दिवंगत शरद वर्तक यांना शब्द सुमनांजली !
दिवंगत शरद वर्तक यांना शब्द सुमनांजली !
नमस्कार करावा अशी पावलं आज दिसत नाहीत. संस्थात्मक पातळीवर तर अभावानेच निःस्पृह माणसं भेटतात. वैयक्तिक स्वार्थासाठी कातडीबचऊ धोरण अवलंबविणाऱ्या माणसांचा गजबजाट आज सभोवती दिसतो आहे. आयुष्याच्या प्रवासात ऐन उमेदीच्या काळात कोणीतरी भेटावे आणि त्याच्याशी ओळख व्हावी, पुढे तिचे मैत्रीच्या रुपात कौटुंबीक ममत्वात रूपांतर व्हावे आणि आकस्मिक भेटलेला हा माणूस आपल्या आयुष्याचा भाग बनावा तसे दिवंगत शरद वर्तक साहेब नकळत माझ्या आयुष्यात आले आणि ३७ वर्षे कायम मुक्कामाला राहिले. त्या राहण्यात त्यांच्या सौ वर्तकांचे घरच्या माणसाचे आपलेपण तर शरदरावांचे ज्येष्ठ मार्गदर्शकाचे नाते होते. वर्तक जेवढे साधे दिसत तेवढेच ते साधेपणाने बोलत परंतु निर्भीड आणि परखडपणे संपादकीय पानावर लिहीत असत. वर्तक साहेबांची आणि माझी भेट १९८६ ला शिंदेवाडीच्या संस्थेच्या कार्यालयात झाली. पुढे दर शनिवारी आणि कार्यक्रमांच्या निमित्ताने भेट होत गेली. काही माणसे अनेक चेहऱ्यांनी समाजात वावरत असतात. शरद वर्तकांना दुसरा चेहरा नव्हताच, एकच होता. सार्वजनिक जीवनात वावरताना आज मी थोडीफार श्रीमंती अनुभवतोय ते दिवंगत ग शं सामंत, गणेश केळकर, भाई तांबे, शरद वर्तक व सध्या वृद्धत्वाकडे झुकलेल्या मधू शिरोडकर, वि अ सावंत, नंदकुमार रोपळेकर, विश्वनाथ पंडित यांच्यामुळे. मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या कामाचा डोंगर उभ्या केलेल्या या व्यक्तिमत्वांच्या सानिध्यात मी, महाराष्ट्र टाइम्सचे ज्येष्ठ पत्रकार नितीन कदम, दिलीप ल सावंत, प्रकाश नागणे,दत्ताराम घुगे आलो.
वर्तक साहेब सातत्याने पत्रलेखन करायचे, विशेषतः महाराष्ट्र टाइम्स हे त्यांचे आवडीचे दैनिक. मराठी - हिंदी चित्रपट गतवैभवाचा काळ ते आठवणींच्या स्वरूपात आपल्या लेखणीतून उतरवत असत. सध्या संपादकीय पानावर समाजाचा आरसा दाखविणारी वृत्तपत्र लेखकाची हक्काची जागा दिवसेंदिवस आकसत चालली आहे. जसा आज प्रिंट मीडियाच्या समोर त्यांच्याच अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे. तसाच संघाच्याही अस्तित्वाचा प्रश्न उभा राहीला आहे. माध्यमांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून अलीकडे जोरात सुरु आहे. असे घडत असले तरी....वृत्तपत्र लेखक म्हणजे रात्रीच्या काळोखातही कार्यरत राहणारा जागल्या आहे. यापुढे...यापुढे...आणि यापुढेही तो राहाणार आहे.
एखाद्या लहानश्या स्टेशनावर अंधाऱ्या रात्री रेल्वेगाडी थांबते. तिथल्या अपुऱ्या प्रकाशात हाती कंदील घेऊन एक कामगार गाडीच्या चाकावर ठोके देऊन जातो. त्याच्या एका हातात कंदील आणि दुसऱ्या हातात तेलाचा कॅन असतो. जिथे गरज असेल तिथे त्या कॅनमधले तेल घालत तो गाडीचा पुढला प्रवास सुखाचा करतो. सगळ्या भविष्याची वाटचाल सोपी करणारी अशी माणसे हीच समाजाच्या निर्धास्तपणाची हमी देत असतात. वर्तक साहेब त्यापैकी एक होते. प्रकाशकणांची पेरणी करणारे आणि आले तसेच नकळत निघून जाणारे ! ....'शरद वसंत वर्तक, चेंबूर' हे संपादकीय पानावरचे नाव अनेकांच्या कायम स्मरणात राहील.
!! तुमच्या कार्यकर्तृत्वाला मानाचा सलाम !!
रवींद्र मालुसरे
अध्यक्ष
मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई
भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🏻
उत्तर द्याहटवा