मराठीच्या भल्यासाठी दिवाळी अंक परंपरा जपू या !
दिवाळी ! दिव्यांची आरास. रांगोळीचा थाट, पक्वानांचा घमघमाट आणि फटाक्यांची आतषबाजी ! दिवाळी म्हणजे दीपोत्सव आणि दीपोत्सव म्हणजे आनंदाचा उत्साह, उल्हासाचा उत्सव ! प्रसन्नतेचा उत्सव, प्रकाशाचा उत्सव. अशी ही दिवाळी मराठी माणसांच्या नसानसातून झिरपत असते. दिवाळी म्हणजे दीप मांगल्याचा सण. रोषणाई,फराळ आणि फटाक्यांची आतिषबाजी हे दिवाळी सणाचे वैशिष्ट्य. त्याचप्रमाणे दिवाळी अंक हा दिवाळी सणाचा एक अविभाज्य भाग आहे. म्हणूनच दीपावली सणाची केवळ चाहूल सुद्धा अबाल वृद्धांना हर्षभरित करते.
दिवाळी' येते तीच मुळात हसत, खेळत, नाचत. सभोवताल प्रकाशाने, देदीप्यमान तेजाने उजळून टाकत. सोबतीला असतात
गतकाळाच्या दिवाळीच्या आठवणी, वर्तमानकालीन अपेक्षा आणि पुढील वर्ष आनंदात, सुखासमाधात जावं, ह्या आशा आणि इच्छा. दिवाळी म्हटलं की पहाटेची
अभ्यंगस्नानं, उटणी, मोती आणि म्हैसूर चंदन साबणाचे सुवास, अत्तरं, फराळ, फटाके, आकाशकंदील, पणत्या, रांगोळी, नवीन कपडे हे सारं असतंच, त्याचबरोबर दिवाळी अंक घरी आल्याशिवाय बऱ्याच
मराठी घरांत ह्या सणाची पूर्तता होत नाही! दिवाळीची चाहूल लागताच मराठी माणूस आणखी
एका गोष्टीत गुंतून राहतो ते म्हणजे दिवाळी अंक. ह्या दिवाळी अंकांनी मराठी मनाला
मोहवून टाकले आहे.
महाराष्ट्रासह
संपूर्ण भारत आणि जगभरातील काही ठिकाणी दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी होते.
प्रत्येक सण, उत्सवावर त्या
त्या प्रदेशातील सांस्कृतीक प्रथा, परंपरांचा प्रभाव असतो. पण, महाराष्ट्रात दिवाळी सणाचा एक वेगळाच पैलू पुढे येतो. ज्याला महाराष्ट्राच्या
सांस्कृतिक इतिहासात अत्यंत मानाचे स्थान आहे. हा पैलू म्हणजे दिवाळी अंक.
दिवाळीच्या फराळासोबत जर दिवाळी अंक नसेल तर, त्या वर्षीची दिवाळी काहीशी सुनी सुनी गेली असे
वाटते. म्हणूनच भारतीय छापाईच्या इतिहासात वाचन परंपरेचा एक मोठा आयाम दिवाळी
अंकांनी व्यापला आहे. जो केवळ मराठी भाषेतच पहायला मिळतो. अर्थात, पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजा महोत्सवाच्या
निमित्ताने विशेषांक, गुजराती भाषेतही
दिवाळी अंक छापले जातात. पण, त्यांचे प्रमाण अगदीच अल्प आहे. दिवाळी अंकाची सुरुवातच मुळात साहित्यिक
प्रेरणेतून झाली आहे.
या दिवाळी
अंकांच्या उगमतेचा इतिहास फार 'मनोरंजक' आहे. साहित्य
क्षेत्रातील दिवाळी अंकांची प्रथा सुरु केली ती मनोरंजनकार काशिनाथ रघुनाथ तथा का
र मित्र यांनी १९०९ साली. एकूण २०० पृष्ठसंख्या असलेल्या या दिवाळी अंकाची किंमत
केवळ १ रुपया होती. हिरव्या रंगाच्या जाड कागदाच्या मुखपृष्ठावर एक मुलगा व एक
स्त्री अंक पाहत असतानाचे चित्र असलेल्या या अंकात एकूण ४२ पाने जाहिरातीची होती.
मात्र सुरुवातीची २६ पाने संपल्यानंतर अनुक्रमणिका दर्शविणारी ४ पाने होती.
त्यानंतरच्या पानावर भारताचे तत्कालीन राजे किंग एडवर्ड सात यांचे चित्र व त्या
पुढील पानावर संपादकाचे 'दोन शब्द' होते. आजच्या
जाहिरातीचे बीज त्या काळातही पेरले गेले होते याची प्रचिती या दिवाळी अंकातील 'स्वदेशी लोटस' या साबणाच्या जाहिरातींवरून येते. जाहिरातीसोबत
असलेले कुपन घेऊन येणाऱ्यास एक साबण बक्षीस देण्याची ती योजना विविधोपयोगी
वस्तूंच्या जाहिरातींसोबत 'दामोदर सावळाराम आणि मंडळी' यांची १६ पानी दीर्घ जाहिरात आहे. . मनोरंजनाचा हा दिवाळी खास अंक
महाराष्ट्रीयांस प्रिय होवो, अशी अपेक्षा त्यांनी शेवटी व्यक्त केली आहे. बालकवींची सुप्रसिद्ध असणारी
‘आनंदी आनंद गडे’ ही कविता या पहिल्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली होती!
यानिमित्ताने सांस्कृतीक प्रथा, परंपरांचा एक वेगळाच पैलू पुढे येतो. ज्याला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक
इतिहासात अत्यंत मानाचे स्थान आहे. गेली
११३ वर्षे मराठी साहित्याचा हा जागर अखंड होत आहे. हे सातत्य इतर भाषांमध्ये फारसे
घडताना दिसत नाही. दिवाळी अंक म्हणजे मराठी भाषेची मिठ्ठास असून, ती खास महाराष्ट्राची साहित्यिक दौलत आहे.
मराठी संस्कृतीमधील दिवाळी अंकांचे योगदान मोठे असून, लेखकांच्या दृष्टीने त्यांच्या जडणघडणीची ती एक
शाळाच आहे. दिवाळी अंकांनी मराठी साहित्यातील विविध प्रकार हाताळले असून, त्यातून अनेक लेखक-साहित्यिक नावारूपास आले
आहेत. गेल्या ११३ वर्षांमधील दिवाळी अंकातील साहित्यिक, कवी कोण होते यांची नुसती यादी बनवली, तरी त्यातून मराठीत किती विपुल आणि व्यापक
प्रमाणावर साहित्यनिर्मिती झाली आहे हे लक्षात येते. शतकोत्तर वर्षाच्या कालखंडात दिवाळी सणात
आमूलाग्र बदल झाला आहे. त्याला दिवाळी
अंकही अपवाद ठरले नाहीत. दिवाळी व दिवाळी अंक या नात्यांमधील वीण दिवसेंदिवस अधिक
घट्ट होत चालली आहे. मराठी माणसाची 'दिवाळी' दिवाळी अंकाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही ! ‘दिवाळी-दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा’ या उक्तींमधील आनंद दिवाळी
साजरा करण्यातील अनेक गोष्टींइतकाच दिवाळी अंक हा त्याचा अविभाज्य भाग बनला आहे.
प्रत्येक दिवाळी
अंकाचा स्वत:चा असा एक वाचक वर्ग असतो. तो शक्यतो मिळेल त्या किमतीला तो अंक विकत
घेतो. यंदाही तसेच घडेल, असे दिवाळी अंक संपादक आणि
विक्रेत्यांना वाटते आहे. कारण
दिवाळी अंक आले, की त्यावर उड्या
मारणारे वाचक अजूनही तितक्याच निष्ठेने ते विकत घेताना दिसतात. दिवाळीच्या फराळासोबत
जर दिवाळी अंक नसेल तर, त्या वर्षीची दिवाळी काहीशी सुनी सुनी गेली असे वाटते. म्हणूनच भारतीय
छापाईच्या इतिहासात वाचन परंपरेचा एक मोठा आयाम दिवाळी अंकांनी व्यापला आहे.
दिवाळी अंकांच्या निर्मितीला शंभर वर्ष होऊन गेली. आजही नव्या पिढीला एकदा तरी दिवाळी अंक प्रकाशित करायचा याची भुरळ पडत असते. दरवर्षी नवनवीन दिवाळी अंक प्रकाशित होत असतात. सध्याच्या घडीला मराठीत पाचशेहून अधिक दिवाळी अंक प्रकाशित होतात. हा आकडा आश्चर्य चकित करणारा आहे. यात दर्जेदार असे अंक खूप कमी असतात हि गोष्ट वेगळी पण आजही दिवाळी अंक नव्या पिढीला आकर्षित करतात याचं समाधान वाटतं. मजकूर कमी आणि जाहिराती जास्त असं स्वरूप अलीकडच्या अनेक दिवाळी अंकाचं दिसू लागलंय. पण तरीही दिवाळी अंकांच्या या गर्दीत स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व ते टिकवून आहेत. दिवाळी अंकांचा व्याप सांभाळणे सोपे नाही, त्यातून मिळणारे उत्पन्नही बेताचे असते. असे असूनही मराठीतले बरेचसे म्हणजे मौज - १०२ वर्ष, सृष्टी ज्ञान - ९६ वर्ष, किरात - ८९ वर्षे,वसंत - ८५ वर्षे, दीपावली - ८० वर्ष, नवल आणि हंस - ७१ ७९ वर्ष, साधना साप्ताहिक - ७६ वर्ष, मोहिनी - ७६ वर्ष, एकता - ७६ वर्षे, आवाज - ७४ वर्ष, ललना ६८वर्ष, माहेर, मेनका जत्रा ६२ ६४ वर्ष, धनंजय ६४ वर्ष, तरुण ६४ वर्ष, प्रसाद - ६५ वर्ष, महाराष्ट्र टाइम्स - ६४ वर्षे, जत्रा मेनका प्रकाशन - ६४ वर्षे, प्रपंच - ६४ वर्ष, उसमळा - ६३ वर्ष, चंद्रकांत - ६१वर्ष, किशोर - ५३वर्ष, मनशक्ती - ५० वर्षे, ललित - ४९वर्ष, निहार - ४८ वर्ष,कथाश्री - ४३वर्ष इत्यादी दिवाळी अंक ४० किंवा त्याहून अधिक वर्षे निघत आहेत. १९५० ते ८० या काळातील दिवाळी अंक हे खरोखर साहित्यिक विशेषांक होते आणि ते जाहिरातींचा वापर केवळ आधार म्हणून करत. जसजसा काळ पुढे जाऊ लागला तसतशी महाराष्ट्रातील मराठी मनाची साहित्यिक, सांस्कृतीक भूक वाढत होती. यात दिवाळी अंकांनी मोलाची भूमिका बजावत हे खाद्य अधिक सकसपणे द्यायला सुरुवात केली. या वाढत्या भुकेला मराठी प्रकाशक साप्ताहिके, मासिके, पुस्तके आणि दैनंदिन घडामोडींसाठी वृत्तपत्रे जमेल तसे खाद्य देत आहेत आजही देतात. वैचारिक देवाणघेवाण होत पुढे वाढलेली वाचकांची भूक पाहून साप्ताहिकांनी विषयनिवडीत पहिल्यांदा कात टाकली. त्याचे पडसाद दिवाळी अंकातही उमटले. कथा, कविता, नाटक, कादंबरी यांसोबतच इतर भाषांमधील लेखकांचे अनुवादित साहित्य, भाषांतरीत कथा, कादंबऱ्या, कविता, नाटकं दिवाळी अंकात छापून येऊ लागली. आज तर दिवाळी अंकांचे स्वरुप इतके बदलले आहे की, दर वर्षी मोठ्या संख्येने दिवाळी अंक बाजारात येतात व स्वत:च्या वैशिष्ट्यांसह ते वाचकांपर्यंत पोहोचतातही. विशेषतः धार्मिक, महिला, ज्योतिष, आरोग्य, रहस्यकथा, विनोद, पाककला या वैविध्यपूर्ण प्रकारांसह ते वाचलेही जातात. काही दिवाळी अंक तर अलीकडे पाणी, सोने, गड किल्ले, नातेसंबंध इत्यादी विषयांवर दर वर्षी स्वतंत्र विषय घेऊन त्याचा विशेषांक काढत असतात. काही संपादक आता तर जाहिराती जास्त व त्याला तोंडी लावायला साहित्य अशी अवस्था आहे.
दिवाळी अंकांना
बँकांच्या जाहिराती यंदा कमी प्रमाणात मिळाल्या आहेत. निवडणुकांची आचार संहिता ऐनवेळी धावपळ करणाऱ्या संपादकांना अडचणीची ठरली आहे. खासगी
कंपन्यांनीही हात आखडता घेतला. दिवाळी अंकांच्या संपादकांना स्नेहसंबंधांतून
मिळालेल्या जाहिरातींवरच अवलंबून राहावे लागले आहे. कोविडच्या प्रादुर्भावानंतर छापील साहित्याच्या विक्रीवर परिणाम झाला आहे, रोजची दैनिके pdf स्वरूपात किंवा ऑनलाईन उपलब्ध झाली आहेत.
प्रकाशकांच्या अडचणी आणि इतर समस्यांमुळे जो पुस्तकांचा खप आहे तो मंदावला असे
म्हणता येईल. याचाच परिणाम या वर्षीच्या दिवाळी अंकांवर मोठ्या प्रमाणावर दिसून
येणार आहेत.
नवी जिद्द बाळगत, निराशेचे ढग बाजूला करीत गेल्यावर्षीप्रमाणे
यंदाही अनेक दिवाळी अंक तयार होऊन बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. 'हल्ली जाहिराती मिळत नाहीत, त्या मिळाल्या तरी मागाहून त्यांचे पैसे वसूल
करणे फार जिकीरीचे होते', 'वाढत्या किंमती आणि घटता वाचक या दुष्टचक्रामुळे आता अंक काढणे परवडत नाही',
अशा तक्रारी कानावर
येतात. या तक्रारी खोट्या आहेत, असे नाही. मात्र, तरीही पाचशेच्या
घरात अंक निघतात आणि दिवाळी अंकांची परंपरा सुरू राहावी यासाठी संपादक, लेखक सतत प्रयत्न करतात हेही तेवढेच
महत्त्वाचे. आता काही दिवसांपासून कुठे आपल्या भारतात जनजीवन सुसह्य होऊ पाहत आहे.
परंतु जगभरात करोनाची साथ चालू आहेच,
महाराष्ट्रामधे गेल्या
वर्षभरात वादळ आणि पावसाच्या महापूराने
थैमान घातलेले आपण अनुभवले आहे. निसर्ग
सर्व बाजूंनी असहकार करत असताना संकटांच्या काळात मनुष्याला सकारात्मक रहाण्यासाठी,
आलेल्या संकटांशी
झुंजण्यासाठी, मनाला पुन्हा
उभारी येण्यासाठी साहित्य महत्वाची भुमिका बजावत असते. कोरोनाची टाळेबंदी, समुद्री वादळ, ढगफुटी पावसामुळे अनेक ठिकाणी आलेले महापूर
व विस्कळीत झालेले जनजीवन या
पार्श्वभूमीवर ही स्थिती अपेक्षित असूनही संकटाच्या काळातही मराठी भाषेतील दिवाळी
अंकांची ही भव्य परंपरा, आपले सांस्कृतिक वैभव जपले जावे केवळ
परंपरा खंडित होऊ नये या हेतूने
प्रकाशकांनी दिवाळी अंकांची निर्मिती केली आहे. तुम्हा-आम्हा वाचकांना वैचारिक
मेजवानी उपलब्ध करून दिली जात आहे हे नक्कीच कौतुकास्पद आहे. साहित्य त्याच्या थकलेल्या मनाला विरंगुळा
देतेच देते पण त्यासोबत हे ही दिवस जातील आणि पुन्हा ताठ कण्याने उभे रहाण्याची
आशा आणि इच्छा जागृत करुन संकटकाळात धीर आणि दिलासा देते.
तंत्रज्ञानाच्या
युगात रोज नवनवीन बदल होत आहेत. अनेक गोष्टीत थोड्याबहुत प्रमाणात ते बदल अनुभवता
येत आहेत. असाच बदल डिजिटल जगात होतोय. पहिला ‘डिजिटल’ स्वरूपातील दिवाळी अंक २०००
मध्ये प्रसिद्ध झाला होता. ‘ऑनलाइन’ प्रकाशित झालेल्या घटनेला यंदा बावीस र्वष
पूर्ण होत आहेत. एकवीस वर्षापूर्वी कोणी कल्पनासुद्धा केली नसेल की, इंटरनेटच्या आणि समाज माध्यमांच्या या युगात
आपण पुस्तके आपल्या हातातील मोबाईलवर वाचू शकू. पण प्रत्येक दशक आपल्या बदललेल्या
काळाची भाषा बोलत असतं. डिजिटल रूपात संगणकावर, मोबाइलवर आणि किंडल किंवा टॅब्लेटवर वाचता
येणारे दिवाळी अंक, ऑडिओ बुक दिवाळी
अंक, व्हिडीओ रूपात संवाद
साधणारे दिवाळी अंक अशी एक नवी परंपराच सुरू झाली आहे. या परंपरेनं जसं लोकप्रिय साहित्य जगभरातल्या
मराठी भाषकांना तळहातावर उपलब्ध करून दिलं, तसंच यातून अनेक नवे लेखक घडवले आहेत. तो
म्हणजे पुस्तके, मासिके, पाक्षिक नियतकालिके यामध्ये. तसेच प्रकाशित
होणार्या आजच्या दिवाळी अंकांमध्ये सुद्धा ई-जगातला बदल पाहायला मिळतोय. पारंपरिक
छापील दिवाळी अंकांचा आनंद घेतानाच नव्या माध्यमातील प्रयत्नांचंही स्वागत
टेक्नोसॅव्ही नवीन पिढीने करायला हवे.
भाषा आणि संस्कृती एकमेकींच्या हातात हात घालून
वाटचाल करतात, एखादी भाषा नष्ट
होते तेव्हा शेकडो वर्षांच्या संचितातून साकार झालेली, संपन्न झालेली संस्कृतीही लयाला जाते. आपल्या
पूर्वसूरींच्या श्रमातून, कौशल्यातून, बौद्धिक-सामाजिक
मंथनातून आकाराला आलेली अशी संस्कृती आपल्या डोळ्यांदेखत संपू नये असे वाटत असेल
तर त्या संस्कृतीच्या खुणा आणि प्रतीक म्हणून जे उरले आहे ते जपणे, वृद्धिंगत करणे हे आपले कर्तव्य आहे याची जाणीव
मराठी भाषिक अस्मिता म्हणून आपल्याच मुळा-नातवंडांमध्ये रुजवायला हवी.
मराठी भाषा जगवा, समृद्ध करा. मराठी माध्यमाच्या शाळा ओस पडत आहेत, बंद होत आहेत. शतकी परंपरा असूनही मराठीला अभिजाततेचा दर्जा मिळत नव्हता तो या निवडणूकीपूर्वी केंद्र सरकारने घोषित केला आहे ही आनंदाची गोष्ट घडली आहे . इंग्लिश माध्यमांच्या शाळांत मराठी भाषेची सक्ती करा अशा घोषणा आणि चर्चा आपण अधूनमधून करीत असतो. शंभर वर्षात अनेक आक्रमणे पचवत आणि स्वीकारत आजही चारशे-पाचशेच्या आसपास प्रसिद्ध होणारे दिवाळी अंक मराठीची पताका खांद्यावर घेऊन मिरवत आहेत. दिवाळी अंकांची ही परंपरा तशीच सुरू रहावी यासाठी प्रत्येक मराठी माणसाने आपला वाटा उचलणे गरजेचे आहे. मराठी भाषा जगवायची असेल, तिचं स्थान भक्कम करायचं असेल, तर आज आपण सर्वांनी निश्चय करणे गरजेचे आहे. मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईने "मराठी अभिजात भाषा, ज्ञानभाषा करूया चला " हा उपक्रम सुरु केला आहे. सर्व लिहित्या हातांनी यावर लिहून पाठवावे.
महागडे मोबाईल
आणि टी व्ही ने आपली संस्कृती बिघडवण्याचा घाट घातला आहे, पण दिवाळी अंक मराठी माणसांची सांस्कृतिक भूक
भागवित आहेत. अभिरुची वाढविताहेत, मराठी वाचक वाढविताहेत त्याबद्दल ह्या अंकांच्या संपादकांना धन्यवाद द्यायलाच हवेत. त्याचवेळी, दिवाळी अंक प्रकाशकांनी आता नव्या जगातील नव्या
माध्यमांशी मैत्री करणेही गरजेचे आहे. दिवाळी अंक हे केवळ मनोरंजनाचे साधन नाही,
तर ती स्वतःला समृद्ध
करण्यासाठीची ती एक पर्वणी असते. कायदा न करता तिच्या संवर्धनासाठी
आत्मीयतेने मराठी वाचूया, बोलूया आणि लिहूया !
४९ वी राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा-प्रदर्शन २०२४
दिवाळी अंक संपादक-प्रकाशकांना आवाहन ......
१९४९ पासून अनेक उपक्रम आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून सातत्याने कार्यरत असलेल्या आणि वृत्तपत्र लेखन चळवळीचे यंदा अमृतमहोत्सवी सांगता वर्ष साजरे करीत असलेल्या मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ४९ वी राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. संस्थेच्या वतीने १९७६ पासून मराठी भाषेची वैभवशाली दिवाळी अंक प्रदर्शन परंपरा जपली जाते आहे, या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात आणि परदेशात अमेरिका लॉस एंजिइल्स येथे पोहोचणार आहे. या उपक्रमात गोरेगाव येथील मराठी विचारधारा प्रतिष्ठान, अमेरिकेतील लॉस एंजिइल्स येथील "marathiculturalfestivals. Com - MCF Foundation - मराठी कल्चरल अँड फेस्टिव्हल ही संस्था सहभागी होत आहे. या मान्यताप्राप्त आणि लोकप्रिय स्पर्धेसाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातूनही अंक येत असतात. सर्वोत्कृष्ट अंकासाठी मनोरंजनकार का र मित्र स्मृती पुरस्कार तर आवाजकार मधुकर पाटकर पुरस्कृत सर्वोत्कृष्ट विनोदी अंक, साने गुरुजी स्मृती सर्वोत्कृष्ट मुलांचा अंक, सर्वोत्कृष्ट धार्मिक अंक, मराठी विचारधारा प्रतिष्ठान पुरस्कृत वसंतराव होशिंग स्मृती महिला संपादित सर्वोत्कृष्ट अंक, कृष्णराव भानुसे स्मृती उत्कृष्ट दिवाळी अंक, पास्कोल लोबो पुरस्कृत गणेश केळकर स्मृती उत्कृष्ट अंक, मनोहरपंत चिवटे स्मृती सर्वोत्कृष्ट आरोग्य विषयक अंक यासह स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या अंकांचा उत्कृष्ट आणि उल्लेखनीय अंक म्हणून पारितोषिक देऊन मराठी भाषा दिन २७ फेब्रुवारी रोजी मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत गौरव करण्यात येतो. स्पर्धा व प्रदर्शनासाठी आलेले हे अंक मुंबई-ठाणे शहरात प्रदर्शन आयोजित करून मांडले जातात. त्यानंतर हे अंक ग्रामीण भागातील शाळा-वाचनालयांना मोफत दिले जातात. दिवाळी अंकांच्या संपादक-प्रकाशकांनी २ प्रती - रवींद्र मालुसरे, अध्यक्ष-मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई, घरकुल सोसायटी, रूम न. ६१२, ६ वा मजला, सेंच्युरी बाजार लेन, भुस्सा इंड. समोर, प्रभादेवी, मुंबई - ४०० ०२५ येथे पाठवाव्यात. असे आवाहन प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी रवींद्र मालुसरे ९३२३११७७०४ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.
मराठी वृत्तपत्र लेखक संघ
मुंबई
९३२३११७७०४
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा