Ticker

6/recent/ticker-posts

सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरे पुण्यतिथी शौर्यदिन कार्यक्रम

पोलादपूर तालुक्यातील मुंबई - ठाण्यात राहाणाऱ्या भारतीय सैन्यदलातील निवृत्त सैनिकांचा आम्ही विशेष सन्मान करणार आहोत, सर्वांना आग्रहाचे निमंत्रण. कृपया शाखाप्रमुख विजय मालुसरे यांच्या मोबाईलवर संपर्क साधावा ही विनंती.












सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरे पुण्यतिथी शौर्यदिन कार्यक्रम 

शिवरायांचा सिंह पडला समरांगणी |

मराठा गडी यशाचा धनी || 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात ज्यांच्या पराक्रमाची सुवर्णाक्षराने नोंद झाली आहे. त्या सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांची पुण्यतिथी मुंबईत दिनांक ४ फेब्रुवारी २०२५ शौर्यदिन म्हणून साजरी करण्यात येत आहे. (इंग्रजी तारखेप्रमाणे ) या कार्यक्रमाला मुंबईतील आमदार, शिवसेना विभाग प्रमुख श्री अजित दादा भंडारी, सौ. मनाली ताई चौकीदार - महिला विभाग संघटिका, श्री. संतोष राणे - विधानसभा प्रमुख  पविभाग प्रमुख, सर्व शाखाप्रमुख, कार्यकर्ते, विभागातील प्रतिष्ठित नागरिक, विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांचबरोबर पोलादपूर - महाड तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत, तसेच भारतीय सैन्यदलात मराठा रेजिमेंट,   भारतीय लष्कर, भारतीय 

नौदल व  भारतीय  वायुदल यामध्ये उच्च पदावर सशस्त्र कामगिरी केलेल्या निवृत्त सेनाधिकाऱ्यांचा हृदय सत्कार करणार आहोत.


वीरमाता अनुराधा गोरे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत आणि त्यांचे "छत्रपती शिवाजी महाराजांचे शूरवीर मावळे ते भारतमातेचे पराक्रमी सुपुत्र" या विषयावर व्याख्यान होणार आहे.

सुभेदार तान्हाजी मालुसरे यांचा पराक्रम आणि स्वामीनिष्ठा आजवरच्या बखरकारांना, इतिहासाच्या अभ्यासकांना, ललित लेखकांना, चित्रपट व नाट्य निर्माता दिग्दर्शकांना आणि अभिनय करणाऱ्या कलाकाराना सतत प्रेरणादायी ठरला आहे, देशातील अनेक जण या अद्वितीय पराक्रमी सामर्थ्यवान पुरुषोत्तमाचे चरित्र अभ्यासून भारावले गेले आहेत, आणि ह्या वीरपुरुषाचे वेगवेगळे पैलू लोकांसमोर मांडले आहेत, यापुढेही ते मांडत राहाणार आहेत, कारण शिवचरित्र अखंड 'प्रेरणादायी' तर शिवरायांना जिवाभावाची साथ देणारे प्रसंगी बलिदान देणारे त्यांचे मावळे म्हणजे जगाच्या इतिहासात पहिल्यांदा 'गनिमी कावा' अवलंबणारे पराक्रमाचे आणि धाडसाचे एक एक सोनेरी पान ! छत्रपती शिवाजी राजांच्या चरणी आपली निष्ठा ठेवण्यासाठी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात राहणारा एक रांगडा तरुण शिवरायांच्या पदरी सामील होतो काय अन त्यांच्याशी इतका समरस होतो काय, की स्वतःच्या मुलाचं लग्न काढलं असताना सिंहगड मोहिमेचा सांगावा आल्यानंतर हा धैर्याचा मेरुपर्वत काळासारखा धावून जातो अन वचनाच्या पूर्ततेसाठी मागे न हटता आपला अमोल देह स्वामीनिष्ठेचरणी अर्पण करीत धारातीर्थी पडतो काय.? आपले भारतीय सैन्य सुद्धा देशाचे संरक्षण करताना याच भावनेतून सीमेवर खडा पहारा देत असते. यासाठी या कार्यक्रमाचे महत्व आम्हाला आहे.


यावेळी निवृत्त विंग कमांडर शशिकांत ओक यांनी अभ्यासांती बनवलेली नरवीर तानाजी मालुसरे यांची सिंहगडावरील शौर्यगाथा यावर आधारित लढाईचे बारकावे टिपणारी चित्रफीत उपस्थितांना दाखविण्यात येणार आहे.

प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि सुभेदार तानाजी मालुसरे यांची चित्रे असलेली रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेल्या शाहीर रोशन पाटील (रणझुंझार शिवशंभू शाहिरी पथक ठाणे.) यांचे पोवाडा गायन होणार आहे. 


















आयोजक 

विजय पांडुरंग मालुसरे 

(शाखाप्रमुख क्र. २०) 

अनिल ज्ञानोबा मालुसरे (पोलादपूर तालुकाप्रमुख) 

कार्यक्रमाचे ठिकाण - 

एकता नगर सर्व्हिस रोड, ब्रिजवासी स्वीट समोर, न्यू लिंक रोड, महावीर नगर, कांदिवली पश्चिम, मुंबई ४०००६७

ओळख.. 

विरमाता अनुराधा गोरे यांची 🇮🇳

अनुराधा गोरे! एक मध्यम वर्गीय कुटुंबातील आई! अशी त्यांची साधीशी ओळख काही वर्षांपूर्वी होती. पण ९५ सप्टेंबर साली, काश्मीरमध्ये असलेल्या त्यांच्या मुलाला, कप्तान विनायक गोरे यांना वीरमरण प्राप्त झाले आणि एका आईचे आयुष्यच बदलून गेले.

त्यांच्या आयुष्याला वेगळे वळण लागले आणि नवीन प्रवास सुरू झाला. मुलाला वचन दिल्याप्रमाणे त्यांनी चारचौघात आपल्या दु:खाचे प्रदर्शन कधीही केले नाहीच, तर अनेक विनायकांना (तरुणांना) सैन्यात भरती होण्यासाठी प्रेरित केले. शहीद परिवारांशी संपर्क ठेवून त्यांना आधार दिला.  ’वारस होऊ अभिमन्यूचे‘ हे प्रेरणादायी पुस्तक प्रथम लिहिले. यात त्यांनी विनायकसारख्या अनेक शूरवीरांची माहिती लिहिली. विविध विषयांवर त्यांनी पुस्तके लिहिली. शिक्षिका असल्याने मुलांसाठीही अनेक पुस्तके लिहिली. पण प्रामुख्याने शौर्यकथा हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय!

१९७५ ते २००३ त्या पार्ले टिळक विद्यालयात माध्यमिक शिक्षिका होत्या. जून २००३ ते ऑगस्ट २००७ पर्यंत रामदेव पोतदार शाळेत मुख्याध्यापिका. या सर्व कालावधीत विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी त्यांनी अनेक कार्यक्रम राबविले. याच कार्यक्रमांचे लेखन आणि सादरीकरण केले. बऱ्याच वृत्तपत्रांत आणि दिवाळी अंकांत याच विषयावर स्तंभलेखन केले.त्यांना महाराष्ट्र शासनाने  'वीरमाता' पुरस्कार तसेच सह्याद्री वाहिनीने  'हिरकणी' पुरस्कारानी सन्मानित केले आहे.

त्यांची 'वारस होऊ अभिमन्यूचे', 'आचंद्र -सूर्य नांदो', 'कळी उमलताना', 'गाऊ त्यांना आरती', ' जॅक ऑफ ऑल', 'कथासागर', ' शौर्यकथा', ' ओळख सियाचेनची', 'परीक्षेची भीती कशाला?' अशी पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कार्याची ओळख त्यांना आलेल्या अनुभवांतून (पुस्तकातून) नक्कीच होईल. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या