ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक आणि मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे ज्येष्ठ सभासद श्री चंद्रकांत पाटणकर यांचा २९ नोव्हेंबर २०२५ रोजी अमृतमहोत्सव साजरा होता आहे. त्यानिमित्ताने संघातील त्यांच्या मित्रांनी त्यांच्या कर्तृत्वाचा आढावा आपापले मनोगत लिहून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
जागल्यांचा दिपस्तंभ : आदरणीय चंद्रकांत पाटणकर
जीवनाच्या प्रवासात अनेक माणसे भेटतात. काहींच्या भेटी विस्मृतीत जातात, तर काहींच्या आठवणी कायम हृदयात घर करून राहतात. काही माणसांचा सहवास सतत लाभावा, त्यांच्याशी संवाद घडावा, असे वाटत राहते; माझे ज्येष्ठ मित्रवर्य चंद्रकांत पाटणकर यांची आणि माझी भेट दादर पूर्वेकडील शिंदेवाडी महापालिका शाळेतील मराठी वुत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या कार्यालयात झाला. आमच्या या संस्थेचे हे कार्यालय म्हणजे वर्तमानपत्रातून संपादकीय पानावर निर्भीडपणे आणि पदरमोड करून पत्रे लिहिणाऱ्या सर्व वृत्तपत्र लेखकांचे विद्यापीठ होय. या विद्यापीठात आम्ही दर शनिवारी संध्याकाळी मुक्तचिंतन, अभ्यास शिबीर, वेगवेगळ्या स्पर्धा किंवा एखाद्या संभाव्य कार्यक्रमाची पूर्वतयारी करण्यासाठी गेली ५० वर्षे अनेकजण भेटत असतो. या विद्यापीठात समरस झालेला कार्यकर्ता लेखनात किंवा सामाजिक कार्यात दिवसेंदिवस परिपक्व होत जातो याची संस्थेच्या चळवळीच्या ७५ वर्षाच्या इतिहासाच्या वाटचालीत शेकडो उदाहरणे सापडतील. साधारण १९९० च्या दरम्यान पाटणकरांची आणि माझी ओळख झाली, ही पहिली भेट पुढे घट्ट मैत्रीत, बंधुभावात रूपांतरित कधी झाली हे कळलेच नाही. योगायोगाने का होईना पाटणकर यांच्याशी विचारांची देवाणघेवाण घडली, संवाद, स्नेहबंध टिकला वारंवार होणाऱ्या भेटी, दूरध्वनीवरील संवाद यामुळे आमचा स्नेहबंध अधिक दृढ झाला.
पाटणकर हे त्यांच्या स्कुटरवरून संघात यायचे आणि संस्था बंद झाल्यानंतर मला ते प्लाझा टॉकिजपर्यंत सोडल्यानंतर आपल्या घरी जात असत. संस्थेत मी टेबलाच्या पलीकडचा म्हणजे कार्यालयीन कामकाज करणारा किंवा व्यासपीठावरचा कार्यकर्ता तर पाटणकर हे कधीही कोणतीही अपेक्षा न धरता संस्थेत पडेल ते काम करणारे टेबलाच्या अलीकडच्या बाजूचे साधे कार्यकर्ते. मितभाषी परंतु मोजकेच आणि आवश्यक बोलणारे, परखड आणि मुद्देसूद भूमिका मांडणारे, निर्भीडपणे सातत्याने अभ्यासपूर्ण वर्तमानपत्रातून पत्रे लिहिणारे आणि संस्थेसाठी स्वतःची मूठ सतत मोकळी करणारे असेच त्यांचे व्यक्तिमत्व माझ्या आणि माझ्या इतर सहकाऱ्यांच्या मनात कोरलेले आहे. मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही, केला तर तो फार पुढे जाऊ शकत नाही, अशी बोंबाबोंब करणाऱ्यांनी चंद्रकांत पाटणकर यांचे वडील स्व. वामनराव आणि चंद्रकांत पाटणकर यांचे चरित्र त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त समजून घ्यावे लागेल.चंद्रकांत पाटणकर ही केवळ एक व्यक्ती नाही, तर ती एक भविष्यकाळाचा वेध घेणारी शक्ती आहे. त्यांचा किमान पाच दशकांचा धावता जीवनपट डोळ्यासमोर आणला तरी याची प्रचिती आपणास येते. चंद्रकांत पाटणकर यांचा प्रेमळ, हळवा स्वभाव व दुसऱ्यांना मदत करणे हे गुण त्यांनी आईकडून, तर बाबांकडून धाडस, नेतृत्व, सतत कामात मग्न राहणे, वाचनाची आवड आणि निर्भयपणा हे गुण घेतले आहेत.
जगातले दुःख नाहीसे करण्याची किमया हिऱ्या-मोत्यात नाही, तलवारीत नाही आणि जप-तपातही नाही. दुसऱ्याचे दुःख पाहून द्रवणाऱ्या आणि अहंकार सोडून त्यांच्या सेवेसाठी सज्ज होणाऱ्या मानवाच्या हृदयात आहे हे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त वि. स. खांडेकरांचे विधान सार्थ ठरवत चंद्रकांत पाटणकर यांनी जीवनाच्या अमृत महोत्सवापर्यंत मजल गाठली आहे. अर्थात चंद्रकांत पाटणकर यांना मुळातच अन्याय-अत्याचाराची चीड असल्याने लढवय्या व धाडसी स्वभावाचे समाजसुधारक म्हणूनच त्यांची जडणघडण संस्कारक्षम वयातच झाली. सामाजिक विषमतेविरुद्ध अनेक विषयावर लेखन करणारे निर्भीड व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ख्याती आहे.
वृत्तपत्र लेखकाला लेखनासाठी दररोजच्या वर्तमानपत्रांसह इतरही अवांतर वाचन करावे लागते. हे वाचन करताना समाजाच्या व्यथा वेदना बातमीत आणि रोजच्या जीवनात शोधाव्या लागतात. हाती घेतलेल्या विषयाचा अभ्यास करून तो नेमक्या शब्दात मांडायचा आणि तडीस नेण्यासाठी सबधितांच्याकडे त्याचा निर्णय होईपर्यंत गप्प न बसता पाठपुरावा करायचा हा पाटणकरांचा खाक्या. आपल्या कार्यशैलीने पाटणकरांनी लेखणीद्वारे अनेक समस्यांना वाचा फोडून न्याय मिळवून दिला आहे.
दरम्यान किमान रोजच्या वर्तमानपत्राचे वाचन करण्याच्या त्यांच्या व्यासंगामुळे त्यांचा जागतिक व सामाजिक घडामोडींचा सखोल अभ्यास होत होता, त्यातून सामाजिक जाणिवा प्रगल्भ व तीव्र होत गेल्या. मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई, दैवज्ञ समाजोन्नती परिषद, नामदार नाना शंकरशेठ प्रतिष्ठान, दैवज्ञ हितवर्धक समाज या संस्थांच्या मित्रांच्या सहकार्याने अगोदरच्या समाजधुरीणांनी स्थापन केलेल्या संस्थांच्या कार्यात ते सहभागी होऊ लागले. मुंबईचे शिल्पकार नाना जगन्नाथ शंकरशेट यांचे मुंबईत स्मारक व्हावे आणि मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनचे नामकरण त्यांच्या नावाने व्हावे यासाठी पाठपुरावा करणाऱ्या नेतृत्वाच्या मागे ते सतत उभे राहिले आहेत.
आपले मानवी जीवन हे एक प्रकारे नदीच्या त्रिवेणी संगमाप्रमाणेच आहे. स्वत:चे सुख व प्रगती ही या संगमातील पहिली नदी. कुटुंबाचे रक्षण व आई-वडिलांचे ऋण फेडणे, त्यांना समाधानी व आनंदी पाहणे हा दूसरा प्रवाह, आणि तिसरी नदी म्हणजेच त्याच काळादरम्यान आपण ज्या समाजात जगतो त्या गरीब , दलित, पीडित किंवा ज्यांचे प्रश्नच कुणीही ऐकायला तयार नसते असा समाजाचा जो घटक असतो त्याच्यासाठी आपल्या परीने लढणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हा तिसरा प्रवाह. पाटणकर यांनी पत्रलेखन करताना वा समाजकारण करताना तिसऱ्या नदीचा धर्म निवडला, जोपासला, वृद्धिंगत केला. हा प्रवास अनंत अडचणींचा होता. त्यावर त्यांनी सकारात्मकतेने मात केली.
हे करताना त्यांनी समाजहित जोपासले, अलौकिक कल्पना शक्ती, दूरदृष्टी, अचूक निर्णय घेण्याची क्षमता याचा योग्य तसा वापर केला यामुळे अल्पावधीतच त्यांनी समाजामध्ये आदराचे स्थान प्राप्त केले. आहे. असे यश प्राप्त करताना चतुरपणा करावा की प्रामाणिकपणा हे आपल्या संस्कारांवर अवलंबून असते. कारण चतुरपणाला फक्त ४-५ दिवसच चमक असते. मात्र प्रामाणिकपणा व आदर्शाला आयुष्यभर लकाकी लाभते. बावनकशी सोन्याप्रमाणे त्यांच्या कर्तृत्वाची लकाकी अमृत महोत्सवपर्यंत कायम आहे. मोठेपणा मिळवण्यासाठी सत्ता, संपत्ती, शिक्षण इत्यादी बाबी आवश्यक असतातच. परंतु त्याहीपलीकडे माणुसकीच्या भावनेतून आपण समाजासाठी काही देणं लागतो ही भावना समाजात माणसाला मोठेपणा मिळवून देते. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माहीम कोकणनगर मधील एक आदर्श व कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्त्व चंद्रकांत पाटणकर. कुणाला मदत करण्यासाठी फार मोठ्या धनाची नाही तर आपल्या निःस्वार्थी मनाची तयारी असावी लागते. अशा मनाचा वारसा हक्काने पाटणकर यांना मिळाला आहे. अप्रकट सुख-दुःखाच्या संवेदना पाटणकरांच्या पर्यंत पोचतात आणि त्यांचा हात सहज खिशात जातो हे मी अनेकदा अनुभवले आहे. 'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन' या गीतेच्या वचनाप्रमाणे त्यांनी अनेकांना मदत केली आणि करत असतात.
आपला वडिलोपार्जित व्यवसाय सचोटीने चालवताना पाटणकरांनी व्यावहारिकदृष्ट्या उच्च शिक्षण घेऊनही एक सामान्य मनुष्य म्हणून तत्त्वनिष्ठा, कर्मनिष्ठा, जिद्द, चिकाटी, प्रखर बुद्धिमत्ता आणि ज्वलंत आत्मविश्वास आणि साहसी स्वभाव यांच्या जोरावर आयुष्यात किती पुढे जाऊ शकतो, एवढेच नव्हे तर समाजाचे आपण काही देणे लागतो ही कृतज्ञ भावना पाटणकरांनी आयुष्यभर जोपासली.
चंद्रकांत हे लहानपणापासून धाडसी, मस्तीखोर, अन्यायाविरुद्ध लढणारे, मदतीसाठी सर्वांच्या पूढे असणारे व त्यासाठी जिवाची पर्वाही न करणारे असे व्यक्तिमत्व. दादर- माहीम म्हणजे मराठी माणसांचा बुलंद आवाज. अत्रे, ठाकरे, डांगे, बापट हे या माणसांची ही कर्मभूमी. देदीप्यमान इतिहास घडवणाऱ्या या महान विभुतींचा आवाज, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे पोवाडे वयाच्या पंधरा-सोळा वर्षांपासूनच याच भागात चंद्रकांत पाटणकर यांनी अनेकदा ऐकले होते. त्यामुळे कायम अस्वस्थ असलेले त्यांचे मन समाजसेवेसाठी तयार होत गेले.
शिवसेनेची स्थापना होऊन १६ वर्षे झाली होती. चंद्रकांत पाटणकर ऐन उमेदीत असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या रोखठोक विचारांनी, रांगड्या भाषेने आणि महत्त्वाचे म्हणजे ' 'मऱ्हाटी बाणा', 'मऱ्हाटी अस्मिता' चेतवणाऱ्या त्यांच्या प्रखर वक्तृत्वाने लक्षावधी तरुण शिवसेनेकडे आकृष्ट झाले होते, त्यातले एक म्हणजे आपले चंद्रकांत पाटणकर ! पाटणकर तरुण वयात नव्हे, तर चक्क बालवयातच शिवसेनेशी जोडले गेले होते. त्याला कारण ठरले त्यांच्या घराच्या हाकेपासून १०० पाऊले चालल्यानंतर शिवसेना भवन आणि मराठी माणसांसाठी ज्या भव्य मैदानातून बाळासाहेब नावाची स्वाभिमानी तोफ गर्जना करायची ते छत्रपती शिवाजी पार्क ही ऐत्याहासिक स्थळे होती. त्यामुळे कुणीही न सांगता दादर- माहीम- माटुंगा विभागातील प्रत्येक घराघरात शिवसेना पोहोचविण्याठी, गेल्या ६० वर्षात झालेल्या प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेचा लोकप्रतिनिधी निवडून आणण्यासाठी, तो खासदार-आमदार-नगरसेवक निवडून आल्यानंतर लोकांचे प्रश्न घेऊन सोडविण्यासाठी वा वर्तमानपत्रातून प्रकाशित झालेले आपल्या पत्राची झेरॉक्स घेऊन त्यांच्यापर्यंत जाणे, आंदोलन करताना आपण जखमी होऊ किंवा आपल्यावर पोलीस केस होईल याची तमा न बाळगता शिवसेनेच्या झालेल्या प्रत्येक आंदोलनात सहभागी होणे या सर्वांमध्ये पाटणकर अग्रभागी होते. त्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे मुंबईतील ज्या शिवसैनिकांना नावाने ओळखत असत त्यात माहिमचा तरुण चंदू हा शिवसैनिक होता. पुढे त्यांची लेक बाळासाहेबांच्या नात्यात प्रवेश करती झाली आहे. बाळासाहेबांनी जोडलेले चंद्रकांत पाटणकरांसारखे हजारो शिवसैनिक अजूनही, एवढ्या राजकीय उलथापालथी, कमालीची स्थित्यंतरे होऊनही मूळ शिवसेनेबरोबर राहिली आहेत ! केवढी ही तत्त्वनिष्ठा ! केवढे हे शिवसेनेवरचे प्रेम ! असे शिवसैनिक जोपर्यंत शिवसेनेकडे आहेत, तोपर्यंत या महान संघटनेला सोन्याचे दिवस आहेत, यात काही शंका नाही. चंद्रकांत पाटणकर यांनी शिवसेना आत्मसात केल्यापासून पडद्याआड राहून कोणत्याही पदाची अभिलाषा न धरता प्रसंगी आलेली संधी नाकारून एक सामान्य शिवसैनिक म्हणून संघटनेसाठी सातत्याने निष्ठेने आजपर्यंत काम केले. आणि हे सर्व करत असताना कौटुंबिक जबाबदाऱ्याही उत्तमरीत्या पार पाडून पुन्हा पराकोटीची समाजसेवा कशी करता हे पाटणकरांनी दाखवून दिले आहे.
पाटणकर यांची मानवसेवेची तळमळ पाहून आजवर अनेक जण प्रभावित झाले आहेत, अनेक संस्थानी त्यांच्या परखड लेखनाची, दातृत्वाची, समाजसेवेची दखल घेऊन सन्मामाने पुरस्कार प्रदान करून गौरविले आहे. नजरेत आत्मविश्वास, मनात ध्येय आणि ओठात प्रेमाचा गोडवा असला की, यशाची हिमशिखरे साद घालतात हेच त्यांच्या यशस्वी वाटचालीचे गमक आहे. परिस्थितीशी झगडून पुढे आलेली माणसे नेहमी जपली पाहिजेत. कारण जीवनाचे तत्त्वज्ञान ही माणसे नुसती शिकलेली असे नव्हे तर जगलेलीही असतात. पाटणकर आज वयाचा अमृतमहोत्सव साजरा करीत आहेत. वाढते वय सोडले तर प्रकृती उत्तम आहे. त्यांच्या पत्नीचे अबाधित सहकार्य हे त्यांच्या यशाचे मुख्य कारण आहे हे ते स्वतः नेहमी सांगतात. दोन विवाहित मुली, जावई, मुलगा, सून आणि नातवंडे हा प्रेमळ परिवार त्यांच्या भोवती आहे. आज त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान म्हणजे खऱ्या आयुष्याचे यश. पूर्वी 'सुखी माणसाचा सदरा' ही गोष्ट आपण वाचली असेलच. पण मला वाटते, असा समाधानी आणि सेवाभावी माणूस जवळ असणे, त्याच्याशी संवाद साधणे हेच आजच्या काळातील भाग्य आहे.
त्यांचे कुटुंबीय, जोडलेला मित्र परिवार आणि त्यांची सामाजिक नाळ ज्या संघटनांशी घट्ट जोडली गेली आहे, त्यांच्यावतीने आदरणीय चंद्रकांत पाटणकर यांचा अमृत महोत्सव साजरा करण्यात होत आहे. मराठी वृत्तपत्र लेखक संघांच्या वतीने अभिष्टचिंतन करताना मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो की, त्यांनी आयुष्यभर जोपासलेला हा 'जागल्याचा' वसा आयुष्यभर जपला जावा, ध्येयाने प्रेरित, सेवेमध्ये आनंद मानणाऱ्या आणि कार्यात यशस्वी झालेल्या पाटणकरांचे समाजसेवेचे हे कार्य उत्तमपणे आणि अखंडपणे त्यांच्या हातून लेखणीद्वारे व्हावे यासाठी मित्रवर्य चंद्रकांत पाटणकरांना भरपूर दीर्घ आयुष्य मिळू दे. मनापासून शुभेच्छा !! जीवेत् शरदः शतम् !
रवींद्र मालुसरे
अध्यक्ष,मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई ९३२३११७७०४
======================================== सौ सोनारकी.. एक लोहार की..
ज्येष्ठ पत्रलेखक चंद्रकांत पाटणकर यांचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे होत आहे. त्यांचे मनापासून हार्दीक अभिनंदन. त्यानिमित्ताने माझी पत्रपंढरी भाग ३ हा गौरवग्रंथ प्रसिद्ध होत आहे. पाटणकरांची आणि माझी ओळख मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई या संस्थेच्या माध्यमातून झाली. वर्तमानपत्रातून प्रसिद्ध होणारी त्यांची पत्रे मी वर्तमानपत्रातून वाचत होतो. आणि हे १९९० पासून आजही कित्येक वर्ष चालू आहे. आम्ही दोघेही बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक. दोघांचे विचार बाळासाहेबांच्या मराठी माणसांच्या विषयीच्या धोरणाने प्रेरित झाले होते. त्यातून जास्त जवळीक वाढली. समाजात घडत असलेल्या अनेक अनिष्ट प्रवृत्ती, समाज विरोधी कारवाई यांच्या विरुद्ध एक समाजातील सजग नागरिक म्हणून सुधारणा व्हाव्या म्हणून पाटणकर मते मांडत असतात. त्यांच्या पत्राची भाषा वाचली असता कोणाचीही भीड भाड न ठेवता सत्य आहे ते निर्भीडपणे मांडणे असा त्यांचा स्थायी भाव लक्षात येतो. सामाजिक कार्याची चाड व चीड असलेला माझ्या आवडीचा एक हरहुन्नरी तळमळीचा कार्यकर्ता म्हणजे पाटणकर. आता त्यांचे वय वाढले असले तरी अहोरात्र काम करण्याची जिद्द तर अचाटच आहे. त्यातून त्यांची सामाजिक समस्यांची उत्तम जाण दिसून येते. हाती घेतलेल्या समस्यांना त्यांची तड लावण्यास, पूर्णत्वास नेण्यास, अन्यायाविरुद्ध झुंज देण्याकरिता पत्रलेखातून ते शेवटपर्यंत कार्यरत राहतात. वास्तविक ते सोन्याचे दागिने घडवणारे कुशल कारागीर. हा त्यांचा मूळ पेशा. सौ सोनार की ही एक म्हण समाजात प्रचलित आहे. परंतु सामाजिक बांधिलकी मुळे त्यांनी अन्यायाविरुद्ध लढण्यातकरीता एक लोहारकी हे धोरण अवलंबिले आहे. नागरिकांचे प्रश्न, होणारा अन्याय, यांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी तरुणवयातच लेखणी हातात घेतली आहे. हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख मा बाळासाहेब ठाकरे हे स्वतः पत्रलेखकांचे पत्र नियमित वाचत असत. पाटणकर यांच्या सामाजिक जाणिवेने पत्रलेखन करण्याची सवय होती त्यांच्या कित्येक पत्रांची नोंद बाळासाहेबांनी घ्यावी अशी पत्रे त्यांनी लिहिली आहेत. वर्तमानपत्रातून वाचा फोडणारा हा समाजातील जागल्या अजूनही समाजातील अनेक संस्थांच्या कार्यात व्यस्त आहे. पाटणकर साहेबांच्या या समाज विधायक कार्याचा गंगौघ असाच पुढे प्रवाहित राहावा यासाठी त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. निसर्गाने आरोग्य संपन्न दीर्घायुष्य त्यांना द्यावे. जय महाराष्ट्र..!!
- विजय ना कदम (माजी अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई )
==========================================
चंद्रकांत पाटणकर - समाज सेवेला वाहून घेतलेला सच्चा पत्रलेखक
ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक, कडवट शिवसैनिक, थोर समाजसेवक मा. श्री. चंद्रकांत पाटणकर यांचा अमृत महोत्सवी जन्मदिन सोहळा साजरा होत आहे. आज खरोखरच आनंदाचा दिवस आहे. त्यांचे कार्य सर्वश्रुत आहेच. हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन ते समाजसेवा करीत आहेत. एक वृत्तपत्र लेखक म्हणून आम्हाला पाटणकरांचा अभिमान वाटतो. मी गेल्या ३५ वर्षांपासून त्यांना ओळखतो. त्यांना लेखनाची, वाचनाची प्रचंड आवड. लोकप्रिय दैनिकांतून विविध विषयांवर प्रसिद्ध झालेली अभ्यासपूर्ण पत्रे बरंच काही सांगून जातात. अन्यायाच्या विरोधात त्यांची लेखणी धारदार शस्त्राप्रमाणे चालते, कमीतकमी शब्दात सर्वसामान्य जनतेला भेडसावणाऱ्या समस्या वर्तमान पत्राच्या माध्यमातून शासन दरबारी मांडून त्या सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणं हे खरं तर जोखमीचे काम, परंतु पाटणकर साहेब अविरतपणे करीत आहेत. " माझी पत्र पंढरी " नामक त्यांच्या पत्रांचा दुसरा संग्रह प्रकाशन सोहळा हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते "मातोश्री " येथे संपन्न झाला होता त्यावेळी मी मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई चा अध्यक्ष होतो. अनेक ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक त्या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित होते. बाळासाहेबांनी पाटणकर यांच्या कार्याचा गौरव केला होता. आज अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने मागोवा घेत असताना त्यांच्या यशस्वी वाटचालीत त्यांची पत्नी, कुटुंब, नातेवाईक, जिवाभावाची माणसं, मित्र परिवार यांची अनमोल साथ लाभली आहे. १९४९ पासून मुंबईच्या वृत्तपत्र जगतात मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या लेखन चळवळीत चंद्रकांत पाटणकर यांचा सक्रिय सहभाग असून मोलाचे योगदान आहे. त्यांच्या कार्याला सलाम करुन त्यांना मनापासून शुभेच्छा देतो.
प्रकाश नागणे
माजी अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई.
-----------------------------------------------
बहुआयामी व्यक्तिमत्त्व.....चंद्रकांत पाटणकर
मैत्रीची खाण असलेले, अजातशत्रू,दिलदार मित्रवर्य, दानशूर दाता, दैवज्ञ ज्ञाती अभिमानी, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे निष्ठावंत शिवसैनिक, कुटुंबवत्सल, पत्नीवर निरंतन प्रेम करणारे, मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे आधारस्तंभ, जेष्ठ वृत्तपत्र लेखक, निर्भिड आणि रोखठोक स्पष्टवक्तेपणा, जगन्नाथ तथा नाना शंकरशेट यांच्या बद्दल जाज्वल्य अभिमान बाळगणारे अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा अमृतमहोत्सवी वाढदिवस साजरा होतोय याचा मला अत्यानंद होत आहे.
माहीम मतदार संघातील कित्येक वर्षे वास्तव्य केल्याने परिसराची खडानखडा माहिती आणि सामाजिक समस्येची जाण असल्याने माजी आमदार श्री. सुरेश गंभीर यांचे स्वीय सहाय्यक म्हणून चोख कामगिरी पाटणकरांनी बजावली होती.
राजकीय, सामाजिक पदापासून सुरुवातीपासूनचअलिप्त राहून आजही सातत्याने त्या कार्यात ते सक्रीय आहेत. ते कधीही सव़ंग लोकप्रियतेच्या मागे धावत नाहीत. माझा परिचय आणि त्यांची पहिली भेट २०१२ च्या दरम्यान नामदार जगन्नाथ तथा नाना शंकरशेट यांच्या स्मारकाच्या संदर्भान्वये झाली.
त्यानंतर सतत गाठीभेटी आणि फोन वरून आजही रोजच्या रोज प्रतिष्ठानच्या माध्यमातून नामांतर तसेच स्मारकाच्या बाबतीत आमच्या दिलखुलास चर्चा होतात.
माझ्या घरी नियमितपणे पाटणकर उभयता गणेश दर्शनाला येतात. दादर माहिम परिसरात आदराने त्यांना मान सन्मान आजही मिळतोय. ते एक उत्तम सुवर्णकार आहेत, उमेदीच्या काळात उमरखाडीतील मुस्लिमबहुल भागात ते उत्तम सुवर्णकार म्हणून नावारुपास आले. त्यावेळी त्यांनी तसेच त्यांच्या दुकानातील कारांगिरांनी घडवलेले सोने, चांदी तसेच हिऱ्यामोत्यांचे दागिने आजही जसेच्या तसे जपुन ठेवले आहेत. सोने चांदीच्या दागिन्यांसह जुन्या नोटा तसेच नाण्यांचे ते संग्राहक आहेत. सुवर्णव्यवसायात ते "चंदुभाई" या टोपण नावाने प्रसिद्ध आहेत.
अनेक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल त्यांना पुरस्कार, सन्मानचिन्ह,मानपत्र मिळाली आहेत.
२० - २५ वर्षांपूर्वी त्या काळात जनतेच्या ज्वलंत समस्येला आपल्या धारदार शब्दांनी वाचा फोडणारे स्वतःच्या हस्ताक्षरात वर्तमानपत्रात वृत्तपत्र लेखन करणारे, काही वेळा टंकलेखनाद्वारे पत्रव्यवहार करण्यासाठी स्वखर्चाने आणि पोस्टाचा खर्च पदरमोड करून बहुतेक सर्व वर्तमानपत्रातून त्यांचे लेख प्रसिद्ध होत होते. त्या पत्रांचा संग्रह करुन त्यांनी दोनवेळा "माझी पत्रपंढरी भाग १ याचे प्रकाशन शिवसेना जेष्ठ नेते, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष श्री दत्ताजीराव साळवी यांनी केले तर माझी पत्रपंढरी भाग २ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मातोश्रीवर शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला होता हे विशेष. आता पुन्हा"माझी पत्रपंढरी -३ हे पुस्तक त्यांचा गौरवग्रंथ म्हणून प्रकाशित करण्याचा त्यांनी ध्यास घेतला आहे आणि ते याप्रसंगी आनंदी होताना दिसत आहेत.
पत्नी, दोन मुली,मुलगा,जावई,सून, नातवंडात रममाण होत ते आनंदी जीवन जगत आहेत. मी आणि
आम्हा सर्व मित्रपरिवाराच्या वतीने त्यांना शतायुषी व्हा या शुभेच्छा देताना पुढील आयुष्य निरोगी आणि निरामय मिळो या सदिच्छांसह त्याच्या पुढील शतकोत्तर यशस्वी वाटचालीस सस्नेह शुभेच्छा!!!
ॲड. मनमोहन चोणकर, सरचिटणीस नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट प्रतिष्ठान, उपाध्यक्ष दैसप. माजी नगरसेवक मुंबई मनपा.
=======================================
सामाजिक जीवनातील अनमोल चंद्र !
सामाजिक जीवनात काम करीत असताना अनेक माणसं भेटत असतात यातील सर्वच कांही लक्षात राहतात असे नाही तर काही प्रथम दर्शनीच आकृष्ट करतात, नव्हे जन्मभर त्यांच्या स्नेहात, मैत्रीत, मार्गदर्शनाखाली रहावेसे वाटते. त्यापैकी पदापेक्षा परिश्रमाने प्रतिष्ठा प्राप्त करावी अशी भावना असणारे माहिमच्या विधायक चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक आमचे चंद्रकांत पाटणकर साहेब हे एक आहेत. सुमारे वीसेक वर्षांपूर्वी वृत्तपत्र लेखकांचे माहेरघर असलेल्या मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या कार्यालयात त्यांची आमची पहिली ओळख झाली आणि आमच्या पूर्व पुण्याईने म्हणा पाहता पाहता त्या ओळखीचे रूपांतर घनिष्ठ मैत्रीत कधी झाले ते मात्र कळलेच नाही आज इतक्या वर्षांनेही त्यात कधी खंड पडला नाही. कधी भेटीत, कधी व्हाट्सअपद्वारे तर कधी फोनवरील संभाषणातून संपर्क मात्र कायम राहिलाय आजही याचं कारण त्यांचा माणसं जपण्याचा स्वभाव हेच होय.
ज्यांचे प्रतिबिंब आपल्या मनाच्या पटलावर दिसते त्याच्याशीच आपली मते जुळतात, विचार जुळतात, पाटणकरांशी आमची मते अशीच जुळली. निस्वार्थी, निगर्वी, प्रेमळ आणि तितके सडेतोड, स्पष्टपणे आणि स्वच्छ मनाने बोलणारे. सामाजिक जीवनात अथवा संस्थेत शिस्तबद्ध, प्रसंगी संस्थेच्या हितासाठी कठोर होणारे पाटणकरही आम्ही पाहिलेत. त्यांच्यासोबत काम करत असताना कार्यकर्त्याला उभारी देणारे हे व्यक्तिमत्व अगदी फणसासारखेच. आणि आम्हाला तेच पटले, भावले आणि म्हणूनच आमची मते जुळली, घट्ट झाली.
आमचे मित्र पाटणकर साहेब जीवनाची ७५ वर्ष जरी पूर्ण करीत असले तरी त्यांच्याकडे पाहिल्यावर त्यांचा सामाजिक कार्यातील अफाट उत्साह , तगडी इच्छाशक्ती, आरपार प्रामाणिकपणा तसुभरही कमी झालेला जाणवत नाही. मी कधी कधी विचार करतो की एवढी ऊर्जा या माणसात येते कुठून ? तर त्याचे मुख्य कारण म्हणजे निरपेक्षवृत्ती, सडेतोड स्वभाव, सामाजिक कार्याची विलक्षण आवड आणि जोपासलेला वृत्तपत्र लेखनाचा छंद आजही शाबूत ठेवलेला आहे नव्हे तेच त्यांचे खरं टॉनिक आहे.. आतापर्यंत त्यांची हजारांहून अधिक पत्र प्रसिद्ध झालेली असून यातील काही निवडक पत्रांचे पुस्तकेही निघालेली आहेत.
मुंबई शहरातील प्रतिथयश अशा मराठी वृत्तपत्र लेखक संघात काम करीत असतांना पाटणकर यांनी पत्र लेखकांना प्रेरणा दिलीच शिवाय सामान्य पत्र लेखक हाच केंद्रबिंदू मानून त्याचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे त्यांची धडपड असते.
पत्रलेखकांवर पाटणकर साहेबांचे विशेष प्रेम. वृत्तपत्रलेखनाच्या माध्यमातून समाजाच्या कथा, व्यथा मांडणाऱ्या पत्रलेखक हाच खऱ्या अर्थाने समाजसेवक असतो असे त्यांचे ठाम मत आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमातून समाज जीवन फुलविण्यासाठी धडपडणाऱ्या या कार्यकर्त्यातील संघटना कौशल्य पदोपदी जाणवते. मराठी वृत्तपत्र लेखक संघासह मुंबईतील अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिलेले असून या संस्थांच्या माध्यमातून विधायक उपक्रम राबविण्यात नेहमी पुढे राहणारे चंद्रकांतजी मात्र स्वत: सत्कार सोहळे यापासून दूर राहतात. समाजाचे आपण ऋणी असतो आणि ते फेडणे प्रत्येकाचे नैतिक कर्तव्य ठरते ही त्यांची जीवन निष्ठा आहे. माहीम विभागातील कट्टर ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून त्यांना ओळखणले जातेच किंबहुना आपल्या उमेदीच्या काळात शिवसेनेच्या माध्यमातून विविध अंगी उपक्रम राबविण्यात ते नेहमी अग्रेसर असत. सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, विविध कामे घेऊन त्यांच्याकडे हक्काने जेव्हा येतात तेव्हां त्यांना खात्री असते की पाटणकरांकडे गेल्यावर आपले स्वागत होईल. अशा तऱ्हेने काम करीत असताना कुठे बडेजाव नाही, स्वतःची स्तुती तर नाहीच नाही तर निरपेक्ष वृत्तीने आपणाकडून जी होईल ती मदत करणे म्हणजे ईश्वर सेवा होय असे ते मानतात. आरपार प्रामाणिकपणा हेच त्यांचे भावणारे रूप. नेतृत्वाचे गुण असूनही नेता न झालेला, विधायक उपक्रमातील जिद्दी कार्यकर्ता, तत्त्वनिष्ठ कुशल संघटक, लोकसंग्रहाक वृतीचा आदर्श मित्र, मार्गदर्शक, हितचिंतक, आपला माणूस म्हणून सर्वांना जवळचे वाटणारे चंद्रकांतजी पाटणकर साहेब हे वयाची ७५ वर्षे पूर्ण करीत आहेत. वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.
विश्वनाथ पंडित, ठाणे
माजी प्रमुख कार्यवाह (मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई )
====================================
पडद्यामागचा सेवाभावी कार्यकर्ता : चंदूशेठ
आमचे वृत्तपत्रलेखक मित्र चंद्रकांत वामन पाटणकर हे आज आपल्या वयाची पाऊणशे (७५) वर्षे पूर्ण करून ७६ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. पाटणकर यांना आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. पाटणकर यांना मी गेल्या ४० वर्षांपासून एक सव्यासाची वृत्तपत्र लेखक म्हणून ओळखत आहे. चंद्रकांत पाटणकर सातत्याने गेली ५० वर्षे वृत्तपत्र लेखन करत आहेत.
फक्त वृत्तपत्र लेखन करून गप्प न बसता ते दादर - माहीम परीसरात सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. त्यांची आणि माझी ' मराठी वृत्तपत्र लेखक संघात ' ओळख झाली. संघाच्या प्रत्येक कार्यक्रमात ते सहभागी असतात. दिलदार वृत्तीने खर्चही करतात. ते कधीही कसलीही अपेक्षा न ठेवता पडेल ते काम करतात. सामाजिक , सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात होणाऱ्या अन्यायाविरुद्ध ते सडेतोड लिहीत असतात. त्यांची सुमारे १५०० हून जास्त. पत्रे व लेख विविध नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाली आहेत. पाटणकरांना विविध पत्रलेखक संघटना आणि सामाजिक संस्थांकडून त्यांना १५० पुरस्कार आणि असंख्य सन्मानपत्रे मिळाली आहेत.
मुंबई शहराचे शिल्पकार आदरणीय जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेट हे पाटणकरांचे दैवत आहेत त्यांचे .नाव मुंबईतील ' मुंबई सेंट्रल ' किंवा ' ग्रॅंट रोड ' या रेल्वे स्थानकांना द्यावे यासाठी त्यांनी राज्य व केंद्र सरकार तसेच रेल्वे प्रशासनाला असंख्य पत्रे पाठवली आहेत.
अतिशय दानशूर व सढळ हाताने खर्च करणारे म्हणून लहानांपासून थोरांपर्यंत ' चंदू शेठ ' म्हणून ते ओळखले जातात. याचा त्यांना अजिबात गर्व नाही. कोणत्याही आपत्कालीन प्रसंगात ते नेहमीच मदतीसाठी धावून जातात. असा हा आमचा निस्वार्थी मित्र आज आपले *अमृतमहोत्सवी वर्ष* साजरे करत आहे. आम्ही चंद्रकांत पाटणकर यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावे असे अभीष्टचिंतन करीत आहोत.
अनंत आंगचेकर, भाईंदर (ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक).
=======================================
अभ्यासपूर्ण पत्रलेखन करणारे पाटणकर
२९ नोव्हेंबर हा दिवस खूप खास आहे,कारण आज ज्येष्ठ पत्रलेखक आणि शिवसैनिक चंद्रकांत पाटणकर यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा करत आहोत. प्रत्यक्षात ७५ वा वाढदिवस हा चंद्रकांत पाटणकर यांच्या आयुष्यातील असा पडाव आहे जिथे पर्यंत पोहोचून बघावे लागते की, त्यांनी जीवनात काय मिळवले. पाटणकर यांच्याशी माझा संबंध २५ वर्षपूर्वी मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या दादरच्या शिंदे वाडीतील संघाच्या कार्यालयात झाली. तेथून त्यांचे आणि माझे ऋणानुबंध आहेत. पाटणकर यांनी वृत्तपत्र लेखन करताना त्यांनी अनेक विषय परखडपणे लोकसत्ता, सामना , मटा अशा अनेक वर्तमानपत्रातून मांडले. वर्तमापत्रातून पाटणकर यांची पत्रे वाचायचो तेव्हा चांगल्या प्रकारे पत्रलेखन असते.कारण त्यांची पत्रे केवळ माहितीपर नसायची तर पत्रातून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे. तसेच माझे काही लेख सामना मधून छापून आल्यावर तुम्ही चांगल्या प्रकारे लेख लिहिला असे सांगून माझे कौतुक करतात. पाटणकर यांनी मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या प्रत्येक उपक्रमात सक्रिय भाग घेऊन दिलेले मोलाचे योगदान संघ कधीही विसणार नाही. मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या ५५ व्या संमेलनाचे स्वागत समितीचे अध्यक्षपद पाटणकर यांनी भूषविले होते. तसेच दैवज्ञ हितवर्धक समाज आणि दैवज्ञ समाजोन्नती परिषद यांच्या माध्यमातून मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला नामदार नाना शंकर शेठ यांचे नाव देण्यात यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले आणि करत आहेत. सामना या वर्तमानपत्रातून नाना शंकर शेठ यांच्या स्तंभ लेखन सुद्धा केले आहे. याचा आमच्या सारख्या वृत्तपत्र लेखकांना अभिमान आहे. वृत्तपत्र लेखन ,स्तंभ लेखन ,सामाजिक कार्यकर्ते आणि गेली अनेक वर्षे राजकिय क्षेत्रात सुध्दा सक्रिय आहेत. विशेषतः त्यांनी दैवज्ञ समाज आणि शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी मोठे विधायक कार्य केले आहे. पाटणकर यांची एक आठवण म्हणजे मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या वतीने दरवर्षी एका ज्येष्ठ वृत्तपत्र लेखकाचा जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येते ,त्यावेळी पाटणकर स्वतःही त्या पुरस्कारकर्त्याचा ते स्वतःही सन्मान करीत असतात. संघ आणि इतर अनेक संस्थाचे पुरस्कार मिळाले आहेत.७५ वर्षाचा प्रवास म्हणजे अनुभव, शहाणपण आणि अविस्मरणीय आठवणींचा एक अनमोल ठेवा आहे. जेजे आपणाशी ठावे- ते ते दुसऱ्यांशी शिकवावे या समर्थ रामदास स्वामींच्या शिकवणीनुसार पाटणकर यांच्याकडे जे कोणी मार्गदर्शन मागतात त्यांना ते नेहमीच हातच राखून न ठेवता देतात. त्यामुळे अनेक सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय संस्थांशी पाटणकरांचे स्नेहपूर्ण आणि घरोब्याचे संबंध प्रस्थापित झाले आहेत. पाटणकरांनी आपल्या कार्याचा कर्तृत्ववाचा , व्यक्तीमत्वाचा ठसा अनेक क्षेत्रात स्वातंत्रपणे उमटवला आहे.असे हे माझे मित्र पाटणकर यांना अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी माझ्याकडून कोटी कोटी शुभेच्छा.
सुनील कुवरे, ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक
==============================
चंद्रकांत पाटणकर : एक दिलदार माणूस
मराठी वृत्तपत्र लेखक संघात प्रवेश करण्याच्या आधी माझी आणि चंद्रकात पाटणकर यांची ओळख नव्हती पण नंतर काही दिवसातच वृत्तपत्रलेखक संघाच्या कार्यालयात आमची भेट झाली.त्यांची छापून आलेली पत्रे मी नियमित वाचत असे त्यामुळे या माणसाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता होती. हळूहळू आमचे बोलणे सुरू झाले. त्यानंतर चंद्रकांत पाटणकर हे माहीम विभागातील कट्टर शिवसैनिक असल्याचे कळताच माझ्यातील कट्टर शिवसैनिक सुखावला. त्यांचा तो बोलका स्वभाव आणि विभागात असलेले कार्य त्याचप्रमाणे अगोदरच्या काळात स्थानिक प्रश्नांना सोडविण्यासाठी विविध वृत्तपत्रात केलेले लिखाण याचीही त्यानिमित्ताने माहिती झाली. काही वर्षांपूर्वी मी राजकारणावरील एक पुस्तक हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेच्या हस्ते प्रकाशित करून घेतले होते. त्याची त्यांना माहिती झाल्यानंतर चंद्रकांत पाटणकर यांना फार आनंद झाला. त्यांनी ते पुस्तक माझ्याकडून घेतले आणि मला घरी बोलाविले.मी त्यांच्या माहीम निवासस्थानी घरी गेलो असताना चंद्रकांत पाटणकर याची वृत्तपत्रांतील लिखाणाची कात्रणे पाहिली. त्यांनी माझी पत्रपंढरी भाग १ आणि भाग २ अशी दोन पुस्तके प्रकाशित केली होती ती त्यांनी मला भेट दिली. ती पाहिल्यानंतर मी थक्क झालो कारण त्यामध्ये त्यांनी ऐन उमेदीत निर्भीडपणे लिहिलेल्या अनेक विषयांची अनेक वर्तमानपत्रांनी दखल घेतली होती. माहीम किल्ल्याची अवस्था आणि अनेक सामाजिक विषय स्पृहणीय होते. त्यांचे कार्य फक्त वृत्तपत्र लेखनापुरते नव्हते तर त्यांच्या समाजाप्रती त्याची कळकळ सतत जाणवत असते. नामदार नाना शंकरशेट यांच्या प्रति असलेला आदर पदोपदी जाणवत होता. मुंबई सेंट्रल स्थानकाला नाना शंकरशेट यांचे नाव द्यावे यासाठी त्यांनी शासनाकडे केलेला पत्रव्यवहार,आंदोलन वाखाणण्याजोगे आहेत. आजही या वयातही ते त्यासाठी आग्रही आहेत वृत्तपत्र लेखक संघाच्या जागेसाठी त्यांनी केलेली धडपड अजूनही आठवते .त्यांची ही लढण्याची प्रवृत्ती कौतुकास्पद आहे.चंद्रकांत पाटणकर यांचा स्वभाव आणि दिलदारपणा अनेक वेळा दिसून आला.कोणत्याही वेळेत खिशात हात घालून सढळ हस्ते मदत करणारे चंद्रकांत पाटणकर पाहिले आहेत.आज त्यांची पंच्याहत्तरी साजरी होत आहे ही आमच्यासाठी सुखावह आणि आनंदाची गोष्ट आहे.त्यांनी आपली शंभरी पूर्ण करावी ही ईश्वरचरणी प्रार्थना
- अरुण पां. खटावकर, ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक
=======================================
मित्र आणि मार्गदर्शक : चंद्रकांत पाटणकर
वृत्तपत्र लेखकांची प्रतिनिधिक संघटना मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई या संस्थेच्या दादर येथील कार्यालयात 'कायदे विषयक मार्गदर्शन' या कार्यक्रमासाठी मी गेलो होतो. त्यावेळी कार्यकारणी मंडळाचे सदस्य येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत करत होते. एकमेकांची विचारपूस करत होते. मी तिथे नवीन असल्यामुळे हाॅल मध्ये जाऊन खुर्चीवर बसलो होतो. एक चांगले उंच, धडधाकट अशी व्यक्ती माझ्या समोर आली. त्यानी हसत माझे स्वागत करून हात मिळवला आणि स्वतःची ओळख करून दिली. मी चंद्रकांत पाटणकर या संस्थेचा आजीव सभासद आहे. त्यानंतर माझी ओळख त्यांना सांगितली. ते मला म्हणाले तुम्ही वृत्तपत्र लेखक आहात का ? मी हो म्हणालो. ते म्हणाले आपण कुठल्या वृत्तपत्र लेखक संस्थेचे सभासद आहात का ? मी नाही म्हणालो. मग त्यांनी सांगितले आमच्या या संस्थेचे सभासद व्हा. मी होकार दिला. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी संघाध्यक्ष गणेश केळकर, कार्याध्यक्ष दत्ताराम घुगे प्रमुख कार्यवाह रवींद्र मालुसरे यांच्याशी माझी ओळख करून दिली. यानंतर मी या संस्थेचा अजीव सभासद झालो.
या संस्थेचा सभासद झाल्यानंतर कार्यालय कामकाज दिनी व कार्यक्रमाच्या निमित्ताने मी कार्यालयात जाऊ लागलो. त्यामुळे संघाचे अनेक वृत्तपत्र लेखक सदस्य यांची ओळख व परिचय झाला. विचारांची देवाणघेवाण झाली. यावेळी चंद्रकांत पाटणकर यांच्याशी माझी जवळीक वाढली. पाटणकरांची वृत्तपत्र लेखक संघ कार्यालयातील विशेषतः म्हणजे, ते प्रत्येक वेळी संघात आल्यानंतर संघातून बाहेर पडण्यापूर्वी, कोषाध्यक्षांकडे न चुकता शंभर रुपयाची देणगी देऊन पावती घेत होते. त्यांची आणखीन एक बाब माझ्या लक्षात आली ती म्हणजे ते कट्टर शिवसैनिक व माननीय हिंदुह्रदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना दैवत मानणारे आहेत.
चंद्रकांत पाटणकर यांची पत्रे सामना, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, लोकसत्ता अशा अग्रगण्य वृत्तपत्रामधून नेहमी प्रसिद्ध होतात. त्यांचे लेखन नेहमी सडेतोड, परखडपणे समाजाला उपयोगी असे असते. नेहमी दिलखुलास व हसतमुख असणारे, कोणताही मित्र अथवा अपरिचित व्यक्तीच्या सुखापेक्षा दुःखदायक प्रसंगात नेहमी पाठीशी उभे राहून मदत करणार असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे. आज जवळजवळ २५ - ३० वर्षांपासून आमची वृत्तपत्र लेखक या नात्याची मैत्री आहे. मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या कार्यकारणी मंडळातील विविध पदांवर मी कार्यरत होतो व आहे. पण पाटणकर आमच्या वृत्तपत्र लेखक संघाच्या कार्यकारणी मंडळातील कोणतेही पद न घेता ही, केवळ कार्यकर्ता म्हणून संघाच्या कार्यात नेहमी स्वतःला झोकून देतात.
मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी वृत्तपत्र लेखकांचे संमेलन कुडाळ मध्ये संपन्न झाले होते. त्यावेळी पूर्वतयारीसाठी कार्यकारी मंडळातील सदस्य म्हणजे जवळजवळ १५ जणांचा समूह तिकडे गेला होता. त्यामध्ये मी सुद्धा होतो. पाटणकरांनी आमच्या सर्वांची अगदी घरच्यासारखी व्यवस्था त्यांच्या मालवण मधील चिंदर गावातील बंगल्यात केली होती. दररोज तिकडचे वेगवेगळे शाकाहारी, मांसाहारी पदार्थ त्यांनी आम्हाला त्यावेळी खाऊ घातले होते. अगदी मुंबईत देखील वृत्तपत्र लेखक मित्र आम्ही कुठेही गेलो. त्याप्रसंगी हॉटेल अथवा कोणत्याही ठिकाणी पटकन खिशात हात घालून खर्च करणं असा त्यांचा स्वभाव आहे. नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मार्गक्रमण करणे असे चंद्रकांत पाटणकर यांचे हे व्यक्तिमत्व आहे.
शनिवार दिनांक २९ नोव्हेंबर २०२५ रोजी, श्रीमान चंद्रकांतजी पाटणकर वयाची ७५ वर्षे पूर्ण करत आहेत. त्यांना अमृत महोत्सवी वाढदिवस निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा व त्यांना निरोगी दीर्घायुष्य मिळावे. ही ईश्वरचरणी प्रार्थना!
रमेश भिकाजी सांगळे, कार्याध्यक्ष (मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई )
===========================================
निर्भीड लेखक आणि कडवट शिवसैनिक
आदरणीय चंद्रकांत पाटणकर जेष्ठ कडवट शिवसैनिक आणि निर्भीड सिटीझन जर्नलिस्ट. दैनंदिन व्यवहार करताना त्यांना जी वैगुण्ये वा समस्या दिसतात ती प्रामाणिकपणे आपले मत म्हणून अगदी स्पष्टपणे मांडणारे व्यक्तिमत्व. २९ नोव्हेम्बरला वयाची पंचांहत्तरी पूर्ण करीत आहेत. मी परिवाराच्या वतीने त्यांना आरोग्यमयी दीर्घायुष्यासाठी खूप शुभेच्छा देतो. सार्वजनिक आयुष्यात समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो याचे भान पाटणकरांना असल्याने त्यांनी मुंबईतील दैनिकातून माहीम विभागातील समस्या तर लिहिल्याचं परंतु त्याचबरोबर राज्य, देश पातळीवर निर्माण होणाऱ्या विषयांवर सुद्धा भाष्य करायचे असे त्यांनी तत्व अंगी मानले. त्यांनी आजपर्यंत जवळपास दीड हजार पत्रे लिहिली असून त्यांना पन्नासच्यावर पुरस्कार मिळाले आहेत. त्यांची पत्रे वाचताना हळव्या मनाचा पण कठोर व्यक्तिमत्वाचा निर्भीड पत्रलेखक असे प्रतिबिंब त्यांच्या लेखनातून प्रत्ययास येते. आणि म्हणूनच त्यांनी आपले वैचारिक दैवत मानलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा परिसस्पर्श त्याच्या पुस्तकाला लाभला. शिवसेना शिवसेनाप्रमुख आणि समाजकारण हेच त्यांच्या लिखाणाचे मूळ स्तोत्र राहिला आहे. आजही त्यांच्या बोलण्यातून आणि वागण्यातून एक कट्टर शिवसैनिक त्याचबरोबर तेवढाच प्रभावी सामाजिक कार्यकर्ता समाजाच्या दृष्टीस पडतो. त्यांची ही अविरत दमदार वाटचाल अशीच पुढील आयुष्यात निर्विघ्न आरोग्यमयी असावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. त्यांच्या हातातील लेखणीतून उत्तरोत्तर समाजप्रबोधनात्मक लेखन प्रसिद्ध होवो. जय हिंद जय महाराष्ट्र
पत्रकार - राजन वसंत देसाई
=======================================
निर्भीड, दिलदार, प्रेमळ मनाचे : चंद्रकांत वामनराव पाटणकर !
ज्येष्ठत्वं जन्मना नैव गुणैः ज्येष्ठत्वम् उच्यते
गुणात् गुरुत्वम् आयाति दुग्धं दधि घृतं क्रमात्
( याचा अर्थ असा की, केवळ जन्माने कोणी श्रेष्ठ होत नाही, तर श्रेष्ठत्व हे गुणांमुळेच सिद्ध होते.
जसे दूध क्रमशः दही आणि मग घृत (तूप) बनते, त्याचप्रमाणे गुणांमुळे व्यक्तीला मोठेपणा मिळतो.)
अंगी स्पष्टपणा,निर्भीड, दिलदार,प्रेमळ मनाचे, एक ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक आणि एक ज्येष्ठ कडवट शिवसैनिक म्हणजेच चंद्रकांत वामनराव पाटणकर ! अमृत महोत्सवी वर्ष साजरे होत असताना पाटणकर यांचे "माझी पत्रपंढरी" भाग तिसरा गौरव ग्रंथ म्हणून प्रकाशित होत आहे.
आयुष्याच्या ७५ वर्षात ५२ वर्षे त्यांनी समाजासाठी दिले आहेत. आपण किती वर्ष जगलो! याचे मोजमाप करताना,कसे जगलो ? आणि कुणासाठी जगलो ? याचेही मूल्यांकन प्रत्येकाचे समाज करीत असतो. ३५ वर्षे पाटणकर साहेबांच्या सहवासात मी व्यतित केलेले क्षणांचा मागोवा घेताना प्रामुख्याने एक लक्षात आले ते म्हणजे हा माणूस समाजासाठी ७० टक्के जगला आहे.
मराठी वृत्तपत्र लेखक संघ दादर शिंदेवाडी मुंबई या संस्थेत सभासद झालो. त्यावेळेला तत्कालीन अध्यक्ष स्व. गणेशजी केळकर साहेब पाटणकर यांना माझी ओळख करून देताना मिश्किलपणे म्हणाले, आपल्या संघाचा एक नवीन सभासद व तुमच्या विचाराचा गिरणगावातील एक शिवसैनिक वाढला आहे. त्यावेळी उपस्थित वि.अ. सावंत साहेबांसारखे इतरही ज्येष्ठ वृत्तपत्र लेखकांमध्ये हशा पिकला होता. त्यानंतर आता त्यांच्याशी केव्हाही भेट झाली की, शिवसैनिकांचा सांकेतिक शब्द जय महाराष्ट्र! आपोआप आमच्या दोघांच्या तोंडून निघतो. ते माहीमला सेनाभवन पासून हाकेच्या अंतरावर राहतात. त्यामुळे शिवसेनेत टप्प्याटप्प्याने ज्या बंडखोरी झाल्या वा आंदोलने झाली त्याचे पडसाद शिवसेना भवनात उमटायचे, या सर्व घटनांचे पाटणकर साक्षीदार आहेत. बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक याविरुद्ध पेटून उठायचा.... बाळासाहेब अंगार है बाकी सब भंगार है अशी आरोळी द्यायला तो शिवाजी पार्कला शिवसेनेचे अधिष्ठान असलेल्या सेनाभवनाजवळ यायचा, यात पाटणकर अग्रभागी असायचेच. हाच ज्वलंत विचार त्यांची निष्ठा अधिकाधिक घट्ट करीत गेला. पहिले महापौर डॉ हेमचंद्र गुप्ते तर त्यांच्या कॉलनी मध्येच राहायचे, त्यांनी शिवसेना सोडली तेव्हा तर चंद्रकांत पाटणकरांना खूपच राग आला होता. त्यानंतर शिवसेनेने ज्यांना मानाची पदे दिली आणि मोठे केले असे अनेकजण शिवसेना सोडून गेले, शिवसेना संकटात आणली तरी अनेकजण आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक अशी भूमिका घेत विचलित झाले नाहीत त्यापैकी चंद्रकांत पाटणकर एक आहेत. चार अक्षरी शिवसेना, पाच अक्षरी बाळासाहेब, सहा अक्षरी मराठी माणूस हे ध्येयवादी असलेले विचार पाटणकर यांनी पुरेपूर आत्मसात केले आहेत. पाटणकरांच्या अनेक भेटी झाल्या त्यांच्याशी वार्तालाप करताना त्यांच्या खऱ्या जीवनातील अनेक पाने मला उलगडत गेली. ही व्यक्ती फक्त स्वतःसाठी न जगता शिवसेना प्रमुखांच्या विचारधारेने प्रेरित होऊन त्यांचा विचार आत्मसात करून मराठी माणूस व मराठी भाषेवर होणाऱ्या अन्यायविरुद्ध अनेक प्रसिद्ध वृत्तपत्रांमधून परखडपणे पत्रलेखन आणि लेख लिहून कोणाचीही मुलाहिजा ठेवली नाही. व्यवसायाने सोनार असल्याने सोन्याचा दागिने घडविता घडविता आपल्या हातातील लेखणीने समाज घडविण्याचे जनहितार्थ कार्य त्यांच्या हातून घडले. कोणत्याही वेळी धार्मिक तेढ निर्माण होईल अशा डोंगरीसारख्या विभागात टोकाच्या गुंडगिरीने व्यापलेल्या मुख्य ठिकाणी त्यांनी व्यवसाय केला. संवेदनशील भागात एक मराठी, कट्टर शिवसैनिक असलेल्या पाटणकर पिता-पुत्रांनी सर्वांशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करून चोख व्यवसाय केला.ख्वाजा समाजाचे प्रिन्स अली खान यांच्या डोक्यावरील मुकुट पाटणकरांचे पिताश्री वामनराव या हिंदू व्यक्तीने बनविला होता, ती कलाकुसर आणि नाजूक काम पाहून त्या समाजाने त्यांची तारीफ केली होती. त्या काळचा स्मगलर प्रसिद्ध करीमलाला एका विषयात अडचणीत आले होते पाटणकर यांनी परिचित या नात्याने मदत केली. करीमलाला यांना हे कळताच पाटणकरांना निरोप देऊन बोलावून घेतले. आणि त्यांच्या माणुसकीचे तोंडभरून कौतुक केले. त्यांच्या जीवनाचा नवीन पैलू पाटणकरांच्या तोंडून नुकताच ऐकायला मिळाला. पाटणकरांनी बेधडक लिहिले आणि त्याचा पाठपुरावाही त्याच ताकदीने केला, माहीम येथील टँकर पाणी चोरी, माहीम किल्ल्याची दुरावस्था, त्रंबकेश्वर देणगी प्रकरण याची दखल संबंधित यंत्रणांनी घेतली होती. शिवसेनाप्रमुखांशी त्यांचे शिवसैनिक म्हणून आणि अलीकडे त्यांच्या घराशी त्यांचे कौटुंबिक जवळचे नाते निर्माण झाले आहेत. परंतु याबाबत दिखावा करीत नाहीत.मला भावलेले ज्येष्ठ बंधूवर्य, ज्येष्ठ शिवसैनिक, जेष्ठ वृतपत्र लेखक आता खऱ्या अर्थाने ज्येष्ठ व्यक्ती झाले आहेत. त्यांचे जीवन कार्य आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना प्रेरणादायी ठेवा ठरणार आहे ! आपले पुढील जीवन आपल्या परिवारासमवेत आरोग्यदायी जावो ! हीच आई भवानी चरणी प्रार्थना ! जय महाराष्ट्र !!
दिगंबर चव्हाण (कार्यक्रम प्रमुख, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई )












0 टिप्पण्या