वीरपुत्र प्रसवणारी भूमी फौजी आंबवडे

वीरपुत्र प्रसवणारी भूमी फौजी आंबवडे                                 - रवींद्र मालुसरे

फौजी आंबवडे गावचे सुपुत्र निखिल निवृत्ती कदम हा युवक तर सध्या लेफ्टनंट या पदावर भारतीय सैन्यात आहे. मागच्या वर्षी विक्रोळी टागोर नगर येथे या गावातील मुंबई - ठाणेकर पाळेजत्रेच्या निमित्ताने एकत्र आले होते, त्यावेळी निखिलची भेट झाली. तरुण वयातच निखिलने उत्तुंग झेप घेतली असल्याचे दिसून आले. आता भारत - पाकिस्तान सीमेवर युद्धजन्य चकमकी घडत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प तात्यांनी दोन्ही देशांना युद्ध थांबविण्यासाठी आवाहन करून सीझफायर केले असले तरी सामारिक क्षेत्राचे अभ्यासक हा तात्पुरता युद्धविराम आहे असे भाकीत करीत आहेत. दोन्ही बाजूकडून आम्ही एकमेकांचे किती नुकसान केले आहे याचे दावे प्रतिदावे केले जात आहेत. सोशल मीडियावर यथेच्छ बदनामी सुरु आहे. परंतु आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण करताना कणखर भूमिका घेतली आहे. भारताची स्पष्ट आणि ठाम भूमिका आहे: चर्चा, व्यापार आणि दहशतवाद एकत्र चालू शकत नाहीत; रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही.


भारतमातेच्या रक्षणासाठी वीरपुत्र प्रसवणाऱ्या फौजी आंबवडे गावाचे आजही अंदाजे ७० तरुण भारतीय सैन्यात विविध पदावर कार्यरत आहेत. आणि आपल्या भारतभूमीचे रक्षण करीत आहेत. युद्धजन्य परिस्थितीवर या गावातील सैनिकी परंपरेचा वेध घेण्याचा यानिमित्ताने हा माझा प्रयत्न -

पूर्वीचा कुलाबा व नंतरच्या रायगड जिल्ह्याशी शिवाजी महाराजांचा पहिला संबंध आला तो जावळीच्या यशवंत तथा चंद्रराव मोरे यांच्या पाडावाच्या निमित्ताने.गडकिल्ले आणि दुर्गम दऱ्याखोऱ्यांनी वेढलेला पोलादपूर - महाड तालुका हा रणभूमीवर लढणाऱ्या प्रसंगी बलिदान देणाऱ्या शूरवीरांचा. पूर्वीचा कुलाबा आणि सध्याचा रायगड जिल्हा हा सुभेदार नरवीर तानाजी -  सूर्याजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी देशपांडे यांच्यापासून ते महावीर चक्र सन्मान प्राप्त करणाऱ्या कृष्णा सोनावणे पर्यंत प्रसंगी देशासाठी बलिदान दिलेल्या हजारो शूरवीरांचा जिल्हा आहे. या मातीला छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झाल्यानंतर तेव्हापासून विरांना प्रसवणारी ही भूमी आजपर्यंत शौर्याने तळपत राहिली आहे.

रयतेचे राज्य स्थापन करण्याच्या दृष्टीकोनातून मावळ प्रांतावरचा ताबा मजबूत करण्यासाठी शिवाजी महाराजांना जावळी खोऱ्यातील मोरेंचा बंदोबस्त करणे भाग होते. चंद्रराव हा  जावळीतील मोरे घराण्याचा किताब होता. त्यावेळी रायरी, प्रतापगड,चंद्रगड, कांगोरीगड हे मजबूत गडकिल्ले मोरेंच्या ताब्यात होते. आदिलशाहीचा अंकित होते तरी चंद्रराव स्वतःला जावळी प्रांताचा राजा म्हणवून घेत होता. वस्तुस्थिती म्हणजे त्यांचे स्वतःचे नाणे होते, सही शिक्का होता आणि घाट चौक्या बंदिस्त करून घेतल्या होत्या. विशेषतः रायरी  हा गड शिवाजी महाराजांना राजधानी करण्यासाठी सोयीचा वाटत होता. १६५५ अखेरीस महाराजांनी केलेला पहिला हल्ला मोरेंनी परतवून लावला. म्हणून महाराजांनी रघुनाथ बल्लाळ कोरडे यांच्याबरोबर जावळीवर आणखी सेना पाठवली. या लढाईतही मोरेंनी तीन महिने किल्ला लढविला. तुंबळ लढाई झाली. पुढे मात्र मोरेंचा नाईलाज झाला व यशवंतराव मोरेला मुख्य गुन्हेगार ठरवून महाराजांनी ठार केले.  हनुमंतराव मोरे मारला गेला व प्रतापराव मोरे विजापुरास पळून गेले आणि जावळी प्रांत म्हणजे मोऱ्यांचे राज्य महाराजांना मिळाले. पुढील इतिहास आपणास माहीत आहे. वरील हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे रायरीवर जी फौज महाराजांनी पाठविली होती ती फौज विन्हेरे खोऱ्यातील फौजी आंबवडे या गावातील पवार घराण्याची होती. या गावाला ३५० वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. गावाच्या पूर्वेस बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा दाट झाडी असलेला डोंगर आहे. या बालेकिल्ल्याची समुद्रसपाटीपासून ९०० ते ११०० फूट उंची आहे. या बालेकिल्ल्यावरून गावाच्या दक्षिणेकडे असलेला रायगड व पूर्वेस असलेल्या या बालेकिल्ल्यावरून त्याकाळी टेहळणी होत असे. समुद्रमार्गे येणारे शत्रू रायगड किल्ल्याकडे जातात की, महाबळेश्वरच्या दिशेने प्रतापगड किल्ल्याकडे जातात हे दोन्ही किल्ल्यांवरील गडप्रमुखांना कळविण्यासाठी या बालेकिल्ल्यावरून तसे संदेश या किल्ल्यांना मिळत असत व त्यानुसार या दोन्ही किल्यांवर शत्रूचा पाडाव करण्यासाठी मोहीम आखली जात असे.

महाड-विन्हेरे रस्त्यावर असलेले हे फौजी आंबवडे गाव. रायगड जिल्ह्याची पश्चिम किनारपट्टी आणि पूर्वेकडील सह्याद्रीच्या रांगा यामधील ५० ते ६० कि.मी. रुंदीच्या दक्षिण-उत्तर पसरलेल्या भूक्षेत्रात हा गाव येतो. या गावाचा तालुका महाड असल्याने दैनंदिन कामासाठी किंवा बाजारहाट करण्यासाठी या गावातील लोकांना सावित्री नदीच्या तिरावर वसलेल्या आणि मुंबई -गोवा महामार्गांवरील महाड या तितक्याच प्राचीन शहरावर अवलंबून राहावे लागते. १९४२ चा रणसंग्राम, १९६० ची संयुक्त महाराष्ट्र चळवळ, १९६२ चीनचे युद्ध, १९६५ व १९७१ भारत -पाकचे युद्ध व १९९९  च्या कारगिल युद्धामध्येदेखील फौजी अंबवडे गावाच्या सुपुत्रांनी ऐतिहासिक कामगिरी केल्याची साक्ष भारतीय सैन्य दलातील ऐतिहासिक दस्तऐवजांमधून पाहावयास मिळते. भारत पाकिस्तान, बांगला देश युद्धातही या गावातील अनेक सुपुत्रांनी शौर्य गाजवले. या गावचे शहीद सुभेदार रघुनाथ गणपत कदम १९६५ च्या युद्धामध्ये जम्मू-काश्मीर येथे लढत असताना शहीद झाले, त्याचप्रमाणे २००३ मध्ये मनोज रामचंद्र पवार यांना लेह लडाख भारत-पाक सीमेवर लढताना वीरगती प्राप्त झाली. या वीरांची आठवण म्हणून त्यांच्या नावाने समाधी स्मारक गावात उभारण्यात आले असून, ते पुढील पिढीला प्रेरणादायी ठरले आहे. १९८०  मध्ये महाराष्ट्र सरकारने या गावाचे नामांतर 'फौजी आंबवडे' असे केले.


व्यवहारात फौजी आंबावडे फार पूर्वीपासून होते मात्र स्व. यशवंतराव चव्हाण अल्पकाळ उपपंतप्रधान झाले. त्या कालावधीत त्यांनी लक्ष घालून आंबवडेला "फौजी आंबवडे" म्हणून मान्यता दिली. तसं नोटिफिकेशन काढलं. सरकार दरबारी त्यावर शिक्कामोर्तब झाले.  राजपत्रात त्यांची नोंद केली तेव्हापासून आंबवडे हे गाव 'फौजी' आंबवडे झाले. त्याचा सार्थ अभिमान गावकऱ्यांना आहे. आज या गावामध्ये माजी सैनिकांची संख्या पाचशेच्यावर असून आज भारतीय सैन्यात ७० पेक्षा जास्त तरुण कर्तव्य पार पाडत आहेत.  तर एकशे बारा निवृत्त झालेले आहेत. तरुण वर्ग सैन्य भरतीत कायम पुढे असतो. प्रत्येक घरातील एक जण सैन्यात आहेच. भारतीय सैन्यात अगदी शिपायापासून ते कॅप्टन पदापर्यंत गावातील अनेक जवानांनी पदे भूषवून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. मनोहर रखमाजी पवार यांना तसेच काहीना त्यांच्या कामगिरीबद्दल सेनापदकेही मिळालेली आहेत. या गावातील तरुण शिक्षण कोणतेही घेतील परंतु सैन्याची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नाही असे माजी सैनिक कृष्णा पवार यांनी सांगितले होते.

फौजी आंबवडे गावातील प्रत्येक घरातील एक तरी तरुण पहिल्या महायुद्धापासूनची लष्करामध्ये आहे. आजही भारतीय सैन्यात असलेले किंवा निवृत्त झालेले किमान ३०० ते ४०० फौजी गावात आहेत. या गावातील १११ तरुण पहिल्या महायुद्धात लढले. त्यापैकी ६ जवानांना वीरमरण आले. त्यांचे सुंदर स्मारक ब्रिटिशांनी या गावात बांधले आहे. दुसऱ्या महायुद्धात या गावातील दोनशे जवानांनी भाग घेतला. त्यातील सत्तर जवान शहीद झाले होते. त्यानंतरच्या प्रत्येक युद्धात म्हणजे कारगीलमध्ये या गावातील १७ ते २८ तरुण प्रत्यक्ष लढत होते त्याचप्रमाणे पुलवामा हल्ला झाल्यानंतर सध्या सुरु असलेल्या भारत-पाकिस्तान युद्धातही ७० तरुण लढत आहेत. रायगड जिल्ह्यात महाड, पोलादपूर, माणगाव व रोहे तालुक्यात लष्करासाठी म्हणून जी गावे प्रसिद्ध आहेत त्यापैकी हे फौजी आंबवडे गाव, रायगडमधील प्रत्येक नागरिकाने देशसेवा म्हणजे काय? हे समजावून घेण्यासाठी या गावाला एकदा तरी भेट द्यायला हवी, 



आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवण्याकडे तरुण पिढीचा कल वाढत आहे.परंतु महाड तालुक्यातील फौजी आंबवडे हे शूरवीरांची परंपरा जपणारे गाव प्रत्येक घरातील एक तरी तरुण सैन्यात पाठवून आपली देशसेवेची परंपरा आजही टिकून आहे. फौजी आंबवडे गावाने देशाला हजारो सैनिक तर दिलेच परंतु मातृभूमीसाठी बलिदान देणा-यांमध्येही ते मागे राहिले नाही.गावातील युवकांनी समाजहित व देशहिताला प्राधान्य द्यावे. देशसेवा करण्यासाठी सैन्यात जावे, त्यासाठी जिद्दीने अभ्यास करावा, आत्मविश्वासाने व पूर्ण तयारीने विविध स्पर्धात्मक परीक्षेला सामोरे जावे यासाठी गेल्याच वर्षी फौजी आंबवडे ग्रामविकास मंडळाच्या वतीने पंचक्रोशीतील मुंबई निवासी युवा विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन दादर येथील धुरू हॉल मध्ये केले होते. शिबिराच्या समारोप प्रसंगी श्रीमती अनुराधा गोरे यांनी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्या म्हणून मार्गदर्शन केले होते. 

सैन्यातील नोकरी आता बिकट होऊ लागली आहे. सीमेपलिकडे वाढणा-या हालचालीं बरोबरच अंतर्गत आव्हानेही वाढली आहेत. अशा स्थितीत सैन्यातील नोकरी अनेक जण टाळतात परंतु मृत्यु समोर आहे हे माहित असुनही त्यात स्व:ताला झोकून देणारे अनेक जण फौजी आंबवडे गावात दिसतात. फौजी आंबवडे गाव २३ लहान वाड्यांमध्ये वसलेला आहे. छत्रपती शिवरायांच्या सैन्यात येथील अनेक कुटुंब होती. कान्होजी आंग्रे यांच्या आरमारातही काहींनी गुप्तहेरांची जबाबदारी पार पाडली होती. गावातील या पराक्रमाची साक्ष वतनदारी सनदीचे कागद व मानाची पंचधातूची तलवार गावात देत असते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून सुमारे ४०० वर्षांचा इतिहास असलेले महाड तालुक्यातील सैनिकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या फौजी आंबवडे या गावाचा इतिहास आजदेखील संपूर्ण देशाला प्रेरणादायी व आदर्शवत राहिला आहे. गावातील प्रत्येक घरातील एक तरुण आज भारतीय सैन्यात कर्तव्य बजावत आहे. आजघडीला या गावाची लोकसंख्या सुमारे ४ हजार आहे. १९१४  मध्ये झालेल्या पहिल्या महायुद्धात या गावातील १११  सैनिकांनी सहभाग घेतला. पैकी सहा जवान शहीद झाले होते. या १११  मधील १०५  जवान मायदेशी परतले. दुस-या महायुद्धात २५०  तरुणांनी भाग घेतला त्यातील ७०  जणांना वीरगती प्राप्त झाली.एकाच दिवशी २१  धारातीर्थी पडल्याच्या तारा गावात आल्याचे वृध्द व्यक्ती सांगतात. या युद्धाचे प्रतीक म्हणून तत्कालीन ब्रिटिश सरकारने शहीद जवान स्मारक गावात उभे केले. ते आजही स्फूर्ती देत आहे.

पोलादपूर तालुक्यातील बहुसंख्य जवान हे पायदळात असतात. इन्फंट्री अथवा पायदळ हा सेनादलाचा प्रत्यक्ष सरहद्दीवर शत्रूशी आमने-सामने लढणारा विभाग. शत्रूवर हे पायदळाचे लोक चढाई करतात तेव्हा तोफखाना व रणगाडा तुकड्या त्यांना साहाय्य करतात. भारतातील सीमेचा खूप मोठा भाग असा आहे की, जिथे रणगाडे जाऊच शकत नाहीत. तर हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यांमुळे तोफखान्याला मर्यादा पडते. अशा ठिकाणी सर्व मदार पायदळावरच असते. चढाई करताना एक संघ किंवा तुकडी असणे आवश्यक असते, म्हणून पायदळाची रचना पूर्वीपासून वेगळी आहे. पायदळ हे अनेक रेजिमेंटस् (अथवा विभाग) मध्ये विभागले गेले आहे. काही पलटणी खूप जुन्या आहेत. मराठा रेजिमेंटच्या १ मराठा, २ मराठा ह्या अडीचशे वर्षे जुन्या पलटणी आहेत.  एका भागातल्या लोकांची भाषा, खाण्यापिण्याच्या सवयी सारख्या असतात. त्यांच्या राहण्याच्या पद्धतीत साम्य असते. त्यांचे सणवार, रीतिरिवाज, देवदैवते एक असतात. ह्या गोष्टी दिसायला लहान असल्या, तरी त्याने बराच फरक पडतो. 'शिवाजी महाराज की जय' ह्या आरोळीने मराठा जवानाला जेवढी 'स्फूर्ती' मिळेल तेवढी शीख जवानाला मिळणार नाही, तर 'सत् श्री अकाल' म्हटल्यावर त्यांना जेवढे स्फुरण चढेल तेवढे इतर कुणाला चढणार नाही. वरून छोट्या वाटणाऱ्या ह्या गोष्टींची पाळेमुळे अशी खोलवर रुजली आहेत.हे मरहट्टे मोठे शूर, कडवे आणि चिवट असतात. म्हणून तर त्यांना त्या युद्धात 'लाइट इन्फन्ट्री' हा किताब मिळाला." शिवाजी महाराजांच्या काळापासून मराठ्यांना लढवय्येपणाची परंपरा आहे. मराठा सैनिकांना पूर्वी 'गणपत' म्हणायचे. पहिल्या महायुद्धाच्या काळात Frankfurter Zeitung मध्ये एका जर्मन सैनिकाचं पत्र प्रसिद्ध झालेलं आहे. त्यात भारतीय सैन्याच्या शौर्याचं वर्णन त्यानं असं केलेलं आहे

या गावातील ग्रामदैवत श्रीकाळभैरव हे आहे. या देवस्थानावर गावकऱ्यांची खूप श्रद्धा आहे. युद्ध सुरू झाले की, सारा गाव देवळात जमतो आणि काळभैरवाला म्हणतो, 'या देशाच्या रक्षणासाठी हिंदुस्थानातील सर्व जवानांना शक्ती दे. गेल्या चार-पाच युद्धात या देवस्थानांची प्रचीती गावकऱ्यांबरोबर या देशालाही आली आहे आणि देशाने वेळोवेळी विजय प्राप्त केला आहे. या गावातील जवान म्हणतात युद्ध आमच्या पुर्वजांपासून अंगात भिनले आहे. जय काळभैरव म्हणून आम्ही जेव्हा लढाईत उतरतो तेव्हा आमचे, आमच्या गावाचे, माझ्या देशाचं रक्षण आमचे ग्रामदैवत श्रीकाळभैरव करीत असतो. 

'तलवारीशी लगीन लागलं' या वृत्तीने हे सारं गाव गेले शतकभर भारलेलं आहे.  प्रत्यक्षात मात्र काळजीपेक्षा भारतमातेच्या विजयाचा आनंद आणि पाकिस्तानच्या भेकड वृत्तीचा द्वेष गावक-यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.त्यांना कायमचा धडा शिकवायला पाहिजे.

रवींद्र मालुसरे 

अध्यक्ष,
मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई ९३२३११७७०४

टिप्पण्या

  1. या गावात आता सुध्दा गाव मिंटीग करिता सेवा निवृत्त सैनिक एकमेकांना हुद्दा असेल तसा सलोट करताना मी तेथे असताना पाहीले आहे

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उतेकर कुळाचा इतिहास आणि भाऊ -बहिणींना आवाहन

लक्ष्मण उतेकर .... प्रवास जिद्दीचा, संघर्षाचा, यशाचा

लक्ष्मण उतेकरांचा छावा इतिहास घडवणार