भगीरथ प्रयत्नाने पोलादपूर तालुक्याच्या विकासाचा ध्यास घ्या - डॉ प्रसाद देवधर
भगीरथ प्रयत्नाने पोलादपूर तालुक्याच्या विकासाचा ध्यास घ्या - डॉ प्रसाद देवधर
गावांतील समस्या कोणतातरी एक प्रश्न सोडवून संपत नाहीत. कारण त्यांचे मूळ कारण दुस-याच समस्येत लपलेले असते. समस्यांची एकमेकात असलेली गुंफण ज्याला लक्षात आली, त्याला ग्रामविकासाची नाडी कळली असे म्हणता येईल. असे उदगार भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर यांनी मुंबईत घाटकोपर येथे काढले. पोलादपूर तालुक्यातील यशस्वी शेतकरी श्री रामचंद्रशेठ कदम यांना नुकताच महाराष्ट्र शासनाने उद्यान पंडित पुरस्कार प्रदान केला त्याप्रित्यर्थ त्यांचा भव्य सत्कार कांगोरीगड विभाग सर्वांगीण विकास मंडळाच्या वतीने डॉ देवधर यांच्या हस्ते आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष पवार होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे, उद्योजक संजय उतेकर, पांडुरंग साळेकर, कृष्णा पां उतेकर, तुकाराम मोरे, रामशेठ साळवी, कृष्णा कदम, सचिन उतेकर, लक्ष्मण वाडकर, सुरेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग दाभेकर यांनी केले.
गावातली घरेदारे
ओस आणि शेतीवाडी ओसाड सोडून मुंबईत अल्प पगारात मोलमजुरी करणाऱ्या तालुक्यातील
तरुणांना योग्य मार्गदर्शन व्हावे यासाठी डॉ देवधर यांचे 'कोकणातील ग्रामीण विकासाचे सुत्र' या विषयावर याप्रसंगी व्याख्यान आयोजित केले
होते. निमंत्रित वक्ते म्हणून या विषयावर बोलताना ते पुढे असेही म्हणाले की,
“धावणाऱ्या पाण्याला
चालायला लावा, चालणा-या
पाण्याला थांबायला लावा, थांबलेल्या पाण्याला मुरायला लावा". कोकणात चांगला पाऊस पडूनही
फेब्रुवारीच्या नंतर पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. पाऊस भरपूर पडला तरीही समुद्र जवळ
असल्याने वेगाने समुद्रास मिळते. यासाठी तुमच्या पंचक्रोशीत हे जलसूत्र अवलंबलेत
तर बऱ्याच अंशी पाण्याचा प्रश्न सुटेल. हे पाणी जमिनीत मुरायला वनसंपदा मदत करते.
झाडांची मुळे जमीनीची पाणी धारण करण्याची क्षमता वाढवतात आणि पाण्यालाही रोखतात.
मग तसे का होत नाही? उत्तर शोधताना
माझ्या लक्षात आले की काही वर्षांत झाडेही कमी झाली आहेत. जवळपासची अरण्ये ओस पडत
आहेत. अचानक वणवे लागत आहेत. खेड्यातील घरांमध्ये चुलींवर जेवण रांधण्याची पध्दत.
त्यासाठी जळणाचा साठा करावा लागतो. ही लाकडे येणार कुठून? दरवर्षी कुठून मिळणार सुकी लाकडे? मग लावा वणवे…पेटवा झाडे. झाड तोडायला बंदी आहे,
पण सुकलेलं झाड तोडायला
नाही. अशा पध्दतीने कळत नकळत मोठ्या प्रमाणात झालेल्या वृक्षतोडीमुळे जमिनीची पाणी
धारण क्षमता कमी झाली. विहीरी लवकर तळ गाठू लागल्या. शेतीला पाणी पुरेनासं झालं.
यासाठी ‘जल है तो कल है’ हा जागतिक विचार समोर ठेवून शेततळी बांधा, ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही चळवळ तुमच्या ग्रामिण भागात उभी
करा.
डॉ देवधर यांनी
आपल्या भाषणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गावात केलेले ग्रामविकासाचे, जलसंवर्धनाचे प्रयोग, त्यामागची भूमिका, आलेले अनुभव, बायोगॅस, कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्धव्यवसाय, परसदारातली हळद, सुरण लागवड, पूरक शेतीचे आर्थिक गणित त्यातून कुटुंबाला
येणारी सुबत्ता, उपलब्ध बाजारपेठ
याबाबत देवधर यांनी सविस्तर माहिती दिली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा