पोलादपूर स्नेहसंमेलन सत्कारमूर्तींचा आणि प्रमुख पाहुण्यांचा परिचय
पोलादपूर तालुक्यातील मुंबई - ठाणे येथील सर्व सामाजिक कार्यकर्त्यांचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. या संमेलनाचे मुख्य पाहुणे म्हणून दुर्गमहर्षी आप्पा परब तर लक्ष्मण उतेकर यांची मुलाखत घेण्यासाठी साहित्यिक प्रल्हाद जाधव उपस्थित होते.
या संमेलनात माननीय लक्ष्मण उतेकर, नामदार भरतशेठ गोगावले साहेब, आमदार प्रवीणभाऊ दरेकर, मा संजीव धुमाळ, स्वप्निल पांडुरंग चव्हाण, डॉ ओंकार मारुती कळंबे, कुमार संग्राश निकम, नेहा विलास शिरावले, ऍड निलेश मारुती जाधव यांचा आदरपूर्वक सत्कार करण्यात आला.
सत्कारमूर्तींचा आणि प्रमुख पाहुण्यांचा परिचय :-
माननीय लक्ष्मण उतेकर -
सध्या हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे नाव असलेले लक्ष्मण उतेकर हे पोलादपूर तालुक्यातील मोरसडे गावचे. लक्ष्मण हे मध्यमवर्गीय कुटुंबातील एक साधासुधा मुलगा, सामान्य बुध्दिमत्तेचा मापदंड असलेला चारचौघांसारखा. वडीलांना शेतीकामात मदत करताना शेत नांगरणे, गाई-बैलांना चारा घालणे, गाईचे दुध काढणे या सगळ्या गोष्टी लक्ष्मण उतेकर यांनी केल्या आहेत. या सर्व काबाडकष्टांचे मला भांडवल करायचे नाही कारण माझ्या आयुष्यातील हे सर्व क्षण मी सकारात्मक जगलो, यात माझ्या जगण्याचे आनंदाचे क्षण होते. 'राजे छत्रपती शिवरायांचे रयतेचे हिंदवी स्वराज्य आणि राजाभिषेक ज्या भूमीत स्थापन झाले आणि नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या कर्तृत्वाने व रक्ताने लाल झालेल्या महाड - स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी राजे यांच्या अजरामर शौर्याची, त्यागाची आणि स्वाभिमानाची प्रेरणादायी कहाणी सांगणारा आणि महापराक्रमाचा वेध घेणारा लक्ष्मण उतेकर यांचा छावा हा चित्रपट काही महिन्यापूर्वी प्रदर्शित झाला आणि संपूर्ण देशात आणि देशाबाहेर यशस्वी झाला.
आम्हांला शंभूराजे कळलेच नव्हते. जे दुर्गुण कळले होते ते त्यांच्यात नव्हतेच. जे सद्गुण
त्यांच्यात होते ते कुणी सांगितलेच नाहीत. लक्ष्मण उतेकर यांनी इतिहासाचा अभ्यास करून
धाडसाने सांगण्याचा आणि देशाच्या कानाकोपऱ्यात दाखविण्याचा प्रयत्न उतेकरांनी केला
आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी सहन केलेला त्रास इतका भयानक आहे त्यामुळे तेवढाच जास्त
आदर त्यांच्याबद्दल मराठी माणसात आहे.आणि म्हणून ते तितकंच ताकदीने मांडलं पाहिजे ही
अपेक्षा होती. संपूर्ण हिंदुस्थानात या चित्रपटाने इतिहासप्रेमींच्या हृदयात
देशभक्तीची नवीन चेतना जागवली आहे.
प्रसंगी जीवाचे बलिदान देत ज्या खोऱ्यातील मावळ्यांनी शिवरायांना साथ दिली त्या मावळ्यांच्या
शौर्याचा आणि रक्ताचा वारसा लक्ष्मण उतेकर यांना लाभला आहे. त्यांच्याबरोबर इतिहासावर
असलेल्या वेडापायी त्यांनी एव्हढे मोठे धाडस केले. लाखो जनतेने चित्रपटाचे स्वागत केले
आणि त्यामुळे उतेकर हे नाव एका वेगळ्याच उंचीवर पोहोचले.
महाड पोलादपूरच्या
मातीशी घट्ट नाळ जुळलेले अन् धर्मभावनेपेक्षा वास्तववादी प्रश्नांची जाण, दिलदार वृत्ती,
चतुरस्त्र प्रतिभा आणि स्वतः मध्ये आत्मविश्वास ठेवून इतरांचा विश्वास जिंकण्याची असलेली
ताकद, स्थानिक गोरगरीब, कष्टकरी, शेतकऱ्यांचा आवाज. सर्वसामान्यापासून ते विरोधकांपर्यंतच्या
मनात प्रेम असणारा स्वाभिमानी नेता म्हणून भरतशेठ गोगावले यांची ओळख महाराष्ट्राच्या
राजकारणात निर्माण झाली आहे. ढालकाठी (खरवली), पोस्ट - बिरवाडी, तालुका - महाड, जिल्हा
- रायगड' असा आता निवडणूक आयोगाच्या लेखी भरतशेठ गोगावलेंचा पत्ता असला, तरी पोलादपूरमधील
मधील कांगोरी गडाच्या पायथ्याशी असलेल्या दुर्गम भागातील पिंपळवाडी नावाच्या छोट्याशा
गावात त्यांचा जन्म झाला. या एका छोट्या गावात जन्माला येऊन त्यांनी महाराष्ट्राच्या
मंत्र्यालयात कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत मजल मारली आहे, हे त्यांना काही एका दिवसात किंवा
एका वर्षात शक्य झाले नाही. गरीब आणि गरिबी त्यांनी जवळून पाहिली. शेतकऱ्यांच्या समस्या
कोणत्या असतात, शेती कशी करावी लागते याचे त्यांना अंगभूत ज्ञान आहे. कुठे काय पेरावे
याची त्यांना जाण आहे. एका गरीब कुटुंबावर ग्रामीण भागातील काही अडचणींमुळे आलेली
आर्थिक ओढग्रस्त परिस्थिती, या सर्व परिस्थितीवर त्यांनी केवळ मातच केली नाही तर त्या
परिस्थितीला आपलीशी करून त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. यातच त्यांचे
मोठेपण सामावले आहे. १९९२ ते २०२४ या काळात वैयक्तिक, सामाजिक आणि राजकीय पातळीवर त्यांना
यासाठी अनेक प्रसंगांना संघर्ष आणि परिस्थितीशी सामना करावा लागला आहे. जणू संघर्षाचं
दुसरं नाव म्हणजेच भरतशेठ असेच म्हणावे लागेल. कोणत्याही कठीण प्रसंगात न खचता धाडसाने
निर्भीडपणे सामोरे जायचे ही तरुणवयापासून त्यांची वृत्ती आहे. कुणीही विधाता जनतेचे
नायक म्हणून कुणाला जन्माला घालत नाही. जो खऱ्या अर्थाने सामान्यातला सामान्य बनत जातो,
तोच असामान्यतेच्या पदवीला गवसणी घालून नायक बनतो. शाळेत त्यांनी आठवीपर्यंत शिक्षण घेतलं आणि शाळेला राम राम ठोकला. शिक्षण मध्येच सोडून
जगण्याच्या उघड्या विश्वात उडी घेतली. १९९२-९३ पासून ते शिवसेनेशी जोडले गेले त्यानंतर
ते जिल्हा परिषद निवडणूक लढले. दोनवेळा रायगड जिल्हा परिषदेवर निवडून आले. पशु, अर्थ,
बांधकाम अशा विविध खात्यांचे दोनवेळा त्यांनी सभापतीपदही भूषवलं. जिल्हा परिषद सदस्य
आणि चार वेळा आमदार आणि आता मंत्री म्हणून त्यांची कारकीर्द शिवसैनिकच नव्हे, तर कुठल्याही
राजकीय- सामाजिक कार्यकर्त्याला प्रेरणादायी ठरेल अशीच आहे. मतदार संघात तळागाळात
जनाधार असलेला मातब्बर नेता अशीच त्यामुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे. पक्षवाढीसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी आयुष्यभर आपली व्यक्तिगत मिळकत खर्च करणारा हा
उदार, कनवाळू नेता आहे. अखंड भ्रमंती, अफाट जनसंपर्क, अचाट स्मरणशक्ती, आश्चर्यचकित
करणारा बुद्धीचा आवाका, कार्यकर्त्यांशी अतूट जिव्हाळा, अविरत चिंतन, विधायक राजकारण
आणि समाजकारण, अलिप्त मनानं स्वतःचा संसार करणारा हा नेता, कार्यकर्त्यांच्या बारीक
सारीक अडचणीही जाणून घेऊन त्यांना वेळोवेळी मदत करतो. पारदर्शी आणि प्रांजळ स्वभाव
ही या व्यक्तिमत्त्वाची ठळक वैशिष्ट्ये आहेत.
मा. प्रविण दरेकर
–
आमदार, गटनेते,
विधान परिषद गटनेते यापूर्वी विरोधी पक्षनेते.
आधुनिक काळात समाजामध्ये अनेक प्रश्न, अनेक आव्हाने निर्माण होत असतात. त्यांचा धैर्याने
स्वीकार करून त्यामध्ये यशस्वी होण्याचा जी माणसे प्रयत्न करतात तीच माणसे मोठी होतात. शेवटी
जी माणसे मोठी होतात, ती निव्वळ मोठ्यांच्या पोटी जन्माला येतात म्हणून नव्हे.
मोठ्यांच्या पोटी जन्माला आल्यामुळे मिळणारे मोठेपण आता जुन्या इतिहासात जमा झाले आहे. सर्वसामान्य
कुटुंबात जन्माला येऊन लोकनेते या बिरूदवली पर्यंत पोहोचणारे जे नेते महाराष्ट्राच्या
राजकारणात होऊन गेले किंवा आहेत त्यामध्ये मा. प्रविण दरेकर यांच्या नावाचाही
आवर्जून उल्लेख करावा लागेल. गरीब आणि गरिबी त्यांनी जवळून पाहिली आहे. पोलादपूर
तालुक्यातील कोतवाल हे दरेकरांचे गाव. वडील एसटी कंडक्टर, तर आई मासळी विक्रेती. प्रवीण
दरेकरांच्या राजकीय जीवनाची सुरुवात मुंबईतून झाली असली तरी त्यांचं दहावीपर्यंतचं
शालेय शिक्षण पोलादपुरातच झालं.घरात पैसे नसल्यानं शिक्षणासाठी पाच-पाच किलोमीटर चालत
जावं लागत असे,विद्यार्थी दशेपासून प्रवीण दरेकर यांचा राजकारणात वावर आहे. 1989 साली
मुंबई विद्यापीठातून पदवी संपादित केल्यानंतर त्यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरूवात
शिवसेनेतून केली. भारतीय विद्यार्थी सेनेचे राज्य सरचिटणीस होते. राज ठाकरेंचे निकटवर्तीय
म्हणून प्रवीण दरेकरांची ओळख होती. चबरोबर शिवसेनेतील
आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला
जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. 2009 साली मनसे पक्ष ज्यावेळी पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीला सामोरा गेला, त्यावेळी
प्रवीण दरेकर मुंबईतल्या मागाठाणे मतदारसंघातून विजयी झाले. २००९ ते १४ या कालावधीत
ते मनसेचे आमदार होते. 2016 मध्ये प्रवीण दरेकर भाजपतर्फे विधानपरिषदेत गेले. सर्वदूर महाराष्ट्रातील गोरगरिबांचे
प्रश्न अभ्यासू पद्धतीने सभागृहात मांडण्याची संधी ठरणारे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद
हे मानाच्या पदावर प्रवीण दरेकर विराजमान झाले. वैयक्तिक आयुष्यातील खाचखळगे पार करत
प्रवीण दरेकरांनी आधी मुंबईतील आणि आता राज्याच्या राजकारणात आपलं विशिष्ट स्थान निर्माण
केलंय. सध्या भाजपचे राज्य सचिव आहेत. आणि भाजपच्या सहकार विभागाचे प्रमुखही आहेत. मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. मुंबई जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त
सहकारी संस्थांची केंद्रीय वित्तीय संस्था असलेल्या मुंबै बँकेचे 2000 पासून दरेकर
हे संचालक होते, तर 2010 पासून अध्यक्ष आहेत.
मा संजीव धुमाळ -
पोलिस वा 'खाकी वर्दी' म्हंटल की धाक, रुबाब, अशी एक संकल्पना सामान्य नागरिकांच्या डोळ्यासमोर उभी राहते. खाकी वर्दीतील तापट स्वभावाचा, कडक शब्दांत बोलणारा, हेकेखोर, असंवेदनशील व्यक्ती अशीच प्रतिमा सर्वसामान्यांच्या मनात असल्यामुळे अनेकजण पोलिसांपुढे जाण्यास घाबरतात. पोलिस अधिकाऱ्याला कर्त्यव्यासाठी वेळप्रसंगी थोडे कठोर व्हावे लागत असले, तरी वर्दीतही अगोदर तो मनुष्य असतो. त्यालाही मन, भावना असतात. माणुसकीच्या नात्याने प्रसंगी मदत करतात, सल्ला देतात, पण कायद्याचे रक्षण करण्यासाठी आणि वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी त्यांना कठोर राहावं लागतं खाकी वर्दीतील देव माणूस हे वाक्य साजेल व पोलीस दलाची मान उंचावेल असे काम मा.संजीव धुमाळ साहेब करीत आहेत. धुमाळ साहेबांची पोलीस उप निरीक्षक म्हणुन १९९५ साली निवड झाल्यानंतर एक वर्ष नाशिक येथे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर सांताक्रुझ पोलीस ठाणे व त्यानंतर नवी मुंबई आयुक्तालयाच्या अंतर्गत वरीष्ठ पोलीस निरीक्षक म्हणुन वाशी, न्हावाशेवा आणि रबाळे येथे कर्तव्य बजावल्यानंतर सध्या वरीष्ठ पोलीस निरीक्षक म्हणुन खार पोलीस स्टेशन मुंबई येथे कार्यरत आहेत. अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना अनेक महत्वाच्या गुन्हयांची उकल करून अंडरवर्ल्डच्या अनेक गुन्हेगारांवर त्यांनी कारवाई केली आहे. पोलीस दलाच्या एकुण ३० वर्षाच्या कारकिर्दीत २५० पेक्षा अधिक पारितोषिके मिळाली आहेत. महाराष्ट्र नशीबवान आहे. प्रशासनात आजही संजीव धुमाळ साहेबांसारखे अनेक अधिकारी आहेत ज्यांचं माणूसपण सुटलेलं नाही. सामाजिक भावनेतून त्यांनी केलेल्या या कामाबद्दल जेव्हा विचारले जाते तेव्हा ते विनम्रपणे सांगतात की, मी फक्त माझं कर्तव्य करतो... वेगळं काहीच नाही. पोलिसांना जात नसते ना धर्म. लोकांचं रक्षण, त्यांच्या मदतीला धावणे हाच त्यांचा खरा धर्म असतो. अशा धडाडीच्या कामगिरीमुळे व उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर होऊन त्यांना नुकतेच गौरविले आहे. धुमाळ साहेब आपल्या पोलादपूरचे सुपुत्र आहेत, त्यांच्या या अमूल्य सेवाकार्याबद्दल आपण पोलादपूर तालुक्यातील सर्व समाजबांधव त्यांचा या स्नेहसंमेलनात आदरपूर्वक सत्कार करीत आहोत.
मा. स्वप्निल पांडुरंग चव्हाण
मुख्याधिकारी गुहागर. 2021 महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षा मधून राज्यातून 84 व्या क्रमांकाने पास. Mtech automotive from COLLEGE OF ENGINEERING PUNE मूळ गाव महाळुंगे तालुका पोलादपूर
मा. ओंकार मारुती कळंबे
इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत पोलादपूर येथे शिक्षण घेतले अकरावी आणि बारावी चाटे कॉलेज खेड शिवापुर या ठिकाणी. इयत्ता १० वी मध्ये ९५ टक्के तर बारावी मध्ये ७८ टक्के मार्क मिळवून उत्तीर्ण झाले होते. देशपातळीवर होणाऱ्या वैद्यकीय प्रवेशासाठीच्या नीट परीक्षेमध्ये 651 गुण प्राप्त त्यामुळे महाराष्ट्रातील टॉपच्या ग्रांट गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज जे जे हॉस्पिटलशी संलग्न या शासकीय वैद्यकीय कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला, पाच वर्षाचा एमबीबीएस चा अभ्यासक्रम पूर्ण करून आता जे जे हॉस्पिटलमध्ये इंटरशिप सुरू आहे .
मा. कुमार संग्राश निकम
वय वर्षे ७, पोलादपूर तालुक्यातील महालगूर नजीकच्या तामसडे वाडीतील. सागरी जलतरणपटू. एप्रिल महिन्यात अटलसेतू ते गेटवे ऑफ इंडिया हे अंतर त्याने ३ तास १७ मिनिटात पार केले. संग्राश निकम (७) याने अटल सेतूपासून गेटवे ऑफ इंडिया या दरम्यान १७ किमी सागरी जलतरण करण्याचा संकल्प केला होता. ही मोहीम त्याने शुक्रवार १८ एप्रिल रोजी तीन तास ११ मिनिटांत फत्ते केली. १८ एप्रिल रोजी पहाटे ३:४५ वाजता, अंगाला ग्रीस लावून आणि समुद्राची पूजा करून संग्राशने अटल सेतूपासून पोहायला सुरुवात केली. अरबी समुद्रात चंद्रप्रकाशाच्या उजेडात त्याने सूर मारला. महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेचे निरीक्षक हिरेन रणपुरा यांच्या देखरेखीखाली त्याचे पोहणे सुरू होते. समुद्रातील वाढते प्रदूषण, भरती-ओहोटीचा प्रभाव, मोठमोठ्या बोटींमुळे निर्माण होणाऱ्या लाटा, तसेच गेटवे ऑफ इंडिया जवळील पाण्यावरचा तेलाचा थर, या सगळ्यांमुळे त्याला त्रास झाला. उलटीसारखे वाटणे, तोंडात खारट पाणी जाणे, आणि प्रवाहाच्या विरुद्ध पोहावे लागणे यामुळे परिस्थिती अधिक कठीण झाली. अंधार असल्यामुळे दूरपर्यंत काही दिसत नव्हते. तरीसुद्धा, संग्राशने जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर एकही मिनिट विश्रांती न घेता सलग पोहत राहिला. सकाळी ६:५६वाजता तो गेटवे ऑफ इंडिया येथे पोहोचला. म्हणजेच, त्याने १७ किलोमीटरचे अंतर तीन तास ११ मिनिटांत यशस्वीरित्या पूर्ण केले.केवळ तीन महिन्यांपूर्वी संग्राशचे आई-वडील त्याला पोहायला शिकण्यासाठी यश जिमखानामध्ये घेऊन आले होते. केवळ आठ दिवसांत त्याने पोहायला शिकून घेतले. तो इतर मुलांचे सराव बघत असे आणि म्हणायचा, “सर, मला पण समुद्रात जायचंय, स्पर्धेत भाग घ्यायचाय. यानंतर त्याला अॅडव्हान्स कोचिंग सुरू करण्यात आले. एक महिन्यानंतर त्याला उरण येथे संतोष पाटील यांच्याकडे दोन वेळा समुद्रात सरावासाठी नेण्यात आले. तेथे त्याने चांगला सराव केला. सध्या तो प्रशिक्षक विलास माने आणि रवी नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहण्याचे धडे घेत आहे.
मा. नेहा विलास शिरावले (रानवडी)
पोलादपूर तालुक्यातील रानवडी हे नेहाचे गाव. सध्या मुंबईतील वरळी येथे वास्तव्यास. Homoeopathy. Maharashtra council of homoeopathya Mumbai येथे BHMS ही पदवी प्राप्त केली.
मा. निलेश मारुती जाधव
पोलादपूर तालुक्यातील ओंबळी या वागचे सुपुत्र. नुकतीच त्यांनी B.A.L.L.B Mumbai ही परीक्षा पास करून ही पदवी वकिलीची सनद प्राप्त केली आहे.
मा. दुर्गमहर्षी आप्पा परब
आप्पा परब हा गडकिल्ल्यांचा चालता-बोलता इतिहास आहे. आपले अवघे आयुष्यच आप्पांनी गड
- किल्ल्यांवरील संदर्भ संशोधनासाठी झोकून दिले आहे. अवतीभोवतीची परिस्थिती कितीही
चंगळवादी होऊ दे आपण आपले अंगीकारलेले व्रत व्रतस्थपणे कसोशीने पाळायचे हा खाक्या आप्पांनी
आयुष्यभर जपला. ते करण्यासाठी जे काही करायचे ते प्रसंगी अपमान सोसून आप्पांनी केले.
त्यांनी अक्षरशः हजारो लोकांना गडकिल्ले दाखवले पण ते करण्यासाठी त्यांनी कधी एक छदामही
कोणाकडून घेतला नाही. 'जे किल्ले मावळ्यांनी तानाजी - बाजी - येसाजी यांनी प्रसंगी
रक्त सांडून राखले तो माझ्या पूर्वजांचा वारसा लिहिण्यासाठी, दाखवण्यासाठी, सांगण्यासाठी
मला पैशाची गरज नाही.' हा विचार आप्पा नेहमी जपत आले व त्या बरहुकूम ते वागत आले.
'माझा धर्म इतिहास, माझे दैवत शिवराय. माझी जात गडकिल्ल्यांची. त्या थोर युगपुरुषाने
कधी जातीभेद मानला नाही, तर मग मी का मानू ?' हा उच्च विचार आप्पांनी आपल्या उरात कोरून
ठेवला आहे. आप्पांचा यामागील स्वार्थ एकच, आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाच्या यशोगाथा,
त्यांचे कार्यकर्तृत्व भावीपिढीला योग्यरितीने समजावे. प्रतिकूल परिस्थितीतही शिवरायांनी
व त्यांच्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी केलेला असीम त्याग येणाऱ्या पिढीला आकलन व्हावा
यासाठी अपार काबाडकष्ट घेऊन आप्पा ही उरफोड करीत आहेत. दादरच्या आपल्या चाळीतल्या घरी
आप्पा क्वचितच असतील पण रायगड, राजगड, सिंहगड अशा कुठल्यातरी गडावर मात्र ते नक्कीच
सापडतील. कदाचित तोच त्यांचा खरा पत्ता असावा. इतकी अफाट मुशाफिरी करणारे आप्पा तसे
प्रसिद्धीच्या बाबतीत मात्र शेकडो मैल दूर आहेत.आप्पांचा जन्म कोकणात गरीब कुटुंबात
झाला असला आणि उदरनिर्वाहासाठी त्यांनी कोहिनुर मिलमध्ये काम केले आप्पा परब
हे वास्तविक प्रसिद्धि-पराड.मुख व्यक्तिमत्त्व आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील शिवप्रेमींनी
त्यांच्या कार्याची स्तुती केली. आप्पांनी वर्तमानपत्रातून लेखन केले नाही. परंतु छत्रपती
शिवाजी महाराजांच्या समग्र कारकिर्दीचा बारकाईने अभ्यास करीत सिद्धहस्त लेखणीने मराठी
भाषेत ४० हून अधिक लेखन केलेली त्यांची ग्रंथसंपदा उपलब्ध आहे.
काही माणसं इतिहास वाचतात
काही माणसं इतिहास लिहितात
काही माणसं इतिहास जगतात !!
आप्पा यातले तिसरे
इतिहास जगणारे आणि जागवणारे जागले
एखाद्या गोष्टीशी इतकं एकरूप होता यायलं हवं
आप्पा होता यायला हवं !!!
चतुरंग सन्मान पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ इतिहास
संशोधक दुर्गमहर्षी मा. आप्पासाहेब परब यांना मानाचा मुजरा!!
प्रल्हाद जाधव हे पोलादपूरचे. लहानपणापासून
तालुक्यातील आजूबाजूचे डोंगर, नद्या त्यांना खुणावत असत. सावित्रीच्या डोहात जसे ते
डुंबत असत. तसेच आडवाटेवरच्या अनेक डोंगरात त्यांनी पायपीट भटकंती केली आहे.
राज्यशासनाच्या नोकरीत अनेक वेगवेगळ्या ठिकाणी पदभार सांभाळल्यानंतर प्रल्हाद जाधव
माहिती व जनसंपर्क खात्याचे संचालक म्हणून निवृत्त झाले आहेत. ३० वर्षे शासकीय नोकरीत
असताना शासनासाठी अनेक गाणी, जाहिराती, जिंगल्स, माहितीपट त्यांनी लिहिल्या आहेत. प्रल्हाद
जाधव आपल्या भिडस्त आणि संकोची स्वभावामुळे आपल्या लेखनाविषयी कधी कुठे फार काही बोलताना
दिसत नाहीत, ते फक्त एवढेच म्हणतात, 'माझे काम मी करीत आहे आणि पुढेही करीत राहणार
आहे. प्रल्हाद जाधव यांनी आजपर्यंत किमान १६ नाटके आणि तितक्याच एकांकिका
लिहिल्या असून त्यांचे सर्वत्र प्रयोग होत असतात. शेक्सपिअर गेला उडत, विठू माझा लेकुरवाळा,
हिरण्यगर्भ, शेवंता जित्ती हाय, एक कप चहासाठी, टाजदंड, या भुतांनो या। यमक, भूमिका,
चेटूक, लेडीज सायकल, दोन घडीचा डाव, डोन्ट वरी बी हॅपी। तर एकांकिका : कुलकणीं व्हर्सेस
देशपांडे, कृष्णाजी केशव, (मुंबई विद्यापीठात एस. वाय.ची.ए.च्या अभ्यासक्रमात समाविष्ट
आहे. पाचूचे बेट, चिमूटभर अधाराचा स्वामी, आचार्य देवो भव, गेला मोहन कुणीकडे ?, ऑपरेशन
दगड, पक्षी जाय दिगंतटा, हरवले ते गवसले का?, युद्धविलाप, मरणगंध इत्यादी. 'कृष्णाजी
केशव' ही त्यांची एकांकिका मुंबई एकांकिकांच्या लेखनासाठी खाजगी संस्थांची आणि शासनाची
इतकी पारितोषिके मिळाली आहेत की त्याचे रेकॉर्डही त्यांनी ठेवले नाही. त्यांचे चाहते
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरलेले आहेत असे सांगितले तर त्यावर अनेकांचा विश्वास
बसणार नाही.महाराष्ट्र शासनातून माहिती संचालक म्हणून निवृत्त झालेले प्रल्हाद जाधव
यांना लेखक आणि नाटककार म्हणूनही ओळखले जातात. विशेषतः दरवर्षी होणाऱ्या महाराष्ट्र
राज्य नाट्य स्पर्धेत कुठे ना कुठे त्यांची नाटके हमखास होत असतात. रानभूल,
तांबट, आनंद नक्षत्र, प्रसिद्धी आणि प्रतिमा, आनंदाची मुळाक्षरे, हिमाक्षरे अशी
त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. पोलादपूरच्या नद्यांतील साधर्म्य वर्णन असलेल्या
"पाण्यातले दिवस" या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट ललित गद्याचा
पुरस्कार लाभला आहे. 'पाझर' नावाची संपूर्ण लांबीची एक चित्रपट कथाही त्यांनी या काळात
लिहिली असून त्या अनुषगाने पुढे काय करता येईल या प्रयत्नात ते आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा