गिरिदुर्गांचा वाटाड्या.... दुर्गमहर्षी आप्पासाहेब परब
गिरिदुर्गांचा वाटाड्या.... दुर्गमहर्षी आप्पासाहेब परब
- रवींद्र मालुसरे (अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई)
आप्पा परब .....
एक सामान्य गिरणी कामगार, दादरच्या रानडे रोडवरच्या फुटपाथवर जुनी पुस्तके, दिवाळी अंक, नियतकालिके विकणारे विक्रेते, प्रख्यात नाणी संग्राहक व नाणी तज्ज्ञ ते इतिहास संकलक - संशोधक हा आप्पांचा जीवनप्रवास ऐकून कोणीही थक्क होऊन जावे अशीच आप्पांची ८३ वर्षाची आयुष्यभराची वाटचाल आहे.
शिवछत्रपतींना दैवत मानणार्या या व्रतस्थ इतिहासपुरूषाशी माझा तीन तपाचा स्नेह आहे. मला लहानापासून वाचनाची प्रचंड भूक, त्यामुळे नवीन काही शोधताना दादरमधल्या रद्दीवाल्यांच्या दुकानात डोकावत असे. रानडे रोडवरील पटवर्धन ब्रदर्स हे आयुर्वेदिक दुकान सोमवारी बंद असे त्यामुळे एक दाढीधारी व्यक्ती आपल्याकडील सर्व ठेवा बंद दुकानासमोर ऐसपैस मांडत असे. ते सहज चालता बघता येत असल्याने महिन्यातून दोन तीन सोमवारी त्याठिकाणी जाणे होऊ लागले. माझ्या 'मालुसरे' आडनावासह उमरठ-साखर या जन्मगावाचा परिचय त्यांना झाल्यानंतर तर आम्ही दोघे अधिकच जवळ आलो. पुढे डिसिल्व्हा लगतच्या सोजपाल चाळीतल्या त्यांच्या घरी माझे जसजसे जाणे झाले, तसतसा त्यांना महाराष्ट्रातील अनेक लोकांच्या घरी वा सार्वजनिक कार्यक्रमात घेऊन गेलो. आप्पांची ओळख झाल्यावर गप्पा मारताना अनेक गोष्टींचे मला अप्रूप वाटत राहिले. त्यापैकी एक गोष्ट होती. परिस्थिती कशीही असो मनाची शांतता जराही ढळू न देता ते कमालीचे स्थितप्रज्ञेत राहत. आणि माणसाच्या स्थितप्रज्ञेतही इतकी उत्कटता असते हे मला तेव्हाच प्रकर्षाने जाणवले. दुसरी गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे त्यांना छत्रपती शिवरायांच्या कार्याबद्दल असणारी आत्यंतिक श्रद्धा आणि हे कार्य चिकित्सक पद्धतीने पुढे घेऊन जाणारी नवी पिढी यापुढच्या काळात कार्यरत राहील काय याबद्दल वाटणारी चिंता.
शिवकार्याच्या अभ्यासासाठी, प्रचार-प्रसारासाठी अहोरात्र वाहून घेतलेल्या या ऋषितुल्य साधकाचे चालणे, बोलणे, वागणे मला याची देही याची डोळा अनुभवता आलेय याबाबत मी स्वतःला भाग्यवान समजतो. सह्याद्रीच्या रांगात महाराष्ट्राच्या कडे- कपारीत दऱ्याखोऱ्यात अखंड भटकंती करणारे आप्पा परब लाखो इतिहासप्रेमींना परिचित आहेत. इतिहासावरील निष्ठे प्रमाणेच ज्यांनी हयातभर इतिहासाची, गडकिल्ल्यांची सेवा केली असे महत्वपूर्व ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणजे आप्पा परब होय. महाराष्ट्रातील साडेसहाशे गडकिल्ल्यांचा केवळ इतिहासच नव्हे तर त्या गडकिल्ल्यांमागील विज्ञान, वास्तुशास्त्र, भूगोल, तत्कालीन सामाजिक - आर्थिक - राजकीय - सांस्कृतिक आणि धार्मिकदृष्टया त्यांचे महत्व सांगणारे आप्पा परब हा गडकिल्ल्यांचा चालता-बोलता इतिहास आहे. आपले अवघे आयुष्यच आप्पांनी गड - किल्ल्यांवरील संदर्भ संशोधनासाठी झोकून दिले आहे. अवतीभोवतीची परिस्थिती कितीही चंगळवादी होऊ दे आपण आपले अंगीकारलेले व्रत व्रतस्थपणे कसोशीने पाळायचे हा खाक्या आप्पांनी आयुष्यभर जपला. ते करण्यासाठी जे काही करायचे ते प्रसंगी अपमान सोसून आप्पांनी केले. त्यांनी अक्षरशः हजारो लोकांना गडकिल्ले दाखवले पण ते करण्यासाठी त्यांनी कधी एक छदामही कोणाकडून घेतला नाही. 'जे किल्ले मावळ्यांनी तानाजी - बाजी - येसाजी यांनी प्रसंगी रक्त सांडून राखले तो माझ्या पूर्वजांचा वारसा दाखवण्यासाठी, सांगण्यासाठी मला पैशाची गरज नाही.' हा विचार आप्पा नेहमी जपत आले व त्या बरहुकूम ते वागत आले. 'माझा धर्म इतिहास, माझे दैवत शिवराय. माझी जात गडकिल्ल्यांची. त्या थोर युगपुरुषाने कधी जातीभेद मानला नाही, तर मग मी का मानू ?' हा उच्च विचार आप्पांनी आपल्या उरात कोरून ठेवला आहे. आप्पांचा यामागील स्वार्थ एकच, आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाच्या यशोगाथा, त्यांचे कार्यकर्तृत्व भावीपिढीला योग्यरितीने समजावे. प्रतिकूल परिस्थितीतही शिवरायांनी व त्यांच्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी केलेला असीम त्याग येणाऱ्या पिढीला आकलन व्हावा यासाठी अपार काबाडकष्ट घेऊन आप्पा ही उरफोड करीत आहेत. त्यांनी छत्रपतींच्या कार्याचा झपाटून अभ्यास केला. प्रचंड तप केले, कठोर जीवन जगले. इतिहासाची ही पाने शोधताना आणि त्यासंबंधाने विषयवार संगती लिहिताना जेव्हा भूगोल बोलत नाही तेव्हा विज्ञान व आकाशातील ग्रह तारे बोलतात या तत्वज्ञानाची सांगड घातली. गडकिल्ल्यांचा अभ्यास करताना भूगोल आणि विज्ञान एकमेकांस कसे पूरक आहेत हे त्यांनी दाखवून दिले. त्यांच्या पुस्तकांचे विषय जरी पाहिले तरी त्यांचे लिखाण हे चतुरस्त्र लेखकाचे लिखाण आहे हे समजते. आप्पांच्या वाड्.मयातील प्रज्ञा, शिवाजी महाराजांचा इतिहास सांगण्यासाठी शेकडो वेळा अनेक गडांवर जावून केलेले प्रत्यक्ष प्रयत्न, आणि त्यातून शिवप्रेमींना मिळणारी प्रसन्नता हे अनुभवता येते.
नेहमी आपल्या पाठीवर आपली सॅक बांधून घेऊन आपले पिण्याचे पाणी नेहमी सोबत ठेऊन गड चढणारे आप्पा आज महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यातून भटकंती करणाऱ्या इतिहासप्रेमींना हे आपले हक्काचे मार्गदर्शक वाटतात. त्याला कारणेदेखील तशीच आहेत. गड -किल्ल्यांसंदर्भात कोणताही अडचणींचा प्रश्न असो आणि कितीही वेळा विचारा, आप्पा कपाळावर एकही आठी पडू ने देता हसतमुख चेहऱ्याने तुमचे समाधान करतात. त्यासाठी तासनतास ते माहिती पुरवतात. अनुभवाच्या दाण्यांचे पीठ ते आपल्या वाणीतून आणि लेखणीतून देतात. एखाद्या माऊलीने जात्यावर ओवी आठवावी तसा शिवकाळातला इतिहास सांगताना त्यांच्या अनुभव विचारांचे गाणे होत जाते. 'दास राहतो डोंगरी' हा रामदासांचा एक श्लोक आप्पांच्या बाबतीत अगदी तंतोतंत लागू पडतो. दादरच्या आपल्या चाळीतल्या घरी आप्पा क्वचितच असतील पण रायगड, राजगड, सिंहगड अशा कुठल्यातरी गडावर मात्र ते नक्कीच सापडतील. कदाचित तोच त्यांचा खरा पत्ता असावा. इतकी अफाट मुशाफिरी करणारे आप्पा तसे प्रसिद्धीच्या बाबतीत मात्र शेकडो मैल दूर आहेत. त्यामागची त्यांची 'फिलॉसॉफी'' ही तितकीच वेगळी आहे. महाराष्ट्राच्या लाडक्या जाणत्या राजाचे कार्यकर्तृत्व आपल्या खारीच्या वाट्याने समाजासमोर उलगडून दाखविण्याचा प्रयत्न करीत असताना प्रसिद्धी ती कसली मिळवायची ? हा त्यांचा रोखठोक सवाल आजकाल उठसुठ प्रसिद्धीच्या मागे घोडे दामटविणाऱ्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारा आहे.
ऊन,वारा अन पाऊस याची तमा न बाळगता दऱ्याखोऱ्यातून हिंडताना आप्पा तहानभूक विसरतात. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी (शंभाजी), तानाजी, बाजीप्रभूंसारख्या व्यक्तींमुळे आप्पांच्या प्रतिभेला अनेकदा नव्याने अंकुर फुटू लागतात. या भटकंतीत ठोस अभ्यासाने केलेले विधान ही काळ्या दगडावरची अमीट रेष ठरते. गडकिल्ल्यांतून भटकंती करताना तिथला चिरान चिरा आप्पांशी बोलतो. जणू इतिहासच वर्तमान होऊन आप्पांच्या मुखाने बोलू लागतो. हा इथे असा बाजी लढला.... तानाजी - सूर्याजी हे इथून असे दोरखंडाने गडावर चढले.... महाराजांच्या घोडीच्या टापा या इथून अशा एक ना असंख्य कथा आणि बाहू-मनगटांना स्फुरण चढविणाऱ्या घटनांची मालिका आप्पा सांगतात. म्हणूनच आप्पांविषयी म्हणावेसे वाटते की,
प्राचीवरूनि मावळतीच्या, जगा सांग भास्करा ।
रायगडाचा शिवसूर्य तो कधी न मावळता ।।
सह्यगिरीत दुमदुमतील भेरी, गर्जतील खोरी ।।
हिंडता फिरता तुम्हा सांगतील, त्यागाची महती ।
तुवा घडावे अन घडवावे, पेटवीत ज्योती ।।
गडकिल्ल्यांतून भटकंती करणारे आप्पा अनेकदा जीवघेण्या प्रसंगातूनही गेले आहेत. रायगडावर मशिदीचे बांधकाम सुरु असल्याचे कळताच तातडीने रायगडावर धाव घेऊन ते रोखण्याचा यशस्वी प्रयत्न त्यांनी केला. त्यामुळे तिथल्या खवळलेल्या मुस्लिमांनीआप्पांना जीवे मारण्याची धमकीही दिली; परंतु अशा धमक्यांना भीक न घालता आप्पांची रायगडावरी सुरूच आहे. आप्पांच्या अशा प्रकारच्या स्वाभिमानी घटनांची खरे तर एक मोठी जंत्रीच होईल स्वाभिमानी मराठ्यांचे उसळते रक्त पाहायचे असेल तर ते आप्पांच्या ठायीठायी बसले आहे.
आप्पांचा जन्म कोकणात गरीब कुटुंबात झाला असला आणि उदरनिर्वाहासाठी त्यांनी कोहिनुर मिलमध्ये काम केले असले तरी त्यांचे व्यक्तिमत्व आणि स्वीकृत कार्य हे बौद्धिक ऋषिकार्य आहे असेच मी समजतो. मुळात त्यांच्या व्यक्तिमत्वाचा मागोवा घेणे वाटते तितके सोपे नाही. ज्ञानीपुरुषांना प्रसिद्धी मुळीसुद्धा हाव नसल्याने ते आपले जीवन चरित्र सांगण्याच्या अगर जोपासण्याच्या भानगडीत पडत नाहीत. एखाद्या ज्ञानी योग्याच्या जीवन चरित्राकडे सामान्य लौकिकदृष्टीने पाहून चालत नाही. ज्ञानी व्यक्तिमत्वाच्या, ज्ञानोत्तर सिद्ध स्वरूप अवस्थेतील लौकिक सदृश्य वर्तनात आणि ज्ञानसाक्षात्कार पूर्वलौकिक जीवनात पौर्वदेहिक संचिताचा, वंशपरंपरेतील ज्ञानमार्गी साधना परंपरेचा अनुबंध प्रकटलेला असतो. आप्पांच्या वर्तनातून तो दिसून येतो. आप्पांनी त्यांच्या आयुष्यात सातत्याने ज्ञान-कर्मनिष्ठ राहण्याचा दीर्घोद्योग केला. त्याचबरोबर कर्माला मग ते प्रापंचीक, व्यावहारिक असे कोणत्याही प्रकारचे असो, त्या कर्माला आप्पांनी शिवकार्याची आणि अध्यात्मशास्त्राची भक्कम बैठक प्राप्त करून दिली. एकादृष्टीने शिवकाळाचे चिंतन करणारे 'सिद्धऋषी' म्हणूनच त्यांचा अभ्यास केला पाहिजे.
आप्पा परब हे वास्तविक प्रसिद्धि-पराड.मुख व्यक्तिमत्त्व आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील शिवप्रेमींनी त्यांच्या कार्याची स्तुती केली. आप्पांनी वर्तमानपत्रातून लेखन केले नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या समग्र कारकिर्दीचा बारकाईने अभ्यास करीत सिद्धहस्त लेखणीने मराठी भाषेत ४० हून अधिक त्यांची ग्रंथसंपदा निर्माण केली आहे. आप्पांचा अभ्यास हा खरेतर एका मोठ्या ज्ञानशाखेचाच अभ्यास आहे. लिखित कागदपत्रे ही अधिक बोलकी व खात्रीशीर असतात. इतिहासाला कागदपत्रांच्या पुराव्यांसह वाटचाल करता येत नाही; परंतु अलिखित संदर्भसाधने अबोल असून त्यांचा अर्थ आपणाला शोधून काढावा लागतो.
आधुनिक युगात इतिहासाची पाने उलगडताना भूगोलाला विज्ञान आणि अध्यात्म यांची जोड देऊन त्यांची मांडणी करणे हे ऐतिहासिक साहित्यात आजपर्यंत घडले नाही. जो जो कागद वा नाणी हाताशी सापडले त्यावर बुद्धिनिष्ठ संशोधन करून काढलेले निष्कर्ष आप्पांनी वाचकांसमोर विविध पुस्तकांच्या माध्यमातून मांडले. त्यात मुख्यतः संशोधनात्मक भाषाशैली वापरावी लागली; पण ती सर्वसामान्यांना समजेल अशी सोप्या शब्दांत त्यांनी मांडली. आणि हे मांडताना नेहमीच सचोटी, विश्वास, सत्य कथन या बाबींना अग्रकम दिला. प्रसंग कितीही बाका असूदे त्यांनी फायदा तोट्याचा विचार न करता आपल्या विचारधारेला कधीही तिलांजली दिली नाही. आप्पांच्या वयाने ऐंशी पार केली आहे. तरीही आज आप्पांच्या व्यक्तित्वाकडे आणि कार्याकडे दृष्टीक्षेप टाकला तर शिवकार्याचा ध्यास घेतलेला हा योगी शरीराने थकलेला नाही, हे प्रतित होते. अभ्यासांती निष्कर्ष काढून आपल्या पद्धतीने मांडणी करीत त्यांचा लेखनयज्ञ पहाटेपासूनच सुरू होतो. अल्प किंमतींत छापून घेतलेली आपली ग्रंथसंपदा पदरमोड करून स्वतःच ती जनमानसात पोहोचविणारा साहित्यिक असे त्रिविध प्रकारचे त्यांचे व्यक्तिमत्त्व सहज डोळ्यात भरते. अशी व्यक्तिमत्त्व आधुनिक काळात दिसत नाहीत.
संतवृत्तीच्या विभूती मग ते कोणत्याही काळातील असोत, समाजासाठी ते आपले जीवन हेतुपूर्वक आणि हेतूपुरस्पर व्यतीत करतात. त्यांचे महत्व पटते पण त्यांच्या कार्याचे माहात्म्य समजत नाही असा काहीसा विचित्र प्रकार आजच्या धारणेत निर्माण झाला आहे. अतिरेकी अभिनिवेश, अनाठायी अहंकार, अनावश्यक वाचाळता यामुळे आजचे विचारविश्व पार झाकोळून गेले आहे. अशावेळी वैभवी गतकाळाचा किंबहुना आपल्या पुर्वासुरींच्या इतिहासाच्या चिंतनाची, मननाची आवश्यकता असतेच असते.
सह्याद्रीच्या कडेकोपऱ्यात तरुण पिढीला कोणतेही मानधन न घेता इतिहास शिकविणारा आप्पा परब हा कर्मयोगी या साऱ्या सव्यापसव्यात मात्र उपेक्षित आहे. स्वाभिमानी आप्पांना हे अशा प्रकारचे लेखन आवडणारही नाही. परंतु ही वस्तुस्थिती आहे. रुढार्थाने आप्पांच्या विषयी लिहिताना आजच्या स्वकेंद्रित होत चाललेल्या समाजापुढे एका आदर्श व्रतस्थ लेखकाचे, इतिहास संशोधकांचे कार्य ठेवावे असे मनोमन वाटत आहे. शासन आणि समाज या दोन्ही घटकांनी म्हणावी तशी त्यांची दखल घेतली नाही हे शल्य शिवप्रेमीच्या मनात आहे. आजच्या या तत्वे, चारित्र्य, सत्यनिष्ठ विचारधारा याबाबतीत फारसे फिकीर न बाळगण्याच्या युगात नेमक्या याच गोष्टी ज्यांनी आयुष्यभर तळ हातावरच्या फोडाप्रमाणे कसोशीने जपल्या अशा आप्पा परब यांना चतुरंग पुरस्कार मिळणे ही मोठी आशादायक बाब आहे. आप्पा प्रसिद्धीपासून दूर राहण्याचा आटोकाट प्रयत्न करतात, परंतु केवळ त्यांचे व्यक्तिमहात्म्य न वाढवता तत्व आणि सामाजिक कार्य यांचा मेळ त्यांनी साहित्यातून निरपेक्षपणे कसा घेतला याची दखल 'चतुरंगने' घेतली. ती ओळख जगाच्या कानाकोपऱ्यात सहज पोहोचविण्यासाठी विविध माध्यमांनी पुढाकार घ्यायला पाहिजे.
- रवींद्र मालुसरे
अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई
9323117704 chalval1949@gmail.com
(रवींद्र मालुसरे हे - नरवीर तानाजी–सूर्याजी मालुसरे यांचे कुलोत्पन्न, रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील उमरठ-साखर ही ऐत्याहासिक भूमी रवींद्र मालुसरे यांची जन्मभूमी )
शिवइतिहास, दुर्गअभ्यासक आप्पा परब
यांना चतुरंग सन्मान जीवन गौरव पुरस्कार
मुंबई (रवींद्र मालुसरे ) :
तीन दशकांची सांस्कृतिक परंपरा लाभलेला चतुरंगचा जीवनगौरव सन्मान पुरस्कार युद्ध इतिहास लेखक, किल्ले अभ्यासक, शिवइतिहास, नाणकशास्त्र अभ्यासक आणि गिरीभ्रमक बाळकृष्ण तथा आप्पा परब ( ८३ ) यांना जाहीर झाला आहे. रविवार, दि १८ डिसेंबर रोजी संध्याकाळी ४ वाजता डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष असून प्रमुख उद्घघाटक म्हणून प्रवीण दुधे उपस्थित राहणार आहेत. संपूर्ण आयुष्य बेडरपणे आणि साहसी वृत्तीने इतिहासाच्या अभ्यासात व इतिहास नोंदीत व्यतीत करणाऱ्या आप्पा परब यांची जीवनगाथा डॉ विनय सहस्त्रबुद्धे, सुधीर जोगळेकर, माधव जोशी, प्रसाद भिडे, विनायक परब यांच्याकडून ऐकता येणार आहे.
आप्पा परब हे वास्तविक प्रसिद्धि-पराड.मुख व्यक्तिमत्त्व आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील शिवप्रेमींनी त्यांच्या कार्याची स्तुती केली. आप्पांनी वर्तमान पत्रातून लेखन केले नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या समग्र कारकिर्दीचा बारकाईने अभ्यास करीत सिद्धहस्त लेखणीने मराठी भाषेत ४० हून अधिक स्वतःची ग्रंथसंपदा निर्माण केली आहे. आप्पांचा अभ्यास हा खरेतर एका मोठ्या ज्ञानशाखेचाच अभ्यास आहे. लिखित कागदपत्रे ही अधिक बोलकी व खात्रीशीर असतात. इतिहासाला कागदपत्रांच्या पुराव्यांसह वाटचाल करता येत नाही; परंतु अलिखित संदर्भसाधने अबोल असून त्यांचा अर्थ आपणाला शोधून काढावा लागतो. ज्यावेळी इतिहास बोलत नाही तेव्हा भूगोल बोलतो, ज्यावेळी भूगोलही बोलत नाही तेव्हा विज्ञान बोलते...
हे वाक्य प्रत्येक शिवप्रेमींच्या मनी बिंबवणारे निस्पृह दुर्गपंढरीचे वारकरी, दुर्गतपस्वी आप्पा परब यांना २०२२ चा चतुरंग पुरस्कार हा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्व महाराष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आप्पासाहेब परब यांच्या सिद्धहस्त लेखणीतून प्रकाशित झालेली पुस्तके
- किल्ले रायगड स्थळ दर्शन
- किल्ले राजगड स्थळ दर्शन
- किल्ले राजगड कथा पंचविसी
- किल्ले रायगड कथा पंचविसी
- श्रीशिवबावनी
- शिवरायांच्या अष्टराज्ञी
- किल्ले पन्हाळगड कथा दशमी
- शिवजन्म
- किल्ले विशाळगड कथा त्रयोदशी
- सिंधुदुर्ग
- विजयदुर्ग
- सिंहगड
- लोहगड
- दंडाराजपुरी दुर्ग
- पावनखिंडीची साक्ष
- रणपति शिवाजी महाराज
- हुजुरबाज
- छत्रपती शिवरायांचा आरमारी सुभेदार- मायाजी नाईक भाटकर
- किल्ले पन्हाळा औरंगहणाख्यान
- किल्ले रायगड प्रदक्षिणेच्या वाटेवर
- किल्ले राजगड प्रदक्षिणेच्या वाटेवर
- श्रीभवानी तरवार
- किल्ले राजगड बखर
- श्रीशिवदुर्ग ओवीबद्ध त्रिशतकावली
- किल्ले राजगड घटनावली
- घोडखिंडीची साक्ष
- रणपती शिवाजी महाराज
- हुजुरबाज
- छत्रपती शिवरायांचा आरमारी सुभेदार- मायाजी नाईक भाटकर
- किल्ले पन्हाळा औरंगहणाख्यान
- किल्ले रायगड प्रदक्षिणेच्या वाटेवर
- किल्ले राजगड प्रदक्षिणेच्या वाटेवर
- श्रीभवानी तरवार
- किल्ले राजगड बखर
- श्रीशिवदुर्ग ओवीबद्ध त्रिशतकावली
- किल्ले राजगड घटनावली
- घोडखिंडीची साक्ष
- रणपती शिवाजी महाराज
- सिन्धुदुर्ग
- विजयनगर साम्राज्यातील किल्ले
- किल्ले रायगड घटनावली - श्री शिवकाळ
- किल्ले रायगड घटनावली - श्री शंभुकाळ
- युद्धपती श्रीशिवराय युद्ध पंच अंग कोष
- पोर्तुगीज अहवालातील किल्ले भाग १
- पोर्तुगीज अहवालातील किल्ले भाग २
- शिवराजाभिषेक
- आगामी -
- निजामी अंमलातील किल्ले
- बहमनी
- आदिली
- मोंगल
- आदिली (शिवकाळ )
- कुतूबी
- रायगड नगरी
- ठाणे जिल्ह्यातील किल्ले
- युद्धपती शंभू महाराज
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा