Ticker

6/recent/ticker-posts

‘जलपरी’ गीता मालुसरेची इंग्लिश चॅनेलला गवसणी

जलपरी’ गीता मालुसरेची इंग्लिश चॅनेलला गवसणी संघर्षातून घडलेली यशोगाथा 

निसर्गाने पोहण्याची कला मानव सोडून सर्वांना दिली आहे. मानवाचा अपवाद वगळता कोणत्याही प्राण्याला जलतरण किंवा पोहणे शिकवावे लागत नाही. कुठल्याही प्राण्याचे लहान पोर जरी पाण्यात पडले तरी चटकन पाय मारून पोहण्यास सुरुवात करते. उपजतच त्यांना जलतरणाची कला अवगत असते. परंतु माणसाच्या पोराला मात्र ही कला मुद्दाम शिकवावी लागते. अगदी पूर्वापार काळात मानवाने ही कला केव्हा आत्मसात केली याची अचूक माहिती मिळणे अशक्य आहे. परंतु गेली हजारो वर्षे मानवाला ही कला अवगत आहे यात शंका नाही. माणसास मात्र पोहणे प्रयत्न पूर्वक करावे लागते ही कला जीवन मरणाशी निगडीत आहे, पोहता आल्यामुळे जीव वाचल्याचे व पोहता नआल्यामुळे जीव गमावल्याचे आपल्याभोवती आपण नेहमी पाहतो. पाणी हे जसे मनुष्यास तारते तसेच ते मनुष्यास मारते सुद्धा. माणूस जसा पाणी पिवून जगतो तसाच तो पोहता न येण्यामुळे पाणी पिवून पिवून सुद्धा मरतो. त्यामुळे आताच्या काळात पोहणे म्हणजेच Swimming हे आपणास येणे जरूरीचे आहे.अत्यावश्यक आहे.

पोहणे ही कला :

पाण्यात पोहताना 'जीव वाचवण्याचे शास्त्र' सर्वात किती महत्त्वाचे आहे. हे पुढील गोष्टीतून वाचण्यासारखे आहे. एकदा गणित शास्त्रज्ञ, विज्ञान शास्त्रज्ञ, भूगोल शास्त्रज्ञ व भौतिक शास्त्रज्ञ एकत्र नदी पार करत असतात. जो नाव चालवत असतो त्या कोळ्याला ते आपल्या आपल्या शाखेचे महत्व पटवून देतात व ते कसे जरूरीचे आहे हे सांगतात. नदी पार करताना घडलेला हा एक प्रसिद्ध आणि मजेशीर किस्सा आहे. खालील संवादात गणित, विज्ञान, भूगोल आणि भौतिकशास्त्र या विषयांचे महत्त्व एका कोळ्याला कसे पटवून दिले, हे स्पष्ट केले आहे:

१. भूगोल शास्त्रज्ञ : "मित्रा, तू दिवसभर या नदीत नाव चालवतोस. पण तू कधी विचार केला आहेस का की, या नदीचा उगम कुठे झाला? हिमालयातील कोणत्या शिखरावरून ती खाली येते? नदीच्या प्रवाहातील खडकांची रचना कशी आहे? या सर्वांचा अभ्यास भूगोलात होतो. जर तुला नद्यांची माहिती नसेल, तर तू भरकटू शकतोस."

२. विज्ञान शास्त्रज्ञ : "नावाडी भावा, तू ज्या लाकडी नावेत बसला आहेस, ती कोणत्या झाडाची आहे? पाण्यावर तरंगण्यासाठी तिची रचना कशी असावी? नदीच्या पाण्यामध्ये कोणकोणते जलचर व खनिजे आहेत? या सर्व सजीव आणि निर्जीव सृष्टीचा अभ्यास विज्ञान (Science) करते."

३. भौतिकशास्त्र शास्त्रज्ञ : "अरे पण, ही नाव पाण्यात बुडत नाही आणि पुढे जाते, हे कसे शक्य आहे? याला कारणीभूत आहे 'प्लवनशीलता' (Buoyancy) चा नियम आणि वल्हवताना लावलेले बल (Force). या सर्व भौतिकशास्त्राच्या (Physics) नियमांमुळेच तू नदीच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकाला जाऊ शकतोस." (तपशीलवार माहिती: )

४. गणित शास्त्रज्ञ : "मित्रा, हे तिघे जे काही सांगत आहेत, त्या सर्वांचा पाया गणित (Mathematics) आहे ! तू नदी पार करण्यासाठी किती वेळ घेतला, नावेचे माप काय, पाण्याचा वेग किती, आणि तू जे पैसे कमावतोस, त्या सगळ्याची आकडेवारी गणितावरच अवलंबून आहे. गणित नसेल, तर जगातले कोणतेही शास्त्र चालणार नाही."

हे सर्व ऐकून कोळी हसला आणि म्हणाला, "तुमचे ज्ञान खूप मोठे आहे, पण मला सांगा... तुम्हाला पोहायला येते का? जर वादळात ही नाव बुडाली, तर तुमचे हे चारही शास्त्र तुम्हाला वाचवू शकतील का ? 

गीता मालुसरेची इंग्लिश चॅनेलला गवसणी :



पोहणे ही कला आहे, योग्य प्रशिक्षण, नियमित सराव आणि धाडस असेल तर या क्षेत्रात जगभर नावलौकिक मिळवू शकतो, याचे अलीकडचे उत्तम उदाहरण म्हणजे आमची लेक कुमारी गीता दिपा महेश मालुसरे. जिद्द आणि अदम्य इच्छाशक्तीवर गीता ही एक अत्यंत धाडसी आणि प्रेरणादायी आंतरराष्ट्रीय जलतरणपटू ठरली आहे. भारताची जलपरी म्हणून प्रसिद्ध गीता मुळशीची सुवर्णकन्या.  सध्या पुण्याच्या कर्वे नगर भागात राहणाऱ्या गीता यांनी लहान वयातच जलतरणात अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. गेल्याच आठवड्यात गीताने शनिवार दि.२७.६.२६ रोजी 'इंग्लिश चॅनेल' चे अंतर १४ तास ३१ मिनिटांत पोहून पूर्ण केले. इंग्लिश चॅनेलचे अंतर ३५ किलोमीटर आहे. काल समुद्रातील आव्हानात्मक लाटांमुळे गीता प्रत्यक्ष पोहताना हे अंतर ५४ किलोमीटर झाले. इंग्लिश चॅनेल स्विमिंग असोशिएशन या संस्थेच्या निगराणीत ही मोहीम पार पडली.गीता अंतरराष्ट्रीय कोच शेखर खासनीस आणि प्रतिक जावडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे त्यांचे सहकार्य लाभले. अतिशय खडतर शस्त्रक्रिया, दीर्घकाळचा संघर्ष आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर गीता यांनी पुन्हा पाण्यात उतरण्याचे आपले स्वप्न पूर्ण केले. त्यांनी अत्यंत कमी वयात 'भारताची जलपरी' म्हणून ओळख मिळवत, इंग्लिश खाडी पोहून पार करण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला आहे. गेले वर्षभर दररोज आठ तास तर कधी दहा तास गीताने  सराव केला. हातावरच्या खोल जखमा सुकलेल्या नसताना, हातातून रक्त येत असतानाही ती कधी थांबली नाही. काल इंग्लिश चॅनेल पोहत असतानाही तिला या जुन्या जखमांचा प्रचंड त्रास होत होता. मात्र, असह्य वेदनांकडे दुर्लक्ष करत तिने आपले लक्ष फक्त स्वप्नावर केंद्रित केले आणि अखेर इतिहास रचला ! जागतिक जलतरण क्षेत्रातील अत्यंत अवघड मानली जाणारी 'इंग्लिश खाडी' गीताने यशस्वीरीत्या पार केली आहे. आठ दिवसांपुर्वी इंग्लडमध्ये प्रॅक्टीस करताना जेली फीशने पुन्हा एकदा गीताला दंश केला. सुदैवाने हा दंश विशारी नव्हता. इंग्लिश खाडीत पोहत असताना जुन्या जखमांच्या वेदना ठणकत होत्या आणि जेलीफिशचे मानसिक दडपणही होते, मात्र वेदनांना विसरून ती फक्त आपल्या ध्येयाकडे झेपावत राहिली. इतका संघर्ष करून मिळवलेले हे यश जगाच्या पाठीवर खरोखरच एकमेवाद्वितीय आहे. गीताने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेले हे यश जगभरात कौतुकास पात्र आहे. गीताचा हा यशस्वी प्रवास मात्र प्रचंड संघर्षमय आहे. वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षापासून पोहायला सुरुवात करत बघता बघता या प्रतिभावान जलतरणपटूने राष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली. 

गीताचा संघर्ष प्रेरणादायी :

गीताचा हा संघर्षमय यशस्वी प्रवास युवा पिढीला कायम प्रेरणा देणारा राहील. मुली कोणत्याच क्षेत्रात कमी नाहीत. त्यामुळे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ हा संदेश देण्यासाठी १३ व्या वाढदिवशी उदयोन्मुख जलतरणपटू गीता महेश मालुसरे हिने मुंबईतील प्राँग्ज लाइट हाउस ते गेट वे ऑफ इंडिया ते वाशी खाडी पूल हे समुद्रातील ३१ किलोमीटर अंतर अवघ्या ४ तास ५५ मिनिटांत पोहून पार केले.  ही मोहीम पार पाडताना जसजसे ऊन वाढत चालले तसतशा लाटा वाढू लागल्या व तिला पोहण्यासाठी अडथळा येऊ लागला. समुद्रातील अत्यंत खारट पाणी, मुंबईला लागून असल्यामुळे प्रचंड घाण पाणी, उन्हाचा तडाखा आणि वाढत असलेल्या लाटांचा तिला खूप त्रास होऊ लागला. त्यामुळे तिला दोन वेळा उलटीही झाली; परंतु संकल्प पूर्ण करण्याच्या निश्‍चयाने तिचा उत्साह वाढतच होता. सगळ्या परिस्थितीवर मात करून ती पुढे सरकत होती. समुद्रात गस्त घालणारे महाराष्ट्र पोलिस व सैनिक चौकशी करून तिला शुभेच्छा देत होते. दरम्यानच्या काळात वाढत्या लाटांमुळे तिची पोहण्याची गती थोडी मंदावली होती; परंतु ध्येय नजरेत आल्यामुळे शेवटच्या १५ मिनिटांत तिने पोहण्याचा वेग सुरुवातीपेक्षाही वाढवला. 

जेलीफिशचा जीवघेणा भयंकर हल्ला : 

डिसेंबर २०२२ मध्ये इस्त्राईलला होणाऱ्या स्पर्धेत गीताला भाग घेतला, त्यात ती स्पर्धेत दुसरी आली. नोव्हेंबर महिन्यात  मध्ये रत्नागिरी येथील सागरी स्पर्धेत पोहत असताना गीताला 'जेलीफिश' या विषारी जलचराचा तीव्र दंश झाला. तिचा हात निकामी होण्याचा धोका निर्माण झाला होता. हात वाचवण्यासाठी व वेदनांवर मात करत त्यांना तब्बल ११ शस्त्रक्रिया सहन कराव्या लागल्या. त्यामुळे गीताचे स्विमिंग करिअर संपले असे वाटत होते. आपला स्विमींगमधलं (Swimming) आपलं उज्ज्वल करिअर वाचवण्याची धडपड करणाऱ्या एका राष्ट्रीय जलतरणपटूच्या चॅम्पियन बनण्याच्या स्वप्नांना तेव्हा ब्रेक लागला होता. हात कढून टाकण्याची वेळ तिच्यावर येईल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. दोन वर्षांपूर्वी त्यावेळी डॉक्टरांच्या समोर उपचारासाठी अशी केस भारतातली पहिलीच होती. मात्र गीताचा प्रवास असाच सुरू राहावा, समुद्रात लांब पल्ले गाठण्यासाठी तिची झुंज अशीच सुरू राहावी, भारतासाठी खेळण्याचा तिचा निर्धार अधिक पक्का व्हावा यासाठी डॉक्टरांनी अहोरात्र प्रयत्न केले, इतक्या कमी वयात एवढ्या मोठ्या संकटाला तोंड देणं आणि हिंमतीने सामोरं जाणं अतिशय अवघड होतं, पण शारीरिक दुर्बलतेला सामोरे जावे लागणार हे आव्हान गीताने हसतमुखाने स्वीकारले. आपल्याला देशासाठी क्वीन ऑफ द ओशन पुरस्कार मिळवण्याचं स्वप्नं गीता मनाशी बाळगून गीता या संकटाने खचली नाही. स्विमींगमध्ये करिअर करायचे आहे हा निर्धार ढळू दिला नाही, डॉक्टरांचे उपचार आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर गीताने पुन्हा एकदा पाण्यात उतरून पोहण्याचं स्वप्न पूर्ण केले. पुन्हा पाण्यात सूर मारण्यासाठी गीताची जिद्द आणि इच्छाशक्ती सर्वानाच अचंबित करणारी ठरली आहे. 

गीताचे ध्येय: 'क्वीन ऑफ ओशन' :

इंग्लिश चॅनेल पार करून गीता थांबणार नाही, तर तिचे मुख्य ध्येय जागतिक कीर्तीचा ‘क्वीन ऑफ ओशन’ (Queen of Ocean) हा बहुमान मिळवण्याचे आहे. यासाठी तिला जगातील सात प्रमुख खाड्या पोहायच्या असून, या ‘सेव्हन ओशन चॅलेंज’ची तिने धडाक्यात सुरुवात केली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून ती याच वर्षी ऑगस्टमध्ये न्यूयॉर्कमधील ४६ किलोमीटरची ‘ट्वेंटी ब्रिजेस’ आणि सप्टेंबरमध्ये कॅलिफोर्नियातील ३२ किलोमीटरची ‘कॅटेलिना चॅनेल’ पार करण्यासाठी सज्ज झाली आहे. ज्या स्विमिंगमुळे हात गमावण्याची वेळ आली होती, त्याच क्षेत्रात जागतिक कीर्ती प्रस्थापित करणाऱ्या गीताच्या या जिद्दीला, चिकाटीला आणि आत्मविश्वासाला आज अवघा देश सलाम करत आहे. गीताला नेहमीच आई वडिलांचे प्रोत्साहन मिळत आहे,  नियमित सराव, तिचा डाएट यावर ते आणि प्रशिक्षक लक्ष ठेवून असतात. मात्र तिची अविश्रांत मेहनत आणि आत्मविश्वास तिला भविष्यात आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये मोठं यश मिळवून देऊ शकते असा त्यांचा आत्मविश्वास आहे. 

- रवींद्र मालुसरे 

अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई   संपर्क : ९३२३११७७०४ 








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या