महाराष्ट्राचा विराट महापुरुष : आचार्य अत्रे
महाराष्ट्राचा
विराट महापुरुष : आचार्य अत्रे
[ यंदा आपण आचार्य अत्रे यांची शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष साजरे करीत आहोत. अत्रे हे खरे तर चालती बोलती सरस्वतीच ! त्यांनी मराठी भाषा आपल्या लेखणीने एका वेगळ्या शैलीने सुंदर केली. आपल्या महाराष्ट्रीय नव्या पिढीला आंदोलनांचा जो वारसा लाभला, तो बहुअंगी दमदार नवी दृष्टी देणारा आहे. आचार्य अत्रे अशा थोर सेवकांपैकी एक. झेंडूची फुले हे उत्तम मराठी विडंबन कवितांजली लिहिली, कर्मकांडाचे स्तोम माजवणाऱ्यांची पंचाईत करणारे साष्टांग नमस्कार, भ्रमाचा भोपळा सारखे नाटक लिहिले. मराठातील अग्रलेख गाजले, पत्रकार म्हणून संयुक्त महाराष्ट्राची चळवळीत लोकजागृती यशस्वीपणे केली. श्यामची आई द्वारे साने गुरुजींना घराघरात पोहोचविले. महात्मा फुले हा विलक्षण चित्रपट निर्माण करून तो काळ जिवंत करून महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाईचें कार्य सर्वांना निकोप रीतीने समजावले. वस्त्रहरण करून दांभिक नेत्यांवर सडेतोड टीका केली. नंतर त्यांच्यावर त्यांनी हृदयस्पर्शी विस्तृत मृत्यूलेखमालाही लिहिल्या. चतुरस्त्र बुद्धिमत्ता, प्रतिभा आणि बहुरंगी व्यक्तिमत्त्व लाभलेला सुपुत्र महाराष्ट्राला लाभला. अत्रे यांची लेखणी आणि वाणी यात श्रेष्ठ कोण हे सांगणे कठीण आहे. महाराष्ट्र हा त्यांचा श्वास होता. हशा आणि टाळ्यांचे ते बादशहा होते. दोन्ही शस्त्रे त्यांनी हवी तशी वापरली. अत्रे यांनी स्वतःच निर्माण केलेल्या कालखंडाचा ठसा पुसता येणार नाही यानिमित्ताने त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन ! ]
एकोणविसावे
शतक अस्ताला जाताना म्हणजे १३ ऑगस्ट १८९८ रोजी महाराष्ट्राच्या क्षितिजावर विसाव्या
शतकात अनेक क्षेत्रात तेजाने तळपत राहणाऱ्या एका महान महाराष्ट्र सुपुत्राचा जन्म झाला.
विद्वतेची कवचकुंडले जन्मताच घेऊन ल्यालेल्या या सुपुत्राच्या जीवनाची अखेर १३ जून १९६९ रोजी झाली. महाराष्ट्रातील एक अजस्त्र
शक्ती लोप पावली तेव्हा मराठीजणांच्या तोंडून उस्फुर्त शब्द निघाले.....दहा हजार वर्षात
असा महापुरुष जन्माला नाही अन जन्मणार सुद्धा नाही. त्या व्यक्तीचे नाव म्हणजे आचार्य प्रल्हाद केशव
तथा प्र. के. अत्रे. अत्र्यांनी आपल्या झंझावाती व सर्वस्पर्शी आयुष्यात विविध क्षेत्रात
केलेल्या डोंगराएव्हढ्या कामगिरीमुळेच यावर्षी त्यांची शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती
वर्ष साजरे करताना महाराष्ट्र त्यांचे गुणगान करणार आहे. ऐन उमेदीच्या काळात दबकत दचकत
कवी म्हणून महाराष्ष्ट्र सारस्वतांच्या दरबारात वळचणीला का होईना पण कशीबशी जागा मिळवणारे
अत्रे त्यानंतर आपल्या अंगच्या अचाट पराक्रमाने विडंबनकार, शिक्षणतज्ज्ञ, नाटककार, विनोदीवक्ता, चित्रपटकथा लेखक, राष्ट्रपती पदक विजेता
चित्रनिर्माता, सव्यसाची पत्रकार, महानगर पालिका आणि विधानसभेत लोकांचे प्रश्न सडेतोडपणे
मांडणारा लोकप्रतिनिधी, लोकप्रिय वर्तमानपत्राचा संपादक, महाराष्ट्राला मुंबई मिळवून
देण्यासाठी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अग्रणी राहून नेतृत्व करणारा झुंजार नेता.
अशा एकामागून एक कर्तृत्वाची थोर दालने सहजगत्या सर करीत महाराष्ट्र मंडळीत आपला असा
काही ठसा उमटवीते झाले की, गेल्या शतकाचा इतिहास लिहिताना इतिहासकारांना पदोपदी त्यांना
मानाचा मुजरा करणे भागच पडणार आहे. हुतात्म्यांच्या बलिदानातून, असंख्यांच्या त्यागातून,
सेनापती बापट, एस. एम. जोशी , कॉम्रेड डांगे, प्रबोधनकार ठाकरे यांच्यासारख्या समर्थ
नेत्यांच्या तेजस्वी लढ्यातून महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. परंतु या नेत्यांनी उभ्या
केलेल्या लढ्याला विराट स्वरूप प्राप्ती झाले ते आचार्य अत्रे यांच्यामुळेच असे यथार्थ
वर्णन महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांनी एकदा केले, त्याची प्रचिती संयुक्त महाराष्ट्र
लढ्यात आचार्य अत्रे यांनी 'मराठा' दैनिकाची रणभेरी वाजविली तेव्हा आली. दैनिक 'मराठा' रणांगणावर, लाखोंच्या लोकसमुदायात जन्माला आले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अनेक नामवंत
नेत्यांचा जसा सहभाग होता तसेच अनेक अनामिक कार्यकर्त्यांचे योगदान होते. यांनी
महाराष्ट्राला मुंबई मिळवून तर दिलीच, पण भारताच्या नकाशावर 'महाराष्ट्र' हे नाव
जे आलं ते केवळ आचार्य अत्रेंच्या शक्तीमुळे, नावामुळे व दबदब्यामुळेच !
सर्वांना भाषिक राज्य मिळते मग मराठी माणसावर दिल्लीकरांचा रोष का ? मुंबई
महाराष्ट्राला आणि महाराष्ट्र हे नाव राज्याला मिळत नाही असे पाहताच हा लढा यशस्वी
करण्यासाठी त्यांनी सिंहझेप घेतली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र या ध्येयापोटी
महाराष्ट्रभर या माणसाने शेकडो व्याख्याने देऊन रक्त ओकले, अविश्रांत झुंज दिली.
आंदोलन एकहाती पेलताना त्यांच्या वाणीने व लेखणीने आग ओकली अगदी जोड्यासजोडा
मारण्याची झुंजार भूमिका घेतली.
अत्र्यांमधील कलावंताने, साहित्यिकाने, मराठी जनतेची नस अचूक पडकली होती. तिच्या आशा-आकांक्षाशी हा महान कलाकार एकरूप होऊन गेला होता. तमाम मराठी जनांच्या मनातील स्पंदने, हेलकावे, भावभावना, राग-द्वेष या साऱ्या छटा आचार्य अत्रे यांच्या लिखातून बाहेर पडतात आचार्य अत्रे म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हणजे आचार्य अत्रे असे समीकरण होते. सर्वत्र संचार असल्याने सर्वांना आचार्य अत्रे आपले वाटत; कारण ते आपल्या मनातले बोलतात असे जनतेला वाटे. सारांश काय तर सारा महाराष्ट्र आचार्य अत्रे यांनी पालथा घातला, सारा महाराष्ट्र पिंजून काढला; त्यामुळे सर्वत्र सभा, प्रबोधन, परिवर्तनाचा नारा आणि अन्यायाविरुद्ध लढा यांची प्रेरणा सातत्याने मिळत गेली. मराठी माणसाला न्यायाची 'चाड' आणि अन्यायाची 'चीड' आहे. तितकी इतर प्रांतातील जनतेला नाही. असे ते मराठी माणसाचे वेगळेपण सांगताना नेहमी म्हणत असत. 'चांदया'पासून 'बांदया'पर्यंत या शब्दप्रणालीचे प्रवर्तकच आचार्य अत्रे !
अत्र्यांची वाणी आणि लेखणी मराठी माणसांच्या मनातील विचार नेमका व्यक्त करीत होती. आणि म्हणूनच महाराष्ट्रात कोणतीही छोटी-मोठी घटना घडली तर त्यावर आचार्य अत्रे मराठा मधून काय म्हणताहेत ? अत्र्यांनी अग्रलेखातून कोणाला ठोकून काढले आहे ? याकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष असे. आचार्य अत्र्यांमधील साहित्यिकाचा - संपादकाचा हा प्रचंड विजय होता. अत्र्यांच्या विरोधकांनी त्यांच्यावर कितीही कठोर टीकेची राळ उठवली तरी या माणसाने महाराष्ट्रावर अपरंपार प्रेम केले ही गोष्ट कुणीही नाकारू शकणार नाही. महाराष्ट्राचे मोठेपण त्यांनी पूणर्पणे जाणून घेतले होते. महाराष्ट्राचे मानदंड सूक्ष्मतेने अवलोकिले होते. आधुनिक महाराष्ट्राच्या मानदंडांचा 'तेल्या - तांबोळ्यांपर्यंत राजकारण गेले पाहिजे' संदेश जवळजवळ ४० वर्षानंतर अमलात आणला तो याच व्यक्तीने आणि जेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेवरच दिल्लीकरांकडून घाला पडण्याची वेळ आली तेच सतराव्या शतकांतील मराठी क्षात्रधर्माची सही सही आठवण देणारा पराक्रम ऊर्ध्वबाहू करून पोट तिडकीने लढले ते अत्रेच ! अत्रे नुसते महाराष्ट्र धर्माचा जयजयकार करून थांबले नाहीत तर त्या धर्माची सरिता या विसाव्या शतकातील बहुरंगी जीवनाच्या अनेक दालनातून फिरवत पुढे नेण्याचे श्रेय निश्चितपणे त्यांच्याकडे जावे. अत्र्यांनी अनेक क्षेत्रात मिळविलेले विजय प्रचंड होते. त्याचप्रमाणे त्यांनी पत्करलेले पराभवही तेवढेच प्रचंड होते. जीवनाबद्दलचे त्यांचे कुतूहल कधीच संपले नाही. आणि म्हणूनच जीवनाचे प्रत्येक अंग हे एक आव्हान समजून त्यांनी त्यात बेदरकारपणे प्रवेश केला. आपल्या पराक्रमाने त्यांनी त्या त्या जीवनांगाचा पूर्ण आस्वाद अन उपभोग घेतला. आणि प्रत्येक वेळी एखाद्या अनासक्त योग्याप्रमाणे ते त्या जीवनांगातून सहजतेने मुक्त झाले. कशातही अडकून पडले नाहीत. आचार्य विनोबा भावेंना 'वनरोबा' म्हणून चपराक लागवणारे अत्रे विनोबांच्या वाङमय साहित्याचे निस्सीम भक्त बनले. सदोदित आपल्या वक्तृत्वातील विनोदाचे भुईनळे उडविणारे अत्रे, डॉ आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणावेळी हजारोंच्या डोळ्यात अश्रू आणू शकले. अत्रे सर्वत्र होते तरीही सर्वाहून अत्रे आणखी कितीतरी अधिक होते. त्यांच्या एवढे पूर्ण जीवन जगलेला माणूस शतकातून एखादाच जन्माला येतो. जीवनाची अशी एकही छटा नसेल की जिचा अविष्कार अत्र्यांच्या जीवनात झालेला नाही. राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी त्यांच्या निधनावेळी दुखवट्याचा संदेश पाठविला होता. त्यात अत्र्यांचे वर्णन "Writer & Fighter of Maharashtra' असे केले होते. राकट देशा - कणखर देशा असे महाराष्ट्राचे पूर्ण प्रतिबिंब लोकांनी आचार्य अत्र्यांच्या व्यक्तिमत्वात पहिले होते. आचार्य अत्रे नसते तर 'मराठा' दैनिक जन्माला आले नसते. आणि पुढे संयुक्त महाराष्ट्र झाला नसता. एका दैनिकाने 'मराठाने' आपल्या मातृभाषेचे एक राज्य निर्माण केले ही इतिहासातील एकमेव घटना. म्हणूनच त्यांना शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त मानवंदना !
साहित्याला लोककल्याणकारी स्पर्श हवा असा आग्रह धरीत राहिले. दुष्ट रूढी,
दांभिकपणा, अन्याय यावर सतत घणाघाती हल्ले चढवले. प्रसिद्ध-अप्रसिद्ध, लहान-थोर
गुणिजनांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. समाज सुधारकांच्या आणि दिनदुबळ्यांच्या
पाठिशी कायमचे उभे राहिले.
२०२३ साल हे महाराष्ट्राचे लाडके 'प्रचंड पुरुष' आचार्य अत्रे यांच्या शतकोत्तर
रौप्य महोत्सवी जयंती वर्ष आहे. यानिमित्ताने महाराष्ट्रभर साजेसे अनेक छोटे मोठे
कार्यक्रम सर्वत्र होत आहेत. अत्र्यांएवढी अफाट आणि अबाधित लोकप्रियता
स्वातंत्रोत्तर काळात कुणाही मराठी साहित्यिकाला लाभली नाही याचे हे द्योतक आहे.
- रवींद्र मालुसरे
अध्यक्ष,
मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई
९३२३११७७०४
सुंदर लेखन
उत्तर द्याहटवाउत्कृष्ट लेख
उत्तर द्याहटवा