Ticker

6/recent/ticker-posts

पुरुषस्पंदनं २०२५

पुरुषस्पंदनं २०२५ दिवाळी अंक
तरुण पिढीला नावं ठेवण्याचा फंडा प्रत्येकच मागच्या पिढीत असतो. प्रत्येक मागच्या पिढीला आपण पाहिलेले उन्हाळे-पावसाळे समोर ठेऊनच आपल्या पुढच्या पिढीभोवती कवच करायचा असतो. मात्र त्या पिढीपुढं नवे प्रश्न नवे संदर्भ असतात, त्यामुळं त्यांना आधीच्या पिढीकडून मिळणारं कवच पुरेसं नसतंच. किंबहुना त्यांच्यासाठी एखादं काचायला लागतं. पण हा संघर्ष केवळ आणि केवळ संवादाच्या माध्यमातूनच कमी होणार असतो. आणि म्हणूनच यंदाच्या पुरुषस्पंदन हा ‘पिढ्यांतर्गत संवाद' या मध्यवर्ती कल्पनेवर आकाराला आणायचे ठरले.
बऱ्याचदा अलिकडच्या पिढीच्या सायबर वावरावरुन काळजी शंका इथपासून ते ही पिढी वाया गेलेली आहे, यांच्यावर काहीच संस्कार नाहीत इथंपर्यंत जोरदार चर्चा सतत घडत असतात. नवी पिढी कौटुंबिक व सामाजिक बदलांच्या काळात मोठी झाली. मध्यमवर्गीय घरांतील स्पर्धा, बाहेरच्या स्पर्धांमध्ये स्वत:ला सतत सिद्ध करण्याचा दबाव, बेरोजगारीची तीव्र समस्या आणि विविध युद्धांच्या निमित्ताने जगभर सतत दिसणारी अस्थिरता... परिणामतः या पिढीमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. योलो (यू ओन्ली लिव्ह वन्स) सारख्या संकल्पना म्हणूनच जोर धरताना दिसतात. त्यातून 'लाइक्स-फॉलोअर्स' हे त्यांच्या प्रयत्नांचे मोजमाप बनतं. अल्गोरिदमने रचलेल्या फीडमध्ये त्यांना लहान-लहान 'डोपामीन रिवॉर्डस' मिळतात. कधी अनपेक्षितपणे, कधी मोठ्या प्रमाणात. हाच खेळ फोमो (फिअर ऑफ मिसिंग आऊट) वाढवतो आणि अवलंबित्वाकडे घेऊन जातो. तसं पाहता या पिढीसमोर पुढचे अनेक प्रश्न हे सोशल मीडियाशी जोडलेले आहेत. माहितीचा प्रचंड पुरवठा; पण त्या माहितीचं करायचं काय हे ठाऊक नाही. मिळालेल्या माहितीवर अंधविश्वास ठेवण्याचं प्रमाणही पुष्कळ. डिजिटल अर्थव्यवस्थेत 'क्रिएटर इकोनॉमी' संधी देते; पण अस्थैर्यही सोबत घेऊन येते. वैयक्तिक माहितीच्या खासगीपणावर (प्रायव्हसी) होणारं अतिक्रमण, वैयक्तिक माहितीचा बाजार, लक्ष-अर्थव्यवस्थेची राजकारणाशी असलेली सांगड हे सगळं 'जेन झी'च्या नशिबी आहे. एकीकडे संधी, दुसरीकडे पैसा, तिसरीकडे त्या सगळ्यातून येणारी अस्वस्थता आणि चौथीकडे त्यावरचं अवलंबित्व आणि त्यातून व्यसन अशी विचित्र गुंतागुंत झालेली आहे.
पण आपण जरा अधिक डोळसपणे पाहिलं तर लक्षात येतं, ज्येष्ठ नागरिकांचा मोबाईलवरचा, सोशल मिडीयावरचा वावरही वाढलेला आहेच. सहजगत्या सायबर फ्रॉडचे सावजही ठरत आहेत. नव्वदीनंतर लोकांच्या घरात टीव्हीनं शिरकाव केला तरी टीव्ही कौटुंबिक स्तरावर, सामुदाययिक रित्या पाहण्याकडं कल होता आता मात्र मोबाईलच्या छोट्या पडद्यावरुन जगाशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न, सभोवतालाशी डिसकनेक्ट करत जात आहे. डिजिटल युगामुळे नव्या-जून्या पिढीला करमणुकीचे अनेक पर्याय जसे आहेत तसा त्यांच्याकडे जगभरातील माहितीचा साठाही भरपूर आहे. आता तर नवी पिढी सतत मागील पिढीला प्रश्न विचारत राहते. पारंपरिक प्रथांना पडताळून पाहते. त्यात अनेकदा ह्युमॅनिटीवर त्या प्रथांना तपासताना दिसते. सतत डिस्कार्ड करण्याचा फंडा नव्या पिढीचा असला तरीही त्यांना आपण त्यांना समजून घ्यायला जर समाज कमी पडत असेल तर किंवा नाकारत असेल तर ते वैफल्यग्रस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अशा गुारोळातला मागच्या-पुढच्या पिढ्यांमधला संवाद, न संवाद, कळत-नकळत झिरपत गेलेले संस्कार, मूल्यव्यवस्था, आधीच्या पिढ्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळं पुढच्या पिढ्यांच्या जगण्याला आलेला आकार, त्यांच्यात होत गेलेले बदल, नव्या पिढीकडून आधीच्या पिढीने स्विकारलेले प्रवाह हे सगळं कसंकसं आहे हे या अंकातून पहायला वाचायला मिळेल.
पुढची पिढी मागच्या पिढीच्या दोन कदम पुढं आहे असं प्रत्येक पिढीला ऐकायला मिळतं आणि पुन्हा नवी पिढी आल्यानंतर तिच्या आधीची पिढी पुन्हा तेच म्हणनं पुढं रेटते. दोन पिढ्यांमध्ये जगण्या-वागण्याच्या तऱ्हामध्ये बऱ्याचदा अंतर असतं, याबाबत कुणाच्या मनात शंका नसणार. फक्त या अंतराची रेष कमी आहे वा जास्त हे त्या दोन पिढ्यांमधील संवादावरून ठरते. पण हा संवाद एकसुरी किंवा एकरेषीय कधीच नसतो. माणूस कुठे, कसा जन्मला, वाढला, त्याची आर्थिक स्थिती, त्याचा परिसर कसा आहे, त्याच्या विवंचना आणि आनंदाचे क्षण कोणते आहेत या साऱ्यातून संवादाला रूप आणि आकर येऊ लागतो. ते सारं या अंकात अवतरलं आहे. संवादाची देवाणघेवाणही बदलली आहे. आजीच्या गोष्टींपासून आजच्या पिढीच्या डिजिटल मिम्सपर्यंतचा हा प्रवास आहे. शब्दांपेक्षा इमोजीचा वापर अधिक आहे. हे सारं आम्हाला खोदून पाहता आलं.
पिढ्यांतर्गत संवादाच्या थीममध्ये मान्यवरांनी या थीमची आंतरछेदिता समजून घेत त्याची अभ्यासपूर्ण चिकित्सा केलेली आहे. समीर शिपूरकर यांच्या लेखांमधून त्यांनी पिढ्यांमधला संवाद आणि विसंवादातला संवाद याची पृष्ठभूमी उलगडली आहे. मुळात कोणत्य दोन पिढ्यांचा आपण विचार करतोय. अगदी साठ सत्तर वर्षापूर्वीच्या पिढ्यांमधली देवघेव आणि तंत्रज्ञानाबरोबर वाढणाऱ्या पिढीसोबतची देवघेव यात अनेकार्थानं बदल झालेले आहेत. नवं काही शिकण्या समजण्याचा विचार करेपर्यंत त्याच गोष्टी आउटडेटेट ठरत आहेत अशा स्थितीत पालक आणि मुलं, वडिलधारी भावंडं आणि बऱ्याच अंतरानं जन्मलेली लहान भावडं यांच्यातला संवादही बराचसा बदलत जातो. शिपूरकर यांनी त्याचा वेध घेतला आहे.
मानसशास्त्रज्ञ डॉ. अंजली जोशी यांचा लेख हा लिंगभेदाच्या पूर्वग्रहांचा मानसशास्त्रीय वेध घेतो. हा लेख पिढ्यांमधील लिंगभेद, पूर्वग्रह आणि त्यांचा मानसिक प्रभाव यांचा सखोल अभ्यास करतो. डॉ. जोशी यांनी स्पष्ट केले आहे की, लिंगभेदाचे पूर्वग्रह कसे पिढ्यान्पिढ्या चालत येतात आणि त्यांचा उन्मूलन कसा करावा. लेखात इम्प्लिसीट, एक्सप्लिसीट, सिस्टमिक आणि अफिनीटी बायसेसची चर्चा आहे, ज्यातून पिढ्यांमधील संवादातील अडथळे स्पष्ट होतात. हा लेख केवळ विश्लेषण करत नाही तर पूर्वग्रह कमी करण्यासाठी वेगवेगळ्या मानसशास्त्रीय पद्धती सुचवतो. पिढ्यांमधील लिंगभेदाच्या संवादाला वैज्ञानिक आधार देतो आणि वाचकांना स्वतःच्या पूर्वग्रहांचा विचार करण्यास उद्युक्त करतो. आनंद करंदीकर यांचा लेख त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात त्यांनी अुनभवलेल्या तीन वेगवेगळ्या पिढ्यांमधील संवाद उलगडतो. सामाजिक, भावनिक आणि वैयक्तिक संवादांचा शोध घेतो. राम जगताप 'दोन पिढ्यांतलं अंतर' ही संकल्पना पाश्चात्य 'जनरेशन गॅप'ची उसनवारी मानतात, जी मध्यमवर्गीय संदर्भात फिट बसत नाही. साठ-अईंशीच्या दशकात पाश्चात्य प्रभावाने 'प्रस्थापितविरोधी' सांस्कृतिक क्रांती घडली, ज्यात मध्यमवर्गीय तरुणांचा सहभाग होता, पण जागतिकीकरणाने (नव्वदच्या दशकात) मूल्ये, परंपरा उलथून मध्यमवर्गाला उन्मादी ग्राहक बनवले. कौटुंबिक जीवनात सरंजामी अवशेष कायम आहेत – पुरुषप्रधानता, अनागरता – ज्यात नवी पिढी आधीच्या पेक्षा 'दोन पावलं पुढे' जाते, पण ते मुख्यतः बाह्य प्रगतीमुळे, आधीच्या पिढीच्या त्यागामुळे आणि कर्तृत्व कमी असते.हा लेख मध्यमवर्गातील पिढीय संवादाच्या अभावावरून सामाजिक एकात्मतेची गरज अधोरेखित करतो.
नीरजा या संवेदनशील लेखिकेनं स्त्रियांभोवतीच्या काचणाऱ्या प्रथा/परंपरा, चळवळींनी त्यांचे मोकळे केलेले पाय आणि आता त्याच पार्श्वभूमीवर पुन्हा परंपरावाद्यांची वाढलेली पीकं यामधल्या घुसमटीचा अदमास आहे. लेखिका स्वतःच्या कुटुंबातील नोंदणीकृत विवाह, वडिलांच्या प्रगल्भ विचारांचा प्रभाव आणि भावंडांमधील परंपरावादी वळण यांचा उल्लेख करतात. प्रत्येक पिढीत आधुनिक आणि परंपरावादी दोन्ही बाजू असतात. गेल्या 20-25 वर्षांत कट्टरवाद वाढला असला, तरी कौटुंबिक-शैक्षणिक-व्यावसायिक स्तरावर निर्णय घेण्याच्या बाबतीत संघर्ष कायम आहे. आज पाच वर्षांत पिढ्या बदलतात, तरी मिलेनिअल्स, जेन झी आणि अल्फा ही तरुण पिढी वरवरच्या तंत्रज्ञान-लैंगिक मुक्तीला आधुनिकता समजते, पण खोल सामाजिक विचार कमी करतात. अशा अनेक मुद्दयांना स्पर्श करतात.
प्रा. जास्वंदी वांबुरकर यांनी आपल्या गुरुस्थानी असणाऱ्या राजा दीक्षीत यांच्यसोबतचा संवाद उलगडला आहे. भक्तीभावापासून मैत्रभावापर्यंतचे टप्पे त्यातून होणारी वैचारिक घुसळण आणि बौद्धिक चर्चा यांतून निर्भेळ होत जाणारं नातं त्यांनी लेखातून मांडले आहे. तर प्राची पिंगळे यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांसोबत असलेलं नातं, मैत्री, त्यांच्यासोबतचा भावबंद मांडला आहे. सई केसकर कुटुंबातून मिळालेला वारसा त्यांनी पुढं कसा नेला, त्या दरम्यान वैयक्तिक आयुष्यातील ताणेबाणे, आपल्या कर्तृत्ववान पालकांशी असणारं नातं आणि त्यातून स्वत:ची वाट शोधणं याचा वेध घेतला आहे तर आणि प्रियदर्शिंनी कर्वे यांनी तरुणपणी आईवडलांच्या पाठिंब्यांनी स्वतंत्रपणे एकटीचा थाटलेला संसार आणि त्या भोवतीच्या पंचवीस वर्षापूर्वीच्या धारणा ते अगदी अलिकडेपर्यंतच्या त्याबाबतचे विचार याबाबत त्या मोकळ्या आणि सहजपणे व्यक्त होतात. अवधूत परळकर जेन झीच्या नरजेतून भवताल समजून घेण्याचा प्रयत्न मांडतात. या जगाचं जे काही व्हायचं असेल ते आता तेच करणार आहेत. त्यामुळे स्वतःचा वर्तमान आणि भविष्य कसं असलं पाहिजे हे ठरवण्याचा त्यांना नक्कीच अधिकार आहे. त्यांच्याशी कनेक्ट करणं अगदी सोपं आणि प्रचंड अवघडही. अशी भूमिका ते मांडतात. अनीश गवांदे यांच्या जेंडर आयडेंटीचा वैयक्तिक प्रवास, समाजाचा त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन ते राजकीय प्रवासातली त्यांची भूमिका यावर अत्यंत मनस्वीपणे त्यांनी लेखन केलं आहे. विजय पांढरपांडे यांनी आधीच्या पिढीची केअरगिव्हर भूमिकेचा परामर्श घेतला आहे.
यंदाच्या वर्षी बुकर पारितोषिक विजेत्या ठरलेल्या बानू मुश्ताक यांची अनुवादित कथा मुश्ताक यांच्या लेखनाची ओळख करुन देतो. तर ज्येष्ठ स्त्रीवादी अभ्यासक लक्ष्मी लिंगम यांच्या मुलाखतीचे विद्या कुलकर्णी यांनी केलेले शब्दांकन अत्यंत वाचनीय आहे. लिंगम यांच्यासोबतच्या सहजगप्पांतून आणि त्यांच्या जगण्यात मुरलेल्या स्त्रीवादातून वाचकाच्या दृष्टीकोनाला आकार येण्यास मदत होईल.याशिवाय प्रसाद कुमठेकर, ऐश्वर्य पाटेकर, डॉ. मीनाक्षी पाटील, माधव गवाणकर, नीता पांढरपांडे, सुप्रसाद बारपांडे, वसंत वाहोकार, प्रतिमा जोशी यांच्या कथा वा ललित लेखनातून पिढ्यांतर्गत संवादाच्या वेगवेगळ्या कोनाला स्पर्श करतात. त्यांच्या कसदार, अभिरुचीपूर्ण कथा वाचकांना वाचनाचा अपार आनंद देतात. तर प्रशांत असनारे, राज चिंचणकर, मोहन देस, हर्षदा सुंठणकर, मुबारक शेख, प्रतिभा सराफ व इतर अनेक कवींच्या आशयघन कवितांनी अंक अधिक समृद्ध झाला आहे.
या अंकाचे मुखपृष्ठ तरुण पिढीचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या शिवानी देसाई हिने केलं आहे. जेंडरच्या वाहत्या प्रवाहांना नीटसं समजून घेणारी अत्यंत सर्जनशील शिवानीने दोन पिढ्यांमधल्या संवाद आणि संघर्षाची वीण अत्यंत समपर्कपणे चित्रातून मांडली आहे. पिढ्यांमधला संवाद म्हणता बऱ्याचदा त्यात नकारात्मक भाव आढळतो पण तो योग्य तर्ऱ्हेनं झाल्यास अत्यंत आनंदी नातं निर्माण होतं, शिवानीच्या चित्रातूनही त्याच प्रकारची ऊर्जा आणि उत्साह प्रतीत होतो.
तर पिढी कुठलीही असो, प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते. ती ओलांडली गेली सगळ्या गोष्टी संदर्भहीन वाटायला लागतात. आपल्या पुढच्या पिढीत नाक न खुपसता आणि तरीही मैत्रीपूर्ण सोबत करता आली तर नव्या जुन्या पिढ्यांना एकमेकांशी कनेक्ट करणं सोप्पं होऊन जाईल यात शंका नाही.
शिवानी यांनी चितारलेल्या या चित्रात पिढ्यांमधील संघर्ष हा केवळ मतभेदांचा तणाव नाही, तर प्रेम, सातत्य आणि संवादाने विणलेली एक मजबूत वीण आहे. आपल्या मुखपृष्ठावरील तेजस्वी हृदयाच्या आकारातील गाठीमधून ते प्रतीत होतं. डावीकडून उजवीकडे पाहिलं, की ही रचना परंपरेपासून आधुनिकतेकडे जाणाऱ्या तीव्र पण आवश्यक प्रवासाचं चित्र उलगडते. हे मुखपृष्ठ संघर्षाकडे तोडण्याचं / तुटकपणाचं माध्यम म्हणून पाहत नाही, तर प्रेम आणि नात्याची टिकणारी वीण मानतं. सातत्यपूर्ण संवादातून ती पुढे जाते.

हरीश सदानी, हिनाकौसर खान
संपादक, पुरुषस्पंदनं
Saharsh267@gmail. Com
9870307748

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या