माटुंगा येथील जीएसबीचा गणपती भारतातील सर्वात श्रीमंत गणपती
गणेश ही पौराणिक हिंदू
धर्मातील प्रथम पूज्य व त्या एक मुख्य देवता आहे.विघ्नहर्ता, बुद्धीची देवता आणि सर्व
देवांमध्ये गणपती बाप्पा हा प्रथम पूजनीय मानतो. गणेशोत्सव म्हणजे भक्तिभाव, श्रद्धा
आणि आनंंदाचा उत्सव ! सोबतच मांगल्य, उत्साह आणि जल्लोष यांचा संगम! श्रीगणेश उपासना
करणारे लाखो भक्त भारतात आहेत. श्रीगणेश ही तर महाराष्ट्राची लाडकी देवता आहे. ऐहिक
किंवा आध्यात्मिक सुखाच्या अपेक्षेने हे भक्त अनेक प्रकारे या देवतेची उपासना करतात.
कोणत्याही मंगल कार्याला आरंभ करताना मंगलमूर्ती श्रीगजाननाचे मंगलमय स्मरण करणे ही
सज्जनांची परंपरागत पध्दती आहे. कारण तो विघ्नहर्ता आहे. तो विघ्नराजही आहे. तो आपल्या
सामर्थ्याने विघ्नांना प्रेरणाही देऊ शकतो व विघ्नांचे दमन आणि शमनही करू शकतो.
भव्य- दिव्य गणेशमूर्ती
आणि अनोखी सजावट हे मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षणाचे केंद्रबिंदु आहे.
मुंबईतील अशी अनेक प्रसिद्ध गणेश मंडळे आहेत, जे कित्येक वर्षांपासून गणेशोत्सवाची
परंपरा आनंदाने साजरी करत आहेत. मुंबईत सार्वजनिक गणपती आता मंडपात सज्ज झालेले पाहायला
मिळत आहे. गणपती म्हटलं की, सर्वत्र आपल्याला धामधूम आणि भक्तांची गर्दी पाहायला मिळते. मुंबईतील आकर्षणाचा
केंद्रबिंदू आणि भारतातील सर्वात श्रीमंत गणपतीची मूर्ती म्हणून मुंबईतील माटुंगा येथीलजीएसबीचा
गणपती ओळखला जातो. कर्नाटकातून आलेल्या गौड सारस्वत ब्राह्मण समुदायाने
महागणपतीची मूर्ती ६९ किलोहून अधिक सोन्याचे दागिने आणि ३३६ किलो चांदी व इतर मौल्यवान साहित्याने सजवण्यात
आली आहे. त्यामुळेच दागिने आणि गणेशभक्तांच्या सुरक्षेसाठी मंडळाने ४७४.६४ कोटी रुपयांचा
विमा करून घेतला आहे. या विम्याच्या रकमेत सोने, चांदी आणि इतर दागिन्यांचा समावेश
आहे. याशिवाय मंडळात दर्शनासाठी येणारे भाविक, स्वयंसेवक, पुजारी, स्वयंपाकी, स्टॉल
कर्मचारी, सुरक्षा रक्षक आदींचाविमा समाविष्ट आहे. ६७. ०३ कोटी सोने, चांदी व इतर अलंकार,३७५ कोटी रुपये- स्वयंसेवक, स्वयंपाकी, पुजारी, पादत्राणे स्टॉल वरील कामगार, सुरक्षा रक्षक अपघात, शिवाय ३० कोटी रुपये मंडप, स्टेडियम, भाविक असे सार्वजनिक दायित्व विम्यासाठी आहेत. गणेशभक्तांनी अर्पण केलेल्या दागिन्यांनी
गणेशमूर्ती सजवली जाते आणि पाच दिवस अखंडपणे येथे धार्मिक विधी केले जातात. त्यामुळे
गणेशभक्त मोठ्या संख्येने येतात. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून गणेश मंडळे दरवर्षी दागिने
आणि सेवेत गुंतलेल्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी विमा उतरवतात असे जी आर भट यांनी सांगितले
वाराणसी येथील धर्मपीठ
श्री काशी मठ संस्थानशी जी. एस. बी. सेवा मंडळाची
निष्ठा आहे आणि प्रत्येक मुंबईकराच्या हृदयाच्या अगदी जवळ आहे. गणेश चतुर्थीच्या
भव्य उत्सवामुळे मंडळाला जागतिक स्तरावर प्रशंसा प्राप्त झाली आहे. सामाजिक कार्ये
आणि धर्मादाय उपक्रमांमधील वाढ हे धर्मगुरू, परमपूज्य श्रीमद् सुधींद्र तीर्थ स्वामीजी
आणि आपले सध्याचे मठाधीपती श्रीमद् संयमींद्र तीर्थ स्वामीजी यांच्या आशीर्वाद आणि
अविरत मार्गदर्शनामुळे होत असते.
या गणपती बाप्पाचे दिवस-रात्र
राबणारे कार्यकर्ते हे उद्योजक आणि पदवीधर असतात त्याचप्रमाणे निरक्षर लोकही निरपेक्ष
भावनेने सर्व कार्यात मनोभावे समरस होत असतात. स्त्री-पुरुष, लहान-थोर, गरीब श्रीमंत,
ज्ञानी-अज्ञानी, भारतातीलच नव्हे, तर परदेशातीलसुद्धा असे अनेक प्रकारचे भक्त मनोभावे
नवसाला पावणाऱ्या या बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात. श्रीगणेशाची पूजा आणि साधनेच्या
पलीकडे जाऊन प्रत्येक भक्ताशी आपुलकीचे नाते जोडणारा जी. एस. बी. सेवा मंडळाचा हा श्रीगणराया
बुद्धी आणि शौर्याचे प्रतीक आहे.
या मंडळाचे मुख्य संयोजक
डॉ भुजंग पै आहेत तर सहसंयोजक म्हणून श्री. जि दामोदर राव, गणेश प्रभू, डॉ दीपक शेणॉय,
डॉ अजित कामत, ऍड रामचंद्र किणी, श्रीमती विजया
कामत, श्रीनिवास कामत हे आहेत तर मंडळाचे विद्यमान अध्यक्ष श्री अमित पै, सेक्रेटरी विष्णू कामत, उपाध्यक्ष
कृष्णा कामत, सहसेक्रेटरी शिवानंद भट, खजिनदार विठ्ठलदास भट आहेत.
- रवींद्र मालुसरे
अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र
लेखक संघ मुंबई
९३२३११७७०४






0 टिप्पण्या