स्व. माणिकराव जगताप : सवेंदनशील कर्तबगार नेता

 

स्व. माणिकराव जगताप : सवेंदनशील कर्तबगार नेता 

कोकणातील महाडचे राष्ट्रवादीचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचे अकाली निधन मनाला चटका लावणारे होते. त्या दिवशी बातमी घेऊन येणारी सकाळ अत्यंत धक्कादायक आणि क्लेशदायक होती.  सामान्य जनतेशी घट्ट नाळ असलेला, मतदारसंघाच्या विकासासाठी तळमळीने झटणारा माणिकरावांच्या रूपाने लोकनेता हरपला होता. व्यक्तिगत पातळीवर माझे संबंध अतिशय जवळचे होते.  काँग्रेसने चांगला लोकप्रतिनिधी आणि मी निकटचा सहकारी गमावला होता. त्यांच्या जाण्याने कोकणातील राजकीय क्षेत्रातील  कार्यकुशल व लोकाभिमुख नेतृत्व हरपले, देश, राज्य, कोकण एका स्वच्छ, पारदर्शी आणि उच्चशिक्षित राजकारण्यास मुकला आहे. तरूण, निष्ठावंत, प्रचंड क्षमता असलेले आणि जबरदस्त उमदे नेतृत्व त्यामुळे काळाच्या पडद्याआड गेले.  अत्यंत कमी वयात त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपली छाप पाडली होती.  काँग्रेसचे युवा नेते, माजी आमदार माणिकरावांच्या निधनानं महाराष्ट्रानं, देशानं एक अभ्यासू, कार्यकुशल, नेतृत्व गमावले आहे. जनसामान्यांशी एकरूप असलेला, विकासासाठी झटणारा लोकनेता हरपला अशीच भावना कोकणात आणि महाराष्ट्रात होती.   मुंबईत रुग्णालयात उपचार सुरू असताना माणिकराव यांनी अखेरचा श्वास घेतला. दुर्दैवाने काळाने एक मोठी क्षमता असलेले नेते आपल्यातून हिरावून नेले आहे. माणिकराव जगताप यांच्या निधनाने एक स्वयंभू नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. 
रायगड जिल्ह्याचे राजकारण डोळ्यांपुढे आणले की, अनेक दिग्गज आणि कर्तबगार राजकीय नेते डोळ्यांपुढे येतात. त्यात गेल्या पंचवीस वर्षांपासून माणिकराव यांचे स्थान अग्रणी होते.  आपल्या कर्तबगारीने त्यांनी आपला दबदबा निर्माण केला होता. एखादा प्रश्न हाती घेतल्यानंतर तो तडीस लावेपर्यंत ते स्वस्थ बसत नसत.  रायगडच्या  प्रत्येक क्षेत्रातील प्रश्नांची त्यांची जाण होती.  विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करत त्यांनी सार्वजनिक जीवनातील पहिलं पाऊल उचलले. महाविद्यालयीन विद्यार्थी नेतृत्व करण्यापासून पुढे युवक काँग्रेसमध्ये ठेवलं होतं, पुढे जिल्हापरिषद सदस्य, रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, नंतर लोकप्रिय आमदार ही वाटचाल स्वत:च्या हिंमतीवर केली.  वजनदार नेते अशी त्यांची प्रगती होत गेली. ही करताना अनेकांच्या मदतीला धावून येणारा आपला हक्काचा माणूस अशीच त्यांच्याबद्दल असे.  प्रत्येकाशी मैत्री ठेवत, पक्षीय चौकटीच्या पलीकडे जाऊन संबंध ठेवणारे एक उमदे आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणजे श्री माणिकराव. मतदारसंघातील जनतेच्या सुख-दु:खांशी एकरूप झालेले त्यांचे नेतृत्व होते. महाड-पोलादपूर-माणगाव मतदारसंघातील गावागावात, घराघरात त्यांचा लोकसंपर्क होता. या डोंगराळ तालुक्याच्या अविकसित भागाला पाणी मिळवून देण्यासह भागाच्या विकासासाठी त्यांनी तळमळीने काम केलेजनसामान्यांशी घट्ट नाळ असलेला, शेतकरी, कष्टकरी, वंचित, उपेक्षित, समाजातल्या दुर्बल घटकांसाठी झटणारा लोकप्रिय नेता, एक कार्यक्षम लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. अभ्यासू, चिंतनशीलपणा, परखड, सजग नेतृत्व, त्यांच्यातील माणुसकी आणि निखळ-निकोप मैत्री, वक्तशीरपणा, त्यांच्या मनाचा मोठेपणा, त्यांच्यातील आक्रमक व स्पष्टवक्तेपणा, त्यांच्या नजरेचा धाक, अंत:करणातील हळवेपणा व भावुकपणा, त्यांच्यातील आध्यात्मिक श्रद्धाळूपणा, त्यांच्या स्वभावातील मिश्कीलपणा आदी विविध पैलू आहेत.

राज्यातील नेतृत्वासाठी, कोकणच्या अस्मितेसाठी ते सदैव आक्रमक राहिले. त्यांनी स्वत:चा आदर्श स्वत: निर्माण केला व संपूर्ण महाराष्ट्रात आणि राजकारणातही हे दाखवून दिले. त्यांनी अतिशय कमी वयात महाराष्ट्राच्या राजकारणावर पाडलेली छाप कौतुकास्पद होती. महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभावशाली आणि अनेक वादळं पाहिलेल्या नेत्यांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक चढ-उतार आले, पण त्यात ते सदैव खंबीर राहिले. विधानसभा निवडणुकांत त्यांचा पराभव झाला, तीनवेळा त्यांना पराभव पाहावा लागला. पण लोकनेत्यांसाठी या क्षुल्लक गोष्टी ठरल्या. ते पुन्हा पुन्हा  राजकारणात सक्रियच  राहिले आणि त्यांची लोकप्रियतेची यशाची कमान चढतच राहिली. त्यांच्याकडे नेतृत्वगुण व संघटन कौशल्य होते. त्यांचा जनसंपर्कही व्यापक होता.  राजकारणाची कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना या क्षेत्रांत आपला ठसा उमटविणारे माणिकराव जगताप यांची वाटचाल थक्क करायला लावणारी आहे. त्यात माणिकराव हे  झंझावातासारखे असल्याने त्यांनी एक वेगळेच स्थान निर्माण केले होते. ते रोखठोक बोलत. अशा बोलण्याचा फटकाही काहीवेळा त्यांना बसला. मात्र, अंतर्यामी ते मृदू होते. त्यांचा साधेपणा, त्यांचं हास्य, जमिनीशी असलेली नाळ, नेतृत्वाशी आणि पक्षासोबत असलेली निष्ठा व मैत्री नेहमीच आठवत राहिल. . तळागाळातल्या कार्यकर्त्यांना ओळखणारा, जनतेच्या प्रश्नांची अचूक जाण असलेला दूरदर्शी, पारदर्शी आणि सामान्यांना आपला वाटणारा जाणता लोकनेता म्हणजे माणिकराव

कोकण हा तर त्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न. कोकणातले अनेक जटील प्रश्नांवर प्रशासनापासून ते मंत्र्यांपर्यंत नेऊन ते सोडवून घेत. ती सोडविण्याची त्यांची एक वेगळी आक्रमक शैली होती.  त्यामुळे कोकणच्या विकासाचा ध्यास घेत, आजच्या पिढीतील कोकणातले देखील ते अभ्यासू नेते ठरले आहेत.   त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक चढ-उतार आले, पण त्यात ते सदैव खंबीर राहिले. कुठल्याही आव्हानांना सामोरे जाण्याची त्यांची जिद्द आणि धडाडी ही यापुढच्या  नव्या पिढीतील राजकीय कार्यकर्ते आणि नेते यांना अनुकरणीय अशीच ठरणार आहे.

 हळुवार अशी संवेदनशीलता लाभलेला माणिकराव हा संवेदनशील माणूस ‘लोकनेता’ होतानाही संवेदनशीलच राहिला किंबहुना त्यांच्यातली ही अखंड जागती संवेदनशीलताच त्यांना ‘लोकनेता’ या उपाधीपर्यंत घेऊन गेली. दुसऱ्याच्या दु:खाने माणूस म्हणून डोळ्यांत पाणी येणारा जेव्हा सांघिक पातळीवर ते पुसण्याचा कृतियुक्त यशस्वी प्रयत्न करतो तेव्हा तो लोकनेता म्हणून गणला जातो; आणि यातील सातत्य तो जेव्हा टिकवून ठेवतो तेव्हा तो ‘संवेदनशील लोकनेता’ म्हणून लोकांना आपला वाटतो. कॉँग्रेसच्या आदर्शांवर निष्ठा ठेऊन चालणारा प्रचंड ताकत असणारा माणिकराव हा नेता होता, स्वपक्षीयांच्या भूमिकेला विरोध न करता इतरांच्या भूमिकांचे स्वागत करणारा दिलदार आणि धाडसी नेता, अशी ओळख म्हणजे माणिकराव. 

माणिकरावांच्या पश्चात त्यांचा राजकीय वारसा कोणाकडे असणार याचा निवाडा त्यांनी आपल्या हयातीतच घेतला होता. त्यांची कन्या स्नेहलताई यांना राजकारणात पदार्पण करताना अडचणी आल्या नाहीत. मात्र त्यांनी राजकीय प्रगल्भता दाखवत राजकारणात स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. आपल्या पित्याच्या निधनाचे दुःख काळजाच्या कोपऱ्यात ठेवत त्यांनी चारच दिवसात पूरग्रस्त महाडकरांच्या सेवेसाठी धावल्या. त्यामुळे  महाडच्या  नगराध्यक्षा म्हणून त्यांनी राजकारणात स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे.  भविष्यात त्यांची उज्वल वाटचाल त्यांना प्रगतीकडे घेऊन जाणारी असणार आहे मात्र त्यासाठी त्यांनी लोकसंपर्क वाढवायला हवा.

त्यांचे सर्व पक्षांच्या नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी जवळकीचे, मित्रत्वाचे, सोहार्दाचे संबंध होते. सामाजिक-ऐत्याहासिक काही प्रश्नावर चर्चा करायची असली तर  एकमेकांचा फोनाफोनी असायचीच. माझी आणि त्यांची पहिली भेट १९८८ मध्ये मुंबईच्या दामोदर हॉलमध्ये झाली. आमच्या खडकवाडी गावच्या 'मालुसरे बंधू ऐक्यवर्धक मंडळाने' वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. महाडचे काँग्रेसनेते ऍड सुधाकर सावंत यांच्या सोबत माणिकराव आले होते. तालुक्याचे काँग्रेसचे नेतृत्व करणारे स्व महादेवराव मालुसरे, श्री ज्ञानोबा मालुसरे यांचा कार्यक्रम मुंबईत यशस्वी करण्यासाठी आवर्जून त्यांनी हजेरी लावली होती. पुढे नरवीर सूर्याजी मालुसरे यांच्या समाधीचे बांधकाम आणि परिसर सुशोभित करण्यासाठी  माजी आमदार चंद्रकांत देशमुख यांना घेऊन आले होते. आमच्या साखर गावावर त्यांनी आणि साखर गावकऱ्यांनी त्यांच्यावर अतोनात प्रेम केले. शक्य होईल असा विकासही केला.  आजच्या पहिल्या स्मृतिदिनी  त्यांचे  हसणे, त्यांचे नेतृत्व, पक्षाशी निष्ठा आणि मैत्री माझ्या कायम आठवणीत राहिल."त्यांना भावपूर्ण आदरांजली !!



रवींद्र मालुसरे

अध्यक्ष

मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई

९३२३११७७०४


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संकल्पपूर्ती दाता : स्व. तानाजीदादा मालुसरे

कर्तबगार माणिकराव जगतापांची लेक स्नेहलदीदी

बैल दिवाळी इतिहास, संस्कृती आणि शेतीचे धागे विणणारा सण