पत्रकारितेची तत्त्वे व मूल्ये जपण्याचा निर्धार व्हावा - रवींद्र मालुसरे
पत्रकारितेची तत्त्वे व मूल्ये जपण्याचा निर्धार व्हावा - रवींद्र मालुसरे मुंबई : पत्रकारिता हे प्रबोधनाचे व लोकशिक्षणाचे प्रभावी माध्यम आहे. सामाजिक घडामोडींचे स्वरुप प्रतिबिंबित करताना समाजाला आरसा दाखविण्याचे कार्यही पत्रकारिता करते. याच उद्देशाने समाजाला वैचारिकतेचा आरसा दाखविण्यासाठी मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे दैनिक सुरु करून रोवली होती. स्वातंत्र्यपूर्व काळात गुलामगिरीतून देशाची मुक्तता करण्यासाठी आणि स्वातंत्र्यानंतर काही वर्षे देशाचे प्रश्न मांडून विकासाची भाषा करण्यासाठी पत्रकारिता केली जात होती. मात्र अलीकडे काही वर्षांपासून आमची एकूणच पत्रकारिता ही सर्वसामान्य लोकांच्या न्याय हक्का पेक्षा राजकीय नेत्यांना मुजरे करण्यात अन अधिकाऱ्यांशी ' गोड संबंध ' जोपासण्यात खर्च होतेय. देशभरात पत्रकारिता तर्कहीन झाल्यामुळे आता संदर्भहीन होवून बसली आहे. सध्याच्या पत्रकारांवर चांगल्या संस्कारांचा आणि अभ्यासाचा अभाव असून चुकीचे संस्कार झाले आहेत. पत्रकारितेच्याही क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानामुळे बराच बदल झाला असला तरी गत पत्रकार...