माजी सभापती सि दौ सकपाळ : शतकाच्या इतिहासाचे साक्षीदार
माजी सभापती सि दौ सकपाळ :
शतकाच्या इतिहासाचे साक्षीदार
मुंबई : (रवींद्र मालुसरे)
शिवछत्रपतींच्या इतिहासाच्या पानापानावर पोलादपूर तालुक्यातील शूरवीरांचा आणि भौगोलिक पाऊलखुणांचा ठसा उमटला आहे, तीनशे वर्षांपूर्वी स्वराज्याच्या सत्तेचे केंद्र असलेला आणि स्वाभिमान जपणारा हा तालुका परंतु रायगड किल्ल्यावर ब्रिटिश राजवटीचा युनियन जॅक फडकल्यानंतर मागच्या पन्नास वर्षांपर्यंत हा तालुका म्हणजे दऱ्याखोऱ्यांचा अविकसित भाग अशीच ओळख शासकीय दप्तरात नोंद झाली होती. परंतु रोजगार हमी योजना लागू झाल्यानंतर हळूहळू रस्ते, साकव, दळणवळण यांची वाढ झाली, हल्ली विकासाच्या नावाखाली करोडो रुपये तालुक्यात येत आहेत मात्र गाव आणि वाड्यावस्त्या ओस पडू लागल्या आहेत अशी खंत सि. दौ. सकपाळ यांनी त्यांच्या ९४ व्या वाढदिवशी व्यक्त केली.
पोलादपूर तालुक्याच्या गेल्या शंभर वर्षातील घडामोडींचा साक्षीदार असलेल्या सि. दौ. सकपाळ यांचा ९४ वा वाढदिवस अतिशय उत्साहात नुकताच त्यांच्या जन्मगावी साजरा करण्यात आला.सि. दौ. हे रायगड शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष, श्री वरदायिनी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सभापती, श्रीगुरु आजरेकर फड पंढरपूरचे विश्वस्त, १९६७-७२ या कालावधीत पोलादपूर तालुका पंचायत समितीचे सभापती होते.
प्रतिक्रिया देतांना सकपाळ पुढे असेही म्हणाले की, वारकऱ्यांचा तालुका म्हणून सर्वपरिचित असलेल्या या तालुक्यात राजकीय आणि शैक्षणिक पीछेहाट होती, अशावेळी आज हयात नसलेले बंधुजीराव पालांडे, बाळाराम मोरे, वि सु मालुसरे, कोंडीराम मास्तर उतेकर, कमलाकर दादा चित्रे, श्रीपतीबाबा मोरे, बाबाजी महाडिक आणि मी तालुक्यात सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्राच्या सुधारणेसाठी कार्य करू लागलो. आम्ही सर्वजण अल्प शिक्षित होतो तरी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात कार्यरत होतो, राजकारणाची व समाजकार्याची आवड होती, लोकांचे पाठबळही होते त्यामुळे पोलादपूर, कापडे, देवळे, साखर, उमरठ, मोरसडे याठिकाणी शाळा - हायस्कूल उभी करु शकलो. सरकारच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवू शकलो. हल्लीच्या पिढीने विकासाबरोबर तालुक्याला लाभलेल्या परंपरेचा वारसासुद्धा जपावा.
याप्रसंगी त्यांची पत्नी, कन्या कांताताई जगदाळे, सुना, नातसुना यांनी औक्षण केले. रायगड शिक्षण प्र. मंडळाचे विश्वस्त शैलेश सलागरे, मुख्याध्यापक येरूणकर, कापडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि आकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय सलागरे, सामाजिक कार्यकर्ते नारायण साने, बाजीराव मालुसरे, अमर सलागरे, सतीश गोळे, राजाराम शेलार, प्रमोद काटे यांनी याप्रसंगी त्यांच्या कार्याला उजाळा देणारी भाषणे करून शुभेच्छा दिल्या. सकपाळ सर यांनी सूत्रसंचालन तर रामदास सकपाळ यांनी उपस्थितांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली. गणपती निमित्ताने आलेले पंचक्रोशीतील शेकडो चाकरमानी आणि ग्रामस्थ या वाढदिवसाला उपस्थित होते. विकास पवार, राजेंद्र सकपाळ यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा