श्री गणेशाचे मंगलमय स्मरण करूया
श्रीगणेश उपासना करणारे लाखो भक्त भारतात आहेत. तरीही श्रीगणेश ही महाराष्ट्राची लाडकी देवता आहे. ऐहिक किंवा आध्यात्मिक सुखाच्या अपेक्षेने हे भक्त अनेक प्रकारे या देवतेची उपासना करतात. कोणत्याही मंगल कार्याला आरंभ करताना मंगलमूर्ती श्रीगजाननाचे मंगलमय स्मरण करणे ही सज्जनांची परंपरागत पध्दती आहे. कारण तो विघ्नहर्ता आहे. तो विघ्नराजही आहे. तो आपल्या सामर्थ्याने विघ्नांना प्रेरणाही देऊ शकतो व विघ्नांचे दमन आणि शमनही करू शकतो. ब्रह्मदेवानेही विश्वरचनेच्या आरंभी श्रीगजाननाचे ध्यान केलेले होते. शंकराने त्रिपुरासुराचा व पार्वतीने महिषासुराचा वध करताना गणपतीचे ध्यान केलेलेच होते. केवळ आरंभिलेले कार्य निर्विघ्नपणे सिद्धीस जावे याच हेतूने गणपतीचे ध्यान करायाचे नसून भुक्ती आणि मुक्तीही गणेशापासून आपल्याला मिळवावयाची असते. कारण तो भुक्तिमुक्तीचा नायक आहे. तो शारदेचाही अधिपती असल्यामुळे आपली बुध्दी विद्येच्या क्षेत्रात विशारद होण्यासाठी आपण त्याचे ध्यान करणे आवश्यक आहे.
खरे तर गणपती ही मूळची आर्येतरांचीच देवता होती. ती त्यांची ग्रामदेवता होती. सुमारे सात-आठ हजार वर्षांपूर्वीही आर्येतर अशा अनेक मानवगणांत तो पूजला जात होता, हे निश्चित ! अशा आर्येतर लोकांत व्रात्य हा एक प्रमुख मानवगण समजला जातो. त्या मानवगणातही गणपती होता.पुढे हळूहळू आर्येतरांचा आर्य संस्कृतीत अधिकाधिक प्रवेश होऊ लागला. आर्यांनी या आर्येतरांना व्रात्य असे संबोधले व त्यांना जवळ केले. या व्रात्यसंघात काही चांगले गुणधर्म होते, म्हणून आर्यांना त्यांची जवळीक करावीशी वाटली. अशा या समन्वयाच्या काळातच गणपतीचे प्रस्तुत रूप सिद्ध झाले असावे. या संबंधाची एक उपपत्ती श्री. माधवराव अणे यांनी सांगितली आहे. अशी ही आर्येतरांची गणदेवता किंवा ग्रामदेवता आर्यांना आपल्या संस्कृतिप्रसाराच्या मोहिमेत आपली म्हणावी लागली. जेव्हा आर्यांचा अशा गणांशी जवळून संबंध आला, तेव्हा त्यांनी मुक्तमनाने त्यांचा स्वीकार केला. मग त्यांनी या देवतेच्या पूजेसाठी, वेदातलाच एक मंत्र शोधून काढला. तो 'गणानां त्वा गणपतिं हवामहे,' हा मंत्र होय. तो वेदांच्या काळापासून आजतागायत गणपतीच्या पूजेतला प्रमुख मंत्र बनून राहिला आहे. अशा या प्राचीन काळी या गणांच्या देवांसाठी मंदिरे नव्हती. आर्येतरांचे सगळे देव, हे वस्तीजवळ एखाद्या झाडाखाली मांडलेले असत. तिथेच त्यांची पूजा व बलिदान होई. आजही अनेक मानवसंघांचे देव हे झाडाखालीच बसलेले असतात. गणपती हा त्यांपैकीच एक देव होय. हा देवही चवाठ्यावर मांडला जात असे, हे ज्ञानेश्वरीतल्या 'ते संवाद तुष्पथींचे गणेश जाहले,' या ओवीवरून सूचित होते. गणपती अथर्वशीर्षात गणपतीला 'नमो व्रातपतये' म्हणून नमन केले आहे. व्रातपती म्हणजे व्रात्यांचा पती होय. व्रतप्रधान व यज्ञपराङ्मुख अशा आर्येतरांच्या संघाला आर्यांनी व्रात्य हे नाव दिले. व्रात म्हणजेच व्रात्य होय. या शब्दांचा गणपतीशी निकटचा संबंध आहे. हे लोक निरनिराळे रूपडी घालून किंवा त्यांची सोंगे घेऊन नाचत, खेळत असत. या सर्वांत पुढे गणपतीचे गजमुख हे प्राधान्य पावले.पुराणांच्या काळात गणपतीची गणना शिवाच्या गणात होऊ लागली. पुढे लवकरच तो शिवगणांचा अधिपतीही बनला. त्याला शिवगणांचे असे प्रभुत्व मिळाल्यावर त्याचे कविभक्त तेवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी गणपतीला शिव-पार्वतीचास जयति सिंदुरवदनो देवो यत्पादपंकजस्मरणम् ।
वासरमणिरिव तमसां राशिं नाशयति विघ्नानाम् ।।
ज्याच्या चरणकमलाचे (केवळ) स्मरण हे, सूर्य जसा घन अंधकाराचा नाश करतो, तद्वत् विघ्नांच्या राशींचे निवारण करतो, अशा त्या सिंदुरवदन गणपतीचा जयजयकार असो. असा याचा अर्थ होतो.
कलियुगात एक चंडीदुर्गा आणि दुसरा गणपती ही दोनच दैवते भक्तांची संकटे निवारण करून त्यांना सुख, समाधान आणि समृद्धी देतात असे मानले जाते. भक्ती हा भारतीय संस्कृतीशी संबंधित प्रत्येक व्यक्तीचा अत्यंत आवडता विषय. त्याला जशी जमेल त्या स्वरूपात तो आपल्या उपास्य देवतेची भक्ती करीतच असतो. अर्थात ही भक्ती करताना, भक्तीचे नेमके स्वरूप काय ? तिचे प्रकार कोणते ? त्या प्रकारांचे वैशिष्ट्य काय? रहस्य काय ? भगवंताला अपेक्षित असणारे भक्तीचे स्वरूप काय ? असे अनेक प्रश्न प्रत्येकच भगवंत भक्ताच्या मनात येतच असतात. विविध ग्रंथात, संत महात्म्यांच्या उपदेशांमध्ये याचे वेगवेगळे वर्णन केलेले आपणास सहज उपलब्ध होते. पहिला म्हणजे भगवान प्रत्येक वेळा त्या भक्ताच्या जवळ मी कोणत्या स्वरूपात किंवा कोणत्या स्थानी राहतो याचे जे वर्णन करतात ते निश्चितच आगळे वेगळे आहे. उदाहरणार्थ श्रवण भक्ताच्या कानात, कीर्तन भक्ताच्या जिभेवर मी निवास करतो हे भगवंताचे कथन खूपच महत्त्वपूर्ण आणि चिंतनीय आहे.
या भक्तांमध्ये पदवीधरांप्रमाणेच निरक्षर लोकांचाही समावेश आहे. स्त्री-पुरुष, लहान-थोर, गरीब श्रीमंत, ज्ञानी-अज्ञानी असे अनेक प्रकारचे भक्त आहेत. भारतातीलच नव्हे, तर परदेशातीलसुद्धा गणेशभक्तांशी जवळीक साधावी असे मला यंदाच्या सणाच्या निमित्ताने वाटत आहे. पूजा आणि साधनेच्या पलीकडे जाऊन प्रत्येक भक्ताशी आपुलकीचे नाते जोडणारा श्रीगणराया बुद्धी आणि शौर्याचे प्रतीक आहे. गणपती बाप्पा बुद्धीची देवता आहे बाप्पा १४ विद्या ६४ कलेची देवता आहे बाप्पा ची भक्ती या माध्यमातून सुद्धा करता येते या गोष्टी कडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे, आपण आनंदाने आपल्या घरी बाप्पा ला घेऊन येतो मग त्याची पूजा मनोभावे जशी जमेल तशी करतो. तसा हा देव भाव भक्तीचा भुकेला आहे. गणेशोत्सव म्हणजे भक्तिभाव, श्रद्धा आणि आनंंदाचा उत्सव ! सोबतच मांगल्य, उत्साह आणि जल्लोष यांचा संगम!तेव्हा या गणेशोत्सवाच्या भक्ती पर्वात श्री गणेशाचे मंगलमय स्मरण करूया!
- रवींद्र मालुसरे
अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई
९३२३११७७०४
0 टिप्पण्या