स्वरांच्या भक्तीत रमलेली माझी आई...
ह. भ. प. स्व. सरस्वतीबाई नारायण शिंदे !
अशिक्षित असूनही संगीताचे सूर आत्मसात करणारी, पांडुरंगाच्या भक्तीत स्वतःला समर्पित करणारी आणि आपल्या मधुर आवाजाने श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी माझी आई... सरस्वतीबाई अंबरनाथमधील सर्वांची सरस्वतीताई शिंदे हिचा आज चौदावा स्मृतिदिन !
काही माणसे काळाच्या पडद्याआड जातात; पण त्यांच्या आठवणी, त्यांचे कर्तृत्व आणि त्यांनी निर्माण केलेला संस्कारांचा ठेवा कधीच पुसला जात नाही. माझी आई, ह. भ. प. स्व. सरस्वतीबाई नारायण शिंदे ही अशीच एक व्यक्ती. आज तिच्या चौदाव्या स्मृतिदिनानिमित्त तिच्या आठवणींना उजाळा देताना मन भावनांनी भरून येते. तिच्या आयुष्याचा प्रवास आठवताना जाणवते की, प्रतिभेला शिक्षणाची पदवी लागत नाही, कलेची साधना करण्यासाठी श्रीमंतीची गरज नसते आणि मनात परमेश्वराच्या भक्तीचा दिवा तेवत असेल तर सामान्य माणूसही असामान्य उंची गाठू शकतो.
माझ्या आईचा जन्म रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील मुमुर्शी या गावात एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. परिस्थितीमुळे तिला शालेय शिक्षण घेता आले नाही. मात्र लग्न होऊन अंबरनाथला आल्यानंतर प्रौढ शिक्षणवर्गात दाखल होऊन तिने पहिला नंबर पटकावला होता. अक्षर ओळख आणि पाढे पाठ केले होते. ती अशिक्षित होती; मात्र तिच्या मनात संगीताची आणि पांडुरंगाच्या भक्तीची विलक्षण ओढ होती. अक्षरांची ओळख नसली तरी स्वरांची ओळख तिने करून घेतली. शिक्षण घेऊन पुस्तकांतून ज्ञान मिळवता आले नाही, पण कानांनी ऐकून, मनात साठवून आणि अखंड सरावातून तिने संगीताचे विश्व स्वतःसाठी खुले केले.
तिच्या या संगीतप्रवासाची सुरुवात आमच्या बालपणीच्या दिवसांपासून झाली. आम्हा मुलांची सकाळी शाळेत जाण्याची वेळ असायची. त्याच काळात माझ्या वडिलांनी तिच्यासाठी एक रेडिओ आणून दिला होता. सकाळी रेडिओ लावून ती गाणी, अभंग आणि भक्तिसंगीत ऐकत असे. लता मंगेशकर, आशा भोसले आणि पंडित भीमसेन जोशी यांचे गायन ती मन लावून ऐकत असे. ऐकलेले सूर, त्यातील बारकावे, स्वरांची लय आणि गाण्याची पद्धत ती मनात साठवून ठेवत असे. एकदा ऐकलेला अभंग तिच्या लक्षात राहत असे. अभंग पाठ करण्याची तिची विलक्षण क्षमता होती.
तिच्या या आवडीला योग्य दिशा मिळाली ती एका महत्त्वाच्या प्रसंगामुळे. वारकरी भजनसम्राट ह. भ. प. हरिभाऊ रिंगे महाराज मुंबईहून एकदा अंबरनाथ येथे आले होते. तेव्हा आईच्या सासऱ्यांनी म्हणजे माझ्या आजोबांनी ह. भ. प. सीतारामबुवा शिंदे यांनी त्यांना विचारले, 'माझ्या सुनबाईला तुम्ही गायन शिकवाल का?' त्यांनी होकार दिला आणि आईच्या संगीत शिक्षणाचा एक नवा अध्याय सुरू झाला. हरिभाऊ रिंगे महाराज यांच्याकडे तिने गायनाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. शिकलेले प्रत्येक स्वर ती मनापासून आत्मसात करत असे. त्यानंतर नियमित रियाज, स्वरांचा अभ्यास आणि भक्तिभावाने केलेली साधना यामुळे तिच्या आवाजाला एक वेगळीच गोडी प्राप्त झाली.
आई केवळ भजन गात नव्हती, तर ती प्रत्येक अभंग जगत होती. संगीताच्या स्वरांची जाण, तालाची समज, शब्दांचा भावार्थ आणि भक्तीची तन्मयता तिच्या गायनातून अनुभवायला मिळत असे. तिचा आवाज सुस्वर, मधुर आणि मनाला भिडणारा होता. ती जेव्हा वारकरी भजन सुरू करायची, आणि "कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर" "माझ्या वडिलांचे कुलदैवत" "तुझे नाम गाऊ आता" "चलो जमुना के तीर" हे अभंग आणि "खांद्यावर घोंगडी हातामध्ये काठी" ही गौळण ती गात असे तेव्हा श्रोते मंत्रमुग्ध होऊन ऐकत असत. तिच्या गायनात दिखाऊपणा नव्हता; होती जमून ती केवळ पांडुरंगाच्या आणि गुरुचरणी चरणी समर्पित झालेली भक्ती !
या संगीतसाधनेला व्यासपीठ मिळाले ते आजोबांनी स्थापन केलेल्या 'वारकरी संप्रदाय माऊली महिला भजनी मंडळा'च्या माध्यमातून. या मंडळात आईने आपल्या गायनकलेचा ठसा उमटवला. तिच्या मधुर आवाजामुळे मंडळाला वेगळी ओळख मिळाली. एकामागून एक यशाची शिखरे मंडळ सर करू लागले.
सन १९९९ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या कामगार कल्याण मंडळातर्फे आयोजित भजन गायन स्पर्धेत आईला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. तिच्या संगीतसाधनेला मिळालेली ही मोठी पावती होती. तिच्यासाठी हा आयुष्यातील अत्यंत मौल्यवान क्षण होता. त्यानंतर वरळी येथील जांबोरी मैदानावर आयोजित स्पर्धेत मंडळाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. सुप्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. बाबामहाराज सातारकर यांच्या गावी सातारा येथे झालेल्या भजन स्पर्धेतही आई ज्या मंडळात गायन करत होती, त्या मंडळाला पारितोषिक मिळाले. ही यशाची शिदोरी तिच्या आणि मंडळातील सर्व महिलांच्या अथक परिश्रमांची साक्ष देणारी होती.
आईच्या आवाजाची मोहिनी केवळ स्पर्धांपुरती मर्यादित राहिली नाही. मुंबई, महाड, पोलादपूर, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ तसेच आसपासच्या ग्रामीण भागांतून तिच्या भजनी मंडळाला कार्यक्रमांसाठी आमंत्रणे येत असत. ठिकठिकाणी तिच्या गायनाचा गौरव होत असे. तिचा आणि भजनी मंडळाचा नावलौकिक वाढत गेला. जिथे भजनाचा कार्यक्रम असे, तिथे तिच्या आवाजाची चर्चा होत असे. श्रोत्यांकडून मिळणारा आदर, प्रेम आणि कौतुक हीच तिच्या कलेची खरी कमाई होती.
आज मागे वळून पाहताना आईच्या आयुष्याकडे एका वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहावेसे वाटते. एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेली, औपचारिक शिक्षण न मिळालेली स्त्री केवळ आपल्या जिद्दीच्या, आवडीच्या आणि साधनेच्या बळावर संगीताच्या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करते, हे किती मोठे यश आहे ! तिने कोणत्याही परिस्थितीला आपल्या कलेच्या आड येऊ दिले नाही. रेडिओवर गाणी ऐकण्यापासून सुरू झालेला प्रवास गुरुंकडून संगीताचे धडे घेण्यापर्यंत, रियाजातून भजनकलेत प्रावीण्य मिळवण्यापर्यंत आणि स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळवण्यापर्यंत पोहोचला. तिचे आयुष्य म्हणजे जिद्द, श्रद्धा, मेहनत आणि कलेवरील निष्ठेचा सुंदर संगम होता.
आई, तुझ्याबद्दल किती लिहू आणि काय लिहू ? तुझ्या आठवणींचा पट इतका मोठा आहे की, शब्द अपुरे पडतात. तुझा मधुर आवाज आजही कानात घुमतो. तू गायलेले अभंग, भजनातील ते सूर, पांडुरंगाचे नामस्मरण आणि तुझा प्रसन्न चेहरा आजही डोळ्यांसमोर उभा राहतो. तुझ्या गायनाने अनेकांची मने जिंकलीस; पण माझ्यासाठी तू केवळ एक उत्तम गायिका नव्हतीस, तर माझे संपूर्ण भावविश्व होतीस.
आज तू आमच्यात नाहीस, पण तुझ्या आठवणी आमच्या प्रत्येक श्वासात आहेत. तुझ्या संस्कारांचा, तुझ्या कलेचा आणि भक्तीचा वारसा आमच्या मनात कायम जिवंत आहे. चौदा वर्षे झाली, तरी तुझी उणीव क्षणभरही कमी झालेली नाही. तुझी रोज आठवण येते. आजही मनात तुझ्याशी बोलावेसे वाटते, तुझ्या मांडीवर डोके ठेवावेसे वाटते आणि तुझ्या आवाजात एखादा अभंग ऐकावा असे वाटते.
तुझ्या स्मृतिदिनी मनातील वेदना व्यक्त करताना कविवर्यांच्या या ओळी प्रकर्षाने आठवतात...
'आई!' म्हणोनी कोणी । आईस हाक मारी.
ती हाक येई कानी । मज होय शोककारी.
नोहेच हाक माते । मारी कुणी कुठारी.
आई कुणा म्हणू मी? । आई घरी न दारी!
ही न्यूनता सुखाची । चित्ता सदा विदारी.
स्वामी तिन्ही जगाचा । आईविना भिकारी.
चिमणी आपल्या पिलांना चारा भरवते, गाय आपल्या वासराला प्रेमाने चाटते, पशुपक्ष्यांमध्येही दिसणारे वात्सल्य पाहताना आईच्या मायेची जाणीव अधिक तीव्र होते. कारण आईची जागा या जगात कोणीच घेऊ शकत नाही. तिच्या मायेची सावली, तिचा सहवास आणि तिच्या प्रेमाची ऊब ही आयुष्यभराची शिदोरी असते.
आई, तू आज शरीराने आमच्यात नसलीस तरी तुझ्या गळ्यातून उमटलेले ते भक्तिस्वर आजही आमच्या मनात निनादत आहेत. तुझ्या आयुष्याची खरी ओळख तुझ्या नावापुढील पुरस्कारांमध्ये नाही, तर तू जिंकलेल्या असंख्य मनांमध्ये आहे. पांडुरंगाच्या भक्तीत रमलेले तुझे जीवन आणि संगीतासाठी केलेली तुझी साधना आम्हाला सदैव प्रेरणा देत राहील.
तुझ्या चरणी माझे कोटी कोटी प्रणाम!
आई, तुझी आठवण हीच माझी संपत्ती आणि तुझा आशीर्वाद हीच माझी ताकद आहे.
भावपूर्ण आदरांजली !
— तुझी मुलगी "विजया रवींद्र मालुसरे



0 टिप्पण्या