पत्रकार नितीन चव्हाण : एक झुंज संपली….
पत्रकार नितीन चव्हाण :
एक झुंज संपली….
बडी
लंबी सांसे लेता हूँ आज कल
घबरता
हूँ, कई टूट न जाये यह माला
इनमे
से कुछ बचाना चाहता हूँ
बिटिया के चेहरे पे भगवान देखने के लिये
थोडी एव्हरेस्ट के नन्ही चोटी के लिये
ही पोस्ट नितीनच्या व्हाट्सअँप स्टेटसला त्याने काही दिवस मृत्युपूर्वी ठेवली होती. या कवितेतून व्यक्त झालेला विचार, त्याच्या जीवाची चाललेली घालमेल मी २०१८ पासून दिवसेंदिवस त्याच्या तोंडून ऐकत होतो अन पाहातही होतो. अखेर आज सकाळी ५-३५ ला मोबाईल वाजला अन त्याच्या मुलीचा वैष्णवीचा त्याच्या लाडक्या बाबुष्टयाचा आवाज आला. हुंदके देत म्हणत होती, काका ...पप्पा सकाळी ३-३० वाजता ऑफ झाले... आम्ही लगेच गोदरेज हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो पण पप्पांना नाही वाचवू शकलो..... शब्द ऐकल्यानंतर मी सुन्न झालो होतो, मोबाईलमधून लेकीचे फक्त हुंदके ऐकायला येत होते..... थोड्या वेळाने बृहन्मुंबई महानगर पालिका वार्ताहर संघाचे अध्यक्ष पत्रकार मारुती मोरे आणि महाराष्ट्र टाइम्सचे ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार आणि नितीन व माझे समान मित्र रमेश सांगळे यांना घडलेली बातमी सांगितली. अन थोड्या वेळासाठी अंथरुणावर पडून डोळे मिटले..... डोळ्यासमोरून नितीन सोबतचा ३७ वर्षाचा प्रवास आठवू लागलो. १९८७ मध्ये शिंदेवाडी येथे मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या कार्यालयात ग शं सामंत, गणेश केळकर, वि अ सावंत, शरद वर्तक यांच्या समक्ष झालेली भेट आठवली. त्या पहिल्याच दिवशी नितीनची आणि माझी मैत्री जुळली ती आजच्या पहाटेपर्यंत. पत्रलेखनापासून सुरुवात करणारा नितीन महाराष्ट्र टाइम्स सारख्या महाराष्ट्रातल्या सर्वाधिक खपाच्या दैनिकाचा चीफ रिपोर्टर पर्यंत पोहोचला होता. सामंत - केळकर यांच्यामुळे वैचारिक बेस तयार झाला होता. या कालखंडात नितीनचे व्यक्तिमत्व वैचारिकदृष्टया अधिक प्रगल्भ झाले होते. लेखणीला चांगली धार आली होती. दैनिकाचे रोजचे काम करताना अनेकांशी बोलल्यानंतर सामान्यांच्या व्यथा-वेदना त्याला अस्वस्थ करून सोडत असत. दुर्बल आणि समाजातील शेवटच्या घटकासाठी नेहमीच आपली लेखणी चालवणारा नितीन मग भर मध्यरात्री अंतर्मनात उमटणारे ते शब्द कवितेच्या स्वरूपात लिहून काढीत असे.
रक्ताळलेले पाय
फुटलेली बोटं
धुळभरले चेहरे
भेगाळलेलं नशिब
घेऊन आलो
तुमच्या 'इंडिया'त
सरकारा, एक गोष्ट कबूल हाय...
आम्ही फाटकी माणसं शोभत नाय
तुझ्या शहरातल्या
पाॅमपाॅम गाडीसमोर
तुमच्या हायफाय
बोलण्यात
आभाळाला भिडलेल्या
टाॅवरसमोर
अत्तरात बुडवून
काढलेल्या कपड्यात
आम्ही थांबणार नाय
तुमच्या 'इंडिया'त
तुमच्यावर ओझ बनून
नायतर उद्या
म्हणाल...
कशाला मरायला आलेत
फुकट
तिथं गावातचं गळ्यात
फास लावून मरायचं ना यार
फुकटचा ट्रॅफिक जाम, ऑफिसचा लेटमार्क
आम्ही नाय आलो
तुमच्याकडे सहानुभूती मागायला
तसही बळीराजा
म्हणवतात आणि रोज घेता बळी
कर्जमाफीच्या फासात
सावकारकीच्या जाचात
जातपंचायतीच्या
आखाड्यात
गावकीच्या पाणवठ्यात
पाचवीला संघर्ष
पुजूनच
जल्मलो आमच्या 'भारतात'
काळ्या आईशी जोडलेली
नाळ पुरलीय तिच्या
पोटात
नांगर, तिफण, विळा, कोयता
सोबत जन्मोजन्मीच्या
भावंडांची
बापाला वाटले तर
बरसेल
कुस उजवेल माय
पांढरीची
फुटलेले पाय आहेत
साक्षी
रक्ताने माखलेली मने
खाऊ देणार नाही
टाळूवरचं लोणी
आता नाही करणार
आत्महत्या
पहाडाला फोडणारा
किसान
पुन्हा होणार नाही
धर्मा पाटील
सावध राहा
राखरांगोळी झालेल्या घरांचा
पेटलेल्या माणसांचा
जमाव येत आहे
वणवा पेट घेत आहे...
(नितीन चव्हाण -
किसान मार्चची उत्तररात्र - 13 मार्च 2018 प्रभादेवी)
हे असे पिळवटून
लिहिल्यानंतर बऱ्याच वेळा त्याला पहाटे पर्यंत झोपच येत नसे मग लिहीत असे -
मला अलीकडे 'धर्म' नावाची गोळी घेतली
की
छान झोप लागते.
महागाई, बेरोजगारी, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा काही काहीच आठवत नाही.
अशा नितीनचा मागच्या १६
जूनच्या रविवारी दुपारी मला फोन आला, रवी मी एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, संध्याकाळी तू ये, मला महत्वाचे बोलायचे आहे. मी त्याच्या वॉर्डमध्ये पोहोचलो तेव्हा वॉर्डबॉय त्याला
अंघोळ घालत होता. थोड्या वेळाने बाहेर आल्यानंतर म्हणाला, आता थोडे फ्रेश
वाटतेय. घोटभर त्याने आणि मी चहा घेतल्यानंतर म्हणाला. माझी शारीरिक ताकद संपली
आहे. सध्या २४ तास मला श्वासासाठी कृत्रिम ऑक्सिजनचा पुरवठा घ्यावा लागत आहे. इंटस्टिशियल लंग डिसीज, आयएलडी हा आजार आता
अंतिम स्टेजला पोहचला आहे. त्यावर फुप्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करून मी पुढची
६-७ वर्षे जगू शकतो आणि हाच शेवटचा पर्याय आहे असे डॉक्टरांनी सांगितले आहे. आणि
हे मी रिलायन्समध्ये
करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु खर्चाची मोठी बाब आहे. जवळपास ६० लाख रक्कम उभी
करावी लागेल. त्यादृष्टीने तू मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा अध्यक्ष म्हणून आणि मुंबई
मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, बृहन्मुंबई महापालिका वार्ताहर संघाचे अध्यक्ष मारुती मोरे, मराठी पत्रकार
परिषदचे मुख्य विश्वस्त श्री. एस. एम. देशमुख, टेलिव्हिजन
जर्नलिस्ट असोसिएशचे अध्यक्ष उदय जाधव यांनी एकत्र येऊन चर्चा करा आणि त्यासाठी
प्रयत्न करा.
त्यानुसार आम्ही सर्वजण एकमेकांशी बोललो, चर्चा केली आणि
निर्णय घेतला की, नितीन चव्हाण यांचा प्रत्येक श्वास ही आता
आपणा सगळ्यांची जबाबदारी आहे. समाजातल्या आणि त्याच्या मित्र परिवाराशी संपर्क
करण्यासाठी आवाहन तयार केले. कामाला लागलो. प्रतिसाद आणि आश्वासने मिळत होती.
शस्त्रक्रियेनंतरचा खर्च वेगळा होता. इतका सारा खर्च त्याला काय, आपल्यासारख्या मध्यमवर्गीयांनाही अशक्य. एवढी रक्कम जमा
होणंही शक्य नव्हतं. त्याला ओळखणाऱ्या राजकीय व्यक्तींकडून सकारात्मक प्रतिसाद
मिळत असल्याने आम्ही आशावादी होतो. अधेमध्ये तब्येत थोडी वरखाली झाली की ग्लोबल
हॉस्पिटलमध्ये काही दिवसासाठी ऍडमिट होत होता. मात्र नितीनची जगण्याची थोडी उमेद
वाढली होती. आणि आज १ ऑक्टोबर मंगळवार पहाटे ३.३० वाजता त्याची प्राणज्योत मालवली.
खणखणीत लिहा
सणसणीत लिहा
दणदणीत लिहा
झणझणीत लिहा
भिडा
प्रश्नांना आणखी
भिडा
चेपा चेपा
दाबा दाबा
मारा मारा
आणखी मारा
जीव जाइस्तो मारा
काल प्रश्नांना
भिडलात
आज भिडा 'फ्रीडम ऑफ प्रेस'साठी
गुळगुळीत लिहा
मुळमुळीत लिहा
बुळबुळीत लिहा
झुळझुळीत लिहा
वाहू दे लाळ कागदावर
फाटू दे कागद
करा कंठशोष 'फ्रीडम ऑफ प्रेसsss'
काय भिकार लिहिता हो
दुकानं चालवता काय?
पीआरगिरी करता काय?
चाटुगिरी करा
करा आणखी चाटुगिरी
मिळतील दोन-चार
लाखांचे पुरस्कार
जय हो 'फ्रीडम ऑफ प्रेस'
कशाला झालात पत्रकार?
एलायसीचं एजंट
व्हायचा ना?
पाॅलिसीनुसार कमिशन
तर मिळाली असती ना?
गेला बाजार
काळबादेवी
ब्रॅन्चचं मॅनेजरपद
तर नक्की होत ना?
कसली भिकार स्वप्नं
पडतात तुम्हाला
'फ्रीडम ऑफ प्रेस'ची
डोक्यात किडा
वळवळतोय
अजून पत्रकारितेचा?
मेंदुच्या ठिकर्या
झाल्यात
डोळे फुटून कपाळाला
लागलेत
मनगटापासून
खांद्यापर्यंत
फुटतायतं झिणझिण्या
कधीही येईल झटका
शब्दांना होईल
पॅरालिसिस
गळून पडेल मातीत
'फ्रीडम ऑफ प्रेस'
प्रश्नांना
भिडण्याची
खुमखुमी आहे अजून
कलममध्ये?
पुन्हा ठेचा
पुन्हा तुडवा
पुन्हा बडवा
खोल मातीत नेऊन गाडा
हातात पेन धरण्याची
ताकद राहाणार नाही
इतकं ठोकून काढा
मस्ती जायची नाय
भडव्यांची
आतड्याशी लेखणीची
नाळ जुळलीय म्हणतात
साले
बैलाचा आंड झेजरतात
तसे झेजरा
साल्यांच्या 'फ्रीडम ऑफ प्रेस'ला
चला आता काढूया मोर्चे
करुया जयजयकार
लेखन स्वातंत्र्याचा
अभिव्यक्ती
स्वातंत्र्याचा
विचार
स्वातंत्र्याचा
चाटुगिरी
स्वातंत्र्याचा...
निर्भिड पत्रकारिता
परखड पत्रकारिता
फ्रीडम ऑफ प्रेस
कुठल्या बाजारबसवीची
नावं?
- नितीन चव्हाण, चाटुगिरी पत्रकारितेच्या खटल्यातील उत्तररात्रीचा साक्षीदार, दिनांक: २२ एप्रिल २०१८, प्रभादेवी, मुंबई
(निवृत्त पोलीस कमिशनर अरविंद इनामदार आणि ज्येष्ठ विचारवंत ग प्र प्रधान मास्तर )
१९९८ मध्ये त्याचे आणि माझे कुटुंब मुलांसह माथेरानला गेलो होतो. चित्रात दिसत असणारी तेव्हा सोबत आता तीला 6 वर्षाचा मुलगा असलेली माझी मुलगी निकिता 6 वर्षे, मुलगा निखिल 4 वर्षे आणि नितीनचा मुलगा ऋषिकेश 2 वर्षाचा होते. अगदीच लहान असलेली आज पंचवीशीच्या मागे पुढे आहेत. त्यावेळी निसर्गाचा आनंद घेताना सुरेश भटांच्या गझल गायनासह साहित्यावर खूप चर्चा केली होती. गेल्या वर्षभरात हॉस्पिटल शिवाय नितीन फारसा बाहेर कार्यक्रमाला हजेरी लावत नसे परंतु मागच्या १० मे रोजी निखिलच्या लग्नाला प्रकृती बरी नसतानाही आला. मागच्या १० मे रोजी निखिलच्या लग्नाला प्रकृती बरी नसतानाही आला. कुटूंबातील लग्न आहे या आनंदापायी प्रकृतीची तमा न बाळगता विक्रोळी ते घाटकोपर मधील मॉल फिरल्यानंतर आवडीचा सूट खरेदी केला.
आम्ही दोघांनीही कौटुंबिक नाते जपल्याने त्याच्या आयुष्यातल्या सर्वच ताणतणावाच्या गोष्टी तो मला सांगत असे. माझ्या गैरहजेरीत पोलादपूरच्या माझ्या घरीही जाऊन माझ्या आई-बाबांना भेटून आला होता. नितीनच्या आईने अठराविश्व दारिद्र्य अनुभवलेले, घरकाम करून मुलांचे शिक्षण आणि हौसमौज पुरी करायची. देवभोळी आणि जुनाट विचारसरणीची असल्याने अनेकदा बदललेल्या जगाचा व्यवहार नितीन तिला सांगायचा. आयुष्यभर उभे राहून काबाडकष्ट केलेल्या वडिलांचा 75 वा वाढदिवस एकदा त्याने प्रेस क्लबला साजरा केला होता. खूप आनंदी होता त्या दिवशी. मला म्हणाला आज फक्त दोघांनाच मी बोलावले आहे. एक तू माझा मित्र म्हणून आणि एक दुसरी व्यक्ती म्हणजे माझ्या वडिलांचे एक मित्र असे उपस्थित होतो. त्याचा मुलगा ऋषिकेश फ्रीप्रेस मध्ये रुजू झाल्यानंतर २३ नोव्हेंबर २०१९ ला त्याची बातमी बायलाईनसह आल्यानंतर असाच आनंद त्याला झाला होता, आणि फोन करून मला म्हणाला, आज मी जगातील सर्वात श्रीमंत बाप आहे.बायलाईनसह बातमी येणे ही कोणत्याही पत्रकारासाठी मोठ्या आनंदाची गोष्ट असते. ऋषिकेश यापुढच्या आयुष्यात या बापाच्या आनंददायी घटनेचा चार्म कमी होणार नाही याची दक्षता घेईलबालपणापासून शरीरात लपून बसलेला आजार वयाच्या चाळीशी नंतर नितीनला अधेमध्ये त्रास देऊ लागला. २०१८ पासून नितीन फुप्फुसाच्या आजाराने (इंटस्टिशियल लंग डिसीज, आयएलडी) त्रस्त झाला होता. ज्याने अनेकांना मोकळा श्वास घेण्यासाठी अखंड धडपड केली, तो नितीन कृत्रिम श्वासावर दिवस कंठत होता. अशा परिस्थितीतही त्याने काम थांबवले नव्हते. बातमीदारी बरोबरच निष्णात डॉक्टरांचा शोध आणि हॉस्पिटलांचा शोध सुरु झाला. पण आजारही असा की सारंच अवघड होतं. कित्येक लाख खर्च झाले होते आणि आणखी ७५ लाख उपचारांसाठी लागणार होते. शिवाय शस्त्रक्रियेनंतरचा पुढच्या तीन वर्षासाठी खर्च वेगळा होणार होता. इतका सारा खर्च त्याला काय,आपल्यासारख्या मध्यमवर्गीयांनाही अशक्य. एवढी रक्कम जमा करून होणंही शक्य नव्हतं. मात्र महाराष्ट्र टाइम्सची मॅनेजमेंट, संपादक पराग करंदीकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, महापालिका वार्ताहर संघाचे अध्यक्ष मारुती मोरे हे सरकारी यंत्रणेशी संपर्कात होते. जीवनाचे हेच मर्म आहे, परिस्थिती कशी येणार हे आपल्या हाती नाही, तिच्याशी दोन हात करत झगडत राहणे इतकेच आपल्या हाती असते.
एक समुद्र द्या, मज आणूनी
औषध, गोळ्या, बातम्या, टेंडर,
राजकारणी बुडवून टाकीन मी
नितीन दोन ओळींची ही तुझी कविता मला आठवली. स्मशानातील सरणावर तुझ्यासह
या सर्व गोष्टी तुझ्यापुरत्या खाक झाल्या असल्या तरी जगाच्या अंतापर्यंत समस्त मानवाला भेडसावत राहणारच आहेत.
मराठी - हिंदी गझल हा तुझा आवडीचा प्रांत. सुरेश भट, भीमराव पांचाळे हा तुझा week पॉईंट....
जे प्रेम वाटतात,
ते जन्मभर उमलत, फुलत दरवळत राहतात.
ते नसतानासुध्दा त्यांचा सुगंध
सा-या धरतीचा शाश्वत ठेवा बनतो..... सुरेश भट
।। भावपूर्ण
आदरांजली ।।
(नितीन चव्हाण हे सध्या विक्रोळी येथे राहात होते तरी 4 वर्ष प्रभादेवी येथे साई सुंदर नगर इमारत 6 मध्ये होते.)
हृदयस्पर्शी आणि नितीन यांचा आलेखपट समोर साकार झाला.भावपूर्ण श्रद्धांजली.🙏
उत्तर द्याहटवाएका लढाऊ पत्रकाराला मुकलो.आपल्या लेखाने नीतीनियम चव्हाणबद्दल खूप माहिती मिळाली
उत्तर द्याहटवा