शनिवार, १६ सप्टेंबर, २०२३

निर्भीड लेखणीची पंच्याहत्तरी : विश्वनाथ पंडित

विश्वनाथ पंडित.... ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक,  महाराष्ट्रातील अनेक दैनिकातील संपादकीय पानावरील वाचकांची पत्रे या सदरातील एक ठळक नाव. निर्भीड आणि निस्वार्थी पत्रलेखनाबरोबर कुशल संघटक, दांडगा जनसंपर्क असलेले, समकालीन प्रश्नांचे भान, लोकांच्या प्रश्नांची सखोल जाण असलेले ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक पंडित हे १८ सप्टेंबर २०२३ रोजी वयाच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यानिमिताने त्यांच्या कर्तृत्वाचा वेध घेणारा हा लेख...

माझा आणि विश्वनाथ पंडित यांचा संपर्क आला तो १९८७ मध्ये . दादर-पूर्वेकडील शिंदेवाडी महापालिका शाळेत एका शनिवारी वृत्तपत्र लेखकांची प्रातिनिधिक आणि मातृसंस्था असलेल्या मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या कार्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी वर्तमानपत्रातून पत्रलेखन करणाऱ्या पत्रलेखकांचा परिचय मेळावा असे कार्यक्रमाचे स्वरूप होते.  कॉलेजमध्ये असतानाच मी सुद्धा सातत्याने सकाळ, नवशक्तीमधून लिहीत होतो, त्यामुळे पत्रांच्या खाली असेलेली अनेक नावे वाचत होतो. परंतु ते कोण आहेत या कुतूहलापोटी मी आवर्जून पहिल्यांदाच तिथे गेलो होतो. त्यादिवशीच अनेकांचा परिचय झाला विश्वनाथ पंडित यांनाही  भेटलो. त्यावेळी ते वृत्तपत्र लेखक संघाचे कार्याध्यक्ष होते. "आज आलात आता संघाचे सभासद व्हा आणि प्रत्येक शनिवारी संध्याकाळी येत जा" हे त्यादिवशीचे त्यांचे शब्द अजूनही माझ्या लक्षात आहेत. पुढे शनिवारी जात राहिलो, आपलयापेक्षा तरुण नवोदित कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त कशी संधी  देता येईल याचा विचार करणारे त्याठिकाणी अनेकजण होते.

माझे हस्ताक्षर सुंदर आहे हे दिवंगत माजी अध्यक्ष ग. शं. सामंत आणि गणेश केळकर यांच्या लक्षात आल्यानंतर या तिघांनी कार्यक्रमाच्या दिवशी तर नक्की यायचेच असा आग्रह केला. मुंबई-ठाण्यातील पत्रलेखक या ठिकाणी एकत्र येण्याचा शनिवार हा हक्काचा दिवस. चळवळीवर नितांत प्रेम करणारे बुजुर्ग आणि नवे अशा दोन्ही पिढीतील पत्रलेखक प्रत्येक शनिवारी शिंदेवाडीत हमखास भेटणार असा हा जणू पायंडाच पडला होता. त्या ठिकाणी मधू शिरोडकर, ग. शं. सामंत, गणेश केळकर, विश्वनाथ रखांगी, वि अ सावंत. भाई तांबे, शरद वर्तक, मिलिंद तांबे, सीताराम राणे, नंदकुमार रोपळेकर यांनी माझ्यासारख्या कितीतरी नवोदितांना संघात येण्यासाठी आग्रह केला आणि संघाचे धडे गिरवण्यासाठी कामाला जुंपले.

सध्या दैनिक वृत्तमानसमध्ये असलेले ज्येष्ठ पत्रकार सुनील शिंदे हे त्यावेळी कार्यक्रमाची बातमी सर्वप्रथम हाताने लिहायचे त्याच्या अनेक कॉपीज तयार करण्याचे काम आम्ही तयार करायचो. म्हणजे झेरॉक्स मशीनचा जन्म त्यावेळी झाला नव्हता. याचवेळी माझ्या एक लक्षात आले ते म्हणजे या संस्थेची धुरा सांभाळणारे संघातील ज्येष्ठ कायम संघाच्या हिताचा विचार निस्वार्थीपणे करीत असतात. जो पहिल्यांदा कार्यालयात येतो तो टाळे उघडल्यानंतर अगोदर हातात झाडू घेतो, साफसफाई करतो त्यानंतरच खुर्चीवर बसतो. याचबरोबर आपलयापेक्षा तरुण नवोदित कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त कशी संधी देता येईल याचाही विचार करीत असतो. विश्वनाथ पंडित हे  त्यापैकी एक. संघात त्यांनी त्यापूर्वी आणि नंतरही प्रमुख कार्यवाह हे कामाचे पद भूषविले होते. फोर्टच्या सिटी बँकेत ते चांगल्या पदावर काम करीत होते, परंतु संघात पाऊल ठेवल्यानंतर ते आपली मोठेपणाची झूल उतरवून ठेवीत असत. काम करताना जे करायचे ते मन लावून करायचे पण त्याच्या यशाचे श्रेय आपण घ्यायचे नाही, सार्वजनिक काम हे एकोप्याने करायचे असते. असे त्यांचे तत्व होते. पंडित म्हणजे व्यक्तीपेक्षा संस्था मोठी मानणारे, सतत संस्थेचे हित जपणारे, आयुष्यभर उराशी जपलेल्या मूल्यांसाठी तडजोड न करणारे, स्वतः प्रसिद्धिपासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करणारे आणि मैत्रीसाठी मृदू होणारे असे व्यक्तिमत्व असेच गुणवर्णन त्यांच्या व्यक्तिमत्वाचे करता येईल. सामाजिक, सांस्कृतिक चळवळीत चालताना कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता काही माणसांशी शांतपणे आपले काम करण्याची एक पद्धत असते. आपल्या जन्मगावी चिपळूणला स्थलांतरित होण्यापूर्वी ते ठाण्यात राहत असत. अष्टविनायक चौकात संघाच्या सहकार्याने दिवाळी अंक प्रदर्शनाचा कार्यक्रम त्यांनी ८० च्या दशकात सुरु केला. पंडितांच्या अनुपस्थितही मनोहर चव्हाण, रवींद्र मोरे यांनी ४० वर्षेहून अधिक वर्षे ही परंपरा सुरु ठेवली आहे.ठाणे जिल्हाप्रमुख स्वर्गीय आनंद दिघे नियमितपणे या प्रदर्शनाला भेट देत असत. त्याचबरोबर ठाणे शहरातील सर्वच क्षेत्रातील मान्यवर आणि वाचक हे प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आवर्जून कसे येतील याचा प्रयत्न पंडित कल्पकतेने करीत असत. विशेष नवलाईची गोष्ट म्हणजे आनंद दिघे हे जाहीर मैदानी सभेत भाषणबाजीला वा पत्रकारांच्या वार्तालापाला केव्हाही सामोरे गेले नव्हते, मात्र पंडितांनी पत्रलेखक म्हणजे काय आणि संस्थेचे उपक्रम कोणकोणते आहेत हे सांगितल्यानंतर त्यांच्या आग्रहाखातर शिंदेवाडीच्या कार्यालयात वार्तालाप करण्यासाठी आले आणि स्वतःच्या खाजगी आयुष्यासह हाजीमलंग-दुर्गाडी आंदोलन आणि ठाण्याच्या विकासावर विकासावर त्यांच्या स्टाईलने दिलखूलास बोलले. प्रश्नांना उत्तरे दिली. टेंबीनाक्यावर मध्यान्नरात्रीपर्यंत गर्दीला सामोरे जात समस्येचा एकाच घावात कसा निकाल लावायचा हे माहित असलेले दिघे  ठाणेकरांना माहित होते.  दादरच्या शिंदेवाडीत त्यांची ही अनोखी दुसरी बाजू विश्वनाथ पंडितांच्यामुळे त्या दिवशी शेकडोंना अनुभवता आली.  

त्यांनी स्वतःचे 'झुंजार सह्याद्री' नावाचे पाक्षिक सुरु केले. अनेक नवोदितांना लिहिते केले आणि ठाणे शहरातील प्रश्नांना वाचा फोडण्याबरोबरच सांस्कृतिक घडामोडींचा वेध प्रामुख्याने घेतला. निवृत्तीनंतर त्यांनी आपला मुळात असणारा पत्रलेखनाचा छंद अधिक वृद्धिंगत केला. आपल्याला भावलेले आणि समाजाला उपयुक्त ठरणारे किंबहुना दिशा देणारे विचार समाजात पेरणे  हे एक नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे या विचाराने एक ध्यास घेऊन ते झपाट्याने दररोज लिहीत असतात. आजपर्यंत त्यांनी जवळपास चार हजारपेक्षा जास्त पत्रे संपूर्ण महाराष्ट्रातील विविध दैनिकातून लिहीली आहेत. या पत्राद्वारे त्यांनी समाजाच्या समस्यांना वाचा फोडली आहे. संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. समाजाला मार्गदर्शन केले. समाजस्थितीचे भान करून दिले. सावधगिरीचा इशाराही दिला. दुर्लक्षित प्रश्नांकडे लक्ष वेधले. लोकशाही व्यवस्था जिवंत राहण्यासाठी आणि समाजमनातील आंदोलने टिपण्यासाठी हे सदर फार महत्त्वाचे असते. माध्यमाला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटले जाते याचे कारण त्यांनी खरीखुरी जनतेची भाषा बोलावी असे अभिप्रेत आहे. परिवर्तनाच्या व प्रबोधनाच्या दीर्घ मुदतीच्या लढ्यासाठी पत्रलेखन आवश्यक असते. ‘वाचकांचा पत्रव्यवहार या प्रक्रियेत महत्त्वाची कामगिरी करत असतो. शिंदेवाडीच्या लहानश्या जागेत हा वैचारिक ठसा त्यांच्या मनावर खोलवर उमटला असल्याने ते आजही वयाच्या अमृत महोत्सवी वर्षात नियमित पेरते राहिले आहेत. निवृत्तीनंतरचा वेळ,बुद्धी खर्च करून आणि पदरमोड करून परखडपणे लिहिणारे विश्वनाथ पंडित हे पत्रलेखक म्हणून लोकप्रबोधनाचेच काम करत आहेत असे म्हणावे लागेल.

विश्वनाथ पंडित सध्या चिपळूण सारख्या दूर ठिकाणी असले तरी मोबाईल संपर्काच्या माध्यमातून सातत्याने संपर्कात असतात. त्यांच्याशी जुळलेला माझा स्नेहबंध आज  जिव्हाळ्याचा मैत्र बनून गेला आहे. मराठी वृत्तपत्र लेखक संघ ही आमची संस्था सध्या संक्रमणावस्थेतून जात आहे. अडचणींतून मार्ग काढण्यासाठी ते सतत मार्गदर्शन करीत असतात. एखादा कार्यक्रम ठरला की पूर्वतयारी कुठपर्यंत आली आहे ते कार्यक्रम कसा झाला याची सतत विचारपूस करीत असतात.  वृत्तपत्र लेखक संघ ही मुंबईतील जागृत नागरीकांची वैचारिक आणि सांस्कृतिक चळवळ व्हावी हे त्यांच्यासह पूर्वसूरींचे स्वप्न पूर्ण झाले आहे. आज मुंबईतील सामाजिक सांस्कृतिक चळवळीचा इतिहास लिहायचा तर इतिहासकाराला 'मराठी वृत्तपत्र लेखक संघाला' वगळून पुढे जाता येणार नाही. संघ सुद्धा चळवळीचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करताना आज त्या टप्प्यावर पोहोचला आहे, याचे श्रेय निःसंशय संघाच्या जुन्याजाणत्या कार्यकर्त्यांचाप्रमाणेच पंडित साहेबांनाही जाते. सलग ५० संमेलने मुंबईत झाल्यानंतर पुढचे संमेलन मुंबईबाहेर एखाद्या जिल्ह्यात करावे असा निर्णय आम्ही घेतला. ठाणे शहराच्या सांस्कृतिक चळवळीत अग्रेसर असणाऱ्या पंडित यांनी ते ठाण्यात होण्यासाठी मी प्रयत्न करतो असा विडा उचलला आणि त्यावेळी आमदार असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आम्हाला घेऊन गेले. ज्येष्ठ साहित्यिक शन्ना तथा श. ना. नवरे यांच्या अध्यक्षतेखाली भरगच्च कार्यक्रम असलेले भव्य संमेलन गडकरी रंगायतनमध्ये माझ्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात झाले. परंतु विश्वनाथ पंडित यांच्या संपूर्ण सहकार्याने यशस्वीपणे पार पडले. त्यापूर्वी अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचे ३२ वे संमेलन ठाणे येथे नरेंद्र बल्लाळ यांच्या पुढाकाराने झाले होते. त्या संमेलनाच्या व्यासपीठावर 'वृत्तपत्र लेखकांचा परिसंवाद'आयोजित करण्यात त्यांनी गणेश केळकर यांच्या सहकार्याने वृत्तपत्र लेखकांना मानाचे स्थान मिळवून दिले होते.

साहित्य, सामाजिक, पत्रलेखन, सांस्कृतिक, भाषा अशा विभिन्न क्षेत्रात दमदारपणे आपला ठसा उमटविणारे पंडित म्हणजे सर्वाना हवेहवेसे वाटणारे व्यक्तिमत्व. त्यांनी अनेकांना मोठे केले. स्वाभिमानाने, ताठ कण्याने कसे जागायचे याचे धडे त्यांनी अखिल भारतीय क्षत्रिय मराठा महासंघाचे अध्यक्ष असलेले त्यांचे मामा दादासाहेब मोरे यांच्याकडून घेतले. त्यामुळेच आयुष्यभर कोणासमोर ते लाचारीने झुकले नाहीत.  १९७४ ला शिवाजी महाराजांच्या ३०० व्या पुण्यतिथीचं आयोजन रायगडावर केलं होतं. मराठा महासंघ आणि  सुनितादेवी धनवटे यांच्या विनंतीनुसार  स्व. इंदिरा गांधी मेघडंबरीच्या उदघटनासाठी येणार होत्या. त्यावेळी मराठा महासंघाचे अध्यक्ष  शशिकांत पवार यांनी पाहुण्यांच्या खास कक्षात महत्वाच्या सुचना देऊन पंडित यांना आपल्या सोबत ठेवले होते. सामाजिक कार्यासाठी प्रामाणिकपणे झोकून दिल्यामुळेच माझ्या वाट्याला हा सुवर्णक्षण आला असे पंडित यांना वाटते आहे.  

अवघ्या महाराष्ट्रातील पत्रलेखकांचा सच्चा मित्र आणि मार्गदर्शक बनलेले विश्वनाथ पंडित ७५ वे अमृतमहोत्सवी वर्षाला सामोरे जात आहेत. मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई या संस्थेबरोबरच ठाणे शहरातील जिजामाता युवक मंडळ, चिपळूण तुरंबव येथील श्री शारदा समाज सेवा मंडळ या संस्थांशी त्यांचा आजही निकटचा संबंध आहे. पत्रलेखनाचा छंद जोपासताना मराठी वृत्तपत्र लेखक संघाला पर्यायाने पत्रलेखक चळवळीला मोठे करणाऱ्या या माणसाला मी अलीकडे विचारले, " पत्रलेखनातून तुम्ही काय काय मिळवलं आणि कमवलं" त्यांनी उत्तर दिले वाचकांच्या पत्रांमध्ये केवढी जबरदस्त ताकद असते हे शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनीच फक्त ओळखले होते. शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना ते स्वतः फोन करून त्याकडे ते लक्ष वेधत असत. या वृत्तपत्रीय पत्रांची दखल काही वर्षांपूर्वी संबंधित सरकारी खात्याकडून घेतली जात असे वर्तमानपत्रातून खुलासा करीत असत. परंतु आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधी निर्ढावलेले झाले आहेत. वाचकांची पत्रेही ते रिकाम्या झालेल्या खोक्यात फेकून देत असतील. भविष्यात  या पत्रांनाही ‘अच्छे दिन येतील अशी आशा बाळगू !

पत्रलेखकांना आणि पत्रलेखक चळवळीला प्रतिष्ठा प्राप्त करून देणाऱ्या निस्वार्थीपणे जागल्याची भूमिका पार पाडणाऱ्या विश्वनाथ पंडित याना उत्तम दीर्घायुरोग्य लाभो अशा यानिमित्ताने सदिच्छा !



 - रवींद्र मालुसरे

अध्यक्ष

मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई

९३२३११७७०४

1 टिप्पणी:

  1. ज्येष्ठ पत्रलेखाक आणि हॅलो सखी चे मुखा संपादक आदरणीय विश्वनाथ पंडित यांच्या अमृत महोत्सवी वर्षपूर्ती निमित्त हार्दिक शुभेच्छा एक चतुरस्त्र परखड विचार मांडणारे पंडित साहेब यांची लेखणी नेहमीच सुसंस्कृत आणि वेगळ्या धाटणीची आहे. समाजाला भेडसावणाऱ्या समस्या भडक आणि उथळ अंगाने न मांडता सहज सुलभ आणि परखड मत मांडणी हेच त्यांच्या लेखणीचे वैशिष्ट्य . मी त्यांना उत्तम आरोग्य आणि आनंददायी दीर्घाुष्यासाठी शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीसाठी सुध्दा खूप शुभेच्छा. राजन देसाई पत्रकार मुंबई

    उत्तर द्याहटवा

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत सत्याची कास धरून पत्रकारिता करावी.

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत  सत्याची कास धरून पत्रकारिता करावी. सतरावे शतक प्रबोधनाचे ,  अठरावे शतक वैचारिकतेचे ,  एकोणीसावे शतक प्रगतीचे...