प्रभादेवीकर रमेश परब यांना अभिवादन !
प्रभादेवीकर रमेश परब यांना अभिवादन !
राजकीय आणि दैनंदिन सामाजिक जीवनात उत्तुंग विचारांची उंची असलेली आणि सतत प्रभादेवी आणि दादर विभागात वावरणारी हसतमुख व्यक्ती म्हणजे माझे मित्र आणि सर्वांच्या परिचयाचे 'जगनमित्र' म्हणजे रमेश परब ! आज पहाटे वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांचे दुःखद निधन झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. त्यानंतर दुःखाची हळहळ व्यक्त करणारे त्यानंतर अनेकजण भेटले.
शरीराने कमी उंचीचे परंतु सृदुढ बांध्याचे असलेल्या रमेश परब यांची मुंबई आणि कोकणातल्या राजकारणाच्या अभ्यासाची उंची व जाण मात्र फार प्रगल्भ होती. साधारण १९८० च्या विद्यार्थी दशेपासून मी त्यांच्या संपर्कात आलो आणि पक्का मित्र झालो. देशाचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा माननीय शरद पवार साहेब आणि कुठल्याही राजकीय पेचप्रसंगात मुंबईत शरद पवारांना खंबीर साथ सोबत करणारे स्वर्गीय गोविंदराव फणसेकर या दोघांचा लाडका 'मानसपुत्र' म्हणूनही रमेश यांची ओळख होती.
शरदरावांनी राजकीय जीवनात कोणतीही बरी वाईट घेतलेली भूमिका असो गोविंदराव आणि त्यांच्यानंतर रमेश परब यांनी सातत्याने त्यांचे समर्थनच केले आणि राजकीय जीवनात अपयश आले तरी त्यांना साथसोबत दिली. आजही राष्ट्रवादीच्या फाटाफुटी नंतर ते त्यांच्या सोबतच होते.
शरद पवारांनी पुलोद स्थापन करताना समाजवादी काँग्रेस पक्ष काढला आणि सैतान चौकी येथील काँग्रेसचे कार्यालय टिळक भवन ताब्यात घेतले. हे करताना संघर्ष करणारी प्रसंगी दांडुकेशाहीची भाषा करणारे आणि त्याठिकाणी दिवसरात्र ठाण मांडून बसणारे कार्यकर्ते पहारा देत होते, ते म्हणजे गोविंदराव फणसेकर, सदानंद तांडेल, गोविंदराव शिर्के, रमेश परब, अरुण मेहता, बबन गवस हे होते. मुंबईत काँग्रेस कमकुवत होती त्यामुळे पुढची बरीच वर्षे म्हणजे शरदरावांचा पुन्हा काँग्रेस प्रवेश होईर्यंतच त्याठिकाणचा कारभार ठप्प होता.
मधल्या कळात राजकीय क्षेत्रात वावरताना विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुक लढवण्याची त्यांना संधी मिळाली, परंतु शिवसेना पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या या दादर प्रभादेवी भागात त्यांच्या वाट्याला अपयशच आले. काही वर्षापूर्वीच्या एका मनपा निवडणुकांच्या वेळी त्यांना दै सामना कार्यालयात बोलावून ते रहात होते त्या प्रभागातून शिवसेनेच्या वतीने निवडणुक लढण्याची ऑफर दिली. परंतु त्यांनी ती नम्रपणे नाकारली आणि आपल्या पक्षातर्फे निवडणुक लढवून पराभूत सुद्धा झाले. आज कोण कुठल्या पक्षात आहे हे न सांगता येणाऱ्या बदलत्या परिस्थितीत रमेश परब पक्षाचे किती निष्ठावान आणि शरद पवारांचे खंबीर समर्थक होते हे लक्षात येतेय. विशेषतः प्रतिभाताई पवार यांच्या किचनपर्यंत परब यांचा खुला वावर होता. मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस वाढविण्यासाठी मुंबईचे मागील काही वर्षात त्या त्या वेळचे झालेले अध्यक्ष राजकीय पोळी भाजून व लाभार्थी होऊन दुसरीकडे गेले...रमेशराव मात्र एक टेबल खुर्ची टाकून स्टँडर्ड मिल प्रभादेवीच्या नाक्यावर कायम शरद पवारांचा बॅनर लावून लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी बसले. आणि न चुकता १२ डिसेंबरला सांस्कृतिक कार्यक्रम आखत शरदरावांचा वाढदिवस आपल्या सहकाऱ्या समवेत नाक्यावर भव्य प्रमाणात करीत राहिले.
एलफिन्स्टन रेल्वे स्टेशनचे नाव प्रभादेवी व्हावे यासाठी मी दैनिक सामना
मध्ये १९९२ सली लेख लिहिला, रमेशने माझा हा लेख वाचल्यानंतर त्यावेळी मला सांगितले रवी याचा पाठपुरावा चालू ठेव, मी नंतर पुढे अनेक वर्षे रेल्वेमंत्र्यांकडे लेखी पाठपुरावा ठेवला आणि २००५ नंतर कंटाळलो. सुरेश प्रभू रेल्वे मंत्री झाल्यानंतर एके दिवशी रमेश परब यांनी मला फोन करून बोलावले आणि यासंबंधी त्यांनीसुद्धा सातत्याने केलेल्या पाठपुराव्याची त्यांची फाईल दाखवली. त्यात त्यावेळच्या माझ्या लेखाची झेरॉक्स प्रत सुद्धा होती. सुरेश प्रभू असताना पुन्हा मी या मागणीसाठी माझ्याकडचा पत्रव्यवहार रेल्वेभवन दिल्लीला पाठविला. प्रभुसाहेबांचे पी.ए. महाजन साहेब यांची दादर पूर्व - फाळके रोडला भेट घेतली, रमेशराव यांनीसुद्धा पत्रव्यवहार पुन्हा सुरूच ठेवला होता. आणि त्याला यश आले, दिनांक १९ जुलै २०१८ रोजी रमेश परब आणि धनंजय खाटपे (यांना हा इतिहास माहीत आहे ) यांचा अभिनंदनाचा फोन आला.
श्री सिद्धिविनायक मंदिराला लागूनच गेल्या ७० - ८० वर्षांपासून पूज्य साने गुरुजी यांच्या नावाने ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी सुशोभित मैदान होते, भूमिगत मेट्रो स्टेशनसाठी ते वापरण्याचे ठरले. रमेश परब यांच्यासह अनेकांनी 'मैदान बचाव' अशी भूमिका घेतली त्यामुळे त्याठिकाणी मैदानाचे अस्तित्व ठेवून विकास होणार आहे असा प्लॅन मंजूर झाला. गेल्या वर्षी रमेश मला प्रभादेवीतच भेटले होते, म्हणाले रवी या गार्डनमध्ये दर्शनी भागावर साने गुरुजींचा एक चांगला भव्य पुतळा असावा असे वाटतेय, शासनाकडे त्याचा आपण पाठपुरावा करूया.
शासकीय पत्रावर कसा करावा याचे उत्तम ज्ञान रमेश परब यांना होते. प्रभादेवी मातेच्या मंदिराला तीनशे वर्ष झाली तेव्हा हा उत्सव भव्य सोहळ्याच्या स्वरूपात व्हावा अशी भूमिका ज्यांनी घेतली त्यात आमदार सदा सरवणकर , नगरसेवक संतोष धुरी, या सोहळ्याचे नेतृत्व करणारे धनंजय खाटपे, वडापाववाले सुभाष सारंगबंधू, संजय नगरकर, महेश सावंत, संतोष गोळपकर, चेतन खाटपे, संजय बारस्कर, भूपेंद्र देवकर, अरुण भोगटे, सर्वपक्षीय कार्यकर्ते व प्रभादेवीतील युवक युवतींनी घेतली होते त्यात रमेश परब सुध्दा अग्रभागी होते. 'न भूतो न भविष्यती' असा भव्य कार्यक्रम हजारोंच्या उपस्थितीत अत्यंत जल्लोषात पार पडला. उद्योजक आणि प्रभादेवीकर असलेले चेतन खाटपे यांनी त्यावेळी हेलिकॉपटर्स मधून मंदिरावर पुष्पवृष्टी केली होती.
प्रभादेवी येथे अनेक सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा संस्था आहेत. यांच्यामध्ये सध्या कार्यरत असलेल्या अनेक कार्यकर्त्यांना रमेश यांनी समाजसेवेचे बाळकडू आणि प्रोत्साहन दिलेले आहे. रमेश यांच्यामुळे "आम्ही प्रभादेवीकर" म्हणून घडलो असे सांगणारे अनेकजण सध्या भागात भेटतात.
ज्येष्ठ मार्गदर्शक आणि मित्रवर्य रमेश परब यांना भावपूर्ण श्रद्धांजली !
- रवींद्र मालुसरे
अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई
(घरकुल सोसायटी, श्री साई सुंदर नगर)
इतर पोस्ट वाचण्यासाठी समोरची 👉अनुक्रमाणिक clik करा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा