Ticker

6/recent/ticker-posts

सेवाव्रत्ती रुग्णमित्र पद्मश्री डॉ. विजयकुमार डोंगरे

सेवाव्रत्ती रुग्णमित्र 

पद्मश्री डॉ. विजयकुमार डोंगरे

- निखिल रवींद्र मालुसरे

व्याधी, व्याधिग्रस्त मानव आणि सेवा हे तिन्ही शब्दप्रयोग फारसे लोकप्रिय नाहीत. फ्लॉरेन्स नाइटिंगेलसारखी एखादी नर्स उत्कृष्ट रुग्णसेवा करून अमर होऊ शकते, गांधीसारखा महात्मा महारोग्यांच्या सेवेत, किंवा दुसऱ्या महायुद्धात चीनमध्ये जाऊन तेथील वैद्यकीय मोहिमेत भाग घेऊन चार वर्षे रुग्णसेवा करणारे मराठमोळे "डॉ. द्वारकानाथ कोटणीस" धन्यता मानू शकतो

 प्रत्येकजण आयुष्यात कधी ना कधी आजारी पडतोच. रुग्णावस्था ही सर्व समस्यांना जड करून टाकणारी अवस्था आहे. मनुष्याला ही दिन आणि लाचार करून टाकते. सेवेची तीव्र आवश्यकता याच वेळी मनुष्याला अधिक भासते आणि सेवकाची प्रामाणिकता ही अशा वेळीच रुग्णसेवेतून कळायला लागते हेही तितकेच खरे आहे. पद्मश्री डॉ. विजयकुमार डोंगरे हे रुग्णसेवेच्या क्षेत्रातील एक आदरणीय व्यक्ती. दादरच्या बालमोहनमध्ये त्यांचे शालेय शिक्षण झाले. मुळात घरात सामाजिक विचारसरणी असल्यामुळे ती ओढ त्यांना निर्माण झाली. त्या काळात कुष्ठरोगाविषयी जनमानसात फारशी चांगली प्रतिक्रिया नव्हती. गावकुसाबाहेर असणाऱ्या या व्यक्तींसाठी त्यांनी कार्य करण्याचे ठरवले. या कामाला जोडून घेताना त्यांना डॉ. बाबा आमटे, आदिवासी पाड्यांवर काम करणारे शामराव व गोदुताई परुळेकर यांच्या कार्याचा आदर्श महत्त्वाचा वाटला. भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यापासून ते  न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्यापर्यंत अनेकांचे मार्गदर्शन त्यांना याकामी लाभले आहे. त्यासाठी त्यांनी पोद्दार महाविद्यालयातून डॉक्टर ही शैक्षणिक पदवी संपादन केली. खरंतर मिळालेल्या पदवीच्या बळावर खाजगी हॉस्पिटलमध्ये काम करून श्रीमंतीचे आणि ऐश्वर्याचे सुखी जीवन त्यांना जगता आले असते, परंतु महानगरपालिकेमध्ये खऱ्या अर्थाने सेवा रुजू व्हावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आरोग्य सेवा अर्थात रुग्णसेवा करीत असतांना खऱ्या अर्थाने माणुसकीची भाषा जो जाणतो तो खरा साधू असे म्हणायला हरकत नाही, त्यादृष्टीने त्यांनी मेडिकलचा अभ्यास करताना जीवनाचा अर्थ सापडेल अशी साधना शिकण्याचा प्रयत्न त्यांनी केला. कोणत्याही फळाची अपेक्षा न करता केलेली साधना आपलेही जीवन समृद्ध करते असे मानणारी फार मोजकीच मंडळी समाजात असतात. आरोग्य सेवा देणाऱ्यामध्ये माणुसकी नसली म्हणजे सार निरर्थक ठरते. डॉ डोंगरे यांचा हा जीवनप्रवास जगदीश पुळेकर यांनी लघुपटाद्वारे खूपच अभ्यासपूर्ण पद्धतीने सादर केला आहे. मुख्यतः डॉक्टरांच्या संपूर्ण आयुष्यातील चढ उतार अनुभवतांना रुग्णसेवा करतानाच समाजाचीही सेवा करण्याची त्यांची भावना इतरांसाठीही प्रेरणा देणारीच आहे असा संदेश हा लघुपट देतो. 

अलीकडे बायोपिक किंवा माहितीपट  मराठी हिंदीमध्ये चांगल्याप्रकारे निघत आहेत आणि प्रेक्षकसुद्धा त्यांचे स्वागत करीत आहेत. यापूर्वी चित्रपट म्हटला की तो ठराविक व्यक्तीवर आधारित येत असे. सामाजिक कार्यक्षेत्रात वा साहित्यात फक्त नावाचा उल्लेख झालेला आहे अशा आणि कर्तृत्व सिद्ध केलेले परंतु त्यांची समाजात फारशी नोंद झालेली नाही किंवा त्यांचा व्यापकतेने विचार व्हायला हवा तो तसा झालेला नाही. त्याचा आता होताना दिसतो आहे. त्या पाठीमागचे कर्तृत्व अधोरेखित करणारे अनेक चित्रपट अलीकडे येऊन गेलेले आहेत. यात जसा प्रज्ञावंताचा विचार झालेला आहे तसा एखादी घटना प्रकरण घडलेले आहे त्याचाही शोध घेतलेला यामागे दिसतो आहे. त्यानिमित्ताने त्यामागे असलेल्या व्यक्तीचे दर्शन हे रुपेरी पडद्यावर घडलेले आहे. हे जरी खरे असले तरी सर्वच निर्मात्यांना असा विचार करता येतो असे नाही. स्थानिक पातळीपासून ते जागतिक पातळीपर्यंत सर्व विषयांना स्पर्श करण्याची ताकद बाळगणारे लघुपट हे एक प्रभावी माध्यम आहे. एखादा विषय कमीतकमी वेळात कथाबीज, कथाविस्तार, शेवट प्रेक्षकांसमोर मांडण्याचे कसब ह्या लघुपटातून करता येते..परंतु तुम्हाला शाँर्टफिल्ममध्ये सीन व वेळ यांची मर्यादा असते. शाँर्टफिल्म एकप्रकारे डाँयलॉगबाजीवर चालत नाही. परिणामकारक दृश्य फार महत्वाचे असते. कँमेरा जेवढा बोलेल तेवढी तुमची शाँर्टफिल्म जबरदस्त. एका लुकमधुन दुसऱ्या मध्ये जाईपर्यंत कथा पुढे सरकली पाहिजे. लघुपटाच्या माध्यमातून अशा व्यक्तींना हेरून ते त्यांचे कार्य लोकांपर्यंत कसे पोहोचेल हे अनेक दिग्दर्शकांनी पाहिलेले आहे. त्याची दखल ही फक्त राज्य, राष्ट्रीय पातळीवर नाही तर जागतिक पातळीवर ही घेतली गेली आहे. त्यामुळेच व्यक्ती लघुपट किंवा माहितीपटाचे महत्व किंवा त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत राहिलेली आहे.

भारत सरकारने सुद्धा या कामी सातत्याने पुढाकार घेतलेला आहे. अशा कर्तुत्ववान व्यक्तीचे कार्य व्हिडिओच्या माध्यमातून बंदिस्त केलेले आहे. यासाठी 'फिल्म डिव्हिजन' सतत कार्यरत राहिलेली आहे. फिल्म डिव्हिजनमध्ये असलेले जगदीश पुळेकर हे नाव त्यापैकी एक आहे. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मधून डिग्री घेतल्यानंतर त्यांनी पूर्णपणे लघुपट, चित्रपट निर्मिती त्याचे दिग्दर्शन, संकल्पना, अॅनिमेशन या गोष्टीला प्राधान्य दिले, त्यासाठी फिल्म्स डिव्हिजन मध्ये सलग ३६ वर्ष त्यांनी योगदान दिलेले आहे. या निमित्ताने नव्वदहून अधिक कलाकृती त्यांच्या निगराणीतून पुढे आलेल्या आहेत संग्रही ठेवली गेलेली आहेत. या निमित्ताने अन्य विविध प्रांतात सुद्धा त्यांना अनेक गोष्टी हाताळता आहेत. सई परांजपे, सुबोध मुखर्जी अशा अनेक दिग्गजांबरोबर त्यांना काम करण्याचे भाग्य लाभलेले आहे. डॉ. डोंगरे यांच्यावरील 'सेवाव्रती' हा त्यांच्याच लेखन,दिग्दर्शन आणि निर्मितीत तयार केलेला लघुपट आहे. जो १४ जुलैला रवींद्र नाट्य मंदिर येथे निमंत्रित प्रेक्षकांना दाखवला गेला. अभिनेते, दिग्दर्शक सतीश पुळेकर हे त्यांचे बंधू आहेत. या लघुपटासाठी क्रिएटिव्ह हेड म्हणून त्यांचे अनमोल मार्गदर्शन लाभलेले आहे. यानिमित्ताने पद्मश्री अच्युत पालव, प्रफुल्ल कळके, डॉ. समीर भुरे, देबाजीत साकिया, किशोर चव्हाण, अजित नाईक, राजेश नादोणे, पराग सावंत, नंदलाल रेळे हे या लघुपटात सक्रिय आहेत.

डॉक्टरांचे सामाजिक भान

पद्मश्री डॉ. विजयकुमार डोंगरे यांना 'झाडपाल्याचे वैदू' म्हणून हिणवले गेले. वैद्यकीय कार्य फक्त मुंबई पुरती मर्यातीतून राहतात ते विविध भागात विखुरले जावे यासाठी त्यांनी भारतभर प्रवास केला. त्यासाठी अनेक प्रतिष्ठेच्या संस्थेवरती पदाधिकारी म्हणून राहिले. या क्षेत्रासाठी त्यांनी ३४ वर्ष योगदान दिले आहे. इथेच त्यांचे कार्य समर्पित राहिले नाही तर प्रत्यक्ष जीवनातही त्यांनी सामाजिक बांधिलकी जपलेली आहे. वैयक्तिक जीवनातही समाजाने नोंद घ्यावी अशा अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. सेवाग्राम गांधी मेमोरियल लेप्रेसी फाउंडेशन, व्हॉलेंटरी हेल्थ असोशियन यांच्यासाठी काम केलेले आहे. ब्रिटिश काळात कुष्ठरोगासाठी केलेले कायदे सुरू होते. त्यावर अभ्यास करून त्यातून मार्ग काढण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. कुष्ठरोगाच्या संदर्भात आजवर त्यांनी ६० पुस्तके लिहिली आहेत. महत्त्वाचे म्हणजे ज्यांना या रोगाची भीती आहे त्यांना ती मोफत दिली जातात. त्यांचे हे योगदान लक्षात घेऊन भारत सरकारने त्यांना २०२२ मध्ये पद्मश्री या नागरी पुरस्काराने सन्मानित केले आहे. हा त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास या लघुपटाच्या माध्यमातून जगदीश पुळेकर यांनी मांडलेला आहे. 

रुग्णसेवा करीत असतांना रुग्णसेवा देणाऱ्यांनी स्वतःला भाग्यवानच समजावे कारण आपल्या हातून समाजातील अपंग, दीन, दलित, शोषितांची सेवा होत असते अशी त्यांची भावना वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी बोलून दाखवली. आज ज्याच्या पुढे आदरयुक्त भावनेने नतमस्तक व्हावे अशी माणसे समाजात दुर्मिळ झाली आहेत पदमश्री डॉ. विजयकुमार डोंगरे हे त्यापैकी एक. 


- निखिल रवींद्र मालुसरे

संपर्क : ८८५०९०३४३५ 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या