराज्याची शेवटची लढाई  : २५ एप्रिल ते ४ मे १८१८ दरम्यान रायगडला ब्रिटिशांचा वेढा पडल्याची बातमी कांगोरी, सावित्री खोऱ्यातील  व प्रतापगड येथे पोहोचली तेव्हा या भागातील जे सातारा गादीशी म्हणजे छत्रपती प्रतापसिंहराजे शाहूराजे भोसले यांच्याशी एकनिष्ठ होते असे पोलादपूर मधील मावळ्यांच्या वंशजांचे मराठा सैन्य रायगडच्या मदतीसाठी शस्त्रास्त्रे घेऊन धावले. पोटल्याच्या डोंगराकडून कर्नल प्रॉथर आपला मोर्चा रायगडवर लागू करणार होता; त्याच्या पिछाडीस मराठी सैन्य येऊन उतरले. पण महाड येथे संरक्षणार्थ ठेवलेल्या लेफ्टनंट क्रॉस्बी यांच्या तुकडीने या सैन्याचा समाचार घेतला; त्यामुळे  मराठ्यांची मदत रायगडास पोहोचणे अशक्य झाले. लेफ्टनंट क्रॉस्बी याने या परतलेल्या सैन्याबरोबर पोलादपूर येथे या सैन्याचा सामना केला. कमी संख्येने असलेल्या  मराठा सैन्याने झुंज दिली पण हिंदुस्थानी सैन्यच सोबत घेऊन लढणाऱ्या क्रॉसब्रीने त्याचा बीमोड केला व रायगडच्या वेढ्याबाबतचा धोका पूर्ण नाहीसा करून टाकला, दुसऱ्याच दिवशी रायगडावरचा भगवा ध्वज उतरला गेला आणि ब्रिटिशांचा युनियन जॅक फडकला.

रायगडचा पहिला शिवजयंती उत्सव : शिवजयंतीचा पहिलावाहिला उत्सव रायगड किल्ल्यावर दोन दिवसांचा झाला होता. पहिल्या दिवशी टिळकांचे समारोपाचे भाषण जोरदार झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक होणे हे राष्ट्रासाठी अत्यंत आवश्यक आहे, असाच टिळकांच्या बोलण्याचा सूर होता. या उत्सवाच्या निमित्ताने २५ एप्रिल १८९६ मध्ये लोकमान्य टिळकांच्या उपस्थितीत झालेल्या पहिल्या उत्सवात त्यावेळी तानाजी मालुसरे आणि येसाजी कंक इत्यादींच्या वंशजांस मानाचे नारळ देण्यात आल्याची आणि  “उत्सवाच्या निमित्ताने तीन हजार लोकांच्या पंगती रायगडावर उठल्या” असे टिळकांनीच लिहिले आहे. अशी  नोंद त्यावेळच्या दैनिक केसरी आणि ऐतिहासिक दप्तरात करण्यात आली आहे. पुढे १६ एप्रिल २०२२ रोजी पुन्हा माझा ३४२ व्या पुण्यतिथीनिमित्त रायगडच्या राजसदरेवर केंद्रीय उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते सत्कार झाला. याशिवाय बोरावळे गावात चंद्रराव मोऱ्यांच्या एका बंधूंचा भव्य वाडा होता, त्याचे दगडी अवशेष अजून दिसतात. सडे हा गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधलेला एक भव्य दगडी बांधकाम केलेला चांदणी चौक आहे. महादेवाचा मुरा हा डोंगर खूप उंच आहे. त्याठिकाणी शेकडो वर्षापूर्वीचे स्वयंभू शिवमंदिर आहे. त्याठिकाणी बिरवाडी आणि इतर खोऱ्यातील देशमुख आणि वतनदार यांच्या मोठमोठ्या वीरगळी आहेत. याठिकाणचा इतिहास अनेक शक्यतांना जन्म देतो आहे. तेथे सुद्धा शिवरात्रीला मानकऱ्यांच्या काठ्या येत असत. या मुऱ्यापासून रायरी फक्त ११ मैल आहे. याशिवाय या डोंगरावरुन प्रतापगड, चंद्रगड, कांगोरीगड, रायगडच्या रांगा दिसतात. केवनाळे, कोंढवी तर्फ, कोंढवी कसबा, कोंढवी परगणे, करंजे येथील मारुतीचे पुरातन मंदिर, क्षेत्रपाल, घेरा चंद्रगड,  जावळी सुभा, जोर खोरे, ढवळा घाट, ढवळे मौजे, देवळे, साखर, पारघाट,बिरवाडी, वाळण बुद्रुक,  विन्हेरे या ठिकाणचा इतिहास, आदिलशाहीतील एक शक्तिशाली मराठा सरदार चंद्रराव मोरे यांचे राज्य याच भूभागावर होते.जावळीच्या मोऱ्यांची स्वतंत्र बखर आणि यांचा नामोल्लेख असलेले अनेक संदर्भ इतिहासात काही ठिकाणी सापडतात. "तुम्ही काळ राजे जाहला. तुम्हांस राज्य कोणें दिधलें? असे शिवाजी महाराजांना ललकारणाऱ्या चंद्ररावांचे स्वतःचे चलनी नाणे आणि शिक्का होता. जणू जावळी खोऱ्यात त्यांचे स्वतंत्र्य राज्य होते.  त्याचप्रमाणे बालाजी मोरे (चंद्रराव),  शंकराजी गोळे, हणमंतराव मोरे, हबाजी नाईक उतेकर, हिरोजीराव दरेकर, केसरकर, बांदल, गोळे यांचा उल्लेख इतिहासात सापडतो.

या मुलुखापुरते बोलायचे झाले तर ब्रिटिश राजवट सुरु झाल्यानंतर १८१८ पासून १८५७ पर्यंत संपूर्ण क्षात्रतेज देशभर झाकोळले गेले होते. गडकिल्ले ओस पडले आणि ज्या ताकदवान मनगटांनी समशेरी पेलल्या होत्या, त्यांनी आपल्या समशेरी एक तर आड्याला खोचुन ठेवल्या नाहीतर काहींनी त्याचे नांगराचे फाळ बनवून  पोटापाण्यासाठी शेतीवाडी करू लागले. मात्र त्यानंतर विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अगोदर पहिल्या, दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश सैन्यात आणि त्यानंतर देशाच्या स्वातंत्र्यानंतर भारतीय सैन्यात आपले शौर्य दाखविणारे अनेक सुपुत्र या मातीत जन्माला आले.



= रवींद्र मालुसरे

अध्यक्ष,मराठी वृत्तपत्र  लेखक संघ मुंबई

9323117704

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या