ह भ प लक्ष्मणमहाराज खेडेकरांचे तीर्थाटन : आध्यात्मिक साधनेचा ऊर्जास्तोत्र
ह भ प लक्ष्मणमहाराज खेडेकरांचे तीर्थाटन
: आध्यात्मिक साधनेचा ऊर्जास्तोत्र
महर्षी नारदांनी तीर्थाबद्दल आपल्या भक्तिसूत्रात असे म्हटले आहे की,
तीर्थी कुर्वन्ति तीर्थानि, सुकर्मी कुर्वन्ति कर्माणि सच्छात्री कुर्वन्ति शास्त्राणि ।। ना. भ. सू. ६९ ॥
असे (अष्टसात्त्विक भावाने युक्त असणारे भक्त) तीर्थांना सुतीर्थ बनवितात, (विहित) कर्मानाही सुकर्म दशेला आणतात आणि शास्त्रांना सच्छास्त्र स्वरूप करून देतात.
मनुष्याला
संचित पापापासून मुक्त करून त्याला पावन करण्याचे सामर्थ्य हे तीर्थात, तीर्थक्षेत्रात
असते. भारतात अनेक तीर्थक्षेत्रे आहेत. प्रत्येकाला एक इतिहास आहे. मनुष्याने जीवनात
धार्मिक कृत्ये करावीत. तथापि, तीर्थयात्रेच्या निमित्ताने मनुष्यजीवनात निसर्गसान्निध्यात
काही काळ घालवावा. तेथील देव- देवतांमुळे जन्म व दिव्य कर्मानी ही भूमी पुनीत झालेली
असते तसेच; ऋषिमंडळी, संत, भक्त यांच्याही तप साधनेने ही भूमी पुनीत होत असल्यामुळे
तेथे जाऊन आपले जीवन पुनीत करावे. यासाठी संत तुकाराममहाराज म्हणतात,
जव हे सकळ सिद्ध आहे । हात चालावया पाय ।। तव तू आपुले स्वहित । तीर्थयात्रे जाय चुको नको ॥
हिंदू
धर्मात मानवी जीवनालाच एक पवित्र तीर्थयात्रा मानले आहे. यात्रा सु-फल- संपूर्ण व्हावी
म्हणूनच वाटेत अनेक तीर्थक्षेत्रे व मंदिरे आहेत. या स्थळी प्रत्यक्ष देवांचा निवास
असतो. म्हणून पवित्र क्षेत्री मंदिरे उभारली जातात.
तीर्थयात्रेचा हेतू परमार्थ साधना व मनाची शुद्धी असा आहे. विशेषतः शरीर, वाणी व मन पवित्र होण्याकरिता तीर्थयात्रा अवश्य आहे. तीर्थयात्रेच्या ठिकाणी आध्यात्मिक वातावरण मुळात अस्तित्त्वात असते. त्याचा भक्तांवर प्रभाव पडतो. तीर्थयात्रेद्वारे तप, त्याग, दान, तितिक्षा, पूजा, स्मरण आदी अनेक प्रकारे लाभ होतो. तीर्थयात्रा करमणूक, सहल, मनोरंजन व विश्रांतीसाठी नाही. आपल्या विशाल भारताच्या सर्व प्रांतात अनेक पवित्र तीर्थक्षेत्रे विखुरली गेली आहेत. अशा तीर्थक्षेत्रांच्या यात्रा कराव्यात, अशी पूर्वजांपासून चालत आलेली आपली परंपरा आहे. ज्या तीर्थक्षेत्राची यात्रा केल्याने आपल्या पापांची निष्कृती होते, तेच खरे तीर्थक्षेत्र होय.
स्कंदपुराणात
म्हटले आहे, 'यात्रा शब्दाचा अर्थच मुळी "या व तर" म्हणजे "आमच्यात
या व भवसागर तरुन जा" असा आहे. यात्रा करण्याने धार्मिक संकेताचे पालन होऊन आपला
देशही पाहून होतो. देशाच्या विविधतेतील एकतेचे दर्शन घडते. तेथील धार्मिक वातावरणाने,
पौराणिक घटनांच्या स्मरणाने, आख्यायिका, कथा इत्यादी गोष्टीने मनातील सात्त्विक वृत्ती
जागृत होतात. श्रद्धा, ईश्वरनिष्ठा दृढ होतात. निराश मनाला श्रद्धा निष्ठेचा प्रकाश
दाखविण्याचे कार्य तीर्थयात्रा करतात.
श्रीएकनाथ
महाराजही आपणास हेच सांगतात,
शुद्ध व्हावया अंतःकरण। करावे गा तीर्थीगमन ।तीर्थयात्री श्रद्धा गहन । तीर्थाटन या नांव ।।
पोलादपूरसह अनेक ठिकाणच्या हजारो भाविक भक्तांना उत्तर - दक्षिण भारतभरातील अनेक तीर्थ यात्रांची १९९९ पासून सहल घडविणारे, सत्संगाच्या पदपथावर वाटचाल करून पुन्हा सुखरूप आणणाऱ्या दोन पारमार्थिक अवलिया बंधूनी पोलादपूरच्या वारकरी सांप्रदायाच्या इतिहासात कायमची नोंद होईल अशी कामगिरी केली आहे. त्यांना प्रथम साक्षात दंडवत!
पोलादपूर
तालुक्यातील कीर्तनकार, समाजसेवक आणि पोलादपूर तालुक्याचे माजी उपसभापती ह भ प लक्ष्मणबुवा
खेडेकर हे गेली १३ वर्षे पोलादपूर, महाड, मुंबई, ठाणे, सातारा, सोलापूर, बडोदे येथील
भावी भक्तगणांना सोबत घेऊन उत्तर भारतात जात असतात. यावर्षी श्री देवभूमी
द्वारका दुसरे धाम या ठिकाणी १३ तपपूर्ती सोहळ्या निमित्त धार्मिक यात्रा २८ डिसेंबर ते ४ जानेवारी
२०२५ जात आहे. या दरम्यान या यात्रेत श्रीमद भागवत कथा व श्रीकृष्णलीला भव्य सत्संग
सोहळा साजरा करण्यात येत आहे.
स्व.
कोंडीराम खेडेकर आणि लक्ष्मण महाराज खेडेकर दोघेही बंधू मुंबईत एल्फिस्टनला एक स्वतःचे
दुकान चालवून आपला चरितार्थ करीत असत. चाळीचा कोंड या आपल्या मातृभूमीत होणारे कोणतेही
सामाजिक काम असो, धार्मिक उत्सव साजरे करण्याचे असो सर्व कामात ते हिरीरीने पुढे असत.
आपल्या मातृभूमीत परतल्यानंर मुळात भगवतभक्त असलेल्या दोघांनी पोलादपूर तालुक्यातील
अनेक वारकऱ्यांसह भाविक भक्तांना सोबत घेऊन परमार्थ अधिक मोठा करण्यासाठी आणि तो तळागाळात
रुजविण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविले. त्यांना माहित होते की, या भूमीत जन्मलेल्या
आणि वारकरी संप्रदायातील गुरुपद भूषविलेल्या अनेक पूर्वसुरींनी प्रत्येक गावात वाडीवस्त्यांवर
परमार्थाचे बीज खोलवर रुजविले आहे, त्यामुळे मशागत झालेल्या या भूमीत आपण प्रयत्न केला
तर चांगल्या कामाला नक्कीच चांगला प्रतिसाद मिळेल....आणि तो अनुभव त्यांना वर्षानुवर्षे अधिकाधिक
भाविक भक्तांची संख्येची वाढ होत गेली तसा आला. त्याचबरोबर त्यांना सहकार्य करण्यासाठी तन मन
धन अर्पण करून अनेक कार्यकर्ते आणि दानशूर व्यक्ती परमेश्वर कृपेने पुढे येत गेल्या.लक्ष्मणबुवा
खेडेकर यांचे बंधू ह भ प स्व. कोंडीरामबुवा खेडेकर यांनी १९९९ साली या धार्मिक यात्रेची
पायाभरणी केली. त्यांनी सुरुवात केली तेव्हा गावागावात आणि घराघरात जाऊन त्यांनी समाजबांधवांना
या यात्रेचे धार्मिक महत्व पटवून सांगितले आणि यात्रेला चलण्यासाठी विनंती केली. हळूहळू
त्यांना उत्तम प्रतिसाद मिळू लागला. त्यांचे बंधू लक्ष्मणबुवा खेडेकर हे राजकारणात
सक्रिय होते. पोलादपूर तालुक्याचे उपसभापती म्हणून पायउतार झाल्यानंतर २००६ मध्ये त्यांनी
यात्रेला जाण्याचे ठरवले. त्या यात्रेत त्यांना परमार्थाची आगळी वेगळी अनुभूती आली.
सोबत असणारी भाविक मंडळी अत्यानंद अनुभवत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी
आपल्या मोठया बंधूना याकामी तन मन धन अर्पण करून सहाय्य करण्याचा निर्णय घेतला.
चारधाम
यात्रेचे आधारस्तंभ या नात्याने अनेक वर्षे ह भ प भाऊ शितकर, तर यात्रा संयोजक म्हणून
ज्ञानेश्वर बाबू खेडेकर काम पाहतात. आणि सचिन कोंडीराम खेडेकर, संतोषदादा महादेव मालुसरे,
दिलीपदादा दाभेकर, पांडुरंगमाहाराज शिंदे, सागर ज्ञानेश्वर खेडेकर, मंगेश शिवराम खेडेकर
या प्रमुखांचे कार्यक्रमात विशेष सहकार्य असते. यावर्षी ह भ प गणपत महाराज जाधव, ह भ
प काका जगताप, ह भ प शिंदे महाराज हे एकनाथी भागवत कथाकार व्यासपीठ सूचक असणार आहेत.
तर सर्वश्री ह भ प संतोष महाराज शेलार (प्रवचन), संतोष महाराज तांदळेकर (कीर्तन), काका
महाराज जगताप (प्रवचन), गणपत महाराज जाधव (कीर्तन), लक्ष्मण महाराज खेडेकर (कीर्तन), राम
महाराज कळंबे (प्रवचन आणि काल्याचे कीर्तन) यांची या दरम्यान पारमार्थिक सेवा
होणार आहे.
ह
भ प लक्ष्मण महाराज खेडेकर यांनी २०११ ला या यात्रेची सुरुवात केली. या कार्याचा शुभारंभ
करताना त्यांनी कोणत्याही पारमार्थिक व्यक्तीचा आशीर्वाद घेतला नाही तर ज्या भूमीत
छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावान मावळे ज्यांनी आपल्या देहाच्या रक्ताचे थारोळे
केले त्या नरव्याघ्र सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या उमरठ येथील पुतळ्याचे
आणि समाधीचे मनोभावे दर्शन घेतले, त्याठिकाणची पवित्र माती आपल्या मस्तकी लावली आणि
आशीर्वाद घेत मनोभावे संकल्प सोडला.
पहिल्या
वर्षी द्वारका यात्रेत ३५० भाविक तिथे शिवलीला अमृत, त्याच्यापुढच्या वर्षी अनुक्रमे
२६५(द्वारका),६५५(वृंदावन),१४८६,४५०(द्वारका), ३५० (वृंदावन) असे भाविकजन यात्रा करून
आले आहेत. सुरुवातीला पोलादपूर तालुक्यातील सर्व संप्रदायाचे गुरुवर्य सर्वश्री ह भ
प रामदादा महाराज घाडगे, गुरुवर्य आनंददादा महाराज मोरे, गुरुवर्य हरिश्चंद्र महाराज
मोरे, गुरुवर्य लक्ष्मण महाराज मालुसरे, मुरलीधर ढवळे गुरुजी यांना या धार्मिक क्षेत्री
पारमार्थिक सेवा देण्यासाठी घेऊन गेले. ४ थ्या वर्षी हरिद्वार दाखवा असा भाविकांचा
आग्रह आल्यानंतर तिथे श्री ज्ञानेश्वरीच्या १२ व्या अध्यायाचे पारायण केले. जगन्नाथपुरी
यात्रेत ३ दिवस १८ व्या अध्यायाचे पारायण, तर रामेश्वरधाम येथे शिवलीलामृत ग्रंथाचे
पारायण केले. अयोध्येत नवीन मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना झाल्यानंतर
गेल्या वर्षी अयोध्या येथे ९ व्या आणि १२ व्या ज्ञानेश्वरी अध्यायाचे पारायण केले.
बडोदे
मांजलपूर येथील वाकण गावची साने मंडळींनी पहिल्यापासून उत्तम सेवासाधना दिली आहे.त्यांनी देवकार्यासाठी ग्रंथराज श्री
ज्ञानेश्वरी प्रति दान करीत अन्नदान पंगतीही दिल्या. पंढरी केसरकर, संतोष मालुसरे,
मिलिंद मालुसरे हे सुद्धा श्री ज्ञानेश्वरी प्रतीसंह आर्थिक योगदान देत आले आहेत.
श्री काशीक्षेत्री शिवपुराणतील ओवी वाचत असताना लक्ष्मण महाराजांना दृष्ठान्त झाला की, खेडेकर महाराज परमार्थाची वाटचाल अशीच सुरु ठेवा. मागे फिरून पाहू नका. त्यानंतर अनेकांनी माझ्या या पारमार्थिक कामावर टीका केली. १३ वर्षांत वाईट चिंतन करणारे त्यांना काहीजण भेटले. परंतु या कार्याचे चांगले मूल्यमापन करणारे त्यांच्यापेक्षा शंभरपट भेटले. त्यामुळे मन केव्हाही नाउमेद झाले नाही. उलट अनेकांनी सहकार्याची भूमिका घेतल्याने उमेद वाढत गेली.
आजपर्यंतच्या १२ वर्षात दक्षिण भारतातील - श्री क्षेत्र जगन्नाथ पुरी, पंढरपूर, तुळजापूर, गाणगापूर, श्रीशैल्यम, महानदी, शिवकांची, विष्णुकांची, विष्णुपुरम, रामेश्वर, दक्षिण भारत गोकर्ण, महाबलीपूरम, कन्याकुमारी, कोल्हापूर,आळंदी, महाकालेश्वर, गिरनार, प्रयाग, काशी अयोध्या, उज्जैन तर उत्तर भारतातील नर्मदा, चांदोर, पावागड , डाकोर, छोटीला माता, संगरपूर,गिरनार, सोमनाथ, वेरावळ, भालूकातीर्थ, सुदामपुरी, बेट द्वारका, नागेश्वर, गोपी तलाव, आणि नंतर द्वारका अशा तीर्थक्षेत्रांचा अनमोल लाभ यात्रेकरू भाविक भक्तांना प्राप्त करून दिला आहे.
हजारो
किलोमीटरच्या प्रवासासाठी सातारच्या मेढा खोऱ्यातील १३ वाहने त्यांच्या सोबत
सुखकारक प्रवासासाठी असतात. एका वर्षी जगन्नाथ पुरी येथे जात असताना २००० किमी गाडीने
प्रवास केला.मंदिराचा कळस दिसत होता इतक्यात एका गाडीला दुर्घटना घडली, गाडीची
वायरिंग जळली आणि स्फोट झाला परंतु प्रसंगावधान आणि ईश्वरकृपेनें सर्वजण सुखरूप बाहेर
पडले. गाडी पूर्ण जळून गेली परंतु कोणतीही जीवित हानी झाली नाही.
आपला भारत देश हा तीर्थक्षेत्रांचा देश आहे.अनेक तीर्थक्षेत्रे,त्यांचा इतिहास, त्यामागील कथा, भावना, त्यांचे पुराण,वेदकाळापासूनचे महत्व वगैरे गोष्टींनी आपले सांस्कृतिक वाङ्मय भरलेले आणि भारलेले आहे. त्यामुऴे तीर्थयात्रा करणे हा आपला छंद झाला आहे. जोपर्यंत शरीरामध्ये ताकद आहे तोपर्यंत तीर्थाटन केले पाहिजे.आपणासही तसे वाटते.त्यामुऴे पारमार्थिक लाभ होतो आणि व्यावहारिक शहाणपणाही प्राप्त होतो. श्रीसमर्थ रामदास स्वामींनी ' केल्याने देशाटन ' म्हणवून ठेवले आहे.
तीर्थाटनाचा, यात्रेचा
मोठा लाभ म्हणजे अंत:करणशुद्धी आहे. पण सर्वांनाच श्रीतुकाराम महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे
तीर्थयात्रा करणे शक्य होत नाही. काही प्रापंचिक अडचणी येतात. त्यांच्यासाठी श्रीज्ञानदेवांनी
सुंदर सोय करून ठेवली आहे. ज्यांना जाणे शक्य नाही त्यांनी आपल्या मातापित्यांचीच सेवा
करावी.त्याने त्याला तो परमात्मा प्राप्त होतो.
सकल तीर्थाचिये धुरे । जिये का मातापितरे ।।तया सेवेशी कीर शरीरे । लोण कीजे ।।
या
बाबतीत पुंडलीकाचे उदाहरण प्रसिद्ध आहे. वृद्धाश्रमाच्या काऴात याची खरी गरज आहे.त्या
सेवेचा इतका मोठा परिणाम होतो,की तो सेवक स्वत: तीर्थरूप होतो, संत होतो. त्यांचे वर्णन संत श्रीज्ञानेश्वर महाराज करतात,
जयाचे नाव तीर्थ रावो । दर्शने प्रशस्तीशी ठावॊ ।।जयाचेनि संगे ब्रम्होभावो । भ्रांतासी ।।
रवींद्र मालुसरे
अध्यक्ष,मराठी
वृत्तपत्र लेखक
संघ मुंबई
९३२३११७७०४
या ब्लॉगवरील इतरही विषय वाचण्यासाठी अनुक्रमणिका वाचा ...प्रतिक्रिया द्या लिंक इतरांना पाठवा
ग्रामपंचायत कार्यालयात मिळणारे खालील दाखले 'आपले सरकार' पोर्टलवर ऑनलाईन उपलब्ध आहेत.
1. BPL
2. निराधार
3. जन्म नोंद
4. ग्रामपंचायत येणे बाकी
5. नमुना 8 अ उतारा
6. मृत्यू नोंद
7. विवाह नोंदऑनलाईन दाखले
वेळेत न मिळाल्यास त्यावर वरीष्ठ अधिकाऱ्याकडे अपील करण्याची सुविधाही ऑनलाईन उपलब्ध आहे.निर्धारीत वेळेत आणि शुल्कात सेवा मिळणे तुमचा हक्क आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा