४९ वी राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा-प्रदर्शन २०२४
४९ वी राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा-प्रदर्शन २०२४
दिवाळी अंक संपादक-प्रकाशकांना
आवाहन ......
१९४९ पासून अनेक उपक्रम आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून सातत्याने कार्यरत असलेल्या आणि वृत्तपत्र लेखन चळवळीचे यंदा अमृतमहोत्सवी सांगता वर्ष साजरे करीत असलेल्या मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ४९ वी राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. संस्थेच्या वतीने १९७६ पासून मराठी भाषेची वैभवशाली दिवाळी अंक प्रदर्शन परंपरा जपली जाते आहे, या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात आणि परदेशात अमेरिका लॉस एंजिइल्स येथे पोहोचणार आहे. या उपक्रमात गोरेगाव येथील मराठी विचारधारा प्रतिष्ठान, अमेरिकेतील लॉस एंजिइल्स येथील "मराठी संस्कृती.com, - MCF Foundation - मराठी कल्चरल अँड फेस्टिव्हल ही संस्था सहभागी होत आहे. या मान्यताप्राप्त आणि लोकप्रिय स्पर्धेसाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातूनही अंक येत असतात.
सर्वोत्कृष्ट अंकासाठी मनोरंजनकार का र मित्र स्मृती पुरस्कार तर आवाजकार मधुकर पाटकर पुरस्कृत सर्वोत्कृष्ट विनोदी अंक, साने गुरुजी स्मृती सर्वोत्कृष्ट मुलांचा अंक, सर्वोत्कृष्ट धार्मिक अंक, मराठी विचारधारा प्रतिष्ठान पुरस्कृत वसंतराव होशिंग स्मृती महिला संपादित सर्वोत्कृष्ट अंक, कृष्णराव भानुसे स्मृती उत्कृष्ट दिवाळी अंक, पास्कोल लोबो पुरस्कृत गणेश केळकर स्मृती उत्कृष्ट अंक, मनोहरपंत चिवटे स्मृती सर्वोत्कृष्ट आरोग्य विषयक अंक यासह स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या अंकांचा उत्कृष्ट आणि उल्लेखनीय अंक म्हणून पारितोषिक देऊन मराठी भाषा दिन २७ फेब्रुवारी रोजी मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत गौरव करण्यात येतो. स्पर्धा व प्रदर्शनासाठी आलेले हे अंक मुंबई-ठाणे शहरात प्रदर्शन आयोजित करून मांडले जातात. त्यानंतर हे अंक ग्रामीण भागातील शाळा-वाचनालयांना मोफत दिले जातात. दिवाळी अंकांच्या संपादक-प्रकाशकांनी २ प्रती - रवींद्र मालुसरे, अध्यक्ष-मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई, घरकुल सोसायटी, रूम न. ६१२, ६ वा मजला, सेंच्युरी बाजार लेन, भुस्सा इंड. समोर, प्रभादेवी, मुंबई - ४०० ०२५ येथे पाठवाव्यात. असे आवाहन प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी रवींद्र मालुसरे ९३२३११७७०४ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.मराठी
अभिजात भाषा चला ज्ञानभाषा करू या!' लेख
स्पर्धा
अमृततुल्य, संतांची, ज्ञानवंतांची, कीर्तिवंतांची, शूरांची, वीरांची, विजिगीषू अशी आपली मराठी मायभाषा! या आपल्या अमृततुल्य मराठी भाषेस अभिजात भाषेचा बहुमान मिळणे हे सर्वच मराठीप्रेमींचे स्वप्न होते. यासाठी सर्वांनीच गेली बारा वर्षे सातत्याने प्रयत्न केले, केंद्राकडे पाठपुरावा केला. अखेर मराठी भाषेचा सन्मान होऊन ती जगाच्या पाठीवर जाण्यासाठी सज्ज झाली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही गौरवाची बाब आहे परंतु खऱ्या अर्थाने ती आज अभिजात राहिली आहे का? वाघिणीचे दूध म्हणून तत्कालीन समाजधुरिणांनी जिची शिफारस केली त्या इंग्रजी भाषेवर आताचे पालकही स्वार झाले आहेत. जागतिक संवादाची भाषा बनलेल्या इंग्रजीचे गारुड पालकांना मोहिनी घालताना दिसत आहे. यामुळे मराठी शाळांच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्यात १४७८३ मराठी शाळा बंद पडल्या आहेत. हे असेच सुरू राहिले तर...अभिजात भाषेचा दर्जा मिळणं ही अभिमानाची गोष्ट आहे, पण हा मिळालेला दर्जा टिकविण्यासाठी प्रयत्न करणं त्याहून महत्त्वाचं ठरणार आहे. दोन हजार वर्षांहून अधिक काळाची समृद्ध साहित्यिक परंपरा असलेली मराठी भाषा आणि तिचे साहित्य आपल्या पुढच्या पिढींपर्यंत टिकवून ठेवणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी झालेली आहे. वृत्तपत्र लेखकांच्या चळवळीतील प्रमुख संस्था सन २०२४ हे वर्ष अमृतमहोत्सवी सांगता वर्ष साजरा करीत असताना 'मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई', 'मराठी विचारधारा प्रतिष्ठान, गोरेगाव' तसेच गेली बारा वर्षे अमेरिकेत मराठी संस्कृती, साहित्य जपण्याचा आणि संवर्धनाचा प्रयत्न करणाऱ्या 'मराठी कल्चर अँड फेस्टिवल्स संस्थे'च्या अध्यक्षा ऐश्वर्या कोकाटे (लॉस एन्जेलिस) यांच्या संयुक्त विद्यमाने 'मराठी अभिजात भाषा चला ज्ञानभाषा करू या!' विषयावर राज्यस्तरीय खुली लेख स्पर्धा आयोजित केली आहे. देशपरदेशातील मराठी भाषाप्रेमी, साहित्यिक, राजकारणी, कलावंत, खेळाडू, स्पर्धा परीक्षार्थी, शिक्षक-प्राध्यापक-विद्यार्थी यांनी यात भाग घ्यावा. या स्पर्धेची शब्दमर्यादा दोन हजार असून पहिल्या तीन विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र आणि रोख रक्कम तसेच इतरांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल, असे संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी घोषित केले आहे. माहिती पत्रकासह अधिक माहितीसाठी स्पर्धा प्रमुख सुनील कुवरे ९१६७३६४८७० यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा