अनाथांचा नाथ लोकनाथ म्हणजेच एकनाथ !



 अनाथांचा नाथ लोकनाथ म्हणजेच एकनाथ ! 

३० जून २०२२ एकनाथजी शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्या दिवशीच आज घडलेल्या सत्तास्थापनेची स्क्रिप्ट लिहिली गेली होती हे नक्की झाले. १०५ आमदार गाठीशी असूनही भाजपच्या दिल्लीश्वरांनी आज शपथ घेतलेल्या आणि त्यापूर्वी मुख्यमंत्रीपद भोगलेल्या देवाभाऊंना बाजूला सारून शिवसेनेच्या ४० आमदारांसह ५१ आमदार सोबत घेऊन आलेल्या एकनाथ भाऊंना मुख्यमंत्री केले होते. फडणवीस साहेब त्यावेळी नाराज असल्याचे भासत होते किंवा तशा बातम्या माध्यमातून येत होत्या तरी ती घडामोड म्हणजे ठरवलेल्या पटकथेचा एक भाग होता हे आर एस एस च्या अभ्यासकांचे मत आहे. नुकत्याच पार पडलेल्या २०२४ च्या विधानसभेचा भरघोस निकाल लागला आहे आणि मंत्रिमंडळ अस्तित्वात येण्यापूर्वीच निवडणूकीच्या निकालानंतर लगेच २-३ दिवसात झालेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या विजयी सभेत बावनकुळे जेव्हा कार्यकर्त्यांना २०२९ मध्ये  भाजपला जिंकून स्वबळावर सत्तेत आणण्याचे आवाहन करतात हे त्याचेच द्योतक नव्हे काय? ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांचे 'झोत' हे ४५ वर्षांपूर्वी प्रकाशित झालेले पुस्तक वाचल्यावर आर एस एस भविष्याचा वेध घेत कशाप्रकारे मांडणी आणि विस्तार करीत असते हे लक्षात येईल. त्यात येणारे २०२५ हे वर्ष भाजपची पितृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या स्थापनेचे शतक महोत्सवी वर्ष आहे तेव्हा नागपूरच्या संघ मुख्यालयातून रेशीमबागेतून नागपूरच्याच सुपुत्राचा मुख्यमंत्री पदासाठी विचार होणार हे ओघाने आलेच. "एकनाथ शिंदे" हे भाजपासाठी पुन्हा सत्ता मिळविण्यासाठीचा OTP होता. या ओटीपीचा ज्या दिवशी वापर होईल, त्या दिवशी शिंदेंचं महत्त्व संपणार होते. 

सत्तेच्या लालसेपोटी म्हणा वा ईडीच्या धाकापाई अडीच वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी मातोश्रीला जय महाराष्ट्र केला होता.  पक्षनेते आणि मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत शिवसेनेसारख्या पोलादी संघटनेत कुणालाही न पटणारे हे घडले होते. छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे, राज ठाकरे हे दिग्गज सुद्धा नेतृत्वाला दुषणे देत बंड करून शिवसेनेतून बाहेर पडले होते. नेतृत्वाची भूमिका किंवा मते पटत नाहीत हे एकवेळ समजू शकतो मात्र मराठी माणसांची अस्मिता जपलेल्या शिवसेना पक्षाचे एकदम ४० आमदार तडकाफडकी बाहेर पडणे व त्यांनी पक्षाच्या नावासह चिन्ह सोबत घेऊन जाणे हे मात्र सर्वांनाच आजही अनाकलनीय आहे. ज्या राज्यात कमी संख्येने आमदार असतात अशा गोव्यासारख्या ठिकाणी मुख्यमंत्रीच सर्व आमदारांना भाजपमध्ये घेऊन जाऊ शकतो किंवा मोठया राज्यात ५-१० आमदार इकडे तिकडे समजू शकतो, पण इतक्या मोठया संख्येने ? मग यातल्या सर्वांनाच ED, CBI चा धाक होता काय? हा संशोधनाचा विषय असला तरी हे अनपेक्षित बंड भाजपला संजीवनी देणारे आणि सत्तेचा महामार्ग दाखवणारे दिसले अर्थात त्याची बक्षीसी देणे जसे आवश्यक होते तसेच त्यांना यासाठी काही त्याग करणे सुद्धा गरजेचे होते... त्यांनी मग आजच्या ५ डिसेंबर  २०२४ पर्यंतची पटकथा आपल्याकडे लिहून तयार ठेवली.  दिल्लीश्वरांकडे जशी एकनाथ शिंदेची अडचण ठरणारी एक कुंडली होती तशीच त्यांच्या मितभाषी परंतु झपाटून धडाडीने काम करणारा राजकारणी अशी दुसरी कुंडली नागपूरच्या हेडक्वार्टर मध्ये बौद्धिक घेणाऱ्यांकडे होती. त्यांनी मग सत्तेच्या सारिपाटाच्या सर्व सोंगट्या शिंदे यांच्या हातात दिल्या आणि सत्ता राबवण्यासाठी त्यांना सर्व मोकळी मुभा दिली. सामान्य कार्यकर्त्याचा मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे सत्ता राबवण्यासाठी एकही रजा न घेता १८ तास अहोरात्र राबत होते. सर्वसामान्यांच्या व्यथांची त्यांना जाणीव असणारा एक सर्वसामान्य माणूस राज्याचा मुख्यमंत्री झाला, याचं समाधान त्यांच्या कायम उराशी होतं हे वेगळंचं……पारदर्शक, कार्यक्षम निर्णय आणि रात्री २ वाजले तरी जनतेला भेटणारा असा मुख्यमंत्री महाराष्ट्राने आतापर्यंत पाहिला नव्हता… तसेच प्रोटोकॉल सोडून जनतेमध्ये जाणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राने एकनाथ शिंदे यांच्या रूपाने पहिल्यांदा पहिला होता. गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने विकासाचे आणि योजनांचे ऐतिहासिक विक्रम रचले. शिंदे यांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेलाय, तोही बाळासाहेबांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा जिल्ह्याच्या महाबळेश्वरच्या दऱ्याखोऱ्यातील दुर्गम भागातून अतिशय छोट्याश्या दरे गावातून ठाण्यात आलेले शिंदे साहेब आज राज्याचे नेतृत्त्व केले हे कौतुकास्पद असले तरी निश्चितच सोपे नव्हते. सामाजिक कार्यकर्त्यापासून सुरुवात करीत "लोकनेता" असा प्रवास त्यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे फडणवीसांच्या हाती सुपूर्द करेपर्यंत केला. लोकनेते हे बिरुद सहजासहजी कोणापुढे लागत नाही, आणि एकदा लागलं की ते कोणीही पुसू शकत नाही. आज उपमुख्यमंत्री म्हणून श्री एकनाथजी शिंदे साहेब शपथ घेत आहेत, पण गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन लोकांनीच त्यांना लोकनेते अशी उपाधी दिलीय, ती सर्वच पदांपेक्षा मोठी आहे. "अनाथांचा नाथ हो, लोकांचा एकनाथ हो"... स्वर्गीय आंनद दिघे साहेबांचे हे शब्द आपल्या कर्तृत्वातून खरे करून दाखवणारा कडवा, निष्ठावंत, सच्चा शिवसैनिक म्हणजे लोकनेते एकनाथजी शिंदे साहेब.
नियमात बसो न बसो तातडीने ते निर्णय घेत होते...त्यामुळे अल्पावधित संपूर्ण महाराष्ट्रात "एकनाथ म्हणजे लोकनाथ " अशी त्यांची ओळख त्यांची निर्माण झाली. होय... एकनाथ म्हणजे लोकानाथच अशीच माझ्या वैयक्तिक आयुष्यात ओळख आहे. २००६ मध्ये आमच्या मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे ५१ वे संमेलन ठाणे शहरात घेण्याचे आम्ही ठरवले, शिंदेसाहेब तेव्हा पहिल्या टर्मचे आमदार होते. टेंबीनाक्यावर असलेल्या स्व. आनंद दिघे यांच्या आनंदाश्रमात जनता दरबारात आम्ही त्यांची रात्री १. ३० वा पहिली भेट झाली तर चार दिवसानंतर रात्री १ वाजता.


त्यांनी संमेलनाचे स्वागताध्यक्षपद स्वीकारले आणि गडकरी रंगायतन मधील संमेलन यशस्वी होण्यासाठी सर्वतोपरी मदत केली, दिवसभरात साहित्यिक श ना नवरे, सामनाचे संपादक संजय राऊत, महाराष्ट्र टाईम्सचे भारतकुमार राऊत, सकाळचे संपादक विनायक पात्रुडकर, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ, नवशक्तीचे ज्येष्ठ पत्रकार अरविंद भानुशाली, ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ, आमदार अनंत तरे, आमदार सतिश प्रधान, खासदार आनंद परांजपे, कवी प्रविण दवणे, अरुण म्हात्रे, इत्यादी भाषणे झाली...परंतु एकनाथ शिंदे दिवसभर सभागृहात आणि व्यासपीठावर होते, पण स्वागताध्यक्ष असूनही माईक जवळ गेले नाहीत...माझ्यावतीने आणि संस्थेचा अध्यक्ष म्हणून तूच भाषण कर असे मला सांगितले. त्यानंतर ठाणे येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष असताना दोन दिवसात त्यांना अनेकदा भेटता आले. 
त्यानंतर भेट होत नसे मात्र अधूनमधून फोन होत असे. मात्र २०२२ ला पोलादपूर तालुक्यात निसर्गाचा प्रकोप झाला. केवनाळे गावची साक्षी दाभेकर ही तरुण मुलगी गंभीर जखमी झाली. क्रीडापटू असलेल्या साक्षीचा पाय कापवा लागला, ही हादरणारी बातमी त्यावेळी मी प्रसिद्ध केली. त्याची दखल जशी संपूर्ण महाराष्ट्राने घेतली तशी मंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी सुद्धा घेतली. के इ एम हॉस्पिटलमध्ये ते भेट देण्यासाठी आले तेव्हा पाच लाख रुपये घेऊन आले आणि पुढची सर्व जबाबदारी स्वीकारली व ती मुख्यमंत्री होण्यापूर्वी पूर्णही केली. त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात माझ्या ४-५ भेटी बंगल्यावर झाल्या तेव्हा ओसंडणारी गर्दी आणि कुणाच्याही मध्यस्तीविना भेटता येतेय याचा आनंद मी अनेकांच्या चेहऱ्यावर पाहिला होता.
सामान्य कार्यकर्त्यापासून मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेले एकनाथ शिंदे म्हणजे 'भाषण न देता राशन देणारा ठाण्याचा ढाण्या वाघ' अशीच ओळख त्यांची जनमानसात त्यांनी ठसवली होती. पुढे लाडकी बहीण योजना त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर घेऊन गेली. 
आर्थिक परिस्थितीमुळे एकनाथ शिंदे यांनी शिक्षण अर्ध्यावर सोडल्यानंतर वयाच्या ५६ व्या वर्षी २०१९ मध्ये त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बी ए पदवी प्राप्त केली. वाचनही बेताचे असावे. त्यामुळे अथांग जनसमुदायासमोर ते काय आणि कसे बोलणार याकडे सुरुवातीला सर्वांचे लक्ष होते. पूर्वीच्या शिवसेनेत असताना शिवाजी पार्कवर किंवा ठाण्यात गर्दीने ओसांडणाऱ्या सभेत त्यांनी भाषण केल्याचे कुणालाही ऐकिवात नव्हते. मात्र मुख्यमंत्री झाल्यानंतर विधानभवनातील पहिल्या भाषणापासून ते आजपर्यंतच्या पत्रकार परिषदेपर्यंत ते राजकीयदृष्टया किती प्रगल्भ आहेत हे त्यांनी महाराष्ट्राला दाखवून दिले आहे. 
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निकालानंतर भाजपाच्या दिल्लीश्वरांना हवे तसे घडतेय किंवा घडत असले तरी, उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेली मराठी माणसांची 'शिवसेना' ही संघटना यापुढच्या काळात अधिक दुबळी होईल की पुन्हा स्थानिक पातळीवरच्या निवडणुकीत मराठी माणसांची सहानुभूती मिळाली तर उभारी घेईल हे काळ ठरवील. त्याचबरोबर अनाथांचा नाथ असलेल्या एकनाथला येणाऱ्या मुंबई- ठाण्यातील मनपा निवडणुकीत किती महत्त्व द्यायचे हे भारतीय जनता पक्ष ठरवणार आहे. राजमार्ग सोडून गल्लीबोळात घुसून सर्वसामान्यांचे प्रश्न समजून घेणारा मुख्यमंत्री अशी न पुसणारी स्वतःची ओळख शिंदेंनी अल्पावधीत करून दिली आहे. त्याचबरोबर मला हलक्यात घेऊ नका अशी तंबी नुकतीच राजकीय पटलावरील सर्वांनाच दिली आहे.... मी पुन्हा येईल असे जगप्रसिद्ध वाक्य...मितभाषी असलेले एकनाथ शिंदे जरी उघडपणे म्हणाले नसले तरी... हाडाचा शेतकरी गवतातले तण कसे आणि केव्हा उपटायचे हे जाणतो. एकनाथ शिंदेच म्हणत असतात... मी शेतकरी आणि शेतकऱ्याचा मुलगा आहे. 
एकनाथ शिंदे हे कधीही मुख्यमंत्री म्हणून वागले नाहीत .... कालही कार्यकर्ता होते आणि आजही आणि उद्याही कार्यकर्ता असतील.आज सत्तेच्या गणितात त्यांना मुख्य पदावरून हटवले असले तरी महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही काहीही घडू शकते हे आपण २०१४ पासून अनुभवतो आहोत. असे असले तरी त्यांची महाराष्ट्राचा अनाथांचा नाथ लोकनाथ म्हणजेच एकनाथ ! ही ओळख कायम राहील.
एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व आणि त्यांचा चेहरा या निवडणुकीत प्रमुख बनला आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली राज्यात विश्वास आणि विकासाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळेच मोठया प्रमाणात यश मिळाले असे त्यांच्या समर्थकांना वाटते आहे. 
रात्रीच्या अंधारात सुरत गोहवटी असा प्रवास करून मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे आता तरी DCM
डेडिकेटेड टू कॉमन मॅन असे झाले असले तरी पुन्हा CM म्हणजे कॉमन मॅन पुन्हा केव्हा बनतील हे भविष्यात उजेड देणारी पहाट ठरविल.



रवींद्र मालुसरे 
अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई
9323117704
chalval1949@gmail.com




























या ब्लॉगवरील इतरही विषय वाचण्यासाठी अनुक्रमणिका वाचा ...प्रतिक्रिया द्या लिंक इतरांना पाठवा 





टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संकल्पपूर्ती दाता : स्व. तानाजीदादा मालुसरे

कर्तबगार माणिकराव जगतापांची लेक स्नेहलदीदी

बैल दिवाळी इतिहास, संस्कृती आणि शेतीचे धागे विणणारा सण