मराठी भाषेची चिंता व्यक्त करण्याची वेळ आली आहे - पोलीस उपायुक्त संदीप भागडीकर
मराठी भाषेची चिंता व्यक्त करण्याची वेळ आली आहे - पोलीस उपायुक्त संदीप भागडीकर
इंग्रजी भाषा ही खरं तर जगाच्या व्यवहाराची भाषा आणि जीवनात स्थैर्य येण्यासाठी ती उत्तमपणे सर्वाना यायला हवी. मात्र आपण मराठी माणसांनी गेल्या काही दशकात याचा गैर अर्थ काढला आणि आपल्या दोन पिढ्या कॉन्व्हेंटमध्ये शिक्षणासाठी घातल्या त्यामुळे त्यांची मराठी भाषेची तोंडओळखसुद्धा पुसली गेली आहे. यासाठी मराठी पालकांनी आपल्या पाल्याचे घरीच शिक्षक होऊन त्यांना मराठीचे धडे द्यायला हवेत. मराठी भाषेला भवितव्य नाही अशी ओरड सर्व व्यासपीठावरून अलीकडे होत असते मात्र संत ज्ञानोबा-तुकोबांपासून सर्व साधुसंत, समाजसुधारक, विचारवंत, साहित्यिकांनी समृद्ध केलेल्या शेकडो वर्षाच्या मराठी भाषेची गळचेपी होणार नाही, ती मरणारही नाही मात्र दिवसेंदिवस खंगत जाईल. मराठी भाषेच्या भविष्याचा असा चिंता व्यक्त करणारा विचार सहायक पोलीस आयुक्त संदीप भागडीकर यांनी व्यक्त केला.
प्रभादेवी येथील आगरी समाज सेवा संघाच्या हॉलमध्ये मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने आयोजित केलेल्या ४८ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक प्रदर्शनाचे उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते आपले विचार मांडत होते. याप्रसंगी चतुरंग सन्मान पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ इतिहास संशोधक आप्पा परब, मनसे उपाध्यक्ष आणि दादर-माहीम विधानसभाध्यक्ष यशवंत किल्लेदार, आगरी सेवा संघाचे अध्यक्ष पद्माकर म्हात्रे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. भागडीकर साहेब पुढे असेही म्हणाले की, मराठी माणसांनी डोळसपणे अनुभव घेतला तर त्यांच्याच लक्षात येईल की, मराठी साहित्य आणि संस्कृती जपण्याची आता वेळ आली आहे. मराठी माणसाचे मन जेव्हा अशांत होते तेव्हा त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड, राजगड अशा गडकोटांवर जायला हवे म्हणजे आपण किती दगड आहोत हे लक्षात येते.
याप्रसंगी यशवंत किल्लेदार यांनी विचार मांडले, ते म्हणाले की मराठी भाषा, संस्कृती याचबरोबर मुंबईतील मराठी माणसांचे अस्तित्व टिकवण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे प्रयत्न करीत असतात, त्यांची भाषा अनेकांना पटत नाही मात्र कालांतराने त्यांचा विचार बरोबर होता हे लक्षात येते. मी मराठीमध्ये शिकलो त्यामुळे लहानपणापासूनच बहुश्रुत होत गेलो. आयुष्याच्या या टप्प्यावर मला जाणवतेय ते म्हणजे महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या शहरांचे सरकारी आशीर्वादाने परप्रांतीयकरण झपाट्याने होते आहे, त्यामुळे मराठी माणसांचे वैभव टिकवून ठेवण्यासाठी यापुढे संघर्ष करावाच लागणार आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मी अनेक उपक्रम करीत असतो, यापुढे मी मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या सोबत असेल.
शिवराजाभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त ज्येष्ठ इतिहास संशोधक आप्पा परब यांचे याप्रसंगी ' शिवपूर्वकाल ते शिवराजाभिषेक' या विषयावर व्याख्यान झाले. शिवजन्मापूर्वी महाराष्ट्र जुलमी राजवटीच्या अंधारात होता. स्वजात - स्वधर्माचा विसर पडून क्षत्रिय आपापसात लढत होते, अशावेळी आई जिजाऊंनी आपल्या पुत्रामध्ये स्वराज्य स्थापण्याचा विचार रुजविला. शिवरायांनी महाराष्ट्रातील अठरा पगड जातीजमातींना एकत्र आणून मावळ्यांमध्ये स्वतःचे राज्य निर्माण करण्याची जिद्द निर्माण केली. त्याचीच परिणीती पुढे रयतेचे राज्य निर्माण होण्यात झाले. त्यासाठी अनेक शूरवीरांनी पराक्रम केला, धारातीर्थी पडले काही गडाच्या पायरीचे दगड झाले. त्यावेळी इतर धर्मियांचे पातशहा, बादशहा यांच्या राजवटी हिंदुस्थानात होत्या, अशावेळी स्वाभिमान जागवत शिवाजी महाराजांनी राज्यरोहन करीत स्वतःला अभिषेक करून घेतला. स्वतःचे सोन्याचे व चांदीचे नाणे व स्वतःचा शिक्का तयार करून घेतले. संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी आपल्या प्रास्ताविकात मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या उपक्रमांचा आणि चळवळीच्या ७५ वर्षाचा आढावा घेतला आणि संस्थेच्या उन्नतीसाठी भविष्यात सरकार आणि हितचिंतकांनी संस्थेच्या पाठीशी राहावे असे आवाहन केले.
कार्यक्रमास स्थानिक नागरिक, मराठी भाषाप्रेमी आणि दिवाळी अंकांचे अनेक संपादक-प्रकाशक उपस्थित होते. संघाचे कार्याध्यक्ष रमेश सांगळे यांच्या नेतृत्वाखाली माजी अध्यक्ष विजय कदम, कोषाध्यक्ष आत्माराम गायकवाड, कार्यवाह नितीन कदम, सुनील कुवरे, दिगंबर चव्हाण, दिलीप ल सावंत, कृष्णा काजरोळकर, अबास आतार, ऍडव्होकेट प्रीती बने, रामचंद्र जयस्वाल, राजन देसाई, चंद्रकांत (चंदन) तावडे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर यांनी तर आभार प्रदर्शन पद्माकर म्हात्रे यांनी केले.
स्तुत्य उपक्रम. मराठी भाषा इतकी व्यापक आणि जनमानसात खोल रुजलेली आहे की ती नष्ट होणे शक्यच नाही. त्याशिवाय रवींद्र मालुसरे आणि त्यांच्या मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे सदस्य मराठीच्या तुष्टीकरणासाठी रात्रंदिवस झटत आहेतच.
उत्तर द्याहटवामराठी भाषा अमर आहे आणि अमरच राहणार.