Ticker

6/recent/ticker-posts

शुभमंगल ....पण सावधान !

शुभमंगल ....पण सावधान !

१९३८-३९  तालुका महाड ग्राम सुधारणा प्रसारक मराठा मंडळाचे ठराव वाचा !

मराठा समाजात लग्न समारंभ हा आनंदाचा आणि एकत्र येण्याचा प्रसंग असला तरी, गेल्या काही वर्षांत यात होणारा प्रचंड खर्च, हुंडा प्रथा आणि अनावश्यक रीतिरिवाजांमुळे अनेक कुटुंबे अडचणीत आली आहेत. 

मराठा समाजात लग्न समारंभात प्री-वेडिंग शूट, डीजे, मोठ्या जेवणावळी, मानपान आणि सोन्याच्या दागिन्यांचे भेटवस्तू देणे यांसारख्या प्रथा वाढल्या आहेत. या सर्वांवर लाखो रुपये खर्च होतात, ज्यामुळे अनेक कुटुंबे कर्जबाजारी होतात. याशिवाय, हुंडा प्रथेमुळे मुलींवर अत्याचार होतात आणि काही वेळा संसार मोडण्याची वेळ येते.
ह.भ.प ब्रदीनाथ महाराज तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या अनिष्ट प्रथांवर नियंत्रण आणण्याची गरज अधोरेखित झाली. या समस्येवर चर्चा करून खर्चाला आळा घालण्यासाठी आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आचारसंहिता ठरवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. वैष्णवी हगवणे या तरुणीच्या मृत्यूमुळे समाजात निर्माण झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली. 
आचारसंहितेची अंमलबजावणी
या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मराठा समाजाने ११ जणांची समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला. ही समिती आचारसंहितेची अंमलबजावणी आणि जनजागृतीसाठी कार्य करेल. प्रत्येक लग्न समारंभात ही आचारसंहिता वाचली जावी, असे आवाहनही बैठकीत करण्यात आले. या समितीच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचून अनावश्यक खर्च आणि प्रथांवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला जाईल. तालुका स्तरावर गाठीभेटी घेऊन लोकांना सामुदायिक विवाह आणि साध्या पद्धतीने लग्न करण्यास प्रोत्साहन देण्याचेही ठरले.
मराठा समाजाने ठरवलेली आचारसंहिता लग्न समारंभ साधा आणि परवडणारा ठेवण्यावर भर देते. लग्नसोहळा १०० ते २०० लोकांच्या उपस्थितीत करावा. डीजे ऐवजी पारंपरिक वाद्ये आणि लोककलावंतांचा वापर करावा. प्री-वेडिंग शूट बंद करावे, आणि केले तरी ते समारंभात दाखवू नये. लग्न वेळेवर लावावे आणि भाषणबाजी टाळावी. कर्ज काढून समारंभ करू नये. दारू पिऊन नाचण्यावर बंदी घालावी. वधू-वर पित्यांनीच फेटे बांधावे. सोन्याचे दागिने किंवा वाहनाच्या चाव्या भेट देण्याचे प्रकार टाळावे. हुंडा देणे-घेणे पूर्णपणे बंद करावे. मुलीच्या नावे बँकेत ठेव ठेवण्याचा पर्याय स्वीकारता येईल. ही आचारसंहिता समाजात सकारात्मक बदल घडवेल या विश्वासातून हे निर्णय घेण्यात आले आहेत.
परंतु महाड-पोलादपूर तालुक्यातील मराठा समाजातील धुरंधर नेत्यांनी १९३८ - ३९ मध्ये काळाची पाऊले ओळखून त्यावेळीच असे पाऊल उचलले होते. एक छापील पत्रक काढून प्रत्येक गावागावात वाडीवस्तीवर जाऊन त्या समितीने प्रचार केला होता. अलीकडच्या पिढीला आपल्या पूर्वजांनी समाजाच्या हितासाठी किंबहुना गरिबीत पिचलेल्या खालच्या वर्गासाठी किती योग्य पाऊल उचलले होते हे माहिती नाही, त्याची माहिती होणे गरजेचे आहे. 
काळाच्या ओघात पिढी दरपिढी यात बदल होत गेला. काही अनावश्यक जाचक गोष्टींचा पुन्हा शिरकाव झाला. त्यामुळे १९९५ च्या सुमारास तत्कालीन सामाजिक नेत्यांनी काही नियम केले. मात्र मार्केटिंगच्या या जमान्यात दशकभरात तर परिस्थिती अधिक हाताबाहेर गेली आहे. लग्नाअगोदर नाव मागण्यासाठी जाणाऱ्यांची संख्या, साखरपुड्यातील वाढती लोकसंख्या, समिष- अमिष जेवणावळी, लग्नाअगोदर पासून दारू कामाची आताषबाजी यासह इतर प्रसंगासाठी होणारी आर्थिक उलाढाल हे अलीकडे न परवडणारे ठरत आहे. महाराष्ट्रातला मराठा समाज आता जागा झाला आहे, समाजाच्या गोरगरिबांसाठी निर्णय होत असतील तर महाड-पोलादपूर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी आपल्याकडेही अंमलबजावणी होण्यासाठी प्रचारात्मक भूमिका घेतली पाहिजे.  
महाड-पोलादपूर तालुक्यातील कार्यकर्त्यांसाठी आपल्या वाडवडिलांनी जे छापील पत्रकाद्वारे नियम केले होते ते पुन्हा पारायणासाठी देत आहे. जरूर वाचा... पूर्वजांना धन्यवाद द्या... त्यांचा प्रगल्भ विचार तालुक्यातील लोकांपर्यंत पोहोचवा. 
१९३८-३९
मंडळाचा उद्देश व कार्य.
प्रिय देशबांधव हो - 
आज जगांत जिकडे तिकडे सुधारणा होत चाललेली आहे. प्रत्येक जातीची सामाजिक सुधारणा होऊन तो समाज सुखी होत चालला आहे. परंतु आपणाकडे अजून नेसण्याची, बोलण्याची रीत अगदी जुन्या पद्धतीचीच आहे.  समाज अशिक्षीत, खर्चिक व घातुक चालीरिती फारच बलवत्तर अशा अनेक कारणांनी आपला समाज मागासलेला राहिला. त्याची आर्थिक, सामाजिक व नैतिक सुधारणा झाली तर नाहीच, परंतु उलट समाज खालावलेल्या स्थितीत सांपडला आहे. तेव्हां अशा वेळी समाजाचा उत्कर्व झाला पाहिजे. त्याची सुधारणा होऊन तो सुशिक्षित बनला पाहिजे. याकरितां मुंबईतील मराठा वर्गानें ही सुधारणा व्हावी व समाज सुखी व्हावा या हेतूनें (तालुका महाड ग्राम सुधारणा प्रसारक मराठा मंडळ) या नांवाची एक संस्था मुंबईत स्थापन केलेली आहे. व समाजाच्या सुधारणेंविषयी सर्वांना आवश्यक व सोईस्कर असे २२ ठराव केले आहेत. ते छापून त्यांचा प्रसार करण्याकरितां एक पंच कमिटी नेमली आहे. खेडेगांवातील जनतेस विनंती ही पंच कमिटी आपल्याकडे हे छापील बुक घेऊन येईल व प्रत्येक गावोगावी जाईल व गावकरी मंडळीच्या मतानें पंच सुधारणेचे कार्य त्यांच्यावर सोपवून त्यांचा निरोप घेईल. तरी आपण देशवांधव ठराव मान्य कराल व आलेल्या पंच कमिटीला आदर सत्कार दाखवून कार्यामध्ये सहकार्य कराल आणि मुंबईतील जनतेच्या विनंतीला पूर्ण पाठिंबा देऊन सुधारणा लवकरच घडवून आणाल अशी आशा आहे.

तालुका महाड ग्राम सुधारणा प्रसारक मराठा मंडळ.
समाज सुधारणेविषयी ठराव खाली लिहील्या प्रमाणें.
महाड तालुक्यांतील मुंबईत असणाऱ्या मराठा वर्गानें, सुमारे एक हजार मतानें मान्यता दिलेले, त्यावेळी पोलादपूर महालाचा समावेश महाड तालुक्यात होत असे. त्याचप्रमाणे १९३७ साली उमरठ गावी [सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त ] भरलेल्या सभेत पंचाच्या साक्षिनिशी सुमारे तीन हजार मतांनी मान्यता दिलेले आहेत.  हे ठराव अशा मंडळीचे आहेत कीं, एका कांबळ्यावर बसणारी, एका पंगतींन जेवणारी जितकी जात तितकी मराठा जात अशी समजावी. व जी जात एका कांबळ्यावर बसू शकतें, परंतु एका पंगतींत जेवत नाहीं. ती तत्सम मराठा समजण्यात यावी.

अशा जातीनें आचरणांत आणावयाचें सुधारणें विषयीं मुख्य ठराव.
ठराव १ ला -  
स्त्रियांनीं मांडकास नेसण्याची पद्धत म्हणजे ढोपरापर्यंतच लुगडे नेसण्याची पद्धत प्रचलित. त्याला 'मांडकास नेसणे’ असेही म्हणतात. अजिबात बंद करावी. पावसाळ्यांत व कामाच्या वेळीं उपराटे नेसणे व इतर सर्व प्रसंगी पायघोळ नेसणें.  पुरुषांनी लग्न, उत्तरकार्य, बाहेरगांवी जाणें, अगर सरकारी कचेरी, बाजारपेठ इत्यादि कार्यात जाणे झाल्यास धोतर नेसून जाणे अशी अट कायम राखणे.

ठराव २ रा -  
मुलीचा हुंडा घेण्याची रीत आहे.  ती फारच दोषास्पद ठरतें. (म्हणजे कन्या विक्रय घडतो) याकरिता हुंडा घेऊच नये. परंतु हल्लीची आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे मुलीच्या आईबापानें नवरी उचलून नेल्यास लग्न शोभेकरिता हाणून फक्त रुपये ३० घेणे व नवरा उचलून आणल्यास रुपये ४० घेणें या पेक्षां अधिक असू नये. अशी रीत कायम ठेवणे.

३ रा  ठराव - 
नवरीस दागिने :-  एक पुतळी, मंगळसुत्र, जोडवी, इरोद्या यांपेक्षा अधिक अटी असू नये. लग्नाचे पातळ अगदी साधे असणे, चोळी साधी असणे, साडी ४ ते ५ रुपयांपेक्षा अधिक असू नये. घड्या देण्याची चाल अजिबात बंद करावी

४ था ठराव - 
लग्नाचे गांव जेवण बंद करावे. फक्त ज्या कोंडावर ज्या वाडीवर लग्न असेल ते लोक व बाहेरचे पाहुणे मंडळी यांना जेवण घालावे.

५ वा ठराव - 
सर्व गावाला आमंत्रण देऊन बस्ता बांधण्याची चाल अजिबात बंद करावी. मूळ मालकांस जितक्या लोकांची जरूरी आहे ते, एक लिहीणारा मनुष्य बरोबर घेऊन बाजार करावा.

६ वा ठराव - 
लग्नाचे आदले रात्रीं उटणें लावणें, दुसरें दिवशी सकाळीं हळद लावणे, सायंकाळी लग्न लावणे, व रात्रौ वरात फिरविणे व सकाळीं कांहीं वेळानें लग्न उलगविणे व वाजंत्र्याचा खर्च एक दिवसा करिता करणे.

७ वा ठराव - 
हक्कदार ब्राह्मणास जास्तीत जास्त १। रुपया देणगी द्यावी. अधिक देऊ नये. व कन्यादानाचे वेळी ४ आणे प्रमाणे देणगी द्यावी. ब्राह्मणांस मान्य नसल्यास जात पंचांनीं लग्न लावावे.

८ वा ठराव - 
वाजंत्र्याला १। रुपयांपेक्षा अधिक देणगी देऊ नये.

वा ठराव - 
हळद उतरण्याची चाल अजिबात बंद करावी. फक्त नवरा व त्यांच्या बरोबरचे पाहुणे यांचा पाहुणचार करणें.

१० वा ठराव - 
लग्न करणें असेल त्यानें गाव पंचाच्या सल्ल्याने लग्न करावे. मूळ मालकांस जास्त खर्च न होईल असा सल्ला देऊन पंचांने हुकूम द्यावा.

११ वा ठराव -
पुनर्विवाहाबद्दल ह्यणजे ज्या मराठा कुळात पुनर्विवाह (पाट लावणे) लावण्याची पद्धन आहे. त्या लोकांनी अशा विधवेचा पुनर्विवाह (पाट) लावावा कीं, जिला पहिल्या पती पासून पुत्र नाही व उपवर आहे. आणि स्वखुशीने वर करण्यास सिद्ध आहे.  अशा विधवेचा पुनर्विवाह लावावा.

ठराव १२ वा - 
पुनर्विवाह लावतेवेळीं पाच गांवचे पाच पंच बोलावून पुनर्विवाह करणे, दुसऱ्या गांवचे पंच नसल्यास पुनर्विवाह योग्य मानण्यांत येणार नाहीं.

ठराव १३ वा - 
जी स्त्री उपवर असून प्रथम पतीपासून मुलगी आहे, व मुलगा नाही, व स्वखुशीनें वर करण्यांस इच्छित आहे. अशा विधवांचा पुनर्विवाह करणे.

ठराव १४ था - 
ज्या विधवेला प्रथम पतीपासून मुलगा असून दुसरा नवरा करण्याची इच्छा असेल, अशा स्त्रीचा जात पंचांनी पुनर्विवाह करू नये.

ठराव १५ वा -  
एकदा ज्या स्त्रीचा पुनर्विवाह होऊन पुन्हां विधवा झाल्यास तिचा पुनर्विवाह पुन्हा लावू नये.

ठराव १६ वा -  
एखाद्या स्त्रीचा नवरा असून बाळगीत नाही, तर जात पंचाकडे फिर्याद न्यावी. पंचांनी दोघांस समक्ष बोलावून पूर्ण विचार व न्याय करून योग्य तो कायदेशीर निकाल द्यावा.

ठराव १७ वा - 
पुनर्विवाहास दागिन्यांची अट मुळींच असूं नये. पुनर्विवाहास जेवण पंचांनी घेऊं नये. पानसुपारीवर कार्य करावें.

ठराव १८ वा  - 
पुनर्विवाहाचे द्याज विधवेच्या आईबापानें अगर तिने घेऊ नये व वराने देऊ नये.

ठराव १९ वा - 
द्याज घेऊन जी विधवा करण्यांस तयार होतील. त्यांना पंचांनें बंदी करावी.

ठराव २० वा - 
उत्तर कार्यात जाणाऱ्या प्रत्येक स्त्री अगर पुरुषाने दुखवटा भेटण्याची चाल आहे. तिला फक्त दोन आणे देऊन भेटणें, यापेक्षा अधिक असता कामा नये. व या कामासाठीं मांडांत एक थाळी ठेवली जातें. त्या थाळींत टाकावें. हातवणी लावण्याची चाळ आहे, तिला एक पैसा लावणें, कोणी स्वखुषीनें लावीत नसल्यास त्याला पंचाची अट असू नये. उत्तरकार्याचे जेवण डाळ, दोन अगर तीन भाज्या, असें साधे असावे.

ठराव २१ वा - 
प्रत्येक गावांत शाळा असलीच पाहिजे. निदान दोन गाव अगर तीन गाव मिळून सर्वाच्या मुलांना जाण्यायेण्यास सोपे होईल, अशा ठिकाणीं बांधावी. ५०-६० मुलांचा भरणा करून, सरकारांत अर्ज करावा. व शिक्षकाची मदत मागवावी.

ठराव २२ वा. -
शाळेच्या खर्चाकरितां वर्षातून एकवेळ प्रत्येक घरपट १ पायली धान्य जमवावें. व पंचामार्फत ठेवणे. त्याशिवाय गांवांत कांही दंड खंड उप्तन्न झाल्यास शाळा फंडात जमा करणे पंचानें हिशोब ठेवणें.

हे ठराव आचरणांत आणणें.

॥ समाप्त ॥

तालुका महाड ग्राम सुधारणा प्रसारक मराठा मंडळ.
श्री. हरी कृष्णाजी रिंगे (जनरल सेक्रेटरी)
श्री. मारूती बाबाजी मोरे (अध्यक्ष)

जे गांव, पंचांत प्रवेश होतील, अशा पंचाच्या सह्याः- पुढे गावाचे नाव लिहावे
(१)
(२)
(३)
(४)
(५)









रवींद्र मालुसरे 
अध्यक्ष,मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई ९३२३११७७०४ 

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. किती काटेकोर पणे नियमांचे नियोजन केले आहे. दूरदृष्टीतून मांडलेले ठराव! या नियमानुसार जर आपला समाज पुढे वाटचाल करत राहीला तर प्रगतीशील समाज म्हणुन नावारूपास आल्याशिवाय राहणार नाही.

    उत्तर द्याहटवा