अंबरनाथमध्ये सुवर्णामृतधारा
अंबरनाथमध्ये सुवर्णामृतधारा
इवलेसे रोप लावीयले द्वारी त्याचा
वेलू गेला गगनावरी
अंबरनाथची ओळख :
केंद्र शासनाचा आयुध निर्माण कारखाना, विम्को, धरमसी मोरारजी, के.टी. स्टील आदी कारखान्यांमुळे स्वातंत्र्यपूर्व काळापासून एक औद्योगिक शहर अशी अंबरनाथची ओळख आहे. त्याचबरोबर अंबरनाथ म्हणजे मलंग गड, अंबरनाथ म्हणजे चिखलोली धरण. परंतु जागतिक पटलावर प्राचीन शिलाहारकालिन शिव मंदिराचे शहर म्हणून ओळखले जाणारे अशीही अंबरनाथची ओळख आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले प्राचीन शिवमंदिर म्हणजे स्थापत्य कलेचा एक अद्भूत आणि अप्रतिम नमुना असल्याचे सांगितले जाते. शिलाहार राज घराण्यातील माम्वाणी राजाच्या काळात इ. स. १०६० मध्ये हे मंदिर पूर्ण झाल्याचा उल्लेख मंदिरावरील शिलालेखावर आढळतो. सांस्कृतिक वारसा म्हणून जगभरातील ज्या २१८ कलासंपन्न वास्तू युनेस्कोने जाहीर केल्या, त्यांमध्ये महाराष्ट्रातील अंबरनाथच्या या प्राचीन शिवमंदिराचा समावेश आहे. उत्तर कोकणावर राज्य करणाऱ्या शिलाहार घराण्यातील छित्तराज याने १०२२ ते ३५ या काळात हे शिवालय उभारण्यास प्रारंभ केला आणि इ. स. १०६०- ६१मध्ये छित्तराजाच्या धाकट्या भावाच्या माम्वाणी राजाच्या काळात या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले.
वैष्णव विचाराचे महत्व -
भारत ही ऋषीमुनींची साधु संतांची
शूर वीरांची भूमी आहे. मानवाला जेवढी विज्ञानाची गरज आहे, त्याहीपेक्षा अधिक गरज अध्यात्माची,
संत विचारांची आहे. मानवाचे व्यक्तीगत जीवन आणि समाज या दोघांचाही उत्कर्ष प्रदान करणारी,
जात-पात, लिंग, संप्रदाय यांच्यापलीकडे नेणारी, अत्युच्च विचारांनी मानवातील तेजस्विता
प्रखर करणारी, दिव्य विचारधारा म्हणजे वारकरी संप्रदाय.
अंबरनाथ पूर्व भागातील छत्रपती शिवाजीनगर रहिवाश्यांच्या सौजन्याने वारकरी सांप्रदाय माऊली भजन मंडळ ट्रस्टच्या वतीने प्रसिद्ध हनुमान मंदिराच्या प्रांगणात गुरुवर्य वै. ह.भ.प. काशिनाथ महाराज नाठे यांच्या कृपाशीवार्दाने व गुरुवर्य वै. ह.भ.प शंकर महाराज मोरे यांच्या प्रेरणेने आणि युक्तीपूर्वक आग्रहावरून महाडमधील कुर्ले गावातील वै ह भ प सीतारामबुवा शिंदे हे आयुष्यभरासाठी वारकरी संप्रदायाच्या सेवाकार्याला समाजात अखंड प्रवाहीत करण्याच्या उदात्त हेतूने सामोरे गेले. हा हेतू साध्य आणि सफल व्हावा यासाठी वारकरी संप्रदाय माऊली भजन मंडळ ट्रस्ट स्थापन करून सांप्रदायिक कार्याला सुरुवात केली. या घटनेचा सुवर्ण महोत्सव साजरा होत आहे. यंदा सुवर्ण महोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आणि जगद्गगुरू श्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराज संगीत गाथा पारायण सोहळा याचे आयोजन अंबरनाथ येथे दिनांक १२ जानेवारी ते १९ जानेवारी २०२५ या कालावधीत केले आहे, त्याचा सर्वच स्थानिकांना मनापासून आनंद होत आहे. वै ह भ प सीतारामबुवा शिंदे आणि त्यांचे समकालीन यांनी अंबरनाथमध्ये भागवत धर्माच्या भक्ती परंपरेचा लामणदिवा अव्याहत प्रज्वलीत ठेवण्यासाठी पन्नास वर्षांपूर्वी वारकरी सांप्रदाय माऊली भजन मंडळ ट्रस्ट संस्थेची स्थापना केली. म्हणजे मुळातच भजनाच्या आवडीने या महत्कार्याला सुरुवात केली. या कार्याचे प्रारंभीचे दिवस आज हयात असलेलेल्याना अजूनही आठवताहेत. मूळ संकल्पना असलेले आणि सेनापती म्हणून पदवी दिलेल्या वै ह भ प सीताराम शिंदे यांनी संस्था स्थापनेपासून शेवटच्या श्वासापर्यंत काया, वाचा, मनाने, निष्ठेने संस्थेची त्यांनी सेवा केली. ५० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. ही मंडळी भजन करायची त्यामुळे अंबरनाथ परिसरातल्या गावागावात बैलगाड्या करून हे सर्वजण कीर्तन ऐकण्यासाठी जात असत. ओर्डीनन्स फॅक्टरीत एक भव्य सप्ताह साजरा होत असे. एका कीर्तनात सीतारामबुवा आणि काहीजण टाळ घेऊन उभे राहिले होते. अंबरनाथमध्येच राहणारे एक सेवाधारी कापसेबुवा यांनी पाहिले तर ही मंडळी टाळ वाजवताना ठेका चुकत होती. त्यांनी यांना सांगितले टाळ खाली ठेऊन तुम्ही फक्त कीर्तन ऐका. सीतारामबुवा काहीसे खजिल झाले आणि मनोमन निश्चय केला. आमच्या भजनाचा नावलौकिक करणार. अंबरनाथ हाजीमलंग जवळ गोरपे येथे डबलबारी संगीत भजनाचा जंगी सामना होता, त्या ठिकाणी मुंबईत सुप्रसिद्ध भजनी गायक असलेले हरिभाऊ रिंगे यांचें भजन ऐकले. भेट घेतली आणि म्हणाले, अंबरनाथमध्ये तुम्ही माझ्या घरात भजनाचाशिकवणी वर्ग सुरु केला. गिरणी संपाचा फटका बसलेले हरिभाऊ त्यानंतर प्रत्येक रविवारी अंबरनाथला येवू लागले. त्यांच्यानंतर "माझ्या वडिलांची मिरासी गा देवा । तुझी चरणसेवा पांडुरंगा ।। श्री संत तुकाराम महाराजांच्या या विचाराप्रमाणे त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव वै ह भ प नारायणबुवा शिंदे आणि सुनबाई वै ह भ प सरस्वतीबाई नारायण शिंदे यांनी आपल्या परीने परमार्थ वृद्धीसाठी प्रयत्न केला.भजनाचे वेड असलेले सीतारामबुवा शहाड येथील एका कंपनीत कामाला होते. ज्यांना भजनाची आवड होती अशा सुरेश वाजे, जयराम बाईत वैगरे लहान मुलांना बोलवायचे आणि त्यांना स्टेशनजवळ बोलवायचे आणि माताजी हॉटेलमध्ये दूध पाजायचे व रात्री ९ वाजता घरी भजनाला बोलवायचे. मुलं आवडीने सीतारामबुवांच्या घरी यायची. त्यानंतर जवळपास दररोजच स्टेशनजवळ मुलं त्यांची वाट पाहात बसायची. सीतारामबुवांनी त्यांना जशी दुधाची गोडी लावली त्यापेक्षा अधिक भजनाची गोडी लावली. कान्हूबुवांच्या घरी श्रावण महिन्यात ग्रंथवाचन होत असे. त्याठिकाणीही दिवसेंदिवस लोक भक्तिभावाने एकत्र येत असत. गुरुवर्य काशिनाथ महाराज नाठे यांच्याहस्ते सीतारामबुवांच्या सोबत असलेल्या ह.भ.प शंकर महाराज मोरे, नामदेवबुवा आडोळे, लक्ष्मणबुवा जाधव, कान्हूबुवा सकपाळ यांनी तुळशीची माळ धारण केल्या. श्रीयुत धोंडू निकम आणि दणदणे यांच्या अंगणात हरिनाम सप्ताह साजरा करण्याची सुरुवात केली. त्यानंतर श्री हनुमान मंदिराच्या समोर हरिनाम सप्ताहाला मोठ्या प्रमाणात सार्वजनिक स्वरूप देण्यात आले. सर्वश्री सखाराम निकम, गोविंद शिंदे, जयराम उतेकर, मच्छिन्द्रनाथ पारशी, विठ्ठल पार्टे, सोमाशेठ आंग्रे, कृष्णाजी शिंदे मास्तर, शिवाजी शिंदे, रामचंद्र सोळशे, गुरुनाथ दाभोलकर, कोळेकर, रंगनाथ माने, पप्पूसर गुडेकर, धोंडीराम निकम, आप्पा मालुसरे, इत्यादी कार्यकर्ते सुरुवातीच्या काळात तन मन धन अर्पण करून कार्यरत होती. ह भ प रामचंद्र फणसे हे बरीच वर्षे सेक्रेटरी म्हणून होते. मंदिराचें पुजारी म्हणून परबबुवा आणि मंडप सजावट संभाजी निकम काम करायचे. उत्साह वाढला तसा पुढे मंडळाने श्रीक्षेत्र पंढरपूर कार्तिकीवारीसाठी अंबरनाथ येथून ग्रुपने जाण्यासाठी एस टी बसेस सुरु केल्या. काही वर्षानंतर मंडळाने आळंदी येथे स्वतःच्या मालकीची धर्मशाळा असावी असा संकल्प सोडला आणि लोकवर्गणीतून सध्या एकमजली इमारत बांधून पूर्ण केली.
गिरणी संपानंतर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भजनी गायक भाजनानंदी हरिभाऊ रिंगे हे अंबरनाथमध्ये गायनाचे शिकवणी वर्ग घेण्यासाठी नारायणबुवांच्या घरी आठ्वड्यातून एक दिवस जाऊ लागले. "भजनं अंतःकरणस्य भगवदाकाररूपत्वं भक्तिः।" ज्या भजनाने अंतःकरण हे भगवद् आकाररूप होते ते भजन म्हणजेच भक्ति. हरिभाऊंच्या आवाजाची आणि शिकवण्याची पद्धत याची अंबरनाथमधील अनेकांना गोडी लागली. शेकडो शिष्यवर्ग त्यांच्याकडे येऊ लागला. त्यातूनच अनेक कलावंत तयार झाले वै ह भ प सीताराम शिंदे महाराजांनी लावलेल्या वेलू ने गगनाचा ठाव घेतला आहे. याचे श्रेय त्यांचा वारसा चालवणाऱ्या अंबरनाथमधील समस्त वारकरी बांधवांस आहे. बाबामहाराज सातारकर, रामदास महाराज मनसुख. नामदेव आप्पा शामगावकर, गंगाराम दुबे गुरुजी, रामराव ढोक महाराज, निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर, प्रमोद महाराज जगताप, किसन महाराज साखरे, पांडुरंगबुवा घुले, दादामहाराज शिरवळकर, जगन्नाथमहाराज पवार, प्रदीप महाराज नलावडे, वासुदेव महाराज मढवी, नारायण महाराज गोपाळे, डॉ यशवंत पाठक, वारिंगे महाराज, पुरुषोत्तम महाराज उगले असे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार यांना तर खाशाबा कोकाटे, हरिभाऊ रिंगे, मारुतीबुवा बागडे, दामूअण्णा माळी, विठ्ठलबुवा घाडगे, बाबूबुवा कळंबे, श्रीधर भोसले, सागर उतेकर, चंद्रभान सांगळे इत्यादी सुप्रसिद्ध गायकांना आणि राम मेस्त्री, तुकाराम शेट्ये, शंकर मेस्त्री, विठोबा घाडगे, भाऊ पार्टे, निवृत्ती रिंगे, सुनील मेस्त्री, विठ्ठल कळंबे या सुप्रसिद्ध पखवाज वादकांना सप्ताहाच्या निमित्ताने अंबरनाथ येथे आणले. सत्संगाच्या या अमृतयोगाचा लाभ हजारो भाविक भक्तांनी आनंदाने घेतला आहे.
वारकरी कीर्तनाचे सामाजिक योगदान
-
पूर्वीच्या काळात संस्कार होते
पण शिक्षण नव्हते. आताच्या काळात शिक्षण आहे पण संस्कार नाहीत. शिक्षण ही काळाजी गरज
तर संस्कार ही जीवनाची गरज आहे. संस्कारमय शिक्षणाकरिता वारकरी कीर्तन-प्रवचन परंपरेची
गरज आहे, अशाप्रकारे या संस्कारमय शिक्षण देणाऱ्या हरिनाम सप्ताहाच्या सोहळ्याला ५०
वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने महाराष्ट्रातील उत्तमोत्तम कीर्तनकार प्रबोधन
करण्यासाठी आगमन होत आहेत. वारकरी कीर्तनात देव नाचला तेव्हा त्याचा पीतांबर गळून पडला..
"कीर्तन रंगी देवा सन्निध सुखे डोलावे" त्यानंतर श्री नामदेव महाराज यांचा
अवतार "जगद्गुरु तुका अवतार नामयाचा" संत तुकाराम महाराजांनीच वारकरी सांप्रदायिकता
वाढविली. "कीर्तन चांग कीर्तन चांग । होय अंग हरिरूप"
या कीर्तन भक्तिचा व्यक्तिगत, सामाजिक व आध्यात्मिक परिणाम आपल्याला दिसून येतो आहे. नवविध भक्तिमध्ये "कीर्तन भक्ति” ही एक वारकरी संप्रदायातील मुख्य साधना आहे. कारण याच कीर्तनभक्तिने अनेक संतांनी देव आपलासा कसा केला याचे अनेक प्रसंग प्रसिद्ध आहेत. कीर्तन हे जसे भगवत्प्राप्तीकरिता महत्त्वाचे आहे तसे कीर्तन हे समाजप्रबोधनाचेही महत्त्वाचे कार्य करणारे आहे. संत तुकाराम महाराज सांगतात. करावे कीर्तन । मुखी गावे हरीचे गुण ।। कलीयुगामध्ये तर कीर्तन हेच भगवंताची भेट करून देणारे साधन आहे, असे संत तुकाराम महाराज सांगतात. कलीयुगामाजी करावे कीर्तन । तेणे नारायण देईल भेटी ।। कीर्तनामध्ये "होय अंग हरिरूप" हे तर संतवचन प्रसिद्ध आहेच. कीर्तन ही वारकरी संप्रदायातील मुख्य सेवा आहे. या कीर्तनात भगवान स्वतः नाचतात, हे प्रसिद्ध आहेच. नामदेव कीर्तन करी । पुढे देव नाचे पांडुरंग ।।
धर्मकार्यांची सुवर्णामृतधारा
-
जमिनीत बीज पेरतो त्या दाण्यांचे पिठ होत नाही. तर ते दाणे हजारो दाण्यांना निर्माण करीत असतात असा निसर्गाचा नियम आहे. ५० वर्षांपूर्वी अंबरनाथमध्ये जे महानुभाव स्वतः जमिनीत जाणारा दाणा बनले. म्हणून वारकरी सांप्रदाय माऊली भजन मंडळ ट्रस्ट संस्थेचे हे कणीस दिसत आहे. म्हणूनच जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात -
एका बीजा केला नास । मग भोगिलें कणीस ।।
एका सेवाभावी आणि धार्मिक संस्थेचा
५० वर्षाचा प्रवास म्हणजे विठ्ठलाच्या दर्शनासाठी आतुरलेली वारीच म्हटले पाहिजे. एकमेकांना
सहकार्य करीत भक्तीभावाने वाटचाल करता करता ५० वर्षाचा प्रवास साध्य करणे हा एक मोठा
टप्पा आहे. या ५० वर्षात अनेकानेक भक्तगणांचा आणि ईश्वरनिष्ठाचा सहभाग या संस्थेला
लाभल्यामुळेच इवल्याशा रोपाचे मोठ्या वटवृक्षास रुपांतर झाले आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा -
अंबरनाथ पूर्व भागातील छत्रपती
शिवाजीनगर रहिवासी यांच्या सौजन्याने वारकरी सांप्रदाय माऊली भजन मंडळ ट्रस्टच्या वतीने
प्रसिद्ध हनुमान मंदिराच्या प्रांगणात ५० व्या सुवर्ण महोत्सवानिमित्त अखंड हरिनाम
सप्ताह व किर्तन सोहळा १२ जानेवारी ते १९ जानेवारी २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात
आला आहे. यावर्षी सुवर्ण महोत्सवानिमित्त महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार व प्रवचनकार
बोधामृताचा उपदेश करणार आहेत. तरी भाविकांनी हिंदू धर्मावरील निष्ठा प्रकट करण्यासाठी
ज्ञानमाऊलीच्या मंडपात उपस्थित राहून श्रवण सुखाचा लाभ घ्यावा असे आवाहन वारकरी सप्रदाय
माऊली भजन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. सालाबाद प्रमाणे गुरुवर्य वै. ह.भ.प. काशिनाथ
महाराज नाठे यांच्या कृपाशीवार्दाने तसेच गुरुवर्य वै. ह.भ.प शंकर महाराज मोरे यांच्या
प्रेरणेने व ह.भ.प. विठ्ठल बुवा पार्टे यांच्या कार्याध्यक्षतेखाली अखंड हरिनाम
सप्ताह व जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण वाचन होणार आहे. व्यासपीठ चालक
ह. भ.प. किशोर महाराज बोधले यांच्यासह परिसरातील सहकारी मंडळी उपस्थित राहणार आहे.
तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर या कीर्तन सप्ताहात हजेरी लावणार आहेत. यावर्षी कार्यकारी
मंडळ ट्रस्ट कमिटीचे ह.भ.प. कानुबुवा सकपाळ, ह.भ.प. विठ्ठल पार्टे, ह. भ.प. विष्णू
मोरे, ह. भ. प. पुष्कर निमकर, ह. भ.प.किसन मोरे, ह.भ.प. रमेश धनावडे, ह. भ. प. सखाराम
निकम, ह.भ.प. बाळाराम मोरे, ह.भ.प. रमेश मोरे, ह.भ.प. दिलीप मोरे, ह.भ.प. रवींद्र पार्टी,
ह. भ.प. रामचंद्र महाडिक, ह. भ. प. गोविंद शिंदे, ह. भ. प. दत्ताराम पार्टे ह.भ.प.
जयराम हरी उतेकर, ह.भ.प. शांताराम पवार, ह. भ. प. आप्पा मालुसरे, ह. भ. प. सुहास सकपाळ,
ह.भ.प. शिवाजी पार्टे तसेच छत्रपती शिवाजीनगर रहिवाशी संघाचे पदाधिकारी व सदस्य या
सर्वाच्या सहकायार्ने हरिनाम सप्ताह व किर्तन सोहळ्याचे उत्तम नियोजन करण्यात आले आहे.
या सप्ताहात महिला मंडळ भजन सेवा, प्रवचनकारांची सेवा तसेच १८ जानेवारी रोजी ३ ते ५
या दरम्यान हळदीकुंकू समारंभाचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. कीर्तनात रंग भरे कीर्तनकार
ह.भ. प. गुरुवर्य दादा महाराज मोरे, ह.भ. प. उमेश महाराज दशरथे, ह.भ.प. पुरुषोत्तम
महाराज मोरे, ह.भ.प. अॅड. शंकर महाराज शेवाळे, संतचरणरज ह.भ.प. बाळकृष्णदादा वसंतगडकर
महाराज, ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील, ह.भ.प. केशव महाराज उखळीकर यांचे सुश्राव्य
कीर्तन होणार असून काकड आरती, पारायण, प्रवचन आणि कीर्तन सेवेला साथ संगत करण्यासाठी
अंबरनाथ तालुक्यातील वारकरी संप्रदायाची मंडळी उपस्थित राहणार आहे. १९ जानेवारी रोजी
सकाळी ९ ते १२ या वेळेत प्रसिद्ध रामायणाचार्य ह.भ.प. विश्वनाथ महाराज वारिंगे यांचे
काल्याचे किर्तन होणार आहे. त्यानंतर दुपारी १२ ते २ या दरम्यान महाप्रसाद व किर्तन
सप्ताहाची सांगता विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याचे कार्याध्यक्ष
ह.भ.प. विठ्ठलबुवा पार्टे यांनी सांगितले
रवींद्र मालुसरे
अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक
संघ मुंबई
9323117704
खुप छान अभ्यासपूर्ण
उत्तर द्याहटवाअंबरनाथ वारकरी संप्रदाय भजन मंडळ ह्याची आपण दिलेली उत्तम माहिती ने सर्व साधारण समन्या ना मिळेल.आपला हा लेख मनाला भावाला.आपल्या उत्तम लेखणीतून सर्व सामान्यांना माहिती आपल्या ब्लॉक वर मिळाली. आपले मनःपूर्वक आभर.
उत्तर द्याहटवाधन्यवाद. केशव उतेकर.