स्वरसाधक भजजानंदी ह भ प हरिभाऊ रिंगे महाराज
स्वरसाधक भजजानंदी ह भ प हरिभाऊ
रिंगे महाराज
जेव्हा जेव्हा आपण पंडित
भीमसेन जोशींचा भटियार ऐकतो. पं. जसराजचा भैरव ऐकतो किंवा प्रभा अत्रेंचा कलावती
ऐकतो तेव्हा भारतीय संस्कृती जोपासणारी अभिजात संगीत कला आणि त्यातून
कलात्मक अविष्कार घडविणाऱ्या विविध घराण्यांचा हेवा वाटतोच, परंतु भजनसम्राट स्व. खाशाबा कोकाटे, मारुतीबुवा बागडे आणि गायनाचार्य ह भ प हरिभाऊ रिंगे
महाराज यांच्या संगीत भजन अथवा चक्रीभजनाच्या निमित्ताने कंठातून निघालेल्या
स्वरात आपल्याला साक्षात परमेश्वराची लीला दिसत असते. आपल्या सुरांमुळे गेल्या
४०-५० वर्षात यांनी मराठी माणसाचे जीवन समृद्ध केले. त्यामुळेच या
कलाकारांना कृतज्ञतेपोटी रसिकांनी भरभरून प्रेम दिले.
१९८० नंतर मुंबईतील गिरण्या आणि
कारखाने धडाधड बंद झाले. कष्टकरी मुंबईबाहेर फेकला गेला आणि त्याबरोबर गिरणगावातील
चाळीचाळीतून उमटणाऱ्या आणि मंदिरातील भजनांच्या सुरावटी मंदावल्या. अशा परिस्थितीत
स्वतः भजन, गायन करत असताना नवी भजनगायक
पिढी घडवण्याचे काम हरिभाऊ रिंगे महाराजांनी केले. सुशिक्षित तरुणांच्यामध्ये
भजनाची संस्कृती रुजविण्याचा ध्यास घेतला. मुंबईतील गिरण्या आणि कारखाने बंद
पडल्यानंतर कष्टकरी मुंबईकर एक तर उपनगरात फेकला गेला किंवा आपल्या गावाकडे परतला.
त्यामुळे मुंबईच्या चाळीचाळीत आणि छोट्या मोठ्या मंदिरातून ऐकू येणारे भजन, मंजुळ स्वर मंदावले. पूर्वी गिरणगावात बारश्यापासून
ते लग्नाच्या सत्यनारायणाच्या पुजेपर्यंत त्यापुढे एखाद्या मृत्यूनंतर
स्मशानापर्यंत ते उत्तरकार्याच्या दिवसापर्यंत भजन कीर्तन मोठ्या संख्येने होत
असे. त्याची जागा आता बेंजो डीजेच्या धांगडधिंगायने घेतली आहे. अशा परिस्थितीत
मुंबईची भजन संस्कृती जगविण्यासाठी जी थोडी मंडळी प्रयत्न करीत होती त्यात हरिभाऊ
महाराज रिंगे यांचे योगदान फार मोठे होते.
भक्ती संगीताची लोकप्रियता
शिष्ट समाजात हरिओम शरण, अनुप जलोटा, पं भीमसेन जोशी, सुरेश वाडकर,अजित कडकडे, अभिषेकीबुवा अशा अनेक मान्यवरांच्या कार्यक्रमातून वाढत असताना शिवरामबुवा
वरळीकर, फुलाजीबुवा नांगरे, महादेवबुवा दांडेकर, एकनाथबुवा हातिस्कर, केसरीनाथबुवा भाये, साटमबुवा, सावळारामबुवा शेजवळ, स्नेहल भाटकर, तुळशीरामबुवा दीक्षित, मारुतीबुवा बागडे, खाशाबा कोकाटे आणि हरिभाऊ रिंगे महाराज यांनी चक्रीभजनाचे आपले स्वतंत्र
अस्तित्व अधिकाधिक समृद्ध केले. चक्रीभजन आजही अबाधित राहिले याचे कारण वारकरी
संप्रदायाची परंपरा हा चक्रीभजनाचा पाय असल्याने व्यावसायिकिकरणाच्या आपत्तीतून ते
सुटले व आपला स्तर शाबूत राखला आहे. ‘गायकी’ पेक्षा ‘भावकी’ला म्हणजे सांप्रदायिक
श्रद्धेला चक्रीभजनात प्राधान्य असल्याने ते शेकडो वर्षे टिकून राहिले आहे.
गायनामध्ये प्रत्येक घराण्यांची
आपली अशी ठशीव वैशिट्ये असतात. शिस्तीच्या चौकटी असतात. त्यानुसार गायकीला ढंग
असतो. किराणा घराणे म्हणजे अतिशय सौंदर्यपूर्ण संथ आलापी. जयपूर घराणे म्हणजे
लयकारीशी लवचिक खेळ. ग्वाल्हेर म्हणजे जोरकस, भिंगरीसारख्या ताना अशी समीकरणे जाणकारांच्या घराणातही आखलेली असतात.
आयुष्यात भजनाशिवाय कोणताही विचार त्यांच्या डोक्यात आला नाही. 'दिनरजनी हाचि धंदा | गोविंदाचे पोवाडे || ही तुकाराम महाराजांची उक्ती हरिभाऊंच्या बाबतीत तंतोतंत लागू पडल्याचे दिसून येते. कुणाशीही बोलताना ते भजन याच विषयावर बोलतात. विचार करताना भजनाविषयीच करतात. 'बोलणेही नाही देवाविण काही' ही अनुभूती त्यांच्याशी चर्चा करताना येते. १९८५ नंतर भजन संस्कृती पुन्हा समृद्ध करण्यासाठी हरिभाऊंनी कठोर परिश्रम केले. त्यासाठी स्वतः तपश्चर्या केली. आज इतक्या उतार वयातही ते स्वतः पहाटे उठून रियाज करतात. आपला आवाज जपण्यासाठी अनेक तऱ्हेचे पथ्य पाळून मनोनिग्रहाचे दर्शन घडवितात. स्वतःची भजन गायकी समृद्ध करत असतानाच ही गायकी पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करण्याची त्यांची तळमळ पाहून मन अचंबित होते. आजही दररोज तीन-चार तास रियाज केल्यानंतर दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी अंबरनाथ, कल्याण, घाटकोपर, करीरोड येथे जाऊन विद्यार्थ्यांना भजनाचे धडे देतात. आपला विद्यार्थी भजन गायनात सर्वांगांनी समृद्ध झाला पाहिजे. यासाठी अहोरात्र मेहनत घेतात. रियाज करताना घोटून घेतात. म्हणूनच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांचे हजारो शिष्य आहेत. एखाद्या विद्यार्थ्यांचा आवाज गोड आणि सुराला धरून असेल त्याला संगीतातील समाज चांगली असेल तर त्याचे तोंड भरून कौतुक करीत सतत त्याला प्रोत्साहन देत असतात. तर एखाद्याची या क्षेत्रातील समज कमी असेल तर त्याला शिकविण्यासाठी स्वतः त्याच्यासोबत कष्ट घेतात. पुन्हा पुन्हा म्हणायला लावल्यानंतर त्याच्या गळ्यातून एखादी तान ज्यावेळी उमटते तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर सार्थकतेचे आनंदी भाव तरळताना दिसतात.
भजनानंदी हरिभाऊ रिंगे यांचा जन्म १९४२ मध्ये रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील लहुळसे या गावी झाला. प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर घरच्या गरिबीमुळे कुटुंबीयांची जबाबदारी शिरावर घेऊन वयाच्या १६ व्या वर्षी १९५८ साली मुंबईस येऊन सुरुवातीला क्राऊन मिलमध्ये व त्यानंतर कमला मिल मध्ये नोकरी केली. दुर्गम कड्याकपाऱ्यात वसलेल्या लहुळसे ग्रामस्थांच्या मुंबईतील बैठकीच्या खोलीत राहून १९५९ सालापासून तब्बल ३६ वर्षे भजनसम्राट वै. खाशाबाबुवा कोकाटे यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले. तर १९६२ साली अखिल महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे सेक्रेटरी वै सदगुरु ज्ञानेश्वर मोरे माऊली यांचे शिष्यत्व पत्करून वारकरी संप्रदायाची द्योतक तुळशीमाळ कंठी धारण केली. पुढे खाशाबांचे शिष्यत्व पत्करून आपला छंद जोपासला, वाढवला इतकेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर नावलौकिक मिळवला. पन्नास-शंभर वर्षांपूर्वी संगीत किंवा संगीताचे शिक्षण घेणे याला समाजजीवनात फारशी प्रतिष्ठा नव्हती. घरदार सोडल्याशिवाय गायन कला वश होणे शक्य नाही अशीही सर्वसामान्यांची समजूत होती. ही विद्या शिकून लोकप्रियता व धनलाभ होऊन संसाराचा गाडा चालेल याची खात्री नसायची. संगीताची विद्या मुक्तहस्ते देणारे गुरु मुळातच संख्येने कमी होते. त्यात विक्षिप्त आणि तऱ्हेवाईक अधिक. त्यांची वर्षानुवर्षे सेवा केली तरी पदरात काही पडेलच याची खात्री नसे. ग्रंथांची उपलब्धता आणि प्रवासाची साधने आजच्या तुलनेने कमी. अनुदान, शिष्यवृत्ती नाही, प्रोत्साहन नाही, दिलासा देणारी दाद नाही त्यामुळे कसलेही भविष्य नाही. अशा प्रतिकूलतेवर मात करून ज्यांनी ही संगीत विद्या तिच्या प्रेमापोटी व ध्यासापोटी आत्मसात करून जोपासली, पाळली, सांभाळली व पुढील पिढीच्या हवाली केली अश्यापैकी एक म्हणजे हरिभाऊ.
कलावंत हा मुळातच जन्माला यावा
लागतो. त्याला त्याच्या भाग्याचे पैलू पाडणारा गुरु भेटला की जन्मजात कलावंत त्या
क्षेत्रातील महान मानदंड होऊ शकतो. परंतु एखादा जन्मजात नसूनही त्या संगीत
विद्येसी सर्वस्व समर्पणाच्या भावनेने झोकून त्याने परिश्रमाची सीमा गाठली तर तोही
थोर विद्यावंत व कलावंत होऊ शकतो. हरिभाऊ आणि रामभाऊ या दोघांनी हे सिद्ध करून
दाखविले. संगीताचा अभ्यास हा खरा तर सात अधिक पाच अशा बारा स्वरांचा पायाभूत
अभ्यास आहे. ज्याच्या गळ्यावर हे बारा स्वर पूर्णार्थाने विराजमान झाले त्यालाच
त्यापुढची वाट अधिक सुकर होते. संगीताचा साधक हा प्राधान्याने स्वरसाधक'' असलाच पाहिजे. ही संगीताची पहिली मागणी आहे.
स्वरसाधना हीच या क्षेत्रातली पहिली मागणी असते आणि असायला हवी. आणि म्हणूनच
गायनाचार्य हरिभाऊसारख्या स्वरसाधकाची वेळोवेळी वारकरी समाजाने पूजा बांधली.
गेल्या ६० वर्षाचा वारकरी संप्रदायाच्या भजन क्षेत्रातील इतिहास लिहिताना
हरिभाऊंना डावलून चालणार नाही. इतके या क्षेत्रातील त्यांचे कर्तृत्व आणि योगदान
आहे. '
पोलादपूर तालुका हा खरं तर
वारकऱ्यांचा तालुका. वै हबाजीबाबा, वै. हनवतीबुवा, वै मारुतीबाबा मोरे, वै गणेशनाथ महाराज, वै ढवळेबाबा, वै नारायणदादा घाडगे, वै श्रीपततात्या,वै विठोबाअण्णा मालुसरे, वै मोरे माऊली अशी वारकरी सांप्रदायातली थोर परंपरा तालुक्याला लाभली, परंतु या क्षेत्रातील दुसरे अंग उणे होते. काही
वर्षानंतर पखवाज वादनात ख्यातनाम स्व रामदादा मेस्त्री आणि गायनात हरिभाऊ रिंगे
यांनी न्यूनता भरून काढली.हरिभाऊ कीर्तनात प्रमाण व चाली यांची बरसात करीत सोबतीला
रामभाऊ मेस्त्रींचा पखवाज असला की कीर्तनात क्षणभर स्तब्धता होत असे.
ह भ प हरिभाऊ रिंगे महाराज हे
नाव उच्चरताच एक निरागस, निर्मळ व निरहंकारी व्यक्तिमत्व नजरेसमोर उभे राहते. धोतर, सदरा त्यावर जॅकीट व डोक्यावर काळी टोपी असा त्यांचा
साधा सुद्धा पेहराव. आजही त्यामध्ये कोणताही बदल झाला नाही. त्यांच्या
व्यक्तिमत्वाचा प्रभाव असा आहे की, हजारो व्यक्ती त्यांच्या स्नेहबंधाच्या नात्याने त्यांच्याशी जोडल्या गेल्या
आहेत. संगीत भजन क्षेत्रातील एक ज्येष्ठ कलावंत म्हणून त्यांचा आजही पंढरपूर, आळंदी, रायगड जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर नावलौकिक आहे. आजही एखाद्या
कीर्तनात रिंगे महाराज चाल म्हणायला उभे राहातात तेव्हा त्यांच्या गायकीचा थाट
त्यांच्या या क्षेत्रातील ऐश्वर्याची साक्ष प्रत्येक तानेतून देतात. भजन ही वारकरी
पंथाची मुख्य उपासना आहे. पारमार्थिक जीवनातून भजन वजा केले तर जीवन उपासनाशून्य
होईल. वारकरी संतांनी आत्मोद्वाराकरिता भजन केले आणि लोकोद्वाराकरिता कीर्तन केले.
भजन हे प्रभूचे निवासस्थान, जेथे हरिदास हरिभजन करीत असतात तेथे त्याचा अखंड वास असतो. अशा हरिभजनाचा वसा
घेऊन त्याचा वारसा अनेकांना मुक्तपणे आयुष्यभर वाटणारे हरिभाऊ सावित्रीच्या
कुशीतील लहुळसे गावचे.
त्यांच्याकडून धडे घेतले अनेक
नामवंत भजन गायक आज महाराष्ट्रात आपल्या भजन गायकीचा ठसा उमटवीत आहेत. इतकेच नव्हे
तर कीर्तनकार म्हणून नावारूपाला आलेल्या अनेक मान्यवर प्रबोधनकारांनी
त्यांच्याकडून स्वरांचे ज्ञान घेतले आहे. एखाद्या कीर्तनकाराची विषय मांडण्याची
हातोटी चांगली असते. परंतु संगीत आणि स्वरांचे ज्ञान नसल्याने कीर्तनकारात
न्यूनगंड येण्याची शक्यता असते. अशा अनेकांना त्यांनी योग्य मार्गदर्शन केले. भजन
गायकी ही मनाला समाधान देणारी कला असून भगवंताच्या जवळ जाण्याचे ते एक साधन
आहे ते आत्मसात करताना खूप कष्ट करण्याची आवश्यकता असल्याचे हरिभाऊ सांगतात.
कोणतीही विद्या किंवा कला
वीर्यवती व्हावयाची म्हणजे ती केवळ निखळ श्रद्धेने आत्मसात करावी लागते. ज्या
गुरूकडून विद्या संपादन करावयाची त्याच्याविषयी त्या विद्यार्थ्यांच्या मनात
असीम श्रद्धा असावी लागते. शिवाय जी विद्या हस्तगत करायची असते तिच्याबद्दल
उत्कट प्रेम असावे लागते. 'स्वीकृत गुरु आणि संकल्पित विद्या' या दोघांवरही परम श्रद्धा असावी लागते. समर्थ रामदास स्वामी याबाबत म्हणतात-
संगीतात घराणी मानावीत की नाही, घराण्यांच्या शिस्तीच्या चौकटीनुसार मैफल करणारा प्रतिभावान असतो की नसतो. या प्रचलित वादाच्या पलीकडे जाऊन निरपेक्ष बुद्धीने मान्य करायला पाहिजे की हरिभाऊंनी अथक परिश्रम करून वारकरी संप्रदायात आपले योगदान सिद्ध केले आहे.
खरा गुरु शिष्याला परिपूर्णतेने घडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असतो. अर्थार्जनाची, नावलौकिकाची अपेक्षा न करता तो मडके साकारणाऱ्या कुंभारासारखे कष्ट घेतो. कुंभार जसा ओली माती मळून योग्य मिश्रण करून त्या मातीतून हळुवार हाताने सुबक मडके आकारास आणतो, तसाच खरा गुरुही शिष्यरूपी ओल्या मातीत सुविचारांचे-सद्गुणांचे सिंचन करून एक परिपूर्ण व्यक्तिमत्व घडविण्याचे कार्य करत असतो, हरिभाऊंकडे समाज याच दृष्टीकोनातून पाहत आला आहे.
रवींद्र मालुसरे
अध्यक्ष
मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा