जाखडी नाच : कोकणचे सांस्कृतिक संचित
‘बोल बोल बोल बोल बजरंग बली की जय, तुरेवाले की जय..’
किंवा
‘गणा धावरे मला पावरे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गावरे, तू दर्शन आम्हाला दावरे..’
किंवा
‘श्रावण बाळ जातो काशीला जातो काशीला |
माता-पित्याची कावड खांद्याला कावड खांद्याला’
गणेशोत्सवात रात्रीच्या वेळी आपण कोकणातील कोणत्याही गावात पोहोचलो तर जाखडीचा हा ठेका हमखास कानी पडतो. गणपतीत पावसाची पर्वा न करता घराच्या अंगणात जाखडी नाच होत असतो. आणि फेर धरून जाखडी नाचणार्या मुलांच्याभोवती अख्खा गाव जमा होवून त्याचा आनंद घेत असतो. या लोककलेचे सादरीकरण अर्थात गणेश स्तवनाने म्हणजे ‘अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र" किंवा ‘गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु, गुरुर्देवो महेश्वरा’ या दोन श्लोकांनी सुरुवात होऊन पुढे ढोलकीच्या ठेक्यावर ….. ढोलकीच्या धुम्यावर जोरदार थाप पडल्यावर, उजव्या पायात चाळ बांधून, भरजरी कपड्यांनी सजलेले नर्तक गाणाऱ्या बुवाने नमनाला `गणा धाव रे, मला पाव रे` अशी सुरुवात केल्यावर उत्साहाने नृत्याला सुरुवात करतात. त्या ठेक्यावर श्रोतेगणही तल्लीन होऊन त्यांची पाऊले आपोआपच ताल धरू लागतात. कोकणवासीयांना जगण्याची उमेद देणाऱ्या जाखडीची श्रावण महिन्यात ढोलकीवर पडलेली थाप ही शिमाग्यानंतरच विसावते.
कोकणाचे आणि निसर्गाचे नाते अतूट आहे. निसर्गाबरोबरच लोककला या इथल्या जगण्याचा स्थायीभाव बनलेला आहे. हजारो वर्षापुर्वीची संस्कृती, समृध्द ग्रामजीवन लोककला या साऱ्यांनी कोकण बहरला आहे.कोकण प्रांतातील निसर्गसौंदर्याप्रमाणे येथील लोककलाही मनमोहक आहेत. कोकणात भजन,शिमग्यातील खेळे, गणपतीतील जाखडी नृत्य, बैठकीचे गाणे, डफावरचे गाणे, अशा अनेक लोककला पाहायला मिळतात. त्यामुळे कोकणातील सण उत्सवांमध्ये एक वेगळीच लोकसंस्कृती पाहावयास मिळते. कोकणातील या कला व उत्सव येथील लोकांना परमेश्वराचे चिंतन व मनोरंजनाची ही महत्वाची साधने आहेत. त्यापैकी एक म्हणजे ‘जाखडी होय. कोकणात आषाढ महिना सरत आला की पाऊस थोडा विश्रांती घ्यायला लागतो. सर्वत्र श्रावणातील प्रसन्न वातावरणात असते. मनासारखा पाऊस झाल्याने शेतकरीही समाधानी असतो आणि नुकतीच भातलावणी पार पाडून विसावा घेत असतो. संध्याकाळी मंदिरात ग्रंथवाचन-श्रवण होत असते. या उत्साही वातावरणात मनही प्रसन्न होते आणि आबालवृद्धांपासून सर्वांना वेध लागतात ते गणेशोत्सवाचे. या धार्मिक कार्यक्रमाच्या सादरीकरणातून आपल्या संस्कृतीचा वारसा अव्याहतपणे त्यांनी सुरू ठेवला आहे.
जाखडी नृत्याचा उगम नेमका केव्हा झाला, कोणत्या काळात झाला याबद्दल खात्रीशीररित्या सांगता येणार नाही. सहाव्या शतकानंतर होऊन गेलेले कवी नागेश यांनी ‘कलगी’ या पंथाची सुरुवात केली. त्यांच्या नावावरुन त्या पंथाला ‘नागेशवळी’ म्हणजेच नागेशाची ओळ किंवा पंथ असेही ओळखले जाऊ लागले. नागेश यांनी कलगी पंथाची स्थापना केल्यानंतर त्यांचा प्रतिस्पर्धी असलेला समकालीन कवी हरदास यांनी ‘तुरेवाले’ या पंथाची सुरुवात केली. त्याला हरदासवळी म्हणजेच हरदासाची ओळ किंवा पंथ असेही म्हटले जाऊ लागले. दोन पंथांपैकी एकाने शक्तीचा (पार्वतीचा) मोठेपणा आपल्या कवितेतून किंवा शाहिरीतून मांडला आणि दुसर्याने हराचा (शिवाचा) मोठेपणा सांगितला. पुढे, पंथांना ओळखण्याची खूण म्हणून कलगीवाल्यांनी कलगी या चिन्हाचा वापर केला आणि तुरेवाल्यांनी आपल्या डफावर पंचरंगाचा तुरा लावण्याचा प्रघात पाडला.
पूर्वी पावसाळ्यातील शेतीची कामे आटपल्यानंतर लोक मनोरंजनासाठी एकत्र जमायचे आणि झांज, ढोलकी, घुंगरू या वाद्यांच्या साथीवर देवाची गाणी म्हणायचे, नृत्य करायचे. पायात चाळ बांधून नाचत असल्यामुळे या नाचाला ‘चवळी नाच’ असे म्हटले जात असे. हाच चवळी नाच पुढे कोकणातील लोकांबरोबर मुंबईत आला आणि बाल्या नाच म्हणून प्रसिद्ध झाला. काही ठिकाणी विशेषतः मंडणगड, दापोली या तालुक्यात जाखडी नृत्यास बाल्या नाच असेही म्हटले जाते. तर महाड-पोलादपूर, चिपळूण, खेड, संगमेश्वर, लांजा, राजापूर, रत्नागिरी याठिकाणी शक्ति- तुरा असेही म्हटले जाते. जाखडी नृत्याशिवाय कोकणातील गणेशोत्सव साजरा होऊच शकत नाही. या जाखडी नृत्याची तालीम जवळ जवळ तीन महिने केली जाते.आणि आता तर हे जाखडी नृत्य फक्त कोकणापुर्ती मर्यादित न राहता आता संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचले आहे. हे नृत्य गणपती काळातच का सादर केले जाते? याची कोणतीही ठोस नोंद आढळत नाही. पण, शंकर आणि पार्वतीचा महिमा सांगणारी कला सादर करण्यासाठी गणपतीसारखा दुसरा योग्य सण नाही. त्यासाठीच पूर्वजांनी हा सण निवडला असावाअसं बोललं जातं. दशक्ती म्हणजे शिवप्रिया देवी पार्वती आणि तुरा म्हणजे भगवान शिवशंकर दोन गटात काव्यात्मक जुगलबंदी रंगते. नृत्यप्रकारात एक-दोन गायक, एक ढोलकी किंवा मृदुंग वादक, एक शैलीवादक, एक-दोन झांजवादक व गायकांना साथ देणारे एक-दोन सुरते (कोरस देणारे) असतात. ते सर्वजण मधोमध बसतात आणि आठ ते दहा जण त्यांच्या सभोवती गोलाकार भरजरी कपडे व पायात चाळ बांधून पायांच्या विशिष्ट हालचालींवर नृत्य करतात. प्रथम शक्तीवाले त्यांचे नृत्य सादर करतात. त्यामध्ये ईशस्तवन केले जाते. नर्तक गुंफलेल्या नृत्याच्या वेगवेगळ्या चाली सादर करतात. त्यानंतर गण-गौळण, सवाल-जवाब, साकी, प्रतिस्पर्ध्याच्या चुका काढणारे, भक्तीपर, सामाजिक अथवा सद्यस्थितीसंबंधी माहितीपर गाणी गाऊन त्यावर नृत्य सादर केले जाते. गणात गणपतीला वंदन केले जाते, तर गौळणीत कृष्णाने गौळणींना केलेला इशारा गायला जातो. नृत्यामध्ये सवाल-जवाब स्वरूपाचीही गाणी गायली जातात. तुरेवाले त्यांचा सवाल विचारतात व शक्तीवाले त्यांच्या काव्यातून त्यांना उत्तर देतात. नाचासाठी ढोलकी, मृदुंग , घुंगरू, झांज, टाळ , बासरी, सनई या वाद्यांचा वापर केला जातो. बदलत्या काळानुसार बाल्यांचे कपडे, म्हटली जाणारी गाणी यात बदल होत गेले. पूर्वी कासोटा बांधून नाच केला जात असे. त्यानंतर नाचणारे धोतर घालू लागले. त्यासोबत डोक्यावर पेशवेशाही पगडी आणि कमरेला रंगीत शेला ही जाखडी नृत्याची वेशभूषा असे. हल्ली रंगेबेरंगी कपडे वापरले जातात. जोडचाल, एक पावली, दोन पावली, तीन पावली आदी चालींवर जाखडी नृत्य केले जाते. उजव्या पायात भरपूर घुंगरू बांधले जातात. नृत्याची रचना प्रामुख्याने वर्तुळाकार असते. नृत्य करताना घुंगरू बाधलेल्या पायाने ठेका दिल्यामुळे ढोलकी, झांजरी,टाळे च्या आवाजात घुंगरांचा आवाज भर टाकतो. पायातले घुंगरू, गायकाचा उत्साहपूर्ण आवाज यामुळे नाचणा-यांच्या अंगी उत्साह संचारतो आणि ते गीत-वाद्यांच्या तालावर आरोळया देऊ लागतात. गाण्याच्या मधे ऐकू येणा-या त्या आरोळ्यांमुळे सादरीकरणात आणखी रंग भरला जातो. नृत्य सादर करताना शाहीर नैसर्गिक आपत्ती, तसेच समाजातील विविध समस्यांवर गीते रचतात.
पोलादपूरमधील सुप्रसिद्ध शाहीर स्व कृष्णा गोपाळ कुंभार यांनी कोरोना काळात जा बा जा तुझ्या गावाला जा परत नको येऊ तुझ्या गावाला जा हे गीत महाराष्ट्रभर गाजले होते. चित्रवाहिन्यांनी त्याची दखल घेतली होती. तर लहुळसे गावातील वै. ह.भ.प.विठोबा रामजी रिंगे(आमदार) यांना या नाचाची लहानपासूनच खूप आवड होती. त्यांनी आपल्या गावातील तरुणांना एकत्रीत करून आपला शक्ती संघ तयार केला. कोणता फेर कसा धरायचा, कोणती चाल कशी मारायची हे त्यांनी शिकवायला सुरुवात केली. नाचाची तालीम करीत असताना कोणी जर चुकला तर त्याला त्यांच्या छडी पासून कोणीच वाचवू शकत नव्हता. त्यामुळे प्रत्येकजण निष्णात नाचणारा झाला. त्याच्याच जोरावर त्यांनी अनेक शक्ती तुरा सामने जिंकून दाखवले.
दोघांमधील प्रश्नोत्तरी भांडण म्हणजे शक्तीतुरा किंवा कलगीतुरा. हे भांडण एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून उभे ठाकलेले शाहीर करतात. हे शाहीर सागरीत झालेले असतात. म्हणजेच या दोन्ही संप्रदायात जी गायकीची घराणी आहेत, त्या घराण्यांच शिष्यत्व त्यांनी पत्करलेल असतं. उदा. शक्तीवाल्यांमध्ये गुरुगणपती आणि सदालाल घराणे व तुरेवाल्यांमध्ये वासुवाणी आंनी रामचंद्र पंडित घराणे. हा सागरीत होण्याचा कार्यक्रम पारंपारिक पद्धतीने मांड भरून दोन्ही संप्रदायाच्या लोकांना बोलावून जाहीररित्या केला जातो. तो केल्याशिवाय शाहीर गायकी करू शकत नाही किंवा प्रतिवाद करू शकत नाही. सागरीत झाल्यानंतरच त्या शाहिराला सांप्रदायिक मान्यता प्राप्त होते. शक्तीतुऱ्यामधील वाद अथवा भांडण हे शास्त्राधारे चालते. श्रुती, स्मृती व पुराणांवर आधारलेल्या अनेक ग्रंथाचा आसरा घेऊन हा वाद मांडला जातो. वादात गद्याचे प्रयोजन कमी आणि पद्याचे प्रयोजन जास्त असते. काव्य, संगीत, नृत्य यामुळे शक्तीतुऱ्याचा खेळ चांगलाच रंगला जातो. या खेळाला बारी असे म्हणतात. बारीची सुरवात करण्याचा मान हा नेहमी शक्तीवाल्यांकडे असतो आणि समाप्तीचा तुरेवाल्यांकडे. दोन्ही संप्रदायाचे शाहीर बारीला सुरुवात करताना प्रथम गण गौळण गातात मग इतर पदे. टोनपा अंतिम असतो. तो खास प्रतिस्पर्धीला खिजवण्यासाठी गायला जातो. शक्तीतुऱ्यामधील जुगलबंदी खऱ्या अर्थाने रंगते ती या टोनप्यामुळेच. पहिल्या बारीत तोडा म्हणजेच चित्रपट गीताच्या चालीवर गीत सादर करणे, स्तवन- प्रार्थना, गण-देवाचे नामस्मरण, गवळण- प्रेक्षकांना चिडवणे, राधा कृष्णाचे संवाद, प्रश्न, पद- शक्तीवाले आपल्या गीतातून सादर करतात ते गीत, तर दुसर्या बारीत टोमणा यात श्रेष्टत्वावरून लढाई चालते,
लक्ष्मण वाझे यांनी कलगी-तुऱ्यातील भेद उलगडून सांगितला. 'कलगी आणि तुरा म्हणजेच शक्ती आणि शिव असे दोन पक्ष आहेत. कलगीवाले म्हणजेच शक्तीवाले माता पार्वतीचा पक्ष घेतात. आपल्या गाण्यातून तिचं गुणवर्णन करतात. तिची स्तुती करतात. तर तुरेवाले शिवाची शंकराची स्तुतीकवनं गातात, मूळ स्तंभात पार्वतीनं प्रश्न विचारायचे आणि शंकराने त्याची उत्तरं द्यायची ही परंपरा सांगितली. कलगीवाले आणि तुरेवाले एकत्र येऊन कार्यक्रम करतात. तिला डबल म्हणतात. त्यावेळी पहिली बारी सादर करण्याचा मान कलगीवाल्याना म्हणजेच शक्तीवाल्यांना मिळतो आणि नंतर तुरेवाले बारी सादर करतात.
गोफ नृत्यप्रकारात हातात गोफ घेतलेले बाल्या नृत्यासोबत गोफ विणत जातात आणि तेवढ्याच लकबीने तो सोडवतातही. गोफ नृत्यासाठी नर्तकांची संख्या समप्रमाणात असावी लागते. ण्याच्या तालावर आणि ढोलकीच्या ठेक्यावर नृत्य सुरू होते. काही वेळातच, बाल्या नृत्याची वर्तुळाकार गती सोडून परस्परांना सामोरे जाऊ लागतात आणि गोफाची गुंफण सुरू होते. त्यावेळी त्यांची नृत्याची पद्धत नागमोडी (झिगझॅग) वळणाची असते. अर्ध्या जोड्या डाव्या तर उर्वरित जोड्या उजव्या बाजूने प्रवास करत गोफ गुंफत असतात. गाण्याची रंगत जसजशी वाढत जाते तसतसा गोफ घट्ट विणला जात असतो. त्या वेळी ढोलकीच्या ठेक्यावरील पदन्यास, परस्परांसोबत असलेली सुसुत्रता यांचे फार महत्त्व असते. चुकलेल्या एका पदन्यासामुळेही गोफाची गुंफण बिघडू शकते. एका टप्प्यावर, गुंफण पूर्ण होते आणि बाल्या उत्साहाने नाचू लागतात. अनेकदा, गाण्याची चाल अथवा गाणे बदलले जाते. एखादे कडवे झाल्यानंतर गोफ सोडवण्याचा भाग सुरू होतो. त्या वेळी बाल्या विरूद्ध दिशेने परस्परांना सामोरे जाऊ लागतात आणि विणलेला गोफ तितक्याच लकबीने सोडवला जातो.
पूर्वीच्या काळी जाखडीत नाचण्यासाठी वीस ते पंचवीस लोकांचा समावेश असायचा त्यांचा पोशाख हाफ चड्डी किंवा शर्ट एवढाच असायचा आणि मध्यस्थानी एक साधा विजेचा दिवा असयाचा परंतु कालानुरूप यामध्ये बदल होत गेले बदलत्या काळानुसार बाल्यांचे कपडे, म्हटली जाणारी गाणी यात बदल होत गेले. पूर्वी कासोटा बांधून नाच केला जात असे. त्यानंतर नाचणारे धोतर घालू लागले. त्यासोबत डोक्यावर पेशवेशाही पगडी आणि कमरेला रंगीत शेला ही जाखडी नृत्याची वेशभूषा असे. झांज, ढोलकी आणि बासरी या पारंपरिक वाद्यांपासून सुरू झालेला या कलेचा प्रवास आज आधुनिक वाद्यांपर्यंत पोहोचलाय. आज शक्ती तुरा नृत्य सादर करताना डबल मिनिंग गाणी जास्त गायली जातात, असा आरोप देखील काही कोकणवासी करतात. त्यामुळं मनोरंजनातून प्रबोधन करण्यासाठी सुरू झालेल्या या लोककलेचा प्रवास काहीसा संथगतीनं सुरू असल्याचं पाहायला मिळतं.पूर्वीच्या काळात या खेळामध्ये प्रामुख्याने नाचासाठी ढोलकी, मृदुंग, घुंगरू, झांज, टाळ, बासरी, सनई , खुळखुळा, बासरी, टाळ, तबला, टिमकी, सुंदरी चकवी, बुलबुला संगीत वाजविण्यासाठी अशा प्रकारची पारंपारिक वाद्ये पूर्वीच्या काळी वापरली जात असे. बदलत्या काळानुसार आणखी काही नवीन इलेक्ट्रोनिक साहित्याचा वापर यामध्ये होवू लागला. ती म्हणजे कॅशिओ, ऑरगन ,पॅड, आणि प्रभावी ध्वनीसाठी विविध प्रकारचे माईक्स. जो केंद्रस्थानी गीत गाणारा (बुवा) असतो. त्याला वेगवेगळ्या प्रकारचे माईक्स दिले जातात. त्याचबरोबर स्वर मिक्सरचा वापर केला जातो. आवाज सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहचण्यासाठी आवाज उपकरणांचा उपयोग केला जातो. बाला नृत्यप्रकारात एक-दोन गायक, एक ढोलकी किंवा मृदुंग वादक, एक शैलीवादक, एक-दोन झांजरीवादक व गायकांना साथ देणारे एक-दोन सुरते (कोरस देणारे) असतात. ते सर्वजण मधोमध बसतात आणि आठ ते दहा जण त्यांच्या सभोवती गोलाकार भरजरी कपडे व पायात चाळ बांधून पायांच्या विशिष्ट हालचालींवर नृत्य करतात. हल्ली रंगेबेरंगी कपडे वापरले जातात.आणि सध्य स्थितीत जाखडीच्या पोशाखात बदल झाला आहे. तो खूप आकर्षक असा वापरला जातो. पायात घुंगुर, डोक्यात पगडा, हाताच्या मधल्या बोटाला मापक असा झगमगीत रुमाल बांधला जातो. चेहरा विशिष्ट प्रकारे सजवला जातो किंवा मुले किंवा मुली देव देवतांची किंवा राजा महाराजांची वेशभूषा करतात. तसेच प्रकाश योजनेसाठी वेगवेगळ्या प्रकारचे लाईट्स वापरल्या जातात. लहान दिव्यांच्या लाईट्स, पोक्स, किंवा डिंमर,कलर, हॉलिजन यांचा प्रकाश ढोलकीच्या व नाचणार्या मुलांच्या अंगावर मारले जातात. त्यामुळे संपूर्ण वातावरण रंगीबेरंगी होवून जाते. सध्या जाखडी नृत्याचे आधुनिकीकरण होत असल्याचे दिसून येत आहे. नृत्याच्या गाण्यांमध्ये अश्लील शब्दांचा वापर वाढला असून नृत्याची परंपरा चुकीच्या मार्गावर नेली जात आहे असे ज्येष्ठांचे म्हणणे आहे. सिनेमाच्या गाण्यांच्या तालावर गीते गायली जातात. त्याचबरोबर गाण्यातून एकमेकांशी अर्वाच्य भाषेत बोलणे, अश्लील गाणी म्हणणे, आकर्षणासाठी नृत्यात कसरती करणे, अंगावर विद्युत उपकरणे लावणे, डोंबा-याचे खेळ करत नाचणे, अशा अनेक प्रकारांनी या लोककलेत शिरकाव केला आहे.
गणेशोत्सवाच्या काळात जाखडी नृत्य व परंपरेला मोलाचे स्थान आहे. गौरी-गणेशाच्या या नाचाला अनेक वर्षांची परंपरा आहे. मुख्यत्वे कोकणातील मराठा-कुणबी समाजाने शतकानुशतके जतन व संवर्धित केलेली आढळते. आजच्या आधुनिक युगात, जाखडी नृत्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळत आहे. विविध सांस्कृतिक महोत्सवांमध्ये हा नृत्य सादर करून महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे संरक्षण आणि प्रचार करण्यात येत आहे. शक्ती तुरा अर्थात जाखडी नृत्य हा महाराष्ट्राच्या विविधतेचे आणि सांस्कृतिक संपन्नतेचे प्रतीक आहे, मागची पिढी नव्या पिढीला हाताला धरून कोकणातील हे सांस्कृतिक संचित पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करीत हे चित्र आशादायक आहे.
- रवींद्र मालुसरे
अध्यक्ष,मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई
९३२३११७७०४
0 टिप्पण्या