नामदार भरतशेठ गोगावले ....लोकनेता घडताना

 नामदार भरतशेठ गोगावले ....लोकनेता घडताना रोजगार हमी,फलोत्पादन खात्याचे कॅबिनेट मंत्रीपद 

मी.... भरतशेठ विठाबाई मारुती गोगावले ईश्वरसाक्ष शपथ घेतो की, कायद्याद्वारे स्थापित..... रोजगार हमी,फलोत्पादन मंत्रिपदाची शपथ घेताना आमदार भरत गोगावले यांच्या तोंडून हे शब्द महाड -पोलादपूर-माणगावकरांनी ऐकले आणि एकच जल्लोष गावागावात वाडीवस्तीवर उसळला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अडीच वर्षांपूर्वी सत्तातंर झाल्यानंतर आलेल्या मंत्रिमंडळात खरे तर भरतशेठ गोगावले यांचा सर्वाधिक हक्क होता. याचे कारण महाआघाडीचे सरकार जाण्यासाठी जे घडले होते त्यात आणि एकनाथ शिंदे यांचे सरकार आणण्यात त्यांचा वाट महत्वाचा होता. त्याला रायगडमधील सत्ता संघर्षाबरोबर दुसरी आर्थिक बाजुही होती. 
आघाडी सरकार स्थापन झाल्याबरोबर आदिती तटकरे पालकमंत्री झाल्याबरोबर अगोदर स्थानिक पातळीवर व नंतर राज्यपातळीवर ही अस्वस्थता पोहोचली होती. २० जुनला बंड झाले परंतु त्याअगोदर ६ महिने भविष्यात मंत्रिपद जवळ आलेय जरा धीर धरा असे सकारात्मकरित्या जवळच्या कार्यकर्त्यांना भरतशेठ ठामपणे हे सांगत होते. परंतु सरकार स्थापन करण्याच्या वेळी एकनाथ शिंदे यांचे विश्वासू म्हणून यांना तडजोड करावी लागली. भरत गोगावले यांना मंत्रीपद मिळण्याची खात्री असल्याने त्यांनी शपथविधीसाठी खास कोट शिवून घेतला होता. मात्र, त्यांना मंत्रीपद न मिळाल्याने तो कोट तसाच पडून आहे, अशा शब्दांत विरोधकांनी गोगावले यांना अनेकदा खिजवले होते. त्यांचे मंत्रीपद हे विरोधकांच्या टिंगलटवाळीचा विषय झाला होता. शिंदे गटात सुरुवातीपासून मंत्रि‍पदाचे प्रबळ दावेदार मानले जाणारे महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांना मग पक्षाचे प्रतोद केले. निवडणूकीपूर्वी अखेर एसटी महामंडळाच्या (MSRTC) अध्यक्षपदी नियुक्ती केली व मंत्रिपदाचा दर्जा दिला. पण सहनशील असलेल्या भरत शेठ यांनी मंत्रिपद न मिळाल्याची नाराजी यांनी फारशी कधी व्यक्त केली नाही. पक्षाचे आणि संघटनेचे काम त्यांनी सुरूच ठेवले. यावेळी भरतशेठ फक्त २-३ हजार मतांनी निवडून येणार असे त्यांचे कार्यकर्ते खाजगीत सांगत असताना, मी २५ हजाराहून अधिक मतांनी निवडून येणार या आत्मविश्वासाने ते नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीला सामोरे गेले आणि तितक्याच मतांनी निवडून आले. निकालाच्या दिवशी पराभव मान्य करून निघताना स्नेहलदीदीही त्यांना शुभेच्छा देताना म्हणाली होती, काका यावेळी न विसरता मंत्रिपद घेऊन या! आज भरतशेठ "नामदार भरतशेठ" झाले आहेत.
महाड पोलादपूरच्या मातीशी घट्ट नाळ जुळलेले अन् धर्मभावनेपेक्षा वास्तववादी प्रश्नांची जाण, दिलदार वृत्ती, चतुरस्त्र प्रतिभा आणि स्वतः मध्ये आत्मविश्वास ठेवून इतरांचा विश्वास जिंकण्याची असलेली ताकद, स्थानिक गोरगरीब, कष्टकरी, शेतकऱ्यांचा आवाज. सर्वसामान्यापासून ते विरोधकांपर्यंतच्या मनात प्रेम असणारा स्वाभिमानी नेता म्हणून भरतशेठ गोगावले यांची ओळख महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झाली आहे. आज ते मंत्रिपदाची शपथ घेत आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करुन महाराष्ट्राच्या नि देशाच्या राजकारणात गेल्या अडीच वर्षात  आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा भरतशेठ यांनी उमटविला आहे. 'ढालकाठी (खरवली), पोस्ट - बिरवाडी, तालुका - महाड, जिल्हा - रायगड' असा आता निवडणूक आयोगाच्या लेखी भरतशेठ गोगावलेंचा पत्ता असला, तरी महाडमधील कांगोरी गडाच्या पायथ्याशी असलेल्या दुर्गम भागातील पिंपळवाडी नावाच्या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला. या एका छोट्या गावात जन्माला येऊन त्यांनी महाराष्ट्राच्या मंत्र्यालयात कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत मजल मारली आहे, हे त्यांना काही एका दिवसात किंवा एका वर्षात शक्य झाले नाही. १९९२ ते २०२४ या काळात वैयक्तिक, सामाजिक आणि राजकीय पातळीवर त्यांना यासाठी अनेक प्रसंगांना संघर्ष आणि परिस्थितीशी सामना करावा लागला आहे. जणू संघर्षाचं दुसरं नाव म्हणजेच भरतशेठ असेच म्हणावे लागेल. राजकारणात, तेही शोषणमुक्त समाजव्यवस्था निर्माण करायच्या राजकीय लढाईत उतरणाऱ्यास सामाजिक हालअपेष्टा आणि विरोध यांना तोंड द्यावं लागतंच. ते लीलया पचवण्याची क्षमता असल्याशिवाय यशस्वी नेतेपण प्राप्त होत नसतं. भरतशेठही त्याला अपवाद नाहीत. 
कुणीही विधाता जनतेचे नायक म्हणून कुणाला जन्माला घालत नाही. जो खऱ्या अर्थाने सामान्यातला सामान्य बनत जातो, तोच असामान्यतेच्या पदवीला गवसणी घालून नायक बनतो. कोणत्याही कठीण प्रसंगात न खचता धाडसाने निर्भीडपणे सामोरे जायचे ही तरुणवयापासून त्यांची वृत्ती आहे.
आधुनिक काळात समाजामध्ये अनेक प्रश्न, अनेक आव्हाने निर्माण होत असतात. त्यांचा धैर्याने स्वीकार करून त्यामध्ये यशस्वी होण्याचा जी माणसे प्रयत्न करतात तीच माणसे मोठी होतात. माणसे शेवटी जी मोठी होतात, ती निव्वळ मोठ्यांच्या पोटी जन्माला येतात म्हणून नव्हे. मोठ्यांच्या पोटी जन्माला आल्यामुळे मिळणारे मोठेपण आता जुन्या इतिहासात जमा झाले आहे.  नवमहाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री आदरणीय यशवंतराव चव्हाण यांनी राजकारणात 'मोठ्या' झालेल्या माणसांबद्दल हे विचार व्यक्त केले आहेत. जनता आणि नेते यांचे नाते माता आणि पुत्र यांचे असते. जनता हीच शेवटी माता. तिच्या आशीर्वादातून, तिच्या सर्वस्वातून, तिच्या भावनेतून, तिच्या परंपरेतून नेतृत्व उभे राहत असते. जनता व नेतृत्व यांचे हे नाते निर्माण करण्याचे काम वर्तमानकाळात सतत घडावे लागते. हे इथे नमूद करण्याचे कारण असे की, आज महाड-पोलादपूर-माणगावला दुसऱ्यांदा मंत्रिपदाच्या रूपाने हे नेतृत्व लाभले आहे. त्या नेतृत्वाची या विचारांशी जवळीक जाणवते. ते व्यक्तिमत्त्व म्हणजे ना. भरतशेठ गोगावले. आयुष्यात काही गोष्टी योगायोगाने घडत असतात. काही गोष्टींसाठी योग जुळून यावे लागत असतात आणि काही गोष्टी आयुष्यातील सुवर्णयोग ठरत असतात. सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊन लोकनेते या बिरूदवली पर्यंत पोहोचणारे जे नेते महाराष्ट्राच्या राजकारणात होऊन गेले त्यामध्ये  भरतशेठ गोगावले यांच्या नावाचाही आवर्जून उल्लेख करावा लागेल. राजकारणात पुढच्या काळाची पावले ओळखून वर्तमानात वाटचाल करावी लागते. ते ज्यांना जमते तेच लोकनेते होतात. सत्तेचे धनी होतात. अशी काळाची पावले ओळखून वाटचाल करणारे जे नेते अलिकडच्या काळात निर्माण झाले त्यामध्ये भरतशेठ हे एक महत्त्वाचे नेते आहेत.
ना. भरतशेठ गोगावले यांच्या आयुष्याची जडणघडण कशी झाली आणि आज या पदापर्यंत ते कसे पोहोचले हा सर्व घटनाक्रम भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. आपल्या एकसष्ट वर्षांच्या आयुष्यात जी भरारी  भरतशेठ यांनी घेतली आहे ती चकित करणारी आहे. त्यांनी जे यश संपादन केलं आहे ते यश क्वचितच कुणाला प्राप्त करता आले असेल.  भरतशेठ हा माणूस म्हणजे खरोखरीच गुणांची खाण आहे. त्यातील काही गुण हे त्यांच्यात उपजत आहेत. काही संस्कार आणि जडणघडणीतून आलेले आहेत, काही गुणांना त्यांनी तिलांजली दिली आहे तर काही गुण हे त्यांनी अथक परिश्रमातून व मेहनतीने व्यक्तिमत्त्वात आणले आहेत. खरे तर एखादा शिल्पकार जसे शिल्प घडवतो त्याप्रमाणे आपल्या आयुष्याला नियोजनबद्ध असा आकार त्यांनी स्वतःच  दिला आहे. एखाद्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीमध्ये त्याला मिळणारे आजूबाजूचे वातावरण, मिळणारे संस्कार, त्यातून होणारी जडणघडण आणि जीवनमूल्यांना याला महत्त्व असते. भरतशेठ नावाचे रसायन अति संघर्षातून तयार झाले आहे. संघर्षशील राहणे हा जणू त्यांचा स्थायीभावच झाला आहे. हाती घेतलेले कार्य तडीस नेण्यासाठी त्यांनी कधी प्रकृतीची काळजी केली नाही. मात्र सतत वादळ अंगावर येऊनही ते कधी खचले नाहीत. नाऊमेद होत नाहीत. उलट त्या वादळांचं स्वागत करण्याची दिलदार वृत्ती ते अंगी बाळगून आहेत.
गरीब आणि गरिबी त्यांनी जवळून पाहिली. शेतकऱ्यांच्या समस्या कोणत्या असतात, शेती कशी करावी लागते याचे त्यांना अंगभूत ज्ञान होते. कुठे काय पेरावे याची त्यांना जाण होती. एका गरीब कुटुंबावर ग्रामीण भागातील काही अडचणींमुळे  आलेली आर्थिक ओढग्रस्त परिस्थिती, या सर्वांवर मात करीत त्यांना शिक्षण चालू ठेवणे एक दिव्य होते. त्यांनी केवळ परिस्थितीवर मातच केली नाही तर त्या परिस्थितीला आपलीशी करून त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. यातच त्यांचे मोठेपण सामावले आहे. गावातच शालेय शिक्षण सुरू केलेल्या भरत गोगावले हे तिसरीत नापास झाले. मग पुढे काय, असा प्रश्न पडल्यावर त्यांच्या चुलत्यानं त्यांना मुंबईत आणलं. हा सगळा काळ सत्तरच्या दशकातला. ते मुंबईत आले आणि पुन्हा शाळेचे उंबरठे चढले. घाटकोपर पूर्वेकडील शिवाजी शिक्षण संस्थेच्या मल्टीपर्पज टेक्निकल हायस्कूलमध्ये त्यांनी तिसरीनंतरचे धडे गिरवायला सुरुवात केली. या शाळेत त्यांनी आठवीपर्यंत शिक्षण घेतलं आणि शाळेला राम राम ठोकला. हे वर्ष होतं १९७९. गरीब घरात जन्मलेल्या मुलाला पूर्णवेळ शिक्षण ही चैन लाभत नाही. भरतशेठ यांच्या बाबतीतही तेच घडलं. त्यांनीही शाळा मध्येच सोडून जगण्याच्या उघड्या विश्वात उडी घेतली.
मग त्याच वर्षी ते गावी आले आणि शेतीत रमू लागले. पुन्हा शाळेकडे ते वळले नाहीत. राजकारणाची आवड निर्माण झाल्यानंतर पंचक्रोशीतली लहान-मोठी कामं करू लागले. अतिशय हुशार, बुद्धिमान आणि क्रीडाक्षेत्राची आवड असलेल्या भरतशेठ यांनी ठरवले पिंपळवाडी गावाच्या सीमा ओलांडून आयुष्याचा अवकाश व्यापणारे जीवनशिक्षण घेतले पाहिजे. त्यासाठी बाह्य जगताची ज्ञानप्राप्ती खूप आवश्यक आहे. ज्ञान म्हणजे मानवी जीवनाचे सार असते. ज्ञान हेच खरे सुवर्ण. ज्ञानी मनुष्य हा विश्वाचा स्वर्ग बनवू शकतो. ज्ञान आणि कर्म हे जीवनाचे पंख आहेत ज्यामुळे सुखरूपी आकाशात मनुष्य सहजतेने उडू शकतो, अशी भरतशेठ यांची धारणा होती  बिरवाडीसारख्या कांगोरी गडाच्या पायथ्याशी असलेल्या दुर्गम गावी परल्यानंतर त्यांचे परिवर्तन होऊ लागले. आर्थिकदृष्ट्या कुचंबलेल्यांच्या जगात दादागिरी ही नेतृत्वाची प्राथमिक पायरी असते. तेच प्रशिक्षण समाजाने त्यांना सहजगत्या दिले. त्या खाचखळग्यांतून गेल्याशिवाय मोठेपणीचा दबंगपणा त्यांच्यात विकसित झाला नसता. पण त्या दबंगपणाचं रूपांतर हिंस्त्रतेत न होता एका सुजाणतेत झालं त्याचं कारण त्यांच्यावर घरातल्यांचे विशेषतः आईचे संस्कार होते.  त्यांचा बुजरेपणा कमी झाला होता. ग्रामीण भागातल्या जनतेचे दुःख त्यांनी जवळून बघितलेले होते. राजकारण आणि वृत्तपत्राचे वाचन यामुळे त्यांना समाजभान व राष्ट्रभान आले. राष्ट्रीय नेत्यांची भाषणे ते आवर्जून ऐकत. त्यातील विचारांचा त्यांच्या मनःपटलावर फार परिणाम झाला.  लाकडाच्या किट्ट्याच्या व्यवसायात दिवसरात्र मेहनत करावी लागे, महिन्याभरात काही कमाई होत असे. धंद्यासाठी उसनवार घेतलेले पैसे, ज्यांची झाडे घेतलेली असत त्यांची देणी उरल्यानंतर स्वतःसाठी काही रुपड्यांची कमाई होत असे. कुटुंबातल्या पाच-सहा जणांच्या हातातोंडाची गाठ घालायची आणि तरीही आल्या पाहुण्याला रिकाम्या पोटी पाठवायचं नाही, ही त्यावेळी अंगीकारलेली रीत आजही भल्या पहाटे पासून सुरु आहे. जीवनामध्ये जिद्द होती की स्वकर्तृत्वाने मोठं व्हायचं. मित्रांच्या सहकार्याने व्यवसायात पाऊल टाकले आणि सुरूवातीलाच समाजकार्याचा एक भाग म्हणून सामाजिक वा सांस्कृतिक कामासाठी ते आर्थिक मदत देऊ लागले. 
राजकारणाची आवड निर्माण झाल्यानंतर पंचक्रोशीतली लहान-मोठी कामं करू लागले. ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांना आपल्या कामाची पावती मिळवण्याची पहिली संधी मिळाली. ते सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आले आणि सक्रीय राजकारणाला सुरुवात झाली. पुढे १९९२ साली पंचायत समिती निवडणूक लढण्याची भरत गोगावलेंची इच्छा होती. तेव्हा काँग्रेसकडे तिकीट त्यांनी मागून पाहिलं. पण काँग्रेसनं तिकीट दिलं नाही, म्हणून अपक्ष लढले आणि जिंकले. त्यानंतर शिवसेनेत प्रवेश केला.तेव्हापासून म्हणजे १९९२-९३ पासून ते शिवसेनेशी जोडले गेले, ते एकनाथ शिंदेंच्या बंडखोर गटाशी जोडण्यापर्यंत. त्यानंतर ते जिल्हा परिषद निवडणूक लढले. दोनवेळा रायगड जिल्हा परिषदेवर निवडून आले. पशु, अर्थ, बांधकाम अशा विविध खात्यांचे दोनवेळा त्यांनी सभापतीपदही भूषवलं. शिवसेनेचा आक्रमक नेता म्हणून रायगडमध्ये भरत गोगावलेंनी ओळख निर्माण केली आहे, यापूर्वी माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले, सुनील तटकरेंचा दबदबा होता. काही प्रमाणात शेकापची सुद्धा ताकद होती असं असतानाही भरत गोगावलेंनी जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढवली आणि महाडमध्ये आपले पाय रोवले आहेत. 
जिल्हापरिषद पहिल्यांदा निवडणूक लढताना खिश्यात छदाम नसतानाही, केवळ लढाऊ फौजेच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर ते निवडून आले. पुढे पुन्हा एकदा जिल्हा परिषद सदस्य आणि चार वेळा आमदार आणि आता मंत्री म्हणून त्यांची कारकीर्द शिवसैनिकच नव्हे, तर कुठल्याही राजकीय- सामाजिक कार्यकर्त्याला प्रेरणादायी ठरेल अशीच आहे.
भरतशेठ यांच्या संपूर्ण आयुष्यावर नाव कोरलं गेलं आहे ते  म्हणजे शिवसेनाप्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांचे. त्यांच्याच विचारांनी त्यांना राजकीय दिशा दिली आणि  पुढे त्यांच्याच विचारांच्या ताकदीवर लढायला आणि जगायला समर्थ केले. पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढताना समोर माणिकराव जगताप यांच्यासारखा कर्तबगार उमदा विद्यमान आमदार होता. त्याचबरोबर ज्यांच्या तिन्ही आमदारकीच्यावेळी त्यांनी झोकून काम केले होते ते माजी मंत्री प्रभाकर मोरे साहेब यांनी असहकार पुकारला होता. त्यामुळे भरतशेठ एकाकी पडतील असे अनेक राजकीय धुरींणाना  वाटत होते, परंतु भरतशेठ यांनी हे राजकीय मुत्सुद्यांची भाकीते आणि अंदाज खोटी  ठरविली. यातून त्यांनी जनमाणसात स्वतःची निर्माण केलेली प्रतिमा लक्षात येते. मतदार संघात तळागाळात  जनाधार असलेला मातब्बर नेता अशीच त्यांची ओळख निर्माण झाली होती.


गेअडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड झाले.  त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खांद्याला खांदा लावून शेठ उभे राहिले होते.  एकनाथ शिंदे शिवसेनेतील आत्ताच्या बंडाचे नायक दिसत असले तरी ते बंड फक्त दोन व्यक्तींमधल्या संघर्षातून उभं राहिले नव्हते. तर शिवसेनेच्या बदललेल्या कार्यशैलीच्या विरोधातलं, सत्ता अथवा अर्थकारण ह्याचे लाभ फक्त निवडक लोकांपुरतेच मर्यादित ठेवण्याबद्दलच्या रागातून झालेलं बंड आहे. राजकारणात कार्यकर्त्यांची घुसमट होते तर नेत्यांची कोंडी होते. अनेक आमदारांनी हे शिंदे यांच्या लक्षात आणून दिले. त्यामुळे पुढे शिवसेनेसारख्या पोलादी संघटनेला मोठा तडा गेला. अगदी यांनी अन्यायाच्या विरोधात उभे राहून बंड करुन वेगळा पक्ष काढला तरी तो सक्षम पणे चालवून ते पुन्हा  सत्तेत येऊ शकतो हे एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिले.
या ब्लॉगवरील इतरही विषय वाचण्यासाठी अनुक्रमणिका वाचा ...प्रतिक्रिया द्या लिंक इतरांना पाठवा 

भरतशेठ गोगावले यांच्या राजकीय कारकिर्दीचा अभ्यास करत असताना ते ज्या काळात विकसित झाले, तो काळ नजरेसमोर आणणं आवश्यक आहे. कोणतीही व्यक्ती, विचार, संघटना निर्वात पोकळीत निर्माण होत नसते. सभोवतालच्या परिस्थितीचा प्रभाव व्यक्तीवर पडतो, व्यक्तीचा प्रभाव वातावरणावर पडतो. वातावरण आणि व्यक्ती यांच्यातील परस्पर देवघेवीतून व्यक्ती घडते. मुंबईत गिरणी संपानंतर मराठी माणूस हलाखीचे आयुष्य जगत होता. १९८०-८५ हा काळ भारतीय राजकारणात धामधुमीचा काळ होता. त्याचबरोबर गुन्हेगारी जगतात गँगवार वाढले होते. हवं तर हा काळ हताशेचा काळ, असं म्हणू या. गुंडगिरी वाढीस लागली होती. तर दुसरीकडे बिल्डरलॉबीचे प्रस्थ वाढत होते. शिवसेनाही मुंबईबाहेर हातपाय पसरण्यासाठी धोरण आखत होती. यादृष्टीकोनातून महाडमध्ये एक भव्य अधिवेशन बाळासाहेबांनी यशस्वी केले होते. शिवसेनेतला धडाडीचा मराठी तरुण येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावाकडे लक्ष देऊ लागला. तेच पुढे आपापल्या तालुक्यातून आमदार म्हणून निवडून आले. माजी मंत्री असलेले प्रभाकर मोरे हे सुद्धा आमदार महाड मधून निवडून येण्यापूर्वी  मुंबईत नोकरी करीत होते. भरतशेठ यांनी हे अचूक हेरले आणि त्यांनी महाडच्या राजकारणात लुडबुड करायला सुरुवात केली.

आकाशाची स्वप्नं पाहणारा माणूसच आकाशामध्ये गरूडझेप घेऊ शकतो. जगविख्यात नेता नेपोलियन सांगून गेला आहे की, स्वप्नच पहायची असतील तर ती भव्यदिव्य पहा. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेही नेहमी म्हणायचे चिरकूट गोष्टींपेक्षा भव्यतेची आस धरावी तर माणूस मोठा होतो. या विचारानेच भरतशेठ यांनी त्यांच्या माझ्या कार्यक्षेत्राची दिशा ठरवली. भरतशेठ यांनी गावोगावी वाड्यावस्त्यावर कार्यकर्ते तयार केले आहेत. त्यांना पक्षात कामे दिली.  काहींना ग्रामीण पातळीवर पदे देऊन सत्तेत जबाबदारी दिली. कार्यकर्त्याचं पाठबळ हीच आपली खरी ताकद आहे असे ते मानत. म्हणूनच त्यांना महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात भरतशेठ अचानक जरी आले तरी  'सर्वसामान्यांचा शेठ' असे म्हणत. दहा मिनिटांच्या आत त्यांच्याभोवती माणसांचं जाळं तयार व्हायला वेळ लागत नाही.  खरं तर माणसात रमणाराच हा लोकनेता आहे. वास्तवाकडे पाठ करून चालणाऱ्यांशी त्यांचे कधी जमले नाही. कधीही अन् कुठेही भेटा. बोलताना पाल्हाळ नाही. जे बोलायचे ते खात्रीचे.

वावटळ होण्यासाठी नाही. काम एके काम. कामाचे महत्त्व पटले की जिवाचे रान करणार. दुष्काळी तालुक्यातील माणसांच्या समस्या कायम वेगळ्याच असतात. मडक्याच्या उतरंडीसारख्याच त्या असतात. सुटतही नाहीत अन् संपतही नाहीत. शेतकऱ्यांत, कष्टकऱ्यांत मिसळणारा, किंबहुना आयुष्य केवळ त्यांच्यासाठीच आहे, असे समजून चालणारा जाणता नेता म्हणूनच तालुक्यातील  जनता त्यांच्याकडे पाहते. त्यांची सौभाग्यवती सुषमाताई म्हणजे  दीनदलितांच्या अडीनडीला निरपेक्षपणे, हमखास, सढळ हाताने मदत करणारी ही सर्वांची वहिनी.  घरात वा दारात माणसांचा अखंड राबता असला तरी कधी कंटाळा नाही. कष्टांना, संकटांना न डगमगणारी ही माऊली आहे भरतशेठ हे कुशल तसेच चाणाक्ष व्यक्तिमत्त्वाचे धनी आहेत. त्यांच्या ठायी अभ्यासूवृत्ती, नेतृत्वगुण आणि माणसं जपण्याच्या हातोटीबरोबरच राजकारणात आवश्यक असणारा संयम तसेच योग्यवेळी गरजेची असणारी आक्रमकता या गुणांचा अचूक मिलाफ आहे. वरवर काही करणे नाही. जे करायचे ते कृतीतून ! ज्या कृतीचा जनसामान्याला उपयोग झाला पाहिजे. केलेल्या कामाचा डांगोरा पिटत राहणे त्यांना जमले नाही. अर्थकारणातून अनेक जण मने सांभाळतात. पण भरतशेठ यांचे तसे नाही. 'जवळचा' 'लांबचा' हे दोन्ही शब्द त्यांच्या कोशात नाहीत. ज्याची खरोखरीची नड आहे किंवा जे घाम गाळतात; त्यांची पूजा बांधणारा हा रयतेचा माणूस आहे. आपण फक्त बोलघेवडे नाही आहोत, हे त्यांनी तिन्ही तालुक्यातील जनतेला दाखवून दिले आहे. शिवसेना पक्षवाढीसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी आयुष्यभर आपली व्यक्तिगत मिळकत खर्च करणारा हा उदार, कनवाळू नेता आहे. अखंड भ्रमंती, अफाट जनसंपर्क, अचाट स्मरणशक्ती, आश्चर्यचकित करणारा बुद्धीचा आवाका, कार्यकर्त्यांशी अतूट जिव्हाळा, अविरत चिंतन, विधायक राजकारण आणि समाजकारण, अलिप्त मनानं स्वतःचा संसार करणारा हा नेता, कार्यकर्त्यांच्या बारीक सारीक अडचणीही जाणून घेऊन त्यांना वेळोवेळी मदत करतो. पारदर्शी आणि प्रांजळ स्वभाव ही या व्यक्तिमत्त्वाची ठळक वैशिष्ट्ये आहेत.


भरतशेठ यांच्या कामाची एक वेगळी पध्दत आहे .... सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून,त्यांच्या बारशापासून ते मयत-कार्यापर्यंत लोकांमध्ये जाऊन त्यांची आस्थेने विचारपूस करणारा सर्वांना आपलासा वाटणारा आपला माणूस म्हणून ते परिचित आहेत. एखादा राजकारणी सत्ताधारी झाला की त्याच्यात एका दुर्गुणाचा प्रादुर्भाव होतो. तो म्हणजे समोरच्या व्यक्तीची उपयुक्तता जोखणे आणि त्यानुसारच त्याचे आदरातिथ्य करणे वा न करणे. या दुर्गुणाने भरतशेठ यांना कधीही स्पर्श केला नाही. आपले पद, मोठेपण विसरुन आपल्यास आपले म्हणण्याचा, कोणाच्याही अडी अडचणीस मदतीला धावून जाण्याचा त्यांचा स्वभाव आहे. त्यात कधीही बदल झाला नाही व पुढे सत्ता नसतानाही होणार नाही. 
तळागाळात असलेला संपर्क, रांगडी भाषा, थेट आणि बिनधास्त स्वभाव आणि सामान्य माणसाच्या मदतीला धावून जाण्याची वृत्ती तसेच सहज संपर्क यामुळे भरतशेठ मतदार संघात प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यांच्या निवासस्थानी सामान्य जनतेचा प्रचंड राबता असतो.मतदार संघात कुठेही गेले तरी त्यांच्याभोवती लोकांचा गराडा पडतो. महाड तालुक्यातून मुंबई वास्तव्यासाठी असलेल्या लोकांशीही त्यांचा थेट कनेक्ट आहे. विशेषतः उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात येणाऱ्या रुग्णांच्या मदतीसाठी भरतशेठ नेहमी तत्पर असतात. "जे मनात तेच ओठात" असा सरळसोट स्वभाव असल्यामुळे भरतशेठ यांना कोणत्याही अडचणी कधी येत नाहीत. महाड विधानसभा मतदारसंघात गेल्या तीन टर्ममध्ये भरत शेठ गोगावले यांनी पायाभूत सुविधा विकासाची अनेक कामे पूर्ण करून घेतली आहेत. 


राज्याच्या प्रश्नांवर अत्यंत अभ्यासू वृत्ती, उत्तम हजरजबाबी वक्तृत्व आणि प्रसंगावधान यामुळे भरतशेठ यांना विधानसभेत वा चॅनेल्स समोर ऐकणे हा अतीव आनंदाचा भाग असतो. त्यांचे वक्तृत्व जीवंत आणि ग्रामीण लेहजाचे असते त्यामुळे अनेकदा त्याचा आनंद प्रसंगी सत्ताधारीही आणि विरोधकही घेत असतात. कित्येक राजकीय कार्यकर्त्यांची उमेद निवडून येईपर्यंतच नष्ट होते. खरी कसोटी निवडून गेल्यावर कायद्याचा, त्याच्या अंमलबजावणीचा लाभ जनतेला मिळवून देण्यात असते. काहीसे अल्पशिक्षित असल्याने सभागृहात एक काटेकोर नियमांचा अभ्यास आणि उत्तम वक्तृत्व असलेला लोकप्रतिनिधी म्हणून भरतशेठ यांची कामगिरी प्रभावी नसली तरी अधिकारी आणि मंत्रीमहोदय यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध ठेऊन ते मतदारसंघातली कामे मार्गी लावत असतात.
राजकारणातला प्रत्येक काळ हा गोड, कडवट अनुभवांचा असतो. समाजजीवनात वावरत असताना काही गोष्टींची अपरिहार्यताही असते; म्हणून 'तत्त्वांशी तडजोड कधीच नाही' हा व्यक्तिविशेष क्वचितच कुण्या राजकारण्याला लागू पडतो. भरतशेठ यांनी समाजजीवनाची तत्त्वं उराशी निष्ठेने बाळगली आहेत. नाकर्ती आणि कर्ती माणसं यांच्यातला पडदा सारूनपाहताना कर्त्या माणसाचं मोठेपण लख्खपणे उठून दिसतंच ! त्याला चमकवण्याची किंवा कल्हई करण्याची गरजच नसते. त्यामागे मोठा त्याग-भाव असतो. लोकप्रतिनिधींची प्रत्येकाच्या मनात वेगळी प्रतिमा असते. ही प्रतिमा निर्माण करायला व्रतस्थपणाचं मूल्य सांभाळावं लागतं. तेही आयुष्यभर सांभाळायचं म्हणजे डोंगर उचलण्यासारखी गोष्ट आहे. असा नैतिकमूल्यांचा राजकारणातील सत्त्वशील लौकिक सांभाळणारे राजकारणी म्हणून भरतशेठ यांची ओळख मला आहे.  
आचार्य अत्र्यांनी या माणसाला पाहिलं असतं तर पहाड, भव्य, बुलंद, बिनधास्त,रांगडा गडी   अशा विशेषणांनीच त्यांनी भरतशेठ यांचं वर्णन केलं असतं. एका अर्थी अतिशयोक्तीही फिकी पडावी असं आयुष्य जगलेला हा माणूस. वरून रांगडा दिसणारा हा माणूस स्वप्नाळू आहे, निर्मळ अंतःकरणाचा आहे. रांगडे वक्तृत्व, अपार कष्ट करायची तयारी आणि कोणत्याही साध्या भोळ्या कार्यकर्त्याच्या गळ्यात हात टाकून बोलण्याइतका मोकळा ढाकळा स्वभाव यामुळे  भरतशेठ राज्यभर लोकप्रिय झाले आहेत. राजकारणासारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्रामध्ये घडणारा कुणीतरी तर असावाच लागतोच परंतु माझी राजकीय कारकीर्द पोलादपूर - महाडकरांनी घडवली असे  भरतशेठ म्हणतात. 






रवींद्र मालुसरे 
अध्यक्ष,मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई ९३२३११७७०४ 







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संकल्पपूर्ती दाता : स्व. तानाजीदादा मालुसरे

कर्तबगार माणिकराव जगतापांची लेक स्नेहलदीदी

बैल दिवाळी इतिहास, संस्कृती आणि शेतीचे धागे विणणारा सण