Ticker

6/recent/ticker-posts

"मराठा दौलतीचे खांब " नवीन वर्षाचा संकल्प

"मराठा दौलतीचे खांब " नवीन वर्षाचा संकल्प 
मराठ्यांचा इतिहास म्हणजे शूरांचा इतिहास आहे. त्यांच्या शौर्याची तोंड भरून वाखाणणी जगातील सर्व इतिहासकारांनी केली आहे. अनेक कवींनी त्यांच्या मर्दुमकीचे पोवाडे गायले आहेत. मराठ्यांच्या स्वातंत्र्य प्रेमाच्या आणि समरांगणातील समर्पणाच्या अनेक कथा प्रत्यक्ष पाहिलेल्या कितीतरी खिंडी, दऱ्या, कपाऱ्या आणि किल्ले आजही त्या इतिहासाची साक्ष देत आहेत. छत्रपती शिवाजी राजे भोसले हे महाराष्ट्राचे दैवत तर माता जिजाऊंनी पाहिलेले रयतेच्या स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पुढे प्रत्यक्षात आणणारे आणि मराठेशाहीचा  संपूर्ण भारतभर विस्तार करणारे हजारो मावळे आणि त्यांचे शौर्य हे  मराठी माणसांचे जिव्हाळ्याचे आणि अभिमानाचे विषय. छत्रपती शिवाजी राजे, छत्रपती संभाजी राजे, छत्रपती राजाराम राजे, पेशवाई या कालखंडात जगाच्या इतिहास नोंद घेतली गेली असा इतिहास घडविला तो अतुल पराक्रम आणि कर्तबगार असलेल्या मावळ्यांनी. छत्रपती शिवरायांच्या अभेद्य किल्ल्यांप्रमाणे ते निधड्या छातीने निष्ठेने लढले. त्वेषाने लढून जिंकले, धारातीर्थी पडले आणि अटकेपार झेंडेही फडकावले. शौर्यावर आणि बलिदानावर जगाला हेवा वाटला आहे असा हा देदीप्यमान शिवकाळातील नररत्नांचा इतिहास नवीन वर्षात सांगावा असा मी संकल्प सोडला आहे. हा संकप सोडताना माझ्या मनात असा विचार आहे की, छत्रपती शिवाजी राजांनी घडवलेला इतिहास हा माझा ध्यास आहे आणि ज्या स्वाभिमानी "मालुसरे" घराण्यात आपला जन्म झाला आहे त्या सुभेदार नरवीर तानाजी - सूर्याजी मालुसरे या पूर्वजांचे आपल्यावर अगणित ऋण आहेत, 
१९८८ पासून आजवर सुभेदारांच्या इतिहासाचा मागोवा घेत त्यांच्या पराक्रमावर  मी नियमितपणे बरेच लिहिले आहे. आता इतर पराक्रमी मावळ्यांच्या शौर्याचा वेध घेत प्रसार माध्यमावर पुन्हा लिहावे आणि त्यातून काही अंशी मुक्त व्हावे असा मानस आहे. 
"मराठा दौलतीचे खांब " या नावाने आज संध्याकाळपासून प्रत्येक आठवड्यात पुढचे वर्षभर लिहिणार आहे. धन्यवाद ! जय भवानी !! जय शिवराय !!! 


रवींद्र मालुसरे 
अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई   
९३२३११७७०४ 

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. खूप छान रवींद्रजी तुमचा मनोदय तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा 👍👍

    उत्तर द्याहटवा