कॉम्रेड डांगेंच्या नेतृत्वाखाली मुंबईतील गिरणी कामगार लढवय्या झाला होता - प्रा डॉ अशोक चौसाळकर
कॉम्रेड डांगेंच्या नेतृत्वाखाली मुंबईतील गिरणी कामगार लढवय्या झाला होता
- प्रा डॉ अशोक चौसाळकर
भारतीय कामगार चळवळीचे कॉम्रेड डांगे हे अग्रगण्य नेते होते. डांगेंच्या नेतृत्वाखाली मुंबईतील गिरणी कामगार लढवय्या झाला आणि अनेक दशके त्यांनी रोमहर्षक संघर्ष केला १९२० पासून डांगे यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या संग्रामात भाग घेतला, भारतीय कामगार चळवळीचा जन्म, बाल्यावस्था व निरनिराळ्या स्थित्यंतरातून जात असताना आलेले अडथळे आणि झालेला विकास याचे ते साक्षीदार होते. लाखो कामगारांची संख्या असलेल्या आयटक या भारतातील मोठ्या संघटनेचे ते अनेक वर्षे सरचिटणीस होते. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय कामगार चळवळीचे एक नामवंत पुढारी होते. त्यामुळे त्यांचे जगभरच्या सुप्रसिद्ध नेत्यांशी त्यांचे जवळचे संबंध होते. आंतरराष्ट्रीय राजकारण व कामगार चळवळ यात डांगें यांच्याइतकी मान्यता इतर कोणत्याही कम्युनिस्ट नेत्यास प्राप्त झाली नाही असे मत प्रा. डॉ. अशोक चौसाळकार यांनी मांडले.
मुंबईतील माजी नगरसेवक कॉम्रेड जयवंत
पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कॉम्रेड डांगे यांच्या १२४ वा जयंती
कार्यक्रम प्रभादेवी येथील 'भुपेश गुप्ता भवनात आयोजित केला होता,चौसाळकर
हे "कॉम्रेड डांगे आणि कम्युनिस्ट
चळवळ" या विषयावर आपले विचार मांडत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी लोकवाड्मय गृहाचे कॉ राजन बावडेकर, भारतीय
कम्युनिस्ट पक्षाचे मुंबई सचिव कॉ मिलिंद रानडे, कॉम्रेड
प्रा क्रांती जेजुरकर, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे
अध्यक्ष रवींद्र मालुसरे हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला इस्त्राएल
आणि हमास यांनी एकमेकांवर हल्ले करून युद्ध सुरु केल्यामूळे निरपराध नागरिकांची
हत्या होत आहे या नरसंहाराचा निषेध करून ठराव करण्यात आला. हा ठराव कॉ मिलिंद रानडे यांनी मांडला त्यावेळी त्यांनी
आवाहन केले की, फॅसिझमच्या विरोधात लढताना पक्षाची ताकद कमी
असेल किंबहुना त्यांचा पराभव करण्यासाठी आमच्याकडे साधने कमी असतील परंतु
कामगारांनी आणि शेतकऱ्यांनी सरकारच्या न पटणाऱ्या धोरणाविरोधात आणि अन्यायाविरूद्ध
आवाज उठवला पाहिजे.
कॉम्रेड प्रा क्रांती जेजुरकर या आपल्या
भाषणात म्हणाल्या की, कॉ डांगे यांचे वक्तृत्व असाधारण होते. मैदानी सभा गाजवणारे डांगे कमालीचे
मिश्किल होते. त्यांच्या घरी गेल्यानंतर चर्चा करताना साहित्य, संस्कृती, कला व इतिहास यांचा त्यांनी सखोल असा
अभ्यास केला होता हे माझ्या लक्षात आले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉ मधुकर कदम यांनी केले. कॉ अनंत मोरे, कॉ बाबा सावंत,कॉ चित्तरंजन कांबळे,कॉ विश्वनाथ घवाळी, कॉ विजय मोरे, कॉ बबन वगाडे, कॉ प्रकाश बागवे, कॉ मंगला सावंत, कॉ नंदा जाधव, कॉ लक्ष्मण चिंतल, कॉ मामिडाल या जन्मशताब्दी समितीच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाला ज्येष्ठ कॉ प्रकाश रेड्डी, ऍड विजय दळवी, कॉ सुबोध मोरे उपस्थित होते.
छान लिखाण
उत्तर द्याहटवा