Ticker

6/recent/ticker-posts

श्री समर्थ क्रीडा मंडळ प्रभादेवी सुवर्णमहोत्सवी नवरात्रोत्सव : आठवणींचा आणि नव्या संकल्पांचा उत्सव

श्री समर्थ क्रीडा मंडळ प्रभादेवी

सुवर्णमहोत्सवी नवरात्रोत्सव : आठवणींचा आणि नव्या संकल्पांचा उत्सव

मुंबई ही स्वप्नांची नगरी म्हणून ओळखली जाते; पण या महानगरीला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरांची समृद्ध किनारही लाभली आहे. मुंबई नगरीला ‘सोन्याची नगरी’ असेही म्हटले जाते. पण त्यापेक्षा तिला मंदिराची नगरी म्हणणेच अधिक संयुक्तिक ठरेल. मुंबई नगरीत जवळ जवळ ४८१ पेक्षा अधिक मंदिरे आहेत. त्यापैकी सर्वात जास्त मंदिरे मारुतीची, त्याखालोखाल क्रमांक येतो शंकर भगवानांची तर देवींची मंदिरे सुद्धा अनेक पुरातन आहेत.

ब्रिटिशांच्या काळापासून मुंबईच्या जडणघडणीत मोलाचा वाटा होता तो गिरणी कामगारांचा. मुंबईच्या मध्यभागी असलेल्या भागाला "प्रभादेवी" हे नाव ज्यावरून पडले आहे ते प्रभादेवीमाता या देवीच्या नावावरून. या देवीचा आजुबाजूचा परिसरही सेंच्युरी, स्टँडर्ड, बॉम्बे डाईंग आदी गिरण्यांचा. हजारोंनी राहणाऱ्या गिरणी कामगारांच्या अनेक चाळी व वाड्यांचा हा परिसर. यात काम करणारी बरीचशी मंडळी ही याच परिसरात राहायची. सर्वचजण गावागावातून कामानिमित्त मुंबईत आली, त्यामुळे साहजिकच गावातल्या (विशेषतः कोकणातल्या) जत्रांचे स्वरूप येथेही आले. तत्कालीन मुंबई बेटावरच्या रूढी व परंपरा बदलत्या काळासोबत अस्तंगत होत गेल्या आणि त्याच ओघात मुंबापुरीतील वार्षिक जत्राही काळाच्या पडद्याआड जाऊ तत्कालीन मुंबई बेटावरच्या रूढी व परंपरा बदलत्या सद्य:स्थितीत जेमतेम हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत यातल्या काही जत्रा मुंबईत उरल्या आहेत. प्रभादेवीची जत्रेची एकेकाळची गर्दी कमी कमी होत गेली आहे. प्रभादेवी येथील वाड्यावस्त्यांची मुंबई टॉवर्स उभे राहत गगनभेदी होत आकाशाला भिडत  चालली आहे. मुंबईची जीवनशैली बदलली तरी प्रभादेवीतील काही परंपरागत सण, उत्सव, जत्रा अजूनही टिकून आहेत.

गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रोत्सवानेही मुंबईच्या सांस्कृतिक जीवनात महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे. नवरात्रोत्सव म्हणजे आदिशक्तीचा जागर. अनादी काळापासून ‘शारदीय नवरात्र’ हे शाक्तपंथीय मानले जाते. या सणाला शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच की हा  शरद ऋतूच्या प्रारंभी येतो. साधारणतः अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा देवी उपासनेचा काळ. आश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून, नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेचा उपवास करून नऊ दिवस मनोभावे पूजा करणे, म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव. म्हणजेच थोडक्यात हा सण नऊ दिवस माता आदिशक्तीची आराधना करण्याचा आहे. पावसाळा बहुतेक संपलेला असतो, शेतांतील पिके तयार होत आलेली असतात, काही तयार झालेली असतात. शेतकरी राजा सुखावलेला असतो, अशा नैसर्गिक आल्हाददायक वातावरणात नवरात्रची सुरुवात होते. दररोज झेंडूच्या फुलांची माळ, आणि निसर्गात उगवलेल्या धनधान्याची पखरण करून देवीपुढे सप्तशतीचा पाठ म्हणत शारदीय नवरात्री व्रत केले जाते.

देवीच्या भक्तीने भारलेले वातावरण, आकर्षक सजावट, पारंपरिक पूजा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि समाजाला एकत्र आणणारा उत्साह यांमुळे मुंबईतील नवरात्रोत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या उत्सवी परंपरेत गेली पन्नास वर्षे सातत्याने योगदान देणारे प्रभादेवीतील श्री समर्थ क्रीडा मंडळ हे आपल्या अर्धशतकाच्या प्रवासामुळे विशेष उल्लेखास पात्र ठरले आहे.

श्री गणेशाला निरोप दिल्यानंतर आनंदाचे व सौख्याचे लेणं लेवून नवरात्र येते. देवीची पुजा करुन घटस्थापना होते व नवरात्रीच्या जागरणाला प्रारंभ होतो. दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती, रेणुका असे विविध रूपे असलेल्या देवींच्या मूर्तीची ठिकठिकाणी प्रतिष्ठापना करण्यात येते हे आपल्याला पाहायला मिळते. नवरात्र उत्सव हा प्राचीन उत्सव असला तरी त्याला प्रथम सार्वजनिक स्वरूप दिले ते १९२६ साली.प्रबोधनकार ठाकरे यांनी. त्यांच्या पुढाकाराने दादरच्या खांडके बिल्डिंगमध्ये महाराष्ट्रातला पहिला सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा झाला. सर्व जाती जमातीच्या गरीब - श्रीमंत, लहान-थोरांना सामावून घेता येईल, असा उत्सव त्यांना सुरू करायचा होता. उत्सवी रूप कायम असावं, पण सामाजिक समता आणि सर्वसामान्यांचे प्रबोधन हा हेतू ठाकरे यांचा असल्याने स्वातंत्र्यपूर्व काळात उत्सवाच्या माध्यमातून समाजप्रबोधन आणि लोकांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने त्यांनी या उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. ती काही प्रमाणात पुढे यशस्वी झाली मात्र सध्याच्या बाजारूपणामुळे या उत्सवातली धार्मिकता कमी झाली आहे हे मुंबईतील काही नवरात्रोत्सवाच्या कामाकडे लक्ष दिल्यानंतर समोर येते.

प्रभादेवीतील सेंचुरी बाजाराजवळील श्री साईसुंदर वसाहतीतील म्हणजे जुन्या शास्त्री नगरमधील श्री समर्थ क्रीडा मंडळची 'आई माऊली ' देवी मात्र गेल्या पाच  दशकापासून परिसरातील भाविकांचे नेहमीच श्रद्धास्थान ठरत आलीय. प्रभादेवीतील अनेक प्रसिद्ध नवरात्रोत्सव मंडळांपैकी हे एक मंडळ. १९७६ साली स्थापन झालेल्या मंडळाने यंदा ५० व्या वर्षात दिमाखात पदार्पण केले आहे. बुसा इंडस्ट्रीजच्या बाजूला असलेल्या शास्त्रीनगर सुरुवातीच्या काळात मर्यादित साधनसामग्री, मोजके कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिकांच्या सहकार्याच्या बळावर सुरू झालेला हा उत्सव आज पन्नास वर्षांचा टप्पा गाठत आहे. या प्रवासात अनेक बदल झाले; पिढ्या बदलल्या, मुंबईचे स्वरूप बदलले, तंत्रज्ञानाने उत्सवांचे स्वरूप बदलले. मात्र देवीवरील श्रद्धा आणि उत्सवामागील सामूहिक भावनेचा धागा कायम राहिला.

पाच दशकांचा श्रद्धेचा प्रवास

या मंडळाच्या वाटचालीत संस्थापक सदस्यांचे योगदान, ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन आणि नव्या पिढीचा उत्साह यांना महत्त्वाचे स्थान आहे. या विभागातील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते स्व. सदानंद हासू तांडेल यांनी संस्थापक म्हणून छोट्या स्वरुपात सुरुवात केलेल्या या उत्सवाला आता मोठे रूप प्राप्त झाले आहे. ज्यांनी सुरुवातीच्या काळात उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली, त्यांच्या परिश्रमांची आठवण काढणे हा या सुवर्णप्रवासाचा महत्त्वाचा भाग आहे. सुरुवातीला झोपडपट्टीचे स्वरूप असलेल्या या वसाहतीमध्ये वीज, पिण्याचे पाणी, सांडपाणी वाहून नेण्यासाठी गटार लाईन या सुविधा नव्हत्या, थोडासा पाऊस पडला तरी नगरालगत असलेल्या गटाराला भरती येत असे आणि त्याचे तुंबलेले पाणी लोकांच्या घराघरात गुडघाभर शिरत असे. (आता हे गटार पूर्णतः जमिनीखाली गाडले गेले असून त्यावरून अटलसेतू ला जोडणारा राज्यसरकारच्या महत्वाकांक्षी उन्नत रस्ता जात आहे. ) या सर्व परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी त्या वेळचे दिवंगत समाजसेवक सदानंद हासू तांडेल तथा सदाकाका आणि त्यावेळची काही मंडळी एकत्र आली आणि शास्त्रीनगर मधील लहानथोर माणसांमध्ये एकजूट, एकोपा व्हावा याहेतूने हा नवरात्र उत्सव सर्वप्रथम सुरु केला. एकमेकांच्या अडचणीला धावून जाणारी वृत्ती माणसांमध्ये जागवली. आणि नैसर्गिक आपत्तीसह चांगले दिवस नगरातील लोकांना यावेत या भावनेने व  हे कुठे तरी बदलले पाहिजे हा विचार करुन या मंडळींनी या मग देवीची स्थापना केली.

यावर्षी गुबगुबीत कोंबड्यावर  बसलेली ६  फुट उभी मूर्ती आहे. मूर्ती उंच आणि चार भुजा  आणि आशीर्वाद देण्याच्या पावित्र्यासह हातात विविध शस्त्रे घेतलेली आहे. या देवीची नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती असल्याने दर्शन घेण्यासाठी परिसरातील भाविकांची गर्दी सतत असते.

 भक्तीबरोबरच संस्कृतीचे संवर्धन

नवरात्रोत्सव हा केवळ धार्मिक विधींपुरता मर्यादित नसतो. तो आपल्या लोककला, संगीत, नृत्य, परंपरा आणि सामाजिक मूल्ये यांचे दर्शन घडवणारा उत्सव आहे. देवीची आरती, भजन, कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि महिलांच्या सहभागातून उत्सवाला व्यापक स्वरूप प्राप्त होते. गेल्या पाच दशकांत या मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमांची परंपरा, सजावटीतील बदल, धार्मिक विधींचे सातत्य आणि नागरिकांचा सहभाग यांचा आढावा घेतल्यास मुंबईतील बदलत्या सामाजिक-सांस्कृतिक जीवनाचे चित्र समोर येऊ शकते. विशेषतः तरुण पिढीला आपल्या परंपरांची ओळख करून देण्याचे कार्य अशा मंडळाच्या माध्यमातून घडते आहे.

एकजुटीचा आणि सामाजिक बांधिलकीचा वारसा

सार्वजनिक उत्सवाचे खरे सामर्थ्य समाजाला एकत्र आणण्यात असते. नवरात्रोत्सवाच्या नियोजनापासून ते विसर्जनापर्यंत अनेक कार्यकर्ते निःस्वार्थ भावनेने योगदान देतात. परिसरातील नागरिक, महिला, युवक, ज्येष्ठ मंडळी आणि विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या व्यक्तींच्या सहभागातून मंडळाची सामाजिक वीण अधिक मजबूत होते. अर्धशतकाची परंपरा साजरी करताना मंडळाने अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी, शैक्षणिक मदत, गरजूंना सहाय्य, स्वच्छता उपक्रम किंवा पर्यावरणपूरक उत्सव याचा विशेष उल्लेख करावासा वाटतो.

बदलत्या काळाशी जुळवून घेतलेली परंपरा

आजच्या डिजिटल युगात सार्वजनिक उत्सवांचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. सोशल मीडिया, डिजिटल निमंत्रणे, आकर्षक प्रकाशयोजना आणि आधुनिक ध्वनिव्यवस्था यांमुळे उत्सवांचे नियोजन अधिक व्यापक झाले आहे. मात्र आधुनिकतेचा स्वीकार करताना परंपरेचे पावित्र्य, शिस्त, सुरक्षितता आणि पर्यावरणाची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे, मंडळाकडून त्याचे पालन होत आहे. यंदाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात मंडळाचे अध्यक्ष विनोद ओटवकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्सव साजरा होत आहे. तर महत्वाचे पदाधिकारी म्हणून खंजिनदार - आशिष पाटील, कार्याध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष निलेश पाटील हे कार्यरत आहेत.

नवसाला पावणारी देवी आहे अशी अढळ श्रद्धा असल्याने मंडळातील प्रत्येक कामात तरुणांचा सहभाग हिरहिरीने असतो, मंडळातील देवीचे भव्य आगमनात मंडळातील तरुणाचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असतो. सजावटीपासून ते देवीच्या प्रत्येक कामात तरुण कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग असल्याची माहिती मंडळाचे सेक्रेटरी हितेश पाटील यांनी दिली. तसेच या परिसरातील बिल्डिंगमधील प्रत्येक बिल्डिंगचे रहिवासी आळीपाळीने जागरणाच्या कार्यकमात सहभागी होत असतो. नवरात्रीतील ९ दिवसात विनामुल्य रास गरबा,भजन, अष्टमीला महाप्रसाद व देवीचा गोंधळ, महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ, होमहवन असे अनेक पारंपारिक कार्यक्रम केले जातात. त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी गरबा, वेशभूषा, निबंध-चित्रकला स्पर्धा,स्मरणशक्ती, प्रौढांसाठी रस्सी खेच स्पर्धा,दहावी-बारावी विद्यार्थी गुणगौरव सोहळा,  कुमारीकांसाठी स्पर्धा मंडळातर्फे असे वर्षभर अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. रक्तदान शिबीर, दुर्घटनाग्रस्तांना मदत आरोग्य शिबीर, चष्मा शिबीर, रक्तदान शिबीर, दुष्काळग्रस्तांना मदत निधी, अशी अनेक कामे केली आहेत. यातले काही कार्यक्रम १ मे या दिवशी मंडळाच्या वर्धापन दिनी होत असतात. हे सर्व कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मंडळाचे अनेक आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते सातत्याने कार्यरत असतात.  विशेषत: नवरात्रीतील सर्व दिवशी मंडळातील महिलांतर्फे परिसरात असणा-या महिला भगिणींकडून देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम केला जातो. देवीला आलेल्या साड्यांचा लिलाव कोजागिरी पौर्णिमे नंतरच्या दिवशी केला जातो. मंडळातील देवीच्या आरतीला संपूर्ण परिसरातील लोकांचा सहभाग असून आरतीचा सोहळा फार मोठा असतो. तसेच अष्टमी आणि नवमीला होमहवन आणि या होमाची पूर्णाहुती नवमीला केली जाते. नवरात्रोत्सवात अष्टमीला यात प्रामुख्याने जागरण, गोंधळ या लोककलेचा समावेश असतो. सर्वजण आनंद व उत्साहाने  एकत्र येऊन धार्मिक भावनेतून निरपेक्षपणे काम करीत असतात सांस्कृतिक कार्यक्रम करताना बाहेरचे कार्यक्रम न करता स्थानिक रहिवाश्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो. महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, होम मिनिस्टर स्पर्धा, पाककला स्पर्धा असतात. दर रोज नवीन कार्यक्रम होत असतात ज्यात अगदी लहान मुलांपासून ज्येष्ठांचा सहभाग असतो.नवरात्रीला सध्या जे सार्वजनिक स्वरुप आले आहे त्यामध्ये मुले मुली नऊ दिवस गरबा खेळतात. मूर्तीचे विसर्जन अगदी पारंपारिक पद्धतीने वाजत-गाजत भावपूर्ण होत मंडळातील लहान मुलांपासून ज्येष्टांसह महिलांच्या हजेरीत देवीला निरोप दिले जाते. पन्नास वर्षांचा प्रवास घडविण्यामागे असंख्य हातांचे योगदान असते. आज मंडळाचे अनेक कार्यकर्ते काळाच्या ओघात आपल्यात नाहीत परंतु त्यांच्या कार्यामुळे त्यांची आपल्या नावाचा न विसरता येणार ठसा कोरून ठेवला आहे. काहींची नावे इतिहासात नोंदली जातात, तर अनेक कार्यकर्त्यांचे परिश्रम प्रसिद्धी पासून दूर राहतात. अशा सर्वांचे स्मरण करणे आणि त्यांच्या कार्याचा गौरव करणे, हे सुवर्णमहोत्सवी वर्षाचे खरे वैशिष्ट्य ठरावे.

मुंबईतील नवरात्रोत्सवाच्या इतिहासात पन्नास वर्षे सातत्याने परंपरा जपणे ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. श्रद्धा, संघटन, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी यांच्या बळावर उभ्या राहिलेल्या अशा मंडळांचा प्रवास हा केवळ एका संस्थेचा इतिहास नसतो; तो संपूर्ण परिसराच्या सामूहिक आठवणींचा भाग असतो. देवीच्या चरणी श्रद्धा, मनामनांत एकता आणि समाजसेवेचा ध्यास घेऊन श्री समर्थ क्रीडा मंडळाने आपल्या सुवर्णमहोत्सवी वाटचालीतून नव्या पिढीला प्रेरणा द्यावी आणि नवरात्रोत्सवाची ही समृद्ध परंपरा पुढील अनेक दशके अशीच जपली जावी, हीच सदिच्छा !


- रवींद्र मालुसरे

९३२३११७७०४

अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई

मुख्य संपादक : पोलादपूर अस्मिता

संपादक : Ai युग दिवाळी अंक






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या