सुभेदार तान्हाजी मालुसरेंच्या मुलुखातील इतिहासाच्या पाऊलखुणा
सुभेदार तान्हाजी मालुसरेंच्या मुलुखातील इतिहासाच्या पाऊलखुणा
आज माघ वद्य नवमी. नरवीर तान्हाजी मालुसरे यांची तिथीप्रमाणे पुण्यतिथी. तान्हाजीरावांची समाधी आणि भव्य पुतळा उमरठ येथे आहे. त्याठिकाणी नरवीर तान्हाजी-सूर्याजी मालुसरे यांचे वंशज आणि उमरठ येथील कळंबे परिवारासह पोलादपूर तालुक्यातील नागरिक-शिवप्रेमी १९३० पासून आजपर्यंत त्यांची पुण्यतिथी मोठ्या भक्तिभावाने साजरी करीत आले आहेत. पुरंदरच्या तहान्वये महाराजांनी जिंकलेल्या किल्ल्यापैकी २३ किल्ले मोगलांच्या ताब्यात गेले होते. शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील रयतेचे स्वराज्यावर काळे ढग दाटले होते. पुढे काय होणार असा प्रश्न सर्वांच्या मनात सलत होता. नजरेच्या टप्प्यात दिसणाऱ्या कोंढाणा किल्ल्यावर फडकणारा हिरवा ध्वज पाहून आई जिजाऊ अस्वस्थ होत होत्या, शिवाजी महाराजांना त्यांनी ही खंत बोलून दाखवली. आणि कोंढाण्याची मोहीम आखली गेली. सुभेदार नरवीर तान्हाजी-सूर्याजी मालुसरे यांनी महाराजांकडून ही मोहीम आपल्या लेकाचे रायबाचे लग्न बाजूला ठेऊन हट्टाने मागून घेतली आणि घनघोर युद्ध करीत प्रसंगी रक्ताचा सडा शिंपत, स्वतःचे बलिदान देत हा किल्ला महाराजांना पुन्हा मिळवून दिला. आपल्यापेक्षा शत्रू सैन्य संख्येने जास्त असले आणि समोर मोगलांचा बलाढ्य सरदार असला तरी, कितीही कठीण प्रसंगात अवघडात अवघड किल्ला जिंकता येऊ शकतो हा आत्मविश्वास या लढाईतून मराठी मातीला मिळाला, आपल्या राजासाठी किंबहुना स्वज्यासाठी मरण पत्करायला लागले तरी बेहत्तर हा विचार मावळयांच्या मनामनात पुढे रुजला तो आजचा दिवस. त्यानंतर मराठ्यांनी पुन्हा एल्गार पुकारला आणि गेलेले किल्ले पुन्हा महाराजांच्या ताब्यात आले. यानिमित्ताने पोलादपूर तालुक्यातील 'मालुसरे' हे नाव ठळकपणे ३५५ वर्षांपूर्वी इतिहासात सुवर्णाक्षराने उमटले असले तरी कोयना खोऱ्यापासून महाडच्या बिरवाडीपर्यंतच्या या खोऱ्यातील अनेक ज्ञात - अज्ञात मावळे या शुभ कार्यात राजांच्या सोबत होते. त्यांनीही स्वराज्यासाठी हौतात्म्य पत्करले मात्र इतिहासाने त्यांच्या पराक्रमाची नोंद घेतली नसली, तरी जेव्हा इतिहास बोलत नाही तेव्हा भूगोल बोलतो या न्यायानुसार या भुभागातील इतिहासाच्या पाऊलखुणा दाखविणारी अनेक स्मृतिस्थळे आणि दंतकथा जिवंत आहेत. नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या मुलुखातील ऐत्याहासिक स्थळांचा, घटनांचा यानिमित्ताने मागोवा घेणे आजच्या दिवशी उचित आहे असे मला वाटते.
सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे (उमरठ), सुभेदार सूर्याजी मालुसरे (साखर), नरवीर मुरारबाजी देशपांडे (किंजळोली), गोदाजी जगताप (सांदोशी) अशा अनेकांनी प्राणाची आहुती देत शिवरायांना मोलाची साथ दिली होती याची नोंद अनेक बखरकारांनी घेतली आहे. प्रतापगड ते रायगड या दरम्यानच्या भूभागाने शिवाजी राजांना स्थैर्य दिले. बारा मावळातील वतनदारांचे वर्तन स्वराज्याचे तोरण बांधताना लक्षात आल्यावर, राजगड आणि पुणे परिसर सोडून या घनदाट जावळीतील अरण्याचा आसरा घेतला नाही तर स्व-राज्य स्थापन करण्याचे मातोश्री जिजाऊंचे स्वप्न पूर्ण होणार नाही हे महाराज जाणून होते. इतिहासाचा धांडोळा घेत असताना मला एक प्रश्न निर्माण झाला होता, शिवरायांच्या घोड्यांच्या टापांनी आणि तलवारीच्या खणखणाटाने निनादलेला या भूभागाचा इतिहास कुठे सापडेल ? अलीकडे काही महत्वाची कागदपत्रे आणि माहिती मिळाली.
प्रतापगड किंवा रायगड किल्ल्यांना भेट देणारे शिवप्रेमी पोलादपूर तालुक्यातील तान्हाजी मालुसरे आणि शेलारमामा यांची समाधी असलेल्या उमरठ आणि साखर गावात असलेल्या सूर्याजी मालुसरे समाधी स्थळांना भेट देतात. मुळातच जावळी ते राजधानी रायगड व बिरवाडीपर्यंत पसरलेली सह्याद्रीची ही दुर्गम खोरी, शिवकाळापूर्वीपासून ऐत्याहासिक किल्ले, माची, वाटा, खिंडी, घळई यांनी स्थापित असाच आहे. उंचच उंच डोंगर आणि दुर्गम झाडी असे निसर्गरम्य वरदान या भागाला लाभलेले आहे. प्रतापगड, चंद्रगड, कांगोरीगड, कोंढवी हे किल्ले, महादेवाचा मुरा, सडे गावातील चौक, बोरावळे गावातील जावळीकर मोऱ्यांपैकी एका बंधूंचा दगडी वाडा, पाच खिंड, तुर्भे खिंड, पारघाट, श्रीरामवरदायिनी-कापडे, बिरवाडी, महाड बंदर अशी अनेक ऐत्याहासिक स्थळे शिवकाळाच्या इतिहासाचे साक्षीदार आहेत. असे असले तरी इतिहासाचे कागदोपत्री पुरावे इतिहास संशोधकांच्या समोर येत नव्हते. ब्रिटिशांचे दडपण असल्यामुळे महाराष्ट्रभर बरेचसे कागद अडगळीत टाकले गेले होते. ग्रांट डफ, इतिहासाचार्य राजवाडे, यदुनाथ सरकार, रामकृष्ण भांडारकर, बिरवाडीचे दत्तो वामन पोतदार, गोविंद सखाराम सरदेसाई, परशुराम दाते, शांताराम आवळस्कर इत्यादी इतिहासाचा धांडोळा घेणारे महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात फिरू लागले. त्यामुळे अनेक ठिकाणी गोण्यांच्या मध्ये किंवा इतस्ततः कोंबून ठेवलेले पत्रव्यवहाराचे कागद, सनदा बाहेर येऊ लागले.
सूर्याजी मालुसरेंचे साखर - सिंहगडाच्या स्वारीच्या वेळी टेहळणी करताना पायथ्याशी असलेल्या घेरेसरनाईकाच्या सोबत केलेल्या बोलचालीचे वर्णन असे आहे - (शिवकाळातला समकालीन शाहीर तुलसीदासच्या पोवाड्यात अशी नोंद आहे... ) ऐतिहासिक पोवाडे अथवा मराठ्यांचा काव्यमय इतिहास ज्येष्ठ साहित्यिक यशवंत नरसिंह केळकर यांनी १९२८ मध्ये प्रसिद्ध केलेल्या ग्रंथात हा ५५ चौक असलेला सुभेदारांच्या पराक्रमाचा पोवाडा आहे... त्यातल्या ओळी आहेत -
धन्य ह्याची नारायणा | कोण तुमचे गाव |
एवढे सांगावे आम्हाला |
सुभेदार म्हणतात -
मी साखरेचा पाटील |
गेलो होतो पुण्याला | मंडईच्या वाड्यात |
गेलो होतो पट्टी लावायला | जात होतो घराला |
तेथे वाघाने अडविला | तुमच्या आलो आश्रयाला |
यात साखरेचा पाटील याचा अर्थ सावित्री-ढवळी- कामथी तीन नदीच्या तीरावर असलेल्या आणि सूर्याजी मालुसरे यांची समाधी आणि त्यांची पत्नी सती गेली ती सतीशिळा म्हणजे साखर गाव कोणते हे सांगायची गरज नाही.
उमरठ - येथे तानाजी मालुसरे यांचा वाडा होता. त्यांच्या घराचे अवशेष अलीकडच्या काळापर्यंत अस्तित्वात होते. आज नरवीर तानाजी मालुसरे आणि शेलारमामा यांची समाधी आणि लढाईच्या पावित्रातील ६ फूट उंचीचा लढाईच्या पावित्रातील भव्य पुतळा १९६५ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या आदेशाने उभारलेला पुतळा आहे. चीनचे युद्ध सुरु झाल्यानंतर यशवंतराव सरंक्षणमंत्री म्हणून दिल्लीला गेले त्यामुळे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी त्याचे अनावरण केले. हजारोंच्या उपस्थितीत स्वातंत्र्यसेनानी अंबाजीराव मालुसऱ्यांचा त्यावेळी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी सत्कार केला होता. तानाजीरावांच्या मृत्यूनंतर सूर्याजी मालुसरे त्यांच्या कलेवरासह वेल्हाची पेठ, ढोणीचे पाणी, बिरवाडी,भावे या गावावरून उमरठला आले. आणि साखर येथे राहिले. सूर्याजींचे तीन मुलगे होते. नाईकजी हा साखर येथे राहू लागला. कान्होजी उमरठला तर भोरजी कडोशी या महाबळेश्वर पलीकडे असलेल्या गावी राहावयास गेला. तर तानाजींच्या चुलत्याचा म्हणजे भोरजीचा वंश फुरुस या कोयना काठच्या गावाला गेले. त्याचप्रमाणे मालुसऱ्यांचे वंशज साखर, धाकटी वाकी,गावडी, किंवे, आंबेशिवथर, कसबे शिवथर, गोडवली, पारमाची,लव्हेरी, पारगड, या गावात आजही राहतात.उमरठच्या समाधीच्या लगतच्या डोंगरावर एक मोठी घळ आहे. गोडोलीवरून खाली कोकणात आल्यानंतर आपल्या दोन्ही मुलांना घेऊन तानाजी-सूर्याजींची आई त्या घळीत काही दिवस राहिल्याची इतिहासात नोंद आहे.
पारघाट - छत्रपती शिवाजी महाराजांचे बंड मोडण्यासाठी काहीतरी केले पाहिजे हे विजापूर दरबारने ठरविले. परंतु या स्वारीवर महाड,जोरखोरे,जावळीचे खोरे या प्रदेशाची माहिती असणारा कोणीतरी हिंदू सेनापती पाठविला पाहिजे असा विचार दरबारने केला आणि शेवटी 'बाजी श्यामराज' याला शिवाजी राजांचा समूळ फडशा पाडण्यासाठी पाठविण्याचे विजापूर दरबारने ठरविले. यावेळी राजे आपल्या सैन्यासह बिरवाडी-महाडच्या परीसरात असल्याने दगा फटका करीत त्यांना जिवंत पकडण्याचा बेत बाजी शामराजाने आखला. तो पारघाटाच्या मार्गाने निघाला. चंद्रराव मोरे याच्या जावळीच्या मुलुखातील घनदाट जंगलाचा फायदा घेण्याचे त्याने ठरवले होते. गोळेगणी या गावाच्या आसपास डोंगराच्या उतारावर तो सैन्यासह लपून बसून राहिला. त्याचवेळी जावळीचा दौलतराव मोरे संभ्रमात पडला की, शिवाजीला मानावे की बाजी शामराजला मानावे; विजापूरचे ऐकावे की स्वतःचे राज्य निर्माण करू इच्छिणाऱ्या शिवाजीचे ऐकावे. तिकडे बाजींचे सैन्य दबा धरून बसले होते. आणि इकडे शिवाजी महाराजांनी किनेश्वर आणि विन्हेरे खोऱ्यात सैन्याची जमवाजमव करून तयारीत होते. ही दोन्ही सैन्य एकत्र येऊ शकेल अशी जागा पारच्या खाली पश्चिम घाटाच्या इथेच असेल असा कयास बांधून महाराज हल्ल्याची वाट पाहात बसले, साखर-देवळे खोऱ्यातील सैन्य तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली करंजे आणि नेरच्या घनदाट जंगलातून डोंगराळी पार या गावांवर सावधपणे जबरदस्त हल्ला करणार होते. बोचेघळीच्या खिंडीतून ढोपराच्या डोंगरावर पूर्वेकडून जंगलातून मावळच्या बांदल देशमुखांनी सैन्य उभारून जय्यत तयारी केली होती. आणि मकरंदगडाखाली मोठ्या सैन्याची जमवाजमव केली. बाजी शामराजचा आपल्या दहा हजार सैन्यावर फार मोठा विश्वास होता. एक-दोन दिवसातच शिवाजीला आपण जेरबंद करू असे त्याने मनसुबे आखले,इतक्यात त्याच्यावरच असा काही हल्ला झाला की त्याच्यासह त्याचे सैन्यहीं बावरले, अनपेक्षित हल्ल्याने हल्लकल्लोळ माजला आणि सैन्य सैरावरा धावू लागले.ते ढोपराच्या डोंगराच्या खिंडीतून पलीकडे कोतवालकडे पळून जात असताना महाराजांचे विन्हेरे खोऱ्यातील सैन्य त्यांना सामोरे गेले आणि चहुबाजूंनी इतर ठिकाणी असलेल्यांनी बाजींचे सैन्य अक्षरशः कापून काढले.
चंद्रगड - चंद्रगड किल्ला उमरठच्या पुढे ढवळे गावाच्या पूर्वेला असून दक्षिण-उत्तर दिशेला पसरलेला आहे. महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वतरांगांमध्ये अनेक दुर्गम आणि ऐतिहासिक किल्ले आढळतात. त्यापैकी एक म्हणजे चंद्रगड किल्ला, ज्याला ढवळगड किल्ला असेही म्हणतात.आज, हा किल्ला जरी भग्नावस्थेत असला तरी त्यावर जुन्या जलकुंड, तटबंदी आणि प्राचीन वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात. इतिहासप्रेमींसाठी हा किल्ला एक अद्भुत ठिकाण आहे. ऑर्थर सीट च्या टोकावर उभे राहील्यास सह्याद्रीचे रौद्रभिषण कातळकडे नेत्रांना सुखावित असले तरी उरात धडकी भरवतात. चंद्रराव मोर्यांना नेस्तनाबूत केले आणि जावळी स्वराज्यात दाखल झाली. त्या बरोबर ढवळगड ही स्वराज्यात दाखल झाला. त्याचे नाव बदलून महाराजांनी चंद्रगड ठेवले. गडाचा माथा लहानसा आहे. घराचे चौथरे आणि पाण्याच्या टाक्या पहायला मिळतात. येथे आकाशाखाली उघडय़ावर शंकराची पिंड आहे. त्याला ढवळेश्वर महादेव म्हणतात. महाशिवरात्रीच्या उत्सवात या ठिकाणी नियमित पूजा केली जाते. उंचवटय़ावर वाडय़ाचे भग्नावशेष दिसतात. उत्तर अंगाला पाण्याची टाकी आहेत. किल्ल्यावर १४ पाण्याची टाकी आहेत पण फक्त ११ दिसतात असे स्थानिक सांगतात.
कांगोरीगड - मंगळगड उर्फ कांगोरी गड जावळीच्या खोर्यातील एका उंच पहाडावर बांधण्यात आला. हा भाग उंच पहाड, घनदाट जंगल व खोल दर्यांनी नटलेला आहे. सावित्री नदीकाठी वसलेल्या महाड शहरातून परदेशांशी व्यापार चालत असे. महाडात उतरलेला माल अनेक घाटमार्गांनी घाटमाथ्यावरील बाजारपेठांत जात असे. ह्या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी घाटमार्गाच्या पश्चिमेस कोकण किनारपट्टीवर व घाटमाथ्यावर अनेक किल्ले बांधण्यात आले. कांगोरी उर्फ मंगळगड हा किल्ला जावळीच्या खोर्यातील भोप घाट, वरंध घाट व अस्वल खिंड यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी व व्यापारी मार्गाचे संरक्षण करण्यासाठी बांधण्यात आला. कोकणात उतरणाऱ्या वाटेवरील रायगडचा उपदुर्ग असलेला हा किल्ला टेहळणीसाठी एक महत्वाचा किल्ला आहे. १५ जानेवारी १६५६ रोजी शिवाजी महाराजांनी जय्यत तयारीनीशी जावळीवर हल्ला केला व जावळी ताब्यात घेतली. त्याबरोबर ८ जानेवारी १६५८ रोजी कांगोरी गड, ढवळगड, रायरी इत्यादी किल्लेही महाराजांच्या ताब्यात आले. मुरारबाजीसारखा कसलेला योध्दा मिळाला. कांगोरीगडाची डागडूजी करुन त्याचे नाव बदलून ‘‘मंगळगड’’ ठेवले. किल्ल्यावर कांगोरीमातेचे (देवी) मंदिर आहे. स्वराज्यांची राजधानी रायगडच्या जवळ असल्यामुळे याचा उपयोग राजकीय गुन्हेगारांना तुरुंगवासात ठेवण्यासाठी केला गेला. या गडावर जाण्यासाठी तीन-चार मार्ग आहेत. चंद्रगड पाहून तेथून महादेव मुर्ह्यामार्गे अंदाजे सहातासांच्या पाय प्रवासानंतर मंगळगडाला पोहोचता येते. दोनदा डोंगर चढून उतरावा लागतो. महाडच्या पिंपळवाडीतून तसेच कामथी खोऱ्यातील सडे गावातून सुद्धा अवघड वाटेने जाता येते.
स्वराज्याची शेवटची लढाई - २५ एप्रिल ते ४ मे १८१८ दरम्यान रायगडला ब्रिटिशांचा वेढा पडल्याची बातमी कांगोरी, सावित्री खोऱ्यातील व प्रतापगड येथे पोहोचली तेव्हा या भागातील जे सातारा गादीशी म्हणजे छत्रपती प्रतापसिंहराजे शाहूराजे भोसले यांच्याशी एकनिष्ठ होते असे पोलादपूर मधील मावळ्यांच्या वंशजांचे मराठा सैन्य रायगडच्या मदतीसाठी शस्त्रास्त्रे घेऊन धावले. पोटल्याच्या डोंगराकडून कर्नल प्रॉथर आपला मोर्चा रायगडवर लागू करणार होता; त्याच्या पिछाडीस मराठी सैन्य येऊन उतरले. पण महाड येथे संरक्षणार्थ ठेवलेल्या लेफ्टनंट क्रॉस्बी यांच्या तुकडीने या सैन्याचा समाचार घेतला; त्यामुळे मराठ्यांची मदत रायगडास पोहोचणे अशक्य झाले. लेफ्टनंट क्रॉस्बी याने या परतलेल्या सैन्याबरोबर पोलादपूर येथे या सैन्याचा सामना केला. कमी संख्येने असलेल्या मराठा सैन्याने झुंज दिली पण हिंदुस्थानी सैन्यच सोबत घेऊन लढणाऱ्या क्रॉसब्रीने त्याचा बीमोड केला व रायगडच्या वेढ्याबाबतचा धोका पूर्ण नाहीसा करून टाकला, दुसऱ्याच दिवशी रायगडावरचा भगवा ध्वज उतरला गेला आणि ब्रिटिशांचा युनियन जॅक फडकला.
कोंढवी किल्ला - पोलादपुर तालुक्यात कशेडी घाटमार्गात कोंढवी हे प्राचिन गाव आहे. गावात दिसणाऱ्या सतीशिळा, विरगळ, कोरीव मुर्त्या तसेच मंदिराचे कोरीव स्तंभ या गावाचे प्राचीनत्व अधोरेखीत करतात. कोंढवी गावाच्या पश्चिमेला घाटमाथ्यावरीत सातारा व महाबळेश्वर येथे जाणारा आंबेनळी घाट आहे. घाटमार्गाचे रक्षण करण्यासाठी कोंढवी किल्ल्याची बांधणी करण्यात आली असावी. गडाची तटबंदी व दरवाजा नष्ट झाले असुन या रस्त्याने आपण गडमाथ्यावर असलेल्या आठगाव भैरवनाथ या मंदिराकडे पोहोचतो. ...उतारावर ढासळलेल्या तटबंदीचे दगड दिसुन येतात. मंदिराच्या उजव्या बाजुस जुन्या चौथऱ्यावर नव्याने बांधतेती एक खोली असुन त्यात नवनाथांच्या मुर्ती ठेवल्या आहेत. या खोलीच्या मागील बाजूस ४ X २ फूट आकाराचे शिल्प आहे पण ते नेमके कशाचे आहे ते कळत नाही. या शिल्पापुढे काही अंतरावर दोन भन्न वास्तुंचे अवशेष पाहायला मिळतात. मंदिरासमोरून रसाळगड, सुमारगड व महिपतगड हे किल्ले नजरेस पडतात. गड पहाण्यास अर्धा तास पुरेसा होतो. आदिलशाही काळात कोंढवी हा परगणा असुन कोंढवी किल्ल्यावरूनच या परगण्याचा कारभार चालत असे. पोलादजंग हा कोंढवी गडाचा किल्लेदार होता. पोलादजंगची पोलादपुर शहरात कबर असुन त्याच्या नावानेच या गावाला पोलादपुर नाव पडल्याचे सांगण्यात येते. शिवकाळात हा प्रदेश जावळीचे चंद्रराव मोरे यांच्या ताब्यात होता. इ.स.१७७८-७९ मध्ये रायगड मधील २४४ गावे कोंढवी महाड बिरवाडी तुडील विन्हेरे व वाळण अशा सहा परगण्यात विभागली होती. यातील परगणा कोंढवी पंतप्रतिनिधीच्या ताब्यात होती. गडमाथ्यावर सुध्दा भैरवनाथाचे प्राचीन मंदिर असून याला "आठगाव भैरवनाथ " या नावाने ओळखले जाते.
कविंद्र स्वामी परमानंद - शिवाजी महाराजांचे चरित्र ज्याने प्रसिद्ध केले ते म्हणजे कविंद्र परमानंद गोविंद नेवासकर यांची समाधी पोलादपूर बाजारपेठेत आहे. शिवभारत हे शिवचरित्राचे एक समकालीन आणि अतिशय विश्वसनीय साधन आहे. आपण हे काव्य शिवाजीच्या सांगण्यावरून रचले असल्याचे परमानंद सांगत असल्याने आणि त्याची विश्वासार्हता वारंवार प्रत्ययास आली असल्याने ते शिवाजी महाराजांचे अधिकृत चरित्र आहे असे समजण्यास हरकत नाही. एकूणच शिवभारत हा ग्रंथ शिवचरित्राच्या आणि इतिहासाच्या अभ्यासकांना अत्यंत उपयुक्त ठरले आहे.
रायगडचा पहिला शिवजयंती उत्सव - शिवजयंतीचा पहिलावाहिला उत्सव रायगड किल्ल्यावर दोन दिवसांचा होता. पहिल्या दिवशी टिळकांचे समारोपाचे भाषण जोरदार झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक होणे हे राष्ट्रासाठी अत्यंत आवश्यक आहे, असाच टिळकांच्या बोलण्याचा सूर होता. या उत्सवाच्या निमित्ताने २५ एप्रिल १८९६ मध्ये लोकमान्य टिळकांच्या उपस्थितीत झालेल्या पहिल्या उत्सवात त्यावेळी तानाजी मालुसरे आणि येसाजी कंक इत्यादींच्या वंशजांस मानाचे नारळ देण्यात आल्याची आणि “उत्सवाच्या निमित्ताने तीन हजार लोकांच्या पंगती रायगडावर उठल्या,” असे टिळकांनीच लिहिले आहे. अशी नोंद त्यावेळच्या दैनिक केसरी आणि ऐतिहासिक दप्तरात करण्यात आली आहे.
चित्रे घराणे - आपल्यासाठी बाळाजी आवजी चिटणिसांचे घराणे म्हणजे चित्रे घराणे. या इतिहासकालीन घराण्याचा सेवा व लौकिक गेले साडेतीन शतके प्रसिद्ध आहेच. चित्रे घराणे देवळे, विन्हेरे, कोंढवी, पोलादपूर, देवास इत्यादी ठिकाणी नांदत होते. कालपरत्वे या घराण्यातील काही पुरुषांची आडनांवेही बदलली आहेत. मध्यप्रदेशातील देवासचे चित्रे आपणास देवळेकर म्हणवितात. देशपांडेपणाचे वतन चालविणारे काही चित्रे मंडळी देशपांडे झाले आहेत. काहीजण आपणास कोंढवीकर म्हणवितात. पोलादपूर तालुक्यातील देवळे गावातील रावजी गोविंद चित्रे यांच्या दप्तरात अनेक ऐत्याहासिक कागदपत्रे ज्येष्ठ इतिहास संशोधक शांताराम गोवळसकर यांना सापडली होती. इ.स. १७३४च्या जानेवारी महिन्यात काळ नदीच्या खोऱ्यात पेशव्यांचे आणि सिद्दी यांचे मोठे युद्ध झाले. किल्ले बाणकोट, गोवेले, विन्हेरे, पाचाड मारीत सिद्दी रायगडाच्या पायथ्यास आणि पुढे देवळे येथे पोहोचला. देवळे येथे त्यावेळी चित्रेंचा गवताने शाकारलेला भव्य चौसोपी वाडा होता. सिद्दीने त्यावेळी आगीचे पलिते सोडून या वाड्यास आग लावली, त्यामुळे बराचसा महत्वाचा दस्तऐवज जळून खाक झाला. मध्ययुगीन महाराष्ट्रातील देशमुख-देशपांडे-देसाई ही महत्त्वाची वतने होती. त्यामुळे चित्रे म्हणजे महाड-पोलादपूर मधील देशपांडे या हुद्द्यावर काम करीत देशपांड्याला त्याच्या कामाच्या स्वरूपावरून देशकुळकर्णी असेही म्हणत असत. देवळे लगतच्या सावित्री नदीतीरावर प्राचीन शिवमंदिर आहे. त्याचे मानकरी चित्रे आहेत. शिवरात्रीला मोठी जत्रा भरते. एकेकाळी मानकऱ्यांच्या काठ्या येत असत. काही वर्षांपूर्वी उत्खनन करताना याठिकाणी अनेक वीरगळी सापडल्या.
सातारा जिल्ह्यातील पार तथा पार्वतीपूर येथील श्रीरामवरदायिनी देवीनंतर पोलादपूर तालुक्यातील श्रीराम वरदायिनी देवी कापडे बुद्रुक येथे आहे. याबाबत 'समर्थ रामदास स्वामींनी तुळजापुरी ठाकेना। चाललि पश्चिमेकडे | रामवरदायिनी जाता। गर्द होऊनी उठली।' असे भाष्य केले असून तुळजापूर, पार, कापडे बुद्रुक आणि काटेतळी या सर्व देवींची स्थाने प्रत्येकीच्या पश्चिमेकडे असल्याचा योगायोग आहे. याशिवाय बोरावळे गावात चंद्रराव मोऱ्यांच्या एका बंधूंचा भव्य वाडा होता, त्याचे दगडी अवशेष अजून दिसतात. सडे हा गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधलेला एक भव्य दगडी बांधकाम केलेला चांदणी चौक आहे. महादेवाचा मुरा हा डोंगर खूप उंच आहे. त्याठिकाणी शेकडो वर्षापूर्वीचे स्वयंभू शिवमंदिर आहे. त्याठिकाणी बिरवाडी आणि इतर खोऱ्यातील देशमुख आणि वतनदार यांच्या मोठमोठ्या वीरगळी आहेत. याठिकाणचा इतिहास अनेक शक्यतांना जन्म देतो आहे. तेथे सुद्धा शिवरात्रीला मानकऱ्यांच्या काठ्या येत असत. या मुऱ्यापासून रायरी फक्त ११ मैल आहे. याशिवाय या डोंगरावरुन प्रतापगड, चंद्रगड, कांगोरीगड, रायगडच्या रांगा दिसतात. केवनाळे, कोंढवी तर्फ, कोंढवी कसबा, कोंढवी परगणे, करंजे येथील मारुतीचे पुरातन मंदिर, क्षेत्रपाल, घेरा चंद्रगड, जावळी सुभा, जोर खोरे, ढवळा घाट, ढवळे मौजे, देवळे, साखर, पारघाट,बिरवाडी, वाळण बुद्रुक, विन्हेरे या ठिकाणचा त्याचबरोबर चंद्रराव मोरे हे आदिलशाहीतील एक शक्तिशाली मराठी सरदार. जावळीच्या मोऱ्यांची स्वतंत्र बखर आणि यांचा नामोल्लेख असलेले अनेक संदर्भ इतिहासात काही ठिकाणी सापडतात. "तुम्ही काळ राजे जाहला. तुम्हांस राज्य कोणें दिधलें? असे शिवाजी महाराजांना ललकारणाऱ्या चंद्ररावांचे स्वतःचे चलनी नाणे आणि शिक्का होता. जणू जावळी खोऱ्यात त्यांचे स्वतंत्र्य राज्य होते. त्याचप्रमाणे बालाजी मोरे (चंद्रराव), शंकराजी गोळे, हणमंतराव मोरे, हबाजी नाईक उतेकर, हिरोजीराव दरेकर, केसरकर, बांदल, गोळे यांचा उल्लेख इतिहासात सापडतो.
या मुलुखापुरते बोलायचे झाले तर ब्रिटिश राजवट सुरु झाल्यानंतर १८१८ पासून १८५७ पर्यंत संपूर्ण क्षात्रतेज देशभर झाकोळले गेले होते. गडकिल्ले ओस पडले आणि ज्या ताकदवान मनगटांनी समशेरी पेलल्या होत्या, त्यांनी आपल्या समशेरी एक तर आड्याला खोचुन ठेवल्या नाहीतर काहींनी त्याचे नांगराचे फाळ बनवून पोटापाण्यासाठी शेतीवाडी करू लागले. मात्र त्यानंतर विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अगोदर पहिल्या, दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश सैन्यात आणि त्यानंतर देशाच्या स्वातंत्र्यानंतर भारतीय सैन्यात आपले शौर्य दाखविणारे अनेक सुपुत्र या मातीत जन्माला आले.
- रवींद्र मालुसरे
अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई
९३२३११७७०४
या ब्लॉगवरील अजून माहितीपूर्ण लिंक वाचा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा