श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर प्रभादेवीकरांचे श्रद्धास्थान - नगरसेवक निशिकांत शिंदे
(रवींद्र मालुसरे : मुंबई ) -जुन्या चाळी आणि वाड्या ही मुंबईची खरी ओळख गगनचुंबी टॉवर्समुळे संपत आली असली तरी १२७ वर्षांचे प्रभादेवी येथिल श्री विठ्ठल रखुमाई मंदिर तीच जुनी भक्ती परंपरा श्री सदगुरू भावे महाराज वारकरी समाजाच्या माध्यमातून अजूनही जोपासून आहे. चार पिढ्यांना वारकरी परमार्थ साधला त्या ठिकाणी मला महापूजा करता आली हे माझे भाग्य आहे असे भक्तिपूर्ण उदगार नगरसेवक निशिकांत शिंदे यांनी काढले. यावेळी मूळ प्रभादेवीकर सुप्रसिद्ध उद्योजक चेतन खाटपे आपल्या संपूर्ण परिवारासह उपस्थित होते. त्यांच्याकडून शेकडू वारकऱ्यांना फराळ वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे स्व. अनंत ह. पाटील आणि स्व.सुरेश पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबीयांकडूनही वारकऱ्यांना कीर्तन संपल्यानंतर फराळ वाटप करण्यात आले. 
दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशी निमित्त हजारो वारकरी या मंदिरात येत असतात, अशा मंदिरात श्री विठ्ठल रखुमाई यांची महापूजा शिंदे दाम्पत्यांच्या हस्ते करण्यात आली होती. ज्येष्ठ गायक दिलीप आणि संतोष गोळपकर यांनी सुश्राव्य भक्तिगीतांचा कार्यक्रम केला. ह. भ. प. शिवाजी महाराज मालुसरे यांचे प्रवचन आणि ह. भ. प. कृष्णामास्तर घाडगे यांचे पंढरी महात्म्य आणि आषाढी एकादशी महत्व वर्णन करणारे कीर्तन झाले.
आमदार महेश सावंत, आमदार सुनील शिंदे, माजी आमदार सदा सरवणकर, माजी आमदार नितीन सरदेसाई, माजी आमदार आणि माजी महापौर विशाखा राऊत, ज्येष्ठ नगरसेवक आशिष चेंबूरकर, माजी नगरसेवक समाधान सरवणकर, माजी नगरसेवक संतोष धुरी, भाजपाच्या महिला नेत्या अक्षता तेंडुलकर, डॉ. भूषण नागवेकर, शाखाप्रमुख संजय भगत, शैलेश माळी, शैलेश पाटील, संतोष तेलवणे, उपविभाग प्रमुख कैलास पाटील, उद्योजक राजाभाऊ जाधव यांचा परिवार, माजी नगरसेविका ज्योतीताई भोसले, शिंदेसेनेच्या प्रिया सरवणकर यांच्यासह अनेक क्षेत्रातील मान्यवर पांडुरंगाच्या दर्शनासाठी आले होते. गुरूवर्य ह. भ . प. रामदादा घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश केसरकर, विष्णु सकपाळ, विठोबा केसरकर, सुरेश घाडगे, विनायक घाडगे, कैलास घाडगे, पुजारी प्रवीण तोडणकर, हेमंत सकपाळ, गोविंद पवार, विजय करनाळे, गणेश अहिरे, नारायण केसरकर, तुकाराम घाडगे, शुभम केसरकर, राज केसरकर, निवृत्ती मेस्त्री यांनी विशेष मेहनत घेतली. 


0 टिप्पण्या