Ticker

6/recent/ticker-posts

निमंत्रण : रवींद्र मालुसरे यांना पुरस्कार

श्री शिवाजी ज्ञानपीठ (इंटरनॅशनल)


दिनांक : ११/०७/२०२५
प्रति,
माननीय श्री. रवींद्र मालुसरे साहेब,

'श्री शिवाजी ज्ञानपीठ (इंटरनॅशनल) ही संस्था छत्रपती शिवाजी महाराजांचे सिद्धांत ठेऊन सामाजिक कार्य करणाऱ्यांचा सत्कार करते. संस्थेच्या वतीने २०२५ सालासाठी देण्यात येणाऱ्या वीर तानाजी मालुसरे पुरस्कारासाठी आपली निवड केली आहे. या पुरस्काराचे स्वरूप मानचिन्ह, शाल, श्रीफळ व रु. ११,००१/- (अकरा हजार एक रोख) असे आहे.
संस्थेच्या वतीने यापूर्वी श्री. संभाजी राजे छत्रपती, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. सदाशिव शिवदे, प्रो. मोहन आपटे, श्री. पांडुरंग बलकवडे, श्री. प्रमोद मांडे, श्री. पी. आर. मुंडले, प्रा. पी. के. घाणेकर, डॉ. जयसिंगराव पवार, श्री. सुनील पवार व डॉ. सुचित्रा ताजणे यांना पुरस्काराने तर महावीरचक्र प्राप्त कॅप्टन मोहन ना. सामंत, शौर्य चक्र व सेना मेडल प्राप्त भा. नौ. निवृत्त ले. कर्नल तुषार जोशी, निवृत्त लेफ्ट कर्नल एस. एस. हेरवाडकर, निवृत्त मेजर अनिल माटवणकर, निवृत्त कॅप्टन प्रफुल तावडे यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आणि विचार यांचा अभ्यास करण्यासाठी 'श्री शिवाजी ज्ञानपीठ (इंटरनॅशनल)' ची स्थापना डॉ. हेमंतराजे गायकवाड यांनी केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला जागतिक स्थान मिळवून देणे हे 'श्री शिवाजी ज्ञानपीठ (इंटरनॅशनल)' चे मुख्य उद्दिष्ठ आहे.

याच उ‌द्देशाने डॉ. हेमंतराजे गायकवाड यांनी 'शिवाजी महाराज द ग्रेटेस्ट' हे पुस्तक लिहिले. या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना जगातील १० महान योद्ध्यांशी केली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज हे या सर्व योद्ध्यांपेक्षा कसे श्रेष्ठ आहेत हे सिद्ध केले आहे. या पुस्तकाला ग्रंथालय भारतीचा पुरस्कार परमपुज्य मोहनजी भागवत यांच्या हस्ते मिळाला आहे.
श्रीमती. प्रतिभाताई पाटील (माजी राष्ट्रपती), श्री. मोहन भागवत, श्री. उदयनराजे भोसले, श्री. अशोक चव्हाण, श्री. अण्णा हजारे, श्री. मनोहर जोशी, श्री. पृथ्वीराज चव्हाण, श्री. राज ठाकरे, श्रीमती. वर्षा गायकवाड यांनी पुस्तकाला शाबासकीची थाप दिली आहे.
या पुस्तकावर आधारीत 'शिवाजी महाराज द ग्रेटेस्ट' या मराठी डॉक्युमेंटरी फिल्मची निर्मिती केली आहे. तसेच हि फिल्म इंग्रजी, हिंदी, कन्नड, संस्कृत आणि बंगाली मध्ये भाषांतरित केली आहे.
मा. रवींद्र मालुसरे आपणास हा पुरस्कार दादर येथील श्री शिवाजी मंदिर येथे दि. १५ सप्टेंबर २०२५ रोजी दु. ३:०० ते सायं. ६:०० या वेळेत सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येईल.
आपण हा पुरस्कार स्विकारावा ही नम्र विनंती. कळावे. आपले मनःपूर्वक अभिनंदन !
आपला विश्वासू,
डॉ हेमंतराजे गायकवाड
श्री शिवाजी ज्ञानपीठ (इंटरनॅशनल).

कार्यक्रमाचे प्रमुख  पाहुणे 
प्रविणचंद्र वसंतराव भोसले
शासकीय नेमणूक तज्ञ सदस्य, बृहत आराखडा समिती, पुरातत्व विभाग, महाराष्ट्र शासन २००९-२०१४ सदस्य, दुर्ग संवर्धन समिती, पुरातत्व विभाग, महाराष्ट्र शासन २०१४-२०१९ व सध्या २०२२ पासून

महाराष्ट्राचा व मराठ्यांचा इतिहास हा आवडीचा व अभ्यासाचा विषय असून, त्यासाठी १९९१ पासून महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील मराठ्यांचे किल्ले, ठाणी, राजवाडे तसेच दक्षिण भारतातील प्रसिध्द लेणी व मंदिरे यांचा अभ्यास करीत आहे. ह्यासाठी मोटारसायकलवरून भारतभर जवळपास २,००,००० (दोन लाख) कि.मी. प्रवास केला. मराठ्यांचे २५० हून अधिक किल्ले, १५०० समाधीस्थाने, महाराष्ट्रातील जवळपास सर्व प्राचीन मंदिरे, अनेक ऐतिहासिक वाडे, विहिरी, घाट इत्यादिंना भेटी देऊन त्यांची माहिती व स्थापत्याची वैशिष्ट्ये इत्यादिंची नोंद करुन छायाचित्रे काढली आहेत.
महाराष्ट्रातील किल्ले व मंदिरे ह्यांचा स्थापत्यशास्त्राच्या अनुषंगाने अभ्यास करीत असून त्यासाठी २००००० (दोन लाख) पेक्षा जास्त छायाचित्रे प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन स्वतः काढली आहेत.
'पराक्रमी मराठ्यांची समाधीस्थाने' हा अभ्यासाचा विषय असून त्यासाठी मराठेशाहीतील ३५० प्रसिद्ध व्यक्तींची समाधीस्थाने प्रत्यक्ष जाऊन पाहिली. ह्या सर्व व्यक्तींची हस्ताक्षरे, शिक्के, नाणी, चित्रे मिळवून ही माहिती सर्वसामान्य लोकांना 'दुर्गदर्शन' प्रदर्शन व पुस्तकांच्या माध्यमातून पुरविली.
१) दुर्गदर्शन प्रदर्शन :-
किल्ले व समाधीस्थानांच्या निवडक १६०० छायाचित्रांचे 'दुर्गदर्शन' प्रदर्शन निर्माण केले. ह्यामध्ये १५५० ते १८५७ हा मराठेशाहीचा कालखंड आवश्यक माहितीने परिपूर्ण असलेल्या छायाचित्रांद्वारे जनतेला दाखविला जातो.
किल्ले व समाधीस्थाने यांची माहिती लोकांना व्हावी व ह्या स्थळांचा जीर्णोद्धार होण्यासाठी प्रयत्न व्हावेत ह्यासाठी निर्माण केलेल्या दुर्गदर्शन प्रदर्शनास आजवर ४,००,००० (चार लाख) लोक व ८०,००० (ऐशी हजार) विद्यार्थ्यांनी भेट दिलेली आहे.
हे प्रदर्शन सोलापूर, कोल्हापूर, वाई, बेळगांव, डोंबिवली, ठाणे ह्यासह विविध ठिकाणी आजवर ११० वेळा आयोजित करण्यात आलेले आहे.
२) लेखन :
 मराठ्यांची धारातीर्थे (ग्रंथ) :
'पराक्रमी मराठ्यांची समाधीस्थाने' हा अभ्यासाचा विषय असून त्यासाठी मराठेशाहीतील ३५० प्रसिद्ध व्यक्तींची समाधीस्थाने प्रत्यक्ष जाऊन पाहिली. ह्या सर्व व्यक्तींची हस्ताक्षरे, शिक्के, नाणी, चित्रे मिळवून ही माहिती सर्वसामान्य लोकांना एकत्रितपणे देता यावी ह्या हेतूने 'मराठ्यांची धारातीर्थे' ह्या ग्रंथाचे लेखन व प्रकाशन केले. मराठेशाहीतील ३५० व्यक्तींची समाधीस्थाने, शिक्के, चित्रे, हस्ताक्षरे यांच्या छायाचित्रांचा समावेश असलेल्या ह्या पुस्तकाला श्री. बाबासाहेब पुरंदरे, डॉ. वसंतराव मोरे, डॉ. रमेश जाधव, श्री. निनाद बेडेकर, श्री. अ. रा. कुलकर्णी, श्री. रा. चिं. ढेरे, डॉ. शिवदे अशा मान्यवर इतिहासतज्ज्ञांनी वाखाणले असून सदर ग्रंथाला ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. जयसिंगराव पवार यांची विवेचक प्रस्तावना आहे.
* दुर्गदर्शन पुस्तकमाला :
महाराष्ट्रातील महत्त्वाचे किल्ले पाहण्यास लोकांना उद्युक्त करावे, ह्या किल्ल्यांची प्रसिद्धी व्हावी व त्यांचा इतिहास जपावा ह्या हेतूने 'दुर्गदर्शन' पुस्तकमालेचे लेखन करून देवगिरी, शिवनेरी, राजगड, तोरणा, प्रतापगड, सिंहगड, पुरंदर, पन्हाळा, विशाळगड, सिंधूदुर्ग, विजयदुर्ग, कुलाबा, जंजीरा व रायगड ही पुस्तके प्रकाशित केली. ह्याशिवाय सर्वभाषिक लोकांपर्यंत किल्ल्यांची माहिती पोहोविण्यासाठी रायगड, प्रतापगड व सिंधूदुर्ग ह्या किल्ल्यांची पुस्तके इंग्रजीमध्ये प्रकाशित केली. एकत्रितपणे थोडक्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३० किल्ल्यांची माहिती देणारे 'शिवदुर्ग यात्रा' हे पुस्तक प्रकाशित केले.
* प्रतापगड जीर्णोध्दार कार्य प्रकल्प :
प्रतापगड जीर्णोध्दार कार्यांची सर्वांगीण माहिती देणारा प्रकल्प अहवाल तयार केला.
* गाईड मार्गदर्शक पुस्तक :
प्रतापगडावर येणाऱ्या पर्यटकांना किल्ला दाखविणाऱ्या गाईड लोकांना उपयुक्त ठरणारे गाईड मार्गदर्शक पुस्तक तयार केले. या पुस्तकात किल्ल्याची सर्वांगिण माहिती, इतिहास तसेच गाईडने पर्यटकाबरोबर कसे वागावे व पर्यटन वाढीसाठी काय प्रयत्न करावेत. याची माहिती दिलेली आहे.
* लेख :
विविध दैनिके, मासिके इत्यादि मध्ये ऐतिहासिक विषयावरील १२ लेख प्रसिध्द झालेले आहेत.
३) ऐतिहासिक वास्तूंची बांधकामे :
* प्रतापगड जीर्णोद्धार कार्य सध्या सुरू असून हा किल्ला शिवकालीन स्वरूपात आणण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मायभवानी सामाजिक संस्था, प्रतापगड यांनी हाती घेतलेला होता. ह्या कामासाठी इंजिनिअर
म्हणून माझी नेमणूक केलेली होती. प्रकल्प अहवाल तयार करणे, वेबसाईट बनविणे, विविध शासकीय व बिगरशासकीय कार्यालयांशी पत्रव्यवहार करणे व प्रत्यक्ष बांधकामाचे प्लॅन, पद्धत, देखरेख ह्यांची जबाबदारी स्विकारली आहे. सिमेंटचा अजिबात वापर न करता. जुन्या पध्दतीने चुना बनवून त्यामध्ये गडाचा जीर्णोध्दार केला जात आहे.
* सेनापती कापशी (कोल्हापूर) येथील सेनापती संताजी घोरपडे व त्यांची पत्नी द्वारकाबाई यांच्या पडलेल्या समाधीस्थानाचा जीर्णोध्दार पुन्हा मूळ रुपात केला आहे.
* मिरज येथील एका जुन्या दगडी वाड्याचा दर्शनी भाग पूर्णपणे काढून पुन्हा तो दुसऱ्या ठिकाणी मूळच्या प्रमाणेच उभा केला आहे.
* आधुनिक साहित्य वापरुन जुन्या शैलीची बांधकामे करणे हा व्यावसायातील महत्वाचा भाग आहे.
* तानाजी मालुसरे म्हाळोजी घोरपडे नागोजी जेधे बहिर्जी नाईक विठोजी चव्हाण यांच्या समाधी जीर्णोध्दार कार्यात इंजिनीयर व समाधी संशोधक या नात्याने सहभागी आहे.
४) संशोधन :
* छत्रपती शिवाजी महाराजांचे सख्खे थोरले भाऊ जिजाऊपुत्र संभाजीराजे यांची कनकगिरी (कर्नाटक) येथील समाधी, मल्हारराव होळकरांची आलमपूर (मध्यप्रदेश) येथील मूळ समाधी व बाजीराव-मस्तानी यांचे पुत्र समशेर बहाद्दर यांची भरतपूर (राजस्थान) येथील कबर ह्यांचा शोध घेऊन ती माहिती छायाचित्रांसह मराठीमध्ये प्रथमच प्रसिद्ध केली.
* छत्रपती शिवाजी महाराजांचा दक्षिण दिग्विजय ह्या दुर्लक्षित विषयाची सर्वांगिण माहिती मिळविण्यासाठी शिवरायांचे महाराष्ट्राबाहेरील किल्ले तसेच त्यांनी भेट दिलेली दक्षिण भारतातील महत्वाची मंदिरे ह्यांचा अभ्यास चालू आहे.
* उपग्रह छायाचित्रांवरुन १०० किल्ल्यांचे जवळपास अचूक व प्रमाणबध्द नकाशे तसेच किल्ल्यांवरील विविध वास्तुंची स्थाननिश्चिती केली आहे.
* प्रतापगड जीर्णोध्दार कार्यासाठी जुन्या पध्दतीने चुन्याचे मिश्रण बनविण्याची पध्दत तसेच त्यात मिसळावयाचे विविध पदार्थ व बांधकामाची पध्दत निश्चित केली आहे.
५) पुरस्कार :
* मराठ्यांची धारातीर्थे ह्या ग्रंथास सन २००७ सालचा उत्कृष्ठ ग्रंथनिर्मितीचा 'लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख' पुरस्कार पुणे येथील 'महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभा' यांच्याकडून मिळाला आहे.
* किल्ल्यांच्या प्रसिध्दीसाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय मराठा महासंघाकडून २००८ सालचा मानाचा 'मराठा भूषण' पुरस्कार सोलापूर येथे समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला आहे.
* किल्ले व समाधीस्थानांच्या जीर्णोद्धारासाठी केलेल्या जनजागृतीच्या कार्याबद्दल नागपूर येथील 'रणशिंग' संस्थेमार्फत दिला जाणारा 'शिवगौरव' पुरस्कार सन २००९ प्राप्त झाला.
* लायन्स क्लब, पुणे यांच्याकडून दिला जाणारा सन २००९ चा 'दुर्गमित्र' पुरस्कार शिवसेना कार्याध्यक्ष श्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते समारंभ पूर्वक देण्यात आला.
* प्रतापगड जीर्णोद्धार कार्यासाठी मायभवानी सामाजिक संस्थेकडून मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
* तानाजी मालुसरेंच्या पुण्यतीथी दिनी रायगड जि. प. तर्फे सन २०१३ चा नरवीर तानाजी मालुसरे स्मृती पुरस्कार उमरठ या गावी असलेल्या तानाजींच्या समाधीजवळ आयोजित कार्यक्रमात देण्यात आला.
* छत्रपती शिवाजी शिवतीर्थ समिती मिरज तर्फे शिवतीर्थ भूषण पुरस्कार सन २०१८ प्राप्त झाला.
* छत्रपती शिवाजी बहुजन मित्र पुरस्कार शिवाजी बिगेड जळगाव यांच्याकडून सन २०११
* छत्रपती शिवाजी फौंडेशन मायणी यांच्याकडून छत्रपती पुरस्कार सन २०१५
* मराठ्यांची धारातीर्थे या ग्रंथाससन २०२१ चे महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचे कै. उध्दव केळकर पारितोषिक प्राप्त
* सहयाद्री व्हेंचर्स कडून सन्मानपत्र २०२०
* रणझुंजार प्रतिष्ठान लातूर कडून शिवसन्मान सामाजिक सेवा पुरस्कार २०२१
* राजे लखुजीराव जाधवराव ट्रस्टकडून सन्मानपत्र २०२२
* श्रीशिवाजी रायगड स्मारक मंडळाकडून श्री शिव पुण्यस्मृती परस्कार २०२३
* हिंदवी परीवार महाराष्ट्र राज्य यांच्याकडून सहयाद्री प्रबोधन पुरस्कार २०२३
* मल्हार जन्मोत्सव समिती चांदवड यांच्याकडून मल्हार रत्न पुरस्कार २०२४
महाराष्ट्रातील किल्ले, मराठ्यांचे वाडे, समाधीस्थाने व मंदिरे यांचा सर्वांगिण अभ्यास करून मराठा बांधकाम शैली ह्या विषयाचा सखोल अभ्यास करणे व ह्या स्थळांचा जीर्णोद्धार तसेच ह्या स्थळांना जागतिक पर्यटन उद्योगात ठळक स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्नरत राहणे ही भविष्यातील योजना आहे. याला अनुसरून महाराष्ट्रातील किल्ले, लेणी व मंदिरे यांचे पर्यटनातील ऐतिहासिक उपयोजन या विषयाचा अभ्यास चालू असून ह्याच विषयात पी.एच.डी. करण्यासाठी पी.एच.डी. च्या प्रवेश परिक्षेची तयारी करीत आहे. मराठेशाही प्रवीण भोसले या यु ट्यूब चॅनेलचे जवळपास २ लाख सबस्क्रायबर अणि २३० हून अधिक इतिहासविषयक व्हीडीओ प्रसारीत केले आहेत.
६) इतर आवडीचे विषय :
* किल्ल्यांवरील तोफा
* वन्यजीवन छायाचित्रण
* इतिहास, मंदिर शास्त्र, मूर्ती शास्त्र, वन्य जीवन इत्यादि विषयावरील अनेक ग्रंथांचा स्वतःचा खाजगी ग्रंथसंग्रह आहे.




कार्यक्रमाचे प्रमुख  पाहुणे 
NSG कमांडो नरेश पवार 
नरेश पवार हे भारतीय इतिहासात नोंद झालेल्या फौजी आंबवडे या गावचे सुपुत्र आहेत.
२१ सप्टेंबर १९९८ रोजी त्यांनी भारतीय सेनेत भरती होऊन मराठा लाइट इन्फॅंट्रीमध्ये प्रशिक्षण घेतले आणि नंतर मराठा युनिटमध्ये त्यांचा समावेश झाला.
त्यांची पहिली पोस्टिंग उरी सेक्टर, जम्मू-काश्मीर येथे झाली.
त्यानंतर बनिहाल, जम्मू-काश्मीर RR मध्ये कार्यरत राहिले.
वयाच्या फक्त २३व्या वर्षी त्यांनी तीन आतंकवाद्यांना कंठस्नान घालताना महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पुढील अडीच वर्षांमध्येही त्यांनी आतंकवाद्यांविरोधातील कारवाईमध्ये सक्रिय सहभाग घेतला.
यानंतर फिरोझपूर, हुसेनिवाला बॉर्डर (२ वर्ष); जम्मू-काश्मीर, नौशेरा बॉर्डर; पठाणकोट, पंजाब बॉर्डर; अरुणाचल प्रदेश, चीन बॉर्डर येथे त्यांना पोस्टिंग मिळाली.
जेव्हा ते NSG कमांडो म्हणून ३ वर्षांसाठी सक्रिय झाले तेव्हा त्यांच्या  धैर्याला नवा आयाम मिळाला. या काळात त्यांनी पठाणकोट हल्ला, जम्मू-काश्मीरमधील कारवाई, तसेच ऑल इंडिया पोलीस कमांडो ट्रेनिंगमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ते जम्मू-काश्मीर पोलीस कमांडोच्या पहिल्या व दुसऱ्या बॅचला प्रशिक्षण देण्यात सहभागी होते, तसेच जॉर्डन, अमेरिका, नेपाळ, भूतान, कझाकिस्तान, श्रीलंका यासारख्या देशांच्या कमांडोसोबत ट्रेनिंग घेतली.
नंतर जम्मू-काश्मीर, पुंछ येथे बॉर्डरवर पाकिस्तानमध्ये घुसून शत्रूविरोधात सलग तीन वर्ष काम केले. यावेळी त्यांनी IAS आणि IPS च्या दोन बॅचेसना प्रशिक्षणही दिले.
एका मोहिमेत त्यांचा पाय भुईसुरंगावर पडल्यामुळे पायाची बोटे आणि सर्व हाडे मोडली,
परंतु कमांडो नरेश पवार यांनी जिद्द आणि संघर्ष याचे अजरामर उदाहरण जगासमोर ठेवले. सहा महिन्यांच्या उपचारानंतर फक्त तीन महिन्यांत कालभैरीच्या कृपेनें स्वतःच्या पायावर उभे राहून पुन्हा कामाला सुरुवात केली.
यानंतर त्यांची पोस्टिंग डेहराडून मध्ये झाली आणि तेथेच ते निवृत्त झाले. परंतु, त्यांचे युनिट नंतर कारगिल मध्ये गेले, जिथे त्यांनी कमांडोना खास प्रशिक्षण दिले.
नरेश पवार यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपले धैर्य सिद्ध केले. त्यांना "चीफ ऑफ आर्मी स्टाफ" हे स्पेशल मेडल देण्यात आले. अशा अथक परिश्रमासाठी महाराष्ट्र सरकारने त्यांचा गौरव केला, तसेच भारतीय सेनेकडून विविध मेडल्स मिळाले.तर मंडळी, कमांडो नरेश पवार यांचे जीवन म्हणजे धैर्य, जिद्द, देशभक्ती आणि सेवाभावाचे प्रेरणादायी उदाहरण आहे.

श्री. रवींद्र तुकाराम मालुसरे यांचा परिचय
रवींद्र मालुसरे यांचे जीवन महाराष्ट्राच्या अस्मितेशी, इतिहासाशी आणि पत्रकारितेच्या परंपरेशी घट्ट जोडलेले आहे.
१० जुलै १९६५ रोजी पोलादपूर तालुक्यातील सुभेदार सूर्याजी मालुसरे यांच्या साखर या गावी जन्मलेले आणि उमरठच्या सुपीक मातीत वाढलेले  व्यक्तिमत्व म्हणजे श्री. रवींद्र तुकाराम मालुसरे.
उमरठ हे त्यांचे आजोळ .... ते गाव जिथे सुभेदार नरवीर तान्हाजी व सूर्याजी मालुसरे यांनी आपली कर्मभूमी घडवली, त्याची इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद झाली आहे. १९३० पासून उमरठ येथे सुरू असलेल्या माघ वद्य नवमीच्या कार्यक्रमात ते बालपणापासून सहभागी होत आले आहेत. एवढेच नव्हे, तर मुंबई-कांदिवली येथे दरवर्षी  ४ फेब्रुवारीला त्यांचे बंधू विजय मालुसरे आणि अनिल मालुसरे यांच्या सहकार्याने सुभेदार तान्हाजींची पुण्यतिथी साजरी करण्याची परंपरा त्यांनी पुढाकाराने जपली आहे.
पत्रकारितेचा अभ्यास पूर्ण करून १९८५ पासून त्यांनी लेखनाला सुरुवात केली. चार दशके उलटली तरी त्यांची लेखणी आजही तेवढीच धारदार आहे.
पत्रकारितेतील योगदानाची दखल घेऊन त्यांना १९८८ मध्ये नगरमित्र पुरस्कार तत्कालीन नेते प्रमोद नवलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. १९९६ मध्ये दिल्ली येथे, माजी राष्ट्रपती डॉ. शंकर दयाळ शर्मा आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या उपस्थितीत त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर डिलाईट फेलोशिप सन्मान पुरस्कार बहाल झाला. २०२० मध्ये आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मगावी पोंभुर्ले येथे आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच २०२२ मध्ये श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या वतीने रायगड किल्ल्यावर केंद्रीय मंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांच्या हस्ते त्यांचा राजसदरेवर विशेष सत्कार करण्यात आला. समस्त मालुसरे परिवाराच्या वतीने त्यांनी तो स्वीकारला.
त्यांच्या लेखनाचा केंद्रबिंदू राहिला आहे – छत्रपती शिवाजी महाराज, सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरे आणि वारकरी संप्रदाय. त्यांनी साई सहवास, साहित्यनामा, अष्टमुद्रा दीप प्रभात, वाचकांची चळवळ यांसारख्या दिवाळी अंकांचे संपादन केले. १९९२ मध्ये त्यांनी पोलादपूर अस्मिता हे नियतकालिक सुरु केले, जे आज वाचकनिष्ठ ब्लॉग म्हणून डिजिटल रूपात वाचकांशी जोडलेले आहे. या ब्लॉगचे तब्बल ७० हजारहून अधिक फॉलोअर्स आहेत.
इतिहास लोकांच्या मनात जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष प्रयत्न केले. तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आणि मालिकेमध्ये भूमिका करणारे कलाकार – सयाजी शिंदे, प्रसन्न केतकर, अजय पुरकर, ओम राऊत, विजय राणे आणि दिगपाल लांजेकर – यांना त्यांनी उमरठच्या समाधीस्थळी नेऊन त्या भूमीचा पराक्रम अनुभवायला लावला.
इतकंच नव्हे तर त्यांनी तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमावर आधारित अनेक लेख प्रकाशित केले, ज्यात आजपर्यंत विविध विषयावर लेख प्रकाशित झाले आहेत.  
>सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या >मुलुखातीलइतिहासाच्या पाऊलखुणा
>चित्रपटांच्या दुनियेतला मराठा योद्धासुभेदार तान्हाजी मालुसरे
>शौर्य आणि निष्ठेचे प्रतिक नरवीर तान्हाजी मालुसरे
>सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरे एक अजरामर योद्धा 
>महापराक्रमीयोद्धा नरवीर तान्हाजी मालुसरे
>नरवीर तान्हाजी मालुसरे यांचा ऐत्याहासिक वारसा
>नरवीर तानाजी मालुसरे पराक्रमाचे स्थळदर्शन
>नरवीर तानाजी मालुसरे यांचे ऐत्याहासिक गाव उमरठ
>नरवीर तानाजी मालुसरे यांची पुण्यतिथी
>लक्ष्मण उतेकरांचा छावा इतिहास घडवणार
>छत्रपती शिवाजराजे मराठा साम्राज्याचे संस्थापक
प्रेरक शिल्पकार हे पुस्तक नुकतेच प्रकाशित
विजयगाथा पराक्रमाची... सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या ऐत्याहासिक कार्याचा आढावा घेणारा ग्रंथ संपादित केला आहे त्याचे लवकरच प्रकाशन होणार आहे.
मुंबईतील सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय घडामोडींचा गेल्या चार तपांचा साक्षीदार.  वेबपोर्टलच्या माध्यमातून युनिकोड चा वापर करीत आयुष्यातील अनुभव व्यक्त करण्याकरिता यापुढे लेखणी बरोबरच की-बोर्डचा पुरेपूर वापर सुरु आहे. वाचन, गप्पा, चर्चा, विचार, विनोद,लेखन, क्रिकेट, राजकारण,वारकरी साहित्य, मराठी अस्मिता, शिवछत्रपतींचा इतिहास....आणि बरेच काही जिव्हाळ्याचे, अभ्यासाचे आणि आवडीचे विषय. 
पूर्ण वेळ भारतीय, सामाजिक विषमता मिटवण्याचे स्वप्न. 
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, साने गुरुजी कथामाला, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन संस्था, मराठा महासंघ, श्री सद्गगुरू भावे महाराज वारकरी समाज पंढरपूर, पोलादपूर तालुका नाईक मराठा समाज, मालुसरे बंधू ऐक्यवर्धक मंडळ मुंबई या संस्थात कार्यरत. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या