प्रभादेवीतील आगरी सेवा संघ

 प्रभादेवीतील आगरी सेवा संघ


आज प्रभादेवीत आगरी सेवा संघाच्या वतीने वार्षिक कार्यक्रम भव्यदिव्य स्वरुपात साजरा होत आहे, सन २०११ मध्ये वरळी कोळीवाड्याच्या जनता शाळेत अमृत महोत्सव अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत झाला होता.

त्यावेळी १२ डिसेंबरला मुंबईतील काही दैनिकातून मी यासंदर्भात लेख लिहून संस्थेच्या कार्याचा आढावा घेऊन मुंबईकरांना ओळख करून दिली होती. यानंतरच्या ११ वर्षात भटचाळ येथे आगरी सेवा संघ चौक, मुरारी घाग मार्ग येथे माजी नगरसेवक मोतीराम तांडेल चौक, खाडा येथे आगरी सेवा संघाचे समाजमंदिराची स्वतःची वास्तू अशी कामे उभी राहिली आहेत.
काळाच्या ओघात संस्थेची स्थापना करणारे काही समाजधुरीण ज्यांनी संस्थेला उर्जितावस्था दिली, आर्थिक ताकद दिली, समाजातील सर्व थरात पोहोचवली असे समाजधुरीण काळाच्या पडद्याआड गेले आहेत, काही वयोवृद्ध झाल्याने घरी आहेत मात्र पद्माकर म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली अलीकडची तरुण पिढी सातत्याने कार्यरत आहे. यातूनच कैलास पाटील, संजय भगत, नरेंद्र बांधणकर, कोठेकर, ज्योति जुईकर असे बरेचजण राजकीय क्षेत्रात पुढे जात आहेत. गुणवत्ता असलेले अनेक तरुण वैद्यकीय क्षेत्रासह आधुनिक तांत्रिक युगात मोठमोठ्या हुद्यावर काम करीत आहेत.....या नवीन पिढीसमोर इतकेच आहे, आपल्या पूर्वजांनी बोलीभाषेसह जोपासलेली मूळ संस्कृती जपण्याची गरज आहे.
-------------------------------
"अगोदर प्रकाशित झालेला लेख"

सन १९३५ च्या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर आगरी सेवा संघाची स्थापना झाली. आज २०२२ च्या दसऱ्याला ८७ वर्षे पूर्ण झाली आहेत. मुंबई शहरात अनेक ठिकाणी आगरी समाजाची वस्ती फार मोठ्या प्रमाणावर विखुरलेली आहे. त्यापैकी प्रभादेवी, वरळी कोळीवाडा, सास्मिराच्या मागे भटचाळ, वडाळा, भोईवाडा, स्यान्डहर्स्ट रोड, चुनाभट्टी, मानखुर्द अशी ठळक ठिकाणे आहेत. परंतु प्रभादेवी आणि  वरळी कोळीवाडा येथे ही संख्या विलक्षण आहे. कामगार वस्तीतील या ठिकाणी गेल्या २० वर्षतात विलक्षण बदल होतो आहे. मुख्यतः  चाळी आणि झोपडपट्टयांनी व्यापलेला हा भाग सध्या टोळेजंग टॉवर्सनी व्यापलेला आहे. त्यामुळे आगरी समाजासह बहुजनांची काळाच्या ओघात प्रतिष्ठा वाढली आहे. शैक्षणिक, सामाजिक, सहकार, उद्योजकता व राजकीय क्षेत्रात तीन दशकापूर्वी अत्यंत मागास असलेला या समाजातील अनेक तरुण कायापालट झालेल्या या समाजातील अनेक तरुण उच्च शिक्षित झाला आहे. इतकेच नव्हे तर बदललेल्या जागतिकीकरण आणि उदारीकरणाचा वेध घेत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवीत आहे. काहींनी तर परदेशात चांगल्या कंपनीमध्ये नोकऱ्या मिळवल्या आहेत. शिक्षणाबरोबरच सधनता आणि समृद्धी आल्याने समाजात चंगळवाद बोकाळला आहे, सर्वच समाजातील अलीकडची युवापिढी शिकली आहे पण जगाच्या बाजारात वावरताना प्रगल्भ बौद्धिक वाढ व्हावी यासाठी अवांतर वाचन करीत नाही, बहुसंख्यजण सोशल मीडियाच्या आहारी गेल्याने स्वकेंद्रित झाली आहे, असाच सूर मागच्या पिढीचा असतो. असे असतानाही या समाजातील अलीकडच्या पिढीने प्रभादेवी परिसरात राजकीय  अस्तित्व निर्माण करतानाच समाजाची सदानंद वाडीत (खाडा ) स्वतःची वास्तू उभी केली आहे.
देशाचा स्वातंत्र्यापूर्वी म्हणजे १९३५ चा आसपासचा काळ हा मुंबई शहरात विशेषतः कष्टकरी कामगारांच्या जीवनात अत्यंत महत्वपूर्ण घडामोडी व उलथापालथी करणारा होता. मुंबई गिरणी कामगार युनियनच्या नेतृत्वाखाली १९२८ मध्ये गिरणी कामगारांचा प्रदीर्घ असा ६ महिन्यांचा जागतिक नोंद करणारा बलाढ्य संप लढला गेला होता. महात्मा गांधी यांनी पुकारलेला १९३० च्या  मिठाचा सत्याग्रहाचा देशव्यापी लढ्यात मुंबईवासीय ब्रिटिश साम्राज्याला हादरे देण्यासाठी लढाऊ बाणाने उतरला होता. १९३४ साली राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन खऱ्या अर्थाने कामगार विभाग ओळख असलेला वरळी येथे राष्ट्रीय लढ्याची धार तेजस्वी करीत मोठ्या प्रमाणात यशस्वी धार तेजस्वी करीत मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले होते. १९३५ मध्ये पुन्हा गिरणी कामगार संपाचा घोषणा वातावरणात दुमुदुमु लागला होता. अशाच वातावरणात त्यावेळचे आगरी समाजातील धुरीण समाजाला एकत्र करावे या भावनेने विचार करीत होता. मुंबई शहराशेजारी असलेला अलिबाग तालुक्यातील पोयनाड,  सांबार,  फणसापुर, पेण तालुक्यातील वडखळ, वाशी, आमटेम, शहाबाज, चरी, शहापूर, पेझारी, कासू, गडब, पिटकीरी या विभागातील आगरी बांधव गिरणी - कारखान्यात अंगमेहनत करून सेंच्युरी बाजार, वरळी कोळीवाडा या भागात स्वतःचा किंवा भाड्याच्या चाळीत राहत होता. तर इकडे ग्रामीण भागातला बांधव निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून आपली खारटण जमिनीच्या तुकड्यांवर दिवसरात्र काबाडकष्ट करून त्यावर आपला संसार सावरण्याचा प्रयत्न करीत होता. एकंदर एका बाजूने निसर्गाची आपत्ती तर दुसऱ्या बाजूला मागासलेपणामुळे हा समाज हलाकीच्या परिस्थितीत जखडला गेला होताच, परंतु त्याचबरोबर आणखी एक जबरदस्त आणि तितकेच महत्वाचे असे कारण होते, ते म्हणजे सर्वांगीण सामाजिक मागासलेपणा व त्यासोबतचा अशिक्षितपणा. अनेक प्रकारचा अनिष्ट अपप्रवृतींना तो बळी पडलेला होता. पोलीस-कोर्ट कबजाच्या हेलपाट्यांच्या बरोबर पैशाचीही उधळपट्टी करीत असे. केवळ मीपणाचा दिखाऊ हौसेपोटी लग्नसमारंभ किंवा इतर प्रसंगी कर्ज काढून वारेमाप खर्च करण्यात तो धन्यता मानत असे. व्यसनाबरोबरच अंधश्रद्धेचा आहारी जाऊन बुवाबाजी,  भगतगिरी, देवदेवस्की, भुताटकी यांचा सारखा फसवणूक होणाऱ्या गोष्टीना तो सहज शिकार बनत होता. त्या काळात अशा परिस्थितीत अडकल्याने त्याला आपला मायभूमीस मुकून मुंबईचा रस्ता धरावा लागला होता.

इकडे मुंबईत आलेल्या या आगरी बांधवांवर शहरी वातावरणात इतर पुढारलेला समाजाशी सामाजिक, व्यावहारिक, धार्मिक व इतर संबंध व संपर्क आल्यामुले त्यांचे आचार,  राहणीमान,  चालीरीती, बोलीभाषा यावर कळत नकळत प्रागतिक असा हळूहळू का होईना पण चांगला परिणाम बदल होऊ लागला होता. शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण वाढत होते. त्यामुळे विशेषतः युवकांना आपल्या समाजातला सर्वच अनिष्ट गोंष्टींविरुद्ध लढा देण्याचे विचार त्यांच्यात घोळू लागले होते. याच सुमारास १९३२ - ३३ सालांत आगरी समाजातील मुंबईचे दोन गरीब होतकरू तरुण जी एल पाटील व भाऊराव मुकुंद पाटील हे विश्वविद्यालयाची पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल समाजातर्फे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला होता. अशा या महत्वपूर्ण सामाजिक घटनेपासून स्फूर्ती घेऊन प्रभादेवी, वरळी, कोळीवाडा भागातील प्रमुख युवकांनी आगरी समाजाला संघटीत करून मागासलेपणा विरुद्धच्या लढ्यास हात घालण्यास सुरुवात केली. आणि अशा तऱ्हेने अखेर १९३५ साली दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर एक भव्य संमेलनाचे आयोजन करून आगरी सेवा संघाची स्थापना करण्यात आली. समाज वस्तीचा अशा सर्व भागातून त्या त्या भागाचे प्रतिनिधी निवडून घेऊन संघाचा कार्यकारिणीची रचना करण्यात आली. विशेष म्हणजे संघाचे कार्यकर्ते श्रमजीवी वर्गातील गिरणी कामगार होते. १९३६ सालचा राष्ट्रीय काँग्रेसचा महाराष्ट्रातील पहिल्या मंत्रिमंडळाच्या आमदानीत संपूर्ण दारूबंदीचा कायदा पास करण्यात आला.
कामगार भागांत त्याचे आगरी सेवा संघाने स्वागत केले. थाळीनाद, प्रचार बैठका राबवून दारूबंदीचा हा संदेश संघाने परिणामकारपणे घरोघरी पोचविला होता. तसेच संघाच्या कचेरी शेजारीच मोफत वाचनालय सुरु करण्यात आले होते. दैनिके, मासिके याबरोबरच ३०० निवडक पुस्तकांचा भरणा असलेले छोटेसे ग्रंथालय संघाच्या सभासदांसाठी विनामूल्य चालविले होते. हे ग्रंथालयाला संघाचे एक निष्ठावंत कार्यकर्ते आणि माजी जनरल सेक्रेटरी कै विठ्ठल बा पाटील यांचा स्मरणार्थ आजगायत चालू आहे. तसेच कुस्ती, चेअर बॅलन्सिंग, लेझीम, दांडपट्टा इत्यादी व्यायाम प्रकार तज्ज्ञा शिक्षाकडून विनामूल्य शिकविले जात असत. त्याचप्रमाणे गोकुळाष्टमी निमित्त गोविंदा पथक, दसरा संमेलन,  संघाचा आर्थिक उन्नतीसाठी चित्रपट किंवा नाट्यप्रयोग,वधु-वर संशोधन मंडळ, इयत्ता १० वी, १२ वी तसेच पदवीधर झालेला यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार, वैद्यकीय शिबीर असे अनेक कार्यक्रम यशस्वीपणे होत असतात. संघाच्या अशा तऱ्हेने चालविलेला या सर्वांगीण समाजकार्याची दखल घेऊन मुंबई महानगरपालिकेने १९३९ साली भटाच्या चाळीत १ रुपया नाममात्र दराने भाड्याने संघाच्या कार्यालयासाठी जागा दिली. जी एल पाटील यांनी आगरी सेवा संघाचे कार्य हे आपले जीवन कार्यच मानले होते.

बेस्टमधील कामगारांची संघटना आणि आगरी सेवा संघ अशी दुहेरी कामगिरी ते पार पाडीत असत. संबंध देशभर कम्युनिष्ठांच्या धरपकडीचे सत्र सुरु झाले असताना त्यांना अटक झाली आणि ते ४ वर्षे नाशिक कारागृहात स्थानबद्ध होते. त्यामुळे अप्रत्यपक्षपणे संघाचा कार्यावर परिणाम झालाच. थोडी शिथिलता आणि विस्कळीतपणा आला. परंतु अभिमानाची बाब अशी की बिकट प्रसंगी संघाचा तरुण कार्यकर्त्यांनी संघटितपणे पुढे होऊन धैर्याने व नेटाने संघाचा कारभार हाती घेतला. संघाच्या कार्याप्रती जी एल यांची निष्ठा एवढी होती की, १९५२ साली जेलमधून सुटल्यानंतर ते प्रथम संघाच्या ऑफिसवर आले. त्यानंतर झालेला १९५२ सालचा मुंबई कॉर्पोरेशन निवडणुकीत ते नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यांच्या पश्चात संघाचे अध्यक्ष रामचंद्र  बांधणकर यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख कार्यवाह राजेंद्र टेमकर, कार्यवाह अशोक पाटील, कोषाध्यक्ष नरेंद्र बांधणकर यांनी ही संघटना टिकविण्यासाठी आणि यंदाचे अमृत महोत्सवी वर्ष अनेक सामाजिक उपक्रमांनी साजरे करण्यासाठी अहोरात्र झटत आहेत.






- रवींद्र मालुसरे
अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई 
9323117704 





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संकल्पपूर्ती दाता : स्व. तानाजीदादा मालुसरे

कर्तबगार माणिकराव जगतापांची लेक स्नेहलदीदी

बैल दिवाळी इतिहास, संस्कृती आणि शेतीचे धागे विणणारा सण