पोलादपूर तालुक्यातील ऐत्याहासिक दस्ताऐवज
पोलादपूर तालुक्यातील ऐत्याहासिक दस्ताऐवजाचा मागोवा .
आज राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजाभिषेक दिन, जग जिंकता येऊ शकते हा आत्मविश्वास या मातीला मिळाला, तो रुजला तो आजचा दिवस. पोलादपूर तालुक्यातील मावळे या शुभ कार्यात राजांच्या सोबत होते. सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे (उमरठ), सुभेदार सूर्याजी मालुसरे (साखर), नरवीर मुरारबाजी देशपांडे (किंजळोली), गोदाजी जगताप (सांदोशी) अशा अनेकांनी प्राणाची आहुती देत शिवरायांना मोलाची साथ दिली होती याची नोंद अनेक बखरकारांनी घेतली आहे. प्रतापगड ते रायगड या दरम्यानच्या भूभागाने शिवाजी राजांना स्थैर्य दिले. बारा मावळातील वतनदारांचे वर्तन स्वराज्याच्या कामी सहकार्याचे आणि भेदाभेद करणारे आहे हे स्वराज्याचे तोरण बांधताना लक्षात आल्यावर,महाराजांनी राजगड आणि पुणे परिसर सोडून घनदाट जावळीतील अरण्याचा आसरा घेतला नाही तर स्व-राज्य स्थापन करण्याचे मातोश्री जिजाऊंचे स्वप्न पूर्ण होणार नाही हे महाराज जाणून होते. इतिहासाचा धांडोळा घेत असताना मला एक प्रश्न निर्माण झाला होता, गेल्या शेदीडशे वर्षांत अनेकांनी पाहिलेली अन अनुभवलेली बलदंड आणि धिप्पाड शिवाय अचाट ताकदीची माणसे त्यातील काही तर दंतकथांचे नायक झाले. मग साडेतीनशे वर्षांपूर्वी शिवरायांच्या आणि मावळ्यांच्या घोड्यांच्या टापांणी आणि तलवारीच्या खणखणाटाने निनादलेला या भूभागाचा इतिहास कुठेतरी असणारच आणि तो कसा सापडेल ? अलीकडे काही महत्वाची कागदपत्रे आणि माहिती मिळाली. आजच्या राजाभिषेकदिनाच्या त्यानिमित्ताने हे विवेचन आपल्यासाठी -
बाळाजी आवाजी चिटणिसांचे घराणे म्हणजे चित्रे घराणे. (अधिक तपशील याच ब्लॉगवर दुसऱ्या पूर्वीच्या लेखात वाचा) या इतिहासकालीन घराण्याचा सेवा व लौकिक गेले साडेतीन शतके प्रसिद्ध आहेच. चित्रे घराणे देवळे, विन्हेरे, कोंढवी, पोलादपूर, देवास इत्यादी ठिकाणी नांदत होते. कालपरत्वे या घराण्यातील काही पुरुषांची आडनांवेही बदलली आहेत. मध्यप्रदेशातील देवासचे चित्रे आपणास देवळेकर म्हणवितात. देशपांडेपणाचे वतन चालविणारे काही चित्रे मंडळी देशपांडे झाली आहेत. काहीजण आपणास कोंढवीकर म्हणवितात. पोलादपूर तालुक्यातील देवळे गावातील 'रावजी गोविंद चित्रे' यांच्या दप्तरात अनेक ऐत्याहासिक कागदपत्रे, सनदा ज्येष्ठ इतिहास संशोधक शांताराम गोवळसकर यांना सापडली होती. परंतु आता ती कुठे आहेत हे चित्रे मंडळींना माहित होत नव्हते. त्याचाच मागोवा या लेखात घेऊया.
२५ एप्रिल ते ४ मे १८१८ दरम्यान रायगडला ब्रिटिशांच्या सैन्याचा वेढा पडल्याची बातमी कांगोरी, सावित्री खोऱ्यातील व प्रतापगड येथे पोहोचली तेव्हा या भागातील जे सातारा गादीशी म्हणजे छत्रपती प्रतापसिंहराजे शाहूराजे भोसले यांच्याशी एकनिष्ठ होते असे मावळ्यांच्या वंशजांचे मराठा सैन्य रायगडच्या मदतीसाठी शस्त्रास्त्रे घेऊन धावले. पोटल्याच्या डोंगराकडून कर्नल प्रॉथर आपला मोर्चा रायगडवर लागू करणार होता; त्याच्या पिछाडीस मराठी सैन्य येऊन उतरले. पण महाड येथे संरक्षणार्थ ठेवलेल्या लेफ्टनंट क्रॉस्बी यांच्या तुकडीने या सैन्याचा समाचार घेतला; त्यामुळे मराठ्यांची मदत रायगडास पोहोचणे अशक्य झाले. लेफ्टनंट क्रॉस्बी याने या परतलेल्या सैन्याबरोबर पोलादपूर येथे लढाई पुकारत सैन्याचा सामना केला. कमी संख्येने असलेल्या मराठा सैन्याने झुंज दिली पण हिंदुस्थानी सैन्यच सोबत घेऊन लढणाऱ्या क्रॉसब्रीने त्याचा बीमोड केला व रायगडच्या वेढ्याबाबतचा धोका पूर्ण नाहीसा करून टाकला, दुसऱ्याच दिवशी रायगडावरचा भगवा ध्वज उतरला गेला आणि ब्रिटिशांचा युनियन जॅक फडकला. त्यानंतर रायगडाच्या परिसरापुरते बोलायचे झाले तर ब्रिटिश राजवट सुरु झाल्यानंतर १८१८ पासून १८५७ पर्यंत संपूर्ण क्षात्रतेज देशभर झाकोळले गेले होते. गडकिल्ले ओस पडले आणि ज्या ताकदवान मनगटानी समशेरी पेलल्या होत्या त्यांनी आपल्या समशेरी घराच्या आड्याला खोचुन ठेवल्या तर काहींनी त्याचे नांगराचे फाळ बनवून पोटापाण्यासाठी शेतीवाडी करू लागले. मात्र नंतर १८६५ च्या सुमारास ज्योतीबा फुले रायगडावर गेले होते, पडझड झालेला किल्ला, घनदाट अरण्य आणि सर्वत्र वाढलेले गवत यातून शिवरायांची समाधी त्यांनी हुडकून काढली, आणि तेथे स्फूर्ती घेऊन शिवाजी महाराजांवर त्यांनी एक मोठा पोवाडा केला. तो पुढे १८६९ मध्ये प्रसिद्ध केला. नंतरच्या काळात १८८५ च्या सुमारास गोविंद आबाजी वसईकर जोशी हे महाडचे गृहस्थ रायगडावरील समाधीची अवस्था पाहून आले आणि त्यांनी सरकारचे आणि मराठी माणसाचे दुर्लक्ष होत आहे हा वाद निकराने लढवला, त्यांनी यावर एक सविस्तर पुस्तकही लिहिले. दरम्यान पुण्यात महादेव गोविंद रानडे आणि तेलंग यांनी सभा भरवून याबद्दल लोकजागृती केली. या सगळ्याच्या एकत्रित परिणामाने सरकारचे लक्ष या प्रकरणाकडे वेधले जाऊन शिवाजी महाराजांच्या समाधीच्या व्यवस्थेसाठी सरकारकडून पैसेही मंजूर करून घेतले गेले. टिळकांनी २ जुलै १८९५ साली 'शिवाजी महाराज यांच्या स्मारकाबद्दल सूचना' अशा शीर्षकाचा लेख केसरीत लिहिला. लोकांच्या सहभागातून शिवाजी महाराजांच्या समाधीचे काम होणे किती आवश्यक आहे हेच यातून पटवून दिले. या सगळ्याचा परिणाम असा झाला की शिवरायांच्या स्मारकासाठी एक विशेष समिती तयार झाली. अर्थात त्यात टिळकांचा समावेश होताच. समाधीच्या प्रश्नापासून ते पहिला-वहिला शिवजयंती उत्सव सुरु करेपर्यंत टिळकांनी स्वतः प्रत्येक बारीकसारीक गोष्टीत लक्ष घातले. हळूहळू वातावरण तापत चालले होते, शिवाजी महाराज हा विषय आणखी पुढे येईल या हेतूने टिळक प्रयत्नशील होते. महाराजांची समाधी रायगडावर असल्याने हा रायगड या निमित्ताने चर्चिला जाऊ लागला होता. मग शिवजन्मोत्सव रायगडावरच का साजरा होऊ नये ? टिळकांच्या मनातला प्रश्न त्यांना खूप काही सांगून जात होता. शिवजयंतीची सुरुवात रायगडावरून झाली तर त्याचे भविष्यात होणारे परिणाम टिळकांसारख्या द्रष्ट्या नेत्याला दिसत होते. मात्र ते सोपे नव्हते. न. र. फाटक त्यांच्या टिळक चरित्रात लिहितात, “उत्सवाचे ठिकाण रायगड. तो सरकारी जंगलखात्याच्या ताब्यात. डोंगराच्या खालील रानाप्रमाणे डोंगरावरदेखील रानच होते. त्यावेळी ओसाडी आणि ऐतिहासिक इमारतींची पडझड... याने गडाची अवस्था भयाण व दुर्गम झाली असल्यास नवल वाटायला नको. रायगडावर उत्सव करायचे ठरवले जरी असले तरी ते सोपे अजिबात नव्हते. महाड हाच मोठ्या वस्तीचा गाव. रायगडावर शिवजयंतीचा पहिलावहिला उत्सव कसा साजरा झाला, याची आठवण मूळचे महाडचे परंतु पुण्याला स्थायिक काळकर्ते शिवरामपंत परांजपे यांनी लिहिली आहे. पंत लिहितात, “लोकमान्य त्या छावणीमध्ये आल्यानंतर रात्रभर तेथे विश्रांती घेतील आणि नंतर ते पहाटेस गड चढून वर जातील अशी पुष्कळांची साहजिकच कल्पना होती. पण, हा कार्यक्रम अविश्रांत श्रम करण्याची सवय असलेल्या लोकमान्यांच्या उत्साही धडाडीला मुळीच पसंत पडला नाही. त्यांनी संध्याकाळचा फराळ झाल्यानंतर थोडी विश्रांती घेतल्यानंतर रात्रीच्या रात्री गडावर चढून जाण्याचा व तेथे पोहोचून मग झोप घेण्याचा निश्चय ठरवला. त्यांच्याबरोबर जी मंडळी पहाटेस उठून वर जाणार होती, त्या लोकांनीही लोकमान्यांच्याच समागमामध्ये रायगडावर चढून जाण्याची तयारी चालवली. अशा रीतीने शेकडो लोक इतक्या रात्री रायगड चढून जाण्याचे धाडस करण्याला लोकमान्यांच्या उद्दीपक उदाहरणामुळे उद्युक्त झाले. लगेच शेकडो मार्गदर्शक मजुरांनी आपल्या चुडी पेटवल्या. ओझेवाल्या मजुरांनी आपल्या पाहुणे मंडळींचे बोजे आपल्या डोक्यावर घेतले आणि चार-पाच लोकांच्या दरम्यान एकेक चुडवाला मनुष्य असा रीतीने जवळजवळ चार-पाचशे लोक एकेक माणसांची रांग चढून करून चालू लागले. शेकडो चुडी पेटलेल्या असून त्यांची लांबच लांब अशी एक रांग डोंगरातील वळणे घेत घेत वरवर चढत असलेली पाहून तळच्या छावणीमध्ये असलेल्या लोकांना हा डोंगरातील देखावा फारच मनोवेधक भासला. त्यातच ‘श्री शिवाजी महाराज की जय’ आणि ‘टिळक महाराज की जय’ अशा रणगर्जना त्या गडावर होऊ लागल्या आणि त्यांचे प्रतिध्वनी त्या गडाच्या दर्याखोर्यातून उत्पन्न होऊ लागले. त्यावेळी हा सारा रायगड किल्लाच त्या चुडीच्या उजेडामध्ये स्वदेशभक्तीने प्रज्वलित होऊन स्वराज्यसंस्थापनेची भाषा बोलू लागला आहे की काय असा भास झाला.” शिवजयंतीचा पहिलावाहिला उत्सव दोन दिवसांचा होता. पहिल्या दिवशी टिळकांचे समारोपाचे भाषण जोरदार झाले.छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक होणे हे राष्ट्रासाठी अत्यंत आवश्यक आहे, असाच टिळकांच्या बोलण्याचा सूर होता. दुसर्या दिवशी आलेले लोक गडावर हिंडले, फिरले, गडाची अवस्था त्यांना जाणवली, आपल्या तेजस्वी इतिहासाची साक्ष देणारा गड जो काहीसा एकाकी पडला होता, त्याला पुन्हा नव्याने उर्जितावस्था आणावी, याची जाणीव कुठेतरी गडावर हिंडताना लोकांना झाली असावी. “उत्सवाच्या निमित्ताने तीन हजार लोकांच्या पंगती रायगडावर उठल्या,” असे तर टिळकांनीच लिहिले आहे. भोजनानंतर आख्याने, कीर्तने झाली. शिवछत्रपतींच्या कार्यात ज्यांनी योगदान दिले त्यांचे सध्या हयात असलेले वंशज त्यांचाही या पहिल्यावहिल्या उत्सवाच्या निमित्ताने २५ एप्रिल १८९६ मध्ये लोकमान्य टिळकांच्या उपस्थितीत झालेल्या पहिल्या उत्सवात त्यावेळी तानाजी मालुसरे आणि येसाजी कंक इत्यादींच्या वंशजांस मानाचे नारळ देण्यात आल्याची नोंद त्यावेळच्या दैनिक केसरी आणि ऐतिहासिक दप्तरात करण्यात आली आहे.प्रतापगड किंवा रायगड किल्ल्यांना भेट देणारे शिवप्रेमी पोलादपूर तालुक्यातील तान्हाजी मालुसरे आणि शेलारमामा यांची समाधी असलेल्या उमरठ आणि साखर गावात असलेल्या सूर्याजी मालुसरे समाधी यांना भेट देतात. मुळातच जावळी ते राजधानी रायगड व बिरवाडीपर्यंत पसरलेला हा सह्याद्रीचा दुर्गम खोरा शिवकाळापूर्वीपासून ऐत्याहासिक किल्ले, माची, वाटा, खिंडी, घळई यांनी स्थापित असाच आहे. उंचच उंच डोंगर आणि दुर्गम झाडी असे निसर्गरम्य वरदान या भागाला लाभलेले आहे. प्रतापगड, चंद्रगड, कांगोरीगड, कोंढवी हे किल्ले, महादेवाचा मुरा, सडे गावातील चौक, बोरावळे गावातील जावळीकर मोऱ्यांपैकी एका बंधूंचा दगडी वाडा, पाच खिंड, तुर्भे खिंड, पारघाट, श्रीरामवरदायिनी-कापडे, बिरवाडी, महाड बंदर अशी अनेक ऐत्याहासिक स्थळे शिवकाळाच्या इतिहासाचे साक्षीदार आहेत. असे असले तरी इतिहासाचे कागदोपत्री पुरावे इतिहास संशोधकांच्या समोर येत नव्हते. ब्रिटिशांचे दडपण असल्यामुळे महाराष्ट्रभर बरेचसे कागद अडगळीत टाकले गेले होते. ग्रांट डफ, इतिहासाचार्य राजवाडे, यदुनाथ सरकार, रामकृष्ण भांडारकर, बिरवाडीचे दत्तो वामन पोतदार, गोविंद सखाराम सरदेसाई इत्यादी इतिहासाचा धांडोळा घेणारे महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात फिरू लागले. त्यामुळे अनेक ठिकाणी गोण्यांच्या मध्ये किंवा इतस्ततः कोंबून ठेवलेले पत्रव्यवहाराचे कागद, सनदा बाहेर येऊ लागले. बिरवाडी, वाळण बुद्रुक, वरंध, महाड मधील आणि पोलादपूर मधील देवळे येथील महत्वाचे कागद इतिहासाच्या अभ्यासकांना उपलब्ध होत नव्हते. चित्र्यांचा मूळपुरुष श्रीरंग प्रभू. त्याला पिलाजी आणि रामाजी असे दोन मुलगे होते. त्यांच्या दोन शाखा झाल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचे चिटणीस बाळाजी चित्रे हे दुसऱ्या शाखेतील रामाजींचे नातू. तर पोलादपूर चित्र्यांची शाखा पिलाजीपासून सुरु होते.
शांताराम आवळसकर हे महाडच्या परिसरात शिक्षक असताना त्यांनी ऐतिहासिक कागदपत्रे जमविण्यास सुरुवात केली. त्या विषयाची आत्यंतिक गोडी निर्माण झाल्याने तो त्यांच्या अध्ययन - संशोधनाचा विषय झाला होता. कागदपत्रांचा शोध घेत हिंडणे, जुनी दप्तरे पाहणे, ऐतिहासिक कागदपत्रांच्या नकला करणे, त्या पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळाकडे पाठवणे, अन्य संशोधकांबरोबर चर्चा करणे, संशोधित कागदपत्रांना विवेचक प्रस्तावना लिहिणे या प्रकाराची कामे ते करत असत. भारत इतिहास संशोधक मंडळाशी १९४० पासून त्यांचा संबंध आला होता. गतेतिहासाचा शोध घेत असताना राजकीय घटनांच्या अन्वयार्थाबरोबरच तत्कालीन भौगोलिक,आर्थिक, सामाजिक संदर्भ परिश्रमपूर्वक ध्यानात घेत आवळसकरांनी आपली संशोधनदृष्टी किती सूक्ष्म, चौफेर, व्यापक आणि विश्लेषक बनवली होती. त्यामुळे त्यांना वाळण बुद्रुक येथील तुकाराम झुरू कालगुडे (२४ ऑक्टोबर १६४३ / १० जानेवारी १६४५ / १७ ऑगस्ट १६४९ / १६ ऑगस्ट १६४८ आणि देवळे पोलादपूर येथील रावजी गोविंद चित्रे यांच्याकडील (२५ ऑगस्ट १६७६ / ३ ऑगस्ट १६९२ / १५ डिसेंबर १६९४ / २२ ऑक्टोबर १६९८ / २४ जून १७०२ / २ एप्रिल १७०८ / ४ मे १७०८ / २७ फेब्रुवारी १७०९ त्याचप्रमणे वरंध येथील तात्यासाहेब देशमुख यांच्याकडील ३ नोव्हेंबर १६९५ / ऑक्टोबर १७३३ ही महत्वाची कागदपत्रे सापडली होती. या ठेव्याचा शोध मला लागला. प्रतापगडापासून रायगडापर्यंत घडलेल्या महत्वाच्या घटना म्हणजे चंद्रराव मोरे, छत्रपती शिवाजी महाराज आणि पेशव्यांच्या काळातील ठळक नोंदी असलेला हा पत्रव्यवहार आहे.
इ.स. १७३४च्या जानेवारी महिन्यात काळ नदीच्या खोऱ्यात पेशव्यांचे आणि सिद्दयाचे मोठे युद्ध झाले. किल्ले बाणकोट, गोवेले, विन्हेरे, पाचाड मारीत सिद्दी अफ्वानी रायगडाच्या पायथ्यास आणि पुढे देवळे येथे पोहोचला. देवळे येथे त्यावेळी चित्रेंचा गवताने शाकारलेला भव्य चौसोपी वाडा होता. सिद्दीने त्यावेळी धनुष्याला आगीचे पलिते सोडून या वाड्यास आग लावली, त्यामुळे बराचसा महत्वाचा दस्तऐवज जळून खाक झाला. मध्ययुगीन महाराष्ट्रातील देशमुख-देशपांडे-देसाई ही महत्त्वाची वतने होती. देश म्हणजे परगणा (हल्लीच्या तालुक्याएवढा किंवा मोठा प्रदेश) होय. त्यावर अधिकार गाजवणारी ती विविध वतने असत. देशमुख म्हणजे देशमुख्य होय. देशाच्या अंतर्गत व्यवस्थेत तो सर्वाधिकारी असे. ‘राज्यातील देशमुख आदिकरून यास वतनदार ही प्राकृत परिभाषा मात्र आहे. ते स्वल्पच परंतु स्वतंत्र देशनायकच होते. देशमुखाला समाजात व राजदरबारातही मान असे. देशपांडे हा देशमुखांच्या हाताखालील अधिकारी होय. ग्रामव्यवस्थेत जे स्थान कुलकर्ण्याला, तेच स्थान परगण्याच्या व्यवस्थेत देशपांड्याला असे. परगण्यातील जमाबंदीचे सर्व कागदपत्र देशपांड्याच्या स्वाधीन असत. त्यामुळे चित्रे म्हणजे महाड-पोलादपूर मधील देशपांडे या हुद्द्यावर काम करीत देशपांड्याला त्याच्या कामाच्या स्वरूपावरून देशकुळकर्णी असेही म्हणत असत. रावजी गोविंद चित्रे हे पोलादपूर येथे राहात. धिप्पाड शरीरयष्टीअसलेले जनमानसावर जरब असलेले रावजी घोड्यावरून पोलादपूर पेठेत फिरत असत. तर देवळे येथे वास्तव्यास असलेल्या कमलाकरदादा चित्रे यांना पाहिलेले अनेक जण आहेत. प्रकांड पंडित आणि लोकांसाठी सहकार्याचा हात पुढे करणारे व्यक्तिमत्त्व अशीच त्यांची ओळख होती. चंद्रगड किल्ल्याची वतनदारी त्यांच्याकडे होती. देश स्वातंत्र्य होईपर्यंत 1 रुपया चित्र्यांकडे येत असे आणि तो 16 जण हिश्ह्याने वाटून घेत.
महत्वाचे - कांगोरी किल्ला, मालुसरे, कादवा डोंगर (महिपतगड ), कापडे बुद्रुक, केवनाळे, कोंढवी तर्फ, कोंढवी कसबा, कोंढवी परगणे, घेरा चंद्रगड, चंद्रगड किल्ला, चंद्रराव मोरे, जावळी सुभा, जोर खोरे, ढवळा घाट, ढवळे मौजे, देवळे, साखर, पारघाट, बालाजी मोरे (चंद्रराव), बिरवाडी, वरदायिनी, वाळण बुद्रुक, विन्हेरे, शंकराजी गोळे, सिंहगड, हणमंतराव मोरे, हबाजी नाईक उतेकर, हिरोजीराव दरेकर, क्षेत्रपाल यांचा संदर्भ असलेला मला सापडलेला पत्रव्यवहार मी लवकरच या ठिकाणी सर्वांसाठी प्रसिद्ध करतो.
रवींद्र मालुसरे
अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई, ९३२३११७७०४
सुंदर अभ्यासपूर्ण ऐतिहासिक माहीती, पोलादपूर तालुक्याच्या इतिहासावर प्रकाश टाकत हातात साहेब. शुभेच्छा!
उत्तर द्याहटवाआपल्या कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा! नवीन संशोधक व पीढीस मार्गदर्शन ठरेल.
उत्तर द्याहटवा