Ticker

6/recent/ticker-posts

रणरागिणी ताराराणी - शौर्य, नेतृत्व आणि इतिहासाचा तेजस्वी ठसा.

 

रणरागिणी ताराराणी

शौर्य, नेतृत्व आणि इतिहासाचा तेजस्वी ठसा.

दर्जा: ५/५ ⭐⭐⭐⭐⭐

कलाकारः तनिषा वर्दे, सुनील गोडसे, मुकुल देशमुख, प्रसाद धोपट, निशांत देसले, उमेश ठाकूर, रुषिकेश शिंदे, चेतन म्हस्के, मोहिका गद्रे, सिद्धी घैसास, अरुण पंदरकर, तेजस भोर, कृष्णा राजशेखर, संदिप शिंगडाणे, नीलेश नाईक, प्रथमेश येवले, विक्रांत खातू, संकेत वाणी.

लेखकः युवराज पाटील

दिग्दर्शकः विजय राणे

संकल्पना: चंद्रकांत (अण्णा) सावंत

निर्माता: ब्रिगेडिअर सुधीर सावंत

 

मराठी रंगभूमीला ऐतिहासिक नाटकांची सशक्त परंपरा लाभलेली लाभली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि ताराराणी यांसारख्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांवर आधारित अनेक कलाकृतींनी या परंपरेला अनेकवेळा उजाळा दिला आहे. या परंपरेत युवराज पाटील लिखित व विजय राणे दिग्दर्शित "रणरागिणी ताराराणी" या नाटकाने आपल्या समर्पक लेखन, ताकदीचा अभिनय, आणि प्रभावी सादरीकरणाच्या जोरावर आपली वेगळी छाप पाडली आहे. हे नाटक केवळ एका ऐतिहासिक स्त्रीचे चरित्रनाटक नाही, तर ते एका इतिहासातील सशक्त स्त्रीपात्राची झुंज, धैर्य, नेतृत्व, आणि बुद्धिमत्तेची अजरामर कथा सांगते.

कथानक : “रणरागिणी ताराराणी" हे नाटक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात आणि छत्रपती संभाजीची राजांचे स्वराज्यासाठी बलिदान दिल्यानंतर निर्माण झालेल्या अस्थिर राजकीय परिस्थितीत राणीसाहेब ताराबाई यांनी घेतलेल्या राजकीय निर्णयांची आणि त्यामागील संघर्षांची गोष्ट सांगते. छत्रपती संभाजी महाराजांची औरंगजेबाकडून क्रूर हत्या, राजाराम महाराजांची कारकीर्द आणि नंतर ताराराणींनी स्वराज्याच्या रक्षणासाठी घेतलेली जबाबदारी हे या नाटकाचे केंद्रबिंदू आहे. महाराणी ताराराणी या एका राजमातेची मर्यादित भूमिका पार करून स्वतःच राज्यकारभार, सैनिकी धोरणं, किल्ले राखणं, आणि मराठ्यांचे मनोधैर्य उंचावणं हे सगळं करताना दाखवल्या गेलेल्या धैर्याची नाटकात सुरेख मांडणी केली आहे.

लेखन :  युवराज पाटील यांचे लेखन हे या नाटकाचा गाभा आहे. त्यांच्या लेखणीची तीन ठळक वैशिष्ट्ये लक्षात येतात (१) फक्त ऐकीव गोष्टींची मांडणी न करता, दस्तऐवजीकृत इतिहासाचा अभ्यास करुन प्रामाणिकपणे कथानक रचले आहे. यात ताराराणींच्या कारभाराची बारकाईने मांडणी असून एकही  प्रसंग कल्पनेवर आधारित आहेत हे प्रेक्षकांना जाणवतही नाही. (२) प्रत्येक पात्राचे संवाद त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी सुसंगत आहेत. ताराराणींच्या संवादांमध्ये शौर्य आणि धोरणीपणा दिसून येतो. तर छत्रपती राजाराम महाराजांमध्ये द्विधा मनसःस्थिती आणि मराठा सरदारांमध्ये कधी विश्वास, कधी शंकेची भावना जाणवते. (३) केवळ युद्धाचा किंवा राजकारणाचा विचार केला नाही, तर ताराराणीच्या एकमेव स्त्री म्हणून असलेल्या भावनिक संघर्षालाही स्थान दिलं आहे. यात त्यांचं मातृत्व, दुःख, मनातील गोंधळ, आणि न झुकण्याची जिद्द सखोलपणे जाणवते.

दिग्दर्शनः विजय राणे यांचं दिग्दर्शन हे या नाटकाचं सर्वात मोठं यश आहे. हे नाटक केवळ ऐतिहासिक दृष्यांची मालिकाच नाही, तर एक सशक्त दृश्यशैली आणि अंतर्मुख करणारा अनुभव आहे. ताराराणींच्या जीवनातील संघर्ष, राजकीय चातुर्य, त्याग, आणि शौर्य यांना नाट्यमंचावर सादर करताना त्यांनी एक ऐतिहासिक दस्तऐवज जिवंत केला आहे. त्यांच्या दिग्दर्शनातून हे स्पष्ट होते की, त्यांना इतिहासाचा फक्त गौरव न करता, त्या काळातील राजकीय व सामाजिक गुंतागुंतीचं भान जपायचं आहे. विजय राणे यांची एक खासियत म्हणजे रंगमंचावरची दृश्यरचना. या नाटकात त्यांनी नेपथ्याचा आणि प्रकाशयोजनेचा पुरेपूर वापर केवळ सौंदर्यदृष्टीने केला नाही, तर प्रत्येक दृश्य आणि प्रकाशयोजनेला कथनाचा भाग बनवले.

अभिनय : ताराराणींची भूमिका साकारणाऱ्या मुख्य अभिनेत्री तनिषा वर्दे यांनी भूमिकेला केवळ न्याय दिला नाही तर ती जिवंत केली आहे. त्यांची संवादफेक, देहबोली आणि नेत्रसंचालन हे इतके प्रभावी आहे की तिच्या प्रवेशानेच रंगमंचावर ऊर्जा संचारते. ताराराणींचं धैर्य, समजूतदारपणा, कणखरपणा आणि सूक्ष्म भावनिकतेचं प्रत्ययकारी मिश्रण साकारलं आहे. त्यांची संवादफेक ठाम असूनही हळुवार, कठोर असूनही कोमलतेचा स्पर्श असलेली आहे. विशेषतः रणांगणातील युद्धप्रसंग, लढायातील तलवारबाजी आणि युद्धानंतरच्या सभा प्रसंगात, त्यांच्या चेहऱ्यावर असलेली ताणतणावाची छटा प्रेक्षकाला थक्क करून सोडते. अनुभवी रंगभूमी आणि चित्रपट अभिनेता सुनील गोडसे यांनी औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. या भूमिकेत त्यांनी दिलेला अभिनय केवळ प्रभावी नव्हे, तर थेट काळजाला भिडणारा, अस्वस्थ करणारा आणि रंगमंचावर दडपण निर्माण करणारा आहे. गोडसे यांनी औरंगजेबाच्या भूमिकेसाठी स्वतःची देहबोली जाणीवपूर्वक बदललेली जाणवते. त्यांच्या चालण्यातला करडेपणा, डोळ्यांतील थंडपणा, आणि आवाजातला सत्ताधीशत्वाचा अहंकार, हे सगळं इतकं समर्पकपणे साकारले आहे की त्यांच्या प्रत्येक प्रवेशाला रंगमंचावर एक थरार निर्माण होतो. मुख्य चेहरे जसे प्रभावी ठरले, तसंच या नाटकातील सह कलाकारांचा अभिनय देखील नाटकाच्या यशात फार मोठं योगदान देणारा ठरतो. प्रत्येक सहकलाकाराने रंगमंचावर आपली जागा निर्माण केली आहे आणि त्यांच्या भूमिकांनी कथानकाला गती, गांभीर्य, भावनिकता आणि वास्तववाद प्राप्त करून दिला आहे. छत्रपती संभाजीराजे, येसूबाई, जानकीबाई, छत्रपती रामराजे यांच्या भूमिका अतिशय संयत, भावनिक आणि मर्मभेदी ठरल्या आहेत. तर सरदार, सेनापती, मावळे यांच्या भूमिकेतून त्या काळातील मराठ्यांची निष्ठा, जिद्द, आणि शौर्य प्रभावीपणे उभं राहिले आहे. त्यांच्या युद्ध प्रसंगांतील शारीरिक हालचाली, घोषणा, तलवारीबाजी,  आणि चेहऱ्यावरील जोश प्रेक्षकांना इतिहासात घेऊन जातो.

थोडक्यात "रणरागिणी ताराराणी" हे नाटक केवळ ताराराणींच्या जीवनावर आधारित नाही, तर ते संपूर्ण स्वराज्याची, शौर्याची, आणि मातृत्वाच्या सन्मानाची साक्ष आहे.

युवराज पाटील यांच्या अभ्यासू लेखनाला विजय राणे यांच्या कल्पक दिग्दर्शनाची जोड मिळून ही कलाकृती रंगमंचावर अजरामर होते. श्रीमंत अभिनय, हृदयस्पर्शी संगीत, प्रभावी नेपथ्य, वेशभूषा, आणि आशययुक्त संवाद यामुळे हे नाटक आजच्या पिढीने आवर्जून पाहावे असे वाटते.

 

- निखिल रवींद्र मालुसरे  

संपर्क : ८८५०९०३४३५

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या