संघर्षयोद्धा कॉम्रेड मणिशंकर कवठे


 संघर्षयोद्धा कॉम्रेड मणिशंकर कवठे

१९५७ सालापासून सतत ९ वेळा म्हणजे एकाच प्रभागातून ४७ वर्षे मुंबई महापालिकेवर नगरसेवक म्हणून वरळी कोळीवाड्यातून निवडून येणारे कॉम्रेड मणिशंकर कवठे यांचे नाव आणि कार्य मध्यमुंबईतील नागरिक कायम लक्षात ठेवतील. सुरुवातीला ते लालनिशाण पक्षाचे प्रतिनिधित्व करीत होते. पुढे ते भारतीय कम्युनिस्ट पक्षात सहभागी झाले. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात लाल निशाण सतत फडकवीत कष्टकरी जनतेचा 'लालबावटा' त्यांनी आमरण हातात घेतला होता. अगदी शिवसेनेच्या लाटेतही ते प्रचंड बहुमताने विजयी होत असत.

बालपण - आद्य मुंबईकरांच्या म्हणजे कोळी समाजात वरळी कोळीवाड्यात त्यांचा जन्म २८ फेब्रुवारी १९२७ रोजी झाला. वरळी कोळीवाडा आणि दादरच्या छबिलदास हायस्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले. शालेय शिक्षण घेत असतानाच त्यावेळी १९४२ चा चलेजाव आंदोलनाचा लढा सुरू झाला. वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी त्यांनी स्वातंत्र्य आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला.   पिस्तुल हातात घेऊन त्यांनी वरळीच्या पोलिस चौकीवर हल्ला केला होता, त्यात एक गोरा साहेब मृत्युमुखी पडला होता. पोलिसचौकी जाळण्याचा प्रयत्न झाला. या घटनेत ते पकडले गेले होते पण वयाने लहान असल्याने ते त्या प्रकरणातून सुटले. मात्र, ब्रिटिश पोलिसांनी त्यांना बेदम मारहाण केली होती. काही सहका-यांना घेऊन वरळी येथील बंगाल केमिकलची फॅक्टरीही जाळली होती. १४-१५ व्या वर्षी व्यायामशाळेत सिंगलबार, डबलबार, मल्लखांब, हॅन्डबॅलन्सिंग, बाराअंगी सूर्यनमस्कार असे शरीर संवर्धन करीत असताना राष्ट्रसेवा दलाच्या १०-१२ शाखांवर शारीरिक शिक्षण देण्याचे काम ते पार पाडीत असत. त्याच वेळी पूज्य साने गुरुजींच्या सहवासात राहून समतेचे प्रबोधनही करीत असत.  पुढे नाना पाटलांचे प्रतिसरकाचे सैनिकांना वरळी कोळीवाड्यात आणून शिबीर घेतले. मात्र स्वातंत्र्यानंतर सुराज्यासाठी लालबावटा हाती घेऊन कष्टकऱ्यांच्या चळवळीत सहभाग, संयुक्त महाराष्ट्र समितीचा वरळी गावातील खांदा कार्यकर्ता, लालनिशाण पक्षाचा एकमेव नगरसेवक, वरळी कोळीवाडा भाडेकरू संघाची स्थापना व भाडेकरू झोपड्पट्टीवासियांचे संरक्षण, त्यांच्यासाठी आंदोलन व न्यायालयीन लढाईसाठी दिवसरात्र कार्यरत असणारा त्यांचा नेता अशा भूमिका घेत ते आयुष्यभर न थकता अविश्रांत काम करीत राहिले.

स्वातंत्र्य चळवळीत सहभाग - तारुण्याच्या उंबरठ्यावर उभे असतानाच त्यांनी १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीत उडी घेतली. महात्मा गांधींच्या 'करो या मरो' हा आदेश त्यांची मुख्य प्रेरणा होती. क्रांतिसिंह नाना पाटील व कारुण्यमूर्ती साने गुरुजी या गुरूंचे ते एकलव्य झाले आणि भूमिगत कार्यात स्वतःला झोकून दिले.  पुढे पुण्याला असताना कॉ एस के लिमये यांच्या सोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी मार्क्सवादी विचारानुसार कामगार, कष्टकऱ्यांच्या चळवळीत काम करायला सुरुवात केली. ह्या सर्व घडामोडीत कॉ दत्ता देशमुख, कॉ लक्ष्मण मेस्त्री, सुमन कात्रे, शरद दिघे, साने गुरुजी, कॉ नाना पाटील यांच्यासोबत त्यांच्या संघर्ष लढ्यात कायमच कार्यरत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ऐन तारुण्यात त्यांची जडण घडण होत होती. मध्यमुंबईतील सेवादल शाखांमध्ये शरद दिघे बौद्धिक घ्यायचे तर मणिशंकर कवठे शारीरिक शिक्षणाचे उपक्रम शिकवायचे. एका गरीब कोळी कुटुंबात जन्मलेला हा लढवय्या एकाच वेळी संघर्ष व करुणा यांचा पाईकच नव्हे बिनीचा सैनिक झाला.  नेरळच्या सेवादलाच्या कॅम्पमध्ये साने गुरुजींच्या उपस्थितीत दुथडी भरून वाहणाऱ्या कल्याण नदीत सूर मारून पोहून आलेल्या मणीशंकरला साने गुरुजींनी 'देव मासा' पदवी दिली होती. नेरळ कॅम्पमधून सहा जणांची अलाहाबाद कॅम्पसाठी निवड झाली. तो कॅम्प ३ महिने चालला. तेथून परत आल्यावर डी एस उर्फ मीना देशपांडे यांच्या संपर्कात आले. 'नवजीवन संघटनेच्या म्हणजेच लाल निशाण गटाच्या' संपर्कात आल्यावर त्यांनी मार्क्सवादाचा पूर्ण स्वीकार केला. १९४६ साली झालेल्या नाविक उठावाला पाठिंबा देत कवठे यांनी त्या आंदोलनात भाग घेतला होता. १९४८ साली कम्युनिस्ट आंदोलनात भाग घेतल्यामुळे त्यांना तुरुंगवास झाला होता. त्यावेळी त्यांना कोकणातून तडीपार करण्यात आले होते. १९४९-५०मध्ये ते नवजीवन संघटना, लाल निशाण पक्षात दाखल झाले. कोळी समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी काम केले, सावकारी जाचातून कोळी महिलांची मुक्तता करण्यासाठी त्यांनी कोळ्यांची बँक स्थापन करण्याचा प्रयत्न केला. १९६० साली वरळी कोळीवाड्यात त्यांनी पाचवी ते दहावीसाठी शाळा काढली. कोळी समाजाचे अनेक प्रश्न त्यांनी सतत संघर्ष करून धसास लावले.सेंच्युरी मिलमध्ये त्रासन खात्यातील कामगारांचा संप संघटित केला म्हणून वरळीच्या जेलमध्ये त्यांना सहा महिने स्थानबद्ध करण्यात आले होते.

सुराज्यासाठी, कष्टकऱ्यांसाठी - अमळनेरच्या ऑइल मिल  कामगारांचा लढा कॉ लक्ष्मण मेस्त्री लढवीत होते.त्या लढ्यात मणिशंकर साथ देण्यासाठी पोहोचले. भोरमध्ये नाचणी पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचे लढ्यातही ते सहभागी झाले. मुळशी खोऱ्यात सुद्धा शेतकऱ्यांना साथ देण्यासाठी कार्यरत राहिले. १९४९-५० ला रत्नागिरीला पोस्ट अँड टेलिग्राफ खात्याच्या युनियनचे काम केले. रत्नागिरीला तडीपार असताना ते शेतमजुरांच्या लढ्यात रामभाऊ पाटील या टोपण नावाने वावरायचे. पुढे कोकणातूनही तडीपार झाल्यावर धुळ्याला शिवाजी मराठी विद्यालयाच्या गच्चीवर वास्तव्यास होते. पश्चिम खान्देशात शेकाप पक्षाच्या शाखांवर जाऊन प्रचार कार्य करीत असताना त्यांनी मॅट्रिकची परीक्षा दिली. गाडगे बाबांबरोबर पहाटे चार वाजता उठून सफाई अभियानात भाग घ्यायचे. नाशिक सेंटरला मॅट्रिकची परीक्षा उत्तम मार्काने पास झाले. हे कार्य चालू असतानाच पुण्याला एस के लिमये यांना भेटले आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत लाल बावट्याचे सैनिक म्हणून वावरले - जगले - लढले.

रचनात्मक कार्य - मणिशंकर कवठे केवळ संघर्ष करीत राहिले नाहीत तर रचनात्मक कामाचा डोंगर उभारीत राहिले. त्यासाठी लागणारी लवचिकता दाखविली. 'संघर्ष व सहकार्य' यांची योग्य सांगड घातली. वरळी येथे  जनता शिक्षण संस्था उभी  केली व अल्पावधीत नावारूपास आणली. वरळी कोळीवाडा भाडेकरू संघ स्थापून भाडेकरूंचे सरंक्षण केले. रत्नदीप क्रीडा मंडळास मोलाचे सहकार्य करून कबड्डी खेळास उत्तेजन दिले. स्काऊट अँड गाईड संस्थेस मौल्यवान जागा मिळवून दिली. मावळ मराठा व्यायामशाळा व अमरप्रेम क्रीडा मंडळ उभारण्यास मोलाचे सहकार्य केले. पक्षातीत दृष्टीकोन ठेऊन कोळीवाड्यात सांस्कृतिक हॉल उभा केला. बँक ऑफ महाराष्ट्र या राष्ट्रीयकृत बँकेशी सहकार्य करून जनता शिक्षण संस्थेमध्ये तिची शाखा सुरु केली. लोकांची सोय झाली व शाळेस आर्थिक पाठबळ मिळाले. डॉ डी वाय पाटील यांचे सहकार्य घेऊन संस्थेची पक्की इमारत उभी केली. लग्नकार्यासाठी व सामाजिक कार्यासाठी सुसज्ज हॉल त्याठिकाणी निर्माण झाला. सातत्याने मुंबई मनपामध्ये ४७ वर्षे निवडून आल्यानंतर २००२ साली त्यांच्या विक्रमी कामांची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली. एक काळ असा होता की, मुंबईच्या गिरणगाव ते गिरगाव परिसरातून कॉ. कृष्णा देसाई, कॉ. गुलाबराव गणाचार्य, कॉ. एस. जी. पाटकर, कॉम्रेड एस एस मिरजकर कॉ. अहिल्या रांगणेकर, कॉ. तारा रेड्डी, कॉ. जी एल रेड्डी, कॉ. पी के. कुरणे, कॉम्रेड तु कृ सरमळकर, कॉ. मणिशंकर कवठे, कॉ. मधु शेटे, कॉम्रेड मोहम्मद शाहिद, कॉ. पीर मोहम्मद, कॉ. जया पाटील, कॉ.बाबूराव शेलार, कॉ. जी एल पाटील इत्यादी अनेक गिरणी कामगार नेते, कम्युनिस्ट नेते महापालिका व विधानसभेत कामगारांनी निवडून पाठविले होते. अलीकडच्या काळात फक्त लोकांच्या मधून निवडून जाणारे कॉ कवठेच राहिले. आज गेल्या पन्नास वर्षात देशातील व महाराष्ट्रातील राजकारण एवढ्या वेगाने बदललेले आहे, की स्वातंत्र्यापूर्वी असलेल्या काँग्रेसचा आणि स्वातंत्र्यानंतरच्या कम्युनिस्टांचा काही बाबतीतला पुरोगामी वैचारिक वारसा, मूल्यांचे राजकारण बदलत गेले आणि त्याची जागा संधीसाधू राजकारणाने घेतली आहे. पक्ष आणि पक्षनिष्ठा जपणारे कवठेंसारख्यांची पिढी संपली आहे हेच खरे.

व्यापक दृष्टीकोन - मणिशंकर कवठे यांच्या विरोधात महापालिकेची निवडणूक लढलेल्या शिवसेना उमेदवार श्री बा. स. पाटील यांना जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्षपद दिले. आपण स्वतः आमरण कार्यवाह म्हणून कार्यरत राहिले. केवढी लवचिकता व मनाचा मोठेपणा ! काँग्रेसचे कार्यकर्ते कृष्ण ब्रीद व शांताराम पारकर यांना सतत पंचवीस वर्षे कार्यकारी मंडळात निवडून आणण्यात पुढाकार त्यांनीच घेतला. याशिवाय जनता हायस्कुल धर्मनिरपेक्ष लोकांच्या हातात राहील याची काळजी घेतली. जनता हायस्कुल हे सामाजिक परिवर्तनाचेच केंद राहावे अशी खटपट मरेपर्यंत केली. जातीयवाद व संकुचित धर्मवादापासून देशाला वाचवायचे असेल तर 'ब्रॉड डेमोक्रॉटिक फ्रंट' उभारावयास हवा म्हणून ते सातत्याने मांडणी करीत असत. असा व्यापक दृष्टीकोन असल्यामुळेच महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणजेच आचार्य अत्रे जनता हायस्कुलमध्ये तीन वेळा भेट देऊन गेले. कॉ दत्ता देशमुखांनी जनता शिक्षण संस्थेसाठी जागा मिळवून  दिली. बिहारचे राज्यपाल प्रा. आर डी भंडारे हे जनता शिक्षण संस्थेचे आजीव सभासद होते. ते बहुतेक वेळा सर्वसाधारण सभेस उपस्थित असत. भारताच्या महान समाज शास्त्रज्ञ गेल ऑमवेट तीन वेळ या शाळेत प्रत्यक्ष येऊन विद्यार्थ्यांस आणि शिक्षकांना  मार्गदर्शन करण्यास आले होते.हजारो बालकांच्या आई सिंधुताई सकपाळ यांना आग्रहाने शाळेत बोलावून शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत त्यांचा हृद्य सत्कार केला. आपल्या जनता शिक्षण संस्थेचा शैक्षणिक आणि सांस्कृतिक दर्जा कायम राहावा मुलांना व शिक्षकांना मराठी साहित्याचे मार्गदर्शन व्हावे म्हणून शिक्षण महर्षी के जी अक्षीकर यांना हायस्कुलचे प्रथम मुख्याध्यापक म्हणून आणले. बालवयातच देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग घेणारे, विविध आंदोलनात आग्रही भूमिका घेऊन संघर्ष करणारे आणि कोळी समाजाचे प्रश्न ऐरणीवर आणून त्या प्रश्नांची तड लावणारे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड मणिशंकर कवठे यांचे वार्धक्याने वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. कवठे यांच्या समर्पित जीवनाची ज्योत दिनांक १६ ऑगस्ट २०१८ रोजी विचारांचा वसा मागे ठेऊन अनंतात विलीन झाली.

अत्यंत स्वच्छ पंधरा शुभ्र शर्ट, दररोज ढाढी करणारा, केस विंचरणारा, मित्रमंडळींसोबत चारचौघात चहा खारी आवडीने खाणारा, मान खाली ठेऊन चालणारा परंतु थंड डोक्याचा अन विचाराने पक्का असलेला आगळा वेगळा लालबावाटेवाला कॉ कवठे मुंबईच्या चिरस्मरणात कायमचा राहील.

कृष्णा ब्रीद - निवृत्त मुख्याध्यापक, जनता शिक्षण संस्था वरळी





रवींद्र मालुसरे  

अध्यक्ष,मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई ९३२३११७७०४ 


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संकल्पपूर्ती दाता : स्व. तानाजीदादा मालुसरे

कर्तबगार माणिकराव जगतापांची लेक स्नेहलदीदी

बैल दिवाळी इतिहास, संस्कृती आणि शेतीचे धागे विणणारा सण