Ticker

6/recent/ticker-posts

गोष्ट सुभेदारांच्या पुतळ्याची


"गोष्ट सुभेदारांच्या पुतळ्याची"

शिवरायांचा सिंह सिंहगडी पडला समरांगणी |

मराठा गडी यशाचा धनी ||  

शिवछत्रपतींच्या सुभेदाराचा असा गौरव शिवचरित्रातील पानापानावर सुवर्णाक्षराने झाला आहे. त्या सुभेदार नरवीर  तानाजी मालुसरे यांची पुण्यतिथी आज साजरी होत आहे. पोलादपूर तालुक्यातील सर्व शिवप्रेमी आणि नरवीरप्रेमी १९३० पूर्वीपासून साजरी करीत आलो आहोत. आज सुद्धा आपल्या पूर्वजांच्या पुण्याईने आपण नरविरांच्या समाधीसमोर नतमस्तक होणार आहोत. १९८८ पासून मी सुभेदारांच्या पराक्रमाचा वेध घेण्याचा, इतिहासाचे गोडवे गाण्याचा प्रयत्न मी सातत्याने गेली ३८वर्षे अनेक वर्तमानपत्रातून लेख लिहून करीत आलो आहे. उमरठ येथे पुतळा बसवला त्या घटनेला यंदा ६० वर्षे पूर्ण होत आहेत. सर्वांनाच अभिमान वाटणारे त्यावेळचे क्षण टिपण्याचा प्रयत्न मी "गोष्ट सुभेदारांच्या पुतळ्याची" या लेखाद्वारे करीत आहे.
दिनांक १६ एप्रिल १९६५ महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री ना. वसंतराव नाईक यांनी तत्कालीन कुलाबा जिल्ह्यातील डोंगरदऱ्यात वसलेल्या उमरठ या गावात येऊन सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या लढाईच्या पावित्रात असलेल्या भव्य ६ फूट पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले आणि महाड तालुका आणि पोलादपूर पेठ्यातून व पंचक्रोशीतून जमलेल्या हजारो स्थानिकांनी एकच गर्जना दिली.... हर हर महादेव! सुभेदार तान्हाजी मालुसरे की जय!! छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो !!!


स्वतःच्या कुटुंबाच्या कर्तव्यापेक्षा राष्ट्राची हाक आणि त्यासाठी "आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे " असे उदगार काढून स्वामीकार्यात स्वतःचे प्राण अर्पण करणाऱ्या तानाजी मालुसरे यांच्या जन्मग्रामी उमरठ येथे हा सोहळा पार पडला होता. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, सरंक्षण मंत्री म्हणून विराजमान असलेले आणि भारताचे एक दिग्गज नेते ना. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या संकल्पनेतून उमरठ येथे हा पुतळा उभारण्याचा निर्णय झाला होता.

१९५७ च्या नोव्हेंबर महिन्यात त्यावेळचे पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्योत्तर काळात प्रतापगड या किल्ल्यावर प्रत्यक्ष येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा ५ मी. उंचीच्या भव्य अश्वारूढ पुतळा अनावरण केले होते. त्यावेळी संयुक्त महाराष्ट्राचा लढा तीव्रतेने धगधगत होता, स्वतंत्र महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी वेळकाढूपणा करणाऱ्या नेहारुंचा निषेध करण्यासाठी घाटाच्या खाली आणि वर महाबळेश्वर पर्यंत प्रचंड संख्येने जनसमुदाय जमला होता.  यशवंतराव चव्हाण हे त्यावेळी द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उपस्थित होते. त्याचवेळी यशवंतरावांनी निर्णय घेतला होता की, शिवरायांचे रयतेचे स्वप्न पुर्ण होण्यासाठी जे जे मावळे लढले त्यांच्या शौर्याची आणि कार्याची आठवण भावी पिढीसाठी मराठी मुलुखात राहावी यासाठी त्यांचे पुतळे उभे राहाणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी म्हटले की आपसूकच 'नरवीर तानाजी' असे शब्द आबालावृद्ध मराठी माणसाच्या तोंडी येतात म्हणून त्यांनी यानंतरचा पुतळा नरवीर तान्हाजीचा उभारण्याचा संकल्प  सोडला होता.
ऐत्याहासिकदृष्ट्या नररत्न संपन्न असलेल्या कुलाबा जिल्ह्यात अशा वीरपुरुषांच्या वस्तू जतन कराव्या किमानपक्षी सध्या आहेत त्या निदान स्मृतीरूपाने तरी जिवंत राहाव्या व चालू पिढीस भूतकाळात असे घडले होते आणि तो घडविणारा पुरुष म्हणजे तानाजी हा असा संपन्न इतिहास कळावा म्हणून त्यांनी या कामासाठी पुढाकार घेतला होता. स्वराज्य संस्थापनेच्या ऐत्याहासिक कार्यात कुलाबा जिल्ह्याने फार मोठी कामगिरी बजावली असून या राष्ट्रकार्यात भाग घेतलेल्या नरवीरांच्या वास्तू जतन कराव्या अशी योजना कुलाबा जिल्हापरिषदेला त्यांनी आखायला लावली, नरवीर  तानाजी  मालुसरे यांच्या पुतळ्याचे अनावरणानेच या योजनेची सुरुवात झाली होती. खरं तरं त्यांच्याच शुभहस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्याचे आयोजन ठरले होते. परंतु "हिमालयाच्या हाकेला धावला सह्याद्री" या उक्तीनुसार यशवंतराव चव्हाण यांना संरक्षणमंत्री म्हणून नेहरूनी दिल्लीला बोलावून घेतले होते. त्यांच्या व्यस्ततेमुळे  त्यांच्या जागी आलेल्या मुख्यमंत्री वसंतराव नाईकांना हे महदभाग्य लाभले होते. 

त्यावेळच्या महाराष्ट्रातील सर्व दैनिकांनी या घटनेची उस्फुर्त दखल घेतली होती.

दिनांक १६ एप्रिल १९६५ रोजी त्यावेळच्या दैनिक लोकसत्ताचा मथळा होता "राष्ट्रकार्यासाठी मुलाचे लग्न दूर सारणारा नरवीर तानाजी : तीनशे वर्षांनी स्मारक उभारले जाणार" तर
दिनांक १८ एप्रिल १९६५ रोजी बातमीचा  मथळा होता "शेतकऱ्यांनी धन्य आघाडी तानाजीच्या तडफेने लढवावी" - मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची हाक
दिनांक १८ एप्रिल १९६५ दै.महाराष्ट्र टाईम्सचा मथळा होता - नरवीर तानाजीच्या पुतळ्याचे अनावरण, दिनांक १८ एप्रिल १९६५ दै. नवाकाळ - नरवीर तानाजीच्या उमरठ येथील स्मारकाचे उदघाटन,आणि राज्य शासनाच्या लोकराज्य मासिकाने नरविरांच्या पराक्रमाचा आढावा घेणारा एक दीर्घ लेख छापला होता.

शिल्पकार श्री. वि ग सहस्रबुद्धे यांच्या प्रतिभेतून आकारलेला हा पुतळा ब्रॉन्झचा आहे. अर्धा टन वजनाच्या या पुतळ्यासाठी तेव्हा १२ हजार रुपये खर्च करण्यात आला होता. गावकऱ्यांनी खास बांधलेल्या १६ फूट उंचीच्या मचाणावर चालून मुख्यमंत्र्यांनी नरवीर तानाजी मालुसरे यांना हार घातला आणि हजारो हातांनी टाळ्यांचा कडकडाट झाला होता. उमरठला येताना केवळ मनुष्यबळाचा वापर करून तयार केलेला ७ मैलाचा सुरेख रस्ता पाहून मुख्यमंत्र्यांना फार समाधान झाले. त्यांनी कुलाबा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दादासाहेब लिमये व गावकरी मंडळीं यांचे कौतुक केले. आपल्या भागाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे पाय लागणार या अभिमानापोटी पंचक्रोशीतील शेकडोंनी घाम गाळला अन हजारो हात राबले होते. श्रमदानाने ग्रामीण भागातील मनुष्य बळाचा वापर या योजनेखाली किती मोठे काम करता येते हे दाखवून हा सर्व रस्ता मोटर वाहतुकीसाठी योग्य असा गावाकऱ्यांनी निर्माण केला. याच रस्त्याने अगोदर सुभेदारांचा भव्य पुतळा आणि त्यानंतर मुख्यमंत्री ना. वसंतराव नाईक आणि हजारोच्या संख्येने नरवीरप्रेमी उमरठला गेले होते.

सर्वप्रथम खालच्या उमरठमध्ये असलेल्या नरवीर तानाजी व शेलारमामा यांच्या समाध्यांची मुख्यमंत्र्यांनी पूजा केली व समाधी परिसराचे नूतनीकरण करणाऱ्या योजनेचे उदघाटन केले.नंतर वरच्या उमरठ मध्ये पुतळ्याला हार घालण्यासाठी १६ फुटावरील अरुंद माचावर मुख्यमंत्री चढले तेव्हा हजारो उपस्थितांचे श्वास क्षणभर रोखले गेले होते. मुख्यमंत्र्यांनी पुष्पहार घातला आणि आसमंत टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमले. 

साखर येथील वयोवृद्ध गृहस्थ श्री. अंबाजी मालुसरे यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी बातचीत केली होती. मालुसरे हे शेजारच्या सूर्याजी मालुसरे यांची समाधी असलेल्या साखर गावातील सर्वात वयोवृद्ध गृहस्थ.उमरठ आणि आमच्या खोऱ्यातील अनेक गावातील अनेक जवान भारतीय सेनेत असून अनेकांनी देशासाठी देह ठेविला आहे हे अंबाजी मालुसरे यांनी मुख्यमंत्र्यांना मोठया अभिमानाने सांगितले. त्याचप्रमाणे १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात ते यशवंतरावांच्या सोबत ६ महिने जेलमध्ये होते तसेच ते आजच्या या कार्यासाठी झटले आहेत आणि पुण्यतिथी साजरी करण्यासाठी सदैव झटत असतात, हे कळल्यावर त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून अंबाजीराव मालुसरे यांना दरमहा ५० रुपये तीन वर्षेपर्यंत देण्याची मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली. या प्रसंगी जादूगार रघुवीर यांनी जादूचे प्रयोग करून दाखविले. त्यांनी टांगलेला पुष्पहार बाणाने अचूक मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात पाडला. जादूगार रघुवीर यांनी तानाजी स्मारकासाठी ७ हजार रुपये मिळवून दिले व आणखी ३ हजार रुपये ते देणार असल्याचे त्यांनी घोषित केले. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पुतळ्याला अनावरण प्रसंगी मुख्यमंत्री श्री वसंतराव नाईक यांनी तानाजी स्मारक निधीला ५ हजार रुपये देणगी देणारे श्री. बाबू अण्णाप्पा वडार इंदूरकर ह्यांचा उमरठ येथे सत्कार केला होता. 

नरवीर तानाजी जेथे जन्मले त्या ठिकाणी एक भव्य वास्तू बांधून त्या वास्तूत ऐत्याहासिक प्रसंगाचे चित्रण केले जाणार होते. या वास्तूची कोनशिला भाऊसाहेब वर्तक यांच्या हस्ते बसविण्यात आली. त्यावेळच्या स्मारक योजनेनुसार वरच्या उमरठात एक चांगले घर बांधले जाईल व त्या घरात नरवीरांच्या आयुष्यातील काही महत्वाची चित्रे चितारली जातील. नरवीरांना छत्रपतींचे बोलावणे व पत्नीचा आणि मुलाचा निरोप, तानाजी, छत्रपती व राजमाता जिजाबाई यांची आज्ञा शिरसावंद्य मानीत आहेत. मावळे मंडळींची जमवाजमव व कोंढाण्याची पहाणी, घोरपड लावून मावळे गड चढत आहेत, उदेभानूशी लढताना तानाजीची गर्दन जाते. व शेलार मामा उदेभानूचे शीर उडवितो, सूर्याजी मालुसरे किल्ला घेतो व विजयाचा जाळ करतो, छत्रपती गडावर येतात आणि तानाजी पडल्याचे कळताच "गड आला पण सिंह गेला" असे उदगार काढतात, नरवीर तानाजी यांचे शव मोठ्या इतमामाने उमरठ येथे आणले जाते व पुढील संस्कार केले जातात. वैगरे प्रसंग या घरात चितारण्याचे ठरले होते.

त्याप्रमाणे घराचा आराखडा आखण्यात आला. घरापुढेच एक चौकी म्हणून ठिकाण आहे, त्या ठिकाणी मावळे मंडळीं जमून खलबते सल्लामसलत, योजना आखणे वैगरे होत असत. त्याच ठिकाणी नरवीर तानाजी यांचा पुतळा उभा करण्यात आला आहे. तर अलीकडे समाधी शेजारी एक विश्राम धाम बांधण्याचे ठरले. समाधीभोवती संगमरवरी फरशी करून सभोवती जाळीचा कठडा बांधला जाईल. समाधीचे उजवे बाजूस एक खुले रंगमंदिर बांधले जाईल. आणि सर्व पुरे झाल्यावर समाधीची साफसफाई व पूजाअर्चा करण्यासाठी एक नोकर ठेवला जाईल. नोकराच्या पगारासाठी १० हजाराचा कायम निधी ठेवला जाणार असून त्याच्या व्याजातूनच हा खर्च केला जाणार आहे याची घोषणा तत्कालीन कुलाबा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दादासाहेब लिमये यांनी आपल्या भाषणात सांगितले.

काळाच्या ओघात शिल्पकलेचा विस्तार झाला आहे. एकसंध पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ उत्तम पुतळे एकामागोमाग एक तयार व्हायला लागले होते. पण शिल्पकलेच्या निकषांमध्ये आजही शिवरायांच्या या पराक्रमी सुभेदाराचा हा पहिला पुतळा अद्वितीय मानला जातो . कारण आपल्या देशात सिंगल कास्टिंग म्हणजे एकाच साच्यात तयार झालेल्या हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या मोजक्या पुतळ्यांमध्ये त्याचा समावेश होतो आहे. आणि म्हणूनच या पुतळ्यातील नरवीर तान्हाजीरावांचं रूप काही औरच दिसतं आहे. त्यामुळे शिल्पकलेच्या विद्यार्थ्यांसाठी आजही हा पुतळा आदर्श मानला जातो. या पुतळ्यात एका हातात तलवार आणि शिवरायांचा समकालीन शाहीर तुळशीदासाच्या पोवाड्यातील निधडया छातीचा करारी बाणा व लढाईच्या पावित्रातील अंगार व्यक्त करणारी प्रतिमाच सर्वांच्या मनात इतकी घट्ट बसली आहे की पुढे अनेक शूरवीर मावळ्यांचे पुतळे, शिल्पं आणि चित्रं याच रूपात आकाराला आली आहेत. हा पुतळा महाराष्ट्रातील शिवप्रेमिंच्या  मनावर कळत - नकळतपणे असा परिणाम करणारा ठरला आहे. वि ग सहस्त्रबुद्धे यांना जेव्हा हे काम सोपवलं. ते शिल्पकार तर होतेच पण अभ्यासकही होते. त्यांचं वाचन होतं. त्यांनी शिवाजी महाराजांची चरित्रे वाचली होती.

इंग्रज छत्रपती शिवाजी महाराजांना राष्ट्रपुरुष मानायलाच तयार नव्हते . त्यांनी शिवाजी महाराजांची लुटारू ही प्रतिमा तयार केली होती. मात्र प्रिन्स ऑफ वेल्स इथे आला आणि त्याला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माहिती मिळाली तेव्हा त्यानं म्हटलं की शिवाजी महाराज नॉट ओन्ली बिल्ड एम्पायर बट ही बिल्ड द नेशन..आपण तर शिवरायांच्या स्वराज्यासाठी रक्त सांडवलेल्या मावळ्यांचे वारसदार. त्यांचा इतिहास आपण नुसता वाचला नाही तर उराशी कवटाळून ठेवला आहे. गेली १०० वर्षे या पवित्र भूमीला वंदन करणे जसे आपण आपले इतिकर्तव्य मानले तसेच वाडवडिलांनी जपायला सांगितलेला इथला  पुतळा, समाध्या यांची निगा राखणे आणि या भूमिचे पवित्र्य जपणे यापुढच्या काळात आपले आद्य कर्तव्य आहे.
आजच्या दिवशी तानाजीरावांच्या भूतकाळातील रम्य आठवणींची जाणीव, त्याचबरोबर आपल्या कर्तव्याची ओळख करून देणाऱ्या चरित्रनायकांच्या जीवनाचे मनन आणि चिंतन करणे आवश्यक आहे आणि म्हणूनच अशी स्मारके जपणे त्यादृष्टीकोनातून आणि नव्या पिढीला आपला समृद्ध वारसा जपण्यासाठी तयार करणे आजच्या दृष्टीकोनातून महत्वाचे आहे. आणि म्हणूनच कवी विनायकाच्या शब्दात सांगावयाचे झाल्यास असे म्हणावे लागते, "पूर्व दिव्य ज्यांचे रम्य त्यांना भावीकाळ"
छत्रपती शिवाजी महाराज की जय!
सुभेदार नरवीर तान्हाजी-सूर्याजी मालुसरे की जय !!

-- रवींद्र मालुसरे 

अध्यक्ष,मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई ९३२३११७७०४



टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. श्रीमती वैशाली जितेंद्र बैकर ( शिक्षिका)१३ फेब्रुवारी, २०२६ रोजी ९:३५ AM वाजता

    सर, तुमचे कार्य खरच खूपच असामान्य आहे,
    ... तुमच्या भावी मनसुब्यांसाठी खूप खूप शुभेच्छा.... 🙏

    उत्तर द्याहटवा