पोलादपूर तालुक्यातील इतिहास पुत्रांनो संघटीत व्हा !
जगभर नावलौकिक प्राप्त झालेल्या, स्वराज्याचे दुसरे छत्रपती शिवपुत्र श्रीमंत संभाजी महाराज यांच्या पराक्रमाचे, शौर्याचे आणि स्वराज्य रक्षणाच्या अभिमानाचे दर्शन घडवणारा ऐतिहासिक चित्रपट म्हणजे 'छावा'! त्याचे दिग्दर्शक श्री. लक्ष्मण उतेकर यांचा भव्य सत्कार चित्रनगरीचे माहेरघर असलेल्या मुंबई शहरात व्हावा अशी भावना पोलादपूर तालुक्यातील शेकडो मुंबई - ठाणेकरांकडून व्यक्त झाल्यानंतर श्री. सुभाषजी पवार, श्री. बाजीराव मालुसरे आणि श्री. किशोरजी जाधव यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. मूर्त विचाराला पूर्ण स्वरूप देण्यासाठी काही दिवसांपूर्वी तातडीने दादरमध्ये प्राथमिक बैठक झाली. आणि काल ३१ मे २०२५ ला संध्याकाळी १५ जून रोजी होणाऱ्या जवेरबेन हॉल मधील कार्यक्रमाच्या पूर्वतयारीची पत्रक काढून घाटकोपरला मिटिंग झाली. सभेला उपस्थित असलेले समाजातले कार्यकर्ते, त्यांनी व्यक्त केलेला विचार, त्या विचारामागची भावना... भविष्यात आपल्या अस्तित्वासाठी काही नवे घडावे यासाठी आम्ही स्वतः हून तयार आहोत असा दाखवणारा त्यांचा उत्साह..... मला खुप काही सांगून गेला.
आपला.... पूर्वजांचा इतिहास तेजस्वी आहे. पूर्वजांच्या रक्ताचा, स्वाभिमानाचा, शौर्याचा, निष्ठेचा आणि शहाणपणाचा वारसाहक्क आपल्याकडे आहे. त्यांचा इतिहास जर आपण असेच विसरत चाललो तर वर्तमानकाळापेक्षाही आपला भविष्यकाळ काजळलेला दिसेल हे सांगायला नको...अर्थात आपल्या पोलादपूरच्या ग्रामीण भागात भौगोलिक आणि सामाजिक स्थित्यतरांच्या घडामोडी ज्या वेगाने घडताहेत याची वेदनाच एकप्रकारे या मिटिंगमध्ये कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत होती.
भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव |
याचा अर्थ जमीन म्हणजे भूमी अतिशय दृढ असते. पण तिच्या हृदयात जे मार्दव ( प्रेमळ भाव) ते जमिनीतून येणाऱ्या कोंबाच्या द्वारे कळते. कोंब किती नाजूक असतो. त्या कोंबाची लवलव किती तरल. तो कोंब जमिनीतून वर येणे ही तशी अशक्य गोष्ट. पण भूमी ही आई आहे. तिला कोंबाची वेदना कळते आणि ती अलगदपणे जमिनीत गाडलेल्या कोंबाला सूर्य प्रकाशात आणते. असे भूमीचे मार्दव आहे, असे ज्ञानेश्वर महाराज सांगतात. त्या संध्याकाळी जमलेल्या सर्व कोभांची तळमळ अंतर्मुख होऊन हेच सांगत होती.
मुंबईतील पोलादपूर वासियांचा गेल्या १९३० पासूनचा इतिहास माझ्याकडे पुराव्यासह उपलब्ध आहे. तालुक्याचा स्नेहबंध जपत विकासाची भाषा करण्यासाठी मुंबईत गेल्या १०० वर्षात ३ संस्था जन्माला आल्या आणि काळाच्या ओघात संपल्या. त्या संस्थांच्या माध्यमातून तालुक्यासाठी नेते आणि वेगवेगळ्या भागात समाजासाठी कार्यकर्ते निर्माण झाले. त्यांनी सामाजिक बैठक सांभाळण्याचा आणि ग्रामीण भागाचा विकास व्हावा यासाठी आपल्यापरीने शक्य होईल असा प्रयत्न केला आहे. परंतु ?
परंतु काय तर पुन्हा तेच वाक्य लिहितो "सामाजिक बैठक सांभाळण्याचा आणि ग्रामीण भागाचा विकास व्हावा" ही भाषा बोलणारे एकही सार्वजनिक व्यासपीठ गेल्या दोन दशकात मुंबईत मात्र पुन्हा निर्माण होऊ शकले नाही. ते पुण्यात आहे अन दुसऱ्या राज्यातील बडोद्यात आहे. परंतु मुंबईत नाही ही खरी वस्तुस्थिती आहे. १९८५ पासून मी पत्रकारितेच्या माध्यमातून लिहायला सुरुवात केल्यानंतर १९९५ मध्ये मी "पोलादपूर अस्मिता" पाक्षिक सुरु केले. तेव्हा शुभारंभाच्या अंकाचे संपादकीय लिहिताना मी म्हटले होते.....
अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्यावर
जागी होते अस्मिता अन्
पेटून उठतो माणूस संघर्षासाठी
तुम्ही म्हणाल प्रश्न संघर्षाने सुटत नाहीत.
ठाऊक आहे आम्हाला
संघर्ष उध्वस्त करतो
माणसातल्या माणूसपणाला.
आमचा संघर्ष नाही माणसाविरुद्ध
आमचा संघर्ष आहे माणूसपणासाठी
करावाच लागेल संघर्ष आम्हाला
तालुक्याच्या न्याय हक्कासाठी
बंधूनो, मात्र गेल्या २० वर्षात बरेच नव्हे तर सर्वच काही चांगले घडले आहे. वाट्याला गरिबी आणि संघर्ष असूनही सर्वच क्षेत्रात अनेकजण मोठे झाले आहेत. सर्वात मोठे उदाहरण म्हणजे लक्ष्मण उतेकर. तर राजकीय क्षेत्रात मा. भरतशेठ गोगावले चार वेळा आमदार आणि सध्या कॅबिनेट मंत्री झाले आहेत. पोलादपूरचे सुपुत्र मा. प्रवीणभाऊ दरेकर हे आमदार व त्यानंतर विरोधी पक्षनेते झाले आहेत. मंगेश कुडाळकर हे आणखी एक सुपुत्र आमदार झाले आहेत. एकेकाळी शाखाप्रमुख होणे फार मोठे मानाचे होते, आज अनेक पक्षात शेकडो शाखाप्रमुख, वॉर्ड अध्यक्ष आणि त्याच्याही वरच्या मानाच्या पदावर कर्तृत्वाने विराजमान आहेत.
उद्योग सुरु करून स्वकष्टाच्या कमाईवर हजारो मोठे उद्योजक निर्माण झाले आहेत. ४० वर्षांपूर्वी आपणच निर्माण केलेल्या विनाअनुदानित हायस्कुलमधून शिक्षण घेतलेले हजारो जण उच्च विद्याविभुषित होऊन एकतर नोकरीच्या मोठया पदावर किंवा परदेशात आहेत. फक्त शिक्षण घेण्यासाठी परदेशात असणारी संख्या हजारावर आहे. धार्मिक क्षेत्रात, कलाक्षेत्रात, साहित्यात, पत्रकारितेत, क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळवणाऱ्यांची संख्याही फार मोठी आहे. ग्रामीण भाषेचा लहेजा सांभाळत ल आणि ळ किंवा न आणि ण बोलण्यात चुकणाऱ्यांची मुले- नातवंडे फाड फाड इंग्रजी बोलत आहेत. एकंदर जागतिक बदलाचे वारे आपणा पोलादपूरकरांच्या वाट्यालाही आले आहेत. तरीही समाजात फिरणारा आणि गावागावात नेतृत्व करणारा समाज बांधव समाधानी नाही, तो आंतरीक ओढीने सामाजिक बांधिलकीची भाषा बोलतो आहे, तेव्हा त्याचे मनापासून स्वागत होणे गरजेचे आहे. खरं तर पोलादपूर तालुक्याला सामाजिक न्यायाची आणि वारकरी सांप्रदायाची उज्वल परंपरा लाभलेली आहे. "बहुत लोक मेळवावे। एक विचार भरावे ।।" या उक्तीनुसार आणि बैठकीत व्यक्त केलेल्या मंतरलेल्या मनाने कार्यरत राहू इच्छिणारे समविचारी सुजाण नागरिकांनी (राजकीय जोडे घरी ठेवून) एकत्र येत असतील, सामाजिक जाणिवेने प्रेरित होवून एकत्र येऊन जर संघटना स्थापन करणार असतील तर विषमता तर मिटेलच परंतु बहुजन समाजातील अनेकांना ती एक आधार होईल याविषयी शंका नाही.
कोणत्याही क्षेत्रात नवीन संघटना स्थापन झाली की, सर्वप्रथम तिची उपेक्षा केली जाते, दखल घेतली जात नाही. काही दिवसानंतर उपहास केला जातो. कार्यकर्ते जर एका ध्येयाने प्रेरित असतील तर संघर्ष करतात व या परिस्थितीतही संघटना टिकून राहिली तर तिचे काम पाहूनच खडतर तपानंतर लोक त्यांच्याशी समन्वय साधतात हे कोणत्याही संघटनेसाठी पुर्वसूत्र आहे.
दि. ७.२.९९ रोजी "पोलादपूर तालुका युवक संघटनेची" स्थापना झाली होती. पक्षभेद पंथभेद विसरून संघटना स्थापनेच्या सूत्रधारापैकी मी एक होतो. काळाची गरज असूनही हे गुटगुटीत बाळसे धरलेले अपत्य मोठे होऊ शकले नाही. मात्र या संघटनेच्या वाढीसाठी ज्यांनी परिश्रम केले ते आज समाजात नावारूपाला आले आहेत. ही संघटना स्थापन झाली तेव्हा त्यावेळच्या पोलादपूर अस्मिताच्या अंकात संपादकीय लिहिताना मी अग्रलेखाचा मथळा दिला होता " इतिहास पुत्रांनो जीवनव्रत्ती व्हा "
आज गाव आणि वाड्यावस्तींची परिस्थिती पाहिल्यानंतर पुन्हा म्हणावेसे वाटतेय आणि हा मथळा कदाचित तुमच्या सर्वांचाच असावा " इतिहास पुत्रांनो आता संघटीत व्हा "
=================
डिसेंबर २०२५ ला मिटिंग झाली... २७ वर्षांपूर्वी मी डिसेंबर १९९८ च्या अंकासाठी " इतिहास पुत्रांनो जीवनव्रत्ती व्हा " हा अग्रलेख लिहिला होता, तो जे लिहिले होते ते तुम्हाला वाचण्यासाठी पुन्हा देत आहे.
शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली तेव्हा ते मार्मिक मध्ये एक सदर लिहीत "वाचा आणि थंड बसा"
बंधूनो तुम्ही याच्या उलट कराल अशी खात्री वाटतेय... धन्यवाद!
=====================
पोलादपूर तालुक्यातील इतिहास पुत्रांनो संघटीत व्हा !
पोलादपूर तालुक्यातील काही युवकांनी तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीकोनातून मुंबईमध्ये एकत्र येऊन युवा कार्यकर्त्यांची एक संघटना असावी असा प्रयत्न केला आणि अल्पावधीतच त्यांना यश आले.
शुभारंभाच्या नारळ फोडण्याच्या प्रसंगाला हजर राहण्याची संधी त्यानिमित्ताने गेल्या १५ दिवसापूर्वी मिळाली. तालुक्यातील अनेक गावातील सुशिक्षित, प्रगल्भ नवविचारांचे युवक ज्यांना तालुक्यातील पारंपारीक संस्कृतिचे भानही आहे आणि मनात मुंबईसारख्या ठिकाणी एखादी संघटना नसल्याची खंतही आहे. असे बरेच जण त्याठिकाणी दिसले या तरूणांच्या विचाराला समाजात सामाजिक पत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि असंख्य तालुकावासियांनी जर योग्य दिशा दिली तर काही वर्षानंतर ही संघटना सर्वांना एक आधार वाटेल, तरूणांना मार्गदर्शन करण्याचे आमचे वय जरी नसले तरी पोलादपूर अस्मिताने पहिल्या अंकातच तालुक्यातील जनसामान्यांसमोर हीच मागणी केली होती. या तरूणांची वाटचाल खडतर आहे हे सर्वांनाच माहित आहे. आमच्या परिने पथदर्शक होण्याचा हा प्रयत्न.
एका विशिष्ट ध्येयाचा प्रसार करण्यासाठी एकत्र आलेले लोक म्हणजे संघटना. एकाच ध्येयाने हे सगळे लोक भारावलेले असले, तरी त्यापैकी प्रत्येकाचं काही स्वभाववैशिष्ट्य असतं, गुण-दोष असतात. पण तरीही त्या सर्वांना एकत्र यावचं लागतं. हे सर्व विचारात घेऊनच संघटनेला पुढे जावे लागते. अशा परिस्थितीत छोटया-मोठ्या संघटनांमध्ये असे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडतात. मधुनच एखादा विसंवादी सूर उमटतो, पण तो वेळीच आणि कौशल्याने टाळला पाहिजे.
संघटना ही एक जिवंत गोष्ट आहे आणि ज्या प्रमाणात पोषक, पूरक वातावरण असेल त्या प्रमाणात ती वाढते. एखादा उदात्त विचार हा अशा संघटनेचा केंद्रबिंदू असू शकतो. उदात्त विचार हा प्रथम एखाद्या व्यक्तीच्या मनात उद्भवतो आणि या विचाराला मूर्त स्वरूप देण्यासाठी ती व्यक्ती झटते. अशी व्यक्ती समविचारी लोक गोळा करते आणि मग आपल्या विचाराच्या पूर्तीसाठी ते सर्वजण एकत्रितपणे काम करतात. समविचारी लोकांची संख्या जितकी अधिक असते तितकी उद्दिष्टपूर्तीची शक्यता वाढते. नैतिक मूल्यांवर पूर्ण श्रद्धा असणारे बुद्धीमान लोक जसजसे वाढतात तसतसा संघटनेच्या प्रगतीचा वेगही वाढतो. पण संघटनेला गरज असते माणसांची; अन् तीही अशा माणसांची की, जे स्वतःच्या व्यक्तीगत स्वार्थाला पूर्ण तिलांजली देऊन ध्येयासाठी जीवन समर्पित करू इच्छितात. जो विचार आपल्याला भारावून सोडतो, आचरणात आणल्याविना स्वस्थ बसू देत नाही असा विचार आपण इतरांनाही सांगतो. लोक मोकळ्या मनाचे असतील तर त्यांच्याकडून लगेच प्रतिसाद मिळतो. तेही त्या विचारानं प्रभावित होतात. काहींना मात्र दिर्घकाल चर्चा करून, संवाद साधून, बैठका करून ते विचार पटवावे लागतात आणि मगच त्या विचारांच आचरण त्यांच्याकडून होऊ लागतं. आणि अशा प्रकारचे हे सर्व लोक एकाच ध्येयासाठी वाट चाल करू लागतात त्या ध्येयासाठी त्यांच्याकडून जेवढे म्हणून काही करणं शक्य असेल ते करण्यास पुढे येतील, प्रत्यक्ष करण्याजोगे असे निश्चित काहीतरी काम त्यांना हवं असेल, अशा वेळेस त्यांच्यापैकी प्रत्येकाला त्याची कुवत, आवड आणि परिस्थिती लक्षात घेऊन त्यानुसार काम द्यावं लागेल. आपण फार मोठ्या कामात सहयोग देत आहोत आणि आपलाही काही उपयोग होत आहे. अशी भावना त्यांच्या मनात जागली पाहिजे. संघटनेमध्ये अनेक सभासद असतात आणि विविध प्रकारचे असतात. अर्थातच अशा लोकांना एकत्र आणण्याचं एक विशिष्ट तंत्र असतं. लोकांचा नुसताच भरणा संघटनेच्या प्रगतीच्या दृष्टीने हितकारक असतो, संघटनेत येणारा प्रत्येक माणूस सर्वार्थाने लायक म्हणजे शारीरिकदृष्टया सुदृढ, बुद्धीने चलाख असला पाहिजे आपलं तन-मन-धन त्यानं संघटनेकरिताच वाहिलं पाहिजे, आल्या प्रसंगाला तोंड देण्याची मानसिक ताकद त्याच्यात हवी आणि वेळ पडलीच तर काही धनही संघटनेला अर्पण करण्याची उदार वृत्तीही त्याच्यात पाहिजे. थोडक्यात, संघटनेसाठी सर्वस्व अर्पण करण्याची त्याची सिद्धता हवी.
संघटनेच्या हितासाठी तिथलं वातावरण अनुकुल ठेवणं ही प्रत्येकाची वैयक्तिक आणि सामूहिक जबाबदारी असते. कोणत्याही नाजूक प्रसंगी आपला दृष्टीकोन विधायकच असेल असा आपला प्रयत्न हवा, प्रत्येक व्यक्ती सर्वांसाठी असते आणि सर्वजण तिच्यासाठी असतात. संघटनेत आपण असं वातावरण जोपासलं पाहिजे, अशी व्यवस्था निर्माण केली पाहिजे की, ज्यामुळे तिची भरभराट होईल. संघटनेतील सदस्यांचे आपापसांतील संबंध इतके जवळचे हवेत की, एखाद्याच्या हातून एखादी शुल्लक चूक घडली तर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. आपण हे लक्षात ठेवायला हवं की, आपण एका ध्येयाशी बांधले गेलो आहोत कोणा एका व्यक्तीशी नव्हे म्हणून व्यक्तिगत हितसंबंध वा गटबाजीला संघटनेत वाव मिळता कामा नये. संघटनेचं ध्येय श्रेष्ठ आहे आणि त्यासाठी संघटना सुरळीत चालणं ही प्राथमिक गरज आहे. ही गोष्ट सदैव ध्यानात ठेवली, तर आपापसांतले मतभेद, कुरबुरी मोकळ्या मनानं दूर होऊ शकतील.
संघटना भक्कम करण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांच्या सहाय्यानं एकूण वातावरण चांगले राहील आणि लोकांच्या मनातली संघटनेची प्रतिमा उजळ राहील याची दक्षता संघटकाला सदैव घ्यावी लागते. आपल्या कामाविषयी सहानुभुती, कौतुक असणाऱ्या हितचिंतकांना आपण एकत्र आणलं पाहिजे. मात्र, खऱ्या रचनात्मक कार्यात अशा ढिगानं मिळालेल्या सहानुभूतीचा काडीमात्रही उपयोग होत नाही हेही आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. त्यासाठी आवश्यकता असते ती सहकाऱ्यांनी आपला वेळ आणि शक्ती देऊन उत्साहाने काम करण्याची. तो कामाशी आणि संघटनेशी एकरूप झाला पाहिजे. संघटनांमध्ये अनेक कारणांमुळे अनेकांशी मतभेद असतात. ते फार वाढणार नाहीत लवकरात लवकर मिटतील हे संघटकाने पाहिलं पाहिजे, प्रत्येक कार्यकर्त्यानेही संघटनेत वातावरण कार्याला अनुकुल राहील हे पाहिलं पाहिजे, त्यासाठी काही पथ्य पाळली पाहिजेत.
नुकतच उगवलेलं एखादं रोपटं किंवा एखादे लहान मुल यांच्यामध्ये मोठे होण्याची, वाढीची प्रेरणा मुलभुत असतेच. मात्र या वाढीसाठी सभोवतालचं वातावरण अनुकुल असणं आवश्यक असतं. एखाद्या संघटनेच्या केंद्रस्थानी उदात्त विचार असतो आणि या विचाराच्या प्रसारासाठी किंवा संघटनेच्या वाढीसाठी योग्य ते वातावरण सभोवताली असावं लागतं वाढीची मुळातली प्रेरणा कितीही प्रबळ असली, तरी रोपटयाला जशी बाह्य परिस्थिती महत्वाची असते. तशीच संघटनेलाही तिच्या वाढीसाठी बाह्य परिस्थिती अनुकूल असणं महत्वाच असतं. संघटना ज्या एका विशिष्ट ध्येयासाठी उभी असते ते ध्येयच संघटनेला सामर्थ्य देतं. आणि या ध्येयामुळेच संघटनेची निकोप वाढ होते. मात्र बाह्य परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. परिस्थितीचे काही घटक अनुकूल तर काही हानीकारक असतात. या हानीकारक गोष्टीपैकी काही टाळता येणं सहज शक्य असतं. पण काही मात्र आपण टाळू शकत नाही. कुटुंबसंस्था आपल्या अगदी परिचयाची आहे. तिथंही आपल्याला गैरसमज आणि मतभिन्नता आढळते. भिन्न आवडी-निवडीमुळे व्यक्तीव्यक्तीत संघर्ष निर्माण होतो. हे स्वाभाविक आणि अपरिहार्य आहे. एकाच कुटुंबातील आणि एकाच रक्ताच्या लोकांबाबतही हे घडतं. मग ज्या ठिकाणी भिन्न-भिन्न कुटुंबातील, परिस्थितीतील विविध जाती-जमातीचे, विविध संस्कृतीचे, प्रांताचे, धर्माचे आणि राष्ट्रांचे लोक एकत्र येतात त्या संघटनांमध्ये मतभेद होतील हे उघडच आहे. अशावेळी शक्यतो संघर्ष टाळण्याची खबरदारी सर्वांनी घेतली पाहिजे, पण समज संघर्ष उद्भभवलाच तर तो चिघळणार नाही, उलट लवकरात लवकर मिटेल याचीही त्यांनी खबरदारी घेतली पाहिजे, एखाद्या कुरबुरीच्या छोटयाशा ठिणगीतून वणवा पेटणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. संघटनेच्या प्रत्येक सदस्याचे हे कर्तव्य आहे. आपापसांतील मतभेदांची कार्यकर्त्यांना जाणीव असायला हवी. क्षुल्लक संशय, गाऱ्हाणी असतील तर ती ताबडतोब संघटनेतल्या वरिष्ठांच्या कानावर घातली पाहिजे. अशा गोष्टी आजूबाजूला पसरण हिताचं नाही. त्या थेट वरच्या कार्यकर्त्याकडे गेल्या पाहिजेत चांगल्या गोष्टी, उत्साहवर्धक घटना या आजूबाजूच्या कार्यकर्त्यांना सांगाव्यात. त्यात त्यांना सहभागी करून घ्यावं, त्यातून त्यांचाही उत्साह दुणावेल. पण एखादी तक्रार, अन्यायाची दाद ही मात्र संघटनेच्या प्रमुखाकडेच मागावी. अन्यायाची वा तक्रारीची दखल घेऊन तिचं निराकरण करण्यास तीच सर्वात योग्य व्यक्ती असते. शरिरातील सर्व रक्त जसं हृदयाकडूनशुद्ध केलं जातं त्याचप्रमाणे संघटनेचा प्रमुख संघटनेतल्या सर्व तक्रारी संशय यांच निराकरण करतो. त्यामुळे संघटनेचं कार्य सुरळीतपणे चालू शकतं. एखाद्या व्यक्तीच्या हातून चूक झाली, तर प्रथम त्या व्यक्तीशीच त्याबद्दल चर्चा करणं हे सर्वात चांगले. पण ते शक्य नसेल तर त्याबाबत प्रमुखाशीच बोलणं उचित, मात्र कोणत्याही परिस्थितीत आपापसांत चर्चा करीत बसू नये कारण अशा चर्चेत एखाद्यावेळी एखाद्या व्यक्तीची उगीचच निंदानालस्ती होण्याचा संभव असतो. आपले गैरसमज आणि पूर्वग्रह यांमुळे कोणतीही व्यक्ती प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे दुखावली जाऊ नये.
अशा कार्यात कधीकधी असंही घडण्याचा संभव असती की, उत्साहाच्या भरात लोक छोटयामोठ्या कामाची जबाबदारी उचलतात, पण त्यासाठी आवश्यक ते कौशल्य त्यांच्याजवळ नसतं. किंवा ते पार पाडण्याचं तंत्र त्यांना अवगत नसतं. आणि मग साहजिकच काही चुका होतात किंवा त्रुटी राहतात. हे टाळण्यासाठी योग्य ती काळजी घेऊन परिस्थिती नीट हाताळली पाहिजे. त्याचबरोबर कोणीही दुखावलं जाणार नाही याचीही काळजी घ्यायला हवी. आणि म्हणून संघटनेची एकूण उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेऊन येणाऱ्या कार्यकर्त्यांना योग्य ते प्रशिक्षण देणं आवश्यक ठरतं. तुम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध ठेवू नका. त्यांच्या मोर्चात, मतभेदांमध्ये किंवा टीकेत सहभागी होऊ नका असं झालं तरच तुम्ही एक चांगला कार्यकर्ता होऊ शकाल. आपल्या मनात कुणाबद्दलही अढी किंवा दुराग्रह असू नये. सर्वप्रकारचे विचार आपल्याला स्विकारता आले पाहिजेत. आपण सर्वांचे-अगदी दुष्ट लोकांचे सुद्धा मित्र असण्याची गरज आहे. लोक एकत्र येऊन नुसत्याच गप्पा मारत, निंदानालस्ती करतात, अफवा पसरवतात आणि यातून हलकी प्रसिद्धी मिळवू पाहतात. तुम्ही मात्र या गोष्टीपासून अलिप्त राहिलं पाहिजे, अन्यथा एक दिवस लोक तुम्हालाही वाळीत टाकतील. तुमच्या जिभेवर ताबा ठेवा, त्याचे सुपरिणाम तुम्हाला भविष्यात दिसू लागतील.
कुणालाही कार्यकर्ता म्हणून 'तयार' करू नका. असे कार्यकर्ते वाळूच्या किल्ल्यासारखे केव्हाही कोसळतील. जोवर तुम्ही काम करीत आहात आणि जोवर त्यांना मानसन्मान मिळत आहे तोवरच ते काम करतील. लोकांना नुसतंच एकत्र करून कधी संघटना उभी राहात नाही, त्यांना प्रशिक्षण देणं आणि नंतर अशा प्रशिक्षित कार्यकर्त्यांना योग्य त्या कामासाठी नियुक्त करणं. हे ही तितकंच आवश्यक असतं, हे सगळे करण्यासाठी संघटकाजवळ काही कौशल्य असली पाहिजेत, लोकांमधला उत्साह जागवण्याची, त्यांना कार्याकडे आकृष्ट करण्याची क्षमता कार्यकर्त्यात असली पाहिजे. एखाद्याजवळ कदाचित बुद्धी असेल, कार्याची तळमळही असेल, पण लोकांना आकर्षिक करून घेण्याची शक्ती जर त्याच्याकडे नसेल, तर काम वाढणार नाही. कामासाठी कार्यकर्ते उभे करण्याचंसुद्धा एक तंत्र आहे. आपलं योग्य वर्तन आणि माणसं जोडण्याची कला यातूनच ते साध्य होऊ शकेल. काहीही करून लोकांनी आपल्या संघटनेसाठी काम करावं यासाठी आपण त्यांना मुर्ख बनवू नये. अशा दुबळ्या माणसांचा संघटनेला खऱ्या अर्थानं काही उपयोगही होत नसतो! अशा लोकांच्या दुबळेपणाचा लाभ तर उठवू नकाच, उलट तो दुबळेपणा दूर करण्याचा प्रयत्न करा. मग कार्यकर्ते जमवायचे कसे? आपण हे नेहमीच लक्षात ठेवले पाहिजे की, कार्यकर्ता हा तयार करता येत नाही, तर तो केवळ शोधून काढावा लागतो. असे सुप्त कार्यकर्ते समाजात असतातच. त्यांच्यातली ही भावना जागी करण्याचीच काय ती कमी असते. सोनं किंवा खनिज तेल तयार करता येत नाही, निर्माण करता येत नाही. ते निसर्गात असतंच. आपण केवळ शोधून काढतो. चांगल काम करण्याची त्यांची क्षमता प्रत्यक्ष कार्यात कशी रूपांतरीत होईल हे आपण पाहिलं पाहिजे. अथक शोधनातूनच निःस्वार्थी आणि तळमळीच्या कार्यकर्त्यांचा संच उभा राहू शकतो.
आपण सूर्याजी की मावळे?
मराठ्यांच्या इतिहासात कोंढाण्याची लढाई अविस्मरणिय ठरली आहे. उदयभानूशी लढताना सुभेदार तानाजीचा देह धारातीर्थी पडल्यावर सारे मावळे भितीने पळ काढू लागले. अशावेळी आवेशानं उभा राहिला तो सूर्याजी ! ज्या दोराच्या सहाय्यानं मावळे गड चढले होते तो दोरच त्यानं कापून टाकला. आणि तो त्वेषाने मावळ्यांना म्हणाला, "खबरदार! परतीचे सारे रस्ते मी आता बंद करून टाकले आहेत. जे मेल्या आईच दूध प्याले असतील, त्या भ्याडांनी सरळ दरीत उड्या टाकाव्यात. आपल्यापुढे एकच मार्ग आहे : लढण्याचा आणि जिंकण्याचा !" सुभेदार सूर्याजीच्या या आवेशपूर्ण आव्हानामध्ये उत्साह आणि प्रेरणा निर्माण करण्यासाठी आपल्यालाही कुणा सूर्याजीची गरज आहे की, आपण स्वतः च सूर्याजी बनणार आहोत ? समजाला जेव्हा निराशा ग्रासून टाकते आणि संकटे जेव्हा चालून येतात तेव्हा सूर्याजींची नितांत आवश्यकता असते. 'माझ्या प्रतिज्ञापूर्तीसाठी मलाच पाय रोवून खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे, धैर्यानं लढल पाहिजे. कोणतीही संकट मला भिववू शकणार नाहीत. सहाय्यासाठी मी कुणावर अवलंबून राहणार नाही - ना मला कुणाकडून शक्ती उसनी घ्यावी लागेल!' असा विचार आपण केला पाहिजे. संकट नेहमीच येत राहणार, त्यामुळे आपण विचलित होण्याचं, गोंधळून जाण्याचं काहीच कारण नाही. निराशेचा आपल्याला स्पर्श होता कामा नये. या स्थितीला आपण जितक्या लवकर पोहोचू तितकं चांगलं ! आज समाजाला आवश्यकता आहे ती योग्य अशा नेतृत्वाची आणि हे नेतृत्व स्वयंप्रेरितच असलं पाहिजे. समाजाला परिवर्तनाच्या दिशेन नेण्यासाठी आपण या कार्यक्षेत्रात आलो आहोत. समाजाचा-गर्दीचा एक भाग बनून आपण हरवून जाता काम नये. उलट आपणच त्याला दिशा द्यायला हवी. आपल्या हृदयातल्या ध्येयाच्या धगधगत्या मशालीनं आपण इतरांच्या हृदयातील मशाली प्रज्वलित करूया. आणि हे होईलच कारण आपण सारे या तालुक्याचे भूमिपुत्र जीवनव्रती आहोत !
रवींद्र मालुसरे
अध्यक्ष,मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई ९३२३११७७०४
रवींद्र जी छान विषय मांडला आहे
उत्तर द्याहटवाआपण पोलादपूर वासी एकत्रित येवू
सामाजिक भावनेने एकत्र आलो पाहिजे 🚩